व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची ओळख घडल्यानंतर आता पुढे काय?

देवाची ओळख घडल्यानंतर आता पुढे काय?

“आता तुम्ही देवाला ओळखता.”—गलती. ४:९.

१. वैमानिक उड्डाणाआधी तपासणी सूचीचा वापर का करतात?

 अतिशय यशस्वी ठरलेल्या एका विमान कंपनीचे वैमानिक प्रत्येक उड्डाणाआधी एका तपासणी सूचीच्या साहाय्याने विमानाची तपासणी करतात. या सूचीत ३० पेक्षा जास्त अशा गोष्टी आहेत ज्यांची त्यांना खातरी करावी लागते. प्रत्येक उड्डाणाआधी या तपासणी सूचीच्या साहाय्याने त्यांनी काळजीपूर्वक विमानाची तपासणी न केल्यास एखादी भयानक दुर्घटना घडण्याची शक्यता वाढते. या तपासणी सूचीचा प्रत्येक वेळी वापर करण्याचे खासकरून कोणत्या वैमानिकाला आवर्जून सांगितले जाते, तुम्हाला माहीत आहे का? सर्वात अनुभवी वैमानिकाला! कारण कालांतराने अनुभवी वैमानिक आत्मसंतुष्ट बनू शकतो आणि त्यामुळे उड्डाणाआधी तपासणी करताना प्रत्येक गोष्टीची खातरी करण्याकडे त्याच्याकडून सहज दुर्लक्ष होऊ शकते.

२. ख्रिश्‍चनांना कोणती तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे?

सुरक्षेविषयी जागरूक असणाऱ्‍या वैमानिकाप्रमाणेच तुम्हीसुद्धा तुमच्या विश्‍वासाचे परीक्षण करण्यासाठी एका तपासणी सूचीचा वापर करू शकता, जेणेकरून कठीण परिस्थितीतही तुमचा विश्‍वास डळमळणार नाही. तुमचा बाप्तिस्मा अलीकडेच झाला असो, किंवा तुम्ही अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करत असोत, यहोवा देवावरील तुमचा विश्‍वास कितपत दृढ आहे आणि त्याच्याप्रती तुम्ही कितपत समर्पित आहात याची वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारे वेळोवेळी व काळजीपूर्वक तपासणी न केल्यास आध्यात्मिक अर्थाने तुमचा नाश होऊ शकतो. बायबल आपल्याला अशी ताकीद देते: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.”—१ करिंथ. १०:१२.

३. गलतीया येथील ख्रिश्‍चनांनी काय करणे गरजेचे होते?

गलतीया येथील ख्रिश्‍चनांना त्यांचा विश्‍वास कितपत दृढ होता हे तपासून पाहणे आणि त्यांना मिळालेल्या आध्यात्मिक स्वातंत्र्याची कदर करणे गरजेचे होते. येशूच्या बलिदानाद्वारे त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना एका अतिशय खास मार्गाने देवाला जाणून घेणे शक्य झाले. ते देवाचे पुत्र बनू शकत होते! (गलती. ४:९) पण या अद्‌भुत नातेसंबंधात राहण्यासाठी गलतीकरांना यहुदी मत समर्थकांच्या शिकवणींचा धिक्कार करणे गरजेचे होते, ज्यांचा असा दावा होता की मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे अत्यावश्‍यक आहे. खरेतर, मंडळीतील बेसुनत विदेशी कधीही नियमशास्त्राच्या अधीन नव्हते! यहुदी व विदेशी या दोन्ही प्रकारच्या ख्रिश्‍चनांनी आध्यात्मिक प्रगती करणे गरजेचे होते. मोशेद्वारे देण्यात आलेल्या नियमशास्त्राच्या व्यवस्थेद्वारे आपण देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही हे त्यांनी ओळखणे महत्त्वाचे होते.

देवाला ओळखण्याच्या दिशेने सुरुवातीची पावले

४, ५. पौलाने गलतीकरांना कोणता सल्ला दिला आणि तो आपल्याकरता अर्थपूर्ण कसा आहे?

