व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा”

“या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा”

“आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा.”—मत्त. २४:३.

१. प्रेषितांप्रमाणेच, आपणही काय जाणून घेण्यास उत्सुक आहोत?

 येशूची पृथ्वीवरील सेवा संपत आली होती, आणि त्याचे शिष्य भविष्यात आपल्यासाठी काय राखून ठेवले आहे हे जाणून घेण्यास उत्सुक होते. म्हणून येशूच्या मृत्यूच्या थोड्या दिवसांआधी त्याच्या चार प्रेषितांनी त्याला असे विचारले: “या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा.” (मत्त. २४:३; मार्क १३:३) येशूने मत्तय २४ आणि २५ अध्यायांत सविस्तरपणे सांगितलेल्या भविष्यवाणीद्वारे त्यांना उत्तर दिले. त्या भविष्यवाणीत, येशूने भविष्यात घडणाऱ्‍या अनेक लक्षवेधक घटनांविषयी सांगितले. त्याने जे सांगितले त्याचा आज आपल्याकरता गहन अर्थ होतो, कारण भविष्यात आपल्यासाठी काय राखून ठेवले आहे हे जाणून घेण्यास आपणही खूप उत्सुक आहोत.

२. (क) पूर्वीपासूनच आपण कशाची स्पष्ट समज मिळवण्याचा प्रयत्न केला आहे? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांचा विचार करणार आहोत?

येशूने शेवटल्या दिवसांबद्दल जी भविष्यवाणी केली होती तिचा यहोवाच्या सेवकांनी पूर्वीपासूनच प्रार्थनापूर्वक अभ्यास केला आहे. येशूचे शब्द केव्हा पूर्ण होतील याची स्पष्ट समज मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आपली समज कशा प्रकारे सुस्पष्ट होत गेली हे जाणून घेण्यासाठी आपण तीन प्रश्‍नांचा विचार करू या. ते आहेत: “मोठे संकट” केव्हा सुरू होते? येशू ‘मेंढरांचा’ आणि ‘शेरडांचा’ न्याय केव्हा करतो? येशू केव्हा ‘येतो?’—मत्त. २४:२१; २५:३१-३३.

मोठे संकट केव्हा सुरू होते?

३. पूर्वी मोठ्या संकटाविषयी आपली काय समज होती?

कितीतरी वर्षे आपण असा विचार करायचो की १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धासोबत मोठ्या संकटाची सुरुवात झाली, आणि १९१८ मध्ये युद्ध संपले तेव्हा आपण असा विचार केला की शेषजनांना सर्व राष्ट्रांत सुवार्तेचा प्रचार करण्याची संधी मिळावी म्हणून यहोवाने युद्धाचे “दिवस कमी केले.” (मत्त. २४:२१, २२) ते प्रचार कार्य पूर्ण झाल्यानंतर सैतानाच्या साम्राज्याचा नाश होईल असा आपण विचार करत होतो. त्यामुळे, मोठ्या संकटाचे तीन टप्पे असतील असे आपण मानायचो: मोठ्या संकटाची एक सुरुवात असेल (१९१४-१९१८), त्यात खंड पडेल (१९१८ पासून पुढे), आणि हर्मगिदोनात त्याचा शेवट होईल.

४. येशूने शेवटल्या दिवसांबद्दल जी भविष्यवाणी केली होती त्याबद्दलची आपली समज कशामुळे आणखी स्पष्ट झाली?

पण, येशूच्या भविष्यवाणीचे आणखी परीक्षण केल्यावर आपल्याला समजले की येशूने शेवटल्या दिवसांबद्दल जी भविष्यवाणी केली होती तिच्या एका भागाच्या दोन पूर्णता असतील. (मत्त. २४:४-२२) पहिली पूर्णता इसवी सन पहिल्या शतकात यहुदीयामध्ये झाली, आणि दुसरी पूर्णता आपल्या दिवसांमध्ये जगव्याप्त स्तरावर होईल. हे समजल्यामुळे अनेक गोष्टींविषयीची आपली समज अधिक स्पष्ट झाली. *

५. (क) १९१४ मध्ये कोणत्या कठीण काळाची सुरुवात झाली? (ख) त्या वेदनांच्या काळाचा इ.स. पहिल्या शतकातील कोणत्या घटनांशी मेळ बसतो?

