व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा—आपल्या गरजा पुरवणारा व आपले संरक्षण करणारा

यहोवा—आपल्या गरजा पुरवणारा व आपले संरक्षण करणारा

“माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करेन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेन.”—स्तो. ९१:१४.

१, २. कौटुंबिक व आध्यात्मिकदृष्ट्या आपल्या सर्वांची परिस्थिती कशा प्रकारे वेगवेगळी आहे?

कौटुंबिक व्यवस्थेची सुरुवात यहोवा देवाने केली आहे. (इफिस. ३:१४, १५) त्याअर्थी, आपण खरेतर एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत. पण असे असले, तरीसुद्धा आपल्या सर्वांचे गुण व परिस्थिती वेगवेगळी आहे. कदाचित तुम्ही जन्मापासून प्रौढ होईपर्यंत आपल्या आईवडिलांसोबत राहिला असाल. काही जणांनी कदाचित आजारामुळे, एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा इतर दुःखद घटनेमुळे आपल्या आईवडिलांना गमावले असेल. तर असेही काही जण आहेत ज्यांना त्यांचे आईवडील कोण आहेत हेदेखील माहीत नाही.

यहोवाचे सेवक या नात्याने आपण एका जागतिक कुटुंबाचे सदस्य असलो, तरीही, आध्यात्मिकदृष्ट्या आपली परिस्थिती एकमेकांपेक्षा वेगळी आहे. कदाचित तुम्ही लहानपणापासूनच सत्यात असाल आणि तुमच्या आईवडिलांनी सुरुवातीपासूनच तुम्हाला यहोवाच्या मार्गांविषयी शिक्षण दिले असेल. (अनु. ६:६, ७) किंवा, तुम्ही त्या हजारो लोकांपैकी असाल ज्यांना यहोवाच्या इतर सेवकांच्या प्रचार कार्यामुळे सत्याविषयी शिकून घेण्याची संधी मिळाली.—रोम. १०:१३-१५; १ तीम. २:३, ४.

३. आपल्या सर्वांमध्ये कोणत्या गोष्टी सारख्याच आहेत?

 पण वर सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांची परिस्थिती वेगवेगळी असली, तरीसुद्धा काही गोष्टी मात्र आपल्या सर्वांच्या बाबतीत सारख्याच आहेत. आपल्या सर्वांनाच आदामाच्या पापामुळे झालेले दुष्परिणाम भोगावे लागतात. त्याच्याकडून आपल्या सर्वांनाच अपरिपूर्णता, पाप व मृत्यूचा वारसा मिळाला आहे. (रोम. ५:१२) पण, असे असूनही यहोवाची खरी उपासना करणारे या नात्याने आपण त्याला आपला “पिता” म्हणू शकतो. प्राचीन काळातील देवाच्या निवडलेल्या लोकांविषयी यशया ६४:८ यात असे म्हटले आहे: “हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस.” शिवाय, येशूने त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेच्या सुरुवातीला त्याने असे म्हटले: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.”—मत्त. ६:९.

४, ५. आपला स्वर्गातील पिता यहोवा याच्याबद्दल आपली कदर वाढवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींवर विचार करणार आहोत?

आपला स्वर्गातील पिता, विश्वासूपणे उपासना करणाऱ्या त्याच्या सेवकांची काळजी घेतो आणि त्यांचे संरक्षण करतो. एका स्तोत्राच्या लेखकानुसार यहोवा असे म्हणतो: “माझ्यावर त्याचे [एका प्रामाणिक सेवकाचे] प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करेन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेन.” (स्तो. ९१:१४) आपण यहोवाचे लोक असल्यामुळे तो आपल्या शत्रूंपासून आपले प्रेमळपणे संरक्षण करतो आणि समूह या नात्याने आपला नाश होऊ नये म्हणून तो आपला सांभाळ करतो.

