व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल” असावा

“हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल” असावा

“हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल; या दिवशी तुम्ही परमेश्‍वरासाठी मेळा भरवून सण पाळावा.”—निर्ग. १२:१४.

१, २. सर्वच ख्रिश्‍चनांनी कोणत्या वार्षिक सणाविषयी जाणून घेणे गरजेचे आहे, आणि का?

 तुम्ही वर्षातील एखाद्या महत्त्वाच्या दिवसाविषयी विचार करता तेव्हा तुमच्या मनात कोणता दिवस येतो? “माझ्या लग्नाचा वाढदिवस,” असे कदाचित एखादी विवाहित व्यक्‍ती म्हणेल. काही जण कदाचित ऐतिहासिक महत्त्व असलेल्या एखाद्या तारखेचा उल्लेख करतील, उदाहरणार्थ त्यांच्या देशाचा स्वातंत्र्यदिन. पण, तुम्हाला एका राष्ट्राच्या वार्षिक सणाविषयी माहीत आहे का, जो ३,५०० पेक्षा जास्त वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे?

हा वार्षिक सण म्हणजे वल्हांडणाचा सण. प्राचीन इस्राएल लोक इजिप्तच्या गुलामगिरीतून मुक्‍त झाल्याची आठवण म्हणून वल्हांडण सण साजरा केला जातो. हा सण तुमच्याकरतादेखील महत्त्वाचा असला पाहिजे. का? कारण, या सणाचा तुमच्या जीवनावर अतिशय महत्त्वपूर्ण मार्गांनी प्रभाव पडतो. पण, तुम्ही कदाचित म्हणाल, ‘वल्हांडण सण तर यहुदी लोक साजरा करतात, आणि मी तर यहुदी नाही. तर मग, या सणाविषयी मी का जाणून घ्यावं?’ याचे उत्तर पुढील महत्त्वाच्या शब्दांतून मिळते: “आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले.” (१ करिंथ. ५:७) या शब्दांचा नेमका अर्थ काय होतो? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपण यहुद्यांच्या वल्हांडण सणाविषयी माहिती करून घेणे आणि या सणाचा सर्व ख्रिश्‍चनांना देण्यात आलेल्या एका आज्ञेशी काय संबंध आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

इस्राएल लोकांनी वल्हांडण का साजरा केला?

३, ४. पहिल्या वल्हांडणाच्या आधी कोणती घटना घडली?

पहिल्या वल्हांडणाच्या आधी कोणती घटना घडली होती याविषयी यहुदी नसलेल्या लाखो लोकांना थोडीफार माहिती आहे. त्यांनी कदाचित बायबलमधील निर्गम पुस्तकात त्याबद्दल वाचले असेल, किंवा इतरांनी त्यांना त्याबद्दल सांगितले असेल, किंवा त्या घटनेवर आधारित एखादा चित्रपट त्यांनी पाहिला असेल.

इस्राएल लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीत बरीच वर्षे झाली, तेव्हा यहोवाने आपल्या लोकांना मुक्‍त करावे अशी विनंती करण्यासाठी मोशे आणि अहरोन यांना फारोकडे पाठवले. इजिप्तच्या त्या गर्विष्ठ राजाने इस्राएल लोकांना मुक्‍त केले नाही, तेव्हा यहोवाने इजिप्तवर एका पाठोपाठ एक भयंकर पीडा आणल्या. सर्वात शेवटी, देवाने दहावी पीडा आणली, ज्यात इजिप्तच्या ज्येष्ठ पुत्रांचा मृत्यू झाला. त्यामुळे, फारोने इस्राएल लोकांना इजिप्त सोडून जाऊ दिले.—निर्ग. १:११; ३:९, १०; ५:१, २; ११:१, ५.