आपल्याला हेदेखील समजले की मोठ्या संकटाच्या पहिल्या भागाची सुरुवात १९१४ मध्ये झाली नाही. असे आपण का म्हणू शकतो? कारण, बायबलमधील भविष्यवाणीवरून स्पष्टपणे दिसून येते, की मोठ्या संकटाची सुरुवात राष्ट्रांच्या आपसातील युद्धाने नव्हे, तर खोट्या धर्मावरील हल्ल्याने होईल. त्याअर्थी, १९१४ पासून घडणाऱ्‍या घटनांमुळे मोठ्या संकटाची सुरुवात झाली नाही, तर त्या घटनांमुळे “वेदनांचा प्रारंभ” झाला. (मत्त. २४:८) या “वेदनांचा,” इ.स. ३३ ते इ.स. ६६ पर्यंत जेरूसलेम आणि यहुदीयामध्ये ज्या घटना घडल्या त्यांच्याशी मेळ बसतो.

६. कोणत्या घटनेने मोठ्या संकटाची सुरुवात होईल?

  कोणत्या घटनेने मोठ्या संकटाची सुरुवात होईल? येशूने असे पूर्वभाकीत केले: “दानीएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे,) तेव्हा जे यहुदीयात असतील त्यांनी डोंगरांत पळून जावे.” (मत्त. २४: १५, १६) याची पहिली पूर्णता इ.स. ६६ मध्ये झाली, जेव्हा रोमन सैन्याने (“अमंगळ पदार्थ”) जेरूसलेमवर व त्यातील मंदिरावर (यहुद्यांच्या दृष्टीने पवित्रस्थान) हल्ला केला. मोठ्या पूर्णतेत, अमंगळ पदार्थ केव्हा “उभा” राहील? हे तेव्हा घडेल जेव्हा ‘संयुक्‍त राष्ट्रे’ (आधुनिक काळातील “अमंगळ पदार्थ”) ख्रिस्ती धर्मजगतावर (नामधारी ख्रिश्‍चनांच्या दृष्टीने पवित्रस्थान) आणि मोठ्या बाबेलच्या उर्वरित भागावर हल्ला करेल. प्रकटीकरण १७:१६-१८ मध्ये याच हल्ल्याचे वर्णन करण्यात आले आहे. या घटनेने मोठ्या संकटाची सुरुवात होईल.

७. (क) पहिल्या शतकात कशा प्रकारे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा “निभाव लागला”? (ख) भविष्यात काय घडण्याची अपेक्षा आपण करू शकतो?

  येशूने असेही पूर्वभाकीत केले होते: “ते दिवस कमी केले . . . जातील.” याची पहिली पूर्णता इ.स. ६६ मध्ये झाली, जेव्हा रोमन सैन्याने आपला हल्ला “कमी” केला म्हणजेच थांबवला. त्यानंतर, जेरूसलेम आणि यहुदीयातील अभिषिक्‍त ख्रिस्ती पळून गेले, ज्यामुळे त्यांचा “निभाव लागला.” (मत्तय २४:२२ वाचा; मला. ३:१७) तर मग, येणाऱ्‍या मोठ्या संकटादरम्यान काय घडण्याची अपेक्षा आपण करू शकतो? ‘संयुक्‍त राष्ट्रे’ या संघटनेने खोट्या धर्मावर केलेला हल्ला यहोवा “कमी” करेल, म्हणजेच तो त्या हल्ल्यात खंड पाडेल. तो खोट्या धर्मासोबत खऱ्‍या धर्माचा नाश होऊ देणार नाही. यामुळे, देवाच्या लोकांचा बचाव होईल याची आपण खातरी बाळगू शकतो.

८. (क) मोठ्या संकटाचा पहिला भाग घडून गेल्यानंतर कोणत्या घटना घडतील? (ख) १,४४,००० जणांपैकी शेवटल्या सदस्याला त्याचे स्वर्गीय प्रतिफळ केव्हा मिळेल? (टीप पाहा.)