आपल्या स्वर्गातील पित्याबद्दल आपली कदर वाढवण्यासाठी आता आपण तीन महत्त्वाच्या गोष्टींवर विचार करू या: (१) आपला पिता आपल्या गरजा पुरवतो. (२) यहोवा आपले संरक्षण करतो. आणि (३) तो आपला सर्वात चांगला मित्र आहे. या तीन गोष्टींवर चर्चा करत असताना, आपण यहोवासोबतच्या आपल्या वैयक्तिक मैत्रीबद्दल; आणि आपला पिता या नात्याने आपल्याला कशा प्रकारे त्याचे गौरव करता येईल याबद्दल लक्षपूर्वक विचार करू या. तसेच, जे यहोवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो कोणते आशीर्वाद देतो याबद्दलही आपण चर्चा करू या.—याको. ४:८.

यहोवा, आपल्या गरजा पुरवणारा

६. कोणत्या एका मार्गाने यहोवा “प्रत्येक उत्तम देणगी” देणारा आहे?

शिष्य याकोबाने लिहिले: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे . . . ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.” (याको. १:१७) जीवन हीच यहोवाकडील एक अद्भुत देणगी आहे. (स्तो. ३६:९) जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतो तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात. आणि त्यासोबतच भविष्यातील नव्या जगात सार्वकालिक जीवनाची आशादेखील आपल्याला प्राप्त होते. (नीति. १०:२२; २ पेत्र ३:१३) पण आज आपण आदामाच्या पापाचे दुष्परिणाम भोगत असताना हे कसे काय शक्य आहे?

७. आपल्याला देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडता यावा म्हणून त्याने काय केले?

यहोवा असंख्य मार्गांनी आपल्या गरजा पुरवतो. उदाहरणार्थ, आपण त्याच्या दयेस पात्र नसताना त्याने आपल्यावर अगाध कृपा केली आहे. हे खरे आहे, की आपण सर्व जण पापी आहोत आणि पृथ्वीवरील आपला पहिला पिता आदाम याच्याकडून आपल्या सर्वांना अपरिपूर्णता वारशाने मिळाली आहे. (रोम. ३:२३) तरीसुद्धा, यहोवाचे आपल्यावर नितान्त प्रेम असल्यामुळे, त्याने स्वतः पुढाकार घेऊन आपल्याला त्याच्यासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडणे शक्य व्हावे म्हणून मार्ग मोकळा केला आहे. प्रेषित योहानाने लिहिले: “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की, त्याच्या द्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली. प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले.”—१ योहा. ४:९, १०.

८, ९. अब्राहाम व इसहाकाच्या काळात यहोवा कशा प्रकारे आपल्या लोकांची गरज पुरवणारा ठरला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

इ.स.पू. १९ व्या शतकात अब्राहामाच्या जीवनात घडलेल्या एका घटनेवरून हे दिसून आले की भविष्यात कशा प्रकारे यहोवा सर्व आज्ञाधारक मानवांना प्रेमळपणे सार्वकालिक जीवन देईल. इब्री लोकांस ११:१७-१९ यात सांगितले आहे: “अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले; ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करत होता; त्याला असे सांगितले होते की, ‘इसहाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील;’ तेव्हा मेलेल्यांतून देखील उठवावयास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.” ज्याप्रमाणे अब्राहाम आपल्या पुत्राचे, इसहाकाचे बलिदान देण्यास तयार होता त्याचप्रमाणे यहोवाने मानवजातीच्या तारणाकरता आनंदाने आपल्या पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे बलिदान दिले.—योहान ३:१६, ३६ वाचा.

 पण अब्राहाम इसहाकाचे बलिदान देणार इतक्यात यहोवाने त्याला रोखले. आपल्याला मरावे लागणार नाही याची जाणीव झाल्यावर इसहाकाला किती आनंद झाला असेल! इसहाकाऐवजी बलिदान करण्यासाठी यहोवाने एका यज्ञपशूची तरतूद केली. त्याने अब्राहामाला जवळच्याच एका झुडपात अडकलेला एडका अर्पण करण्यास सांगितले. (उत्प. २२:१०-१३) म्हणूनच त्या ठिकाणाला “याव्हे-यिरे” असे नाव पडले ज्याचा अर्थ, “परमेश्वर पाहून देईल” किंवा ‘यहोवा पुरवेल’ म्हणजेच तरतूद करेल असा होतो.—उत्प. २२:१४.

