व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी टिकवून ठेवावी?

स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी टिकवून ठेवावी?

“माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा.”—मत्त. १६:२४.

१. स्वार्थत्यागी मनोवृत्ती दाखवण्याच्या बाबतीत येशूने कशा प्रकारे सर्वोत्तम उदाहरण मांडले?

येशू पृथ्वीवर होता तेव्हा स्वार्थत्यागी मनोवृत्तीचे सर्वोत्तम उदाहरण त्याने आपल्यासमोर मांडले. स्वतःच्या इच्छांचा व सोयीचा विचार न करता, त्याने देवाच्या इच्छेनुसार वागण्याचा प्रयत्न केला. (योहा. ५:३०) वधस्तंभावरील मृत्यूला सामोरे जावे लागले, तरीसुद्धा तो शेवटपर्यंत देवाला विश्वासू राहिला. अशा रीतीने त्याने दाखवले की त्याच्या स्वार्थत्यागी मनोवृत्तीला कोणतीही सीमा नव्हती.—फिलिप्पै. २:८.

२. आपण स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी दाखवू शकतो आणि आपण असे का केले पाहिजे?

आपण येशूचे अनुयायी आहोत, त्याअर्थी आपल्या जीवनातूनही स्वार्थत्यागाची ही मनोवृत्ती दिसून आली पाहिजे. पण, स्वार्थत्यागी मनोवृत्ती म्हणजे नेमके काय? सोप्या शब्दांत सांगायचे, तर इतरांना मदत करण्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला सारणे असा याचा अर्थ होतो. स्वार्थत्यागाची मनोवृत्ती ही स्वार्थीपणाच्या अगदी उलट आहे. (मत्तय १६:२४ वाचा.) अशी निःस्वार्थ वृत्ती आपल्याला स्वतःपेक्षा इतरांच्या भावनांना व आवडीनिवडींना जास्त महत्त्व देण्यास साहाय्य करते. (फिलिप्पै. २:३, ४) खरे पाहता, अशा निःस्वार्थ मनोवृत्तीचा आपल्या उपासनेशी जवळचा संबंध आहे असे येशूने शिकवले. तो कसा? स्वार्थत्यागी मनोवृत्ती दाखवण्याची एका व्यक्तीला प्रेरणा मिळते ती ख्रिस्ती प्रेमामुळे, आणि हेच येशूच्या खऱ्या अनुयायांचे ओळखचिन्ह आहे. (योहा. १३:३४, ३५) तसेच, स्वार्थत्यागी मनोवृत्तीने वागणाऱ्या एका जागतिक बंधुसमाजाचा आपण भाग असल्यामुळे आपल्याला किती आशीर्वाद अनुभवता येतात याचाही विचार करा!

३. कोणती गोष्ट स्वार्थत्यागी मनोवृत्तीला सुरुंग लावू शकते?

 पण, मुळात आपल्या सर्वांमध्ये स्वार्थीपणाची प्रवृत्ती आहे. आणि ही प्रवृत्ती स्वार्थत्यागी मनोवृत्तीला सुरुंग लावू शकते. आदाम आणि हव्वा कशा प्रकारे स्वार्थीपणाने वागले हे आठवा. हव्वेला देवासारखे होण्याची स्वार्थी लालसा होती. तर आदामाने आपल्या पत्नीची मर्जी राखण्याच्या स्वार्थी इच्छेमुळे देवाची आज्ञा मोडली. (उत्प. ३:५, ६) आदाम आणि हव्वेला खऱ्या उपासनेपासून दूर नेण्यात यशस्वी झालेल्या दियाबलाने लोकांना स्वार्थीपणाने वागण्याचे प्रोत्साहन देणे पुढेही चालू ठेवले. येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न करताना त्याने हेच केले नाही का? (मत्त. ४:१-९) आपल्या काळात, बहुतेक लोकांना बहकवण्यात सैतानाला यश आले आहे. तो आज त्यांना अनेक मार्गांनी स्वार्थी मनोवृत्ती दाखवण्यास प्रवृत्त करत आहे. आपण मात्र सांभाळून राहिले पाहिजे कारण सर्वत्र दिसणारी ही स्वार्थी मनोवृत्ती आपल्यामध्येही सहज येऊ शकते.—इफिस. २:२.

