राज्य शासनाची १०० वर्षे पूर्ण —याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?
“यहोवा देवा, सर्वकालच्या राजा, तुझी कार्ये किती महान व आश्चर्यकारक आहेत!”—प्रकटी. १५:३, NW.
१, २. देवाचे राज्य काय करेल, आणि ते राज्य येईल याची खात्री आपण का बाळगू शकतो?
“तुझे राज्य येवो.” येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना इ.स. ३१ मध्ये कफर्णहूम शहराजवळ असलेल्या एका डोंगरावर अशी प्रार्थना करण्यास शिकवले. (मत्त. ६:१०) ते राज्य कधी येईल की नाही, याबाबत अनेकांना आज शंका वाटते. पण, आपल्याला खात्री आहे की देवाचे राज्य येण्यासाठी आपण मनापासून करत असलेल्या प्रार्थनांचे यहोवा नक्कीच उत्तर देईल.
२ या राज्याद्वारे यहोवा स्वर्गात व पृथ्वीवर असलेल्या त्याच्या कुटुंबात ऐक्य निर्माण करेल. देवाचा हा उद्देश निश्चितच पूर्ण होईल. (यश. ५५:१०, ११) खरेतर, मागील १०० वर्षांत घडलेल्या रोमांचक घडामोडी दाखवून देतात की आपल्या दिवसांत यहोवा राजा बनला आहे आणि तो आपल्या लाखो सेवकांसाठी महान व आश्चर्यकारक कार्ये करत आहे. (जख. १४:९; प्रकटी. १५:३) पण, यहोवाचे राजा बनणे आणि येशूने ज्याकरता प्रार्थना करण्यास शिकवले होते ते राज्य येणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोन गोष्टींमध्ये कोणता फरक आहे आणि त्यांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो?
यहोवाचा नियुक्त राजा कारवाई करतो
३. (क) येशूने राज्य शासन केव्हा सुरू केले आणि कोठे? (ख) देवाचे राज्य १९१४ साली स्थापन झाले हे तुम्ही कसे सिद्ध कराल? (तळटीप पाहा.)
३ एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास, देवाच्या सेवकांना दानीएलाने २,५०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका भविष्यवाणीचा अर्थ समजू लागला. दानीएलाने असे लिहिले होते: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करेल, त्याचा कधी भंग होणार नाही.” (दानी. २:४४) बायबल विद्यार्थी अनेक दशकांपासून सांगत होते की १९१४ हे महत्त्वाचे वर्ष असेल. त्या काळात लोक भविष्याकडे अतिशय आशावादी दृष्टिकोनाने पाहत होते. एका लेखकाने लिहिल्याप्रमाणे: “१९१४ साली जगातील लोक मोठ्या आशेने व आत्मविश्वासाने भविष्याकडे डोळे लावून होते.” पण, त्याच वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा बायबलची भविष्यवाणी खरी ठरली. युद्धाच्या पाठोपाठ आलेले दुष्काळ, भूकंप व रोगराई; तसेच बायबलमधील इतर भविष्यवाण्यांची पूर्णता यांवरून अगदी स्पष्ट झाले की १९१४ साली येशू ख्रिस्ताने स्वर्गात देवाच्या राज्याचा राजा या नात्याने आपले राज्य शासन सुरू केले. * मशीही राज्याचा राजा म्हणून आपल्या पुत्राला सिंहासनावर बसवण्याद्वारे यहोवा खरोखरच एका नव्या अर्थाने राजा बनला होता!
४. राज्य शासन सुरू करताच येशूने कोणती कारवाई केली आणि त्यानंतर त्याने काय केले?
