व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या राज्यासाठी त्याग करण्यास तुम्ही तयार आहात का?

देवाच्या राज्यासाठी त्याग करण्यास तुम्ही तयार आहात का?

“संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”—२ करिंथ. ९:७.

१. बरेच लोक कोणत्या प्रकारचे त्याग करतात, आणि का?

 ज्या गोष्टी लोकांना महत्त्वाच्या वाटतात त्यांसाठी त्याग करण्यास ते सहसा तयार असतात. उदाहरणार्थ, आईवडील आपल्या मुलांसाठी आनंदाने आपला वेळ, पैसा व शक्‍ती खर्च करतात. ऑलिंपिक स्पर्धांत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्‍या तरुण खेळाडूंचा विचार करा. त्यांचे मित्र खेळण्यात व मौजमजा करण्यात वेळ घालवत असले, तरी हे खेळाडू मात्र दररोज तास न्‌ तास सराव व व्यायाम करतात. येशूनेदेखील ज्या गोष्टी त्याला महत्त्वाच्या वाटत होत्या त्यांकरता अनेक त्याग केले. आपल्या जीवनात सर्व सुखसोयी असाव्यात किंवा आपल्याला मुलेबाळे असावीत असा येशूने विचार केला नाही. उलट, त्याने संपूर्ण जीवन देवाच्या राज्याच्या कार्याकरता वाहून घेतले. (मत्त. ४:१७; लूक ९:५८) त्याच्या अनुयायांनीदेखील देवाच्या राज्यासाठी अनेक त्याग केले. देवाच्या राज्याशी संबंधित कार्य त्यांच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे होते आणि म्हणूनच या कार्यात होताहोईल तितका सहभाग घेण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला. (मत्त. ४:१८-२२; १९:२७) आपणही स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘माझ्या जीवनात कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे?’

२. (क) सर्व ख्रिश्‍चनांनी कोणते त्याग करणे आवश्‍यक आहे? (ख) काही जण कोणते अतिरिक्‍त त्याग करतात?

काही त्याग असे आहेत की जे सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी करणे गरजेचे आहे. यहोवा देवासोबत चांगला नातेसंबंध जोडण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी हे त्याग करणे आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ प्रार्थना, बायबल वाचन, कौटुंबिक उपासना, सभांना उपस्थित राहणे व क्षेत्र सेवाकार्य यांसाठी आपण जो वेळ व शक्‍ती खर्च करतो, त्यांचा यात समावेश होतो. * (यहो. १:८; मत्त. २८:१९, २०; इब्री १०:२४, २५) आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे व यहोवाच्या आशीर्वादांमुळे आज प्रचाराच्या कार्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे आणि बरेच लोक यहोवाची उपासना करण्याकरता त्याच्या संघटनेत येत आहेत. (यश. २:२) राज्याच्या कार्यात योगदान देण्याच्या इच्छेने बरेच जण बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी, राज्य सभागृहांच्या व संमेलन गृहांच्या बांधकामात मदत करण्यासाठी, अधिवेशनांचे नियोजन करण्यासाठी किंवा नैसर्गिक विपत्ती येतात तेव्हा मदत कार्यात सहभागी होण्यासाठी अनेक त्याग करतात. तसे पाहिल्यास, या अतिरिक्‍त कार्यांत सहभाग घेणे सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता आवश्‍यक नाही. पण, या कार्यांमुळे आज देवाच्या राज्याच्या वाढीला बराच हातभार लागतो.

३. (क) देवाच्या राज्यासाठी आपण त्याग करतो तेव्हा आपल्याला कोणता फायदा होतो? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे?

