व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचे रूपांतर झाले आहे का?

तुमचे रूपांतर झाले आहे का?

“आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोम. १२:२.

१, २. आपल्या लहानपणाचे अनुभव आणि आपल्या भोवतालचे वातावरण यांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो?

 आपल्या लहानपणाच्या अनुभवांचा तसेच आपल्या भोवतालच्या वातावरणाचा आपल्यावर खोल प्रभाव पडतो. आपण विशिष्ट प्रकारचे कपडे घालतो; विशिष्ट खाद्यपदार्थ आपल्याला आवडतात; किंवा आपण विशिष्ट प्रकारे वागतो व बोलतो. असे का? कारण आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांचा, तसेच आपल्या जीवनातील परिस्थितींचा कळत-नकळत आपल्यावर प्रभाव पडत असतो.

पण आपल्याला कोणते खाद्यपदार्थ किंवा कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, लहानपणापासूनच काही गोष्टी योग्य तर काही गोष्टी अयोग्य असे आपल्याला शिकवले जाते. पण योग्य काय आणि अयोग्य काय याविषयी वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते असतात. तसेच, आपण जीवनात जे निर्णय घेतो त्यांवर आपल्या विवेकबुद्धीचाही प्रभाव पडतो. बायबलमध्ये सांगितले आहे की बऱ्‍याचदा, “ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय . . . नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करत असतात.” (रोम. २:१४) पण कधीकधी, एखाद्या गोष्टीबद्दल देवाचा कोणताही सुस्पष्ट नियम नसतो. अशा वेळी, आपण आपल्या कुटुंबात शिकवण्यात आल्याप्रमाणे किंवा आपल्या राहत्या परिसरात सर्व जण वागतात त्याप्रमाणे वागावे का?

३. कोणत्या दोन कारणांमुळे खरे ख्रिस्ती जगाच्या चालीरीतींचे अनुकरण करत नाहीत?

पण खरे ख्रिस्ती केवळ कुटुंबाच्या शिकवणीप्रमाणे किंवा इतर सर्वांच्या वागणुकीप्रमाणे वागत नाहीत. यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बायबल आपल्याला अशी आठवण करून देते: “मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.” (नीति. १६:२५) आपण अपरिपूर्ण मानव असल्यामुळे, कोणता मार्ग आपल्याकरता सर्वात हिताचा आहे हे आपल्याला नेहमीच अचूकपणे ठरवता येत नाही. (नीति. २८:२६; यिर्म. १०:२३) दुसरे कारण म्हणजे, बायबल आपल्याला सांगते की सैतान या युगाचे दैवत असल्यामुळे या जगातील चालीरीतींवर त्याचा पगडा आहे. (२ करिंथ. ४:४; १ योहा. ५:१९) त्यामुळे, जर आपल्याला यहोवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि त्याचे मन आनंदित करायचे असेल, तर आपण रोमकर १२:२ (वाचा.) यातील सल्ल्याचे पालन केले पाहिजे.

४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

रोमकर १२:२ या वचनात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. (१) आपले “रूपांतर” होणे का गरजेचे आहे? (२) रूपांतर करणे म्हणजे नेमके काय? आणि (३) आपण स्वतःचे रूपांतर कसे करू शकतो? या तीन प्रश्‍नांवर आता चर्चा करू या.

रूपांतर होणे का गरजेचे आहे?

५. रोमकर १२:२ या वचनातील पौलाचे शब्द खासकरून कोणाकरता होते?