४ राज्य शासन सुरू करताच देवाच्या नियुक्त राजाने हाती घेतलेली पहिली कामगिरी म्हणजे त्याच्या पित्याचा मुख्य शत्रू सैतान याच्याविरुद्ध लढाई करणे. येशूने व त्याच्या देवदूतांनी, दियाबल व त्याचे दुरात्मे यांना स्वर्गातून बाहेर घालवले. यामुळे स्वर्गात खूप आनंद व्यक्त करण्यात आला, पण पृथ्वीवर मात्र कधी नव्हे इतकी संकटे आली. (प्रकटीकरण १२:७-९, १२ वाचा.) त्यानंतर, राजा येशूने पृथ्वीवरील आपल्या प्रजेकडे लक्ष वळवले. त्यांनी देवाची इच्छा पूर्ण करावी म्हणून येशूने त्यांच्यात सुधारणा करण्यास, त्यांना प्रशिक्षित करण्यास आणि संघटित करण्यास सुरुवात केली. येशूच्या मार्गदर्शनाला देवाच्या सेवकांनी कशा प्रकारे चांगला प्रतिसाद दिला आणि यावरून आज आपण काय शिकू शकतो याविषयी आता पाहू या.
मशीही राजा सुधारणा घडवून आणतो
५. १९१४ पासून १९१९ च्या सुरुवातीच्या काळापर्यंत कोणते शुद्धीकरण घडून आले?
५ नुकताच सिंहासनावर बसलेल्या येशूने सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून बाहेर घालवल्यानंतर, यहोवाने त्याला पृथ्वीवरील त्याच्या अनुयायांच्या आध्यात्मिक स्थितीची पाहणी करण्यास व त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यास सांगितले. मलाखी संदेष्ट्याने या आध्यात्मिक शुद्धीकरणाचे वर्णन केले आहे. (मला. ३:१-३) इतिहासाकडे पाहिल्यास हे शुद्धीकरण १९१४ पासून १९१९ च्या सुरुवातीच्या काळापर्यंत घडल्याचे दिसून येते. * यहोवाच्या विश्वव्यापी कुटुंबाचे सदस्य या नात्याने आपण शुद्ध किंवा पवित्र असणे गरजेचे आहे. (१ पेत्र १:१५, १६) खोट्या धर्माने किंवा जगातील राजकारणाने आपण कोणत्याही प्रकारे दूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
६. आध्यात्मिक अन्न कशा प्रकारे पुरवले जाते, आणि हे अन्न इतके महत्त्वाचे का आहे?
६ यानंतर राजा या नात्याने आपल्या अधिकाराचा वापर करून येशूने एका ‘विश्वासू व बुद्धिमान दासाला’ नियुक्त केले. येशूच्या देखरेखीखाली ‘एका कळपात’ समाविष्ट असलेल्या सर्वांना हा दास नियमित रीत्या आध्यात्मिक अन्न पुरवणार होता. (मत्त. २४:४५-४७; योहा. १०:१६) १९१९ पासून अभिषिक्त बांधवांच्या एका लहानशा गटाने “परिवाराला” आध्यात्मिक अन्न पुरवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. या दासाद्वारे विपुल प्रमाणात पुरवले जाणारे आध्यात्मिक अन्न आपल्याला विश्वासात सुदृढ बनण्यास साहाय्य करते. तसेच, ते आपल्याला आध्यात्मिक, नैतिक, मानसिक व शारीरिक दृष्ट्या शुद्ध राहण्यास मदत करते. शिवाय, आज पृथ्वीवर चाललेल्या सर्वात महत्त्वाच्या कार्यात, अर्थात प्रचार कार्यात पुरेपूर सहभाग घेण्यासाठीही या आध्यात्मिक अन्नाद्वारे आपल्याला आवश्यक माहिती व प्रशिक्षण पुरवले जाते. या सर्व तरतुदींचा तुम्ही पूर्णपणे फायदा घेत आहात का?
जगभरात प्रचार कार्य पार पाडण्यासाठी राजा आवश्यक प्रशिक्षण पुरवतो
७. पृथ्वीवर असताना येशूने कोणत्या महत्त्वाच्या कार्याची सुरुवात केली, आणि हे कार्य केव्हापर्यंत चालणार होते?
