व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सारफथच्या विधवेला तिच्या विश्वासाचे प्रतिफळ मिळाले

सारफथच्या विधवेला तिच्या विश्वासाचे प्रतिफळ मिळाले

एक गरीब विधवा तिच्या एकुलत्या एका मुलाला आपल्या उराशी कवटाळते. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. कारणही तसेच आहे. काही वेळापूर्वीच तिचा मुलगा मरण पावला होता आणि त्याचे मृत शरीर तिच्या मांडीवर होते. आता मात्र आपल्या पुनरुत्थित झालेल्या मुलाच्या चेहऱ्यावरील हसू ती पाहू शकते आणि त्यामुळे तिला खूप आनंद होतो. तिच्या घरी आलेला पाहुणा तिला म्हणतो, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे.”

जवळजवळ ३,००० वर्षांपूर्वी हे अद्भुत पुनरुत्थान घडले होते. त्याबद्दल तुम्ही १ राजे याच्या १७ व्या अध्यायात वाचू शकता. विधवेच्या घरी आलेला तो पाहुणा, देवाचा संदेष्टा एलीया आहे. आणि त्या मुलाची आई ही सारफथ गावात राहणारी एक विधवा आहे. बायबलमध्ये तिच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तिच्या मुलाचे पुनरुत्थान तिच्या जीवनातील अशी घटना होती जिच्यामुळे देवावरील तिचा विश्वास खूप भक्कम झाला. आपण तिच्यावर आपले लक्ष केंद्रित करू या आणि तिच्या उदाहरणावरून आपल्याला कोणते महत्त्वाचे धडे शिकता येतील ते आता पाहू या.

एलीयाला विश्वास दाखवणारी एक विधवा भेटते

इस्राएलचा दुष्ट राजा अहाब याच्या कारकिर्दीत, यहोवाने दुष्काळ आणण्याचे ठरवले. हा दुष्काळ दीर्घकाळ राहणार होता. एलीयाने या दुष्काळाविषयीची घोषणा केल्यानंतर देवाने त्याला राजा अहाबापासून सुरक्षित ठेवले आणि कावळ्यांच्या साहाय्याने त्याला चमत्कारिक रीत्या भाकरी व मांस पुरवले. पण नंतर यहोवाने एलीयाला असे म्हटले: “चल, सीदोनातील सारफथ नगरात जाऊन राहा; पाहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे.”—१ राजे १७:१-९.

सारफथला पोचल्यावर एलीयाने एका गरीब विधवेला सरपण गोळा करताना पाहिले. संदेष्ट्याला अन्न पुरवणारी स्त्री हीच असणार होती का? पण ती तर स्वतः खूप गरीब होती, मग ती अन्न कसे पुरवू शकणार होती? एलीयाच्या मनात कदाचित असे प्रश्न आले असतील. तरीपण तो त्या स्त्रीशी बोलू लागला. तो तिला म्हणाला: “मला एका पात्रात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये.” ती पाणी आणण्यासाठी जात असताना त्याने तिला परत हाक मारून म्हटले: “आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा  मला घेऊन ये.” (१ राजे १७:१०, ११) आपल्या घरी आलेल्या त्या पाहुण्याला पाणी देणे त्या विधवेसाठी काही अवघड नव्हते, पण त्याला भाकर देणे मात्र तिच्यासाठी सोपे नव्हते.

ती स्त्री एलीयाला म्हणाली: “तुमचा देव परमेश्वर [“यहोवा,” NW] याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही; मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी दोन काटक्या जमा करत आहे; मग मी घरी जाऊन मजसाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करेन; ते आम्ही खाऊ आणि मग मरू.” (१ राजे १७:१२) त्यांच्या या संभाषणातून आपल्याला काय कळते?

त्या विधवेने ओळखले की एलीया हा देवभीरू इस्राएली आहे. आणि म्हणूनच ती म्हणाली की, “तुमचा देव यहोवा याच्या जीविताची शपथ.” त्या स्त्रीला इस्राएलच्या देवाबद्दल थोडेफार ज्ञान असले तरीही तिने यहोवाचा उल्लेख करताना “माझा देव” असे म्हटले नाही कारण तिचा विश्वास अद्यापही इतका भक्कम नव्हता. ती सारफथ या गावात राहत होती. सारफथ हे गाव फेनिके देशातील सीदोन या शहराचा भाग असावे किंवा या शहराच्या नियंत्रणात असावे. त्यामुळे सारफथचे बहुतेक रहिवाशी बआल देवतेचे उपासक होते. असे असले तरी यहोवाने त्या विधवेत काहीतरी विशेष पाहिले होते.

ही गरीब विधवा मूर्तिपूजक लोकांमध्ये राहत होती तरीही तिने विश्वास दाखवला. यहोवाने एलीयाला त्या विधवेकडे पाठवले कारण यहोवाला एलीयाची आणि त्या विधवेची काळजी होती. यहोवाने जे केले त्यावरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकू शकतो.