आज देवाच्या राज्याच्या कार्यात जास्तीत जास्त सहभाग घेण्याची पूर्वी कधी नव्हती इतकी गरज आहे. आणि बरेच बांधव यहोवासाठी आनंदाने त्याग करत आहेत हे पाहून आपल्याला निश्‍चितच खूप आनंद होतो. (स्तोत्र ५४:६ वाचा.) देवाच्या राज्याची वाट पाहत असताना अशा प्रकारची स्वार्थत्यागी मनोवृत्ती दाखवल्यास आपल्यालाही जीवनात खरा आनंद अनुभवता येईल. (अनु. १६:१५; प्रे. कृत्ये २०:३५) तेव्हा, आपण सर्वांनी स्वतःच्या जीवनाचे काळजीपूर्वक परीक्षण करून हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: देवाच्या राज्यासाठी मला आणखी जास्त त्याग करता येतील का? माझा वेळ, पैसा, शक्‍ती व कौशल्ये यांचा मी कशा प्रकारे उपयोग करत आहे? देवाच्या कार्यासाठी त्याग करताना मी कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये? आता आपण प्राचीन इस्राएलात स्वसंतोषाने दिल्या जाणाऱ्‍या अर्पणांची काही उदाहरणे पाहू या. तसेच, देवाच्या सेवेत स्वेच्छेने त्याग करताना आपण या उदाहरणांचे कशा प्रकारे अनुकरण करू शकतो यावर विचार करू या. असे केल्यामुळे आपल्या आनंदात नक्कीच भर पडेल.

प्राचीन इस्राएलातील अर्पणे

४. अर्पणे केल्यामुळे इस्राएली लोकांना कसा फायदा झाला?

प्राचीन इस्राएलातील लोक पापांची क्षमा मिळवण्यासाठी अर्पणे द्यायचे. यहोवा देवाची स्वीकृती मिळवण्याकरता ही अर्पणे देणे आवश्‍यक होते. यांपैकी काही अर्पणे अत्यावश्‍यक होती; तर काही स्वसंतोषाने दिली जाऊ शकत होती. (लेवी. २३:३७, ३८) यहोवाला स्वसंतोषाचे अर्पण किंवा भेट म्हणून होमार्पण दिले जाऊ शकत होते. उदाहरणार्थ, शलमोनाच्या काळात मंदिराच्या उद्‌घाटनाच्या वेळी यहोवाला अनेक अर्पणे देण्यात आली.—२ इति. ७:४-६.

५. गरिबांनाही अर्पणे देता यावीत म्हणून यहोवाने कोणती तरतूद केली होती?

यहोवा प्रेमळ देव असल्यामुळे, त्याचे सर्व सेवक एकाच प्रकारचे अर्पण देऊ शकत नाहीत याची त्याला जाणीव होती. त्याने ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणेच त्यांच्याकडून अर्पणांची अपेक्षा केली. यहोवाने अशी आज्ञा दिली होती की अर्पण देताना प्राण्याचे रक्‍त वाहिले पाहिजे. ही “पुढे होणाऱ्‍या चांगल्या [गोष्टींची]” म्हणजेच त्याच्या पुत्राच्या अर्थात येशूच्या बलिदानाची एक झलक होती. (इब्री १०:१-४) पण, हा नियम लागू करण्याबाबत यहोवाने सक्‍ती केली नाही. उदाहरणार्थ, कळपातील पशू देण्याची एखाद्याची ऐपत नसल्यास तो पारव्याची पिले अर्पण करू शकत होता. यहोवा हे अर्पण स्वीकारण्यास तयार होता. अशा रीतीने, गरीब लोकसुद्धा यहोवाला आनंदाने अर्पणे देऊ शकत होते. (लेवी. १:३, १०, १४; ५:७) अर्पणे वेगवेगळ्या प्रकारची असली, तरीसुद्धा जे स्वेच्छेने अर्पण द्यायचे त्या सर्वांकडून यहोवाने दोन गोष्टींची अपेक्षा केली.

६. अर्पणे देणाऱ्‍या प्रत्येकाकडून कोणत्या दोन गोष्टींची अपेक्षा केली जायची आणि या अपेक्षा पूर्ण करणे इतके महत्त्वाचे का होते?

