“माझ्या स्मरणार्थ हे करा”
“आभार मानून [त्याने भाकर] मोडली, आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” —१ करिंथ. ११:२४.
१, २. जेरूसलेमला जाण्याची येशूला ओढ लागली असणार हे प्रेषितांनी कशावरून ओळखले असावे?
जेरूसलेममधील पहारेकऱ्यांना चंद्राची पहिली कोर दिसली होती. यहुदी न्यायसभेला याविषयी कळवण्यात आले, तेव्हा त्यांनी निसान या नव्या महिन्याची सुरुवात झाल्याचे घोषित केले. ठिकठिकाणी मशाली पेटवून किंवा निरोप्यांना पाठवून ही बातमी लोकांना कळवण्यात आली. वल्हांडणाची वेळ जवळ येत आहे हे प्रेषितांनी ओळखले. वल्हांडण सुरू होण्याआधी जेरूसलेमला पोचण्याची येशूला ओढ लागली असणार याची त्यांना जाणीव होती.
२ त्या वेळी, येशू व त्याचे प्रेषित पेरियामध्ये (यार्देन नदीच्या पलीकडे) होते आणि येशू शेवटच्या वेळी जेरूसलेमला जायला निघाला होता. (मत्त. १९:१; २०:१७, २९; मार्क १०:१, ३२, ४६) निसान या यहुदी महिन्याचा पहिला दिवस निश्चित केल्यानंतर १३ दिवसांनी, म्हणजे निसान १४ रोजी सूर्यास्तानंतर वल्हांडण साजरा केला जाणार होता.
३. वल्हांडणाच्या तारखेविषयी ख्रिश्चनांना उत्सुकता का वाटते?
३ प्रभूच्या सांजभोजनाचा विधी यंदा १४ एप्रिल, २०१४ रोजी सूर्यास्तानंतर साजरा केला जाणार आहे. ही तारीख वल्हांडणाच्या तारखेशी जुळते. सर्व खऱ्या ख्रिश्चनांसाठी व आस्थेवाईक जनांसाठी हा एक अतिशय खास दिवस असेल. का? याचे उत्तर आपल्याला १ करिंथकर ११:२३-२५ या वचनांत मिळते: “ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले.”
४. (क) स्मारकविधीच्या संदर्भात कोणते प्रश्न विचारण्याजोगे आहेत? (ख) दरवर्षी स्मारकविधीची तारीख कशी ठरवली जाते? ( “स्मारकविधी २०१४” या शीर्षकाची चौकट पाहा.)
४ स्मारकविधी हा एकच असा सण आहे जो दरवर्षी साजरा करण्याची येशूने आपल्या अनुयायांना आज्ञा दिली होती. या खास समारंभाला तुम्हीही नक्कीच उपस्थित राहणार असाल. स्मारकविधीला उपस्थित राहण्याआधी स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘या प्रसंगासाठी मी कोणती तयारी केली पाहिजे? त्या दिवशी प्रतीकांच्या रूपात कोणत्या खास वस्तूंचा उपयोग केला जाईल? हा समारंभ कशा प्रकारे साजरा केला जाईल? या समारंभाचा व प्रतीकांच्या रूपात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा माझ्याकरता कोणता अर्थ आहे?’
स्मारकविधीची प्रतीके
५. प्रेषितांसोबतच्या शेवटल्या वल्हांडणासाठी येशूने कोणती तयारी करण्यास सांगितले?
५ वल्हांडणाच्या भोजनासाठी येशूने आपल्या शिष्यांना एक खोली तयार करण्यास सांगितले. त्या खोलीची खूप सजावट करावी असे त्याने शिष्यांना सांगितले नाही. त्याला केवळ त्या प्रसंगासाठी योग्य ठरेल अशी स्वच्छ खोली हवी होती, जेथे उपस्थित व्यक्तींसाठी पुरेशी जागा असेल. (मार्क १४:१२-१६ वाचा.) शिष्यांनी वल्हांडणाच्या भोजनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची व्यवस्था केली, ज्यांत बेखमीर भाकरी व द्राक्षारसाचाही समावेश होता. वल्हांडणाचे भोजन संपल्यावर येशूने या दोन प्रतीकांकडे प्रेषितांचे लक्ष वेधले.