५. इस्राएल लोकांची सुटका होण्याआधी त्यांनी काय करायचे होते? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

पण, इजिप्तमधून सुटका होण्याआधी इस्राएल लोकांनी काय करायचे होते? ही घटना इ.स.पू. १५१३ च्या वसंत ऋतूत, अबीब नावाच्या महिन्यात घडली. नंतर, या महिन्याला निसान असे नाव पडले. * त्या महिन्याच्या दहाव्या दिवशी देवाने त्यांना सांगितले, की त्यांनी निसान १४ रोजी होणाऱ्‍या एका घटनेसाठी तयारी करावी. हा दिवस सूर्यास्ताच्या वेळी सुरू झाला, कारण इब्री लोकांचा दिवस एका सूर्यास्तापासून दुसऱ्‍या सूर्यास्तापर्यंत असायचा. निसान १४ च्या दिवशी प्रत्येक इस्राएली कुटुंबाने एका कोकऱ्‍याला (किंवा बकऱ्‍याला) कापायचे होते आणि त्याचे काही रक्‍त दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आणि कपाळपट्टीला लावायचे होते. (निर्ग. १२:३-७, २२, २३) कोकऱ्‍याचे मांस भाजून बेखमीर भाकर आणि कडू भाजीसोबत ते खावे असे त्यांना सांगण्यात आले होते. देवदूत त्या देशातून फिरून इजिप्तच्या सर्व ज्येष्ठ पुत्रांना ठार मारणार होता. पण, देवाच्या आज्ञेचे पालन करणाऱ्‍या इस्राएल लोकांचे संरक्षण होणार होते आणि त्यानंतर त्यांची इजिप्तमधून सुटका होणार होती.—निर्ग. १२:८-१३, २९-३२.

६. येणाऱ्‍या वर्षांतही देवाच्या लोकांनी वल्हांडण सण का साजरा करायचा होता?

नेमके असेच घडले. इस्राएल लोकांनी येणाऱ्‍या वर्षांदरम्यान इजिप्तमधून झालेल्या या सुटकेचे स्मरण करायचे होते. देवाने त्यांना असे सांगितले: “हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल; या दिवशी तुम्ही परमेश्‍वरासाठी मेळा भरवून सण पाळावा; पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.” १४ व्या दिवसाच्या सणानंतर पुढील सात दिवस त्यांनी उत्सव करायचा होता. खरेतर निसान १४ हा वल्हांडणाचा दिवस होता, पण आठही दिवसांच्या उत्सवाला वल्हांडण म्हटले जाऊ शकत होते. (निर्ग. १२:१४-१७; लूक २२:१; योहा. १८:२८; १९:१४) इब्री लोकांनी दरवर्षी जे सण साजरे करायचे होते त्यांपैकी वल्हांडण हा एक नेमलेला वार्षिक सण होता.—२ इति. ८:१३.

७. येशूने त्याच्या अनुयायांना कोणता नवीन सण साजरा करण्यास सांगितले?

येशू आणि त्याचे प्रेषित यहुदी होते आणि ते मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करायचे. त्यामुळे तेदेखील वार्षिक वल्हांडण सण साजरा करायचे. (मत्त. २६:१७-१९) त्यांनी शेवटल्या वेळी हा सण साजरा केला तेव्हा येशूने एका नवीन सणाची—प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात केली. त्याच्या अनुयायांनी हा नवीन सण दरवर्षी साजरा करायचा होता. पण, त्यांनी तो कोणत्या दिवशी साजरा करायचा होता?

प्रभूचे सांजभोजन—कोणत्या दिवशी?

८. वल्हांडण सण आणि प्रभूचे सांजभोजन यांविषयी कोणता प्रश्‍न उद्‌भवतो?

येशूने आपल्या शिष्यांसोबत वल्हांडण सण साजरा केल्यानंतर लगेच त्यांना सांजभोजनाविषयीच्या सूचना दिल्या. त्यामुळे, प्रभूचे सांजभोजन वल्हांडणाच्या दिवशीच साजरे केले जाणार होते. पण, कदाचित तुमच्या पाहण्यात आले असेल, की आधुनिक कॅलेंडरनुसार यहुद्यांचा वल्हांडण सण ज्या तारखेला साजरा केला जातो आणि ज्या तारखेला आपण ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करतो त्यात एक किंवा अनेक दिवसांचा फरक असतो. हा फरक का? याचे उत्तर, देवाने इस्राएल लोकांना जी आज्ञा दिली होती त्यात सापडते. निसान १४ च्या दिवशी कोकऱ्‍याला नेमके केव्हा कापायचे हे देवाने इस्राएल लोकांना सांगितले होते.—निर्गम १२:५, ६ वाचा.

