व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोलाचे ज्ञान देणारी विरोधदर्शक वाक्ये

मोलाचे ज्ञान देणारी विरोधदर्शक वाक्ये

येशू हा या पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वात उत्तम शिक्षक होता याच्याशी नक्कीच तुम्हीही सहमत असाल. लोकांना शिकवताना त्याने ज्या पद्धती वापरल्या, उदाहरणार्थ त्याने प्रश्‍नांचा व उदाहरणांचा जसा वापर केला, तसा तुम्हीही कदाचित करण्याचा प्रयत्न केला असेल. पण येशूने अनेकदा विरोध दर्शवणाऱ्‍या वाक्यांचाही वापर केला होता याकडे कधी तुम्ही लक्ष दिले आहे का?

अनेक लोक बोलताना अशा विरोध दर्शवणाऱ्‍या वाक्यांचा वापर करत असतात. बरेचदा तुम्हीदेखील फारसा विचार न करता अशी वाक्ये बोलून जात असाल. उदाहरणार्थ, तुम्ही कदाचित असे म्हणाल, “त्यांनी सांगितलं की सगळी केळी पिकलीयेत; पण ही मात्र अजून कच्चीच आहेत.” किंवा “पूर्वी ती फार लाजाळू होती, पण आता ती खूप बोलकी झालीय.”

अशा प्रकारच्या वाक्यांत आधी आपण एक वस्तुस्थिती किंवा एक विचार मांडतो; त्यानंतर पण, तर, त्याऐवजी किंवा दुसरीकडे पाहता यांसारख्या शब्दांचा वापर करून आपण विरोध दाखवणारे वाक्य त्याला जोडतो. किंवा, दिलेल्या माहितीत आणखी भर घालून विरोध दर्शवणारे वाक्य तयार केले जाऊ शकते. अशा वाक्यांचा बोलताना अगदी सहज रीत्या वापर केला जातो आणि त्यांमुळे तुम्हाला काय सांगायचे आहे हे स्पष्ट होण्यास मदत मिळते.

काही भाषांमध्ये किंवा संस्कृतींमध्ये अशा विरोधदर्शक वाक्यांचा तितका वापर केला जात नाही. तरीसुद्धा अशा वाक्यांचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे. का? कारण, देवाच्या प्रेरित वचनात आपल्याला अशा वाक्यांची अनेक उदाहरणे आढळतात. येशूने कित्येकदा विरोधदर्शक वाक्यांचा उपयोग केला होता. तुम्हाला त्याची ही वाक्ये कदाचित आठवत असतील: “दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणाऱ्‍यांस उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो.” “मी [नियमशास्त्र] रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे.” “व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो . . . ” “डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते, . . . मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. [“पण,” NW] जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर.”—लूक ११:३३; मत्त. ५:१७, २७, २८, ३८, ३९.

बायबलच्या इतर पुस्तकांतही अशा प्रकारची विरोधदर्शक वाक्ये आढळतात. ही वाक्ये तुम्हाला एखादा मुद्दा स्पष्टपणे समजून घेण्यास किंवा एखादी गोष्ट दुसऱ्‍या गोष्टीपेक्षा कशा प्रकारे अधिक चांगली आहे हे समजण्यास साहाय्य करतात. जर तुम्ही एक पालक असाल तर पुढील विरोधदर्शक वाक्याकडे लक्ष द्या: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिस. ६:४) पालकांनी आपल्या मुलांना प्रभूच्या शिस्तीत वाढवावे इतकेच जरी पौलाने म्हटले असते, तरी तो सुज्ञ व उचित सल्ला ठरला असता. पण, ‘मुलांना चिरडीस आणू नका तर प्रभूच्या शिस्तीत त्यांना वाढवा’ असे म्हटल्यामुळे हा मुद्दा आणखीनच स्पष्ट होतो.

त्याच अध्यायात पुढे पौलाने असे लिहिले: “आपले झगडणे रक्‍तमांसाबरोबर नव्हे, तर . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिस. ६:१२) या वाक्यात ख्रिस्ती या नात्याने आपला संघर्ष मानवांशी नाही; तर, दुरात्मिक शक्‍तींशी आहे हे दाखवण्यात आले आहे. या विरोधदर्शक वाक्यावरून आपल्याला किती मोठा संघर्ष करायचा आहे याची आपल्याला जाणीव होते.

