व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“प्रार्थना करण्यासाठी सावध असा”

“प्रार्थना करण्यासाठी सावध असा”

“मर्यादेने राहा, व प्रार्थना करण्यासाठी सावध असा.”—१ पेत्र ४:७.

१, २. (क) “प्रार्थना करण्यासाठी सावध” असणे इतके महत्त्वाचे का आहे? (ख) प्रार्थनेच्या संदर्भात आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

 पूर्वी रात्रपाळीत काम करणाऱ्‍या एका कर्मचाऱ्‍याने म्हटले, की “पहाट होण्याआधीची जी वेळ असते, त्या वेळेत जागं राहणं सर्वात कठीण असतं.” ज्यांना रात्रभर जागे राहावे लागते असे इतर जणही कदाचित या कर्मचाऱ्‍याच्या शब्दांशी सहमत होतील. आज ख्रिस्ती या नात्याने आपणही जागृत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सैतानाच्या दुष्ट जगाचा अंत अगदी जवळ येऊन ठेपला आहे. (रोम. १३:१२) या शेवटच्या घडीला जर आपण आध्यात्मिक रीत्या झोपी गेलो तर ते किती धोकादायक ठरेल! म्हणूनच आपण “मर्यादेने” राहणे म्हणजेच जागरूक राहणे आणि “प्रार्थना करण्यासाठी सावध” असणे फार गरजेचे आहे.—१ पेत्र ४:७.

आज आपण अंताच्या इतक्या जवळ असल्यामुळे स्वतःला पुढील प्रश्‍न विचारणे उचित ठरेल: ‘प्रार्थना करण्याच्या बाबतीत मी खरोखरच सावध आहे का? मी सर्व प्रकारच्या प्रार्थना करण्याची व सतत प्रार्थना करण्याची काळजी घेत आहे का? इतरांसाठीही प्रार्थना करण्याची मला सवय आहे का? की, सहसा माझ्या प्रार्थनांमध्ये फक्‍त माझ्या स्वतःच्याच गरजांबद्दल आणि इच्छांबद्दल उल्लेख असतो? येणाऱ्‍या नाशातून बचावण्यासाठी प्रार्थना करणे खरोखरच इतके महत्त्वाचे आहे का?’

सर्व प्रकारची प्रार्थना करा

३. प्रार्थनेचे काही प्रकार कोणते आहेत?

इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने “सर्व प्रकारची प्रार्थना” करा असे म्हटले. (इफिस. ६:१८) आपण यहोवाला प्रार्थना करतो, तेव्हा सहसा आपल्या गरजा पूर्ण करण्याची आणि समस्यांना तोंड देण्यास मदत करण्याची आपण त्याला याचना करतो. यहोवा प्रार्थना ऐकणारा देव असल्यामुळे आपल्या याचनांकडे तो प्रेमळपणे लक्ष देतो. (स्तो. ६५:२) पण, आपण केवळ मदतीची याचना करण्यासाठीच प्रार्थना करू नये. तर स्तुती, आभारप्रदर्शन आणि विनंती या प्रार्थनेच्या इतर प्रकारांकडेही आपण लक्ष दिले पाहिजे.

४. आपण अनेक वेळा आपल्या प्रार्थनांतून यहोवाची स्तुती का केली पाहिजे?

प्रार्थनेत यहोवाची स्तुती करण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा आपण यहोवाच्या “पराक्रमाच्या कृत्यांबद्दल” आणि तो किती थोर आहे याबद्दल विचार करतो, तेव्हा आपोआपच यहोवाची स्तुती करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. (स्तोत्र १५०:१-६ वाचा.) स्तोत्र १५० यातील सहा वचनांत आपल्याला १३ वेळा यहोवाची स्तुती करण्याचा आर्जव करण्यात आला आहे! आणखी एका स्तोत्राच्या लेखकाने देवाबद्दल गाढ आदर व्यक्‍त करून असे म्हटले: “तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी दिवसातून सात वेळा तुझे स्तवन करतो.” (स्तो. ११९:१६४) यहोवा आपल्या स्तुतीस पात्र आहे यात कोणतीच शंका नाही. तर मग, आपणही “दिवसातून सात वेळा” म्हणजेच अनेक वेळा आपल्या प्रार्थनांतून यहोवाची स्तुती करू नये का?

