व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवावर कधीच नाराज होऊ नका

यहोवावर कधीच नाराज होऊ नका

“मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करते, आणि त्याचे मन परमेश्‍वरावर रुष्ट होते.”—नीति. १९:३.

१, २. मानवांच्या समस्यांसाठी आपण यहोवाला जबाबदार का ठरवू नये? उदाहरण द्या.

 अशी कल्पना करा की तुमचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली आहेत; तुम्ही आणि तुमची पत्नी सुखासुखी जीवन जगत आहात. पण, एक दिवस तुम्ही घरी येता आणि काय पाहता? घरात सगळे काही अस्ताव्यस्त पडले आहे. घरातील सामानाची मोडतोड झाली आहे, भांडी इकडेतिकडे पडलेली आहेत. तुम्ही जिवापाड जपलेल्या घरात जणू भूकंपच आला आहे असे वाटते. घराची ती अवस्था पाहून तुम्ही नक्कीच असे म्हणणार नाही, की “माझ्या बायकोनं असं का केलं? उलट तुम्ही विचाराल, “कुणी केलं हे?” कारण तुमची प्रिय पत्नी असे काम करूच शकत नाही याची तुम्हाला पूर्ण खातरी असते.

आज मानवांचे घर असलेली पृथ्वी ही प्रदूषण, हिंसाचार आणि अनैतिकता यांनी बरबटलेली आहे. आपण बायबलचा अभ्यास करत असल्यामुळे आपल्याला ठाऊक आहे की या समस्यांसाठी यहोवा जबाबदार नाही. कारण ही पृथ्वी एक सुंदर नंदनवन बनावी या हेतूने त्याने तिची निर्मिती केली होती. (उत्प. २:८, १५) तसेच, यहोवा एक प्रेमळ देव आहे. (१ योहा. ४:८) जगातील समस्यांसाठी मुळात कोण जबाबदार आहे हे बायबलच्या अभ्यासातून आपल्याला समजले आहे. त्या समस्यांसाठी, “जगाचा अधिकारी” असलेला दियाबल सैतान जबाबदार आहे.—योहा. १४:३०; २ करिंथ. ४:४.

३. आपल्या समस्यांबद्दल आपण चुकीचा दृष्टिकोन कसा बाळगायला लागू?

पण, आपल्या जीवनातील सर्वच समस्यांसाठी आपण सैतानाला दोष देऊ शकत नाही. का बरे? कारण काही समस्या आपल्या स्वतःच्या चुकांमुळे निर्माण होत असतात. (अनुवाद ३२:४-६ वाचा.) आपण हे मान्य करत असलो, तरी अपरिपूर्ण असल्यामुळे कधीकधी आपल्या समस्यांबाबत आपण चुकीचा दृष्टिकोन बाळगतो. आणि यामुळे आपण अशी एक विचारसरणी अवलंबतो जी कालांतराने आपल्याकरता घातक ठरू शकते. (नीति. १४:१२) ते कसे? तर, एखाद्या समस्येसाठी स्वतःला किंवा सैतानाला दोष देण्याऐवजी आपण यहोवाला दोष द्यायला लागतो. इतकेच काय, तर कधीकधी आपण यहोवावर नाराजदेखील होतो.—नीति. १९:३.

४, ५. एक ख्रिस्ती व्यक्‍ती कशा प्रकारे यहोवावर नाराज होण्याची शक्यता आहे?

पण, यहोवावर नाराज होण्यात खरेच काही अर्थ आहे का? नाही, असे करणे व्यर्थच ठरेल. (यश. ४१:११) यहोवाशी लढून आपण कधीच जिंकू शकणार नाही. हे खरे आहे, की आपण यहोवावर नाराज असल्याचे कदाचित उघडपणे बोलून दाखवत नसू. पण नीतिसूत्रे १९:३ म्हणते की, “मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करते, आणि त्याचे मन परमेश्‍वरावर रुष्ट होते.” यावरून दिसून येते, की एक व्यक्‍ती मनातल्या मनात यहोवावर रुष्ट किंवा नाराज होऊ शकते. तिची ही मनोवृत्ती तिच्या कृत्यांतून दिसून येईल. उदाहरणार्थ, ती व्यक्‍ती कदाचित यहोवाच्या सेवेत धिमी पडेल किंवा मंडळीत येण्याचे सोडून देईल.