प्रेषित पौलाने रोमकरांना जे पत्र लिहिले होते त्यातील शब्द विश्‍वासात नसलेल्या, सर्वसाधारण लोकांना उद्देशून लिहिलेले नव्हते. तर पौलाने हे शब्द आपल्या अभिषिक्‍त बांधवांना उद्देशून लिहिले होते. (रोम. १:७) पौलाने त्यांना स्वतःचे रूपांतर होऊ द्या आणि “या युगाबरोबर समरूप होऊ नका [“समरूप होण्याचे सोडून द्या,” NW]” असे आर्जवले. त्या काळी म्हणजे इ.स. ५६ च्या सुमारास रोममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कोणत्या “युगाबरोबर” समरूप व्हायचे नव्हते? तर त्यांनी रोमी साम्राज्यातील आचारविचार व रितीभाती यांचा स्वतःवर प्रभाव पडू द्यायचा नव्हता. पौलाने, “समरूप होण्याचे सोडून द्या,” असे जे म्हटले त्यावरून असे दिसून येते की काही बांधव अजूनही त्या युगाच्या प्रभावाखाली होते. त्या काळातील आपल्या बंधुभगिनींना रोमी समाजाच्या कोणकोणत्या प्रभावांचा सामना करावा लागत होता?

६, ७. पौलाच्या काळात रोममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांची परिस्थिती कठीण का होती?

आज रोम शहराला भेट देणाऱ्‍या पर्यटकांना सहसा तेथील मंदिरे, कबरी, स्मारके, आखाडे, नाट्यगृहे इत्यादींचे अवशेष पाहायला मिळतात. यांपैकी काही अवशेष इ.स. पहिल्या शतकातील आहेत. जुन्या काळातील या अवशेषांवरून प्राचीन रोममधील लोकांच्या दैनंदिन जीवनाबद्दल व ते पाळत असलेल्या धार्मिक रीतिरिवाजांबद्दल बरीच माहिती मिळते. तसेच, त्या काळी रोममध्ये होणारे योद्ध्‌यांचे खेळ, रथांच्या शर्यती; तसेच निरनिराळ्या विषयांवर आणि कधीकधी तर अश्‍लील विषयांवर आधारित असलेली नाटके व संगीताचे कार्यक्रम यांविषयी इतिहासाच्या पुस्तकांतून आपल्याला वाचायला मिळते. रोम हे एक अतिशय समृद्ध असे व्यापाराचे केंद्रदेखील होते. त्यामुळे, या शहरात पैसा कमवण्याच्या बऱ्‍याच संधी उपलब्ध होत्या.—रोम. ६:२१; १ पेत्र ४:३, ४.

रोममध्ये अनेक मंदिरे होती व त्यांत असंख्य देवीदेवतांची उपासना केली जायची. पण रोमी लोक ज्या देवतांची उपासना करायचे त्यांच्यासोबत ते एक खराखुरा व जवळचा नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यांच्या दृष्टीने धर्म म्हणजे फक्‍त जन्म, मृत्यू आणि लग्नकार्ये यांच्याशी संबंधित असलेले रीतिरिवाज पाळणे. हे रीतिरिवाज त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होते. या सर्वामुळे रोममध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांची परिस्थिती किती कठीण असावी याची तुम्ही कल्पना करू शकता. त्यांच्यापैकी बरेच जण पूर्वी स्वतः या सर्व गोष्टी पाळत होते. त्यामुळे साहजिकच खरे ख्रिस्ती बनण्याकरता त्यांना स्वतःचे रूपांतर करणे खूप महत्त्वाचे होते. आणि हे रूपांतर केवळ बाप्तिस्मा घेण्यापुरते नव्हते, तर त्यानंतरही त्यांना अनेक बदल करावे लागले असतील.

८. सध्याच्या जगाकडून ख्रिश्‍चनांना कोणता धोका आहे?

रोमच्या प्रभावाखाली असलेल्या त्या जगाप्रमाणेच सध्याचे जगसुद्धा ख्रिश्‍चनांकरता एक धोकादायक ठिकाण आहे. असे का म्हणता येईल? कारण या जगाचा आत्मा अनेक गोष्टींमधून दिसून येतो. (इफिसकर २:२, ३; १ योहान २:१६ वाचा.) आपल्यावर जगातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा, विचारसरणी व नैतिक स्तर यांचा सतत प्रभाव पडत असतो. आणि या प्रभावामुळे आपणही जगातील लोकांसारखे बनण्याचा धोका आहे. म्हणूनच, “या युगाबरोबर समरूप होण्याचे सोडून द्या” आणि “स्वतःचे रूपांतर होऊ द्या” या देवप्रेरित सल्ल्याचे पालन करणे फार गरजेचे आहे. पण कशाचे रूपांतर करणे गरजेचे आहे?