समेट करण्यासाठी तरतूद

१०, ११. “समेटाची सेवा” करण्यात कोणी पुढाकार घेतला आहे आणि त्यांनी हे कसे केले आहे?

१० यहोवा कशा प्रकारे आपल्या लोकांच्या गरजा पुरवतो याविषयी मनन करताना, आपण येशू ख्रिस्ताच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दलही मनापासून कृतज्ञता बाळगतो. याच कृतज्ञतेच्या भावनेने प्रेषित पौलाने असे लिहिले: “आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले; आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे.”—२ करिंथ. ५:१४, १५.

११ देवावर असलेल्या प्रेमामुळे आणि त्याची सेवा करण्याच्या अतुलनीय सुहक्काबद्दल कृतज्ञता असल्यामुळे सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी “समेटाची सेवा” आनंदाने स्वीकारली. ही सेवा म्हणजे त्यांचे प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य होते. या कार्याद्वारे प्रामाणिक मनाच्या लोकांना देवासोबत शांतीचा संबंध जोडण्याची, त्याचे मित्र बनण्याची आणि भविष्यात आध्यात्मिक अर्थाने त्याची मुले बनण्याची संधी प्राप्त झाली. आज यहोवाचे अभिषिक्त सेवक हीच सेवा करत आहेत. ते देवाच्या व ख्रिस्ताच्या वतीने वकील म्हणून कार्य करत आहेत. त्यांच्या प्रचार कार्यामुळे प्रामाणिक व नम्र मनाच्या लोकांना यहोवाकडे येणे व त्याचे सेवक बनणे शक्य होते.—२ करिंथकर ५:१८-२० वाचा; योहा. ६:४४; प्रे. कृत्ये १३:४८.

१२, १३. यहोवाने पुरवलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१२ यहोवा आपल्या गरजा पुरवणारा आहे याबद्दल कृतज्ञता बाळगून पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले सर्व ख्रिस्ती, अभिषिक्त जनांसोबत राज्य प्रचाराच्या कार्यात सहभागी होतात. या कार्यात आपण बायबलचा वापर करतो, जी देवाने पुरवलेली आणखी एक अतुलनीय देणगी आहे. (२ तीम. ३:१६, १७) सेवाकार्यात देवाच्या या प्रेरित वचनाचा निपुणतेने वापर करण्याद्वारे आपण इतरांना सार्वकालिक जीवन मिळवण्याची संधी देतो. हे कार्य करत असताना आपल्यापैकी प्रत्येकाला यहोवाच्या आणखी एका तरतुदीपासून साहाय्य मिळते. ती तरतूद म्हणजे यहोवा आपल्याला पुरवत असलेला त्याचा पवित्र आत्मा. (जख. ४:६; लूक ११:१३) पवित्र आत्म्यावर विसंबून राहिल्यामुळेच आपल्या प्रचार कार्यात आपल्याला अतिशय उल्लेखनीय परिणाम दिसून येतात. याचा पुरावा, आपल्याला दरवर्षी आपली राज्य सेवा यात प्रकाशित होणाऱ्या ‘यहोवाच्या साक्षीदारांचा जगव्याप्त सेवा वर्ष अहवाल’ यात पाहायला मिळतो. खरोखर, या कार्यात सहभागी होऊन आपल्या पित्याची व आपल्या गरजा पुरवणाऱ्या यहोवा देवाची स्तुती करणे ही आपल्यासाठी किती सन्मानाची गोष्ट आहे!