सारफथमध्ये बआल उपासना प्रचलित असली, तरी तेथे राहणारे सर्वच लोक पूर्णपणे भ्रष्ट झाले नव्हते. एलीयाला त्या विधवेकडे पाठवण्याद्वारे यहोवाने हे दाखवून दिले, की जी व्यक्ती प्रामाणिक मनाची आहे तिची तो दखल घेतो, मग ती अद्याप त्याची उपासक नसली तरीही. खरोखर, “प्रत्येक राष्ट्रात जो [देवाची] भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रे. कृत्ये १०:३५.

तुमच्या क्षेत्रात राहणारे काही लोक सारफथच्या विधवेप्रमाणे आहेत का? आजूबाजूला राहणारे लोक खोटी उपासना करत असले, तरी या लोकांच्या मनात सत्य जाणून घेण्याची इच्छा असेल. अशा लोकांना यहोवाबद्दलचे फार कमी किंवा काहीच ज्ञान नसेल. त्यामुळे, खरी उपासना करता यावी म्हणून त्यांना मदतीची गरज असेल. अशा व्यक्तींना शोधून तुम्ही त्यांना मदत पुरवत आहात का?

“त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण”

एलीयाने त्या विधवेला काय करण्यास सांगितले त्याकडे लक्ष द्या. तिने काही वेळाआधीच त्याला सांगितले होते, की ती स्वतःसाठी व तिच्या मुलासाठी शेवटचे भोजन तयार करेल आणि ते खाल्ल्यानंतर त्यांच्याजवळ मरण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरणार नाही. तरीसुद्धा एलीयाने तिला काय सांगितले? “भिऊ नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. इस्राएलांचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेल त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही.”—१ राजे १७:११-१४.

‘स्वतःचे शेवटले भोजन दुसऱ्याला द्यायचे? हे कसे काय शक्य आहे?’ असे कोणी कदाचित म्हणाले असते. पण, या विधवेची प्रतिक्रिया अशी नव्हती. यहोवाबद्दल फारसे ज्ञान नसूनही तिने एलीयावर विश्वास ठेवला आणि त्याने जसे सांगितले तसे केले. तिच्या विश्वासाची ही किती मोठी परीक्षा होती—आणि तिने अगदी योग्य निर्णय घेतला!

एलीयाचा देव यहोवा याच्यावर त्या विधवेने विश्वास ठेवल्यामुळे तिचा व तिच्या मुलाचा जीव वाचला

देव या गरीब विधवेला विसरला नाही. त्याने एलीयाद्वारे तिला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण केले. तिच्याजवळ अन्नाचा जो थोडासा साठा होता तो संपणार नाही याची देवाने काळजी घेतली. यामुळे एलीयाला, त्या विधवेला आणि तिच्या मुलाला दुष्काळ संपेपर्यंत अन्नाची कमी भासली नाही. खरेच, “परमेश्वर एलीयाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही.” (१ राजे १७:१६; १८:१) त्या स्त्रीने जर एलीयावर विश्वास ठेवला नसता आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे  केले नसते, तर तिच्याजवळचे थोडेसे पीठ आणि कुपीतील तेल यांपासून तयार केलेली भाकरी ही खरेच तिचे शेवटचे भोजन ठरले असते. पण, तिने विश्वास दाखवला, यहोवावर भरवसा ठेवला आणि आधी एलीयाला भोजन दिले.

यावरून आपण हे शिकतो, की जे विश्वास दाखवतात त्यांना देव आशीर्वादित करतो. तुमच्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा तुम्ही विश्वास दाखवला तर यहोवा तुम्हाला नक्कीच मदत करेल. तुम्हाला परीक्षेचा सामना करता यावा म्हणून तो तुमचा सांभाळ करेल, तुमचे रक्षण करेल आणि एका मित्राप्रमाणे तुम्हाला मदत करेल.—निर्ग. ३:१३-१५.

विधवेच्या या उदाहरणावरून कोणते धडे शिकता येतील याबद्दल १८९८ च्या झायन्स वॉच टॉवर या नियतकालिकात पुढील माहिती दिली होती: “त्या स्त्रीला जर विश्वास असता आणि तिने आज्ञा मानली असती, तरच तिला संदेष्ट्यामार्फत मदत पुरवण्यात आली असती; तिने जर विश्वास दाखवला नसता, तर यहोवाने संदेष्ट्याला दुसऱ्या एखाद्या विधवेकडे पाठवले असते. आपल्या बाबतीतही तसेच आहे; आपल्या जीवनात देव असे प्रसंग येऊ देतो ज्यांमुळे आपल्या विश्वासाची परीक्षा होते. अशा वेळी जर आपण विश्वास दाखवला, तर आपल्याला आशीर्वाद मिळतील. पण जर आपण विश्वास दाखवला नाही, तर आपण ते आशीर्वाद गमावू.”