आपण कशामुळे यहोवावर नाराज होण्याची शक्यता आहे? हा पाश कसा टाळता येईल? या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण त्यावरच यहोवासोबतचा आपला नातेसंबंध अवलंबून आहे.

आपण कशामुळे यहोवावर नाराज होण्याची शक्यता आहे?

६, ७. मोशेच्या काळात इस्राएल लोक यहोवाविरुद्ध कुरकूर का करू लागले?

यहोवाचा एखादा विश्‍वासू सेवक कशामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याची शक्यता आहे? याची पाच कारणे आपण विचारात घेऊ या आणि बायबलच्या काळात या पाशाला बळी पडलेल्या काही जणांच्या उदाहरणांचे परीक्षण करू या.—१ करिंथ. १०:११, १२.

इतरांच्या नकारार्थी बोलण्याकडे लक्ष दिल्यास आपल्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो (परिच्छेद ७ पाहा)

इतरांच्या नकारार्थी बोलण्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. (अनुवाद १:२६-२८ वाचा.) इस्राएल लोक नुकतेच इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर पडले होते. इजिप्त या जुलमी राष्ट्रावर यहोवाने चमत्कारिक रीत्या दहा पीडा आणल्या होत्या आणि फारोचा व त्याच्या लष्करी सैन्याचा तांबड्या समुद्रात नाश केला होता. (निर्ग. १२:२९-३२, ५१; १४:२९-३१; स्तो. १३६:१५) देवाचे लोक प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते. पण, नेमक्या याच महत्त्वाच्या क्षणी ते यहोवाविरुद्ध तक्रार करू लागले. कशामुळे त्यांचा विश्‍वास ढळला? देशाची पाहणी करण्यासाठी पाठवलेल्या हेरांनी जी नकारार्थी बातमी आणली होती ती ऐकून त्यांच्या हृदयाचे पाणीपाणी झाले. (गण. १४:१-४) याचा परिणाम असा झाला, की एका संपूर्ण पिढीलाच उत्तम देशात प्रवेश मिळाला नाही. (अनु. १:३४, ३५) यावरून आपण काय शिकतो? हेच, की इतरांच्या नकारार्थी बोलण्यामुळे आपला विश्‍वास कमजोर होऊ शकतो. आणि यामुळे यहोवा ज्या प्रकारे आपल्या लोकांचे मार्गदर्शन करतो त्याबद्दल आपण कुरकूर करायला लागू शकतो.

८. कोणत्या कारणामुळे यशयाच्या काळात देवाचे लोक आपल्या परिस्थितीसाठी यहोवाला जबाबदार धरू लागले?

संकटांमुळे किंवा अडीअडचणींमुळे आपण खचून जाऊ शकतो. (यशया ८:२१, २२ वाचा.) यशयाच्या काळात इस्राएल लोक अतिशय बिकट परिस्थितीत होते. शत्रूंनी त्यांना वेढा घातला होता. देशात दुष्काळ पडला होता आणि भुकेमुळे लोक कासावीस झाले होते. पण, त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या काळात आध्यात्मिक गोष्टींचा दुष्काळ पडला होता. (आमो. ८:११) या परिस्थितीत मदतीसाठी यहोवाचा धावा करण्याऐवजी ते आपल्या राजाला आणि आपल्या देवाला “शिव्याशाप” देऊ लागले. अशा प्रकारे, आपल्या समस्यांसाठी त्यांनी देवाला जबाबदार धरले. आज आपल्यावर एखादे संकट कोसळले किंवा काही समस्या आल्या तर आपणही मनात असे म्हणणार का, की “मला गरज होती तेव्हा यहोवा कुठं होता?”

९. यहेज्केलच्या काळातील इस्राएल लोकांनी चुकीचा दृष्टिकोन का बाळगला?

आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीत नसतात. यहेज्केलच्या काळात राहणाऱ्‍या इस्राएल लोकांना सगळ्याच गोष्टी माहीत नसल्यामुळे, “प्रभूचा मार्ग न्याय्य नाही,” असा ते विचार करू लागले. (यहे. १८:२९) आपले स्तर यहोवाच्या स्तरांपेक्षा उच्च आहेत असे मानून, अर्धवट माहितीच्या आधारावर ते जणू देवाचा न्याय करायला निघाले होते. आपल्याला जर बायबलमधील एखादा वृत्तान्त किंवा आपल्या जीवनातील घटना ज्या प्रकारे वळण घेत आहेत ते पूर्णपणे समजत नसेल, तर यहोवा अन्यायी आहे किंवा त्याचा “मार्ग न्याय्य नाही” असे आपण मनातल्या मनात म्हणणार का?—ईयो. ३५:२.