६. (क) वल्हांडणाच्या भोजनानंतर येशूने भाकरीविषयी काय म्हटले? (ख) स्मारकविधीसाठी कोणत्या प्रकारची भाकरी वापरली जाते?
६ प्रेषित मत्तय, जो त्या प्रसंगी उपस्थित होता त्याने नंतर असे लिहिले: “येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, घ्या, खा.” (मत्त. २६:२६) ती “भाकरी” म्हणजे वल्हांडणासाठी वापरली जाणारी बेखमीर भाकरी होती. (निर्ग. १२:८; अनु. १६:३) ती गव्हाच्या पिठात पाणी मिसळून बनवलेली होती. कोणत्याही प्रकारचे खमीर किंवा चवीसाठी मीठ इत्यादी त्यात घातलेले नव्हते. खमीर नसल्यामुळे ती भाकरी फुगलेली नव्हती. तर ती साधी कोरडी व कडक भाकरी होती, जिचे सहज तुकडे केले जाऊ शकत होते. स्मारकविधीच्या आधी मंडळीतील वडील एखाद्या व्यक्तीला अशी भाकरी बनवण्यास सांगू शकतात. गव्हाच्या पिठात पाणी मिसळून, किंचित तेल लावलेल्या तव्यावर ती भाजली जाऊ शकते. (गव्हाचे पीठ उपलब्ध नसल्यास, तांदळाच्या, जवाच्या, मक्याच्या किंवा अशा इतर धान्याच्या पिठाची भाकरी बनवली जाऊ शकते.)
७. येशूने कोणत्या प्रकारच्या द्राक्षारसाचा वापर केला आणि आज स्मारकविधीसाठी कोणत्या प्रकारची वाईन वापरली जाऊ शकते?
७ मत्तयने पुढे म्हटले: “[येशूने] प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांस दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या.” (मत्त. २६:२७, २८) येशूच्या हातातील पेल्यात लाल रंगाचा द्राक्षारस होता. (हा ताज्या द्राक्षांचा रस असणे शक्य नव्हते कारण द्राक्षांचा हंगाम केव्हाच संपला होता.) इजिप्तमध्ये पहिले वल्हांडणाचे भोजन करण्यात आले तेव्हा त्यात द्राक्षारसाचा समावेश नव्हता. पण, येशूने वल्हांडणाच्या भोजनात द्राक्षारसाचा वापर करणे चुकीचे आहे असे म्हटले नाही. उलट, त्यातील काही द्राक्षारसाचा त्याने प्रभूच्या सांजभोजनासाठीही वापर केला. त्यामुळे ख्रिस्तीदेखील स्मारकविधीसाठी द्राक्षारस किंवा वाईन याचा वापर करतात. ही कोणत्या प्रकारची वाईन असावी? येशूच्या रक्ताचे मोल वाढवण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीची त्यात भर घालण्याची गरज नव्हती. त्यामुळे, स्मारकविधीसाठी वापरली जाणारी वाईन ही साधी लाल रंगाची वाईन असावी. तिच्यात ब्रॅन्डी किंवा चवीसाठी इतर पदार्थ टाकलेले नसावेत. ही वाईन घरी बनवलेली, किंवा बाजारात मिळणारी बोझोले, बर्गंडी किंवा कीयान्टी यांपैकी एखादी वाईन असू शकते.
प्रतीकांचा अर्थ
८. खरे ख्रिस्ती भाकरी व वाईन या प्रतीकांना महत्त्व का देतात?
८ प्रभूच्या सांजभोजनाचा विधी केवळ प्रेषितांनीच नव्हे तर इतर ख्रिश्चनांनीही साजरा केला पाहिजे हे प्रेषित पौलाने स्पष्ट केले. त्याने करिंथमधील बांधवांना असे लिहिले: “जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे, की . . . [येशूने] भाकरी घेतली; आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, हे माझे शरीर आहे [“शरीराला सूचित करते,” NW], हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” (१ करिंथ. ११:२३, २४) म्हणूनच, आजपर्यंत खरे ख्रिस्ती दरवर्षी हा खास प्रसंग साजरा करतात आणि प्रतीकांच्या रूपात वापरल्या जाणाऱ्या भाकरीचे व वाईनचे महत्त्व ओळखतात.
९. येशूने वापरलेल्या भाकरीबद्दल काही लोक कोणता चुकीचा विचार करतात?