कशाचे रूपांतर करणे गरजेचे आहे?

९. बाप्तिस्मा घेण्याअगोदर बरेच जण कोणते बदल करतात?

एखादी व्यक्‍ती बायबलचा अभ्यास करते आणि शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागू लागते तेव्हा ती यहोवाच्या जवळ येऊ लागते. ती व्यक्‍ती खोट्या धर्मातील चालीरीती सोडून देते आणि आपल्या जीवनात अनेक बदल करते. तसेच, ती ख्रिस्ती गुण विकसित करण्याचाही प्रयत्न करते. (इफिस. ४:२२-२४) दर वर्षी हजारो जण अशी प्रगती करून यहोवा देवाला आपले जीवन समर्पित करतात व बाप्तिस्मा घेतात हे पाहून आपल्याला खूप आनंद होतो. नक्कीच यामुळे यहोवालाही खूप आनंद होतो. (नीति. २७:११) पण एखाद्या व्यक्‍तीचे रूपांतर होण्यासाठी इतकेच बदल करणे पुरेसे आहे का?

अनेकांनी सैतानाच्या जगातून बाहेर येऊन स्वतःचे रूपांतर करण्याची गरज आहे (परिच्छेद ९ पाहा)

१०. रूपांतर हे फक्‍त सुधारणा करण्यापेक्षा वेगळे कसे आहे?

१० खरे पाहता, रूपांतर होणे याचा अर्थ केवळ प्रगती किंवा सुधारणा करणे इतकाच होत नाही. उदाहरणार्थ, बाजारातील एखादी वस्तू “नवीन रूपात” आली आहे असे म्हणून तिची जाहिरात केली जाते. पण, मुळात ती वस्तू बदललेली नसते. कदाचित, एखादा नवीन घटक त्यात घालण्यात आला असेल किंवा त्याचे पॅकेजिंग पूर्वीपेक्षा जास्त आकर्षक असेल इतकेच. एका बायबल शब्दकोशानुसार “रूपांतर होणे” या शब्दांविषयी पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे: “रोमकर १२:२ या वचनात सध्याच्या युगातील [जगातील] बाह्‍य गोष्टींशी समरूप असणे; आणि पवित्र आत्म्याच्या शक्‍तीने आपल्या विचारांमध्ये बदल करून स्वतःचे आतून परिवर्तन करणे या दोन गोष्टींतील फरक स्पष्ट करण्यात आला आहे.” त्याअर्थी, एका ख्रिस्ती व्यक्‍तीने फक्‍त वाईट सवयी, असभ्य बोलणे व अनैतिक वागणूक यांसारख्या गोष्टी सोडून दिल्याने तिचे रूपांतर होणार नाही. ज्यांना बायबलचे काहीही ज्ञान नाही असेही काही लोक आपल्या जीवनात या गोष्टी टाळतात. तर मग, रूपांतर होण्यासाठी एका ख्रिस्ती व्यक्‍तीमध्ये कोणत्या प्रकारचा बदल झाला पाहिजे?

११. एका व्यक्‍तीचे रूपांतर होण्यासाठी कशाची गरज असल्याचे पौलाने सांगितले?

११ पौलाने लिहिले, “आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” मन हे आपल्या विचारशक्‍तीशी संबंधित आहे. पण, बायबलमध्ये मन या शब्दाचा वापर आपल्या मनाचा कल, मनोवृत्ती आणि एखाद्या गोष्टीविषयी तर्क करण्याची क्षमता यांच्या संदर्भातही करण्यात आला आहे. रोमकरांना लिहिलेल्या पत्रातच आधी पौलाने “विपरीत मनाच्या” लोकांचे वर्णन केले होते. अशा प्रकारचे लोक “अनीती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा . . . हेवा, खून, कलह, कपट” आणि अशाच इतर अनेक वाईट गोष्टींच्या आहारी गेले होते. (रोम. १:२८-३१) म्हणूनच, अशा वातावरणात वाढलेले जे लोक देवाचे सेवक बनले होते, त्यांना पौलाने “आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या” असे आर्जवले.