प्रेषित पौलाने गलतीकरांना दिलेला सल्ला एका खास उद्देशाने बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आला. खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी, मग ते कोणत्याही काळात जगत असले, तरी त्यांनी बायबलच्या अनमोल सत्याकडे पाठ फिरवून पूर्वीच्या गोष्टींकडे परत जाऊ नये म्हणून हा सल्ला बायबलमध्ये लिहिण्यात आला. यहोवाने केवळ गलतीया येथील मंडळ्यांनाच नव्हे, तर त्याच्या सर्व उपासकांना विश्‍वासात स्थिर राहण्याचे प्रोत्साहन देण्याकरता प्रेषित पौलाला प्रेरित केले.

आपल्याला खोट्या धर्मापासून कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळाले आणि आपण कशा प्रकारे यहोवाचे साक्षीदार बनलो हे आपण सर्वांनीच आठवणीत ठेवले पाहिजे. असे करण्याकरता या दोन प्रश्‍नांवर विचार करा: बाप्तिस्मा घेण्यास पात्र ठरण्याकरता तुम्ही कोणती पावले उचलली हे तुम्हाला आठवते का? तुम्ही देवाला ओळखू लागल्यामुळे आणि देवानेही तुमची ओळख करून घेतल्यामुळे तुम्हाला खरे आध्यात्मिक स्वातंत्र्य कशा प्रकारे अनुभवता आले हे तुम्हाला आठवते का?

६. आपण कोणत्या तपासणी सूचीविषयी पाहणार आहोत?

बाप्तिस्मा घेण्याआधी आपण सर्वांनी नऊ पावले उचलली होती. ती पावले,  “बाप्तिस्म्याकरता उचललेली व पुढील प्रगतीकरता साहाय्यक ठरणारी पावले” या शीर्षकाच्या चौकटीत एखाद्या तपासणी सूचीसारखी देण्यात आली आहेत. वेळोवेळी स्वतःला या नऊ पावलांची आठवण करून दिल्यामुळे, आपल्याला जगातील गोष्टींकडे परत फिरण्याच्या मोहाचा प्रतिकार करणे शक्य होईल. एक अनुभवी व दक्ष वैमानिक ज्या प्रकारे उड्डाणाआधी आपली तपासणी सूची पडताळून पाहिल्यामुळे सुरक्षित रीत्या विमान चालवू शकतो, त्याच प्रकारे तुम्हीही ही आध्यात्मिक तपासणी सूची पडताळण्याद्वारे यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहू शकता.

देवाने ओळख करून घेतलेले आध्यात्मिक प्रगती करत राहतात

७. आपण कोणत्या नमुन्याचे पालन केले पाहिजे, आणि का?

एका वैमानिकाची तपासणी सूची त्याला याची आठवण करून देते, की प्रत्येक उड्डाणाआधी त्याने ठरावीक गोष्टींची खातरी करून घेतली पाहिजे. आपणसुद्धा नियमित रीत्या स्वतःचे परीक्षण केले पाहिजे. तसेच बाप्तिस्मा झाल्यापासून आपण ज्या आध्यात्मिक नित्यक्रमाचे पालन करत आलो आहोत तोदेखील आपण वेळोवेळी तपासून पाहिला पाहिजे. पौलाने तीमथ्याला लिहिले: “ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्‍वास व प्रीती यामध्ये दृढपणे राख.” (२ तीम. १:१३) ही सुवचने देवाच्या वचनात सापडतात. (१ तीम. ६:३) ज्या प्रकारे एका कलाकाराने काढलेल्या रेखाचित्रावरून आपल्याला चित्राची रूपरेषा समजते, त्याच प्रकारे सत्याचा “नमुना” एका व्यापक रूपरेषेसारखा आहे; या रूपरेषेच्या साहाय्याने, यहोवा आपल्याकडून काय अपेक्षितो हे समजून घेऊन त्याचे पालन करणे आपल्याला शक्य होते. तर आता आपण बाप्तिस्मा घेण्याआधी उचललेली नऊ पावले विचारात घेऊ या, आणि सत्याच्या नमुन्याचे आपण किती जवळून पालन करत आहोत हे तपासून पाहू या.