पहिली गोष्ट म्हणजे, अर्पण देणाऱ्‍या व्यक्‍तीने आपल्याजवळ जे सर्वात उत्तम असेल तेच यहोवाला द्यायचे होते. यहोवाने इस्राएली लोकांना सांगितले होते, की अर्पणे स्वीकारली जाण्यासाठी ती देताना त्यांत कोणताही दोष नाही याची त्यांनी खात्री करायची होती. (लेवी. २२:१८-२०) कारण, अर्पण म्हणून दिलेल्या पशूत कोणताही दोष आढळल्यास ते अर्पण यहोवा स्वीकारणार नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे, अर्पण देणारा स्वतः नियमशास्त्रानुसार शुद्ध असणे गरजेचे होते. जर तो शुद्ध नसेल, तर त्याला स्वेच्छेने अर्पण देण्याआधी, यहोवाची स्वीकृती मिळवण्याकरता पापार्पण किंवा दोषार्पण द्यावे लागायचे. (लेवी. ५:५, ६, १५) ही एक गंभीर बाब होती. कारण, यहोवाने अशी आज्ञा दिली होती की जर एखाद्याने अशुद्ध स्थितीत असताना, शांत्यर्पणाचे—जे स्वेच्छेने दिले जाणाऱ्‍या अर्पणांपैकी एक होते—मांस खाल्ले तर त्याला मृत्यूदंड दिला जावा. (लेवी. ७:२०, २१) दुसरीकडे पाहता, जर अर्पण देणारा शुद्ध असेल आणि त्याच्या अर्पणात कोणताही दोष नसेल तर तो देवाला अर्पण दिल्याचा आनंद व समाधान अनुभवू शकत होता.—१ इतिहास २९:९ वाचा.

आज आपण कोणती अर्पणे देतो?

७, ८. (क) राज्यासाठी त्याग केल्यामुळे अनेकांना कोणता आनंद अनुभवायला मिळतो? (ख) आपल्याजवळ अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा आपण यहोवाच्या सेवेसाठी त्याग करू शकतो?

त्याच प्रकारे आजदेखील, अनेक जण यहोवाच्या सेवेकरता स्वेच्छेने स्वतःला वाहून घेतात. हे पाहून यहोवाला खूप आनंद होतो यात शंका नाही. आपल्या बांधवांकरता झटणे खरोखरच खूप समाधानदायक असते. राज्य सभागृहांच्या बांधकामात आणि नैसर्गिक विपत्तींनंतर साहाय्य कार्यात सहभाग घेणारा एक बांधव सांगतो, की या मार्गांनी सेवा करताना मिळणारे समाधान शब्दांत व्यक्‍त करणे कठीण आहे. तो म्हणतो, “बंधुभगिनी जेव्हा त्यांच्या नव्या राज्य सभागृहात पाऊल ठेवतात किंवा नैसर्गिक विपत्तींनंतर त्यांना साहाय्य दिलं जातं तेव्हा त्यांच्या चेहऱ्‍यावर जो आनंद व कृतज्ञता दिसून येते ती पाहून आपल्या सर्व मेहनतीचं व प्रयत्नांचं चीज झालं असं वाटतं.”

आज आपण जे त्याग करतो त्यांप्रमाणेच प्राचीन काळात काही अर्पणे स्वसंतोषाने दिली जायची (परिच्छेद ७-१३ पाहा)

यहोवाच्या आधुनिक काळातील संघटनेने नेहमीच त्याच्या कार्याला वेगवेगळ्या मार्गांनी हातभार लावला आहे. १९०४ साली बंधू सी. टी. रस्सल यांनी असे लिहिले: “प्रत्येकाजवळ जो वेळ, सामर्थ्य व पैसा आहे त्याचा कसा उपयोग करावा हे ठरवणं प्रभूनं त्याच्यावर सोडलं आहे. आणि प्रत्येकानं जमेल तितका देवाच्या गौरवाकरता या गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” यहोवाची सेवा केल्यामुळे आपल्याला बरेच आशीर्वाद मिळत असले, तरी ही सेवा करण्याकरता आपल्याला बरेच त्यागही करावे लागतात. (२ शमु. २४:२१-२४) तर मग, आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा आपल्याला देवाच्या सेवेसाठी आणखी चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल का?

