व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या संघटनेसोबत तुम्ही पुढे वाटचाल करत आहात का?

यहोवाच्या संघटनेसोबत तुम्ही पुढे वाटचाल करत आहात का?

“परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात.”—१ पेत्र ३:१२.

१. यहोवाचे नाव धारण करण्याकरता निवडलेले लोक या नात्याने, धर्मत्यागी इस्राएलची जागा कोणत्या संघटनेने घेतली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

यहोवानेच पहिल्या शतकात ख्रिस्ती मंडळीची स्थापना केली आणि अलीकडील काळात खऱ्या उपासनेला पुन्हा प्रस्थापित केले असे म्हणणे योग्य ठरेल. मागच्या लेखात चर्चा केल्यानुसार, ख्रिस्ताच्या सुरुवातीच्या अनुयायांनी बनलेल्या संघटनेने धर्मत्यागी इस्राएल राष्ट्राची जागा घेतली आणि त्यानंतर ते यहोवाचे नाव धारण करण्याकरता निवडलेले लोक म्हणून ओळखले गेले. या नवीन संघटनेवर यहोवाची कृपादृष्टी असल्यामुळेच इ.स. ७० साली जेरूसलेमचा जो नाश झाला त्यातून त्यांचा बचाव झाला. (लूक २१:२०, २१) पहिल्या शतकातील त्या घटनांत आजच्या काळात यहोवाच्या सेवकांसंबंधी जे बदल घडत आहेत त्यांची चाहूल होती. सैतानाच्या व्यवस्थेचा लवकरच अंत होईल पण देवाची संघटना शेवटल्या दिवसांतून बचावेल. (२ तीम. ३:१) आपण याची खात्री का बाळगू शकतो?

२. येशूने मोठ्या संकटाविषयी काय सांगितले आणि या संकटाची सुरुवात कशी होईल?

येशूने त्याच्या अदृश्य उपस्थितीबद्दल आणि या जगाच्या अंताबद्दल असे म्हटले: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” (मत्त. २४:३, २१) यहोवा राजकीय शक्तींचा उपयोग करून खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य असलेली “मोठी बाबेल”  हिचा नाश करेल तेव्हा मोठ्या संकटाला सुरुवात होईल. (प्रकटी. १७:३-५, १६) त्यानंतर काय होईल?

सैतानाच्या हल्ल्याने हर्मगिदोनाची सुरुवात

३. खोट्या धर्माच्या नाशानंतर यहोवाच्या लोकांवर कोणता हल्ला केला जाईल?

खोट्या धर्माच्या नाशानंतर सैतान व त्याच्या जगातील वेगवेगळे घटक यहोवाच्या सेवकांवर हल्ला करतील. शास्त्रवचनांत “मागोग देशातील गोग” याच्याबद्दल असे सांगितले आहे: “तू तुफानासारखा चालून येशील, भूमीला मेघ झाकतो त्यासारखा तू होशील; तू, तुझे सर्व सेनासमूह व तुजसह अनेक राष्ट्रांचे लोक.” यहोवाच्या साक्षीदारांकडे कोणतेही शस्त्रधारी सैन्य नाही आणि त्यांना पृथ्वीवरील सर्वात शांतिप्रिय लोक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे, त्यांचा सहज नाश करता येईल असे भासेल. पण, त्यांच्यावर हल्ला करणे खरेतर सर्वात मोठी चूक असेल.—यहे. ३८:१, २, ९-१२.

४, ५. सैतान जेव्हा यहोवाच्या सेवकांचा नाश करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा यहोवा काय करेल?

देवाच्या लोकांचा नाश करण्यासाठी सैतान जे काही करेल त्याप्रती देवाची कशी प्रतिक्रिया असेल? यहोवा त्याच्या लोकांकरता कार्य करेल आणि सबंध विश्वाचा सर्वोच्च शासक या नात्याने त्याच्या अधिकाराचा वापर करेल. यहोवाच्या सेवकांवर केलेला हल्ला जणू त्याच्यावरच केलेला आहे असे तो समजतो. (जखऱ्या २:८ वाचा.) त्यामुळे आपला स्वर्गीय पिता आपला बचाव करण्यासाठी लगेच पाऊल उचलेल. शेवटी, “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या” दिवसाच्या लढाईत म्हणजेच हर्मगिदोनात सैतानाच्या जगाचा नाश केला जाईल.—प्रकटी. १६:१४, १६.

हर्मगिदोनासंबंधी बायबलच्या एका भविष्यवाणीत असे म्हटले आहे: “परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करत आहे, मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालत आहे, व दुष्टांस तरवारीच्या स्वाधीन करत आहे, असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अती दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल. त्या दिवशी परमेश्वराने संहारलेले, पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्यांकरता कोणी शोक करणार नाही, त्यांस कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.” (यिर्म. २५:३१-३३) हर्मगिदोनाद्वारे या दुष्ट जगाचा नाश केला जाईल. सैतानाच्या जगाचा लवलेशही राहणार नाही, पण यहोवाच्या संघटनेचा पृथ्वीवरील भाग सुखरूप बचावेल.

