व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सहजासहजी आपली विचारशक्‍ती व स्थैर्य गमावू नका

सहजासहजी आपली विचारशक्‍ती व स्थैर्य गमावू नका

“बंधुजनहो, . . . आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका.”—२ थेस्सलनी. २:१, २.

१, २. जगात फसवणूक इतकी सर्वसामान्य का आहे, आणि आज कोणती खोटी माहिती पसरवली जात आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

 खोटे बोलणे आणि फसवणूक करणे आजच्या काळातील सर्वसामान्य गोष्टी झाल्या आहेत, याचे आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे, की इतरांना फसवण्यात दियाबल सैतान अगदी तरबेज आहे आणि तो या जगाचा शासक आहे. (१ तीम. २:१४; १ योहा. ५:१९) जसजसा या दुष्ट जगाचा शेवट जवळ येत आहे, तसतसा सैतान आणखीनच क्रोधित होत आहे, कारण त्याचा थोडाच काळ उरला आहे. (प्रकटी. १२:१२) म्हणून, जे सैतानाच्या प्रभावाखाली आहेत ते इतरांची, खासकरून जे खरी उपासना करतात त्यांची आणखी जास्त फसवणूक करतील हे अपेक्षित आहे.

कधीकधी प्रसार माध्यमांमध्ये यहोवाच्या सेवकांविषयी आणि त्यांच्या विश्‍वासांविषयी अर्धवट माहिती दिली जाते किंवा सरळसरळ खोटे बोलले जाते. वर्तमानपत्रांतून, टीव्ही कार्यक्रमांतून आणि इंटरनेटवरून ही खोटी माहिती पसरवली जाते. काही जण या माहितीमुळे गोंधळून जातात किंवा त्यांना रागही येतो, कारण ते या माहितीची सत्यता पडताळून न पाहताच तिच्यावर विश्‍वास ठेवतात.

३. आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

आनंदाची गोष्ट म्हणजे, सैतान पसरवत असलेल्या खोट्या माहितीपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. असे करण्यासाठी बायबल आपल्याला मदत करू शकते, कारण बायबल “सुधारणूक” करण्याकरता उपयोगी आहे. (२ तीम. ३:१६) प्रेषित पौलाच्या लिखाणांतून आपल्याला कळते, की पहिल्या शतकात खोट्या माहितीवर विश्‍वास ठेवल्यामुळे थेस्सलनीकामधील काही ख्रिश्‍चनांची फसवणूक झाली होती. पौलाने त्यांना असा सल्ला दिला, की त्यांनी लगेच गोंधळून जाऊन आपली विचारशक्‍ती गमावू नये. (२ थेस्सलनी. २:१, २) पौलाने दिलेल्या प्रेमळ सल्ल्यापासून आपण कोणत्या गोष्टी शिकू शकतो, आणि त्यांचा आपण आपल्या जीवनात कसा अवलंब करू शकतो?

योग्य वेळी मिळणाऱ्‍या सूचना

४. थेस्सलनीकामधील ख्रिश्‍चनांना कोणता इशारा देण्यात आला होता, आणि आज आपल्याला सावध राहण्यास कशा प्रकारे मदत केली जात आहे?

थेस्सलनीकाच्या मंडळीला लिहिलेल्या पहिल्या पत्रात पौलाने यहोवाच्या येणाऱ्‍या दिवसाचा उल्लेख केला होता. आपल्या बांधवांनी अंधारात राहू नये, तर सज्ज असावे अशी पौलाची इच्छा होती. त्याने त्यांना आर्जवले, की त्यांनी “प्रकाशाची प्रजा” या नात्याने “जागे व सावध राहावे.” (१ थेस्सलनीकाकर ५:१-६ वाचा.) आज आपण, खोट्या धर्माचे साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलचा नाश होण्याची वाट पाहत आहोत. या नाशासोबत यहोवाच्या महान दिवसाची सुरुवात होईल. यहोवा त्याचा उद्देश कसा पूर्ण करेल याविषयी आपल्याला दिवसेंदिवस आणखी जास्त समज मिळत आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! शिवाय, मंडळीद्वारे आपल्याला योग्य वेळी सूचनादेखील मिळतात, ज्यांमुळे आपल्याला जागे व सावध राहणे शक्य होते. वारंवार मिळणाऱ्‍या या इशाऱ्‍यांकडे लक्ष दिल्यास, कोणत्याही फसवणुकीला बळी न पडता देवाची सेवा करत राहण्याचा आपला निर्धार आणखी मजबूत होऊ शकतो.—रोम. १२:१, २.