७ येशूने पृथ्वीवर त्याचे सेवाकार्य सुरू केले तेव्हा त्याने असे म्हटले: “मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.” (लूक ४:४३) साडेतीन वर्षांपर्यंत येशूने या कार्याला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व दिले. त्याने शिष्यांना अशी आज्ञा केली: “जात असताना अशी घोषणा करत जा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्त. १०:७) येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने असे भाकीत केले की त्याचे अनुयायी “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” राज्याच्या संदेशाचा प्रसार करतील. (प्रे. कृत्ये १:८) तसेच, थेट आपल्या काळापर्यंत तो या महत्त्वाच्या कार्याकडे जातीने लक्ष देईल असे अभिवचनही त्याने दिले.—मत्त. २८:१९, २०.
८. राजाने आपल्या पृथ्वीवरील प्रजेला प्रचार करण्यासाठी कशा प्रकारे प्रेरित केले?
८ सन १९१९ उजाडेपर्यंत राज्याच्या सुवार्तेला एक नवा अर्थ लाभला होता. (मत्त. २४:१४) राज्य स्वर्गात सुरू झाले होते आणि राजाने पृथ्वीवर, शुद्ध केलेल्या अनुयायांच्या एका लहानशा गटाला एकत्रित केले होते. तेव्हा, येशूच्या अनुयायांना भविष्यात येणार असलेल्या राज्याची नव्हे, तर १९१४ साली स्वर्गात सुरू झालेल्या राज्याची सुवार्ता घोषित करण्याची सुस्पष्ट आज्ञा देण्यात आली. या आज्ञेला त्यांनी आनंदाने प्रतिसाद दिला. (प्रे. कृत्ये १०:४२) उदाहरणार्थ, १९२२ सालच्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील ओहायो राज्यात, सीडर पॉईंट येथे देवाच्या राज्याला पाठिंबा देणारे जवळजवळ २०,००० जण एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनाकरता एकत्र आले. अधिवेशनात बंधू रदरफर्ड यांनी “देवाचे राज्य” असे शीर्षक असलेल्या भाषणात असे घोषित केले: “पाहा, राजा राज्य करत आहे! तुम्ही लोकांसमोर त्याचे प्रतिनिधी आहात. म्हणून राजा व त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा!” हे भाषण ऐकल्यावर उपस्थित सर्व जण किती उत्साहित झाले असतील याची कल्पना करा. दुसऱ्याच दिवशी, अधिवेशनाला आलेल्यांपैकी दोन हजार जणांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेतला; काहींनी तर अधिवेशनाच्या ठिकाणापासून जवळजवळ ७२ किलोमीटर अंतरापर्यंतच्या क्षेत्रात जाऊन लोकांना त्यांच्या घरी भेटी दिल्या. या अधिवेशनामुळे सर्वांना किती प्रोत्साहन मिळाले होते याविषयी एका बांधवाने असे म्हटले: “राज्याची घोषणा करण्याचं ते आवाहन आणि अधिवेशनाला आलेल्या सर्वांमध्ये संचारलेला उत्साह मी कधीही विसरू शकणार नाही.” अनेकांच्या भावना या बांधवासारख्याच होत्या.
९, १०. (क) कोणकोणत्या प्रशालांद्वारे आपल्याला सेवाकार्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे? (ख) या प्रशिक्षणामुळे व्यक्तिशः तुम्हाला कसा फायदा झाला आहे?
९ सन १९२२ पर्यंत जगभरातील ५८ देशांत १७,००० पेक्षा जास्त राज्य उद्घोषक सक्रियपणे सुवार्तेची घोषणा करत होते. पण या प्रचारकांना प्रशिक्षणाची गरज होती. पहिल्या शतकात, देवाच्या नियुक्त राजाने आपल्या शिष्यांना कशाविषयी, कोठे आणि कसा प्रचार करावा याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. (मत्त. १०:५-७; लूक ९:१-६; १०:१-११) त्याच नमुन्याप्रमाणे, आजही येशू राज्य प्रचाराच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सर्वांना आवश्यक प्रशिक्षण आणि साहित्य दिले जाईल याची खात्री करतो, जेणेकरून त्यांना हे कार्य परिणामकारक रीत्या करता येईल. (२ तीम. ३:१७) येशू आज ख्रिस्ती मंडळीद्वारे आपल्या प्रजेला सेवाकार्याकरता प्रशिक्षित करत आहे. हे प्रशिक्षण देण्याचा एक मार्ग म्हणजे ईश्वरशासित सेवा प्रशाला, जी जगभरातील १,११,००० पेक्षा जास्त मंडळ्यांमध्ये चालवली जात आहे. या प्रशिक्षणामुळे आज सत्तर लाखांपेक्षा जास्त प्रचारक या कार्यासाठी तयार झाले आहेत. सर्व प्रकारच्या लोकांना त्यांच्या मनाला भिडेल अशा पद्धतीने सुवार्ता सांगण्यास ते सुसज्ज झाले आहेत.—१ करिंथकर ९:२०-२३ वाचा.