९ चर्चला जाणारे काही लोक असे म्हणतात की येशूने ‘हे माझे शरीर आहे’ असे म्हटले, त्याअर्थी त्याने शिष्यांना दिलेली भाकरी त्याच्या खरोखरच्या शरीरात रूपांतरित झाली होती. पण असे म्हणणे योग्य नाही. * येशूचे शरीर त्या सर्व विश्वासू प्रेषितांच्या समोरच होते आणि जी बेखमीर भाकरी येशूने त्यांना खाण्यास दिली तीदेखील तेथेच होती. साहजिकच येशू त्या भाकरीची आपल्या शरीराशी केवळ तुलना करत होता. तो कित्येक वेळा अशा प्रकारे तुलना करून बोलत असे.—योहा. २:१९-२१; ४:१३, १४; १०:७; १५:१.
१०. प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी वापरली जाणारी भाकरी कशास सूचित करते?
१० जी भाकरी प्रेषितांच्या समोर होती व जी थोड्याच वेळात ते खाणार होते, ती येशूच्या शरीराला सूचित करत होती. पण, एकेकाळी देवाच्या सेवकांचा असा समज होता की भाकरी ही अभिषिक्त जनांच्या मंडळीला सूचित करत असावी, जिला “ख्रिस्ताचे शरीर” म्हणण्यात आले आहे. कारण, येशूने तर भाकरीचे तुकडे केले होते, पण त्याच्या शरीरातील एकही हाड मोडण्यात आले नाही. त्यामुळे भाकरी ही येशूच्या शरीरास सूचित करू शकत नाही असे त्यांना वाटायचे. (इफिस. ४:१२; रोम. १२:४, ५; १ करिंथ. १०:१६, १७; १२:२७) पण नंतर, त्यांना हे स्पष्ट झाले की तार्किकदृष्ट्या आणि शास्त्रवचनांनुसारही भाकरी ही येशूच्या शरीरालाच सूचित करते. येशूने “देहाने दुःख सोसले.” इतकेच काय, त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. तेव्हा, प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी वापरली जाणारी भाकरी येशूच्या शरीराला सूचित करते, ज्यात त्याने आपली पापे वाहून नेली.—१ पेत्र २:२१-२४; ४:१; योहा. १९:३३-३६; इब्री १०:५-७.
११, १२. (क) येशूने द्राक्षारसाबद्दल काय म्हटले? (ख) प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी वापरली जाणारी वाईन कशास सूचित करते?
११ भाकरी कशास सूचित करते हे समजून घेतल्यामुळे येशूने द्राक्षारसाबद्दल जे म्हटले ते समजून घेण्यास आपल्याला मदत मिळते. आपण पुढे असे वाचतो, “मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे [“नव्या करारास सूचित करतो,” NW].” (१ करिंथ. ११:२५) येशूच्या हातात असलेला तो प्यालाच नवा करार होता का? नाही. “प्याला” असे म्हणताना येशू खरेतर त्या प्याल्यातील द्राक्षारसाबद्दल बोलत होता. हा द्राक्षारस आपण वाहिलेल्या रक्तास सूचित करतो असे येशूने म्हटले.
१२ मार्कच्या शुभवर्तमानात आपण येशूचे पुढील शब्द वाचतो: “हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे.” (मार्क १४:२४) खरोखर, येशूचे रक्त “पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले” जाणार होते. (मत्त. २६:२८) त्यामुळे, सांजभोजनाच्या वेळी वापरली जाणारी लाल रंगाची वाईन ही अगदी योग्यपणे येशूच्या रक्ताला सूचित करते. त्या रक्ताद्वारेच आपल्याला खंडणीच्या आधारावर “आपल्या अपराधांची क्षमा” मिळते.—इफिसकर १:७ वाचा.
ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी
१३. स्मारकविधीची सभा कशा प्रकारची असते?