४. (क) स्वार्थी प्रवृत्ती काढून टाकणे सध्या आपल्याला शक्य आहे का? स्पष्ट करा. (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

स्वार्थीपणाची तुलना लोखंडी वस्तूला लागणाऱ्या गंजाशी करता येईल. वातावरणाच्या संपर्कात आल्यावर कालांतराने लोखंडी वस्तू गंजण्यास सुरुवात होते. पण त्या वस्तूला गंज लागणे हा खरा धोका नसतो; तर, त्या वस्तूत बिघाड होईपर्यंत किंवा ती निकामी होईपर्यंत तिला लागलेल्या गंजाकडे दुर्लक्ष करणे यात खरा धोका दडलेला असतो. लोखंडामध्ये जशी गंजण्याची प्रवृत्ती असते तशीच आपल्या सर्वांमध्ये अपरिपूर्णता आणि स्वार्थी प्रवृत्तीची लक्षणे ही असतातच. ही अपरिपूर्णता व स्वार्थी प्रवृत्ती पूर्णपणे काढून टाकणे हे सध्या आपल्याला शक्य नसले, तरी या प्रवृत्तींमुळे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात याविषयी जागरूक राहणे आणि अशा प्रवृत्तींविरुद्ध सतत लढा देणे महत्त्वाचे आहे. (१ करिंथ. ९:२६, २७) तर मग, आपल्यामध्ये असलेली ही स्वार्थीपणाची लक्षणे आपण कशी ओळखू शकतो? आणि स्वार्थत्यागी मनोवृत्ती वाढीस लावण्यासाठी आपण काय करू शकतो?

बायबलच्या मदतीने स्वार्थीपणाची लक्षणे ओळखा

५. (क) बायबल आरशासारखे आहे असे का म्हणता येईल? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) स्वार्थीपणाची लक्षणे ओळखण्यासाठी बायबलचा वापर करताना आपण काय करण्याचे टाळले पाहिजे?

आपले शारीरिक स्वरूप पाहण्यासाठी ज्या प्रकारे आपण आरशाचा उपयोग करतो त्याच प्रकारे आपण बायबलच्या साहाय्याने आपल्या आंतरिक व्यक्तीचे परीक्षण करू शकतो आणि काही दोष आढळल्यास ते सुधारू शकतो. (याकोब १:२२-२५ वाचा.) पण, आरशाचा योग्य प्रकारे वापर केला, तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. उदाहरणार्थ, जर आपण आरशात फक्त ओझरते पाहिले तर एखादा लहानसा पण महत्त्वाचा दोष आपल्या नजरेतून सुटू शकतो. तसेच, जर आपण आरशात सरळ न पाहता एका कोनातून पाहिले तर आपल्याला स्वतःऐवजी दुसऱ्या कोणाची प्रतिमा त्यात दिसू शकते. त्याच प्रकारे, स्वार्थीपणाची लक्षणे ओळखण्यासाठी बायबलचा वापर करताना आपण त्याचे फक्त वरवर वाचन करू नये किंवा दुसऱ्यांचे दोष पाहण्यासाठी त्याचा उपयोग करू नये.

६. परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करण्यासोबतच आपण काय केले पाहिजे?