   मोठ्या संकटाचा पहिला भाग घडून गेल्यानंतर काय होते? येशूच्या शब्दांवरून सूचित होते, की या घटनेनंतर आणि हर्मगिदोनाची सुरुवात होईपर्यंत मधे एक काळ असेल. या मधल्या काळात कोणत्या घटना घडतील? याचे उत्तर यहेज्केल ३८:१४-१६ आणि मत्तय २४:२९-३१ (वाचा.) या वचनांत सापडते. * त्यानंतर, हर्मगिदोनाचे युद्ध होईल. हा मोठ्या संकटाचा कळस असून, इ.स. ७० मध्ये जेरूसलेमच्या नाशाशी समांतर आहे. (मला. ४:१) मोठे संकट ज्याच्या शेवटास हर्मगिदोनाचे युद्ध होईल, ही एक अशी घटना असेल जी “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत” घडली नाही. (मत्त. २४:२१) ते संकट होऊन गेल्यानंतर, ख्रिस्ताचे हजार वर्षांचे शासन सुरू होईल.

९. येशूने मोठ्या संकटाबद्दल जी भविष्यवाणी केली होती तिचा यहोवाच्या लोकांवर कोणता परिणाम होतो?

मोठ्या संकटाबद्दलच्या या भविष्यवाणीमुळे आपला विश्‍वास मजबूत होतो. असे आपण का म्हणू शकतो? कारण, यामुळे आपल्याला ही खातरी मिळते की आपल्यासमोर कोणतेही अडथळे आले, तरी एक समूह या नात्याने यहोवाचे लोक मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील. (प्रकटी. ७:९, १४) सर्वात महत्त्वाची व आनंदाची गोष्ट म्हणजे, हर्मगिदोनाच्या युद्धात यहोवा त्याचे सार्वभौमत्व सिद्ध करेल आणि त्याच्या नावाचे पवित्रीकरण करेल.—स्तो. ८३:१८; यहे. ३८:२३.

येशू ‘मेंढरांचा’ आणि ‘शेरडांचा’ न्याय केव्हा करतो?

१०. मेंढरांचा आणि शेरडांचा न्याय केव्हा होईल याबद्दल पूर्वी आपण कसा विचार करायचो?

१० येशूच्या भविष्यवाणीच्या आणखी एका भागाचा, म्हणजे मेंढरांचा आणि शेरडांचा न्याय केव्हा केला जातो याविषयी त्याने दिलेल्या दृष्टान्ताचा विचार करा. (मत्त. २५:३१-४६) यापूर्वी, आपण असा विचार करायचो, की लोकांचा मेंढरे किंवा शेरडे या नात्याने न्याय करण्याचे काम १९१४ पासून सबंध शेवटल्या दिवसांदरम्यान सुरू असेल. आपण असा निष्कर्ष काढला होता, की ज्या लोकांनी राज्याचा संदेश नाकारला आणि ज्यांचा मोठे संकट सुरू होण्याआधी मृत्यू झाला ते शेरडे या नात्याने मरण पावतील, म्हणजे त्यांना पुनरुत्थानाची आशा नसेल.

११. लोकांचा मेंढरे किंवा शेरडे या नात्याने न्याय करण्याचे काम १९१४ मध्ये सुरू झाले नाही असे आपण का म्हणू शकतो?

११ सन १९९५ मध्ये, टेहळणी बुरूजच्या एका अंकात मत्तय २५:३१ या वचनाचे पुन्हा परीक्षण करण्यात आले. त्या वचनात असे म्हटले आहे: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल.” त्या टेहळणी बुरूज अंकात असे म्हटले होते, की येशू १९१४ मध्ये देवाच्या राज्याचा राजा बनला, पण तो ‘सर्व राष्ट्रांचा’ न्यायाधीश या नात्याने “वैभवशाली राजासनावर” बसला नाही. (मत्त. २५:३१, ३२; दानीएल ७:१३ पडताळून पाहा.) मेंढरांच्या आणि शेरडांच्या दृष्टान्तात मात्र, येशूचे वर्णन प्रामुख्याने न्यायाधीश असे करण्यात आले आहे. (मत्तय २५:३१-३४, ४१, ४६ वाचा.) १९१४ मध्ये येशू अद्यापही न्यायाधीश या नात्याने कार्य करत नव्हता, त्यामुळे लोकांचा मेंढरे किंवा शेरडे या नात्याने न्याय करण्याचे काम त्यावर्षी सुरू होणे शक्य नव्हते. * तर मग, न्यायाधीश या नात्याने येशूचे कार्य केव्हा सुरू होईल?