१३ जर तुम्ही पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांसोबत स्मारकविधीला उपस्थित राहणार असाल, तर साहजिकच तुमच्या मनात हा प्रश्न येईल, की ही सभा कशी असते? ही सभा शक्यतो एका स्वच्छ व नीटनेटक्या सभागृहात आयोजित केली जाते, जेथे उपस्थित असलेले सर्व जण आरामशीर बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. सभागृहात ठिकठिकाणी काही साध्या पुष्परचना ठेवलेल्या असू शकतात. पण, मुख्य कार्यक्रमापासून लक्ष विचलित होईल अशी बटबटीत सजावट तुम्हाला तेथे दिसणार नाही. एक सुयोग्य वडील सुस्पष्ट व आदरणीय पद्धतीने दिलेल्या एका भाषणाद्वारे, या खास प्रसंगाबाबत बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे याचा खुलासा करतील. ते सर्वांना याची जाणीव करून देतील की आपल्याला जीवन मिळावे म्हणून ख्रिस्ताने आपल्याकरता खंडणी दिली.—रोमकर ५:८-१० वाचा.
१४. स्मारकविधीच्या भाषणात कोणत्या दोन आशांविषयी सांगण्यात येईल?
१४ बायबलमध्ये ख्रिश्चनांकरता कोणत्या दोन आशा दिलेल्या आहेत याचाही वक्ता त्या प्रसंगी खुलासा करतील. पहिली आशा ही ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा आहे. ख्रिस्ताच्या विश्वासू प्रेषितांना ही आशा होती. आणि आज ख्रिस्ताच्या अनुयायांपैकी फार थोड्यांना ही आशा आहे. (लूक १२:३२; २२:१९, २०; प्रकटी. १४:१) दुसरी आशा ही आपल्या काळात विश्वासूपणे देवाची सेवा करणाऱ्या बहुतेक ख्रिश्चनांना असलेली आशा आहे. पृथ्वीवरील नंदनवनात सर्वकाळ जीवनाचा आनंद घेण्याची ती आशा आहे. त्या वेळी देवाची इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही पूर्ण होईल. यासाठी ख्रिस्ताचे अनुयायी बऱ्याच काळापासून प्रार्थना करत आहेत. (मत्त. ६:१०) पृथ्वीवरील त्या नंदनवनात देवाचे सेवक जे अद्भुत आशीर्वाद सर्वकाळ अनुभवतील त्यांविषयी बायबल आपल्याला सांगते.—यश. ११:६-९; ३५:५, ६; ६५:२१-२३.
१५, १६. प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी भाकरीच्या संबंधाने काय केले जाईल?
१५ या दोन आशांविषयी स्पष्ट केल्यानंतर, वक्ता हे सूचित करेल की येशूने सांगितलेला सांजभोजनाचा विधी करण्याची वेळ आली आहे. याआधी सांगण्यात आल्याप्रमाणे सांजभोजनासाठी दोन प्रतीकांचा वापर केला जाईल. बेखमीर भाकरी व लाल रंगाची वाईन. वक्त्याच्या जवळच असलेल्या एका टेबलावर या वस्तू ठेवलेल्या असतील. स्मारकविधीची सुरुवात करताना येशूने काय म्हटले होते व कशा प्रकारे तो विधी केला होता याविषयीच्या बायबलमधील अहवालाकडे वक्ता उपस्थितांचे लक्ष वेधेल. उदाहरणार्थ, मत्तयच्या अहवालात आपण असे वाचतो: “येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” (मत्त. २६:२६) येशूने बेखमीर भाकरीचे तुकडे केले आणि त्याच्या दोन्ही बाजूला बसलेल्या प्रेषितांना ती खायला दिली. १४ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेत तुम्हाला आधीच तुकडे केलेली बेखमीर भाकरी प्लेट्समध्ये ठेवलेली दिसेल.
१६ भाकरीच्या प्लेट्स कमी वेळात उपस्थित असलेल्या सर्व लोकांमध्ये फिरवता याव्यात म्हणून पुरेशा प्लेट्स ठेवल्या जातील. भाकरी फिरवण्यासाठी कोणताही खास विधी पाळला जाणार नाही. एक लहानशी प्रार्थना केली जाईल आणि त्यानंतर व्यावहारिक दृष्ट्या सोयीचे ठरेल त्यानुसार प्लेट्स सर्व उपस्थितांमध्ये सुव्यवस्थित रीत्या फिरवल्या जातील. २०१३ सालाप्रमाणेच या वर्षीही भाकरी फिरवली जाईल तेव्हा बहुतेक मंडळ्यांमध्ये फार कमी व्यक्ती ती खातील किंवा कदाचित कोणीही खाणार नाही.
१७. प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी वाईनच्या संबंधाने काय केले जाईल?