उदाहरणार्थ, आपण नियमितपणे, इतकेच काय तर दररोज देवाच्या वचनाचे वाचन करत असू. पण असे असूनही, आपल्यामध्ये स्वार्थीपणाची प्रवृत्ती निर्माण होत असल्याचे कदाचित आपल्या लक्षात येणार नाही. असे कशामुळे घडू शकते? याचा विचार करा: याकोबाने आरशाचे जे उदाहरण सांगितले त्यातील मनुष्य स्वतःकडे काळजीपूर्वक पाहत नाही, असे नाही. कारण याकोबाने लिहिले की तो माणूस स्वतःकडे पाहतो. खरेतर, या ठिकाणी याकोबाने जो ग्रीक शब्द वापरला आहे तो बारकाईने पाहणे किंवा काळजीपूर्वक परीक्षण करणे असे सूचित करतो. तर मग, त्या मनुष्याचे कोठे चुकले? याकोब पुढे सांगतो: “तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो, आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो.” याचा अर्थ, आरशात पाहिल्यानंतर स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी तो कोणतीही कृती करत नाही. दुसरीकडे पाहता, ज्याची कार्ये सफल होतात असा मनुष्य, “परिपूर्ण नियमांचे निरीक्षण” तर करतोच, पण त्यासोबतच तो या नियमांचे पालन “करत राहतो.” देवाच्या वचनातील परिपूर्ण नियमांचा स्वतःला विसर पडू देण्याऐवजी तो सतत त्यांनुसार वागतो. येशूनेही एकदा असे म्हटले होते: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा.”—योहा. ८:३१.

७. स्वार्थीपणाची लक्षणे ओळखण्यासाठी आपण बायबलचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो?

याचा अर्थ असा होतो, की स्वार्थीपणाच्या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही देवाच्या वचनाचे काळजीपूर्वक वाचन केले पाहिजे. असे केल्यामुळे, कोठे सुधारणा करण्याची गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल. पण, एवढ्यावरच थांबू नका. तर संशोधन करण्याद्वारे विषयाच्या आणखी खोलात जा. एकदा का बायबलमधील विशिष्ट अहवाल  तुमच्या मनात स्पष्ट झाला, की मग तुम्ही स्वतः त्या परिस्थितीत आहात अशी कल्पना करून पुढील प्रश्न विचारा: ‘मी त्या ठिकाणी असतो तर मी काय केलं असतं? मी खरोखरच योग्य पाऊल उचललं असतं का?’ पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वाचलेल्या माहितीवर अशा प्रकारे मनन केल्यानंतर त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. (मत्त. ७:२४, २५) आता आपण राजा शौल आणि प्रेषित पेत्र यांच्याविषयीच्या अहवालांचे परीक्षण करू या. स्वार्थत्यागी मनोवृत्ती टिकवून ठेवण्यासाठी हे अहवाल आपल्याला कशी मदत करू शकतात याकडे आपण लक्ष देऊ या.

शौल राजाच्या वाईट उदाहरणावरून धडा घ्या

८. शौल जेव्हा राजा बनला होता तेव्हा त्याची मनोवृत्ती कशी होती आणि हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

स्वार्थीपणा कशा प्रकारे स्वार्थत्यागाच्या मनोवृत्तीला सुरुंग लावू शकतो हे इस्राएलचा राजा शौल याच्या उदाहरणावरून दिसून येते. शौलाने त्याचे राज्य सुरू केले तेव्हा त्याची मनोवृत्ती नम्र आणि विनयशील होती. (१ शमु. ९:२१) उदाहरणार्थ, एकदा काही इस्राएली लोक शौल राजाच्या विरोधात बोलू लागले. खरेतर शौलाला स्वतः देवाने राजा म्हणून निवडले असल्यामुळे, त्याच्याविरुद्ध बोलणाऱ्या या लोकांना तो चांगली अद्दल घडवू शकला असता. पण त्याने तसे केले नाही. (१ शमु. १०:२७) आणखी एका उदाहरणाचा विचार करा. अम्मोन्यांविरुद्ध लढाईला जाताना शौल राजाने देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन स्वीकारले आणि यामुळे इस्राएलला लढाईत विजय मिळाला. लढाईनंतर शौलाने नम्रपणे यहोवाला या विजयाचे श्रेय दिले.—१ शमु. ११:६, ११-१३.

९. शौलाच्या मनात कशा प्रकारे स्वार्थी मनोवृत्ती उत्पन्न झाली?