९. निर्गम १२:६ नुसार वल्हांडणाच्या कोकऱ्‍याला केव्हा कापायचे होते? (“दिवसाच्या कोणत्या वेळी?” ही चौकटदेखील पाहा.)

निर्गम १२:६ मध्ये सांगितल्यानुसार, कोकऱ्‍याला “संध्याकाळी” कापायचे होते. काही बायबल भाषांतरांत, जसे की यहुदी तनाक यात “संधिप्रकाशाच्या वेळी” असे त्या शब्दाचे भाषांतर करण्यात आले आहे. आणखी काही भाषांतरांत “सांजवेळी,” “मावळतीला,” “कातरवेळी” असे म्हणण्यात आले आहे. तेव्हा, कोकऱ्‍याला सूर्यास्त झाल्यानंतर पण अजूनही उजेड असताना, निसान १४ च्या सुरुवातीला कापायचे होते.

१०. काहींच्या मते, कोकऱ्‍याला केव्हा कापले जायचे, पण यामुळे कोणता प्रश्‍न उपस्थित होतो?

१० नंतरच्या काळात, कोकऱ्‍यांना कापण्यासाठी मंदिरात आणले जाऊ लागले आणि त्यामुळे सर्व कोकऱ्‍यांना कापण्यासाठी बराच वेळ लागायचा. या कारणामुळे, अनेक शतकांनंतर काही यहुदी असा विचार करू लागले, की निर्गम १२:६ मध्ये जे सांगितले आहे ते निसान १४ च्या समाप्तीला सूचित करते. पण, त्याचा हा अर्थ असता, तर मग भोजन कधी केले जायचे? प्राचीन यहुदी धर्माचे तज्ज्ञ असलेल्या प्रोफेसर जॉनथन क्लॉवन्स यांनी असे म्हटले: “सूर्यास्तासोबत नवीन दिवसाची सुरुवात होते; म्हणून १४ ला कोकऱ्‍याचे बलिदान केले जाते पण १५ ला वल्हांडणाची सुरुवात होते आणि भोजन खाल्ले जाते; पण निर्गमच्या पुस्तकात याविषयी सरळसरळ सांगितलेले नाही.” त्यांनी असेही लिहिले, की इ.स. ७० मध्ये “मंदिराच्या नाशाच्या आधी वल्हांडण सण कसा साजरा केला जायचा याविषयी रब्बींच्या लिखाणांत काहीही सांगितलेले नाही.”

११. (क) इ.स. ३३ मधील वल्हांडणाच्या दिवशी येशूसोबत काय घडले? (ख) इ.स. ३३ मध्ये निसान १५ ला “मोठा” शब्बाथ का म्हणण्यात आले? (तळटीप पाहा.)

११ आता हा प्रश्‍न उद्‌भवतो, की इ.स. ३३ मध्ये वल्हांडण केव्हा साजरा करण्यात आला होता? वल्हांडण सण ज्या दिवशी साजरा केला जाणार होता त्याच्या एक दिवस आधी, म्हणजे निसान १३ ला येशूने पेत्राला आणि योहानाला असे सांगितले: “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.” (लूक २२:७, ८) नंतर, गुरुवार, निसान १४ च्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर येशूने त्याच्या प्रेषितांसोबत वल्हांडणाचे भोजन केले. त्यानंतर, त्याने आपल्या प्रेषितांना प्रभूच्या सांजभोजनाविषयीच्या सूचना दिल्या. (लूक २२:१४, १५) त्या रात्री त्याला अटक करून त्याची न्यायचौकशी करण्यात आली. येशूला निसान १४ च्या दुपारच्या आसपास वधस्तंभावर खिळण्यात आले आणि त्याच दुपारी त्याचा मृत्यू झाला. (योहा. १९:१४) अशा रीतीने, ज्या दिवशी वल्हांडणाच्या कोकऱ्‍याला कापले जायचे त्याच दिवशी “आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले.” (१ करिंथ. ५:७; ११:२३; मत्त. २६:२) निसान १४ च्या शेवटास, पण निसान १५ सुरू होण्याच्या आधी येशूला कबरेत ठेवण्यात आले. *लेवी. २३:५-७; लूक २३:५४.

असे स्मारक ज्यापासून तुम्ही शिकू शकता

१२, १३. वल्हांडणाच्या सणात इस्राएली मुलांचा कशा प्रकारे सहभाग होता?