ऑस्ट्रेलियातील काही बेथेल सदस्य

९. वेळेचा उपयोग कसा करावा यासंबंधी लूक १०:२-४ यातून आपल्याला काय शिकायला मिळते?

आपला वेळ. बायबल आधारित साहित्याचे भाषांतर व छपाई करण्यासाठी, उपासनेसाठी वापरली जाणारी सभागृहे बांधण्यासाठी, अधिवेशनांचे नियोजन करण्यासाठी, मदत कार्य करण्यासाठी तसेच इतर अनेक आवश्‍यक कार्ये पार पाडण्यासाठी बराच वेळ व श्रम खर्च करावे लागतात. दिवसभरात आपल्याजवळ फक्‍त ठरावीक तास असतात. पण, येशूने सांगितलेल्या एका तत्त्वामुळे आपल्या वेळेचा योग्य वापर करण्यास आपल्याला साहाय्य मिळू शकते. शिष्यांना सुवार्ता सांगण्यास पाठवताना येशूने त्यांना सांगितले की “वाटेने कोणाला मुजरा करू नका.” (लूक १०:२-४) येशूने त्यांना अशी आज्ञा का दिली असावी? येशूच्या काळातील लोकांच्या संदर्भात बायबलचे एक विद्वान असे म्हणतात: “एकमेकांना भेटल्यावर ते नुसतेच मान वाकवून किंवा हातात हात देऊन अभिवादन करत नव्हते. तर दुसऱ्‍या व्यक्‍तीला बरेचदा आलिंगन देऊन, वाकून साष्टांग नमस्कार केला जायचा. या सर्वासाठी साहजिकच बराच वेळ लागायचा.” आपल्या शिष्यांनी इतरांना आदर देऊ नये असे येशू येथे सुचवत नव्हता. त्याऐवजी, तो त्यांना याची जाणीव करून देत होता की त्यांच्याजवळ फार वेळ नव्हता; आणि त्यामुळे अधिक महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी आपल्याजवळ असलेल्या वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे होते. (इफिस. ५:१६) राज्याच्या कार्याला हातभार लावण्यासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून आपल्यालाही येशूच्या या सल्ल्याचे पालन करता येईल का?

आफ्रिकेतील केनियामध्ये एका राज्य सभागृहात काही राज्य प्रचारक

१०, ११. (क) जगभरातील आपल्या कार्यासाठी मिळणाऱ्‍या देणग्यांचा कोणकोणत्या मार्गांनी उपयोग केला जात आहे? (ख) १ करिंथकर १६:१, २ यात दिलेल्या कोणत्या तत्त्वाचे आपण पालन करू शकतो?

१० आपला पैसा. राज्याशी संबंधित कार्यांना हातभार लावण्यासाठी बराच पैसा लागतो. दरवर्षी प्रवासी पर्यवेक्षक, खास पायनियर व मिशनरी यांच्या गरजा भागवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. १९९९ पासून अनेक गरीब देशांत २४,५०० पेक्षा जास्त राज्य सभागृहे बांधण्यात आली आहेत. तरीसुद्धा, जवळजवळ ६,४०० राज्य सभागृहांची अजूनही गरज आहे. दर महिन्यात आपल्या नियतकालिकांच्या जवळजवळ १० कोटी प्रती छापल्या जातात. हे सर्व तुम्ही स्वेच्छेने दिलेल्या अनुदानांमुळेच शक्य होते.

११ आर्थिक देणग्या देण्याच्या बाबतीत प्रेषित पौलाकडून आपल्याला एक तत्त्व शिकायला मिळते. (१ करिंथकर १६:१, २ वाचा.) देवाच्या प्रेरणेने लिहिताना, त्याने करिंथ येथील बांधवांना असे प्रोत्साहन दिले की देणग्या देण्यासाठी आठवड्याच्या शेवटी आपल्याजवळ किती पैसे उरतात याची त्यांनी वाट पाहू नये. तर त्यांनी जे काही मनात ठरवले असेल ते आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजूला काढून ठेवावे. पहिल्या शतकाप्रमाणेच आजदेखील अनेक बंधुभगिनी आपल्या परिस्थितीनुसार उदारपणे दान देण्याकरता आगाऊ योजना करतात. (लूक २१:१-४; प्रे. कृत्ये ४:३२-३५) अशा उदार मनोवृत्तीची यहोवा कदर करतो.