८, ९. (क) आपले ज्ञान व विश्‍वास वाढत राहणे का गरजेचे आहे? (ख) आध्यात्मिक प्रगती करणे का महत्त्वाचे आहे आणि ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया का आहे हे उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.

आपल्या या तपासणी सूचीतील पहिले पाऊल म्हणजे ज्ञान घेणे. यानंतर आपण विश्‍वास उत्पन्‍न करू शकतो. पण या दोन्ही बाबतींत आपली वाढ होणे गरजेचे आहे. (२ थेस्सलनी. १:३) वाढ होताना अनेक प्रगतीशील बदल होतात. एखादी गोष्ट वाढणे म्हणजे तिच्यात भर पडणे किंवा ती मोठी होणे. तेव्हा, बाप्तिस्म्यानंतर यहोवासोबतचा आपला नातेसंबंध अधिकाधिक घनिष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपली वाढ खुंटणार नाही.

झाडाची वाढ होत राहते. त्याच प्रकारे ख्रिश्‍चनांचीही वाढ होत राहिली पाहिजे

आपल्या आध्यात्मिक वाढीची तुलना आपण एक झाड ज्या प्रकारे वाढते त्याच्याशी करू शकतो. झाडाची मुळे अगदी खोलवर रुजली असतील आणि दूरपर्यंत पसरली असतील तर ते झाड वाढून अतिशय मोठे बनते. उदाहरणार्थ लेबनानमधील गंधसरूची विशाल वृक्षे १२ मजली इमारतीएवढी उंच होतात. त्यांची मुळे अतिशय मजबूत असतात व ती जमिनीत खोलवर रुजलेली असतात. या वृक्षाच्या खोडाचा घेरा कधीकधी ४० फुट (१२ मी.) इतका असतो. (गीत. ५:१५) झाडाची सुरुवातीला झपाट्याने झालेली वाढ थांबल्यानंतर, पुढेही झाडाची वाढ होतच राहते; पण ही वाढ तितक्या स्पष्टपणे दिसून येत नाही. दर वर्षी झाडाचे खोड रुंदावत जाते आणि झाडाची मुळे आणखी खोलवर व दूरवर पसरतात आणि यामुळे झाडाला मजबुती मिळते. एका ख्रिश्‍चनाच्या आध्यात्मिक वाढीच्या बाबतीतही असेच घडते. आपण बायबल अभ्यास करतो त्या सुरुवातीच्या काळात आपली आध्यात्मिक वाढ झपाट्याने होते व त्यानंतर आपण बाप्तिस्मा घेतो. मंडळीतील सर्वांना आपली ही प्रगती पाहून आनंद वाटतो. कदाचित आपण पायनियर सेवा करण्यास किंवा इतर विशेषाधिकार मिळवण्यासही पात्र ठरू शकतो. पुढील वर्षांत मात्र आपली सातत्याने होणारी आध्यात्मिक वाढ कदाचित तितक्या सहजासहजी दिसून येणार नाही. तरीपण, आपण विश्‍वासात व ज्ञानात वाढत जाऊन, “प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत” प्रगती केली पाहिजे. (इफिस. ४:१३) अशा रीतीने, जणू एका लहानशा अंकुरापासून एक पूर्ण वाढलेला मोठा वृक्ष, अर्थात एक परिपक्व ख्रिस्ती बनेपर्यंत आपली प्रगती होते.

१०. परिपक्व ख्रिश्‍चनांचीही वाढ होत राहणे का गरजेचे आहे?

