व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

ख्रिस्ती पालकांनी मंडळीच्या सभांमध्ये आपल्या बहिष्कृत मुलासोबत बसणे योग्य ठरेल का?

राज्य सभागृहात बहिष्कृत व्यक्‍तीने नेमके कोठे बसावे याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. या नियतकालिकाने नेहमीच ख्रिस्ती पालकांना असे उत्तेजन दिले आहे की त्यांच्यासोबत एकाच घरात राहणाऱ्‍या बहिष्कृत मुलाला त्यांनी योग्य वाटल्यास आध्यात्मिक मदत करावी. १ ऑगस्ट १९८९ च्या टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे २२ आणि २३ वर सांगितल्याप्रमाणे, पालक त्यांच्यासोबत राहणाऱ्‍या बहिष्कृत लहान मुलासोबत बायबलचा अभ्याससुद्धा करू शकतात. यामुळे त्या मुलाला त्याचा चुकीचा मार्ग सुधारण्यासाठी ज्या उत्तेजनाची गरज आहे ती मिळण्याची शक्यता आहे. *

राज्य सभागृहात बसण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा बहिष्कृत झालेले लहान मूलही आपल्या पालकासोबत शांतपणे बसू शकते; यात काहीच गैर नाही. बहिष्कृत व्यक्‍तीने सभागृहात मागेच बसावे असा काही नियम नसल्यामुळे पालक सभेत कोठेही बसत असले तरी त्यांच्या बहिष्कृत मुलाने त्यांच्यासोबत बसण्यात काहीच हरकत नाही. पालक या नात्याने आपल्या मुलाच्या आध्यात्मिकतेची काळजी घेत असताना सभेद्वारे त्याला पुरेपूर फायदा मिळत आहे याची खातरी त्यांनी करावी. आपल्या लहान मुलाला एकटे सोडून देण्याऐवजी त्याला आपल्यासोबत बसू दिल्यास नक्कीच मदत होऊ शकते.

पण बहिष्कृत मूल पालकांसोबत राहत नसेल तर काय? यामुळे काही फरक पडू शकतो का? एकाच घरात न राहणाऱ्‍या बहिष्कृत नातेवाइकाबरोबर संगती करण्याबाबत ख्रिश्‍चनांनी कोणती मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करावा याबद्दलची स्पष्ट माहिती यापूर्वी या नियतकालिकात देण्यात आली आहे. * पण, एका बहिष्कृत व्यक्‍तीने सभेदरम्यान आपल्या नातेवाइकांच्या शेजारी शांतपणे बसणे ही एक गोष्ट आहे; तर नातेवाइकांनी त्याच्यासोबत उगाचच संगती करण्याचा स्वतःहून प्रयत्न करणे ही अगदीच वेगळी गोष्ट आहे. कुटुंबातील विश्‍वासू सदस्यांनी आपल्या बहिष्कृत नातेवाइकाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगल्यास आणि त्याच्यासोबत संगती करण्यासंबंधी असलेल्या शास्त्रवचनीय सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न केल्यास खरेतर काळजीचे कारण असू नये.—१ करिंथ. ५:११, १३; २ योहा. ११.

बहिष्कृत व्यक्‍ती राज्य सभागृहात आपल्या नातेवाइकाच्या शेजारी बसली किंवा मंडळीतील इतर कोणत्याही व्यक्‍तीच्या शेजारी बसली तरी हे चुकीचे ठरणार नाही; एवढेच, की तिने शांतपणे बसावे व नीट वागावे. मंडळीत एखाद्या व्यक्‍तीने कोठे बसावे याबद्दल नियम बनवल्यास, काही परिस्थितींमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उपस्थित असलेले सर्व जण तसेच बहिष्कृत व्यक्‍तीचे विश्‍वासू नातेवाईकसुद्धा बहिष्कृतीसंबंधी असलेल्या बायबल तत्त्वांचा आदर करत असतील; आणि इतर बंधुभगिनींना अडखळण होत नसेल तर ख्रिस्ती सभांना उपस्थित असलेल्यांनी कोठे बसावे याबद्दल अवाजवी चिंता करण्याची गरज नाही. *

^ या लेखातील मुद्दे जरी बहिष्कृत लहान मुलासंबंधी असले तरी ते मुलीलाही लागू होतात.

^ टेहळणी बुरूज (इंग्रजी), १५ सप्टेंबर १९८१ या अंकातील पृष्ठे २९ आणि ३० पाहा.

^ टेहळणी बुरूज (इंग्रजी), १ एप्रिल १९५३ यातील पृष्ठ २२३ वर जी माहिती प्रकाशित करण्यात आली होती त्यावरील ही सुधारित माहिती आहे.