१२. (क) सर्व राष्ट्रांचा न्यायाधीश या नात्याने येशू पहिल्यांदाच केव्हा कार्य करेल? (ख) मत्तय २४:३०, ३१ आणि मत्तय २५:३१-३३, ४६ या वचनांत कोणत्या घटनांचे वर्णन करण्यात आले आहे?

  १२ येशूने शेवटल्या दिवसांबद्दल जी भविष्यवाणी केली होती, तिच्यातून दिसून येते की खोट्या धर्माचा नाश झाल्यानंतर, येशू सर्व राष्ट्रांचा न्यायाधीश या नात्याने पहिल्यांदाच कार्य करेल.   व्या परिच्छेदात उल्लेख केल्याप्रमाणे, त्या काळात घडणाऱ्‍या काही घटनांविषयी मत्तय २४:३०, ३१ या वचनांत सांगितले आहे. जेव्हा तुम्ही या वचनांचे परीक्षण कराल तेव्हा तुम्हाला दिसून येईल की त्या वचनांत येशू अशा घटनांविषयी पूर्वभाकीत करतो ज्या मेंढरांच्या आणि शेरडांच्या दृष्टान्तातील घटनांसारख्याच आहेत. उदाहरणार्थ: मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येतो; सर्व राष्ट्रे जमवली जातात; मेंढरे या नात्याने ज्यांचा न्याय केला जातो ते “आपली डोकी वर” करतात कारण त्यांना “सार्वकालिक जीवन” मिळेल. * शेरडे या नात्याने ज्यांचा न्याय केला जातो त्यांना “सार्वकालिक शिक्षा” मिळेल या जाणिवेने ते ‘शोक करतात.’—मत्त. २५:३१-३३, ४६.

१३. (क) लोक मेंढरे आहेत की शेरडे याचा न्याय येशू केव्हा करेल? (ख) हे समजल्यामुळे प्रचार कार्याबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडतो?

 १३ तर मग, आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? येशू मोठ्या संकटादरम्यान येईल तेव्हा तो सर्व राष्ट्रांच्या लोकांचा मेंढरे किंवा शेरडे असा न्याय करेल. त्यानंतर, हर्मगिदोनाच्या वेळी शेरडांसमान लोकांना “सार्वकालिक शिक्षा” मिळेल, अर्थात त्यांचा कायमचा नाश केला जाईल. हे समजल्यामुळे प्रचार कार्याबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडतो? यामुळे आपले प्रचाराचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजते. मोठ्या संकटाची सुरुवात होईपर्यंत, लोकांजवळ अजूनही त्यांच्या विचारसरणीत फेरबदल करण्यासाठी आणि “जीवनाकडे” जाणाऱ्‍या अरुंद मार्गावर चालायला सुरुवात करण्यासाठी वेळ आहे. (मत्त. ७:१३, १४) हे खरे आहे, की काही लोकांच्या मनोवृत्तीवरून ते एकतर मेंढरांपैकी किंवा शेरडांपैकी आहेत असे आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. तरीपण, आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे, की मेंढरे कोण आहेत आणि शेरडे कोण आहेत याचा शेवटला न्याय मोठ्या संकटादरम्यान होईल. म्हणून, जास्तीत जास्त लोकांना देवाच्या राज्याचा संदेश ऐकण्याची आणि त्या संदेशाला प्रतिसाद देण्याची संधी देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

मोठ्या संकटाची सुरुवात होईपर्यंत, लोकांना त्यांच्या विचारसरणीत फेरबदल करण्याची संधी आहे ( परिच्छेद १३ पाहा)

येशू केव्हा ‘येतो?’

१४, १५. ख्रिस्ताचे ‘भविष्यात’ न्यायाधीश म्हणून येणे कोणत्या चार शास्त्रवचनांवरून सूचित होते?

१४ येशूच्या भविष्यवाणीचे आणखी परीक्षण केल्यानंतर, इतर महत्त्वाच्या घटना केव्हा घडतील याबद्दल आपली जी समज आहे त्यात फेरबदल करण्याची गरज असल्याचे दिसून येते का? याचे उत्तर भविष्यवाणीवरूनच मिळते. ते कसे, आपण पाहू या.

