देवाची सेवा हेच त्याचे औषध!
केनियामधील एका घरात जेव्हा दोन पायनियर बांधवांना बोलवण्यात आले तेव्हा त्या घरातील बिछान्यावर छोटे शरीर असलेल्या एका माणसाला पाहून बांधवांना आश्चर्य वाटले. त्या माणसाचे धड खूप छोटे होते आणि त्याचे हातही खूप लहान होते. देवाच्या राज्यात, “लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील,” हे जेव्हा त्या बांधवांनी त्याला सांगितले तेव्हा त्याला खूप आनंद झाला.—यश. ३५:६.
त्या पायनियर बांधवांना समजले की हा ओनेस्मस जन्मापासूनच ठिसूळ हाडांच्या रोगाने ग्रस्त होता. या आजाराला ऑस्टियोजेनेसिस इंपर्फेक्टा असे म्हणतात. ओनेस्मसची हाडे इतकी ठिसूळ होती की त्यांवर थोडाही दबाव आला तरी ती मोडू शकत होती. या आजारावर कोणताही प्रभावी औषधोपचार नसल्यामुळे ओनेस्मसला माहीत होते की त्याला हे दुखणे सहन करत व्हीलचेअरच्या साहाय्यानेच आयुष्य जगावे लागणार आहे.
ओनेस्मस बायबल अभ्यास करण्यास तयार झाला. पण, त्याची आई त्याला ख्रिस्ती सभांना पाठवण्यास तयार नव्हती. तिचे म्हणणे होते की यामुळे त्याला काही इजा होऊन आणखी त्रास होईल. म्हणून, बांधव सभांचे रेकॉर्डिंग करायचे आणि ओनेस्मस त्याच्या घरीच ते ऐकायचा. त्याच्या अभ्यासाला पाच महिने झाल्यावर त्याने ठरवले की काहीही झाले तरी तो सभांना उपस्थित राहणार.
ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्यामुळे ओनेस्मसला जास्त त्रास होऊ लागला का? नाही, याच्या उलटच घडले. तो म्हणतो, की “सभेत असताना मला माझं दुखणं कमी झाल्याचं जाणवायचं.” ओनेस्मसच्या मते, त्याला मिळालेल्या आशेमुळेच त्याला बरे वाटू लागले होते. त्याच्या मनःस्थितीवर चांगला परिणाम होत असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. यामुळे तिला खूप आनंद झाला आणि तिनेही बायबल अभ्यास करण्याचे ठरवले. ती म्हणायची, “देवाची सेवा हेच माझ्या मुलाचं औषध आहे.”
लवकरच ओनेस्मस बाप्तिस्मा न झालेला प्रचारक बनला. नंतर त्याचा बाप्तिस्मा झाला आणि आता तो सेवा सेवक म्हणून काम करत आहे. ओनेस्मस आपले पाय व एक हात वापरू शकत नसला तरी यहोवाच्या सेवेत खूप काही करण्याची त्याची मनस्वी इच्छा होती. त्याला साहाय्यक पायनियरिंग करायची होती पण तो ती सुरू करण्यास मागेपुढे पाहत होता. का? कारण त्याला माहीत होते की त्याची व्हीलचेअर ढकलण्यासाठी त्याला पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल. त्याने जेव्हा त्याची ही चिंता इतर ख्रिस्ती बांधवांना सांगितली तेव्हा त्यांनी त्याला मदत करण्याची खात्री दिली आणि त्यांनी असे केलेसुद्धा. त्यांनी ओनेस्मसला साहाय्यक पायनियरिंग करण्यासाठी हवी ती मदत पुरवली.
ओनेस्मसला सामान्य पायनियरिंग करण्याचीही इच्छा होती, पण आतासुद्धा त्याच्या मनात तीच चिंता होती. काही काळानंतर, एका दैनिक वचनामुळे त्याला प्रोत्साहन मिळाले. ते वचन स्तोत्र ३४:८ होते, ज्यात म्हटले आहे: “परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा.” या वचनावर मनन केल्यानंतर ओनेस्मसने सामान्य पायनियर बनण्याचे ठरवले. तो आता आठवड्यातील चार दिवस प्रचारकार्य करतो आणि त्याचे अनेक बायबल विद्यार्थी सत्यात चांगली प्रगती करत आहेत. इतकेच नव्हे, तर २०१० मध्ये त्याला पायनियर सेवा प्रशालेला उपस्थित राहण्याचीही संधी मिळाली. ज्या दोन बांधवांनी त्याला पहिल्यांदा भेट दिली होती त्यांपैकी एक त्या प्रशालेचे प्रशिक्षक होते, हे पाहून ओनेस्मसला खूप आनंद झाला.
ओनेस्मसचे वय आता चाळीसच्या आसपास आहे. त्याचे आईवडील आता जिवंत नाहीत. पण तरीही त्याच्या रोजच्या गरजा पुरवल्या जातात, कारण मंडळीतील बंधुभगिनी त्याची काळजी घेतात. त्याला मिळालेल्या सर्व आशीर्वादांबद्दल तो अत्यंत कृतज्ञ आहे. तो त्या दिवसाची आस धरून आहे जेव्हा, “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”—यश. ३३:२४.