सर्व प्रकारचा संताप, क्रोध, गलबला व निंदा तुम्हापासून दूर करण्यात येवो. —इफिस. ४:३१.

१२. आज लोक सहसा कशा प्रकारे विचार करतात, आणि अशी विचारसरणी ख्रिश्‍चनांकरता धोकादायक का ठरू शकते?

१२ दुःखाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला अशाच लोकांमध्ये राहावे लागते जे पौलाने वर्णन केलेल्या लोकांसारखेच आहेत. या लोकांच्या मते जीवनात कोणत्याही नियमांचे व तत्त्वांचे पालन करणे हे जुनाट विचारसरणीचे लक्षण आहे. आपण कसे वागावे हे कोणीही आपल्याला सांगण्याची गरज नाही असे त्यांना वाटते. बरेच शिक्षक व आईवडील आपल्या मुलांना मनात येईल तसे वागू देतात. इतकेच नव्हे, तर चांगले काय आणि वाईट काय हे ज्याने त्याने आपल्या मनाप्रमाणे ठरवावे असेही ते शिकवतात. देवावर विश्‍वास असल्याचा दावा करणाऱ्‍यांपैकीही बऱ्‍याच जणांना योग्य-अयोग्य यांबाबत देवाच्या नियमांचे पालन करण्याची गरज वाटत नाही. (स्तो. १४:१) अशा प्रकारचे विचार खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी खूप धोकादायक आहेत. आपण खबरदारी न बाळगल्यास मंडळीतील व्यवस्थांबद्दल आपला दृष्टिकोन या लोकांसारखाच बनण्याची शक्यता आहे. आपण कदाचित दिलेल्या मार्गदर्शनानुसार वागण्यास नकार देऊ किंवा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर तिच्याविषयी कुरकूर करू. तसेच मनोरंजन, इंटरनेटचा वापर, व उच्च शिक्षण यांबद्दल आपल्याला बायबलच्या आधारावर सल्ला दिला जातो तेव्हा तो योग्य नाही असा कदाचित आपण विचार करू.

१३. आपण स्वतःचे प्रामाणिकपणे परीक्षण का केले पाहिजे?

१३ तेव्हा, यापुढे जर आपल्याला या जगाच्या विचारसरणीशी समरूप व्हायचे नसेल, तर आपण आपल्या मनात खोलवर दडलेल्या मनोवृत्तींचे, भावनांचे, ध्येयांचे आणि योग्य-अयोग्य यांविषयी आपल्या मतांचे प्रामाणिकपणे परीक्षण केले पाहिजे. या गोष्टी कदाचित इतर लोकांना कळून येणार नाहीत. इतर जण कदाचित आपल्याला सांगतील की आपण आध्यात्मिक रीत्या उत्तम प्रगती करत आहोत. पण, या महत्त्वाच्या गोष्टींबाबत बायबलमधून आपण जे शिकलो आहोत त्यानुसार आपण खरोखरच स्वतःचे रूपांतर होऊ दिले आहे का, आणि अजूनही हे रूपांतर आपण करत आहोत का हे फक्‍त आपल्यालाच माहीत असते.—याकोब १:२३-२५ वाचा.

रूपांतर कसे केले जाते?

१४. आपल्याला स्वतःमध्ये आवश्‍यक बदल करण्यास कशामुळे मदत मिळेल?