१० ईश्वरशासित सेवा प्रशालेसोबतच इतर अनेक बायबल प्रशाला सुरू करण्यात आल्या आहेत. या प्रशालांद्वारे मंडळीतील वडील, पायनियर, अविवाहित बांधव, ख्रिस्ती जोडपी, शाखा समितीचे सदस्य व त्यांच्या पत्नी, प्रवासी पर्यवेक्षक व त्यांच्या पत्नी तसेच मिशनरी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. * ख्रिस्ती जोडप्यांकरता असलेल्या प्रशालेला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रशालेबद्दल आपली कृतज्ञता पुढील शब्दांत व्यक्त केली: “या खास प्रशिक्षणामुळे यहोवा देवावरील आमचे प्रेम आणखीनच वाढले आहे आणि इतरांना मदत करण्यासंबंधी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन आम्हाला मिळाले आहे.”
११. विरोध होत असूनही येशूच्या अनुयायांना प्रचार करत राहणे कशामुळे शक्य झाले आहे?
११ सबंध जगातील राज्य प्रचाराच्या कार्यासाठी केले जाणारे हे सर्व प्रयत्न देवाचा शत्रू सैतान याच्या नजरेतून सुटलेले नाहीत. हे कार्य थांबवण्यासाठी तो राज्य संदेशावर आणि तो घोषित करणाऱ्यांवर थेटपणे तसेच अप्रत्यक्ष रीत्या हल्ला करतो. पण सैतानाचे कोणतेही प्रयत्न सफल होणार नाहीत. कारण यहोवाने त्याच्या पुत्राला “कोणताही राजा, अधिपती, हुकूमशहा किंवा पुढारी यांच्या स्थानापेक्षा फार फार उंच” असे स्थान दिले आहे. (इफिस. १:२०-२२, सुबोधभाषांतर) आपल्या पित्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून येशू एक राजा या नात्याने आपल्या अधिकाराचा वापर करून आपल्या शिष्यांचे संरक्षण व मार्गदर्शन करत आहे. * म्हणूनच आज सुवार्तेचा प्रचार यशस्वी रीत्या केला जात आहे आणि प्रामाणिक मनाच्या लाखो लोकांना यहोवाच्या मार्गांचे शिक्षण दिले जात आहे. या महान कार्यात सहभाग घेणे हा आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे!
राजा आपल्या प्रजेला अधिक कार्य करण्यासाठी संघटित करतो
१२. राज्याची स्थापना झाल्यापासून देवाच्या लोकांच्या संघटनेत कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या?