१३ यहोवाने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी पुरवल्या आहेत. तेव्हा आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारले पाहिजेत: ‘यहोवाने पुरवलेल्या सर्व गोष्टींबद्दल मी मनापासून आभारी आहे हे दाखवण्यासाठी मी प्रचार कार्यात पुरेपूर सहभाग घेत आहे का? मला कोणत्या सुधारणा करता येतील व सुवार्तेचा जास्त परिणामकारक प्रचारक कसे बनता येईल?’ देवाच्या राज्याशी संबंधित कार्याला जीवनात सर्वात वरचे स्थान देण्याद्वारे आपण देवाने पुरवलेल्या सर्व चांगल्या गोष्टींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. असे केल्यास, यहोवा आपल्या सर्व गरजा पुरवेल. (मत्त. ६:२५-३३) देवाच्या प्रेमामुळे, आपणही त्याचे मन आनंदित करण्यासाठी आपल्याकडून होईल तितके नक्कीच केले पाहिजे.—नीति. २७:११.

१४. यहोवा कशा प्रकारे त्याच्या लोकांचा मुक्तिदाता ठरला आहे?

१४ दाविदाने एका स्तोत्रात म्हटले: “मी तर दीन व दरिद्री आहे; तरी प्रभूला [यहोवाला] माझी चिंता आहे; माझा साहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस.” (स्तो. ४०:१७) यहोवाच्या सेवकांचा क्रूरपणे छळ होत असताना आणि त्यांच्या शत्रूंकडून त्यांचा पाठलाग होत असताना, यहोवा अनेकदा एक समूह या नात्याने त्याच्या लोकांचा मुक्तिदाता ठरला आहे. अशा कठीण प्रसंगांना तोंड देताना यहोवा आपले साहाय्य करतो आणि नियमित रीत्या आपल्याकरता अनेक आध्यात्मिक तरतुदी करतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!

 यहोवा, आपले संरक्षण करणारा

१५. एका प्रेमळ पित्याने कशा प्रकारे आपल्या मुलाचे संरक्षण केले हे उदाहरण देऊन सांगा.

१५ एक प्रेमळ पिता आपल्या मुलांच्या गरजा पुरवण्यासोबतच त्यांचे संरक्षणही करतो. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका असल्यास तो लगेचच त्यांना त्या कठीण परिस्थितीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो. एका बांधवाला त्यांच्या लहानपणी घडलेला एक प्रसंग आठवतो. ते व त्यांचे पिता क्षेत्र सेवाकार्य करून घरी परतत होते. वाटेत त्यांना एक ओढा पार करायचा होता. सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त होता. पलीकडे जाण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे एका खडकावरून दुसऱ्या खडकावर पाय ठेवून जाणे. लहान मुलाने आपल्या पित्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण, एका खडकावर पाय ठेवताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात पडून गटांगळ्या खाऊ लागला. पण, पित्याने लगेच आपल्या मुलाच्या खांद्याला घट्ट धरून त्याला बुडण्यापासून वाचवले. मुलाला याबद्दल किती कृतज्ञ वाटले असेल! आपला स्वर्गातील पितादेखील आपल्याला सैतानापासून व त्याच्या दुष्ट जगातील धोक्यांपासून सोडवतो. नक्कीच, यहोवापेक्षा चांगला संरक्षक कोणीही असू शकत नाही!—मत्त. ६:१३; १ योहा. ५:१९.

१६, १७. अमालेकी लोकांशी लढताना यहोवाने कशा प्रकारे इस्राएली लोकांना साहाय्य केले व त्यांचे संरक्षण केले?

१६ ख्रिस्तपूर्व १५१३ साली यहोवाने आपल्या लोकांचे प्रेमळपणे संरक्षण केले. त्याने आधीच इस्राएलांना इजिप्तच्या गुलामीतून सोडवले होते आणि तांबडा समुद्र पार करताना आपल्या लोकांचे संरक्षण केले होते. सीनाय पर्वताच्या दिशेने अरण्यातून वाटचाल करत इस्राएली लोक आता रफीदीम येथे येऊन पोचले.

