‘देवाची इच्छा पूर्ण करणे हेच माझे अन्न आहे’
तुम्हाला सर्वात जास्त आनंद कशामुळे होतो? अशा काही गोष्टी ज्यांत मानवी नाती गोवलेली असतात जसे की लग्न करणे, मुलांचे संगोपन करणे, किंवा एखाद्याशी मैत्री करणे यांमुळे तुम्हाला आनंद मिळतो का? कदाचित तुम्हाला तुमच्या नातेवाइकांसोबत किंवा मित्रांसोबत मिळून जेवण करण्यात आनंद वाटत असेल. पण, यहोवाचे सेवक या नात्याने त्याची इच्छा पूर्ण करण्यात, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यात आणि प्रचार कार्य करण्यात तुम्हाला जास्त आनंद मिळत नाही का?
प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याने सृष्टिकर्त्याची स्तुती करत असे म्हटले, “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” (स्तो. ४०:८) दाविदाला त्याच्या जीवनात बऱ्याच संकटांचा आणि दबावांचा सामना करावा लागला. तरीसुद्धा, त्याने मनापासून आणि आनंदाने देवाची इच्छा पूर्ण केली. अर्थात, आनंदाने देवाची सेवा करणारा दावीद हा एकटाच नव्हता.
प्रेषित पौलाने स्तोत्र ४०:८ या वचनातील शब्द मशीहा किंवा ख्रिस्ताला लागू केले. पौलाने लिहिले “तो [येशू] जगात येतेवेळेस म्हणाला, ‘यज्ञ व अन्नार्पण यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले; होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. यावरून मी म्हणालो, पाहा, हे देवा, ग्रंथपटांत माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.’”—इब्री १०:५-७.
पृथ्वीवर असताना येशूने निसर्गातील सुंदरता न्याहाळणे, मित्रांसोबत वेळ घालवणे व त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेणे या गोष्टींचा आनंद घेतला. (मत्त. ६:२६-२९; योहा. २:१, २; १२:१, २) पण, सर्वात जास्त आनंद त्याला त्याच्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करण्यात होता आणि हीच गोष्ट त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती. इतकेच काय, तर येशूने असेही म्हटले: “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.” (योहा. ४:३४; ६:३८) शिष्यांनी त्यांचा शिक्षक येशू, याच्याकडून खऱ्या आनंदाचे रहस्य काय हे शिकून घेतले. मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने त्यांनी इतरांना जाऊन राज्याचा संदेश सांगितला.—लूक १०:१, ८, ९, १७.
तुम्ही जाऊन शिष्य करा
येशूने त्याच्या अनुयायांना आज्ञा दिली: “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:१९, २०) या कामात, जेथे कोठे आपल्याला लोक भेटतील तेथे त्यांना राज्याचा संदेश सांगणे, आवड दाखवलेल्यांना परत भेटणे आणि त्यांच्यासोबत बायबल अभ्यास चालवणे हे गोवलेले आहे. हे काम केल्यामुळे आपल्याला अत्यंत आनंद मिळू शकतो.
काही लोक आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात तरी प्रेम आपल्याला प्रचार कार्य करत राहण्यास मदत करते
सेवेतील आपला आनंद हा लोकांनी आपल्या संदेशात आवड दाखवली किंवा नाही यापेक्षा, या कार्याप्रती असणाऱ्या आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. कधीकधी लोक आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात किंवा थंड प्रतिसाद देतात तरीही आपण सुवार्ता का सांगत राहतो? कारण आपल्याला याची जाणीव आहे की, जेव्हा आपण प्रचाराचे आणि शिष्य बनवण्याचे काम करतो तेव्हा आपण हे दाखवतो की आपले देवावर आणि शेजाऱ्यांवरदेखील प्रेम आहे. शेवटी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे, आपल्या स्वतःच्या आणि शेजाऱ्यांच्याही. (यहे. ३:१७-२१; १ तीम. ४:१६) आता आपण असे काही मुद्दे पाहू या ज्यांमुळे देवाच्या सेवकांना आव्हानात्मक क्षेत्रांत त्यांचा आवेश टिकवून ठेवण्यास आणि पुन्हा जोमाने काम करण्यास मदत मिळाली.
प्रत्येक संधीचा फायदा घ्या
सेवाकार्यात योग्य प्रश्न विचारल्याने सहसा चांगले परिणाम घडून येतात. एकदा आमालियाने बागेत एका मनुष्याला वर्तमानपत्र वाचताना पाहिले. तिने जवळ जाऊन त्याला विचारले की तुम्हाला वर्तमानपत्रात एखादी आनंदाची बातमी वाचायला मिळाली का? जेव्हा त्याने नाही असे म्हटले तेव्हा आमालिया त्याला म्हणाली, “माझ्याजवळ तुमच्यासाठी देवाच्या राज्याबद्दल एक आनंदाची बातमी आहे.” यामुळे त्या मनुष्याची उत्सुकता वाढली आणि तो लगेच बायबल अभ्यास करण्यास तयार झाला. इतकेच नव्हे, तर आमालियाने त्या बागेत तीन बायबल अभ्यास सुरू केले.
