“तुझे राज्य येवो” —पण केव्हा?
“या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच, आहे असे समजा.”—मत्त. २४:३३.
१, २. (क) कशाच्या प्रभावामुळे आपण एक प्रकारे आंधळे होतो? (ख) देवाच्या राज्याबद्दल आपल्याला काय माहीत आहे?
एखादी घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या प्रत्येकाला त्या घटनेबद्दलचे सारखेच तपशील आठवत नाहीत हे कदाचित तुमच्या पाहण्यात आले असेल. त्याच प्रकारे, एखाद्याच्या आजाराचे निदान केल्यावर डॉक्टरने नेमके काय सांगितले हे आठवणीत ठेवणे त्या व्यक्तीला कठीण जाऊ शकते. किंवा कधीकधी असे होऊ शकते की एखादी व्यक्ती आपल्या चाव्या किंवा चष्मा शोधत असते पण त्या अगदी डोळ्यांसमोर असूनही तिला सापडत नाहीत. असे का घडते? आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक प्रकारे आपण आंधळे होतो असे संशोधकांचे म्हणणे आहे. यावरून दिसून येते, की आपला मेंदू एका वेळी फक्त एकाच गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतो.
२ आज बहुतेक लोक जगात घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत “आंधळे” आहेत. ते ही गोष्ट मान्य करतात, की १९१४ पासून या जगात अनेक बदल घडून आले आहेत. पण, या घटनांचा खरा अर्थ काय आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. आपण बायबलचे विद्यार्थी असल्यामुळे, येशूला १९१४ मध्ये स्वर्गात राजा म्हणून नेमण्यात आले तेव्हा एका अर्थाने देवाचे राज्य आले हे आपल्याला माहीत आहे. पण, “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” या प्रार्थनेचे उत्तर पूर्णपणे देण्यात आलेले नाही. (मत्त. ६:१०) या दुष्ट जगाचा अंत होईल तेव्हाच या प्रार्थनेचे पूर्णपणे उत्तर दिले जाईल. हे घडल्यानंतरच, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही देवाच्या इच्छेप्रमाणे होईल.
३. देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टी समजल्या आहेत?
३ आपण नियमितपणे देवाच्या वचनाचा अभ्यास करतो त्यामुळे आपण ओळखू शकतो की आज बायबलमधील भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत. या बाबतीत आपण जगातील लोकांपेक्षा किती वेगळे आहोत! ते आपापल्या जीवनात आणि जगातील गोष्टी मिळवण्यात इतके व्यस्त आहेत, की ख्रिस्ताने १९१४ पासून राज्य करायला सुरुवात केली आहे आणि तो लवकरच जगावर देवाचा न्यायदंड बजावेल याच्या स्पष्ट पुराव्याकडे ते दुर्लक्ष करतात. तेव्हा स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘या जगाचा अंत जवळ आहे आणि हे जगात घडणाऱ्या घटनांवरून सिद्ध होते असा आजही माझा विश्वास आहे का?’ तुम्ही जरी अलीकडेच यहोवाचे साक्षीदार बनला असला, तरी तुमचे लक्ष कशावर केंद्रित आहे? या बाबतीत तुमचे उत्तर काहीही असो, लवकरच पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे होईल असे आपण का म्हणू शकतो याच्या तीन महत्त्वाच्या कारणांची आपण चर्चा करू या.
घोडेस्वार प्रकट झाले आहेत
४, ५. (क) येशू १९१४ पासून काय करत आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) येशूच्या मागोमाग जाणारे तीन घोडेस्वार कशास चित्रित करतात, आणि ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली आहे?
४ सन १९१४ मध्ये येशू ख्रिस्ताला स्वर्गीय मुकुट देण्यात आला म्हणजे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमण्यात आले. तो एका पांढऱ्या घोड्यावर स्वारी करत असल्याचे प्रकटीकरण ६ व्या अध्यायात वर्णन करण्यात आले आहे. राजा बनल्यानंतर तो लगेच सैतानाच्या दुष्ट जगावर विजय मिळवण्यास निघाला. (प्रकटीकरण ६:१, २ वाचा.) प्रकटीकरण ६ व्या अध्यायातील भविष्यवाणीत सांगण्यात आले होते, की देवाच्या राज्य शासनाची सुरुवात झाल्यावर लगेच जगातील परिस्थिती खूप बिकट होईल. युद्धे, अन्नटंचाई, रोगराई आणि मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या इतर गोष्टी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात घडतील. भविष्यवाणीत या विपत्तींचे चित्रण येशू ख्रिस्ताच्या मागोमाग स्वारी करणाऱ्या तीन घोडेस्वारांद्वारे करण्यात आले आहे.—प्रकटी. ६:३-८.