१२ सन १९१४ मध्ये राज्य स्थापन झाले तेव्हापासून राजा येशूने देवाच्या सेवकांच्या संघटनेत अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. (यशया ६०:१७ वाचा.) १९१९ साली प्रत्येक मंडळीत प्रचार कार्यात पुढाकार घेण्यासाठी एका सेवा संचालकाला नियुक्त करण्यात आले. १९२७ मध्ये रविवारच्या दिवशी नियमित रीत्या घरोघरचे सेवाकार्य सुरू करण्यात आले. १९३१ साली देवाच्या राज्याला पाठिंबा देणाऱ्यांनी बायबलवर आधारित असलेले ‘यहोवाचे साक्षीदार’ हे नाव स्वीकारल्यानंतर त्यांना अधिकच जोमाने राज्याचा प्रचार करण्याची प्रेरणा मिळाली. (यश. ४३:१०-१२) १९३८ मध्ये मंडळ्यांत जबाबदार पदांवर कार्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने बांधवांना निवडून देण्याऐवजी ईश्वरशासित पद्धतीने त्यांना नियुक्त करण्यास सुरुवात झाली. १९७२ मध्ये मंडळ्यांवर देखरेख करण्यासाठी एकाच पर्यवेक्षकाऐवजी वडील वर्गाला नेमण्यात आले. वडील आणि सेवा सेवक म्हणून कार्य करण्याची पात्रता पूर्ण करणाऱ्या सर्वच बांधवांना “देवाच्या कळपाचे पालन” करण्यात हातभार लावण्याचे प्रोत्साहन देण्यात आले. (१ पेत्र ५:२) १९७६ साली, सबंध जगातील राज्य प्रचाराच्या कार्यावर देखरेख करण्यासाठी नियमन मंडळाला सहा समित्यांमध्ये संघटित करण्यात आले. तेव्हापासून, यहोवाच्या नियुक्त राजाने आपल्या प्रजेला ईश्वरशासित म्हणजेच देवाच्या पद्धतीने कार्य करण्यासाठी क्रमाक्रमाने संघटित केले आहे.
१३. देवाच्या राज्याच्या १०० वर्षांच्या शासनादरम्यान जे काही साध्य करण्यात आले आहे त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे?
१३ खरोखर, मशीही राजाने त्याच्या राज्य शासनाच्या पहिल्या १०० वर्षांत कितीतरी कार्ये साध्य केली आहेत! यहोवाचे नाव धारण करणाऱ्या लोकांना त्याने शुद्ध केले आहे. त्याने २३९ देशांत राज्य प्रचाराच्या कार्याचे मार्गदर्शन केले आहे आणि लाखो लोकांना यहोवाच्या मार्गांचे शिक्षण दिले आहे. त्याने राज्याला पाठिंबा देणाऱ्या सत्तर लाखांपेक्षा जास्त लोकांना एकत्रित केले आहे आणि त्यांपैकी प्रत्येकाने आज स्वेच्छेने यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. (स्तो. ११०:३) खरोखर, मशीही राज्याद्वारे यहोवाने महान व आश्चर्यकारक कार्ये साध्य केली आहेत. आणि भविष्यात तर आणखी रोमहर्षक घटना घडणार आहेत!
मशीही राज्याचे भविष्यातील आशीर्वाद
१४. (क) “तुझे राज्य येवो” अशी प्रार्थना करताना आपण देवाला कोणती विनंती करत असतो? (ख) सन २०१४ या वर्षासाठी आपले वार्षिक वचन काय असेल आणि हे अगदी योग्य का आहे?
१४ यहोवाने १९१४ मध्ये येशू ख्रिस्ताला मशीही राज्याचा राजा बनवले हे जरी खरे असले, तरीही यामुळे “तुझे राज्य येवो” या प्रार्थनेचे पूर्णपणे उत्तर देण्यात आले नाही. (मत्त. ६:१०) बायबलमध्ये असे भाकीत करण्यात आले होते, की येशू आपल्या “वैऱ्यांमध्ये धनीपण” करेल. (स्तो. ११०:२, पं.र.भा.) सैतानाच्या नियंत्रणात असलेली मानवी सरकारे अजूनही राज्याचा विरोध करत आहेत. त्यामुळे, देवाचे राज्य यावे अशी आपण प्रार्थना करतो, तेव्हा खरेतर आपण देवाला अशी विनंती करतो की मशीही राजा व त्याचे सहराजे यांनी मानवी राज्यांचा अंत करून देवाच्या राज्याच्या सर्व विरोधकांना नष्ट करावे. हे घडेल तेव्हाच दानीएल २:४४ यातील शब्द खऱ्या अर्थाने पूर्ण होतील. त्यात असे म्हटले आहे, की देवाचे राज्य “या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करेल.” देवाचे राज्य त्याचा विरोध करणाऱ्या सर्व मानवी सरकारांचे नामोनिशाण मिटवून टाकेल. (प्रकटी. ६:१, २; १३:१-१८; १९:११-२१) असे घडण्याची वेळ खूप जवळ आली आहे. म्हणूनच, २०१४ या वर्षासाठी, जेव्हा देवाचे राज्य स्वर्गात स्थापन होऊन १०० वर्षे पूर्ण होतील, अगदी योग्य असे वार्षिक वचन निवडण्यात आले आहे. मत्तय ६:१० हे ते वचन आहे, ज्यात म्हटले आहे, “तुझे राज्य येवो.”
