त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले मेक्सिकोमध्ये
दिवसेंदिवस कित्येक तरुण साक्षीदार ख्रिस्ती सेवा वाढवण्याकरता आपले जीवन साधे करत आहेत हे पाहून खूप आनंद होतो. (मत्त. ६:२२) ते कोणते फेरबदल करतात? त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? जाणून घेण्यासाठी, सध्या मेक्सिकोमध्ये सेवा करत असलेल्यांपैकी काही जणांचा परिचय करून घेऊ या.
“आम्हाला बदल करावाच लागेल”
अमेरिकेतील डस्टिन आणि जेसा यांचा विवाह जानेवारी २००७ मध्ये झाला. एक बोट विकत घेण्याचे व वर्षभर त्यात राहण्याचे ते खूप दिवसांपासून स्वप्न पाहत होते. त्यांच्या लग्नानंतर त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. पॅसिफिक महासागरापासून थोड्याच अंतरावर, अमेरिकेतील ऑरिगन राज्यातील ॲस्टोरिया नावाच्या एका सुंदर शहराजवळ ते या बोटीत राहू लागले. हे शहर चोहोकडून हिरव्यागार टेकड्यांनी आणि बर्फाच्छादित डोंगरांनी वेढलेले होते. डस्टिन म्हणतो, “सभोवतालचे सुंदर देखावे पाहून भान हरखून जायचं!” डस्टिन व जेसा यांना वाटत होते की ते यहोवावर विसंबून राहून एक साधे जीवन जगत आहेत. त्यांनी असा विचार केला, की ‘शेवटी आम्ही २६ फूट लांब बोटीवर राहतो, अर्धवेळेची नोकरी करतो, दुसरी भाषा बोलणाऱ्या मंडळीसोबत सहवास करतो आणि अधूनमधून साहाय्यक पायनियर म्हणून सेवाही करतो.’ पण काही काळाने ते या निष्कर्षावर आले की ते स्वतःची फसवणूक करत आहेत. डस्टिन म्हणतो, “मंडळीसोबत मिळून कार्य करण्याऐवजी आमचा बहुतेक वेळ बोट दुरुस्त करण्यातच जायचा. आम्हाला माहीत होतं की जर यहोवाला
खरोखरच पहिल्या स्थानी ठेवायचं असेल, तर आम्हाला बदल करावाच लागेल.”जेसा म्हणते, “लग्न होण्याआधी, मी मेक्सिकोमध्ये राहायचे व इंग्रजी भाषा बोलणाऱ्या मंडळीसोबत सहवास करायचे. मला तिथं सेवा करताना खूप आनंद मिळाला आणि त्यामुळं पुन्हा तिथं जाण्यास मी उत्सुक होते.” दुसरीकडे जाऊन सेवा करण्याची त्यांची इच्छा बळकट करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कौटुंबिक उपासनेदरम्यान अशा बंधुभगिनींच्या जीवन कथा वाचण्यास सुरुवात केली जे जास्त गरज असलेल्या देशांत सेवा करण्यास गेले होते. (योहा. ४:३५) डस्टिन म्हणतो, “आम्हालाही हा आनंद अनुभवायचा होता.” मेक्सिकोमधील नुकत्याच तयार झालेल्या गटाला मदतीची गरज आहे असे जेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले, तेव्हा डस्टिन व जेसा यांनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी आपली नोकरी सोडली, बोट विकली आणि ते मेक्सिकोला गेले.
“आमचा निर्णय सर्वात उत्तम होता”
डस्टिन व जेसा, टेकोमान या शहरात राहण्यास गेले. हे शहरदेखील पॅसिफिक महासागराच्या जवळच, पण ॲस्टोरियाच्या दक्षिणेकडे ४,३४५ किमी अंतरावर होते. डस्टिन म्हणतो, “आता आम्ही थंड वारा व डोंगरांच्या दृश्यांऐवजी, रखरखीत ऊन असलेल्या आणि दूर दूरपर्यंत फक्त लिंबाची झाडे दिसणाऱ्या ठिकाणी राहत होतो.” सुरुवातीला त्यांना नोकरी शोधणे कठीण गेले. पुरेसे पैसे नसल्यामुळे, कित्येक आठवड्यांपर्यंत भात व बीन्स (शेंगा) हेच त्यांचे दोन्ही वेळचे जेवण होते. जेसा म्हणते, “पण भात व बीन्स खाऊन खाऊन उबग आला त्याच दरम्यान आमचे बायबल विद्यार्थी आम्हाला आंबे, केळी, पपया आणि हो, पिशव्याभरून लिंबं देऊ लागले!” काही काळानंतर डस्टिन व जेसा यांना ऑनलाईन भाषा शिकवणाऱ्या एका शाळेत काम मिळाले, जी ताइवानमध्ये होती. आता या नोकरीतून मिळणाऱ्या पैशांत ते त्यांच्या दररोजच्या गरजा चांगल्याने भागवू शकतात.