५ भविष्यवाणीत सांगण्यात आल्याप्रमाणे, युद्धामुळे पृथ्वीवरील शांतता नाहीशी झाली आहे. शांती आणण्यासाठी सोबत मिळून कार्य करण्याचे अनेक राष्ट्रांनी एकमेकांना आश्वासन देऊनही हे घडले. जगात झालेल्या अनेक युद्धांमुळे पृथ्वीवरील शांती नाहीशी झाली. याची सुरुवात पहिल्या महायुद्धाने झाली. १९१४ पासून आर्थिक आणि वैज्ञानिक क्षेत्रांत बरीच प्रगती होऊनही, अन्नटंचाईमुळे जगभरातील शांती व सुरक्षितता अजूनही धोक्यात आहे. शिवाय रोगराई, नैसर्गिक विपत्ती आणि इतर संकटांमुळे दरवर्षी लाखो लोक मृत्यूमुखी पडतात हे कोण नाकारू शकतो? या घटनांनी इतिहासात कधी नव्हे इतके भयंकर रूप धारण केले आहे, त्या वारंवार घडत आहेत आणि त्यांमुळे मोठ्या प्रमाणात लोक मारले जात आहेत. या घटनांचा काय अर्थ होतो याची तुम्हाला कल्पना आहे का?
६. बायबलमधील भविष्यवाणी पूर्ण झाल्याचे कोणी ओळखले, आणि त्यामुळे त्यांना काय करण्याची प्रेरणा मिळाली?
६ पहिले महायुद्ध सुरू झाल्यामुळे आणि स्पॅनिश फ्लूची साथ आल्यामुळे अनेक लोकांचे लक्ष विचलित झाले होते. पण, अभिषिक्त ख्रिस्ती मात्र १९१४ ची आतुरतेने वाट पाहत होते, कारण या वर्षी “परराष्ट्रीयांची सद्दी” किंवा विदेश्यांचा काळ संपणार होता. (लूक २१:२४) १९१४ मध्ये नेमके काय घडेल याची त्यांना पूर्ण माहिती नव्हती. तरीसुद्धा, त्यांना हे माहीत होते की १९१४ हे वर्ष देवाच्या राज्याच्या संबंधाने महत्त्वाचे आहे. बायबलमधील भविष्यवाणी पूर्ण झाल्याचे त्यांनी ओळखले तेव्हा त्यांनी देवाचे राज्य सुरू झाले असल्याचे बेधडकपणे इतरांना सांगितले. राज्याविषयी घोषित केल्यामुळे त्यांना तीव्र छळाचा सामना करावा लागला. या छळामुळेदेखील बायबलमधील भविष्यवाणी पूर्ण झाली आहे हे दिसून आले. त्यानंतरच्या दशकांत देवाच्या राज्याच्या शत्रूंनी प्रचार कार्य थांबवण्यासाठी कायद्याच्या नावाने छळ केला. तसेच, ते प्रचार कार्य करणाऱ्यांशी अतिशय क्रूरपणे वागले, त्यांनी त्यांना तुरुंगात टाकले आणि काहींना तर जिवेही मारले.—स्तो. ९४:२०; प्रकटी. १२:१५.
७. जगातील घटनांचा नेमका काय अर्थ होतो हे बहुतेक लोकांना का समजत नाही?
७ स्वर्गात देवाचे राज्य सुरू झाल्याचे इतके सारे पुरावे असूनही, हे बहुतेक लोकांच्या लक्षात का येत नाही? जगात घडणाऱ्या घटनांमुळे बायबलमधील भविष्यवाण्या पूर्ण होत असल्याची अनेक वर्षांपासून देवाचे लोक घोषणा करत आहेत, तरीही लोकांना ही गोष्ट का समजत नाही? ते आपल्या डोळ्यांनी जे पाहू शकतात त्याच्यावरच लक्ष केंद्रित करत असल्यामुळे असे घडत आहे का? (२ करिंथ. ५:७) ते आपापल्या जीवनात इतके गर्क झाले आहेत का, की देव जे करत आहे ते त्यांना दिसत नाही? (मत्त. २४:३७-३९) सैतानाचे जग ज्या गोष्टींना किंवा ध्येयांना चालना देते त्यांमुळे काही जण विकर्षित झाले आहेत का? (२ करिंथ. ४:४) देवाचे राज्य काय काय करत आहे हे समजण्यासाठी आपल्याला विश्वासाची आणि आध्यात्मिक दृष्टीची गरज आहे. जे काही घडत आहे त्याचा अर्थ आपण समजू शकतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!