पौलाने लिहिलेल्या पत्रांतून ख्रिश्‍चनांना आवश्‍यक इशारे देण्यात आले (परिच्छेद ४, ५ पाहा)

५, ६. (क) पौलाने थेस्सलनीका येथील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात कोणत्या गोष्टीकडे लक्ष वेधले? (ख) येशूद्वारे देव लवकरच काय करेल, आणि आपण स्वतःला काय विचारले पाहिजे?

थेस्सलनीका येथील ख्रिश्‍चनांना पहिले पत्र लिहिल्याच्या काही काळानंतर पौलाने त्यांना दुसरे पत्र लिहिले. या पत्रात त्याने येणाऱ्‍या त्या संकटाकडे लक्ष वेधले, जेव्हा प्रभू येशू “जे देवाला ओळखत नाहीत व . . . सुवार्ता मानत नाहीत” त्यांना दंड देईल. (२ थेस्सलनी. १:६-८) त्या पत्रातील दुसऱ्‍या अध्यायातून आपल्याला कळते, की यहोवाच्या दिवसाविषयी ऐकून त्या मंडळीतील काही जणांचे मन अस्थिर झाले होते. इतके, की यहोवाचा दिवस लगेच येणार आहे असा ते विचार करू लागले. (२ थेस्सलनीकाकर २:१, २ वाचा.) यहोवा आपला उद्देश कसा पूर्ण करेल याविषयी पहिल्या शतकातील त्या ख्रिश्‍चनांची समज अपुरी होती. पौलाने नंतर भविष्यवाणीच्या संदर्भात बोलताना ही गोष्ट मान्यदेखील केली. त्याने लिहिले: “आपल्याला केवळ अंशतः कळते, आणि अंशतः संदेश देता येतो; पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.” (१ करिंथ. १३:९, १०) पण पौलाने, प्रेषित पेत्राने आणि त्या काळातील इतर विश्‍वासू अभिषिक्‍त बांधवांनी लिहिलेल्या देवप्रेरित इशाऱ्‍यांमुळे पहिल्या शतकातील त्या ख्रिश्‍चनांना त्यांचा विश्‍वास टिकवून ठेवण्यास मदत मिळणार होती.

त्या ख्रिश्‍चनांची विचारसरणी सुधारण्यासाठी, पौलाने देवाच्या प्रेरणेने स्पष्ट केले, की यहोवाचा दिवस येण्याआधी मोठ्या प्रमाणात धर्मत्याग होईल आणि “अनीतिमान पुरुष” प्रगट होईल. * त्यानंतर, ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांना देवाने ठरवलेल्या वेळी प्रभू येशू “नष्ट करेल.” त्यांना दंड का देण्यात येईल याचे कारण प्रेषित पौलाने सांगितले; ते म्हणजे, त्यांनी “सत्याची आवड . . . धरली नाही.” (२ थेस्सलनी. २:३, ८-१०) तेव्हा आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘मला सत्याची कितपत आवड आहे? बायबलमधील शिकवणींबद्दल सध्याची आपली समज काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो का? यासाठी मी देवाच्या लोकांकरता पुरवल्या जाणाऱ्‍या या नियतकालिकाचा आणि इतर प्रकाशनांचा अभ्यास करतो का?’

सुज्ञपणे सोबत्यांची निवड करा

७, ८. (क) सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना कोणत्या धोक्यांपासून सावध राहायचे होते? (ख) आज ख्रिश्‍चनांसमोर खासकरून कोणता धोका आहे?

ख्रिश्‍चनांना धर्मत्यागी लोकांच्या शिकवणींसोबत इतर धोक्यांचाही सामना करावा लागणार होता. पौलाने तीमथ्याला लिहिले, की “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीम. ६:१०) तसेच, ज्यांना “देहाची कर्मे” म्हणण्यात आले आहे अशा वाईट कृत्यांमध्ये अडकण्याचाही ख्रिश्‍चनांना सतत धोका होता.—गलती. ५:१९-२१.