१०. एक व्यक्‍ती कशा प्रकारे आदामाच्या चुकीच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकते?

१० आपण सहसा आपल्या पापांचा किंवा चुकांचा दोष दुसऱ्‍यांवर ढकलतो. मानव इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात आदामाने आपल्या पापासाठी देवाला दोषी ठरवले. (उत्प. ३:१२) आदामाने जाणूनबुजून आणि पुढे होणाऱ्‍या परिणामांची पूर्ण कल्पना असूनही देवाचा नियम तोडला होता. तरीसुद्धा त्याबद्दल त्याने देवाला दोषी ठरवले. असे करण्याद्वारे तो जणू असे म्हणत होता की यहोवाने त्याला चांगली बायको दिली नव्हती. तेव्हापासून, अनेकांनी आपल्या चुकांसाठी देवाला दोष देण्यात आदामाच्या उदाहरणाचे अनुकरण केले आहे. त्यामुळे आपण स्वतःला असे विचारले पाहिजे की, ‘माझ्या स्वतःच्या चुकांमुळे निराश किंवा त्रस्त होऊन मी यहोवाच्या नीतिनियमांना दोष देतो का?’

११. योनाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

११ आपण सहसा स्वतःचाच विचार करतो. यहोवाने निनवे शहरातील लोकांना दया दाखवून त्यांचा नाश करण्याचा विचार बदलला तेव्हा योनाला खूप राग आला. (योना ४:१-३) का? कारण योनाने घोषणा केल्याप्रमाणे निनवे शहराचा नाश झाला नाही तेव्हा आपल्याला आता तोंड दाखवायला जागा उरणार नाही या गोष्टीची त्याला सगळ्यात जास्त चिंता लागली होती. मनापासून पश्‍चात्ताप केलेल्या निनवेकरांबद्दल करुणा वाटण्याऐवजी त्याला स्वतःच्या नावाची चिंता भेडसावत होती. आपल्यालाही योनासारखे वाटू शकते का? आपण जर स्वतःचाच विचार केला तर लोकांच्या गरजांकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, यहोवा लवकरच या दुष्ट जगाचा अंत करणार आहे याचा आपण अनेक वर्षांपासून प्रचार करत आलो आहोत. पण, देवाने अजूनही अंत आणला नाही याबद्दल लोक आपली थट्टा करतात तेव्हा आपण अधीर होऊन यहोवावर नाराज होणार का?—२ पेत्र ३:३, ४, ९.

यहोवावर नाराज होण्याचे आपण कसे टाळू शकतो?

१२, १३. यहोवाच्या काही कार्यांबद्दल आपल्या पापी मनात प्रश्‍न निर्माण होऊ लागल्यास आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे?

१२ यहोवाच्या काही कार्यांबद्दल आपल्या पापी मनात प्रश्‍न निर्माण होऊ लागल्यास काय? हे लक्षात घ्या की असे करणे मूर्खपणाचे ठरेल. बायबलच्या आणखी एका भाषांतरात नीतिसूत्रे १९:३ (ईझी-टू-रीड व्हर्शन) म्हणते: “माणसाचा स्वतःचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो पण तो दोष मात्र परमेश्‍वराला देतो.” हे लक्षात ठेवून आपण आता पाच गोष्टी विचारात घेणार आहोत; त्यांचे परीक्षण केल्याने जीवनातील कोणत्याही समस्यांसाठी यहोवाला दोष देण्याचे आपण टाळू शकतो.

१३ यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाकडे लक्ष द्या. आपण जर देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध राखला तर त्याच्यावर नाराज होण्याच्या पापी प्रवृत्तीवर आपल्याला मात करता येईल. (नीतिसूत्रे ३:५, ६ वाचा.) आपण यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. तसेच, आपण स्वतःला खूप शहाणे समजू नये किंवा स्वतःचाच विचार करू नये. (नीति. ३:७; उप. ७:१६) हा सल्ला पाळल्यास, वाईट गोष्टी घडतात तेव्हा आपण यहोवाला दोष देणार नाही.

१४, १५. कोणती गोष्ट आपल्याला इतरांच्या नकारार्थी बोलण्याकडे लक्ष न देण्यास मदत करू शकते?