काही काळानंतर, लोखंडाला लागणाऱ्या गंजाप्रमाणे शौलाने आपल्या मनात स्वार्थी आणि गर्विष्ठ मनोवृत्ती उत्पन्न होऊ दिली. अमालेकी लोकांचा लढाईत पराभव केल्यानंतर त्याने यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याऐवजी स्वतःच्या इच्छांना जास्त महत्त्व दिले. देवाने अमालेक्यांच्या सर्व वसतूंचा नाश करण्याची आज्ञा दिली होती. पण शौलाने लोभीपणा दाखवला आणि लुटीतील वस्तू राखून ठेवल्या. तसेच स्वतःच्या नावाचा विजयस्तंभ उभारून शौलाने आपल्या गर्विष्ठपणाचा पुरावा दिला. (१ शमु. १५:३, ९, १२) शौलाच्या या कृतीमुळे यहोवा त्याच्यावर नाराज झाल्याचे जेव्हा शमुवेल संदेष्ट्याने त्याला सांगितले तेव्हा शौलाने काय केले? देवाच्या आज्ञेतील ज्या भागाचे त्याने पालन केले होते केवळ त्याचाच उल्लेख करून शौल आपली चूक लपवण्याचा आणि आपला दोष इतरांवर टाकण्याचा प्रयत्न करू लागला. (१ शमु. १५:१६-२१) शिवाय, शौलाच्या गर्विष्ठ मनोवृत्तीमुळे त्याला देवाच्या इच्छेनुसार वागण्यापेक्षा लोकांसमोर आपली चांगली प्रतिमा कशी टिकवून ठेवता येईल याचीच जास्त काळजी होती. (१ शमु. १५:३०) शौलाबद्दलच्या या अहवालातून आपण काय शिकतो?

१०, ११. (क) स्वार्थत्यागी मनोवृत्ती टिकवून ठेवण्याच्या बाबतीत शौलाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? (ख) शौलाने केलेल्या चुका आपण कशा टाळू शकतो?

१० शौलाच्या उदाहरणावरून आपण जी पहिली गोष्ट शिकतो, ती म्हणजे आपण कधीही आत्मसंतुष्ट असू नये. म्हणजेच, पूर्वी आपण स्वार्थत्यागी मनोवृत्ती दाखवली त्याअर्थी पुढेही आपण आपोआपच ती दाखवत राहू असे आपण गृहीत धरू नये. (१ तीम. ४:१०) एकेकाळी शौलाची मनोवृत्ती चांगली होती आणि त्याला देवाचा आशीर्वादही मिळाला होता; पण, स्वार्थीपणाची लक्षणे त्याच्या मनात घर करू लागली, तेव्हा त्याने ती काढून टाकण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत. शौल यहोवाच्या विरोधात गेल्यामुळे, शेवटी यहोवाने त्याला राजा या नात्याने नाकारले.

११ दुसरी गोष्ट म्हणजे, आपण ज्या बाबतींत देवाच्या आज्ञांनुसार वागत आहोत केवळ त्यांवरच लक्ष केंद्रित करून, ज्या बाबतींत आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे त्यांकडे डोळेझाक करणे चुकीचे आहे. असे करणे, आरशात पाहून आपण घातलेले नवीन कपडे किती छान दिसतात हेच पाहणे, आणि चेहऱ्यावर डाग लागलेला असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे यासारखे ठरेल. आपली जरी शौलाइतकी आत्मसंतुष्ट मनोवृत्ती नसली, तरी देवाच्या विरोधात वागण्यास आपल्याला प्रवृत्त करू शकेल अशी कोणतीही विचारसरणी टाळण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आपली चूक आपल्या लक्षात आणून दिली जाते तेव्हा आपण आपल्या वागणुकीसाठी कारणे सांगू नये; आपण केलेली चूक फार मोठी नव्हती असे पटवून सांगण्याचा प्रयत्न करू नये, तसेच आपला दोष आपण इतरांवर टाकण्याचाही प्रयत्न करू नये. शौलाप्रमाणे होण्याऐवजी आपण मिळालेल्या सल्ल्याचा मनापासून स्वीकार करू या.—स्तोत्र १४१:५ वाचा.

