व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “चांगल्या कामांमध्ये आवेशी” आहात का?

तुम्ही “चांगल्या कामांमध्ये आवेशी” आहात का?

“येशू ख्रिस्त . . . [याने] स्वतःला आम्हाकरिता दिले यासाठी की . . . चांगल्या कामांमध्ये आवेशी असे आपले खासगीचे लोक आपणासाठी शुद्ध करावे.”—तीत २:१३, १४, पं.र.भा.

१, २. यहोवाच्या साक्षीदारांना कोणता अतुलनीय सन्मान लाभला आहे आणि त्याविषयी तुमच्या भावना काय आहेत?

 एखाद्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पारितोषिक दिले जाते तेव्हा बरेच लोक यास फार मोठा बहुमान समजतात. उदाहरणार्थ, एकमेकांचे शत्रू असलेल्या दोन गटांत शांती प्रस्थापित करण्यासाठी आवेशाने कार्य केल्याबद्दल काही जणांना नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. पण, लोकांना त्यांच्या निर्माणकर्त्यासोबत शांतीचे संबंध जोडता यावेत म्हणून खुद्द देवाकडून त्याचे राजदूत म्हणून पाठवले जाणे, यापेक्षा मोठा बहुमान आणखी कोणता असू शकतो?

यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्याला हा अतुलनीय बहुमान मिळालेला आहे. देवाच्या व ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार आपण लोकांना विनंती करतो की त्यांनी “देवाबरोबर समेट” करावा. (२ करिंथ. ५:२०) यहोवा आज लोकांना त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी आपला उपयोग करत आहे. त्यामुळेच जगभरातील २३५ पेक्षा जास्त देशांतील लाखो लोकांना देवासोबत चांगला नातेसंबंध जोडणे शक्य झाले आहे आणि सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त झाली आहे. (तीत २:११) आपण आवेशाने लोकांना हे मनःपूर्वक निमंत्रण देतो, की “ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” (प्रकटी. २२:१७) आपल्यावर सोपवण्यात आलेल्या या कार्याला आपण मौल्यवान समजतो आणि ते विश्‍वासूपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो; म्हणूनच आपल्याला “चांगल्या कामांमध्ये आवेशी” असे लोक म्हणणे योग्य ठरेल. (तीत २:१४) चांगल्या कामांमध्ये आवेशी असल्यामुळे आपण कशा प्रकारे लोकांना यहोवाकडे येण्यास साहाय्य करू शकतो यावर आता विचार करू या. एक मार्ग ज्याद्वारे आपण असे करू शकतो, तो म्हणजे आपले प्रचार कार्य.

यहोवाच्या व येशूच्या आवेशाचे अनुकरण करा

३. “यहोवाचा आवेश” आपल्याला कोणत्या गोष्टीची हमी देतो?

देवाच्या पुत्राच्या राज्यशासनामुळे जे काही साध्य केले जाईल त्याच्या संदर्भात यशया ९:७ (पं.र.भा.) असे म्हणते: “सैन्यांच्या यहोवाचा आवेश हे सिद्धीस नेईल.” या शब्दांवरून, आपल्या स्वर्गीय पित्याला मानवांच्या तारणाबद्दल मनस्वी कळकळ आहे याची हमी आपल्याला मिळते. यहोवाच्या आवेशी उदाहरणावरून अगदी स्पष्टपणे दिसून येते की देवाने आपल्याला राज्य उद्‌घोषक या नात्याने जे काम सोपवले आहे त्याला आपण मनापासून हातभार लावला पाहिजे आणि ते उत्साहाने व आवेशाने केले पाहिजे. देवाबद्दल जाणून घेण्यास लोकांना साहाय्य करण्याची तीव्र इच्छा जर आपल्या मनात असेल, तर आपण यहोवाच्या आवेशाचे अनुकरण करत आहोत हे त्यावरून दिसून येईल. तर मग, देवाचे सहकारी या नात्याने आपल्या वैयक्‍तिक परिस्थितीनुसार सुवार्तेची घोषणा करण्याच्या कार्यात जास्तीत जास्त सहभाग घेण्याचा आपण व्यक्‍तिशः दृढनिश्‍चय केला आहे का?—१ करिंथ. ३:९.

४. सेवाकार्यात आवेश टिकवून ठेवण्याच्या बाबतीत येशूने आपल्यासमोर कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडले?