१४ नकारार्थी बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मोशेच्या काळातील इस्राएल लोकांजवळ, यहोवा नक्कीच आपल्याला प्रतिज्ञात देशात घेऊन जाईल असा विश्‍वास बाळगण्याची अनेक कारणे होती. (स्तो. ७८:४३-५३) पण, दहा अविश्‍वासू हेरांनी नकारात्मक बातमी आणली तेव्हा यहोवाच्या “प्रतापी हस्ताचे त्यांस स्मरण झाले नाही.” (स्तो. ७८:४२) आपण जर यहोवाच्या कार्यांवर मनन केले व त्याने आपल्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यांचे स्मरण केले, तर त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध आणखी दृढ होईल. आणि याचा परिणाम असा होईल, की इतरांच्या नकारार्थी बोलण्यामुळे आपण आपल्या आणि यहोवाच्या नातेसंबंधात दरी निर्माण होऊ देणार नाही.—स्तो. ७७:११, १२.

१५ आपल्या बंधुभगिनींविषयी आपली नकारात्मक मनोवृत्ती असल्यास काय? अशा परिस्थितीत यहोवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. (१ योहा. ४:२०) अहरोनाला महायाजक म्हणून नियुक्‍त करण्यात आले तेव्हा इस्राएल लोकांनी कुरकूर केली. असे केल्याने ते जणू आपल्याविरुद्धच कुरकूर करत आहेत असे यहोवाने मानले. (गण. १७:१०) त्याचप्रमाणे, आज यहोवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागाचे मार्गदर्शन करण्यासाठी यहोवा ज्यांचा उपयोग करत आहे त्यांच्याविरुद्ध जर आपण कुरकूर केली, तर हे यहोवाविरुद्ध कुरकूर करण्यासारखेच होईल.—इब्री १३:७, १७.

१६, १७. जीवनात समस्या येतात तेव्हा आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?

१६ आपल्या समस्यांचे कारण यहोवा नाही हे लक्षात असू द्या. यशयाच्या काळातील इस्राएल लोक यहोवापासून दूर गेले, तरीसुद्धा यहोवा त्यांना मदत करू इच्छित होता. (यश. १:१६-१९) जीवनात आपल्याला कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागले तरी यहोवाला आपली काळजी आहे आणि तो आपल्याला मदत करू इच्छितो हे जाणून आपल्याला दिलासा मिळू शकतो. (१ पेत्र ५:७) आपण त्याला विश्‍वासू राहावे म्हणून आपल्याला सामर्थ्य देण्याचे वचनही तो देतो.—१ करिंथ. १०:१३.

१७ विश्‍वासू ईयोबाप्रमाणे आपण जर अन्याय सहन करत असू तर त्यासाठी यहोवा जबाबदार नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण यहोवाला अन्यायाचा वीट आहे, पण त्याला नीतिमत्ता प्रिय वाटते. (स्तो. ३३:५) ईयोबाचा मित्र अलीहू याच्याप्रमाणे आपणही हे मान्य करू, की “सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करावयाला नको.” (ईयो. ३४:१०) यहोवा कधीच आपल्यावर समस्या आणत नाही; उलट, तो आपल्याला “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देतो.—याको. १:१३, १७.

१८, १९. यहोवाबद्दल आपण कधीच शंका का घेऊ नये? उदाहरण द्या.

१८ यहोवाबद्दल कधीच शंका घेऊ नका. देव परिपूर्ण आहे आणि त्याचे विचार आपल्यापेक्षा कितीतरी उच्च आहेत. (यश. ५५:८, ९) त्यामुळे आपण नम्रपणे हे कबूल केले पाहिजे की आपली समज मर्यादित आहे. (रोम. ९:२०) एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला नेहमीच सर्व काही माहीत असते असे नाही. पुढील नीतिसूत्रात जे म्हटले आहे ते किती खरे आहे याचा तुम्हालाही नक्कीच अनुभव आला असेल. त्यात म्हटले आहे: “सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्‍न विचारत नाही.”—नीति. १८:१७, ईझी-टू-रीड व्हर्शन.