५. आभार मानण्याच्या मनोवृत्तीमुळे कोणत्या चुकीच्या प्रवृत्तीपासून आपला बचाव होईल?

प्रार्थनेचा आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे आभारप्रदर्शन. फिलिप्पै येथील ख्रिस्ती बांधवांना पौलाने असा सल्ला दिला: “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” (फिलिप्पै. ४:६) आज आपण शेवटल्या काळात राहत आहोत, ज्यात बहुतेक माणसे “उपकार न स्मरणारी” अशी आहेत. आपणही जगातील या लोकांसारखे बनू नये म्हणून यहोवाच्या सर्व आशीर्वादांसाठी त्याचे मनापासून आभार मानणे खूप महत्त्वाचे आहे. (२ तीम. ३:१, २) जगात उपकार न मानण्याची मनोवृत्ती सर्वत्र दिसून येते. काळजी न घेतल्यास ही मनोवृत्ती आपल्यातही येऊ शकते. पण प्रार्थनेत नेहमी यहोवाचे आभार मानल्यास आपण जीवनात समाधानी राहू आणि “कुरकूर” करण्याची प्रवृत्ती टाळू. (यहू. १६) तसेच, कुटुंबप्रमुखांनी आपल्या प्रियजनांसोबत प्रार्थना करताना यहोवाच्या आशीर्वादांसाठी त्याचे आभार मानले पाहिजेत; यामुळे, त्यांच्या पत्नी व मुलांनाही यहोवाचे आभार मानण्याचे प्रोत्साहन मिळेल.

६, ७. विनंती म्हणजे काय, आणि आपण कोणत्या गोष्टींविषयी यहोवाला विनंती करू शकतो?

विनंती म्हणजे अगदी मनापासून व कळकळीने केलेली प्रार्थना. आपण यहोवाकडे कशाविषयी विनंती करू शकतो? जेव्हा आपला छळ होत असतो, किंवा आपण गंभीर आजारपणाला तोंड देत असतो तेव्हा यहोवाला मदतीची विनंती करणे योग्य ठरेल. अशा प्रसंगी साहजिकच आपण प्रार्थनांमध्ये यहोवाला कळकळीची विनंती करतो. पण फक्‍त या विशिष्ट परिस्थितींतच आपण यहोवाला विनंती करावी का?

हे समजून घेण्यासाठी येशूने शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेत त्याने देवाच्या नावाबद्दल, त्याच्या राज्याबद्दल आणि इच्छेबद्दल काय म्हटले होते याचा विचार करा. (मत्तय ६:९, १० वाचा.) आज जगात सगळीकडे अनीती व अत्याचार बोकाळला आहे. मानवी सरकारे लोकांच्या मूलभूत गरजाही पुरवण्यास अपयशी ठरत आहेत. तर मग, देवाचे नाव पवित्र व्हावे आणि त्याचे राज्य येऊन सैतानाचे शासन कायमचे संपावे अशी आपण नक्कीच प्रार्थना केली पाहिजे. तसेच, यहोवाची इच्छा ज्याप्रमाणे स्वर्गात पूर्ण होत आहे त्याप्रमाणे ती पृथ्वीवरही पूर्ण व्हावी अशी विनंती करणेही योग्य ठरेल. तेव्हा, आपण नेहमी सावध राहू या आणि सर्व प्रकारच्या प्रार्थना करण्याचा प्रयत्न करू या.

“सतत प्रार्थना करा”

८, ९. गेथशेमाने बागेत झोपी गेल्याबद्दल आपण पेत्राला व इतर प्रेषितांना लगेच दोषी का ठरवू नये?

प्रेषित पेत्राने “प्रार्थना करण्यासाठी सावध” असण्याविषयी सल्ला दिला असला, तरी एके प्रसंगी तो स्वतः असे करण्यास चुकला होता. गेथशेमाने बागेत येशू प्रार्थना करण्यास गेला होता, तेव्हा जे शिष्य झोपी गेले त्यांच्यात पेत्रदेखील होता. येशूने त्यांना “जागृत राहा व सतत प्रार्थना करा” (NW) असे सांगितल्यानंतरही ते झोपी गेले.—मत्तय २६:४०-४५ वाचा.