१७ यानंतर वक्ता मत्तयच्या पुढील शब्दांकडे सर्वांचे लक्ष वेधेल: “[येशूने] प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांस दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे.” (मत्त. २६:२७, २८) येशूने केल्याप्रमाणेच, पुन्हा प्रार्थना केली जाईल आणि मग लाल रंगाच्या वाईनचे ग्लास सर्व उपस्थितांमध्ये फिरवले जातील.
१८. प्रतीकांचे सेवन करणारे फार कमी लोक असले किंवा कोणीही नसले तरीसुद्धा स्मारकविधीला उपस्थित राहणे महत्त्वाचे का आहे?
१८ उपस्थित असलेले बहुतेक जण स्मारकविधीत वापरल्या जाणाऱ्या प्रतीकांचे सेवन करत नाहीत. कारण, येशूने सांगितले होते की जे त्याच्या स्वर्गीय राज्यात त्याच्यासोबत राज्य करतील केवळ तेच भाकरी व द्राक्षारस खाऊ किंवा पिऊ शकतात. (लूक २२:२८-३० वाचा; २ तीम. ४:१८) इतर जण, येशूच्या आज्ञेचे पालन करून स्मारकविधीला आदरपूर्वक उपस्थित राहतात. ते प्रतीकांचे सेवन करत नसले, तरी त्यांनी स्मारकविधीला उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे कारण यावरून त्यांना येशूच्या बलिदानाची कदर असल्याचे ते दाखवतात. स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे त्यांना येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर मिळणाऱ्या आशीर्वादांवर मनन करण्याची संधी मिळते. त्यांना “मोठ्या संकटातून” जिवंत बचावणाऱ्या मोठ्या लोकसमुदायातील एक असण्याची उज्ज्वल आशा मिळाली आहे. देवाच्या या सेवकांनी “आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र” केलेले असतील. म्हणजेच, येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे ते देवाच्या नजरेत नीतिमान ठरतील.—प्रकटी. ७:९, १४-१७.
१९. प्रभूच्या सांजभोजनाला उपस्थित राहण्यासाठी व त्याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्ही कोणती तयारी करू शकता?
१९ सबंध जगातील यहोवाचे साक्षीदार या खास सभेची तयारी करतात. स्मारकविधीच्या कित्येक आठवड्यांआधी आपण जास्तीत जास्त लोकांना या सभेला येण्याचे आमंत्रण देण्यासाठी एका खास मोहिमेत सहभागी होतो. शिवाय, स्मारकविधीच्या आधीच्या दिवसांत आपल्यापैकी बहुतेक जण इ.स. ३३ साली त्या त्या दिवशी येशूने काय केले याविषयीचे बायबलमधील वृत्तान्त वाचून त्यांवर मनन करू. स्मारकविधीच्या ठिकाणी पोचण्यासाठी आपण आधीपासूनच आवश्यक योजना केली पाहिजे. गीत व प्रार्थना सुरू होण्याच्या बऱ्याच वेळाआधी सभेला पोचणे चांगले राहील. कारण यामुळे, नवीन लोकांचे स्वागत करणे आणि पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेणे आपल्याला शक्य होईल. भाषण सुरू असताना वक्ता जी वचने सांगेल ती आपल्या बायबलमधून उघडून पाहिल्यास मंडळीतील सर्वांनाच, तसेच नवीन लोकांनाही खूप फायदा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्मारकविधीला उपस्थित राहण्याद्वारे आपण येशूच्या बलिदानाची मनापासून कदर करतो हे दाखवू. तसेच, “माझ्या स्मरणार्थ हे करा” या येशूच्या आज्ञेचे आपण पालन करत आहोत हेदेखील आपण दाखवू.—१ करिंथ. ११:२४.
^ हाइनरिक मेयर हे जर्मन विद्वान म्हणतात की आपण खरोखरच येशूचे शरीर व रक्त सेवन करत आहोत असा प्रेषितांनी विचार करणे शक्यच नव्हते. कारण “येशूचे शरीर अद्यापही शाबूत (जिवंत) होते.” मेयर यांनी असेही म्हटले की भाकरी व द्राक्षारसाचा काय अर्थ होतो याचा खुलासा करण्यासाठी येशूने “साधे शब्द” वापरले. आपल्या शिष्यांचा गैरसमज व्हावा अशी नक्कीच येशूची इच्छा नव्हती.