डस्टिन व जेसा यांना त्यांच्या नव्या जीवनशैलीविषयी कसे वाटते? ते सांगतात, “इथं येण्याचा आमचा निर्णय सर्वात उत्तम होता. यहोवासोबतचा व एकमेकांसोबतचा आमचा नातेसंबंध आम्ही कधी विचारही केला नाही इतका मजबूत झाला आहे. दररोज आम्ही दोघं मिळून प्रचाराला जातो, बायबल विद्यार्थ्यांना मदत कशी करू शकतो याची चर्चा करतो आणि सभांची तयारी करतो. यांसारख्या बऱ्याच गोष्टी आम्ही एकत्र मिळून करतो. शिवाय, पूर्वी आमच्यावर सतत काही ना काही दबाव असायचा, पण आता आम्हाला तो जराही जाणवत नाही.” ते पुढे म्हणतात, “‘परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा’ या स्तोत्र ३४:८ मध्ये दिलेल्या अभिवचनाचं सत्य, जे आधी आम्हाला कळलं नव्हतं ते आता चांगल्या प्रकारे कळलं आहे.”
स्वेच्छेने कार्य करणाऱ्या हजारो जणांना प्रेरणा कोठून मिळते?
विशीत व तिशीत असलेले २,९०० पेक्षा जास्त विवाहित व अविवाहित बंधुभगिनी मेक्सिकोमधील अद्यापही राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेवा करत
आहेत. या सर्वांनी हे आव्हानात्मक कार्य का निवडले? त्यांच्यापैकी काहींना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी तीन मुख्य कारणे सांगितली. कोणकोणती कारणे?यहोवाप्रती व सहमानवांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी. लेटिस्या १८ वर्षांची होती तेव्हा तिचा बाप्तिस्मा झाला. ती म्हणते, “मी यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं त्याअर्थी मी संपूर्ण मनानं व जिवानं त्याची सेवा केली पाहिजे याची मला जाणीव झाली. म्हणून त्याच्याप्रती असलेलं माझं निःस्वार्थ प्रेम प्रदर्शित करण्यासाठी मला जास्तीत जास्त वेळ व शक्ती त्याची सेवा करण्यात घालवायची होती.” (मार्क १२:३०) एर्मीलो लेटिस्याचा पती आहे. विशीत असताना तो राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी गेला होता. तो म्हणतो, “मला याची जाणीव झाली की शेजाऱ्यांप्रती माझं प्रेम दाखवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्यांना त्यांची आध्यात्मिक गरज पूर्ण करण्याकरता मदत करणे.” (मार्क १२:३१) म्हणून त्याने माँटेर्रेई हे समृद्ध शहर सोडले, जिथे तो एका बँकेत काम करत होता व एक आरामाचे जीवन जगत होता आणि एका लहानशा शहरात राहायला गेला.
खरा व दीर्घकालीन आनंद अनुभवण्यासाठी. लेटिस्याचा बाप्तिस्मा झाल्याच्या थोड्याच काळानंतर, ती एका अनुभवी पायनियर बहिणीसोबत एका महिन्यासाठी दुर्गम भागातील एका शहरात प्रचार करण्यासाठी गेली. लेटिस्या सांगते, “मी आश्चर्यचकित झाले. राज्याच्या संदेशाप्रती लोकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला. महिन्याच्या अखेरीस मी स्वतःला म्हणाले, ‘मला माझ्या जीवनात असंच काहीतरी करायचं आहे!’” त्याच प्रकारे, विशीत असलेली एक अविवाहित बहीण एस्ली हिला या सेवेतून मिळणारा आनंद पाहून प्रेरणा मिळाली. हायस्कूलमध्ये असताना ती अशा बऱ्याच आवेशी साक्षीदारांना भेटली होती जे जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करत होते. ती म्हणते, “या बंधुभगिनींचे आनंदी चेहरे पाहून मलासुद्धा असंच जीवन जगण्याची तीव्र इच्छा होऊ लागली.” बऱ्याच बहिणींनी एस्लीसारखा प्रतिसाद दाखवला आहे. मेक्सिकोमध्ये ६८० पेक्षा जास्त अविवाहित बहिणी जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करत आहेत. त्यांनी तरुण व वयस्क लोकांसमोर किती उत्तम उदाहरण मांडले आहे!