दुष्टपणात वाढ होत आहे
८-१०. (क) दुसरे तीमथ्य ३:१-५ या वचनांतील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली आहे? (ख) दुष्टपणात अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे असे आपण का म्हणू शकतो?
८ देवाचे राज्य लवकरच पृथ्वीचा कारभार आपल्या हातात घेईल असे आपण का म्हणू शकतो याचे दुसरे कारण म्हणजे लोक दिवसेंदिवस आणखी दुष्ट बनत आहेत. २ तीमथ्य ३:१-५ या वचनांत पूर्वभाकीत करण्यात आलेल्या गोष्टी मागील जवळजवळ शंभर वर्षांपासून पाहायला मिळत आहेत. या वचनांत सांगितलेली वागणूक जगभरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. यावरून दिसून येते की ही भविष्यवाणीदेखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होत आहे. याची काही उदाहरणे आपण पाहू या.—२ तीमथ्य ३:१, १३ वाचा.
९ जे आचरण १९४० च्या किंवा १९५० च्या दशकात वाईट मानले जायचे त्याची तुलना आज कामाच्या ठिकाणी, मनोरंजनाच्या क्षेत्रात, खेळ जगतात आणि फॅशनच्या दुनियेत जे घडत आहे त्याच्याशी करा. आज लोक आधीपेक्षा जास्त हिंसक आणि अनैतिक बनल्याचे सगळीकडे पाहायला मिळते. आपण इतरांपेक्षा जास्त हिंसक, अनैतिक आणि क्रूर आहोत हे दाखवण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे असे दिसते. १९५० च्या दशकात ज्या प्रकारच्या टीव्ही कार्यक्रमांना वाईट मानले जायचे, त्या प्रकारचे कार्यक्रम आज कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून पाहतात. मनोरंजन आणि फॅशनच्या क्षेत्रावर समलिंगी लोकांचा किती पगडा आहे आणि ते कशा प्रकारे सर्वांपुढे आपल्या जीवनशैलीचे समर्थन करतात हे अनेकांनी पाहिले आहे. या सर्व बाबतींत देवाचा दृष्टिकोन काय आहे हे आपल्याला माहीत आहे त्याबद्दल आपण किती आभारी आहोत!—यहूदा १४, १५ वाचा.
१० तसेच, १९५० च्या दशकातील तरुणांच्या बंडखोर मनोवृत्तीची तुलना आजच्या काळातील तरुण जे करतात त्याच्याशी करा. उदाहरणार्थ, त्या काळी पालकांना याची चिंता असायची, की आपली मुले धूम्रपान, दारूची नशा तर करत नाही ना किंवा अनुचित नाचगाण्यात तर सहभागी होत नाहीत ना. पण, आज पुढील प्रकारच्या धक्कादायक बातम्या वारंवार ऐकायला मिळतात: एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या वर्गसोबत्यांवर गोळ्या झाडल्या, दोघांचा मृत्यू आणि १३ जण जखमी. किशोरवयीन तरुणांच्या एका जमावाने दारूच्या नशेत एका नऊ वर्षांच्या मुलीचा खून केला आणि तिच्या वडिलावर व नातलगावर हल्ला केला. आणखी एका बातमीनुसार, आशियातील एका देशात मागील दहा वर्षांत जितके गुन्हे घडले आहेत त्यांपैकी अर्धे गुन्हे अल्पवयीनांनी केले आहेत. अशा घातक कृत्यांचे प्रमाण कितीतरी पटीने वाढले आहे हे कोणी नाकारू शकतो का?
११. वाईट गोष्टींमध्ये वाढ होत आहे हे बहुतेक लोकांच्या लक्षात का येत नाही?
११ प्रेषित पेत्राने अगदी अचूकपणे असे लिहिले: “स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” (२ पेत्र ३:३, ४) काही लोक असे का म्हणतात? एखादी गोष्ट वारंवार घडत असते तेव्हा लोक अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात असे दिसते. आपला एखादा जवळचा मित्र अचानक विचित्रपणे वागू लागला, तर याचे आपल्याला आश्चर्य वाटू शकते. पण, लोकांची मनोवृत्ती हळूहळू बदलू लागली किंवा त्यांचे नैतिक स्तर हळूहळू खालावू लागले, तर या गोष्टी सहसा लक्षात येत नाहीत आणि लोकांना याचे आश्चर्य वाटत नाही. तरीसुद्धा, ही गोष्ट धोकादायक नाही असे म्हणता येणार नाही.