यांव्यतिरिक्‍त पौलाने थेस्सलनीकातील ख्रिश्‍चनांना आणखी एका धोक्याविषयी अतिशय कडक इशारा दिला. हा इशारा खोट्या प्रेषितांविषयी होता. त्यांच्यापैकी काही जण “विपरीत गोष्टी” बोलून “शिष्यांना आपल्यामागे ओढून” घेण्याचा प्रयत्न करत होते. (२ करिंथ. ११:४, १३; प्रे. कृत्ये २०:३०) येशूने नंतर इफिसस येथील मंडळीची प्रशंसा केली, कारण त्या मंडळीने “दुर्जन” माणसांना सहन केले नव्हते. त्या मंडळीतील बांधवांनी अशा माणसांची “परीक्षा” केली जे मुळात खोटे प्रेषित होते. (प्रकटी. २:२) लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे पौलाने आपल्या दुसऱ्‍या पत्रात थेस्सलनीकाकरांना हा सल्ला दिला: “बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्‍या . . . प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे.” पौल या ठिकाणी खासकरून अशा बांधवांबद्दल बोलत होता ज्यांना “काम करण्याची इच्छा” नव्हती. (२ थेस्सलनी. ३:६, १०) जर अशांना अव्यवस्थितपणे वागणारे असे म्हणण्यात आले, तर मग जे धर्मत्यागी लोकांप्रमाणे वागू लागले होते त्यांच्यापासून दूर राहणे नक्कीच जास्त गरजेचे होते. अशा लोकांसोबत मैत्री करणे जसे त्या काळी धोकादायक होते तसे आजही धोकादायक आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्याचे आपण टाळले पाहिजे.—नीति. १३:२०.

९. जे बायबलमधील गोष्टींविषयी अंदाज बांधतात किंवा इतरांची टीका करतात त्यांच्यापासून आपण सावध का राहिले पाहिजे?

लवकरच मोठ्या संकटाची सुरुवात होईल आणि या दुष्ट जगाचा अंत होईल. त्यामुळे, पहिल्या शतकात पौलाने दिलेले देवप्रेरित इशारे आपल्याकरता आणखी जास्त महत्त्वाचे आहेत. यहोवाने आपल्यावर जी कृपा केली आहे ती व्यर्थ होऊ देण्याची आपली इच्छा नाही. असे झाल्यास, यहोवाने आपल्याला देऊ केलेले सार्वकालिक जीवन आपण गमावून बसू, मग ते स्वर्गातील असो वा पृथ्वीवरील. (२ करिंथ. ६:१) म्हणूनच, आपल्या सभांमध्ये उपस्थित राहणाऱ्‍यांपैकी जर कोणी बायबलमध्ये स्पष्ट न केलेल्या गोष्टींविषयी अंदाज बांधत असेल, किंवा मंडळीतील वडिलांची वा इतरांची टीका करत असेल, तर अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे.—२ थेस्सलनी. ३:१३-१५.

“जे संप्रदाय तुम्हास शिकवले ते बळकट धरून राहा”

१०. थेस्सलनीकातील ख्रिश्‍चनांना कोणत्या संप्रदायांना जडून राहण्यास आर्जवण्यात आले?

१० पौलाने थेस्सलनीका येथील बांधवांना “स्थिर” राहण्यास आणि शिकलेल्या गोष्टींना जडून राहण्यास आर्जवले. (२ थेस्सलनीकाकर २:१५ वाचा.) त्यांना कोणते “संप्रदाय” शिकवण्यात आले होते? ते संप्रदाय खोट्या धर्माच्या शिकवणी नसून येशूने शिकवलेल्या आणि पौलाने व इतरांनी देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या गोष्टी होत्या. पौलाने करिंथ मंडळीतील बांधवांची असे म्हणून प्रशंसा केली, की “तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हाला सांगून ठेवलेले विधी जशाचे तसे दृढ धरून पाळता.” (१ करिंथ. ११:२) अशा शिकवणींचा स्रोत विश्‍वसनीय होता आणि त्यामुळे त्यांच्यावर भरवसा ठेवला जाऊ शकत होता.

११. काही जण कोणत्या मार्गांनी फसवणुकीला बळी पडू शकतात?

११ इब्री ख्रिश्‍चनांना लिहिताना पौलाने अशा दोन मार्गांकडे लक्ष वेधले ज्यांमुळे एक ख्रिस्ती व्यक्‍ती आपला विश्‍वास गमावू शकत होती आणि अस्थिर होऊ शकत होती. (इब्री लोकांस २:१; ३:१२ वाचा.) हे मार्ग म्हणजे, एकतर देवापासून ‘वाहवत जाणे,’ किंवा स्वतः त्याला ‘सोडून देणे.’ एखादी नाव किनाऱ्‍यापासून वाहवत जाते तेव्हा सुरुवातीला कदाचित हे कळणारही नाही. पण, हळूहळू ती किनाऱ्‍यापासून खूप दूर जाते. दुसरीकडे पाहता, एखादा मनुष्य स्वतः आपल्या नावेला किनाऱ्‍यापासून दूर ढकलण्याचे ठरवू शकतो. फसवणुकीला बळी पडून सत्यावरील विश्‍वास कमकुवत होऊ दिल्यामुळे काय घडते हे वरील दोन्ही उदाहरणांवरून दिसून येते.