एक अर्थभरीत व समाधानी जीवन जगण्यासाठी. एस्ली हिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला महाविद्यालयातून शिष्यवृत्ती देऊ करण्यात आली. तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला शिष्यवृत्ती स्वीकारण्याचे व “चारचौघांसारखे जीवन” जगण्याचे प्रोत्साहन दिले—उच्च शिक्षण घेणे, करियर करणे, कार घेणे आणि जगभर फिरणे. पण तिने त्यांचा सल्ला ऐकला नाही. एस्ली म्हणते, “माझे बरेच ख्रिस्ती मित्र या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागले. आणि माझ्या लक्षात आलं की उपासनेशी संबंधित ध्येयं आता त्यांच्याकरता पूर्वीइतकी महत्त्वाची राहिली नव्हती. जगातील गोष्टींमध्ये ते जितकं जास्त स्वतःला गुंतवत होते तितक्याच जास्त समस्यांचा सामना त्यांना करावा लागत होता ज्यामुळं शेवटी त्यांच्या पदरी नैराश्यच यायचं. पण मला पूर्णार्थानं यहोवाची सेवा करण्यासाठी माझ्या तारुण्याचा वापर करायचा होता.”
एस्लीने असे काही कोर्स केले ज्यांमुळे पायनियर म्हणून सेवा करताना एक नोकरी मिळवणे व स्वतःच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे तिला शक्य होणार होते. आणि नंतर ती राज्य प्रचारकांची निकडीने गरज असलेल्या ठिकाणी गेली. तिने ओटोमी व ट्लापानेको लोक जी भाषा बोलतात ती भाषा शिकण्याचे आव्हानही स्वीकारले. दुर्गम भागांत तीन वर्षे प्रचार कार्य केल्यानंतर ती म्हणते, “जास्त गरज असलेल्या ठिकाणी येऊन सेवा केल्यामुळं मला खूप समाधानी वाटतं. माझं जीवन खरोखरच अर्थपूर्ण बनलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यहोवासोबतचा माझा नातेसंबंध आणखी घट्ट झाला आहे.” अमेरिकेतील फिलिप आणि रॉकेल जे तिशीत आहेत, त्यांनाही असेच वाटते. ते म्हणतात, “जग खूप झपाट्यानं बदलत आहे. बऱ्याच जणांना वाटतं की त्यांच्या जीवनात स्थैर्य नाही. पण जिथं अद्यापही बरेच जण बायबलचा संदेश ऐकतात अशा ठिकाणी येऊन सेवा केल्यामुळं आमच्या जीवनाला अर्थ असल्यासारखं वाटतं. खरंच खूप समाधानी वाटतं.”
आव्हानांचा सामना कसा कराल?
साहजिकच, राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यात आव्हाने गोवलेली आहेत. आर्थिक रीत्या स्वतःचा सांभाळ कसा करावा त्यांपैकी एक आहे. असे करण्यासाठी तुम्हाला स्थानिक परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. वेरोनिका, जी एक अनुभवी पायनियर आहे ती म्हणते, “एके ठिकाणी राहत असताना मी कमी पैशात बनणारे फराळाचे पदार्थ तयार करून विकायचे. दुसऱ्या ठिकाणी मी कपडे विकायचे आणि लोकांचे केस कापायचे. सध्या मी एका घराची साफसफाई करते आणि नव्या पालकांना त्यांच्या मुलांसोबत कसे बोलावे याचा वर्ग चालवते.”
जर तुम्ही दुर्गम भागातील स्थानिक लोकांमध्ये राहत असाल तर त्यांच्या वेगळ्या संस्कृतीशी व निरनिराळ्या रीतींशी जुळवून घेणे एक मोठे आव्हान असू शकते. फिलिप व रॉकेल जेव्हा नाव्हाटल भाषा बोलणाऱ्या क्षेत्रात कार्य करत होते तेव्हा त्यांना या आव्हानाचा सामना करावा लागला. फिलिप म्हणतो, “संस्कृतींत जमीनअस्मानाचा फरक होता.” पण या दोघांना कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली? तो पुढे म्हणतो, “नाव्हाटल लोकांच्या सकारात्मक गोष्टींवर आम्ही आमचं लक्ष लावलं. उदाहरणार्थ, कुटुंबातील एकता, इतरांसोबतच्या व्यवहारातील त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचा उदार आत्मा.” रॉकेल सांगते, “इथं राहिल्यामुळं आणि स्थानिक बंधुभगिनींसोबत सेवा केल्यामुळं आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो.”