पेत्र व इतर प्रेषितांना लगेच दोषी ठरवण्याआधी, ते अतिशय थकलेले होते हे आपण आठवणीत ठेवले पाहिजे. त्या दिवशी त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या होत्या? त्यांनी वल्हांडणाची तयारी केली होती आणि संध्याकाळी तो साजरा केला होता. त्यानंतर येशूने सांजभोजनासंबंधी शिष्यांना सूचना दिल्या आणि त्यांनी पुढे हा स्मारकविधी कसा साजरा करावा हे त्यांना सांगितले. (१ करिंथ. ११:२३-२५) “नंतर गीत गाऊन ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.” तेथे जाण्यासाठी त्यांना जेरूसलेम शहरातील अरुंद रस्त्यांवरून काही अंतर चालावे लागले. (मत्त. २६:३०, ३६) तोपर्यंत मध्यरात्र उलटून गेली असेल. जर आपण त्या रात्री गेथशेमाने बागेत असतो, तर कदाचित आपल्यालाही झोप लागली असती. येशूने त्याच्या थकलेल्या प्रेषितांवर रागावण्याऐवजी, प्रेमळपणे म्हटले की “आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्‍त आहे.”

पेत्राकडून चूक तर झाली, पण नंतर तो “प्रार्थना करण्यासाठी सावध” राहण्यास शिकला (परिच्छेद १०, ११ पाहा)

१०, ११. (क) गेथशेमाने बागेत आलेल्या अनुभवामुळे पेत्राला कोणता धडा शिकायला मिळाला? (ख) पेत्राच्या अनुभवावरून तुम्हाला काय शिकायला मिळाले?

१० गेथशेमाने बागेत पेत्र झोपी गेला त्या रात्री त्याला एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला. काही वेळाआधी येशूने म्हटले होते: “तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल.” तेव्हा पेत्राने मोठ्या आत्मविश्‍वासाने म्हटले, “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही!” येशूने पेत्राला सांगितले की तो तीन वेळा येशूला नाकारेल. पण, पेत्र तरीही मानायला तयार नव्हता. तो म्हणाला: “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही.” (मत्त. २६:३१-३५) पण, शेवटी येशूने सांगितले होते तेच घडले; पेत्र अडखळला. त्याने तिसऱ्‍यांदा येशूला नाकारले तेव्हा त्याला इतके वाईट वाटले की तो “मोठ्या दुःखाने रडला.”—लूक २२:६०-६२.

११ या अनुभवामुळे, स्वतःवर जास्त भरवसा ठेवण्याच्या प्रवृत्तीवर पेत्राला मात करता आली. नक्कीच, प्रार्थना केल्यामुळे त्याला असे करण्यास मदत मिळाली असेल. हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण नंतर पेत्रानेच “प्रार्थना करण्यासाठी सावध असा” हा सल्ला दिला. आपण या सल्ल्याचे पालन करत आहोत का? तसेच, “सतत प्रार्थना” करण्याद्वारे आपण यहोवावर विसंबून राहत आहोत हे दाखवतो का? (स्तो. ८५:८) प्रेषित पौलाचा पुढील सल्लादेखील आपण मनावर घेतला पाहिजे: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.”—१ करिंथ. १०:१२.

नहेम्याला त्याच्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले

१२. नहेम्याचे उदाहरण अनुकरण करण्यासारखे का आहे?

१२ आणखी एक चांगले उदाहरण नहेम्याचे आहे. येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला त्याच्या सुमारे ४५० वर्षांआधी नहेम्या हा पर्शियन राजा अर्तहशश्‍त याचा प्यालेबरदार म्हणून सेवा करत होता. देवाला अगदी मनापासून प्रार्थना करण्याच्या बाबतीत नहेम्याचे उदाहरण अनुकरण करण्यासारखे आहे. जेरूसलेममध्ये यहुदी कठीण परिस्थितीला तोंड देत असल्यामुळे नहेम्या “बरेच दिवसपर्यंत . . . उपास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना” करत होता. (नहे. १:४) अर्तहशश्‍त राजाने जेव्हा त्याला विचारले की तो का खिन्‍न दिसत आहे, तेव्हा नहेम्याने लगेच स्वर्गातील देवाला प्रार्थना केली. (नहे. २:२-४) यामुळे काय परिणाम घडून आला? यहोवाने त्याच्या प्रार्थनांचे उत्तर दिले आणि त्याच्या लोकांना मदत मिळेल असे घडवून आणले. (नहे. २:५, ६) यामुळे नहेम्याचा देवावरील विश्‍वास किती दृढ झाला असेल!