१२. कोणत्या गोष्टींमुळे आपली आध्यात्मिकता धोक्यात येऊ शकते?

१२ थेस्सलनीकातील काही जणांसोबत कदाचित असेच घडले असावे. आणि आज आपल्या दिवसांबद्दल काय म्हणता येईल? आज अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांत आपला वेळ वाया जाऊ शकतो. सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून सतत इतरांच्या संपर्कात राहणे, एसएमएस किंवा ई-मेल वाचणे व पाठवणे, छंद जोपासणे किंवा खेळ जगतात काय चालले आहे याबद्दल जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करणे यांमुळे किती तास खर्च होतात याचा जरा विचार करा. यांपैकी कोणत्याही गोष्टीमुळे एका ख्रिश्‍चनाचे लक्ष विचलित होऊन त्याचा आवेश कमी होऊ शकतो. याचा परिणाम काय होतो? कदाचित तो कळकळीने प्रार्थना करण्याचे थांबवेल. त्याच्याजवळ देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, सभांना उपस्थित राहण्यासाठी आणि सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी कदाचित वेळच उरणार नाही. अशा प्रकारे, आध्यात्मिक रीत्या अस्थिर होण्याचे आपण कसे टाळू शकतो?

अस्थिर होऊ नये म्हणून काय करावे?

१३. बायबलमध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे, अनेकांची मनोवृत्ती कशी आहे, आणि आपण आपल्या विश्‍वासाचे रक्षण कसे करू शकतो?

१३ आपण कोणत्या काळात राहत आहोत याविषयी आपण जागरूक असले पाहिजे. तसेच, आपण “शेवटल्या दिवसांत” जगत आहोत हे न मानणाऱ्‍यांची संगत धरल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो याविषयीदेखील जागरूक असले पाहिजे. आपल्या काळाविषयी प्रेषित पेत्राने असे लिहिले: “थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” (२ पेत्र ३:३, ४) दररोज देवाच्या वचनाचे वाचन व अभ्यास केल्याने आपण “शेवटल्या दिवसांत” आहोत हे लक्षात ठेवण्यास आपल्याला मदत मिळेल. भाकीत करण्यात आलेल्या धर्मत्यागाची सुरुवात खूप आधी झाली होती आणि आजही धर्मत्याग सुरूच आहे. “अनीतिमान पुरुष” आजही अस्तित्वात आहे आणि देवाच्या सेवकांचा विरोध करत आहे. त्यामुळे, यहोवाचा दिवस जवळ आहे हे लक्षात ठेवून आपण जागरूक राहणे गरजेचे आहे.—सफ. १:७.

चांगली तयारी केल्यामुळे आणि प्रचार कार्यात आवेशाने सहभाग घेतल्यामुळे आध्यात्मिक रीत्या अस्थिर होण्याचे आपण टाळू शकतो (परिच्छेद १४, १५ पाहा)

१४. देवाच्या सेवेत व्यस्त राहिल्याने कशा प्रकारे आपले संरक्षण होते?

१४ अनुभवावरून हे सिद्ध झाले आहे, की सावध राहण्याचा आणि गोंधळून न जाण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे नियमितपणे देवाच्या राज्याचा प्रचार करणे. मंडळीचे मस्तक असलेल्या ख्रिस्त येशूने त्याच्या अनुयायांना सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवण्याची आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी लोकांना शिकवण्याची आज्ञा दिली. असे केल्याने, त्याच्या अनुयायांचे संरक्षण होणार होते. (मत्त. २८:१९, २०) या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपण आवेशाने प्रचार करण्याची गरज आहे. थेस्सलनीकामधील आपले बांधव केवळ कर्तव्य म्हणून प्रचार करण्याच्या व शिकवण्याच्या कार्यात नावापुरता भाग घेत असावेत का? पौलाने त्यांना काय सांगितले होते त्याची आठवण करा: “आत्म्याला विझवू नका; संदेशाचा [किंवा भविष्यवाणीचा] धिक्कार करू नका.” (१ थेस्सलनी. ५:१९, २०) आपण ज्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करतो व ज्यांविषयी इतरांना सांगतो त्या खरोखर किती अद्‌भुत आहेत!

१५. कौटुंबिक उपासनेदरम्यान आपण कोणकोणत्या गोष्टींची चर्चा करू शकतो?

