व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यहोवाची सुंदरता” पाहत राहणे

“यहोवाची सुंदरता” पाहत राहणे

जीवनात येणाऱ्या दुःखदायक समस्यांचा आपल्यावर खूप जबरदस्त प्रभाव पडू शकतो. त्या समस्यांमुळे दुसऱ्या कशातच आपले लक्ष लागत नाही, आपण खचून जातो आणि जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावरही या समस्यांचा प्रभाव पडतो. प्राचीन इस्राएलाच्या दावीद राजावरही अनेक कठीण प्रसंग आले आणि त्यांचा त्याच्यावर खूप भयंकर परिणाम झाला. त्याने या परिस्थितीचा सामना कसा केला? त्याच्या एका हृदयस्पर्शी स्तोत्रात याचे उत्तर आपल्याला मिळते. दाविदाने लिहिले: “मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो; आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करतो. मी त्याच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडतो; मी आपले संकट त्याला सांगतो. माझ्या ठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे; तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे.” अशा रीतीने, खडतर प्रसंगांना तोंड देताना दाविदाने नम्रपणे यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली.—स्तो. १४२:१-३.

कठीण परिस्थितीत दाविदाने यहोवाकडे नम्रतेने मदतीची याचना केली

आणखी एका स्तोत्रात दाविदाने असे म्हटले: “यहोवाजवळ मी एक गोष्ट मागितली आहे, तीच मी शोधीन: यहोवाची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास [“कृतज्ञतेने मनन करण्यास,” NW] मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस यहोवाच्या घरात वस्ती करावी.” (स्तो. २७:४) दावीद लेवी नसला तरी खऱ्या उपासनेचे केंद्रस्थान असलेल्या मंदिराच्या पवित्र अंगणाच्या बाहेर तो उभा असल्याची आपण कल्पना करू शकतो. दाविदाचे मन कृतज्ञतेने इतके भरून जाते की त्याला त्याचे पुढचे आयुष्य देवाच्या मंदिरातच त्याची “सुंदरता” पाहत घालवायचे आहे.

“सुंदरता” असे भाषांतर केलेला मूळ इब्री शब्द “मनाला आनंद देणाऱ्या किंवा सुखद भावना निर्माण करणाऱ्या गुणाला सूचित करतो.” प्राचीन काळात उपासना करण्यासाठी देवाने जी व्यवस्था केली होती त्यासाठी दावीद नेहमी कृतज्ञ होता. आपणही स्वतःला विचारले पाहिजे, ‘माझ्याही भावना दाविदाप्रमाणे आहेत का?’

देवाच्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञ असा

आपल्या काळात मंदिरासारखे कोणतेही विशिष्ट ठिकाण आपल्या उपासनेचे मुख्य केंद्र नाही. कारण यहोवाने महान आध्यात्मिक मंदिराची म्हणजेच त्याची खरी उपासना करण्याची व्यवस्था केली आहे. * आपण जर त्याच्या या व्यवस्थेबद्दल कृतज्ञ असलो तर आपल्यालाही त्याची “सुंदरता” पाहता येईल.

निवासमंडपाच्या दाराशी असलेल्या होमार्पणाच्या पितळेच्या वेदीचा विचार करा. (निर्ग. ३८:१, २; ४०:६) ती वेदी कशास सूचित करत होती? येशू मानव या नात्याने त्याच्या जीवनाचे जे बलिदान देणार होता त्याचा देव स्वीकार करण्यास तयार असेल या गोष्टीला ती वेदी सूचित करत होती. (इब्री १०:५-१०) याचा आपल्याकरता काय अर्थ होतो याचा विचार करा. प्रेषित पौलाने लिहिले: “आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला.” (रोम. ५:१०) येशूच्या बलिदानावर जर आपण विश्वास ठेवला तर देवाचे मित्र या नात्याने आपण त्याची कृपापसंती व भरवसा मिळवू शकतो. आणि यामुळे त्याच्यासोबतची आपली मैत्री आणखी घनिष्ठ होईल.—स्तो. २५:१४.

आपली “पापे पुसून टाकली” जातात आणि त्यामुळे आपण यहोवापासून “विश्रांतीचे समय” अनुभवू शकतो. (प्रे. कृत्ये ३:१९) आपली तुलना अशा एका कैद्याशी करता येईल ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पण, आपल्या शिक्षेची वाट पाहत असताना त्या कैद्याला त्याने केलेल्या अपराधांबद्दल पस्तावा होतो आणि तो स्वतःत खूप सुधारणा करतो. ही गोष्ट जेव्हा एका दयाळू न्यायाधीशाच्या लक्षात येते तेव्हा तो त्या कैद्याचे पूर्वीचे गुन्हे माफ करतो आणि त्याच्यावर ठोठावण्यात आलेल्या मृत्यूदंडापासून त्याला मुक्त करतो. हे जाणून त्या कैद्याला किती दिलासा मिळाला असेल आणि किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. त्या न्यायाधीशाप्रमाणे आज यहोवा देवदेखील पश्‍चात्ताप करणाऱ्या मानवांवर दया करतो आणि त्यांना मृत्यूच्या दंडातून मुक्त करतो.