१३, १४. विश्‍वास दृढ राखण्यासाठी आणि आपल्याला निराश करण्याच्या सैतानाच्या प्रयत्नांचा प्रतिकार करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१३ नहेम्याप्रमाणे सतत प्रार्थना केल्यामुळे आपल्याला दृढ विश्‍वास टिकवून ठेवण्यास मदत मिळेल. सैतानाला आपल्याविषयी जराही दयामाया नाही आणि तो सहसा आपण कमजोर असतो तेव्हाच आपल्यावर हल्ला करतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण आजारी असतो किंवा निराश असतो तेव्हा आपल्याला कदाचित असे वाटू लागेल की दर महिन्याला आपण क्षेत्र सेवाकार्यासाठी जो वेळ देतो तो यहोवाच्या नजरेत अगदीच क्षुल्लक आहे. किंवा, गतकाळात आलेल्या वाईट अनुभवांमुळे आपल्यापैकी काही जणांना नकारात्मक विचारांना तोंड द्यावे लागत असेल. सैतान आपल्याला असे पटवून देऊ इच्छितो की आपण अगदी कवडीमोल आहोत. तो सहसा आपल्या मनात नकारात्मक भावना आणून आपला विश्‍वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो. पण, “प्रार्थना करण्यासाठी सावध” राहिल्यास, आपण विश्‍वासात दृढ राहू शकतो. बायबलमध्ये विश्‍वासाची तुलना एका मोठ्या ढालीशी करण्यात आली आहे. या ढालीच्या साहाय्याने “त्या दुष्टाचे सगळे जळते बाण [आपल्याला] विझवता येतील.”—इफिस. ६:१६.

“प्रार्थना करण्यासाठी सावध” राहिल्यामुळे आपल्याला जीवनातील समस्यांना तोंड देणे शक्य होईल (परिच्छेद १३, १४ पाहा)

१४ जर आपण “प्रार्थना करण्यासाठी सावध” राहिलो, तर आपल्या विश्‍वासाची परीक्षा पाहणारा कठीण प्रसंग अचानक उद्‌भवल्यास आपण डळमळणार नाही. असे कठीण प्रसंग व परीक्षा आपल्यासमोर येतात तेव्हा आपण नहेम्याचे उदाहरण आठवून लगेच यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. कारण केवळ यहोवाच्या मदतीनेच आपण प्रलोभनांना व परीक्षांना यशस्वी रीत्या तोंड देऊन विश्‍वासात टिकून राहू शकतो.

इतरांकरता प्रार्थना करा

१५. इतरांकरता प्रार्थना करण्याच्या बाबतीत आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१५ येशूने पेत्राकरता विनंती केली की त्याचा विश्‍वास ढळू नये. (लूक २२:३२) पहिल्या शतकातील एपफ्रास नावाच्या एका विश्‍वासू ख्रिश्‍चनाने या बाबतीत येशूचे अनुकरण केले. कलस्सै येथील आपल्या बांधवांकरता तो आवर्जून प्रार्थना करत असे. पौलाने त्या बांधवांना असे लिहिले: “तो तुमच्यासाठी नेहमी कळकळीने प्रार्थना करून देवाजवळ मागतो की देवाने तुम्हाला बलवान व पूर्ण करावे आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत देवाची इच्छा काय आहे, हे तुम्हाला समजावे.” (कलस्सै. ४:१२, सुबोधभाषांतर) आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘जगभरातील माझ्या बांधवांसाठी मी कळकळीने प्रार्थना करतो का? नैसर्गिक विपत्तींना तोंड देत असलेल्या बंधुभगिनींकरता मी किती वेळा प्रार्थना करतो? यहोवाच्या संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या पार पाडणाऱ्‍या बांधवांसाठी मी इतक्यात प्रार्थना केल्याचे मला आठवते का? कठीण परिस्थितीतून जात असलेल्या मंडळीतील एखाद्या व्यक्‍तीसाठी मी अलीकडे प्रार्थना केली आहे का?’