१० पण आपली वाढ तेथेच थांबायला नको. आपल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत व आपला विश्‍वास दिवसेंदिवस दृढ झाला पाहिजे. यामुळे आपल्याला जणू देवाच्या वचनाच्या जमिनीत स्थिरावणे शक्य होईल. (नीति. १२:३) ख्रिस्ती मंडळीत असे अनेक बंधुभगिनी आहेत, ज्यांनी हेच केले आहे. उदाहरणार्थ, तीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या एका बांधवाने सांगितले की ते अजूनही आध्यात्मिक प्रगती करतच आहेत. ते म्हणतात: “बायबलविषयीची माझी कदर खूप वाढली आहे. बायबलमधील तत्त्वांचं व नियमांचं पालन करण्याचे सतत नवनवीन मार्ग मला दिसून येतात. तसंच, सेवाकार्याबद्दलही माझी कदर दिवसेंदिवस वाढतच आहे.”

देवासोबत मैत्र वाढवा

११. आपण यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे कसे जाणून घेऊ शकतो?

११ आपली आध्यात्मिक वाढ होण्यात, एक घनिष्ट मित्र व पिता या नात्याने यहोवाच्या आणखी जवळ येणेदेखील समाविष्ट आहे. यहोवाचे आपल्यावर प्रेम आहे याची आपल्याला खातरी वाटावी आणि आपल्याला सुरक्षित वाटावे असे त्याला वाटते. लहान मुलाला आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या कुशीत बसल्यावर जसे वाटते किंवा एखाद्या भरवशाच्या व विश्‍वासू मित्राच्या सहवासात आपल्याला जसे वाटते तसे आपल्याला यहोवाबद्दल वाटावे अशी त्याची इच्छा आहे. साहजिकच, यहोवासोबत असा घनिष्ट नातेसंबंध एका रात्रीत निर्माण होत नाही. यहोवाची ओळख घडण्यासाठी आणि त्याच्याविषयी आपल्या मनात प्रेम उत्पन्‍न होण्यासाठी वेळ लागेल. म्हणूनच, यहोवाचे व्यक्‍तिमत्त्व आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी दररोज न चुकता त्याचे वचन वाचण्याकरता वेळ काढा. तसेच, टेहळणी बुरूज नियतकालिकाचा प्रत्येक अंक व इतर बायबल आधारित प्रकाशनेदेखील वाचा.

१२. यहोवाने आपल्याला ओळखावे म्हणून आपण काय केले पाहिजे?

१२ मनःपूर्वक प्रार्थना व चांगला सहवास यांद्वारेही देवाचे मित्र त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध आणखी दृढ करू शकतात. (मलाखी ३:१६ वाचा.) यहोवाचे “कान त्यांच्या विनंतीकडे असतात.” (१ पेत्र ३:१२) आपण प्रार्थनेत यहोवाला मदतीची याचना करतो, तेव्हा एका प्रेमळ पालकाप्रमाणे तो आपल्याकडे लक्ष देतो. म्हणूनच, आपण “प्रार्थनेत तत्पर” राहिले पाहिजे. (रोम. १२:१२) देवाच्या मदतीशिवाय आपण एक परिपक्व ख्रिस्ती या नात्याने विश्‍वासात स्थिर राहू शकत नाही. या जगाकडून येणाऱ्‍या अनेक दबावांवर आपण स्वतःच्या बळावर मात करू शकत नाही. प्रार्थनेत तत्पर न राहिल्यास, देव आपल्याला पदोपदी जे सामर्थ्य देऊ इच्छितो व देऊ शकतो त्यापासून आपण स्वतःला वंचित करू. तुम्ही एखाद्या भरवशाच्या मित्राशी ज्या प्रकारे बोलता त्या प्रकारे प्रार्थनेत यहोवाशी बोलता का? की याबाबतीत आणखी प्रगती करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते?—यिर्म. १६:१९.

१३. सहविश्‍वासू बांधवांसोबत सहवास राखणे आध्यात्मिक वाढीकरता इतके महत्त्वाचे का आहे?