खऱ्या उपासनेत आनंद मिळवा

यहोवाच्या मंदिरात होणाऱ्या खऱ्या उपासनेच्या अनेक पद्धतींपैकी पुढील काही गोष्टी दाविदाने पाहिल्या असतील: इस्राएली बांधवांच्या जमावाचे एकत्र येणे, नियमशास्त्राचे मोठ्याने वाचन करणे व त्याचा अर्थ समजावून सांगणे, धूप जाळणे आणि याजक  व लेवी यांद्वारे पवित्र सेवा करण्यात येणे. (निर्ग. ३०:३४-३८; गण. ३:५-८; अनु. ३१:९-१२) खऱ्या उपासनेच्या त्या पद्धती आज आपल्या काळात करण्यात येत असलेल्या उपासनेसारख्या आहेत.

गतकाळाप्रमाणे आज आपल्या काळातही, “बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” (स्तो. १३३:१) आज जगभरातील आपल्या बांधवांत प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे. (१ पेत्र २:१७) आपल्या मंडळीच्या सभांमध्ये देवाच्या वचनाचे वाचन केले जाते व त्याचा अर्थ समजावून सांगितला जातो. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक अभ्यासासाठी मुबलक प्रमाणात, छापील स्वरूपात आध्यात्मिक अन्न उपलब्ध आहे. नियमन मंडळाच्या एका सदस्याचे असे म्हणणे आहे: “यहोवाच्या वचनावर मनन केल्यामुळे, आणि त्यात रुजलेला खोलवर अर्थ व समज जाणण्याचा कसोशीने प्रयत्न केल्यामुळे मी प्रत्येक दिवशी आध्यात्मिक अर्थाने धनवान बनत जातो व मला खरे समाधान लाभते.” खरोखर, ज्ञान आपल्या जिवाला खरा आनंद देऊ शकते.—नीति. २:१०.

आपल्या काळात देवाचे सेवक दररोज स्वीकारयोग्य पद्धतीने त्याला प्रार्थना करतात. यहोवाच्या दृष्टीत या प्रार्थना सुवासिक धुपाप्रमाणे आहेत. (स्तो. १४१:२) आपण जेव्हा यहोवा देवाला प्रार्थना करतो तेव्हा तो त्या आनंदाने स्वीकारतो, या जाणिवेमुळे आपल्याला किती आनंद होतो!

मोशेने अशी प्रार्थना केली: “परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो; आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने.” (स्तो. ९०:१७) आपण आवेशाने प्रचारकार्य करतो तेव्हा यहोवा आपल्या कामावर आशीर्वाद देतो. (नीति. १०:२२) आपण कदाचित कोणाला सत्य शिकून घेण्यास मदत केली असेल. किंवा मग आपण लोकांच्या थंड प्रतिसादाचा, स्वतःच्या खराब आरोग्याचा, मानसिक तणावाचा किंवा विरोधाचा सामना करूनही सेवेत टिकून राहिलो असू. (१ थेस्सलनी. २:२) असे असले तरीही आपण यहोवाची “सुंदरता” पाहिलेली नाही का? आणि आपल्याला याची खात्री नाही का की आपल्या प्रयत्नांना पाहून आपल्या स्वर्गीय पित्याला नक्कीच आनंद होत असेल?

दाविदाने असे म्हटले: “परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे; माझा वाटा संभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत.” (स्तो. १६:५, ६) दाविदाला जो “वाटा” मिळाला होता त्यासाठी तो कृतज्ञ होता. हा वाटा म्हणजेच यहोवासोबतचा त्याचा स्वीकारयोग्य नातेसंबंध व त्याची सेवा करण्याचा बहुमान. दाविदाप्रमाणे आज आपल्यावरही अनेक समस्या येऊ शकतात. पण, आपल्यावर कितीतरी आध्यात्मिक आशीर्वादांचा वर्षाव होत आहे! तर मग आपण नेहमी खऱ्या उपासनेत आनंद मिळवू या आणि यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराबद्दल कृतज्ञ असू या.

^ परि. 6 टेहळणी बुरूज, १ जुलै १९९६ या अंकातील पृष्ठे १४-२४ पाहा.