१२, १३. (क) जगातील घटनांमुळे आपण निराश का होऊ नये? (ख) कोणत्या गोष्टीची जाणीव बाळगल्यास आपल्याला कठीण परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यास मदत मिळेल?
१२ प्रेषित पौलाने सांगितले, की “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” (२ तीम. ३:१) पण, परिस्थिती कठीण असली, तरी तिचा सामना करणे अशक्य नाही. म्हणून, आपण वास्तवाकडे डोळेझाक करण्याची गरज नाही. एखाद्या गोष्टीमुळे आपण निराश झाल्यास किंवा आपल्याला कशाची भीती वाटत असल्यास, आपण यहोवाच्या, त्याच्या पवित्र आत्म्याच्या आणि ख्रिस्ती मंडळीच्या मदतीने त्या गोष्टीला यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. आपण यहोवाला विश्वासू राहू शकतो. कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी हवे असलेले सामर्थ्य देव आपल्याला देईल.—२ करिंथ. ४:७-१०.
१३ पौलाने शेवटल्या दिवसांविषयीची भविष्यवाणी करताना सुरुवातीला “हे समजून घे” असे म्हटले होते. या शब्दांवरून आपल्याला याचे आश्वासन मिळते की त्याने पुढे जे म्हटले ते नक्कीच घडेल. आपल्याला माहीत आहे, की यहोवा जोपर्यंत या दुष्ट जगाचा नाश करत नाही तोपर्यंत दुष्ट लोक आणखी जास्त दुष्ट बनतील. इतिहासावरून दिसून येते, की जेव्हा एखाद्या समाजाची किंवा राष्ट्राची नैतिकता खूप खालच्या थराला गेली तेव्हा त्या समाजाचा किंवा राष्ट्राचा नाश झाला. आज संपूर्ण जगाचे नैतिक स्तर पूर्वी कधी नव्हे इतके घसरले आहेत. याचा काय अर्थ होतो याकडे कदाचित अनेक लोक दुर्लक्ष करतील; पण, १९१४ पासून घडणाऱ्या घटनांवरून आपल्याला याची खात्री पटली पाहिजे, की लवकरच देवाचे राज्य सर्व दुष्टाईचा समूळ नाश करेल.
ही पिढी नाहीशी होणार नाही
१४-१६. देवाचे राज्य लवकरच पृथ्वीवर येईल ही खात्री बाळगण्याचे तिसरे कारण कोणते आहे?
१४ लवकरच या जगाचा अंत होणार यावर भरवसा बाळगण्याचे आणखी एक कारण आहे. ते कारण म्हणजे देवाच्या लोकांशी संबंधित घटना. उदाहरणार्थ, स्वर्गात देवाच्या राज्याची सुरुवात होण्याआधी, विश्वासू अभिषिक्त जनांचा एक गट आवेशाने देवाची सेवा करत होता. १९१४ मध्ये त्यांनी अपेक्षा केल्याप्रमाणे घटना घडल्या नाहीत तेव्हा त्यांनी काय केले? त्यांच्यापैकी बहुतेकांना परीक्षांचा सामना करावा लागला आणि छळ सोसावा लागला तरी ते विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहिले. त्या अभिषिक्त जनांपैकी सर्वच नाही, तरी बहुतेक जण काळाच्या ओघात, पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटापर्यंत यहोवाला विश्वासू राहून आता स्वर्गात गेले आहेत.
१५ सैतानाच्या जगाच्या अंताविषयी भविष्यवाणी करताना येशूने असे म्हटले: “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” (मत्तय २४:३३-३५ वाचा.) येशूने “ही पिढी” असे म्हटले तेव्हा तो अभिषिक्त ख्रिश्चनांच्या दोन गटांविषयी बोलत होता हे आपल्याला माहीत आहे. यांपैकी पहिल्या गटातील अभिषिक्त जन १९१४ मध्ये हयात होते आणि त्यांनी हे ओळखले की त्या वर्षी येशू राजा बनला. या गटाचे सदस्य १९१४ मध्ये केवळ हयातच नव्हते, तर त्या वर्षी किंवा त्याच्या आधीच ते देवाचे पुत्र म्हणून पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त झाले होते.—रोम. ८:१४-१७.