कशी कराल तयारी?
दुर्गम भागांत गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही आता तयारी कशी करू शकता? अशा भागांत सेवा करण्याचा अनुभव घेतलेल्या बंधुभगिनींनी असे म्हटले: दुर्गम भागात सेवा करण्यास जाण्याआधी तुमची जीवनशैली साधी करा आणि संतुष्ट राहण्यास शिका. (फिलिप्पै. ४:११, १२) तुम्ही आणखी काय करू शकता? लेटिस्या सांगते, “एकाच ठिकाणी जास्त काळ राहण्याचा करार करावा लागेल अशा प्रकारच्या नोकऱ्या मी टाळायचे. जिथं कुठं गरज असेल तिथं केव्हाही जाता यावं अशी माझी इच्छा होती.” एर्मीलो म्हणतो, “मी जेवण बनवण्यास, कपडे धुण्यास आणि इस्त्री करण्यास शिकलो.” वेरोनिका सांगते, “मी आईबाबांसोबत व भावंडांसोबत राहत होते तेव्हा साफसफाईत मदत करायचे; शिवाय कमी पैशात तयार होणारा पौष्टिक आहार बनवण्यास व पैशांची बचत करण्यासही मी शिकले.”
अमेरिकेतील लीवाय आणि अमीलिया यांचा विवाह होऊन आठ वर्षे झाली आहेत. मेक्सिकोमध्ये सेवा करण्यासाठी तयारी करताना प्रार्थनेत त्यांच्या गरजा स्पष्टपणे यहोवासमोर मांडल्यामुळे त्यांना मदत कशी मिळाली त्याविषयी ते सागंतात. लीवाय सांगतो, “एका वर्षासाठी दुसऱ्या देशात सेवा करण्याकरता आम्हाला किती पैसे लागतील याचा हिशोब आम्ही केला आणि तितकेच पैसे कमवण्यासाठी यहोवानं आम्हाला मदत करावी अशी प्रार्थना केली.” काही महिन्यांतच, प्रार्थनेत मांडलेली रक्कम ते जमवू शकले आणि उशीर न करता ते लगेच मेक्सिकोला गेले. लीवाय म्हणतो, “आम्ही यहोवाला जी खास विनंती केली होती ती त्यानं ऐकली, तेव्हा आम्ही जे ठरवलं होतं ते पूर्ण करण्याची आता आमची वेळ होती.” अमीलिया म्हणते, “आम्हाला वाटलं की आम्ही इथं केवळ एकच वर्ष राहू, पण गेल्या सात वर्षांपासून आम्ही इथं राहत आहोत आणि इथून जाण्याचा आम्ही विचारही करत नाहीए. इथं राहत असल्यामुळं यहोवा आम्हाला मदत करत असल्याचं आम्ही अनुभवत आहोत. त्याच्या चांगुलपणाचा पुरावा आम्ही रोज पाहतो.”
अमेरिकेतील ॲडम आणि जेनीफर मेक्सिकोतील इंग्रजी भाषा बोलणाऱ्या क्षेत्रात सेवा करत आहेत. त्यांच्या जीवनातसुद्धा प्रार्थनेने एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते असे सांगतात: “उत्तम परिस्थितीची वाट पाहत बसू नका. दुसऱ्या देशांत सेवा करण्याची तुमची इच्छा असेल तर त्याविषयी प्रार्थना करा आणि मग तुमच्या प्रार्थनेच्या अनुषंगानं कार्य करा. तुमचं जीवन साधं करा, तुम्हाला ज्या देशात सेवा करायची आहे त्या देशातील शाखा कार्यालयाला पत्र लिहा आणि सर्व गोष्टी विचारात घेतल्यानंतर, ठरवलेल्या ठिकाणी जा!” * तुमच्यासमोर रोमांचक व आध्यात्मिक रीत्या समृद्ध जीवन राखून ठेवलेले आहे.
^ अधिक माहितीसाठी आमची राज्य सेवा, ऑगस्ट २०११ मधील “तुम्ही ‘मासेदोनियात जाऊ’ शकाल का?” हा लेख पहा.