येशूच्या आवेशाचाही विचार करा. सेवाकार्यात आवेश टिकवून ठेवण्याच्या बाबतीत त्याने सर्वात उत्तम उदाहरण आपल्यासमोर मांडले. त्याला तीव्र विरोधाचा सामना करावा लागला आणि शेवटी यातनामय मृत्यूला सामोरे जावे लागले. तरीही पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत त्याने प्रचार कार्यातील आपला आवेश मंदावू दिला नाही. (योहा. १८:३६, ३७) त्याच्या बलिदानरूपी मृत्यूची घडी जसजशी जवळ येत होती, तसतसा इतरांना यहोवाबद्दल जाणून घेण्यास साहाय्य करण्याचा त्याचा निर्धार अधिकच दृढ झाला.

५. अंजिराच्या झाडाच्या दृष्टान्तात सांगितल्याप्रमाणे येशूने काय केले?

उदाहरणार्थ, इ.स. ३२ च्या उत्तरार्धात येशूने एका अशा माणसाचा दृष्टान्त दिला ज्याच्या द्राक्षमळ्यात एक अंजिराचे झाड होते, पण तीन वर्षांपासून त्या झाडाला फळे आली नव्हती. त्याने माळ्याला ते झाड तोडून टाकण्यास सांगितले, तेव्हा माळ्याने त्या झाडाला खत घालू देण्याची आणि आणखी काही काळ वाट पाहण्याची विनंती केली. (लूक १३:६-९ वाचा.) येशूने हा दृष्टान्त दिला तेव्हा केवळ काही मूठभर लोक त्याचे शिष्य बनले होते. पण माळ्याच्या या दृष्टान्तातून सुचवण्यात आल्याप्रमाणे येशूने त्याच्याजवळ उरलेल्या सहा महिन्यांच्या अल्प काळात यहुदिया व पेरिया या प्रदेशांत आणखी आवेशाने प्रचार कार्य केले. त्याच्या मृत्यूच्या थोड्याच दिवसांआधी, ऐकूनही प्रतिसाद न देणाऱ्‍या त्याच्या यहुदी बांधवासाठी तो अक्षरशः रडला.—मत्त. १३:१५; लूक १९:४१.

६. आपण सेवाकार्यात आपला सहभाग वाढवण्याची का गरज आहे?

आज आपण शेवटल्या काळाच्या अगदी अंतिम भागात राहत आहोत. तर मग, प्रचार कार्यातील आपला सहभाग वाढवणे गरजेचे नाही का? (दानीएल २:४१-४५ वाचा.) यहोवाचे साक्षीदार असणे हा खरोखर किती अद्‌भुत विशेषाधिकार आहे! मानवजातीला आज ज्या समस्यांनी ग्रासले आहे त्या कशा प्रकारे नाहीशा होतील याविषयी फक्‍त यहोवाचे साक्षीदार लोकांना एक आशादायक संदेश सांगत आहेत. अलीकडेच, एका वृत्तपत्राच्या स्तंभलेखिकेने म्हटले की “चांगल्या लोकांना वाईट गोष्टी का सोसाव्या लागतात?” या प्रश्‍नाला कोणतेच उत्तर नाही. ऐकण्यास उत्सुक असलेल्या सर्वांना अशा प्रश्‍नांची बायबलमध्ये दिलेली उत्तरे सांगणे ही ख्रिस्ती या नात्याने आपली जबाबदारी आणि आपल्याला लाभलेला एक सुहक्क आहे. म्हणूनच, देवाने आपल्यावर सोपवलेले हे कार्य आपण उत्साहाने केले पाहिजे. (रोम. १२:११) यहोवा आपले कार्य आशीर्वादित करेल आणि आपल्या आवेशी सुवार्तिक कार्यामुळे इतरांना यहोवाची ओळख करून घेणे व त्याच्यावर प्रेम करणे शक्य होईल.

स्वार्थत्यागी वृत्तीमुळे यहोवाचा गौरव होतो

७, ८. स्वार्थत्यागी वृत्तीमुळे कशा प्रकारे यहोवाचा गौरव होतो?