१६ दुसरा गट अशा लोकांनी मिळून बनलेला आहे, जे पहिल्या गटातील सदस्यांच्या जीवनकाळात हयात होते, आणि फक्त हयातच नव्हते, तर पहिल्या गटातील सदस्यांच्या जीवनकाळात ते पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्तदेखील झालेले होते. म्हणून, येशूने उल्लेख केलेल्या पिढीत सध्या जिवंत असलेल्या अभिषिक्त जनांपैकी प्रत्येकाचाच समावेश होत नाही. आज या दुसऱ्या गटातील सदस्य वृद्ध होत चालले आहेत. पण, मत्तय २४:३४ मधील येशूच्या शब्दांतून आपल्याला ही खात्री मिळते, की मोठ्या संकटाची सुरुवात होईपर्यंत “ही पिढी नाहीशी होणारच नाही.” दुसऱ्या शब्दांत, या दुसऱ्या गटातील निदान काही जण मोठ्या संकटाची सुरुवात होताना पाहतील. यावरून आपला भरवसा आणखी दृढ होतो, की देवाच्या राज्याचा राजा लवकरच दुष्टांचा नाश करेल आणि एका नीतिमान नवीन जगाची सुरुवात करेल.—२ पेत्र ३:१३.
ख्रिस्त लवकरच विजयी ठरेल
१७. आपण चर्चा केलेल्या पुराव्यांवरून आपल्याला काय समजण्यास मदत मिळते?
१७ आतापर्यंत चर्चा केलेल्या भविष्यवाण्यांवरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? येशूने म्हटल्याप्रमाणे अंत नेमका केव्हा येईल तो दिवस किंवा ती घटका आपल्याला माहीत नाही. (मत्त. २४:३६; २५:१३) पण, पौलाने सांगितल्याप्रमाणे, अंत येण्याचा “समय” किंवा शेवटला काळ आपण ओळखू शकतो. (रोमकर १३:११ वाचा.) आज आपण त्याच शेवटल्या काळात जगत आहोत. आपण जर बायबलमधील भविष्यवाण्यांकडे आणि यहोवा देव व येशू ख्रिस्त जे करत आहेत त्याकडे लक्ष दिले, तर आपण हा सुस्पष्ट पुरावा पाहू शकू, की या दुष्ट जगाचा अंत जवळ आहे.
१८. देवाच्या राज्याचा स्वीकार न करणाऱ्यांचे काय होईल?
१८ येशू ख्रिस्ताला, जो पांढऱ्या घोड्यावर स्वारी करत आहे त्याला देण्यात आलेला अद्भुत अधिकार जे स्वीकारणार नाहीत त्यांना लवकरच आपली चूक मान्य करावी लागेल. त्यांच्यावर येणाऱ्या न्यायदंडातून ते वाचू शकणार नाहीत. त्या वेळी, ते घाबरून जातील आणि “कोणाच्याने टिकाव धरवेल?” अशी आरोळी करतील. (प्रकटी. ६:१५-१७) पण, प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायात याचे उत्तर देण्यात आले आहे. अभिषिक्त शेषजनांना आणि पृथ्वीवर जगण्याची आशा बाळगणाऱ्यांना देवाची स्वीकृती असल्यामुळे ते “टिकाव” धरतील. मग दुसऱ्या मेंढरांचा एक “मोठा लोकसमुदाय” मोठ्या संकटातून सुखरूप बचावेल.—प्रकटी. ७:९, १३-१५.
१९. लवकरच या जगाचा अंत होणार आहे याचा भरवसा असल्यामुळे, तुम्ही कोणत्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात?
१९ आपल्या काळात पूर्ण होत असलेल्या बायबलमधील भविष्यवाण्यांकडे जर आपण लक्ष देत राहिलो, तर सैतानाच्या जगातील गोष्टींमुळे आपण विकर्षित होणार नाही. तसेच, जगात घडणाऱ्या घटनांचा खरोखर काय अर्थ होतो याकडेही आपण दुर्लक्ष करणार नाही. ख्रिस्त लवकरच विजयी ठरेल आणि हर्मगिदोनाच्या नीतिमान युद्धात तो या दुष्ट जगाचा नाश करेल. (प्रकटी. १९:११, १९-२१) त्यानंतर, आपण किती आनंदी असू याचा विचार करा!—प्रकटी. २०:१-३, ६; २१:३, ४.