१५ साहजिकच, आपली कुटुंबे क्षेत्र सेवेत आणखी परिणामकारक बनावीत म्हणून त्यांना मदत करण्याची आपली इच्छा आहे. कौटुंबिक उपासनेतील थोडा वेळ सेवाकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी ठेवल्याने सेवेत परिणामकारक बनणे शक्य झाल्याचे अनेक बंधुभगिनींना दिसून आले आहे. लोकांनी आवड दाखवल्यास त्यांना आणखी कशा प्रकारे मदत करता येईल याविषयी कुटुंबातील सदस्यांनी चर्चा करणे साहाय्यक ठरू शकते. ते पुढच्या भेटीच्या वेळी काय बोलतील? आवड दाखवलेल्यांशी कोणत्या विषयांवर बोलल्याने त्यांची आस्था आणखी वाढू शकते? पुनर्भेटीसाठी लोकांच्या घरी जाण्याची योग्य वेळ कोणती असेल? तसेच, मंडळीच्या सभांबद्दल चर्चा करण्यासाठीही बरेच जण कौटुंबिक उपासनेचा काही वेळ राखून ठेवतात. त्यामुळे सभांमध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा केली जाणार याची त्यांना कल्पना येते. सभांमध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेता यावा म्हणून सभांची तयारी करण्याकरता तुम्ही आणखी जास्त प्रयत्न करू शकता का? तुमच्या सहभागामुळे तुमचा विश्‍वास आणखी दृढ होईल आणि आध्यात्मिक रीत्या अस्थिर होण्याचे तुम्हाला टाळता येईल. (स्तो. ३५:१८) खरेच, कौटुंबिक उपासनेमुळे, बायबलमध्ये न सांगितलेल्या गोष्टींविषयी अंदाज बांधण्यापासून आणि शंका घेण्यापासून आपले संरक्षण होईल.

१६. अभिषिक्‍त जनांनी त्यांची विचारशक्‍ती टिकवून ठेवल्यामुळे त्यांना कोणता बहुमान लाभणार आहे?

१६ मागील अनेक वर्षांदरम्यान यहोवाने त्याच्या लोकांना बायबलमधील भविष्यवाण्यांची अधिकाधिक स्पष्ट समज देऊन आशीर्वादित केले आहे. याविषयी मनन केल्याने भविष्यात आपल्यासाठी किती अद्‌भुत आशीर्वाद राखून ठेवलेला आहे याची कदर आपण बाळगू शकतो. अभिषिक्‍त जनांना ख्रिस्तासोबत स्वर्गात राहण्याची आशा आहे. त्यांनी आपली विचारशक्‍ती टिकवून ठेवल्याबद्दल त्यांना किती मोठा बहुमान लाभणार आहे! पौलाने थेस्सलनीकाकरांना लिहिलेले शब्द आपण नक्कीच त्यांना लागू करू शकतो: “बंधुजनहो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्‍या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्‍वासात देवाने तुम्हाला . . . निवडले आहे.”—२ थेस्सलनी. २:१३.

१७. २ थेस्सलनीकाकर ३:१-५ मध्ये कोणते प्रोत्साहन देण्यात आले आहे?

१७ अभिषिक्‍त जनांप्रमाणेच, पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा बाळगून असलेल्यांनीदेखील आध्यात्मिक रीत्या अस्थिर होण्याचे टाळण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. तुम्ही जर पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगत असाल, तर पौलाने थेस्सलनीका येथील आपल्या सोबतीच्या अभिषिक्‍त जनांना जे लिहिले होते त्याचे मनापासून पालन करा. (२ थेस्सलनीकाकर ३:१-५ वाचा.) आपल्यापैकी प्रत्येकाने या वचनांत असलेल्या प्रेमळ भावनांची कदर केली पाहिजे. थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पत्रांत बायबलमध्ये न सांगितलेल्या गोष्टींविषयी अंदाज बांधण्यापासून किंवा शंकास्पद मतांपासून दूर राहण्याविषयी आवश्‍यक इशारे देण्यात आले आहेत. आपण जगाच्या अंताच्या खूप जवळ असल्यामुळे, या इशाऱ्‍यांबद्दल खरोखर किती कृतज्ञ आहोत!

^ प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३० मध्ये पौलाने याकडे लक्ष वेधले, की ख्रिस्ती मंडळ्यांतूनच “काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” इतिहासावरून हे दिसून येते, की कालांतराने पाळक व सर्वसामान्य लोक असा वर्गभेद निर्माण झाला. भाकीत करण्यात आलेला “अनीतिमान पुरुष” ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक असल्याचे इ.स. तिसऱ्‍या शतकापर्यंत अगदी स्पष्ट झाले.—टेहळणी बुरूज, १ सप्टेंबर १९९०, पृष्ठे १२-१६ पाहा.