प्रेषित पौलाच्या अनुभवांवरून दिसून येते त्याप्रमाणे, कधीकधी आपल्या सेवाकार्यामुळे आपल्याला ‘जागरण’ आणि ‘उपवास’ सहन करावा लागू शकतो. (२ करिंथ. ६:५) पौलाने वापरलेल्या या शब्दांतून सुवार्तिक कार्यासाठी कशा प्रकारच्या स्वार्थत्यागाची गरज आहे हे स्पष्ट होते. कदाचित तुम्हाला अशा पायनियर बंधुभगिनींची आठवण झाली असेल, जे स्वतःचा उदरनिर्वाह चालवत असतानाच त्यांच्या सेवाकार्याला जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान देतात. तसेच, समर्पित भावनेने कार्य करणाऱ्‍या मिशनऱ्‍यांचाही विचार करा, जे परक्या देशात जाऊन तेथील लोकांना साहाय्य करण्यासाठी स्वतःला वाहून घेतात. (फिलिप्पै. २:१७) शिवाय, यहोवाच्या मेंढरांचे पालनपोषण करत असताना कित्येकदा तहानभूक विसरून काम करणाऱ्‍या किंवा रात्र रात्र जागणाऱ्‍या आपल्या परिश्रमी वडिलांबद्दल काय? आपल्यामध्ये बरेच वयस्क व आजारी बंधुभगिनीदेखील आहेत जे ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यासाठी आणि क्षेत्र सेवेत सहभागी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. देवाच्या या सर्व स्वार्थत्यागी सेवकांचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला त्यांचा मनापासून अभिमान वाटतो. या सर्व बांधवांच्या प्रयत्नांमुळे आपल्या सेवाकार्याविषयी इतरांच्या दृष्टिकोनावर बराच प्रभाव पडतो.

संयुक्‍त राज्यातील लिंकनशर येथील बॉस्टन टार्गेट या वृत्तपत्राला लिहिलेल्या पत्रात यहोवाच्या साक्षीदारांपैकी नसलेल्या एका वाचकाने असे म्हटले: “धर्मांवरून लोकांचा विश्‍वास उडत चालला आहे . . . हे पाळक दिवसभर करतात तरी काय? ख्रिस्तासारखे लोकांकडे जाऊन त्यांच्या भेटी तर ते नक्कीच घेत नाहीत . . . असा एकच धर्म आहे ज्याचे लोक स्वतःहून जाऊन लोकांना भेटण्याची तसदी घेतात आणि जे खऱ्‍या अर्थाने सत्याचा प्रसार करतात, आणि ते लोक म्हणजे यहोवाचे साक्षीदार.” स्वार्थी लोकांनी भरलेल्या या जगात आपल्या स्वार्थत्यागी वृत्तीमुळे नक्कीच यहोवा देवाचा गौरव होतो.—रोम. १२:१.

तुम्ही सेवाकार्यात सहभागी होता तेव्हा निरीक्षण करणाऱ्‍यांना यामुळे अतिशय प्रभावी मार्गाने साक्ष मिळते

९. सेवाकार्यातील चांगल्या कामांमध्ये आवेशी राहण्यास आपल्याला कशामुळे प्रेरणा मिळू शकते?

पण, सेवाकार्यातील आपला आवेश मंदावत चालला आहे असे आपल्या लक्षात आल्यास आपण काय करू शकतो? प्रचार कार्याद्वारे यहोवा काय साध्य करत आहे यावर मनन केल्यामुळे आपल्याला बरीच मदत मिळेल. (रोमकर १०:१३-१५ वाचा.) तारण होण्यासाठी लोकांनी यहोवावर विश्‍वास ठेवून त्याच्या नावाचा धावा करणे गरजेचे आहे, पण जोपर्यंत आपण लोकांकडे जाऊन प्रचार करणार नाही तोपर्यंत त्यांना यहोवाच्या नावाचा धावा करणे शक्य होणार नाही. या जाणिवेमुळे आपल्याला चांगल्या कामांमध्ये आवेशी राहण्याची आणि परिश्रमी वृत्तीने राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत राहण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे.

चांगल्या आचरणामुळे लोक देवाकडे आकर्षित होतात

तुमचा प्रामाणिकपणा आणि परिश्रम लोकांच्या नजरेतून सुटणार नाही

१०. आपल्या उत्तम आचरणामुळे लोक यहोवाकडे आकर्षित होतात असे का म्हणता येईल?