१७ देवाने उत्पत्ति ३:१५ यात दिलेले अभिवचन लक्षात घेतल्यास, असाहाय्य भासणाऱ्या इस्राएली लोकांवर हल्ला करून त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकण्यास सैतान नक्कीच उत्सुक असेल. सैतानाने देवाच्या लोकांचे शत्रू असलेल्या अमालेकी लोकांद्वारे असे करण्याचा प्रयत्नदेखील केला. (गण. २४:२०) पण यहोवाने यहोशवा, मोशे, अहरोन आणि हूर या आपल्या चार विश्वासू सेवकांद्वारे कशा प्रकारे आपल्या लोकांचे संरक्षण केले यावर विचार करा. यहोशवा अमालेकी लोकांशी लढण्यास गेला, तर मोशे,  अहरोन व हूर हे जवळच्याच एका टेकडीच्या माथ्यावर उभे राहिले. मोशे आपले हात वर करायचा तेव्हा इस्राएली लोक लढाईत अमालेकी लोकांवर प्रबळ ठरायचे. पण मोशेचे हात दुखू लागायचे तेव्हा अहरोन व हूर त्याचे हात वर उचलून धरायचे. अशा रीतीने, यहोवाच्या साहाय्यामुळे व संरक्षणामुळे “यहोशवाने . . . अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला.” (निर्ग. १७:८-१३) मोशेने त्या ठिकाणी एक वेदी बांधून तिला “याव्हे-निस्सी” असे नाव दिले, ज्याचा अर्थ “परमेश्वर माझा झेंडा” असा होतो.—निर्गम १७:१४, १५ वाचा.

यहोवा आपल्या सेवकांना सैतानाच्या तावडीतून सोडवतो

१८, १९. आपल्या काळात यहोवाने कशा प्रकारे त्याच्या सेवकांचे संरक्षण केले आहे?

१८ जे यहोवावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात त्यांचे तो संरक्षण करतो. रफीदीम येथे ज्या प्रकारे इस्राएली लोक यहोवावर विसंबून राहिले त्याच प्रकारे आपले शत्रू आपल्यावर हल्ला करतात तेव्हा आपणही संरक्षणासाठी यहोवावर विसंबून राहतो. एक समूह या नात्याने यहोवाने अनेकदा आपले संरक्षण केले आहे आणि तो आपल्याला सैतानाच्या तावडीत सापडू देत नाही. बायबल तत्त्वांमुळे राजकीय व्यवहारांत व युद्धांत भाग न घेतल्यामुळे आपल्या बांधवांचा छळ करण्यात आला तेव्हा देवाने कित्येकदा त्यांचे संरक्षण केले. उदाहरणार्थ, जर्मनीत नात्झींच्या काळात, तसेच १९३० व १९४० च्या दशकांत इतर देशांत जे घडले त्यावरून हे दिसून येते. छळ होत असताना देवाने कशा प्रकारे त्याच्या लोकांचे संरक्षण केले याविषयी आपल्या प्रकाशनांत येणाऱ्या जीवन कथा व इतर अहवाल वाचल्यास व त्यांवर मनन केल्यास आपल्याला यहोवावर नेहमी भरवसा ठेवण्यास साहाय्य मिळेल.—स्तो. ९१:२.

कठीण परिस्थितीतही विश्वासू राहण्याकरता यहोवा आपल्या बांधवांद्वारे आपल्याला साहाय्य करतो (परिच्छेद १८-२० पाहा)

१९ आपले संरक्षण करण्यासाठी, यहोवाच्या संघटनेद्वारे व ख्रिस्ती प्रकाशनांद्वारे आपल्याला वारंवार अनेक प्रेमळ सूचना दिल्या जातात. अलीकडील काळात देण्यात आलेल्या अशा सूचनांमुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा झाला आहे याचा विचार करा. सैतानाचे जग अनैतिकता व पोर्नोग्राफीच्या दलदलीत अधिकाधिक ओढले जात आहे. पण, यहोवाने आपल्याला अशा धोक्यांपासून वाचवण्यासाठी वारंवार सूचना व व्यावहारिक मदत पुरवली आहे. उदाहरणार्थ, सोशल नेटवर्किंगचा गैरवापर करून वाईट संगतीत फसण्यासंबंधी अलीकडे आपल्याला बराच प्रेमळ सल्ला देण्यात आला आहे. *१ करिंथ. १५:३३.

