व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा “प्रतिदिनी” माझा भार वाहतो

यहोवा “प्रतिदिनी” माझा भार वाहतो

आरोग्यासंबंधी मला बऱ्‍याच समस्या असूनही आणि त्यामुळं अनेकदा असह्‍य वेदना सहन कराव्या लागत असूनही आजवर मी आपल्या स्वर्गीय पित्या यहोवाचा आधार पावलोपावली अनुभवला आहे. आणि वीस वर्षांपेक्षा जास्त काळ पायनियर म्हणून यहोवाची सेवा करण्याचा विशेष आनंद मला मिळाला आहे.

माझा जन्म १९५६ मध्ये झाला. जन्मतःच मला स्पायना बायफीडा हा रोग झाला होता. मणक्यातील तंत्रिकानलिका पूर्णपणे बंद नसल्यामुळं माझ्या नसांना जो अपाय झाला त्यामुळं मला चालणं खूप अवघड जातं. शिवाय, इतरही गंभीर व्याधींनी मला जखडलंय.

माझ्या जन्माच्या काही काळाआधी, एका मिशनरी जोडप्यानं माझ्या आईवडिलांसोबत बायबल अभ्यास करायला सुरुवात केली होती. मी लहान असताना नामिबियातील उसाकोस या माझ्या गावी खूप कमी प्रचारक राहत होते. तिथं एकही मंडळी नसल्यामुळं आम्ही कुटुंब मिळून सभेतील साहित्यावर चर्चा करायचो. सात वर्षांची असताना यूरोस्टमीचं ऑपरेशन करून माझ्या शरीरात कृत्रिम रीत्या छिद्र करण्यात आलं. त्यामुळं माझा लघवीसंबंधी त्रास कमी झाला. १४ वर्षांची असताना मला फिट्‌स येऊ लागल्या. आमच्या घरापासून शाळा खूप लांब असल्यामुळं आणि मी पूर्णपणे आईवडिलांवर अवलंबून असल्यामुळं मला माझं शालेय शिक्षण पूर्ण करता आलं नाही.

असं असलं, तरी मी यहोवासोबतचा माझा नातेसंबंध घट्ट करायचं ठरवलं. त्या वेळी आपली प्रकाशनं माझ्या मातृभाषेत, आफ्रिकान्समध्ये उपलब्ध नव्हती. त्यामुळं इंग्रजीत असणाऱ्‍या पुस्तकांचा अभ्यास करता यावा म्हणून मी इंग्रजी वाचायला शिकले. मी राज्य प्रचारक बनले आणि वयाच्या एकोणिसाव्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला. पुढील चार वर्षं, मला बराच शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. शिवाय, आमच्या गावात सगळीच कुटुंबं एकमेकांना ओळखत असल्यामुळं मी सेवाकार्यात आवेशानं भाग घेण्यास मागंपुढं पाहत होते. लोक काय म्हणतील याची मला भीती वाटत होती.

मी विशीत असताना आमचं कुटुंब नामिबियाहून दक्षिण आफ्रिकेला राहायला गेलं. आणि पहिल्यांदाच मी मंडळीचा सहवास अनुभवू शकले. किती आनंददायी होतं ते! पण पुन्हा माझ्यावर ऑपरेशन करावं लागलं. हे कोलस्टमीचं ऑपरेशन होतं.

काही दिवसांनंतर मी एका विभागीय पर्यवेक्षकांचं पायनियरिंग या विषयावरील भाषण ऐकलं. त्यांचे शब्द माझ्या मनाला भिडले. मला माहीत होतं की माझ्या या अशा तब्येतीमुळं पायनियरिंग करणं मला अवघड जाईल. पण, आजवर अनेक समस्यांना तोंड देताना यहोवानं मला साथ दिली आहे हेसुद्धा मी अनुभवलं होतं. म्हणून मी सामान्य पायनियरिंगचा फॉर्म भरला. पण माझ्या खालावलेल्या शारीरिक परिस्थितीमुळं मंडळीतले वडील माझा फॉर्म स्वीकारण्यास कचरत होते.

पण तरीही, मी सेवाकार्यात होता होईल तितकं करण्याचा निर्धार केला. आईच्या आणि इतरांच्या सहकार्यामुळं, मी सहा महिन्यांपर्यंत पायनियर जितके तास भरतात तितके तास भरू शकले. यावरून मला पायनियर बनण्याची किती उत्कट इच्छा आहे आणि आरोग्य समस्या असल्या तरी मला पायनियर सेवा जमू शकते हे सिद्ध झालं. मग मी पुन्हा फॉर्म भरला, आणि या वेळेस मात्र माझा फॉर्म स्वीकारण्यात आला. १ सप्टेंबर १९८८ रोजी मी सामान्य पायनियर बनले.

पायनियर या नात्यानं मी पदोपदी यहोवाचा आधार अनुभवला आहे. स्वतःच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याऐवजी, इतरांना सत्याबद्दल शिकवल्यामुळं मला नकारात्मक भावनांवर मात करण्यास आणि यहोवाबरोबरचा माझा नातेसंबंध आणखी मजबूत करण्यास मदत मिळाली आहे. बऱ्‍याच जणांना, समर्पण करून बाप्तिस्मा घेण्यास मदत केल्यामुळं मला खूप आनंद झाला आहे.

अजूनही माझ्या आरोग्याविषयी काहीच सांगता येत नाही. पण, यहोवा “प्रतिदिनी” माझा भार वाहतो. (स्तो. ६८:१९) आणि मी फक्‍त जगायचं म्हणून जगतेय असं नाही, तर मी दररोज जीवनाचा आनंद घेत आहे कारण यहोवा माझं जीवन सुदंर बनवतोय!