१३ जे यहोवावर “भाव” ठेवतात त्यांच्यावर तो प्रेम करतो. म्हणूनच, देवाची ओळख घडल्यानंतरही आपण त्याच्या खऱ्‍या उपासकांच्या मंडळीसोबत नियमित सहवास राखला पाहिजे. (नहू. १:७) नैराश्‍याने भरलेल्या या जगात, आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्‍या बंधुभगिनींच्या सहवासात राहणे सुज्ञपणाचे आहे. यामुळे कोणते फायदे मिळतात? मंडळीतील बांधव तुम्हाला “प्रीति व सत्कर्मे करावयास” उत्तेजन देतील. (इब्री १०:२४, २५) ख्रिस्ती बांधव एकमेकांवर प्रेम करतात असे पौलाने इब्रीकरांना लिहिले होते. पण असे प्रेम असण्याकरता एक बंधुसमाज, समान विश्‍वास असलेल्या उपासकांचा समूह, दुसऱ्‍या शब्दांत एक मंडळी असणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे प्रेम दाखवण्याकरता आपण इतर ख्रिश्‍चनांसोबत मिळून कार्य करणे आवश्‍यक आहे. तेव्हा, आपल्या तपासणी सूचीवर सभांना नियमित रीत्या उपस्थित राहणे व त्यांत सहभाग घेणे या गोष्टींची खातरी करण्यास विसरू नका.

१४. पश्‍चात्ताप करणे व मागे फिरणे ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया का आहे?

१४ ख्रिस्ती बनण्याअगोदर आपण पश्‍चात्ताप केला आणि पूर्वीच्या पापांपासून मागे फिरलो. पण पश्‍चात्ताप करणे ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. कारण, अपरिपूर्ण मानव या नात्याने आपल्यामध्ये अजूनही पापी प्रवृत्ती आहे. ती विळखा घालून बसलेल्या व कोणत्याही क्षणी दंश करेल अशा सापासारखी आहे. (रोम. ३:९, १०; ६:१२-१४) म्हणूनच आपण आपल्या दोषांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, स्वतःवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. आनंदाची गोष्ट म्हणजे, आपण आपल्या दुर्बलतांवर मात करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो आणि स्वतःमध्ये आवश्‍यक बदल करतो तेव्हा यहोवा आपल्याशी सहनशीलपणे व्यवहार करतो. (फिलिप्पै. २:१२; २ पेत्र ३:९) पण, याकरता आपण आपल्या वेळेचा व साधनांचा योग्य रीत्या उपयोग करणे व स्वार्थी इच्छा-आकांक्षा बाजूला सारणे गरजेचे आहे. एका बहिणीने लिहिले: “मी सत्यातच लहानाची मोठी झाले. पण लहानपणापासूनच यहोवाबद्दलचा माझा दृष्टिकोन इतरांपेक्षा फार वेगळा होता. मला यहोवाची खूप भीती वाटायची आणि मी कधीही त्याला आनंदित करू शकणार नाही असं मला नेहमी वाटायचं.” काही काळाने, या बहिणीच्या हातून काही चुका घडल्यामुळे ती “आध्यात्मिक रीत्या डळमळू” लागली. ती पुढे सांगते, “माझं यहोवावर प्रेम नव्हतं असं नाही, पण मी खऱ्‍या अर्थानं त्याला ओळखलंच नव्हतं. बऱ्‍याच मनःपूर्वक प्रार्थनांनंतर मी हळूहळू आध्यात्मिक रीत्या सावरू लागले.” ती सांगते, “एखाद्या लहान मुलाला हात धरून चालवावं, तसं यहोवानं माझ्यासमोर असलेल्या एकेका अडथळ्यावर मात करायला अतिशय कोमलतेनं मला मदत केली, आणि मी काय केलं पाहिजे याची मला जाणीव करून दिली.”

१५. येशू व त्याचा पिता कशाची दखल घेतात?