१२. आपल्या हातून गंभीर पाप घडल्यास स्वार्थत्यागाची मनोवृत्ती आपल्याला कशा प्रकारे साहाय्य करेल?

१२ पण, आपल्या हातून एखादे गंभीर पाप घडले असल्यास काय? शौलाला त्याची चांगली प्रतिमा टिकवून ठेवण्याचीच काळजी होती आणि यामुळे त्याने यहोवासोबतचा  बिघडलेला नातेसंबंध सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत. याउलट जर आपली स्वार्थत्यागी मनोवृत्ती असेल, तर इतरांसमोर आपली लाजिरवाणी स्थिती होईल याची पर्वा न करता आपण आध्यात्मिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करू. (नीति. २८:१३; याको. ५:१४-१६) उदाहरणार्थ, एका बांधवाला तो १२ वर्षांचा असताना पोर्नोग्राफी (अश्‍लील साहित्य) पाहण्याची सवय लागली. पुढील दहा वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत तो इतरांच्या नकळत पोर्नोग्राफी पाहत राहिला. तो सांगतो: “माझ्या या सवयीबद्दल माझ्या बायकोला आणि मंडळीतल्या वडिलांना सांगणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण जेव्हा मी आपली चूक कबूल केली तेव्हा मनावरचं मोठं ओझं दूर झाल्यासारखं मला वाटू लागलं. सहायक सेवकाची जबाबदारी माझ्याकडून काढून घेण्यात आली तेव्हा माझ्या काही मित्रांना खूप वाईट वाटलं. मी त्यांचा अपेक्षाभंग केला आहे असं त्यांना वाटलं. पण मला माहीत आहे की आज यहोवाला माझी सेवा नक्कीच जास्त आनंददायक वाटत असेल आणि खरं पाहता त्याचं माझ्याविषयी काय मत आहे हेच मला सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं.”

पेत्राने स्वार्थीपणावर विजय मिळवला

१३, १४. पेत्राने कशा प्रकारे स्वार्थी मनोवृत्ती दाखवली?

१३ प्रेषित पेत्र येशूचा अनुयायी बनला तेव्हा त्याने स्वार्थत्यागी मनोवृत्ती दाखवली होती. (लूक ५:३-११) तरीसुद्धा, त्याला स्वार्थी प्रवृत्तींवर मात करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागला. उदाहरणार्थ, याकोब व योहान यांनी येशूच्या भावी राज्यात त्याच्या शेजारी महत्त्वाच्या जागा मिळाव्यात अशी मागणी केली तेव्हा पेत्राला खूप राग आला. त्या महत्त्वाच्या जागांपैकी एक जागा आपल्याला मिळाली पाहिजे असे कदाचित पेत्राला वाटत असावे. कारण पेत्र एक महत्त्वाची भूमिका पार पाडेल असे खुद्द येशूने म्हटले होते. (मत्त. १६:१८, १९) पण, येशूने याकोब व योहान यांना तसेच पेत्राला आणि इतर प्रेषितांनाही ताकीद दिली की त्यांनी आपल्या बांधवांवर “अधिकार” गाजवण्याचा प्रयत्न करू नये.—मार्क १०:३५-४५.

१४ येशूने पेत्राची चुकीची विचारसरणी सुधारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा पेत्राला त्याच्या स्वार्थी प्रवृत्तींशी पुढेही झगडावे लागले. येशूने जेव्हा प्रेषितांना सांगितले की ते सर्व त्याला तात्पुरत्या काळासाठी एकटे टाकतील तेव्हा पेत्राने इतरांपेक्षा आपण वरचढ आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. इतर जण येशूला सोडून निघून गेले तरी आपण मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याला सोडून जाणार नाही असा दावा पेत्राने केला. (मत्त. २६:३१-३३) पण त्याचा हा आत्मविश्वास फोल ठरला, कारण त्याच रात्री पेत्र स्वार्थत्यागी वृत्ती दाखवण्यास चुकला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने तीन वेळा येशूला नाकारले.—मत्त. २६:६९-७५.

