व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोकऱ्याच्या लग्नाविषयी आनंद करा!

कोकऱ्याच्या लग्नाविषयी आनंद करा!

“आपण आनंद व उल्लास करू . . . कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे.”—प्रकटी. १९:७.

१, २. (क) कोणाच्या लग्नामुळे स्वर्गात आनंद होईल? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

लग्नसमारंभाची तयारी करण्यासाठी सहसा बराच वेळ लागतो. पण आपण आपले लक्ष एका अतिशय खास लग्नावर केंद्रित करू या. हे लग्न एका राजाचे आहे. जरा कल्पना करा! या लग्नाची तयारी सुमारे २,००० वर्षांपासून सुरू आहे. वधू-वराच्या मिलनाची वेळ अतिशय वेगाने जवळ येत आहे. लवकरच, राजमहाल मधुर संगीताने भरून जाईल आणि स्वर्गातील मोठा समुदाय असे गाईल: “सर्वसमर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्लास करू व त्याचे गौरव करू; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे.”—प्रकटी. १९:६, ७.

ज्या ‘कोकऱ्याच्या’ लग्नामुळे स्वर्गात आनंद होईल तो आणखी कोणी नसून येशू ख्रिस्त आहे. (योहा. १:२९) लग्नासाठी त्याने कशा प्रकारचा पेहराव केला आहे? त्याची वधू कोण आहे? लग्नासाठी वधूला कशा प्रकारे तयार करण्यात आले आहे? हे लग्न केव्हा होणार आहे? या लग्नामुळे स्वर्गात तर आनंद होईलच, पण जे पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा बाळगतात तेही या आनंदात सहभाग घेतील का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण खूप  उत्सुक आहोत. त्यासाठी आपण ४५ व्या स्तोत्राचे पुढे परीक्षण करू या.

त्याच्या वस्त्रांना “सुगंध येत आहे”

३, ४. (क) वराचा लग्नाचा पेहराव कशा प्रकारचा आहे, आणि कशामुळे त्याच्या आनंदात भर पडते? (ख) वराच्या आनंदात सहभागी होणाऱ्या “राजकन्या” आणि “राणी” कोण आहे?

स्तोत्र ४५:८, ९ वाचा. ज्याचे लग्न होणार आहे तो येशू ख्रिस्त लग्नाचा शाही पेहराव करतो. म्हणूनच, त्याच्या वस्त्रांतून गंधरस आणि दालचिनी यांसारख्या उत्तम सुगंधी द्रव्यांचा सुगंध दरवळतो; इस्राएलमध्ये अभिषेक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पवित्र तेलात यांसारख्या सुगंधी द्रव्यांचा वापर केला जायचा.—निर्ग. ३०:२३-२५.

लग्नाची वेळ जवळ येत असल्यामुळे वराला आनंद होतो. राजमहालातील संगीतामुळे वराच्या आनंदात आणखी भर पडते. त्याच्या आनंदात “राणी” म्हणजे देवाच्या संघटनेचा स्वर्गातील भाग सहभागी होतो. यात ‘राजकन्यांचा’ म्हणजे पवित्र देवदूतांचा समावेश आहे. स्वर्गातील या समुदायाला पुढीलप्रमाणे घोषणा करताना ऐकणे किती आनंददायक आहे: “आपण आनंद व उल्लास करू . . . कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे.”

लग्नासाठी वधूला तयार केले जाते

५. “कोकऱ्याची स्त्री” कोण आहे?

स्तोत्र ४५:१०, ११ वाचा. लग्नाचा वर कोण आहे हे आपल्याला माहीत झाले आहे, पण वधू कोण आहे? ज्या मंडळीचे मस्तक येशू ख्रिस्त आहे त्याच्या सदस्यांनी मिळून ही वधू बनलेली आहे. (इफिसकर ५:२३, २४ वाचा.) या मंडळीचे सदस्य ख्रिस्ताच्या मशीही राज्याचा भाग बनतील. (लूक १२:३२) आत्म्याने अभिषिक्त असलेल्या या सदस्यांची संख्या १,४४,००० असून ते “जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे” जातात. (प्रकटी. १४:१-४) ते “कोकऱ्याची स्त्री” बनतात आणि त्याच्यासोबत त्याच्या स्वर्गातील निवासस्थानात राहतात.—प्रकटी. २१:९; योहा. १४:२, ३.