१६. आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा खरोखरच काही फरक पडतो का? स्पष्ट करा.

१६ आपण इतरांकरता यहोवा देवाला प्रार्थना करतो, तेव्हा त्यांना खरोखरच मदत मिळू शकते. (२ करिंथकर १:११ वाचा.) यहोवाच्या अनेक उपासकांनी वारंवार त्याच्याकडे प्रार्थना केल्यास, केवळ या कारणामुळे तो त्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास बांधील नाही. पण त्याच्या सेवकांच्या प्रार्थनांचे उत्तर देताना, ते एकमेकांबद्दल मनापासून आस्था दाखवतात हे पाहून त्याला आनंद होतो. त्यामुळे, इतरांसाठी प्रार्थना करण्याचा जो विशेषाधिकार आणि जबाबदारी आपल्याला देण्यात आली आहे तिच्याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. एपफ्रासप्रमाणे आपणही आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींसाठी आवर्जून प्रार्थना करण्याद्वारे त्यांच्याबद्दल मनःपूर्वक प्रेम व आस्था व्यक्‍त केली पाहिजे. असे केल्याने, आपण अधिक आनंदी होऊ कारण “घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे.” —प्रे. कृत्ये २०:३५.

आपले तारण जवळ आले आहे

१७, १८. “प्रार्थना करण्यासाठी सावध” राहिल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद लाभतील?

१७ “रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे” असे म्हणण्याआधी पौलाने असे लिहिले: “समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्‍वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे.” (रोम. १३:११, १२) देवाने वचन दिलेले नवे जग आणि आपले तारण, आपण कल्पना करतो त्यापेक्षाही जवळ आले आहे. म्हणूनच, आपण आध्यात्मिक रीत्या झोपी न जाण्याची काळजी घेतली पाहिजे. जगातील आकर्षक गोष्टींमध्ये आपण कधीही इतके व्यस्त होऊ नये, की ज्यामुळे आपल्याला प्रार्थनेत यहोवाच्या समीप येण्यासाठी वेळच मिळणार नाही. त्याऐवजी आपण “प्रार्थना करण्यासाठी सावध” राहू या. असे केल्यामुळे आपल्याला यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना, “पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत” चालणे शक्य होईल. (२ पेत्र ३:११, १२) आपण आध्यात्मिक रीत्या जागृत असल्याचे, तसेच, या दुष्ट जगाचा अंत अतिशय जवळ आला आहे यावर आपला पूर्ण विश्‍वास असल्याचे आपल्या जीवनशैलीवरून दिसून येईल. तेव्हा, आपण “निरंतर प्रार्थना” करत राहू या. (१ थेस्सलनी. ५:१७) तसेच, येशूचे अनुकरण करून आपण एकांतात यहोवाशी बोलण्यासाठी संधी शोधू या. घाईघाईने प्रार्थना करण्याऐवजी जर आपण पुरेसा वेळ घेऊन यहोवाजवळ आपले मन मोकळे केले तर त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध दिवसेंदिवस घनिष्ट होत जाईल. (याको. ४:७, ८) यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता असू शकतो!

१८ बायबलमध्ये असे सांगितले आहे: “आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ [ख्रिस्ताने] आपल्या देहावस्थेच्या दिवसात, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्‌भक्‍तीमुळे ऐकण्यात आली.” (इब्री ५:७) येशूने पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या अगदी शेवटच्या घटकेपर्यंत देवाला विनंत्या व प्रार्थना केल्या आणि देवाला तो पूर्णपणे विश्‍वासू राहिला. परिणामस्वरूप, यहोवाने त्याच्या परमप्रिय पुत्राचे पुनरुत्थान केले आणि त्याला स्वर्गात अमर जीवन दिले. भविष्यात आपल्यासमोर कोणतीही प्रलोभने किंवा परीक्षा आल्या तरी येशूप्रमाणे आपणसुद्धा आपल्या स्वर्गातील पित्याला विश्‍वासू राहू या. जर आपण “प्रार्थना करण्यासाठी सावध” राहिलो तर आपल्याला सार्वकालिक जीवनाचे बक्षीस प्राप्त होईल.