जॅनस आपल्या कामाच्या ठिकाणाला प्रचाराचे क्षेत्र समजून सहकर्मचाऱ्यांना साक्ष देते. एका चौकीदाराला आणि आणखी एका व्यक्तीला टेहळणी बुरूज यामध्ये प्रकाशित केलेला एक लेख आवडला, तेव्हा जॅनसने त्यांना नियमितपणे नियतकालिके आणून देण्याचे वचन दिले. जॅनससोबत काम करणाऱ्या आणखी एका व्यक्तीने टेहळणी बुरूज आणि अवेक! यांमधील वेगवेगळ्या विषयांवरची माहिती पाहून आश्चर्य व्यक्त केले. तेव्हा जॅनसने त्यालाही नियमितपणे नियतकालिके आणून देण्याचे वचन दिले. अशाच प्रकारे आणखी एका स्त्रीने नियतकालिके मागितली. जॅनस म्हणते, “यहोवाकडून मिळालेला हा किती मोठा आशीर्वाद!” पाहता-पाहता, तिच्या कामाच्या ठिकाणी अकरा लोक तिच्याकडून नियमितपणे नियतकालिके घेऊ लागले.
सकारात्मक असा
एका प्रवासी पर्यवेक्षकाने सांगितले की घरोघरच्या सेवाकार्यात प्रचारकांनी, ‘आम्ही तुम्हाला पुन्हा येऊन भेटू’ इतकेच म्हणून घरमालकासोबत चर्चा संपवू नये. तर प्रचारक त्यांना विचारू शकतात, “बायबल अभ्यास कसा चालवला जातो हे मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का?” किंवा “आपली चर्चा चालू ठेवण्याकरता मी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी येऊ शकतो?” प्रवासी पर्यवेक्षकांनी असे सांगितले की त्यांनी भेट दिलेल्या एका मंडळीतील बंधुभगिनींनी या पद्धतीचा उपयोग केल्यामुळे एकाच आठवड्यात ४४ बायबल अभ्यास सुरू केले.
लवकरात लवकर म्हणजे अगदी दोन-तीन दिवसांत पुनर्भेटी करणे खूप परिणामकारक ठरू शकते. का बरे? कारण असे केल्यामुळे आपण हे दाखवतो की आपल्याला प्रामाणिक मनाच्या लोकांना बायबल समजण्यासाठी मदत करण्याची खरोखरच इच्छा आहे. एका स्त्रीला जेव्हा विचारण्यात आले की तिने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्याचे का स्वीकारले तेव्हा ती म्हणाली, “मी बायबल अभ्यास करण्याचं सुरू केलं कारण यहोवाच्या साक्षीदारांनी माझ्याबद्दल खरी आस्था आणि प्रेम दाखवलं.”
तुम्ही घरमालकाला विचारू शकता, “बायबल अभ्यास कसा चालवला जातो हे मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का?”
पायनियर सेवा प्रशालेला उपस्थित राहिल्यानंतर माडाई हिने काही काळातच १५ बायबल अभ्यास सुरू केले. तिच्याजवळ जे आणखी ५ बायबल अभ्यास होते ते तिने इतर प्रचारकांना दिले. तिचे बरेच बायबल विद्यार्थी सभांना नियमितपणे येऊ लागले. माडाईला इतके सारे बायबल अभ्यास सुरू करण्यास कोणत्या गोष्टीने मदत केली? ज्यांनी सुरुवातीला आवड दाखवली होती ते जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडे जात राहणे महत्त्वाचे आहे हे तिला पायनियर प्रशालेत शिकायला मिळाले होते. बऱ्याच लोकांना जिने सत्य शिकण्यास मदत केली आहे अशी आणखी एक ख्रिस्ती बहीण म्हणते: “मला हे समजलं आहे की, ज्या लोकांना यहोवाला जाणून घ्यायचं आहे त्यांना मदत करण्याची गुरुकिल्ली म्हणजे चिकाटीनं पुनर्भेटी करत राहणं.”
लवकरात लवकर पुनर्भेट घेतल्यामुळे आपण दाखवतो की ज्यांना बायबलबद्दल शिकायचे आहे त्यांच्याबद्दल आपल्याला खरी आस्था आहे
पुनर्भेटी करण्यासाठी आणि बायबल अभ्यास चालवण्यासाठी परिश्रमांची गरज आहे. पण, आपण जे काही परिश्रम करू त्यापेक्षा अधिक प्रतिफळ आपल्याला मिळेल. आपण जेव्हा स्वतःला राज्य प्रचाराच्या कामामध्ये झोकून देतो तेव्हा लोकांना “सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत” पोहचण्यास मदत करू शकतो आणि त्यामुळे त्यांचे तारण होऊ शकते. (१ तीम. २:३, ४) तसेच, आपल्याला या कार्यातून अतुलनीय समाधान आणि आनंद मिळू शकतो.