१२ इजिप्तमधील वल्हांडण सणाच्या वेळी मोशेने सांगितले, की देवाच्या लोकांनी भविष्यातही वल्हांडण सण साजरा करायचा होता. हा सण त्यांनी ‘निरंतर’ साजरा करावा असा हुकूम त्यांना देण्यात आला होता. या वार्षिक सणाच्या वेळी, मुले आपल्या आईवडिलांना या सणाचा अर्थ काय असे विचारणार होते. (निर्गम १२:२४-२७ वाचा; अनु. ६:२०-२३) म्हणून, वल्हांडणाचा सण मुलांसाठीदेखील एक ‘स्मारक’ असणार होते, आणि त्यापासून ते अनेक गोष्टी शिकणार होते.—निर्ग. १२:१४.

१३ इस्राएली पिता आपल्या मुलांना वल्हांडण सणाविषयी माहिती द्यायचे. अशा प्रकारे, इस्राएल लोकांनी आपल्या पुढच्या पिढ्यांना या सणाविषयी महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. त्यांपैकी एक गोष्ट ही होती की यहोवा त्याच्या उपासकांचे संरक्षण करू शकतो. त्या मुलांना शिकायला मिळाले, की यहोवा खरोखरचा व जिवंत देव आहे; तो आपल्या लोकांवर प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो आणि त्यांचे संरक्षण करतो. यहोवाने इजिप्तच्या लोकांवर पीडा आणल्या आणि इस्राएल लोकांचे संरक्षण केले त्यावरून हे सिद्ध झाले. त्याने इस्राएल लोकांच्या ज्येष्ठ पुत्रांना जिवंत ठेवले.

१४. वल्हांडण सणाच्या अहवालातून ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना कोणती गोष्ट शिकवू शकतात?

१४ ख्रिस्ती पालकांना दरवर्षी प्राचीन काळातील वल्हांडण सणाविषयी आपल्या मुलांना स्पष्ट करून सांगण्याची आज्ञा देण्यात आलेली नाही. पण, वल्हांडण सणाच्या अहवालातून शिकायला मिळणारी एक महत्त्वाची गोष्ट, म्हणजे देव आपल्या लोकांचे संरक्षण करतो हे तुम्ही आपल्या मुलांना शिकवता का? यहोवा आजही आपल्या लोकांचे संरक्षण करतो यावर तुम्हाला पूर्णपणे भरवसा असल्याचे तुम्ही आपल्या मुलांना दाखवता का? (स्तो. २७:११; यश. १२:२) आणि असे करताना त्यांना केवळ भाषण देऊ नका, तर त्यांना आनंद वाटेल अशा प्रकारे त्यांच्याशी बोला. असे केल्यामुळे, तुमच्या कुटुंबाचा यहोवावरील भरवसा आणखी वाढेल.

वल्हांडणाविषयी चर्चा करताना तुम्ही आपल्या मुलांना कोणत्या गोष्टी समजण्यास मदत कराल? (परिच्छेद १४ पाहा)

१५, १६. वल्हांडण सणाच्या अहवालातून आणि निर्गम १२-१५ अध्यायांतील अहवालातून आपण यहोवाबद्दल काय शिकू शकतो?

१५ यहोवाजवळ आपल्या लोकांचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य आहे केवळ हीच गोष्ट वल्हांडण सणातून शिकायला मिळत नाही; तर, यहोवाने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणून त्यांची सुटका केली हेही शिकायला मिळते. त्यांची सुटका करण्यासाठी यहोवाने काय केले याचा जरा विचार करा. त्याने मेघस्तंभाद्वारे आणि अग्निस्तंभाद्वारे त्यांचे मार्गदर्शन केले. त्याने तांबड्या समुद्राचे दोन भाग केले तेव्हा त्यांच्या उजवीकडे व डावीकडे पाण्याच्या मोठ्या भिंती तयार झाल्या आणि ते समुद्रातून चालत गेले. त्यांनी सुरक्षितपणे समुद्र पार केल्यावर पाण्याच्या भिंती इजिप्तच्या सैन्यावर कोसळल्याचे त्यांनी पाहिले. मग इस्राएल लोकांची सुटका झाल्यावर त्यांनी यहोवाची स्तुती करत असे म्हटले: “मी परमेश्‍वराला गीत गाईन, . . . घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश्‍वर माझे बल . . . आहे, तो माझा उद्धारक झाला आहे.”—निर्ग. १३:१४, २१, २२; १५:१, २; स्तो. १३६:११-१५.