१० सेवाकार्यात आवेशी असणे जरी महत्त्वाचे असले, तरी लोकांना देवाकडे आकर्षित करण्यासाठी फक्‍त आवेश पुरेसा नाही. लोकांना देवाकडे आकर्षित करणाऱ्‍या आवेशी कार्यांचा दुसरा पैलू म्हणजे उत्तम ख्रिस्ती आचरण. आपले आचरण किती महत्त्वाचे आहे यावर भर देण्याकरता पौलाने म्हटले: “आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही.” (२ करिंथ. ६:३) आपले उभारणीकारक शब्द आणि निर्मळ वर्तन देवाच्या शिकवणींना सुशोभित करतात, कारण त्यांमुळे लोक यहोवाच्या उपासनेकडे आकर्षित होतात. (तीत २:१०) प्रामाणिक मनाच्या लोकांनी आपल्या ख्रिस्ती आचरणाची दखल घेतल्यामुळे घडून आलेल्या उत्तम परिणामांविषयी अनेकदा आपल्याला ऐकायला मिळते.

११. आपल्या आचरणाच्या परिणामांबाबत आपण प्रार्थनापूर्वक विचार का केला पाहिजे?

११ आपल्या चांगल्या वर्तनामुळे लोकांवर चांगला परिणाम होऊ शकतो हे खरे आहे, पण आपल्या वाईट वर्तनामुळे लोकांवर वाईट परिणाम होऊ शकतो हेही तितकेच खरे. म्हणूनच, आपण कामाच्या ठिकाणी, घरी किंवा शाळेत, कोठेही असलो तरी कोणालाही आपल्या सेवाकार्याकडे आणि आपल्या आचरणाकडे बोट दाखवण्याची संधी मिळणार नाही याची काळजी घेतो. जर आपण जाणूनबुजून पाप करत असू, तर आपल्या वैयक्‍तिक जीवनात याचे अतिशय दुःखदायक परिणाम आपल्याला भोगावे लागतील. (इब्री १०:२६, २७) या जाणिवेमुळे, आपल्या आचरणाबद्दल आणि आपल्या जीवनाकडे पाहून लोकांना कोणता संदेश मिळतो याबद्दल प्रार्थनापूर्वक विचार करण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. या जगाचे नैतिक स्तर जसजसे घसरत जातील, तसतसे प्रामाणिक मनाचे लोक “देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद” अधिकाधिक स्पष्टपणे पाहू शकतील. (मला. ३:१८) खरोखर, लोकांना देवाशी समेट करण्यास प्रवृत्त करण्यात आपले ख्रिस्ती आचरण एक महत्त्वाची भूमिका बजावते.

१२-१४. विश्‍वासाची परीक्षा पाहणाऱ्‍या प्रसंगांना आपण धीराने तोंड देतो तेव्हा आपल्या सेवाकार्याबद्दल इतरांच्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडतो? उदाहरण द्या.

१२ करिंथकरांना लिहिताना पौलाने सांगितले की त्याने संकटे, अडचणी, मारहाण व तुरुंगवास सहन केला होता. (२ करिंथकर ६:४, ५ वाचा.) आपल्या विश्‍वासाची परीक्षा पाहणाऱ्‍या प्रसंगांत आपण धीर धरतो तेव्हा आपले निरीक्षण करणारे सत्य स्वीकारण्यास प्रवृत्त होऊ शकतात. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी अंगोलाच्या एका भागात यहोवाच्या साक्षीदारांना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन बाप्तिस्मा झालेल्या साक्षीदारांना आणि सभांना उपस्थित राहणाऱ्‍या ३० आस्थेवाईक जणांना एका ठिकाणी गोळा करण्यात आले. मग, त्या भागात राहणाऱ्‍या इतर लोकांना जमा करून विरोधकांनी त्या सर्वांच्या देखत या निर्दोष व्यक्‍तींना रक्‍तबंबाळ होईपर्यंत चाबकाने मारले. स्त्रियांची व मुलांचीही त्यांनी गय केली नाही. लोकांच्या मनात दहशत बसावी आणि कोणीही यापुढे यहोवाच्या साक्षीदारांचे ऐकू नये असा विरोधकांचा इरादा होता. पण, सार्वजनिक रीत्या ही मारहाण केल्यानंतर त्या परिसरातील कित्येक जणांनी साक्षीदारांकडे येऊन बायबल अभ्यास करण्याची इच्छा व्यक्‍त केली! पुढे, या भागात राज्य प्रचाराच्या कार्यात प्रगती होत गेली आणि साक्षीदारांची संख्या बरीच वाढून त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले.