६. अभिषिक्तांना “राजकन्या” असे का म्हटले आहे, आणि त्यांना आपल्या लोकांना विसर असे का सांगण्यात आले आहे?

भावी वधूला केवळ “अगे कन्ये” असे म्हणूनच नव्हे, तर “राजकन्या” असे म्हणूनदेखील संबोधण्यात आले आहे. (स्तो. ४५:१३) ती कोणत्या राजाची कन्या आहे? अभिषिक्त ख्रिश्चनांना यहोवाची “मुले” म्हणून दत्तक घेण्यात आले आहे. (रोम. ८:१५-१७) अभिषिक्त जन स्वर्गातील वराची वधू होणार असल्यामुळे, त्यांना “आपले लोक व आपल्या [पृथ्वीवरील] बापाचे घर ही विसर” असे सांगण्यात आले आहे. त्यांनी आपले मन “वरील गोष्टींकडे” लावायचे आहे, “पृथ्वीवरील गोष्टींकडे” नव्हे.—कलस्सै. ३:१-४.

७. (क) ख्रिस्त कशा प्रकारे आपल्या भावी वधूला तयार करत आहे? (ख) आपल्या भावी पतीबद्दल वधूची कोणती मनोवृत्ती आहे?

स्वर्गातील लग्नासाठी ख्रिस्त अनेक शतकांपासून आपल्या भावी वधूला तयार करत आहे. प्रेषित पौलाने स्पष्ट केले, की “ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, अगर सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.” (इफिस. ५:२५-२७) पौलाने प्राचीन करिंथमधील अभिषिक्त ख्रिश्चनांना असे सांगितले: “तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे; मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.” (२ करिंथ. ११:२) राजा आणि वर असलेला येशू ख्रिस्त त्याच्या भावी वधूच्या आध्यात्मिक ‘सौंदर्याची’ कदर करतो. आणि वधूदेखील त्याला “पती” मानते आणि आपल्या भावी पतीच्या अधीन होते.

वधूला राजाकडे आणले जाते

८. वधूचे वर्णन करताना ती “अगदी ऐश्वर्यमंडित” आहे असे म्हणणे योग्य का आहे?

स्तोत्र ४५:१३, १४क वाचा. स्वर्गातील लग्नासाठी वधूला “अगदी ऐश्वर्यमंडित” असे सादर केले  जाते. प्रकटीकरण २१:२ मध्ये वधूची तुलना नवी जेरूसलेम या नगरीशी करण्यात आली आहे, जी “नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे” आहे. या स्वर्गीय नगरीला “देवाचे तेज” असून तिची “कांती अती मोलवान रत्नासारखी” आणि “स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी” आहे. (प्रकटी. २१:१०, ११) नव्या जेरूसलेमच्या ऐश्वर्याचे प्रकटीकरणाच्या पुस्तकात सुंदर वर्णन करण्यात आले आहे. (प्रकटी. २१:१८-२१) म्हणूनच, स्तोत्रकर्ता वधूबद्दल बोलताना ती “अगदी ऐश्वर्यमंडित” आहे असे म्हणतो, कारण राजाचे लग्न हे स्वर्गात होत आहे.

९. वधूला ज्याच्याकडे आणले जाते तो कोण आहे, आणि वधूने कशा प्रकारचा पेहराव केला आहे?

वधूला ज्या वराकडे आणले जाते तो वर आहे मशीही राजा. तो मागील अनेक शतकांपासून वधूला “वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ” करून लग्नासाठी तयार करत आहे. “ती पवित्र व निर्दोष” आहे. (इफिस. ५:२६, २७) त्याच्या वधूनेदेखील लग्नसमारंभासाठी उचित असा पेहराव केला पाहिजे. आणि खरोखर तिने तसाच केला आहे! “तिची वस्त्रे भरजरी आहेत” आणि “तिला कशिद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील.” कोकऱ्याच्या लग्नासाठी “तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे; ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.”—प्रकटी. १९:८.