१६ तुम्हाला लहान मुले असल्यास, यहोवा संकटातून सुटका करणारा आहे यावर भरवसा ठेवण्यास तुम्ही त्यांना मदत करत आहात का? यहोवावर तुमचा पूर्णपणे भरवसा आहे हे तुमच्या बोलण्यातून आणि तुम्ही घेत असलेल्या निर्णयांतून त्यांना दिसून येते का? निर्गम १२-१५ अध्यायांत असलेल्या अहवालावर तुम्ही आवर्जून आपल्या कौटुंबिक उपासनेत चर्चा करू शकता आणि यहोवाने त्याच्या लोकांची सुटका कशी केली यावर भर देऊ शकता. इतर एखाद्या वेळी, प्रेषितांची कृत्ये ७:३०-३६ किंवा दानीएल ३:१६-१८, २६-२८ या वचनांची चर्चा करा आणि यहोवा सुटका करणारा देव आहे यावर भर द्या. तो सुटका करणारा देव आहे यावर तरुण व वयोवृद्ध सर्वांनाच भरवसा असला पाहिजे. ज्या प्रकारे त्याने मोशेच्या काळात आपल्या लोकांची सुटका केली, त्याच प्रकारे तो भविष्यात आपलीही नक्कीच सुटका करेल.—१ थेस्सलनीकाकर १:९, १० वाचा.

शिकण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

१७, १८. वल्हांडणाच्या कोकऱ्‍याच्या रक्‍तापेक्षा येशूचे रक्‍त कशा प्रकारे जास्त मौल्यवान आहे?

१७ आज खरे ख्रिस्ती यहुद्यांचा वल्हांडण सण साजरा करत नाहीत. हा वार्षिक सण मोशेच्या नियमशास्त्राचा भाग होता, आणि आज आपण त्या नियमशास्त्राच्या अधीन नाही. (रोम. १०:४; कलस्सै. २:१३-१६) त्याऐवजी, आपण दरवर्षी देवाच्या पुत्राच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करतो. तरीपण, प्राचीन काळी इजिप्तमध्ये सुरू करण्यात आलेल्या वल्हांडण सणापासून आपण बऱ्‍याच गोष्टी शिकू शकतो.

१८ इस्राएल लोकांनी कोकऱ्‍याचे रक्‍त दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आणि कपाळपट्टीला लावल्यामुळे त्यांचे ज्येष्ठ पुत्र जिवंत राहिले. आज आपण देवाला पशुबलिदाने अर्पण करत नाही, मग तो वल्हांडणाचा सण असो किंवा इतर एखादा दिवस असो. पण, एक असे बलिदान आहे ज्यामुळे लोकांना सार्वकालिक जीवन मिळू शकते. प्रेषित पौलाने लिहिले, की शिंपडण्याच्या रक्‍तामुळे, म्हणजे येशूच्या रक्‍तामुळे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गात सार्वकालिक जीवन मिळते. ते “स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी” आहेत. (इब्री १२:२३, २४) पृथ्वीवर जगण्याची आशा बाळगणाऱ्‍यांनादेखील त्याच रक्‍तामुळे सार्वकालिक जीवन मिळते. त्यांनी वारंवार पुढील आश्‍वासनाची स्वतःला आठवण करून दिली पाहिजे: “त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्‍ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्‍ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.”—इफिस. १:७.

१९. येशूचा ज्या प्रकारे मृत्यू झाला त्यावरून बायबलमधील भविष्यवाण्यांवरील आपला भरवसा आणखी दृढ का झाला पाहिजे?