१४ रूपांतर होण्यासाठी आपल्या हृदयात जे आहे, म्हणजेच आपण मुळात ज्या प्रकारची व्यक्‍ती आहोत त्यात बदल करण्याची गरज आहे. असे बदल करण्यास आपल्याला कोणती गोष्ट मदत करू शकेल? जेव्हा आपण बायबलचा अभ्यास करतो, तेव्हा यहोवा आपल्याकडून कशा प्रकारची व्यक्‍ती बनण्याची अपेक्षा करतो हे आपल्याला कळते. बायबलमध्ये वाचलेल्या माहितीला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देतो त्यावरून आपल्या हृदयात खरोखर काय आहे हे ओळखण्यास आपल्याला साहाय्य मिळेल. आणि यामुळे आपल्याला हे जाणून घेणे शक्य होईल, की देवाच्या परिपूर्ण इच्छेनुसार वागण्याकरता आपल्याला कोणते बदल करावे लागतील.—रोम. १२:२; इब्री ४:१२.

१५. यहोवा आपल्याला आकार देतो तेव्हा आपल्यामध्ये कोणता बदल होतो?

१५ यशया ६४:८ वाचा. यशया संदेष्ट्याने वापरलेल्या उदाहरणावरून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. आपण मातीसारखे, तर यहोवा देव कुंभारासारखा आहे. आपल्याला आकार देत असताना यहोवा आपल्या बाहेरच्या स्वरूपात बदल करत नाही. उलट आपण आतून ज्या प्रकारची व्यक्‍ती आहोत त्यात तो बदल करतो. हे बदल स्वीकारल्यास, आपण यहोवाला आपल्या आतील व्यक्‍तीचे रूपांतर करू देतो. आणि यामुळे तो आपल्या भावनांमध्ये आणि विचारांमध्ये बदल घडवून आणतो. या जगातील वाईट प्रभावांचा सामना करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये अशाच प्रकारचा बदल करण्याची गरज आहे. पण यहोवा आपल्याला नेमक्या कशा प्रकारे आकार देतो?

१६, १७. (क) उत्तम प्रतीची भांडी बनवण्याआधी कुंभार काय करतो याचे वर्णन करा. (ख) यहोवाच्या सेवेकरता उपयोगी ठरेल अशी व्यक्‍ती बनण्यास देवाचे वचन आपल्याला कशा प्रकारे साहाय्य करते?

१६ चांगल्या दर्जाची भांडी बनवण्याकरता कुंभार उत्तम प्रतीची माती वापरतो. पण, सर्वात आधी त्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. सर्वप्रथम त्याला माती चांगल्या प्रकारे स्वच्छ करून कचरा इत्यादी काढून टाकावा लागतो. त्यानंतर मातीत योग्य प्रमाणात पाणी मिसळून तिचा मऊ गोळा तयार करावा लागतो, जेणेकरून भांडे तयार केल्यानंतर त्याचा आकार टिकून राहील.

१७ कुंभार माती स्वच्छ करतानाच नव्हे, तर तिचा मऊ गोळा तयार करतानादेखील पाण्याचा वापर करतो याकडे लक्ष द्या. असे केल्यामुळे त्याला त्या मातीपासून हवे ते भांडे, अगदी नाजूक भांडेदेखील तयार करता येते. पाण्यामुळे मातीत बदल होतो त्याच प्रकारे देवाचे वचन आपल्यामध्ये बदल घडवून आणते. ते आपल्याला सत्यात येण्यापूर्वीची जुनी विचारसरणी सोडून देण्यास आणि देवाच्या सेवेत उपयोगी ठरेल अशी व्यक्‍ती बनण्यास मदत करते. (इफिस. ५:२६) आपल्याला बायबल दररोज वाचण्याची आणि जेथे देवाच्या वचनातून चर्चा केली जाते त्या ख्रिस्ती सभांना नियमित रीत्या उपस्थित राहण्याची किती वेळा आठवण करून दिली जाते याचा विचार करा. या गोष्टी करण्याचे आपल्याला वारंवार प्रोत्साहन का दिले जाते? कारण जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा यहोवाने आपल्याला आकार द्यावा म्हणून आपण स्वतःला त्याच्या हातात सोपवून देत असतो.—स्तो. १:२; प्रे. कृत्ये १७:११; इब्री १०:२४, २५.