१५. पेत्राकडून आपण अनेक चांगल्या गोष्टी शिकू शकतो असे का म्हणता येईल?

१५ पेत्राला त्याच्या चुकीच्या प्रवृत्तींशी अशा प्रकारे संघर्ष  करावा लागला, तरीसुद्धा त्याच्या जीवनाकडे पाहिल्यास आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. त्याने स्वतः पुरेसे प्रयत्न केल्यामुळे व देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्यामुळे तो आपल्या स्वार्थी मनोवृत्तीवर मात करून संयम व निःस्वार्थ प्रेम दाखवू शकला. (गलती. ५:२२, २३) ज्या कठीण प्रसंगांना तोंड देताना पेत्र अडखळला होता, त्यांपेक्षा कितीतरी जास्त खडतर अशा परीक्षांना त्याला पुढे तोंड द्यावे लागले. प्रेषित पौलाने एकदा सर्वांदेखत पेत्राची कानउघाडणी केली तेव्हा त्याने नम्रपणे प्रतिक्रिया दाखवली. (गलती. २:११-१४) शिवाय, पौलाने सर्वांसमोर आपली चूक दाखवल्यामुळे आपली नाचक्की झाली असा विचार करून पेत्राने पौलाविरुद्ध मनात अढी बाळगली नाही. तर पेत्र पुढेही पौलाशी प्रेमानेच वागला. (२ पेत्र ३:१५) पेत्राच्या उदाहरणावर मनन केल्यास आपल्याला स्वार्थत्यागी मनोवृत्ती उत्पन्न करणे शक्य होईल.

पेत्राची चूक सुधारण्यात आली तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? आपणही असेच करू का? (परिच्छेद १५ पाहा)

१६. कठीण परिस्थितींत आपण स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी दाखवू शकतो?

१६ तुम्ही स्वतः कठीण परिस्थितींत कशी प्रतिक्रिया दाखवता याचा विचार करा. पेत्र व इतर प्रेषितांना त्यांच्या प्रचार कार्यामुळे अटक करून फटके मारण्यात आले, तेव्हा त्यांनी “[ख्रिस्ताच्या] नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद” केला. (प्रे. कृत्ये ५:४१) तुम्हीसुद्धा छळाला तोंड देताना पेत्राचे व येशूचे अनुकरण करण्याची आपल्याला एक संधी मिळाली आहे असा विचार करू शकता आणि अशा प्रकारे स्वार्थत्यागी मनोवृत्ती दाखवू शकता. (१ पेत्र २:२०, २१ वाचा.) वडिलांकडून ताडन दिले जाते तेव्हासुद्धा अशी स्वार्थत्यागी मनोवृत्ती तुम्हाला मदत करू शकते. ताडन देणाऱ्या बांधवाबद्दल मनात राग बाळगण्याऐवजी पेत्राप्रमाणे त्या सल्ल्याचा नम्रपणे स्वीकार करा.—उप. ७:९.

१७, १८. (क) आध्यात्मिक ध्येयांच्या बाबतीत आपण स्वतःला काय विचारू शकतो? (ख) आपल्या मनात काही प्रमाणात स्वार्थाची भावना आहे असे लक्षात आल्यास आपण काय करू शकतो?