१३ या उदाहरणावरून अगदीच स्पष्ट आहे, की जेव्हा आपण बायबल तत्त्वांना जडून राहतो तेव्हा या गोष्टीचा इतरांवर दूरगामी परिणाम होऊ शकतो. पेत्राने व इतर प्रेषितांनी दाखवलेल्या धैर्यामुळे कोण जाणे किती लोकांना देवाशी समेट करण्याची प्रेरणा मिळाली असेल! (प्रे. कृत्ये ५:१७-२९) आपल्या बाबतीत पाहिल्यास, जेव्हा आपण ख्रिस्ती तत्त्वांच्या बाबतीत तडजोड करत नाही तेव्हा आपले वर्गसोबती, सहकर्मचारी किंवा कुटुंबातील सदस्य सत्याला चांगला प्रतिसाद देण्यास प्रवृत्त होऊ शकतात.

१४ कोणत्याही विशिष्ट वेळी, जगात कोठे ना कोठे आपल्या बांधवांना छळ सोसावा लागत आहे. उदाहरणार्थ, सध्या आर्मीनियात जवळजवळ ४० बांधव त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे तुरुंगात आहेत आणि पुढील काही महिन्यांत आणखी कित्येकांना तुरुंगात टाकले जाण्याची शक्यता आहे. एरिट्रिया येथे ५५ यहोवाचे साक्षीदार तुरुंगात असून त्यांच्यापैकी काहींचे वय साठपेक्षा जास्त आहे. दक्षिण कोरियात जवळजवळ ७०० साक्षीदार त्यांच्या विश्‍वासामुळे तुरुंगात आहेत. मागील ६० वर्षांपासून तेथे हीच परिस्थिती आहे. निरनिराळ्या देशांत छळ सोसत असलेल्या आपल्या बांधवांच्या विश्‍वासूपणामुळे यहोवाचा गौरव व्हावा आणि नीतिप्रिय लोकांना खऱ्‍या उपासनेचा स्वीकार करण्यास साहाय्य मिळावे अशी आपण प्रार्थना करू या.—स्तो. ७६:८-१०.

१५. आपल्या प्रामाणिकपणामुळे कशा प्रकारे इतर जण सत्याकडे आकर्षित होऊ शकतात हे उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.

१५ आपला प्रामाणिकपणा पाहूनही लोक सत्याकडे आकर्षित होऊ शकतात. (२ करिंथकर ६:४,  वाचा.) उदाहरणार्थ हा अनुभव विचारात घ्या: “एक बहीण बसमधील तिकीट घेण्याच्या स्वयंचलित यंत्रात पैसे टाकत असताना तिच्या मैत्रिणीने तिला म्हटले की ती फार कमी अंतरापर्यंत प्रवास करणार असल्यामुळे तिकीट घेण्याची गरज नाही. बहिणीने तिला सांगितले की आपण फक्‍त एकाच स्टॉपपर्यंत प्रवास करत असलो तरी आपण तिकीट घेतलेच पाहिजे. त्यानंतर तिची मैत्रीण बसमधून उतरली. तेव्हा, बस चालकाने बहिणीकडे वळून तिला विचारले, “तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात का?” बहिणीने उत्तर दिले, “हो, पण तुम्ही असं का विचारताय?” “मी बसचं तिकीट घेण्याबद्दल तुमचं संभाषण ऐकत होतो आणि मला माहीतंय की यहोवाचे साक्षीदार त्या अगदी थोड्या लोकांपैकी आहेत जे नेहमी तिकीट घेतात आणि सर्व बाबतीत प्रामाणिक असतात.” काही महिन्यांनंतर, राज्य सभागृहात एक मनुष्य त्या बहिणीजवळ येऊन म्हणाला, “मला ओळखलंत? मी तोच बस चालक आहे, आठवतंय आपण तिकीट घेण्याच्या बाबतीत बोललो होतो? तुमचं वागणं पाहून मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्याचं ठरवलं.” प्रामाणिक असण्याबाबत आपण चांगले नाव कमावतो तेव्हा आपण देवाचे भरवशालायक सेवक म्हणून आपली ओळख पटवून देतो.

देवाचा गौरव करणारे गुण नेहमी प्रदर्शित करा

१६. सहनशीलता, प्रेम व दयाळूपणा यांसारख्या गुणांमुळे लोकांच्या मनावर चांगला परिणाम का होतो? उदाहरण द्या.