स्वतःचे रूपांतर केल्यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा आणखी चांगल्या प्रकारे समस्यांचा सामना करू शकाल (परिच्छेद १८ पाहा)

१८. (क) देवाच्या वचनाने आपले रूपांतर करण्यासाठी, त्यावर मनन करणे इतके महत्त्वाचे का आहे? (ख) कोणत्या प्रश्‍नांवर आपण विचार केला पाहिजे?

१८ देवाच्या वचनाने आपले रूपांतर करण्यासाठी नियमित रीत्या बायबलचे वाचन करणे व त्यातून शिकून घेणे इतकेच पुरेसे नाही. बरेच लोक वेळोवेळी बायबल वाचतात आणि त्यांना त्यातील पुष्कळ वचनेदेखील माहीत असतात. कदाचित तुम्हाला क्षेत्र सेवाकार्य करताना असे लोक भेटलेही असतील. त्यांच्यापैकी काही जण तर बायबलमधील उतारे तोंडपाठ म्हणून दाखवू शकतात. * पण, याचा त्यांच्या विचारसरणीवर आणि जीवनावर फरक पडतोच असे नाही. असे का? देवाच्या वचनाने एखाद्या व्यक्‍तीवर प्रभाव पाडण्यासाठी आणि तिचे रूपांतर करण्यासाठी त्या व्यक्‍तीने त्यातील शिकवणी थेट तिच्या अंतःकरणापर्यंत पोचू दिल्या पाहिजेत. म्हणूनच, आपण बायबलमधून जे काही शिकतो त्यावर मनन करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘ही नुसतीच एक धार्मिक शिकवण नाही याची मला खात्री आहे का? हे खरोखरच सत्य आहे याचा पुरावा मला माझ्या जीवनात पाहायला मिळालेला आहे का? शिवाय, जे मी शिकत आहे ते फक्‍त इतरांना शिकवण्यासाठी आहे असा दृष्टिकोन न बाळगता, माझ्या स्वतःच्या जीवनात मला याचा कसा उपयोग करता येईल यावर मी विचार केला आहे का? यहोवा खास माझ्याशी बोलत आहे अशी मला जाणीव आहे का?’ अशा प्रश्‍नांवर विचार केल्यामुळे यहोवाशी असलेली आपली जवळीक वाढेल. त्याच्यावर असलेले आपले प्रेम आणखी गहिरे होईल. जेव्हा आपल्या अंतःकरणावर असा परिणाम होईल तेव्हा ओघानेच आपल्या जीवनात चांगले बदल घडून येतील.—नीति. ४:२३; लूक ६:४५.

१९, २०. बायबलमधील कोणत्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे आपल्याला आशीर्वाद मिळतील?

१९ पौलाने म्हटले: “तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे; आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.” (कलस्सै. ३:९, १०) कदाचित आपण काही प्रमाणात या सल्ल्याचे पालन केलेही असेल. पण देवाचे वचन नियमित वाचल्यामुळे आणि त्यावर मनन केल्यामुळे आपल्याला पौलाच्या या सल्ल्याचे पुढेही पालन करत राहण्याची प्रेरणा मिळेल. देवाचे वचन काय शिकवते हे जर आपण खरोखर समजून घेतले आणि त्याचे जीवनात पालन केले, तर आपल्याला ख्रिस्ती गुण विकसित करणे शक्य होईल. आणि यामुळे सैतानाच्या प्रलोभनांपासून आपले संरक्षण होईल.

२० प्रेषित पेत्र आपल्याला अशी आठवण करून देतो, “तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका; तर . . . सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा.” (१ पेत्र १:१४, १५) आपण आपल्या विचारांत आणि मनोवृत्तींमध्ये बदल करून स्वतःचे रूपांतर होऊ दिल्यास यहोवा आपल्याला कशा प्रकारे आशीर्वाद देईल याविषयी पुढील लेखात चर्चा करू या.

^ टेहळणी बुरूज, १ फेब्रुवारी १९९४ अंकातील पृष्ठ ९, परिच्छेद ७ यात दिलेले उदाहरण पाहा.