२०. ख्रिस्ती मंडळीद्वारे आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन व संरक्षण मिळते?

२० यहोवाकडून मिळणाऱ्या शिक्षणाचा आपण फायदा करून घेत आहोत हे आपण कसे दाखवू शकतो? यहोवाच्या आज्ञांकडे मनापासून लक्ष देऊन त्यांचे पालन करण्याद्वारे आपण हे दाखवू शकतो. (यश. ५४:१३) आपल्याला आवश्यक असलेले मार्गदर्शन व संरक्षण जेथे मिळू शकेल अशी सुरक्षित ठिकाणे म्हणजे आपल्या ख्रिस्ती मंडळ्या. कारण या मंडळ्यांमध्येच वडील या नात्याने सेवा करणारे विश्वासू बांधव आपल्याला बायबल आधारित मार्गदर्शन व साहाय्य देतात. (गलती. ६:१) हे बांधव आपल्याला जणू मानवांच्या रूपात मिळालेल्या “देणग्या” आहेत आणि त्यांच्याद्वारे यहोवा देव कोमलतेने आपली काळजी घेतो. (इफिस. ४:७, ८) मग आपण या बांधवांच्या मार्गदर्शनाला कसा प्रतिसाद दिला पाहिजे? आपण त्यांचे मार्गदर्शन स्वीकारून त्यानुसार वागल्यास आपल्याला देवाकडून अनेक आशीर्वाद मिळतील.—इब्री १३:१७.

२१. (क) आपण काय करण्याचा मनाशी निश्चय केला पाहिजे? (ख) पुढील लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

२१ तर मग, आपण नेहमी पवित्र आत्म्याच्या साहाय्यावर विसंबून राहण्याचा आणि आपल्या स्वर्गातील पित्याच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचा मनाशी निश्चय करू या. तसेच, आपण त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या जीवनावरही मनन केले पाहिजे आणि त्याच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. येशूने शेवटच्या श्वासापर्यंत यहोवा देवाच्या आज्ञांचे पालन केल्यामुळेच त्याला मोठे प्रतिफळ मिळाले. (फिलिप्पै. २:५-११) आपणही त्याच्याप्रमाणे यहोवावर पूर्ण मनाने भरवसा ठेवल्यास आपल्यालाही अनेक आशीर्वाद मिळतील. (नीति. ३:५, ६) तेव्हा, आपल्या गरजा पुरवणारा आणि आपले संरक्षण करणारा यहोवा देव याच्यावर आपण नेहमी विसंबून राहू या. त्याची सेवा करणे ही आपल्यासाठी खरोखर आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे! पण, यहोवा कोणत्या अर्थाने आपला सर्वात चांगला मित्र आहे? याविषयी चर्चा केल्यामुळे आपल्याला यहोवाबद्दल वाटणारे प्रेम नक्कीच आणखी वाढेल. पुढील लेखात आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत.

^ परि. 19 या विषयावरील सूचना टेहळणी बुरूज, १५ ऑगस्ट २०११ अंकातील पृष्ठे ३-५ वर, “इंटरनेट—याचा सुज्ञपणे उपयोग करा” या शीर्षकाच्या लेखात आणि टेहळणी बुरूज, १५ ऑगस्ट २०१२ अंकातील पृष्ठे २०-२९ वर, “दियाबलाच्या पाशांपासून खबरदार!” व “खंबीर राहा आणि सैतानाचे पाश टाळा!” या लेखांत सापडतील.