१७ आध्यात्मिक ध्येये गाठण्याच्या बाबतीतही तुम्ही पेत्राच्या उदाहरणावरून बरेच काही शिकू शकता. ही ध्येये गाठण्याचा प्रयत्न करताना स्वार्थत्यागी मनोवृत्ती बाळगा. पण, चारचौघांत नाव कमावण्याची महत्त्वाकांक्षा तुमच्या मनात असू नये. स्वतःला हे प्रश्न विचारा, ‘यहोवाच्या सेवेत प्रगती करण्याच्या किंवा जास्त प्रमाणात सेवा करण्याच्या माझ्या इच्छेमागे लोकांची वाहवा मिळवण्याचा किंवा अधिकार मिळवण्याचा स्वार्थी हेतू आहे का? महत्त्वाच्या जागा देण्यात याव्यात अशी येशूजवळ विनंती करणाऱ्या याकोब व योहान यांच्यासारखे मी वागत आहे का?’

१८ तुमच्या मनात काही प्रमाणात स्वार्थी हेतू आहेत असे लक्षात आल्यास, तुमची चुकीची विचारसरणी सुधारण्यासाठी मदत करण्याची यहोवाला विनंती करा; आणि मग, स्वतःपेक्षा त्याचे गौरव कसे होईल यावर लक्ष केंद्रित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. (स्तो. ८६:११) शिवाय, अशीही काही ध्येये असतात, ज्यांमुळे तुम्ही सर्वांच्या नजरेत येत नाही. यांपैकी काही ध्येयेदेखील तुम्ही स्वतःसमोर ठेवू शकता. उदाहरणार्थ, आत्म्याच्या फळात समाविष्ट असलेल्या गुणांपैकी जो गुण दाखवणे तुम्हाला जास्त कठीण वाटते, तो अधिक प्रमाणात उत्पन्न करण्याचे ध्येय तुम्ही ठेवू शकता. किंवा, सभेत भाग सादर करण्यासाठी कदाचित तुम्ही उत्तम तयारी करत असाल; पण राज्य सभागृहाची सफाई करण्यात कदाचित तुम्हाला तितक्याच उत्साहाने सहभाग घ्यावासा वाटत नसेल. असे असल्यास, तुम्ही रोमकर १२:१६ (वाचा.) या वचनातील सल्ल्याचे पालन करण्याचे ध्येय ठेवू शकता.

१९. आपले दोष लक्षात आल्यावर निराश न होण्यासाठी आपण काय करू शकतो?

१९ देवाच्या वचनाच्या आरशात पाहिल्यावर आपल्याला स्वतःमध्ये काही दोष किंवा स्वार्थीपणाची काही लक्षणे दिसून येतात, तेव्हा कदाचित आपल्याला निराश वाटेल. तुमच्या बाबतीत कधी असे घडल्यास याकोबाने दिलेल्या उदाहरणातील दुसऱ्या मनुष्याचा विचार करा ज्याची कार्ये सफल होतात. स्वतःमध्ये दोष आहेत हे लक्षात आल्यावर ते सुधारण्यासाठी या मनुष्याने किती लवकर पावले उचलली, किंवा स्वतःमध्ये आढळलेले सगळेच दोष दूर करण्यात त्याला यश आले का, यावर याकोबाने भर दिला नाही. त्याऐवजी याकोबाने एवढेच म्हटले की हा मनुष्य परिपूर्ण नियमांचे अनुसरण ‘करत राहिला.’ (याको. १:२५) आरशामध्ये त्याने जे पाहिले होते ते तो विसरला नाही आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत राहिला. तेव्हा, स्वतःचे दोष लक्षात आल्यावर अवाजवी प्रमाणात निराश होऊ नका, तर सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. (उपदेशक ७:२० वाचा.) देवाच्या वचनातील परिपूर्ण नियमांचे परीक्षण करत राहा आणि स्वार्थत्यागी मनोवृत्ती टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. तुमच्या अनेक बांधवांना स्वार्थत्यागी मनोवृत्ती विकसित करण्यास यहोवाने मदत केली आहे. आणि यामुळे ते अपरिपूर्ण असतानाही आज देवाची कृपापसंती व आशीर्वाद अनुभवत आहेत. त्यांच्याप्रमाणेच तुम्हालाही मदत करण्यास यहोवा उत्सुक आहे आणि तुम्हीदेखील त्याचे आशीर्वाद अनुभवू शकता.