१६ सहनशीलता, प्रेम व दयाळूपणा यांसारखे गुण आपण प्रदर्शित करतो तेव्हादेखील आपण लोकांना यहोवाकडे आकर्षित करण्यास हातभार लावत असतो. आपल्या वागणुकीचे निरीक्षण करणाऱ्‍यांपैकी काही जण कदाचित यहोवाबद्दल, त्याच्या उद्देशांबद्दल आणि त्याच्या लोकांबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रवृत्त होतील. खऱ्‍या ख्रिश्‍चनांची मनोवृत्ती व वागणूक ही धार्मिक असण्याचा केवळ दिखावा करणाऱ्‍यांच्या ढोंगी वागणुकीपेक्षा अगदीच वेगळी आहे. काही धर्मपुढाऱ्‍यांनी त्यांच्या कळपातील लोकांची फसवणूक करून अमाप संपत्ती गोळा केली आहे. यांपैकी बराचसा पैसा ते स्वतःसाठी आलिशान घरे व मोटारी विकत घेण्यासाठी खर्च करतात. एका पाळकाने तर आपल्या कुत्र्यासाठी असलेले घरदेखील वातानुकुलित करवून घेतले आहे. खरोखर, स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी म्हणवणाऱ्‍या बऱ्‍याच जणांमध्ये इतरांना “फुकट” देण्याची वृत्ती नाही. (मत्त. १०:८) उलट, प्राचीन इस्राएल राष्ट्रातील दुष्ट याजकांप्रमाणे ते “वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात,” आणि जे ते शिकवतात त्यांपैकी बहुतेक गोष्टी बायबलवर आधारित नसतात. (मीखा ३:११) अशा ढोंगी आचरणामुळे कोणीही देवाकडे आकर्षित होऊ शकत नाही.

१७, १८. (क) यहोवाचे गुण प्रदर्शित केल्यामुळे आपण कशा प्रकारे त्याचा गौरव करतो? (ख) तुम्हाला चांगल्या कामांमध्ये तत्पर राहण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली आहे?

१७ दुसरीकडे पाहता, खऱ्‍या ख्रिस्ती शिकवणींमुळे व दयाळू कृत्यांमुळे लोकांच्या मनावर अतिशय चांगला परिणाम होतो. उदाहरणार्थ, घरोघरचे प्रचार कार्य करत असताना एका पायनियर बांधवाला एक वयस्क विधवा स्त्री भेटली. पण आपल्याजवळ अजिबात वेळ नाही असे तिने बांधवाला सांगितले. तिने म्हटले की त्याने दारावरची बेल वाजवली तेव्हा ती शिडीवर चढून स्वयंपाकघरातला बल्ब बदलण्याचा प्रयत्न करत होती. बांधवाने तिला म्हटले, “तुम्ही शिडीवर चढून बल्ब बदलणं धोकादायक आहे.” मग त्याने स्वतः तिला बल्ब बदलून दिला आणि त्यानंतर तो निघून गेला. त्या स्त्रीच्या मुलाला या घटनेविषयी समजले तेव्हा तो इतका प्रभावित झाला की त्याने बांधवाचा शोध घेतला आणि आभार व्यक्‍त केले. कालांतराने तो बायबल अभ्यासदेखील करण्यास तयार झाला.

१८ तुम्ही नेहमी चांगल्या कामांमध्ये तत्पर राहण्याचा निर्धार का केला आहे? आपण सेवाकार्यात आवेशी असतो आणि नेहमी देवाच्या इच्छेनुसार वागतो तेव्हा यहोवाचा गौरव होण्यासोबतच इतरांना तारण मिळणेदेखील शक्य होते, ही जाणीव असल्यामुळे कदाचित तुम्ही असा निर्धार केला असेल. (१ करिंथकर १०:३१-३३ वाचा.) देवाबद्दल आणि इतर मानवांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्याच्या मनस्वी इच्छेमुळेच आपल्याला चांगल्या कामांमध्ये आवेशी असण्याची; म्हणजेच सुवार्तेचा प्रचार करण्याची आणि नेहमी देवाच्या इच्छेनुसार वागण्याची प्रेरणा मिळते. (मत्त. २२:३७-३९) चांगल्या कामांमध्ये आवेशी असल्यास आपल्याला जीवनात खूप समाधान व आनंद अनुभवता येईल. शिवाय, आपण त्या दिवसाचीही वाट पाहू शकतो जेव्हा सर्व मानव आपल्या निर्माणकर्त्याची, यहोवाची उपासना करण्याविषयी आवेशी असतील.