अमेरिकेतील न्यू यॉर्कच्या टक्सीडो येथे प्रादेशिक बांधकाम समितीच्या देखरेखीखाली काम करणारा एक स्वयंसेवक

१२, १३. आपण यहोवाच्या सेवेत आपली शक्‍ती व कौशल्यांचा उपयोग करू शकत नाही असे काहींना का वाटू शकते, पण यहोवा त्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो?

१२ आपली शक्‍ती व कौशल्ये. देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांकरता आपण आपली शक्‍ती खर्च करतो व आपल्या कौशल्यांचा वापर करतो तेव्हा यहोवा आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देतो. आपण थकून गेल्यास तो आपल्याला साहाय्य करण्याचे आश्‍वासन देतो. (यश. ४०:२९-३१) आपल्याजवळ पुरेशी कौशल्ये नाहीत किंवा इतर जण आपल्यापेक्षा चांगले कार्य करू शकतात असे आपल्याला वाटते का? तर मग, बसालेल व अहलियाब यांची आठवण करा. त्यांच्याप्रमाणेच यहोवा आपल्यापैकी कोणाच्याही स्वाभाविक कौशल्यांत भर पाडून आपल्याला अधिक निपुणतेने काम करण्यासाठी मदत करू शकतो हे आठवणीत असू द्या.—निर्ग. ३१:१-६; लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.

१३ यहोवा आपल्याला असे प्रोत्साहन देतो की आपण मागेपुढे न पाहता, आपल्याकडून होताहोईल तितके करावे. (नीति. ३:२७) मंदिराच्या पुनर्बांधणीचे कार्य सुरू होते तेव्हा यहोवाने यहुद्यांना सांगितले की या कार्याला हातभार लावण्यासाठी ते काय करत आहेत याविषयी त्यांनी गांभीर्याने विचार करावा. (हाग्ग. १:२-५) मंदिराच्या बांधकामाच्या कार्यावरून त्या लोकांचे लक्ष विचलित झाले होते आणि ते यहोवाच्या कार्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देईनासे झाले होते. तेव्हा, आपण स्वतःचे परीक्षण करून पाहिले पाहिजे की आपण यहोवाच्या कार्याला जीवनात सर्वात जास्त महत्त्व देत आहोत का? या शेवटल्या दिवसांत राज्य प्रचाराच्या कार्यात जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी आपणही त्या यहुद्यांप्रमाणे गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे का?

आपल्याजवळ जे आहे त्यानुसार त्याग करणे

१४, १५. (क) गरीब बांधवांच्या उदाहरणावरून आपल्याला कोणते प्रोत्साहन मिळते? (ख) आपली काय इच्छा असली पाहिजे?

१४ बरेच जण आज अशा भागांत राहतात जेथे लोक अतिशय कठीण परिस्थितीला व गरिबीला तोंड देत आहेत. आपली संस्था अशा देशांत राहणाऱ्‍या बांधवांच्या आध्यात्मिक गरजा भागवण्याचा प्रयत्न करते. (२ करिंथ. ८:१४) पण, आपले गरीब बांधवदेखील राज्याच्या कार्यासाठी आर्थिक देणग्या देण्याच्या बहुमानाची कदर करतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेलेही जेव्हा संतोषाने दान देतात तेव्हा यहोवाला आनंद होतो.—२ करिंथ. ९:७.