“कोकऱ्याचे लग्न निघाले आहे”

१०. कोकऱ्याचे लग्न केव्हा होणार आहे?

१० प्रकटीकरण १९:७ वाचा. कोकऱ्याचे लग्न केव्हा होणार आहे? जरी कोकऱ्याच्या “नवरीने स्वतःला सजवले” असले, तरीही प्रकटीकरणाच्या अहवालात लग्नसमारंभाचे वर्णन करण्यात आलेले नाही. त्याऐवजी, त्यात मोठ्या संकटाच्या शेवटल्या टप्प्याचे वर्णन करण्यात आले आहे. (प्रकटी. १९:११-२१) तर मग, याचा अर्थ असा होतो का, की राजाने अंतिम विजय मिळवण्याआधीच त्याचे लग्न होते? नाही. प्रकटीकरण पुस्तकात वर्णन करण्यात आलेले दृष्टान्त क्रमवारपणे मांडण्यात आलेले नाहीत. पण, ४५ व्या स्तोत्रात, राजा येशू ख्रिस्त आधी आपली तरवार कंबरेला बांधून शत्रूंवर विजय मिळवतो, आणि मग त्याचे लग्न होते.—स्तो. ४५:३, ४.

११. ख्रिस्ताने अंतिम विजय मिळवण्याआधी कोणत्या घटना घडतील?

११ तर मग, आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की घटना पुढील क्रमाने घडतील: सर्वात आधी, “मोठ्या कलावंतिणीचा” म्हणजे खोट्या धर्माचे साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलचा नाश केला जाईल. (प्रकटी. १७:१, ५, १६, १७; १९:१, २) त्यानंतर, ख्रिस्त सैतानाच्या पृथ्वीवरील व्यवस्थेविरुद्ध न्यायदंड बजावेल आणि हर्मगिदोनात, म्हणजेच “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या” लढाईत या व्यवस्थेचा नाश करेल. (प्रकटी. १६:१४-१६; १९:१९-२१) शेवटी, योद्धा असलेला राजा ख्रिस्त सैतानाला आणि त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहात टाकून त्यांना पूर्णपणे निष्क्रिय करण्याद्वारे अंतिम विजय मिळवेल.—प्रकटी. २०:१-३.

१२, १३. (क) कोकऱ्याचे लग्न केव्हा होईल? (ख) कोकऱ्याच्या लग्नामुळे स्वर्गात कोणाला आनंद होईल?

१२ ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान जसजसे अभिषिक्त ख्रिस्ती त्यांचे पृथ्वीवरील जीवनक्रम संपवतात तसतसे त्यांना स्वर्गातील जीवनासाठी पुनरुत्थित केले जाते. मोठ्या बाबेलचा नाश केल्यानंतर, येशू वधू वर्गाच्या उरलेल्या सदस्यांना आपल्याजवळ एकत्र करेल. (१ थेस्सलनी. ४:१६, १७) त्यामुळे, हर्मगिदोनाचे युद्ध सुरू होण्याआधी वधू वर्गाचे सर्व सदस्य स्वर्गात असतील. त्या युद्धानंतर, कोकऱ्याचे लग्न होईल. या लग्नाचा प्रसंग किती आनंदाचा असेल! प्रकटीकरण १९:९ मध्ये असे म्हटले आहे: “कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” खरोखर, वधू वर्गाच्या १,४४,००० सदस्यांना नक्कीच आनंद होईल. आणि येशूसोबत राज्य करणारे हे सर्व सहराजे त्याच्या राज्यात लाक्षणिक अर्थाने त्याच्यासोबत त्याच्या मेजावर खातील व पितील तेव्हा स्वतः येशूलाही अत्यानंद होईल. (लूक २२:१८, २८-३०) पण, कोकऱ्याच्या लग्नाचा आनंद केवळ वधू-वरालाच होईल असे नाही.