सन २०१४ चे वार्षिक वचन: “तुझे राज्य येवो.”—मत्तय ६:१०
१५, १६. (क) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान कोणकोणत्या रोमांचक घटना घडणार आहेत? (ख) मशीही राजा या नात्याने ख्रिस्त शेवटी काय करेल, आणि यामुळे यहोवाचा उद्देश कशा प्रकारे पूर्ण होईल?
१५ देवाच्या शत्रूंचा नाश केल्यानंतर, मशीही राजा सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना एक हजार वर्षांसाठी अथांग डोहात टाकून देईल. (प्रकटी. २०:१-३) सैतानाचा दुष्ट प्रभाव नाहीसा झाल्यानंतर देवाचे राज्य येशूच्या खंडणी बलिदानाचे फायदे सर्व मानवजातीला लागू करेल आणि आदामाच्या पापामुळे झालेले दुष्परिणाम समूळ नष्ट करेल. मशीही राजा मरण पावलेल्या कोट्यवधी लोकांना पुन्हा जिवंत करेल; त्या सर्वांना यहोवाविषयी शिकवण्यासाठी जगभरात एक व्यापक शैक्षणिक कार्यक्रम राबवला जाईल. (प्रकटी. २०:१२, १३) सबंध पृथ्वी एदेन बागेसारखी एक नंदनवन बनेल आणि सर्व विश्वासू मानव परिपूर्ण होतील.
१६ ख्रिस्ताचे हजार वर्षांचे राज्य संपेल तेव्हा देवाचा पृथ्वीबद्दल असलेला उद्देश मशीही राज्याद्वारे पूर्ण झालेला असेल. त्यानंतर येशू आपले राज्य पित्याला सोपून देईल. (१ करिंथकर १५:२४-२८ वाचा.) त्यापुढे यहोवा आणि त्याच्या पृथ्वीवरील मुलांमध्ये कोणत्याही मध्यस्थाची गरज उरणार नाही. स्वर्गातील देवाचे सर्व पुत्र व पृथ्वीवरील त्याची सर्व मुले एका विश्वव्यापी कुटुंबात ऐक्याने आपल्या स्वर्गीय पित्याची उपासना करतील.
१७. तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?
१७ राज्य शासनाच्या १०० वर्षांदरम्यान घडलेल्या रोमांचक घटनांवरून आपल्याला याची खात्री पटते की परिस्थिती पूर्णपणे यहोवाच्या नियंत्रणात आहे आणि पृथ्वीबद्दल असलेला त्याचा उद्देश निश्चितच पूर्ण होईल. तर मग, देवाच्या राज्याची एकनिष्ठ प्रजा या नात्याने आपण नेहमी त्याला पाठिंबा देत राहू या आणि राजा व त्याचे राज्य यांची घोषणा करत राहू या. आपल्याला पूर्ण खात्री आहे की “तुझे राज्य येवो” या आपल्या प्रामाणिक प्रार्थनेचे यहोवा लवकरच उत्तर देईल!
^ परि. 3 बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील पृष्ठे ८८-९२ पाहा.
^ परि. 10 टेहळणी बुरूज, १५ सप्टेंबर २०१२, पृष्ठे १३-१७ वरील “विविध ईश्वरशासित प्रशाला—यहोवाच्या प्रेमाचा पुरावा” हा लेख पाहा.
^ परि. 11 वेगवेगळ्या देशांत मिळालेल्या न्यायालयीन विजयांच्या उदाहरणांसाठी टेहळणी बुरूज, १ डिसेंबर १९९८, पृष्ठे १९-२२ वरील लेख पाहा.