१५ आफ्रिकेतील एका अतिशय गरीब देशात काही बांधव आपल्या बागेतील काही भाग वेगळा करतात आणि तेवढ्या भागात जे काही उगवेल ते विकून मिळणारे पैसे राज्याच्या कार्यासाठी दान म्हणून देतात. त्याच देशात, बांधवांना एका राज्य सभागृहाच्या बांधकामात सहभाग घ्यायचा होता. पण हा बांधकामाचा प्रकल्प नेमका त्यांच्या पेरणीच्या काळात सुरू होणार होता. तरीसुद्धा बांधवांना या प्रकल्पात सहभाग घेण्याची मनापासून इच्छा असल्यामुळे, ते दिवसभर राज्य सभागृहाच्या बांधकामात साहाय्य करायचे आणि संध्याकाळी आपल्या शेतांत जाऊन पेरणीचे काम करायचे. किती स्वार्थत्यागी वृत्ती! यावरून आपल्याला मासेदोनिया येथील बांधवांची आठवण होते. “कमालीचे दारिद्र्‌य” असूनही त्यांनी आपल्या गरजू बांधवांना आर्थिक मदत करू देण्याची पौलाला आग्रहपूर्वक विनंती केली. (२ करिंथ. ८:१-४) आपणही यहोवाने आपल्याला दिलेल्या आशीर्वादांच्या प्रमाणात देवाच्या राज्याला उदारपणे हातभार लावण्यासाठी दान देऊ या.—अनुवाद १६:१७ वाचा.

१६. आपली सेवा यहोवाने मान्य करावी म्हणून आपण काय केले पाहिजे?

१६ पण, एक सावधगिरीचा इशारा आहे. प्राचीन इस्राएली लोकांप्रमाणे, आज आपण स्वसंतोषाने जे त्याग करतो ते यहोवाच्या दृष्टीने स्वीकारयोग्य असतील याची आपण खात्री केली पाहिजे. आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की आपले कुटुंब व यहोवाची उपासना या आपल्यावर असलेल्या सर्वात मोठ्या जबाबदाऱ्‍या आहेत. इतरांसाठी आपला वेळ व साधने उपयोगात आणताना आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक आरोग्याकडे किंवा इतर गरजांकडे आपले दुर्लक्ष होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. अन्यथा, आपल्याजवळ जे नाही त्यातून आपण देत आहोत असा त्याचा अर्थ होईल. (२ करिंथकर ८:१२ वाचा.) शिवाय, आपण स्वतःचे आध्यात्मिक आरोग्यदेखील टिकवून ठेवले पाहिजे. (१ करिंथ. ९:२६, २७) जेव्हा आपण बायबलच्या स्तरांनुसार वागतो, तेव्हा यहोवाच्या सेवेत केलेल्या त्यागांमुळे आपल्याला आनंद व समाधान तर मिळतेच, पण आपली सेवा यहोवा “मान्य” करेल याचीही आपण खात्री बाळगू शकतो.

आपल्या अर्पणांची यहोवा कदर करतो

१७, १८. देवाच्या राज्यासाठी त्याग करणाऱ्‍या सर्वांबद्दल आपल्या काय भावना आहेत, आणि आपण सर्वांनी कशाविषयी विचार केला पाहिजे?

१७ बरेच बंधुभगिनी देवाच्या राज्याच्या कार्याकरता निःस्वार्थपणे त्यांचा वेळ, शक्‍ती व पैसा खर्च करतात. (फिलिप्पै. २:१७) अशी स्वार्थत्यागी मनोवृत्ती दाखवणाऱ्‍या बांधवांची आपण नक्कीच मनापासून कदर करतो. तसेच, राज्याच्या कार्यात पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांच्या पत्नी व मुलांनी दाखवलेली उदारता व स्वार्थत्याग याचीही आपण प्रशंसा करतो.

१८ देवाच्या राज्याशी संबंधित कार्याला बराच हातभार लावण्याची गरज आहे. आपल्याला या कार्यात जास्तीत जास्त सहभाग कसा घेता येईल याविषयी आपण सर्वांनी प्रार्थनापूर्वक विचार करणे गरजेचे आहे. असे केल्यास, आपल्याला आज आणि “येणाऱ्‍या युगात” आणखी कित्येक पटीने आशीर्वाद मिळतील.—मार्क १०:२८-३०.

^ टेहळणी बुरूज, १५ जानेवारी २०१२ अंकात, पृष्ठे २१-२५ वरील “यहोवाला जिवेभावे बलिदाने अर्पण करा” असे शीर्षक असलेला लेख पाहा.