 १३ आपण याआधी पाहिल्याप्रमाणे, स्वर्गातील समुदाय एकसुरात असे गातो: “आपण आनंद व उल्लास करू व त्याचे [“यहोवाचे,” NW] गौरव करू; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे.” (प्रकटी. १९:६, ७) पण, यहोवाच्या पृथ्वीवरील सेवकांबद्दल काय? तेदेखील या आनंदात सहभागी होतील का?

“आनंदाने . . . त्यांस मिरवतील”

१४. स्तोत्र ४५ मध्ये वधूच्या ज्या कुमारी सख्यांचा उल्लेख करण्यात आला आहे त्या कोण आहेत?

१४ स्तोत्र ४५:१२, १४ख, १५ वाचा. जखऱ्या संदेष्ट्याने पूर्वभाकीत केले होते, की शेवटल्या काळात सर्व राष्ट्रांतील लोक कृतज्ञ मनोवृत्तीने आत्मिक इस्राएलच्या शेषजनांसोबत सहवास करतील. जखऱ्याने असे लिहिले: “त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जख. ८:२३) स्तोत्र ४५:१२ मध्ये या लाक्षणिक ‘दहा जणांना’ “सोराची कन्या” आणि “धनवान लोक” असे म्हटले आहे. ते अभिषिक्त शेषजनांची कृपापसंती आणि आध्यात्मिक मदत मिळवण्यासाठी त्यांच्याकडे भेटवस्तू घेऊन येतात. सन १९३५ पासून लाखो लोक अभिषिक्त शेषजनांची मदत स्वीकारून “धार्मिकतेकडे” वळले आहेत. (दानी. १२:३) अभिषिक्त ख्रिश्चनांच्या या एकनिष्ठ साथीदारांनी सर्व अशुद्धतांपासून स्वतःला मुक्त केले आहे आणि अशा प्रकारे ते आध्यात्मिक अर्थाने ‘कुमारी’ बनले आहेत. वधूच्या या ‘सख्यांनी’ यहोवाला आपले जीवन समर्पित केले आहे आणि राजा येशू ख्रिस्ताची विश्वासू प्रजा असल्याचे सिद्ध केले आहे.

१५. पृथ्वीवर असलेल्या वधू वर्गाच्या शेषजनांसोबत मिळून कुमारी सख्या कोणते कार्य करत आहेत?

१५ वधूच्या कुमारी “सख्या” सर्व जगात राज्याच्या  सुवार्तेच्या प्रचाराला आवेशाने हातभार लावतात, त्यामुळे वधू वर्गाचे शेषजन त्यांचे आभारी आहेत. (मत्त. २४:१४) केवळ “आत्मा व वधू” हेच लोकांना जीवनाचे पाणी फुकट घेण्याचे आमंत्रण देत नाहीत, तर ऐकणारेसुद्धा इतरांना हे आमंत्रण देण्यात सहभागी होतात. (प्रकटी. २२:१७) खरेच, वधू वर्गाच्या अभिषिक्त जनांनी दिलेले हे आमंत्रण ‘दुसऱ्या मेंढरांनी’ ऐकले आहे आणि तेसुद्धा वधू वर्गासोबत सबंध पृथ्वीच्या रहिवाशांना हे आमंत्रण देण्यात सहभागी होत आहेत.—योहा. १०:१६.

१६. यहोवाने दुसऱ्या मेंढरांना कोणता सुहक्क दिला आहे?

१६ अभिषिक्त शेषजनांचे आपल्या साथीदारांवर, म्हणजे दुसऱ्या मेंढरांवर प्रेम आहे. त्यांना हे जाणून आनंद होतो, की वराच्या पित्याने म्हणजे यहोवाने पृथ्वीवरील या त्यांच्या साथीदारांना स्वर्गात होणाऱ्या कोकऱ्याच्या लग्नाच्या आनंदात सहभागी होण्याचा सुहक्क दिला आहे. वधूच्या या ‘सख्यांना’ “आनंदाने व उत्साहाने” राजाकडे आणले जाईल असे भाकीत करण्यात आले होते. त्याअर्थी, कोकऱ्याचे लग्न स्वर्गात होईल तेव्हा स्वर्गात तर आनंद होईलच, शिवाय पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा बाळगणाऱ्या दुसऱ्या मेंढरांनादेखील आनंद होईल. म्हणूनच, प्रकटीकरणाच्या पुस्तकात अगदी उचितपणे म्हटले आहे, की “मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा” आहे. मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील अंगणात त्याची पवित्र सेवा करतात.—प्रकटी. ७:९, १५.