१५ राज्याचा संदेश लोकांना सांगत राहा. पेत्र व इतर प्रेषितांची तुरुंगातून चमत्कारिक रीत्या सुटका झाल्यानंतर देवाच्या दूताने त्यांना सुवार्ता सांगत राहण्याचे प्रोत्साहन दिले होते. (प्रे. कृत्ये ५:१९-२१) आपली तपासणी सूची पडताळून पाहताना, आणखी एक गोष्ट जिची आपण खातरी केली पाहिजे ती म्हणजे दर आठवड्यात क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेणे. येशू व त्याचा पिता आपल्या विश्‍वासाची व आपल्या सेवाकार्याचीही दखल घेतात. (प्रकटी. २:१९) याआधीच्या एका परिच्छेदात ज्यांचे शब्द उद्धृत करण्यात आले होते ते वडील म्हणतात: “क्षेत्र सेवाकार्य हीच आपली ओळख आहे.”

१६. आपण यहोवाला केलेल्या समर्पणाविषयी मनन करणे का चांगले आहे?

१६ तुमच्या समर्पणाविषयी मनन करा. आपल्याजवळ जी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ती म्हणजे यहोवासोबतचा आपला वैयक्‍तिक नातेसंबंध. जे यहोवाचे आहेत त्यांना तो ओळखतो. (यशया ४४:५ वाचा.) तेव्हा, यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध कितपत दृढ आहे याचे प्रार्थनापूर्वक परीक्षण करा. तसेच, तुमच्या बाप्तिस्म्याची महत्त्वाची तारीख आठवणीत ठेवा. असे केल्यामुळे, तुमचा बाप्तिस्मा हा तुम्ही जीवनात घेतलेल्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयाचे प्रतीक आहे हे सदोदित आठवणीत ठेवणे तुम्हाला शक्य होईल.

धीर धरण्याद्वारे यहोवाच्या जवळ राहा

१७. यहोवाच्या जवळ राहण्यासाठी धीराची आवश्‍यकता का आहे?

१७ गलतीकरांना लिहिताना पौलाने धीर धरण्याच्या गरजेवर भर दिला होता. (गलती. ६:९) आजही ख्रिश्‍चनांनी धीर धरणे गरजेचे आहे. तुमच्यासमोर कठीण प्रसंग जरूर येतील, पण यहोवा तुम्हाला साहाय्य करेल. तेव्हा, पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करत राहा. असे केल्यास तुमचे मनोबल वाढेल, कारण यहोवा तुमच्या मनातील दुःख व चिंता काढून तुम्हाला आनंद व शांती देईल. (मत्त. ७:७-११) याचा विचार करा: जर यहोवा पक्ष्यांची काळजी घेतो तर मग तो तुमची किती जास्त काळजी घेईल, कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता आणि तुम्ही त्याला आपले जीवनदेखील समर्पित केले आहे? (मत्त. १०:२९-३१) तेव्हा, कोणतेही दबाव तुमच्यावर आले तरीसुद्धा कधीही माघार घेऊ नका; कधीही हिंमत हारू नका. यहोवाने आपली ओळख करून घेतली असल्यामुळे आपल्याला खरोखर किती अद्‌भुत आशीर्वाद लाभले आहेत!

१८. देवाची ओळख करून घेतल्यानंतर आता तुम्ही पुढे काय करणार?

१८ तुम्ही अलीकडेच यहोवाची ओळख करून घेतली असेल आणि बाप्तिस्मा घेतला असेल, तर आता पुढे काय? यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा आणि आध्यात्मिक रीत्या परिपक्व बनण्याचा प्रयत्न करत राहा. आणि जर तुमचा बाप्तिस्मा होऊन अनेक वर्षे झाली असतील, तर आता पुढे काय? तुम्हीदेखील यहोवाविषयी आणखी सखोल ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे. यहोवासोबतच्या नातेसंबंधाविषयी आपण कधीही आत्मसंतुष्ट मनोवृत्ती बाळगू नये. त्याउलट, आपण सर्वांनी वेळोवेळी आपली आध्यात्मिक तपासणी सूची पडताळून पाहिली पाहिजे; आणि आपला प्रेमळ पिता, मित्र व देव यहोवा याच्यासोबतचा आपला नातेसंबंध दिवसेंदिवस अधिकाधिक घनिष्ट होत आहे याची खातरी केली पाहिजे!—२ करिंथकर १३:५, ६ वाचा.