१९ असे समजा की तुमच्या एका भरवशाच्या मित्राने असे काहीतरी केले आहे जे सुरुवातीला कदाचित तुम्हाला समजणार नाही किंवा त्याने जे केले ते खूपच वेगळे आहे असे तुम्हाला वाटेल. मग तुम्ही लगेच असा विचार कराल का, की त्याने नक्कीच काहीतरी गुन्हा केला असेल? नाही. उलट, आपण असा विचार करू की नेमके काय घडले त्याची पूर्ण कल्पना आपल्याला नाही. आपण जर आपल्या अपरिपूर्ण मित्रांशी इतक्या प्रेमळपणे वागतो, तर मग आपल्या स्वर्गीय पित्यावर आपण आणखी किती भरवसा ठेवला पाहिजे! कारण त्याचे मार्ग आणि विचार आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत.

२०, २१. आपल्या समस्यांसाठी आपण कधीही यहोवाला जबाबदार का धरू नये?

२० आपल्या समस्यांचे कारण काय ते नेहमी लक्षात असू द्या. का बरे? कारण आपल्या काही समस्यांसाठी आपण स्वतःच जबाबदार असू. आणि तसे जर असेल तर आपण ते मान्य केले पाहिजे. (गलती. ६:७) आपल्या समस्यांसाठी देवाला जबाबदार धरू नका. असे करणे अविचारीपणाचे ठरेल. एक उदाहरण विचारात घ्या: एखादी कार भरधाव वेगाने धावू शकत असेल. पण, समजा वाहनचालकाने धोक्याच्या वळणावर वेगमर्यादा ओलांडली आणि त्यामुळे अपघात झाला तर त्यासाठी कारच्या उत्पादकाला जबाबदार धरावे का? मुळीच नाही! त्याचप्रमाणे, यहोवाने आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिले आहे. पण, योग्य निर्णय कसे घ्यावेत याबद्दल त्याने आपल्याला उचित मार्गदर्शनही दिले आहे. मग, आपल्या चुकांसाठी आपण देवाला का जबाबदार धरावे?

२१ अर्थात, सर्वच समस्या आपल्या स्वतःच्या चुकांमुळे निर्माण होत नसतात. काही दुर्घटना, “समय व प्रसंग” यांमुळे घडतात. (उप. ९:११, पं.र.भा.) पण शेवटी, एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, सर्व दुष्टाईचे मूळ कारण दियाबल सैतान आहे. (१ योहा. ५:१९; प्रकटी. १२:९) तोच आपला शत्रू आहे, यहोवा नाही!—१ पेत्र ५:८.

यहोवासोबतचा आपला मौल्यवान नातेसंबंध जपा

यहोवावर विश्‍वास ठेवल्यामुळे यहोशवा आणि कालेब यांना आशीर्वाद मिळाला (परिच्छेद २२ पाहा)

२२, २३. आपल्या समस्यांमुळे आपण निराश झालो तर आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?

२२ तुमच्यावर संकटे किंवा अडीअडचणी येतात तेव्हा यहोशवा व कालेब यांचे उदाहरण आठवा. इतर दहा हेरांच्या अगदी उलट या दोन विश्‍वासू पुरुषांनी चांगली बातमी आणली. (गण. १४:६-९) त्यांनी यहोवावर विश्‍वास दाखवला. तरीसुद्धा, इतर इस्राएल लोकांसह त्यांनाही ४० वर्षे अरण्यात भटकावे लागले. पण, आपल्यावर अन्याय झाला आहे असे समजून यहोशवा आणि कालेब यांनी तक्रार केली का, किंवा मनात राग बाळगला का? नाही. त्यांनी यहोवावर भरवसा ठेवला. त्याबद्दल त्यांना आशीर्वाद मिळाला का? नक्कीच! कारण एक संपूर्ण पिढी अरण्यात मरण पावली असली, तरी या दोघाही पुरुषांना प्रतिज्ञात देशात प्रवेश मिळाला. (गण. १४:३०) आपणही न खचता यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले तर त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही नक्कीच आशीर्वाद मिळतील.—गलती. ६:९; इब्री ६:१०.

२३ तुमच्या समस्यांमुळे किंवा इतरांच्या अथवा तुमच्या स्वतःच्या अपरिपूर्णतेमुळे तुम्ही निराश झाला तर काय? यहोवाच्या सुरेख गुणांचा विचार करा. यहोवाने तुम्हाला जी आशा दिली आहे तिचे चित्र डोळ्यांसमोर आणा. स्वतःला विचारा: ‘यहोवाशिवाय माझं जीवन कसं असतं?’ तेव्हा, नेहमी यहोवाच्या जवळ राहा, आणि कोणत्याही गोष्टीमुळे यहोवावर कधीच नाराज होऊ नका.