कोकऱ्याच्या लग्नामुळे वधूच्या ‘सख्यांना’ अत्यानंद होतो (परिच्छेद १६ पाहा)

“तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील”

१७, १८. कोकऱ्याच्या लग्नामुळे कशा प्रकारे नवीन जगातील लोकांना आशीर्वाद मिळतील? त्याच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान ख्रिस्त कोणाचा पिता बनेल?

१७ स्तोत्र ४५:१६ वाचा. कोकऱ्याच्या लग्नामुळे नवीन जगातील लोकांना आशीर्वाद मिळत आहेत हे पाहून ख्रिस्ताच्या स्वर्गीय वधूच्या ‘सख्यांना’ आणखी आनंद होईल. ख्रिस्त आपले लक्ष पृथ्वीकडे वळवून पृथ्वीवरील त्याच्या ‘वडिलांना’ पुन्हा जिवंत करेल, जे त्याची पृथ्वीवरील “मुले” बनतील. (योहा. ५:२५-२९; इब्री ११:३५) यांच्यापैकी काहींना तो “सर्व पृथ्वीवर . . . अधिपती” करेल. तसेच, आजच्या विश्वासू वडिलांपैकीही काहींना ख्रिस्त नवीन जगात पुढाकार घेण्यासाठी नेमेल.—यश. ३२:१.

१८ ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान तो इतरांचाही पिता बनेल. खरेतर, पृथ्वीवर ज्यांना सार्वकालिक जीवन मिळेल, त्या सर्वांना येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळेच ते मिळेल. (योहा. ३:१६) अशा प्रकारे, ख्रिस्त त्यांचा “सर्वकालचा पिता” बनेल.—यश. ९:६, ७, NW.

त्याच्या नावाबद्दल इतरांना सांगण्याची प्रेरणा

१९, २०. स्तोत्र ४५ मध्ये उल्लेख केलेल्या रोमांचक घटनांचा सर्व खऱ्या ख्रिश्चनांवर कसा प्रभाव पडतो?

१९ स्तोत्र ४५:१, १७ वाचा. ४५ व्या स्तोत्रात सांगितलेल्या घटनांचा सर्व खऱ्या ख्रिश्चनांवर प्रभाव पडतो. अभिषिक्त जन लवकरच स्वर्गात आपल्या बांधवांसोबत आणि ख्रिस्तासोबत एकत्र होतील या आशेमुळे त्यांना अत्यानंद होतो. दुसऱ्या मेंढरांना आपल्या वैभवशाली राजाच्या अधीन होण्याची प्रेरणा मिळते आणि वधू वर्गाच्या पृथ्वीवरील शेषजनांसोबत सहवास करण्याचा सुहक्क मिळाल्याबद्दल ते आभारी आहेत. कोकऱ्याच्या लग्नानंतर, ख्रिस्त आणि त्याचे सहराजे पृथ्वीवरील रहिवाशांवर असंख्य आशीर्वादांचा वर्षाव करतील.—प्रकटी. ७:१७; २१:१-४.

२० मशीही राजाशी संबंधित ज्या “चांगल्या विचारांची” आपण आतापर्यंत चर्चा केली त्यांची पूर्णता होण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. यामुळे आपल्याला त्याच्या नावाबद्दल इतरांना सांगण्याची प्रेरणा मिळत नाही का? तेव्हा, त्याचे “उपकारस्मरण” करणाऱ्यांसोबत आपणदेखील त्याची स्तुती “युगानुयुग” करत राहू या.