विरोधदर्शक वाक्यांवरून बोध घ्या

बायबलच्या याच पुस्तकात, म्हणजेच इफिसकरांस यामध्ये पौलाने वापरलेली आणखीही अनेक विरोधदर्शक वाक्ये आढळतात. या वाक्यांवर विचार केल्यामुळे पौल जे सांगू इच्छित होता ते आपल्याला स्पष्टपणे कळेल. तसेच, आपण काय केले पाहिजे याचीही आपल्याला स्पष्टपणे जाणीव होईल.

सोबतच्या तक्त्यात इफिसकरांस अध्याय ४ व यांतील काही विरोधदर्शक वाक्ये दिलेली आहेत. या वाक्यांचे परीक्षण करणे अतिशय रोचक व माहितीपूर्ण ठरेल. यांतील प्रत्येक वाक्य वाचताना स्वतःच्या जीवनाचा विचार करा. स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास माझी मनोवृत्ती कशी आहे? या किंवा अशा परिस्थितीत माझी प्रतिक्रिया काय असेल? इतरांना विचारल्यास, या विरोधदर्शक वाक्याचा कोणता भाग माझ्या व्यक्‍तिमत्त्वाचं वर्णन करतो असं ते म्हणतील?’ यांपैकी एखाद्या वाक्यातून तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करण्याजोगी एखादी गोष्ट लक्षात आल्यास, लगेच असे करण्याचा प्रयत्न करा. आणि अशा प्रकारे त्या विरोधदर्शक वाक्यापासून बोध घ्या.

किंवा, तुम्ही कौटुंबिक उपासनेत या तक्त्याचा उपयोग करू शकता. सर्वप्रथम, कुटुंबातील सर्व सदस्य तक्त्यातील विरोधदर्शक वाक्ये वाचून घेऊ शकतात. त्यानंतर एक जण कोणत्याही विरोधदर्शक वाक्यातील पहिला भाग सांगू शकतो आणि मग इतर जण त्यातील दुसऱ्‍या भागात कोणता मुद्दा सांगितला आहे हे आठवण्याचा प्रयत्न करू शकतात. वाक्याच्या या दुसऱ्‍या भागाचा जीवनात आणखी चांगल्या प्रकारे उपयोग कसा केला जाऊ शकतो याबाबत कुटुंब मिळून तुम्ही चर्चा करू शकता. ही चर्चा अतिशय आनंददायी ठरेल. खरोखर, या पद्धतीने विरोधदर्शक वाक्यांचा अभ्यास केल्यामुळे कुटुंबातील तरुण व वयस्क सर्वांनाच घरात आणि बाहेरही ख्रिस्ती तत्त्वांनुसार वागण्यास साहाय्य मिळेल.

विरोधदर्शक वाक्यातील दुसरा भाग तुम्हाला आठवतो का?

विरोधदर्शक वाक्यांचे महत्त्व तुम्हाला जसजसे कळेल, तसतसे बायबलचे वाचन करत असताना अशा प्रकारची वाक्ये अधिक सहजपणे तुमचे लक्ष वेधून घेतील. तसेच, ख्रिस्ती सेवाकार्यातही ती अतिशय उपयोगी असल्याचे तुम्हाला दिसून येईल. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या घरमालकाला असे म्हणू शकता: “बरेच जण म्हणतात की माणसात अमर आत्मा असतो, पण देवाचं वचन या ठिकाणी काय म्हणतं ते पाहा.” किंवा बायबल अभ्यास घेत असताना तुम्ही असे विचारू शकता: “बरेच लोक असं मानतात की देव व येशू एकच व्यक्‍ती आहे; पण बायबलमधून आपण काय शिकलो? आणि तुम्ही काय मानता?”

तर अशा रीतीने, बायबलमध्ये अनेक विरोधदर्शक वाक्ये आहेत जी आपल्याला मोलाचे ज्ञान देतात आणि देवाच्या मार्गात चालत राहण्यास साहाय्य करू शकतात. शिवाय, या वाक्यांचा उपयोग करून आपण इतरांनाही बायबलमधील सत्य जाणून घेण्यास मदत करू शकतो.