१५ येशूच्या भविष्यवाणीचा जो भाग मत्तय २४:२९–२५:४६ या वचनांत नमूद आहे त्यात तो प्रामुख्याने या शेवटल्या दिवसांदरम्यान आणि येणाऱ्‍या मोठ्या संकटादरम्यान घडणाऱ्‍या घटनांवर भर देतो. त्या वचनांत, येशू त्याच्या ‘येण्याचा’ आठ वेळा उल्लेख करतो. मोठ्या संकटाविषयी तो असे म्हणतो: “ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन . . . येताना पाहतील.” “कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” “तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” तसेच, मेंढरांच्या आणि शेरडांच्या दृष्टान्तात येशू म्हणतो: “मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने . . . येईल.” (मत्त. २४:३०, ४२, ४४; २५:३१) या चारही शास्त्रवचनांवरून ख्रिस्ताचे ‘भविष्यात’ न्यायाधीश म्हणून येणे सूचित होते. मग उरलेले चार संदर्भ येशूच्या भविष्यवाणीत कोठे सापडतात?

१६. येशूच्या येण्याचा उल्लेख आणखी कोणत्या शास्त्रवचनांत सापडतो?

१६ विश्‍वासू व बुद्धिमान दासाविषयी येशू म्हणतो: “धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य.” दहा कुमारींच्या दृष्टान्तात येशू म्हणतो: “त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला.” रुपयांच्या दृष्टान्तात येशू असे सांगतो: “बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला.” त्याच दृष्टान्तात धनी असे म्हणतो: “मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते.” (मत्त. २४:४६; २५:१०, १९, २७) येशूच्या येण्याचे हे चार संदर्भ कोणत्या काळाला सूचित करतात?

१७. मत्तय २४:४६ मध्ये येशूच्या येण्याचा जो उल्लेख आढळतो त्याबद्दल पूर्वी आपण काय म्हटले होते?

१७ गतकाळात, आपण आपल्या प्रकाशनांमध्ये असे म्हटले होते, की शेवटचे हे चार संदर्भ १९१८ मध्ये येशूच्या येण्याला लागू होतात. उदाहरणार्थ, येशूने “विश्‍वासू व बुद्धिमान” दासाविषयी केलेल्या विधानाचाच विचार करा. (मत्तय २४:४५-४७ वाचा.) ४६ व्या वचनात उल्लेख केलेले येशूचे ‘येणे’ हे १९१८ मध्ये येशू अभिषिक्‍त जनांच्या आध्यात्मिक स्थितीची पाहणी करण्यास आला, त्याच्याशी निगडित आहे असा पूर्वी आपला समज होता. तसेच, विश्‍वासू दासाला १९१९ मध्ये धन्याच्या सर्वस्वावर नेमण्यात आले असेही आपण समजायचो. (मला. ३:१) पण, येशूच्या भविष्यवाणीचे आणखी परीक्षण केल्यानंतर दिसून येते, की या भविष्यवाणीतील काही विशिष्ट घटना कधी घडतील याविषयी आपण जे मानत आलो आहोत त्यात फेरबदल करण्याची गरज आहे. असे का म्हणता येईल?

१८. येशूने केलेली संपूर्ण भविष्यवाणी विचारात घेतल्यानंतर त्याच्या येण्याविषयी आपण कोणत्या निष्कर्षावर पोचतो?