१९ वल्हांडणाच्या भोजनासाठी कोकऱ्‍याला कापताना त्याचे एकही हाड मोडू नये असे इस्राएल लोकांना सांगण्यात आले होते. (निर्ग. १२:४६; गण. ९:११, १२) मग, खंडणी देण्यासाठी आलेल्या देवाच्या कोकऱ्‍याविषयी, म्हणजे येशूविषयी काय म्हणता येईल? (योहा. १:२९) त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या उजवीकडे व डावीकडे दोन अपराध्यांना खिळण्यात आले. वधस्तंभावर खिळलेल्या त्या तिघांची हाडे मोडली जावीत अशी विनंती यहुद्यांनी पिलाताकडे केली. हाडे मोडल्याने त्यांचा मृत्यू लवकर घडून येणार होता आणि निसान १५ च्या, म्हणजे मोठ्या शब्बाथ दिवसाच्या आधी त्यांची शरीरे वधस्तंभावरून खाली उतरवता येऊ शकत होती. म्हणून, सैनिकांनी त्या दोन अपराध्यांची हाडे मोडली, “परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत.” (योहा. १९:३१-३४) वल्हांडणाच्या कोकऱ्‍याप्रमाणेच येशूची हाडेदेखील मोडली गेली नाहीत. म्हणून वल्हांडणाचा कोकरा इ.स. ३३ मध्ये निसान १४ रोजी जे घडणार होते त्याची “छाया” होता. (इब्री १०:१) शिवाय, घडलेल्या घटनांमुळे स्तोत्र ३४:२० मधील शब्द पूर्ण झाले. त्यामुळे बायबलमध्ये असलेल्या भविष्यवाण्यांवरील आपला भरवसा आणखी दृढ झाला पाहिजे.

२०. वल्हांडण सण आणि प्रभूचे सांजभोजन यांच्यात कोणता महत्त्वाचा फरक आहे?

२० पण, यहुद्यांनी ज्या प्रकारे वल्हांडण सण साजरा केला त्यात आणि प्रभूचे सांजभोजन कसे साजरे करावे याविषयी येशूने त्याच्या शिष्यांना जे सांगितले त्यात काही गोष्टी वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, इस्राएल लोक कोकऱ्‍याचे मांस खायचे पण त्याचे रक्‍त सेवन करण्याविषयी त्यांना सांगण्यात आले नव्हते. येशूने त्याच्या शिष्यांना जे करायला सांगितले होते त्यापेक्षा हे वेगळे आहे. त्याने म्हटले, की देवाच्या राज्यात राज्य करणाऱ्‍यांनी दोन्हींचे म्हणजे भाकरीसोबत द्राक्षारसाचेही सेवन करणे गरजेचे होते; भाकर त्याच्या शरीराचे व द्राक्षारस त्याच्या रक्‍ताचे प्रतीक होते. याविषयी पुढील लेखात आपण आणखी सविस्तर चर्चा करणार आहोत.—मार्क १४:२२-२५.

२१. वल्हांडण सणाविषयी माहिती करून घेणे का फायदेकारक आहे?

२१ वल्हांडण सण हा देवाच्या लोकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा सण होता आणि त्यातून आपल्याला कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. हा सण ख्रिश्‍चनांकरता नव्हे, तर यहुद्यांकरता “स्मारकादाखल” होता. तरीसुद्धा, आपल्याला त्याविषयी माहिती असली पाहिजे आणि त्यापासून आपण महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, कारण शास्त्रवचनांत असलेल्या सर्व गोष्टी देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आल्या आहेत.—२ तीम. ३:१६.

^ यहुदी कॅलेंडरनुसार पहिला महिना अबीब होता. पण, इस्राएल लोक बॅबिलोनच्या बंदिवासातून मायदेशी परतल्यानंतर या महिन्याला निसान नावाने ओळखले जाऊ लागले. या लेखात आपण निसान हेच नाव वापरणार आहोत.

^ वल्हांडणाच्या नंतरचा दिवस म्हणजे, निसान १५ बेखमीर भाकरींच्या सणाचा पहिला दिवस होता. हा आठवड्यातील कोणताही दिवस असला, तरी त्या दिवशी शब्बाथ पाळला जायचा. इ.स. ३३ मध्ये, निसान १५ रोजी आठवड्याच्या शब्बाथ (शनिवार) दिवसाचीही सुरुवात झाली होती. त्या वर्षी दोन्ही शब्बाथ एकाच दिवशी असल्यामुळे, त्या दिवसाला “मोठा” शब्बाथ असे म्हटले आहे.—योहान १९:३१, ४२ वाचा.