आपण जेव्हा परीक्षांचा सामना करतो तेव्हा आपण बायबल व बायबलवर आधारित प्रकाशनांतून देवाकडील मार्गदर्शन मिळवले पाहिजे. आणि यहोवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा स्वीकार करून आपण त्याचा अवलंब केला पाहिजे, असे करणे सोपे नसले तरीही. आपण जर पुढील नीतिसूत्रानुसार केले तर नक्कीच आपल्याला आशीर्वाद मिळतील: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीति. ३:५, ६.

“माझ्या मुलास मारून टाकावे म्हणून आपण माझ्या घरी आला आहा का?”

विधवेच्या विश्वासाची आणखी एक परीक्षा होणार होती. अहवालात पुढे असे म्हटले आहे: “यानंतर घरधनिणीचा मुलगा आजारी पडला, त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला.” आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दुःखी असलेली ती स्त्री एलीयाला म्हणाली, “अहो देवाचे माणूस, आपला माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलास मारून टाकावे म्हणून आपण माझ्या घरी आला आहा का?” (१ राजे १७:१७, १८) तिच्या या कटू शब्दांचा काय अर्थ होतो?

त्या स्त्रीला तिने केलेले एखादे पाप आठवले होते का जे तिच्या विवेकाला बोचत होते? तिने असा विचार केला का, की तिच्या मुलाचा मृत्यू ही देवाकडून शिक्षा आहे आणि त्यासाठीच देवाने एलीयाला पाठवले आहे? बायबल याबद्दल आपल्याला काहीच सांगत नाही. पण, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, की देव अनीतीने वागला आहे असा आरोप त्या विधवेने केला नाही.

त्या विधवेच्या मुलाच्या मृत्यूमुळे आणि संदेष्ट्याचे तिच्या घरी येणेच तिच्या या दुःखाचे कारण आहे असा ती विचार करत असल्यामुळे एलीयाला नक्कीच धक्का बसला असेल. त्यामुळे एलीयाने त्या मुलाच्या मृत शरीराला तो राहत असलेल्या वरच्या खोलीत नेले आणि यहोवाला असे विचारले: “हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिजवर अरिष्ट आणले काय?” देवाने जर अशा उदार व दयाळू स्त्रीवर असे संकट येऊ दिले तर यहोवाच्या नावावर दोष लावण्यात येईल हा विचारही एलीया सहन करू शकत नव्हता. म्हणून त्याने देवाला अशी विनंती केली: “परमेश्वरा, हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊ दे.”—१ राजे १७:२०, २१.

“पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे”

यहोवा एलीयाची प्रार्थना ऐकत होता. त्या विधवेने संदेष्ट्याला अन्न पुरवले होते आणि विश्वास दाखवला होता. खरेतर देवाने त्या मुलाचा त्याच्या आजारपणामुळे मृत्यू होऊ दिला कारण पुढे तो त्या मुलाचे पुनरुत्थान करणार होता. बायबलमध्ये नमूद असलेली ही सर्वात पहिली पुनरुत्थानाची घटना असणार होती आणि यामुळे भविष्यात लोकांना आशा मिळणार होती. एलीयाने जेव्हा यहोवाला विनंती केली तेव्हा त्याने त्या मुलाला जिवंत केले. एलीयाने जेव्हा त्या विधवेला सांगितले, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे,” तेव्हा तिला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! आपल्या मुलाच्या पुनरुत्थानानंतर ती विधवा एलीयाला म्हणाली: “आपण देवाचे माणूस आहा आणि परमेश्वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.”—१ राजे १७:२२-२४.

पहिले राजे याच्या १७ व्या अध्यायातील या अहवालात त्या स्त्रीबद्दल आणखी काही सांगण्यात आलेले नाही. पण, येशूने त्या स्त्रीची प्रशंसा केली यावरून हे समजते की कदाचित ती पुढेही यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहिली असावी. (लूक ४:२५, २६) तिच्या या अहवालातून आपण हे शिकू शकतो की जे कोणी देवाच्या सेवकांसाठी काही चांगले करतात त्यांना देव आशीर्वाद देतो. (मत्त. २५:३४-४०) यावरून हे सिद्ध होते की देव त्याच्या विश्वासू सेवकांचा अगदी कठीण परिस्थितीतही सांभाळ करतो. (मत्त. ६:२५-३४) या अहवालावरून आपल्याला हेदेखील समजते की यहोवाला मृतांना पुन्हा जिवंत करण्याची इच्छा आहे आणि असे करण्याचे सामर्थ्यही त्याच्याजवळ आहे. (प्रे. कृत्ये २४:१५) सारफथच्या विधवेच्या उदाहरणावर लक्ष केंद्रित करण्याची ही खरोखर किती चांगली कारणे आहेत!