 १८ मत्तय २४:४६ च्या आधी असलेल्या वचनांत जेव्हा जेव्हा ‘येणे’ असा उल्लेख आढळतो, तेव्हा तेव्हा तो भविष्यातील मोठ्या संकटादरम्यानच्या त्या काळाला सूचित करतो जेव्हा येशू न्यायदंडाची घोषणा करण्यासाठी व तो बजावण्यासाठी येईल. (मत्त. २४:३०, ४२, ४४) तसेच, आपण  परिच्छेद १२ मध्ये पाहिल्याप्रमाणे, मत्तय २५:३१ मध्ये ‘येण्याचा’ जो उल्लेख आढळतो तोदेखील भविष्यातील न्यायदंडाच्या त्याच काळाला सूचित करतो. तेव्हा असा निष्कर्ष काढणे तर्कसंगत आहे, की मत्तय २४:४६, ४७ मध्ये उल्लेख केलेले विश्‍वासू दासाचे धन्याच्या सर्वस्वावर नेमले जाणे हेदेखील भविष्यात, म्हणजे मोठ्या संकटादरम्यान येशूच्या येण्याला लागू होते. आतापर्यंत आपण येशूच्या येण्याविषयीचा उल्लेख असलेल्या आठ वचनांची चर्चा केली. येशूने केलेली संपूर्ण भविष्यवाणी विचारात घेतल्यानंतर हे स्पष्ट होते, की या आठही वचनांत त्याच्या येण्याविषयी जे सांगितले आहे ते भविष्यात मोठ्या संकटादरम्यान होणाऱ्‍या न्यायदंडाच्या काळाला लागू होते.

१९. आपण कोणत्या सुधारित स्पष्टीकरणांची चर्चा केली आहे, आणि पुढील लेखांत कोणत्या प्रश्‍नांची चर्चा केली जाईल?

१९ तर मग, आतापर्यंत चर्चा केलेल्या गोष्टींवरून आपण काय शिकलो? या लेखात आपण तीन प्रश्‍नांची चर्चा केली. सर्वात आधी आपण पाहिले की मोठ्या संकटाची सुरुवात १९१४ मध्ये झाली नाही, तर ‘संयुक्‍त राष्ट्रे’ जेव्हा मोठ्या बाबेलवर हल्ला करेल तेव्हा मोठ्या संकटाची सुरुवात होईल. त्यानंतर, आपण हे पाहिले, की मेंढरांचा आणि शेरडांचा न्याय करण्याचे कार्य येशूने १९१४ मध्ये सुरू केलेले नसून, हे कार्य मोठ्या संकटादरम्यान सुरू होईल. सर्वात शेवटी आपण याचे परीक्षण केले, की विश्‍वासू व बुद्धिमान दासाला आपल्या सर्वस्वावर नेमण्यासाठी येशूचे येणे हे १९१९ मध्ये घडले नसून, ते मोठ्या संकटादरम्यान घडेल. तेव्हा, तीनही प्रश्‍न एकाच कालावधीला, म्हणजे भविष्यातील मोठ्या संकटाच्या काळाला सूचित करतात. तर मग, या सुधारित स्पष्टीकरणाचा विश्‍वासू व बुद्धिमान दासाबद्दल आपला जो समज आहे त्यावर कसा प्रभाव पडतो? तसेच, या शेवटल्या दिवसांदरम्यान पूर्ण होत असलेल्या येशूच्या इतर दृष्टान्तांविषयी आपला जो समज आहे, त्यावर या सुधारित स्पष्टीकरणाचा कसा प्रभाव पडतो? या महत्त्वाच्या प्रश्‍नांची चर्चा पुढील लेखांत केली जाईल.

 

^ परिच्छेद ४: जास्त माहितीसाठी, टेहळणी बुरूज, १५ फेब्रुवारी १९९४, पृष्ठे ८-२१ आणि १ मे १९९९, पृष्ठे ८-२० पाहा.

^ परिच्छेद ८: या वचनांत उल्लेख केलेल्या घटनांपैकी एक घटना आहे “निवडलेल्यांस” जमा करणे. (मत्त. २४:३१) त्यामुळे, मोठ्या संकटाचा पहिला भाग संपल्यावर जे अभिषिक्‍त जन अद्यापही पृथ्वीवर असतील त्यांना हर्मगिदोनाचे युद्ध सुरू होण्याआधी कधीतरी स्वर्गात घेतले जाईल असे दिसते. हे स्पष्टीकरण, टेहळणी बुरूज, १५ ऑगस्ट १९९० (इंग्रजी), पृष्ठ ३० वर “वाचकांचे प्रश्‍न” यात जे म्हटले होते त्याचे सुधारित स्पष्टीकरण आहे.

^ परिच्छेद ११: टेहळणी बुरूज, १५ ऑक्टोबर १९९५, पृष्ठे १८-२८ पाहा.

^ परिच्छेद १२: लूक २१:२८ यात असलेला समांतर अहवाल पाहा.