यहोवाच्या संघटनेत आज इतकी वाढ का होत आहे?

६, ७. (क) मोठ्या लोकसमुदायातील लोक कोठून येतात? (ख) अलीकडच्या वर्षांत साक्षीदारांच्या संख्येत किती वाढ झाली आहे?

यहोवाची संघटना ही त्याची पसंती मिळालेल्या लोकांनी बनलेली असल्यामुळेच ही संघटना या पृथ्वीवर टिकून आहे आणि तिच्यात वाढ होत आहे. बायबल असे आश्वासन देते: “परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात.” (१ पेत्र ३:१२) या नीतिमानांमध्ये एक “मोठा लोकसमुदाय” समाविष्ट आहे जो “मोठ्या संकटातून” सुरक्षित बचावेल. (प्रकटी. ७:९, १४) त्यांना फक्त “लोकसमुदाय” नाही, तर “मोठा लोकसमुदाय” म्हणण्यात आले आहे. म्हणजेच त्यांची संख्या फार मोठी असेल. हर्मगिदोनमधून बचावणाऱ्या या लोकांमध्ये तुम्ही स्वतःलाही पाहू शकता का?

मोठ्या लोकसमुदायातील हे लोक कोठून येतात? येशूने त्याच्या उपस्थितीबद्दल केलेल्या भविष्यवाणीत काही चिन्हांचा उल्लेख केला होता. मोठ्या लोकसमुदायातील लोकांना एकत्रित करण्यात येते हे खरेतर त्या चिन्हांपैकीच एक आहे. येशूने असे म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्त. २४:१४) या शेवटल्या दिवसांत देवाच्या संघटनेचे हेच मुख्य कार्य आहे. सबंध जगात चाललेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार व शिकवण्याच्या कार्यामुळे लाखो लोकांनी “आत्म्याने व खरेपणाने” देवाची उपासना करण्याचे शिकून घेतले आहे. (योहा. ४:२३, २४) उदाहरणार्थ, मागील दहा वर्षांच्या काळादरम्यान म्हणजे  २००३ ते २०१२ या सेवा वर्षांदरम्यान २७,०७,००० पेक्षा जास्त लोकांनी देवाला केलेल्या त्यांच्या समर्पणाचे प्रतीक म्हणून बाप्तिस्मा घेतला आहे. जगभरात आता ७९,००,००० पेक्षाही जास्त साक्षीदार आहेत आणि लाखो लोक त्यांच्या सभांना उपस्थित राहतात, खासकरून दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या स्मारकविधीला. आम्ही संख्येविषयी शेखी मारत नाही कारण “वाढवणारा देव हाच . . . आहे.” (१ करिंथ. ३:५-७) पण, सरत चाललेल्या प्रत्येक वर्षासोबत मोठ्या लोकसमुदायाच्या संख्येत वाढ होत चालली आहे हे अगदीच स्पष्ट आहे.

८. यहोवाच्या संघटनेत आज कशामुळे उल्लेखनीय वाढ होत आहे?

देवाच्या सेवकांच्या संख्येत ही उल्लेखनीय वाढ होत आहे कारण स्वतः यहोवा त्याच्या साक्षीदारांच्या पाठीशी आहे. (यशया ४३:१०-१२ वाचा.) या वाढीबद्दल एका भविष्यवाणीत असे म्हटले होते: “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” (यश. ६०:२२) एके काळी अभिषिक्त शेषजनांची संख्या “लहान” होती, पण इतर आध्यात्मिक इस्राएली लोकांचा देवाच्या संघटनेत जसजसा समावेश होत गेला, तसतशी या संख्येत वाढ झाली. (गलती. ६:१६) पुढील वर्षांत, यहोवाने मोठ्या लोकसमुदायाच्या लोकांना एकत्रित करण्याच्या कामावरही आशीर्वाद दिला. यामुळे त्यांच्याही संख्येत वाढ होत आहे.

यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

९. देवाच्या वचनात सांगितलेले उज्ज्वल भविष्य अनुभवायचे असेल तर काय करणे गरजेचे आहे?

आपण अभिषिक्त ख्रिश्चन असो किंवा मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य, देवाने दिलेल्या अभिवचनांनुसार आपण सर्वच एक उज्ज्वल भविष्य अनुभवू शकतो. पण, याकरता आपल्याला यहोवाच्या अपेक्षांप्रमाणे जीवन जगावे लागेल. (यश. ४८:१७, १८) मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणाऱ्या इस्राएली लोकांचा विचार करा. इस्राएली लोकांचे रक्षण व्हावे हा या नियमशास्त्राचा एक उद्देश होता. त्यात लैंगिक संबंधांबद्दल, व्यापारात प्रामाणिक राहण्याबद्दल, मुलांचे संगोपन करण्याबद्दल, इतर लोकांशी चांगला व्यवहार करण्याबद्दल आणि असे बरेच हितकारक नियम दिले होते. (निर्ग. २०:१४; लेवी. १९:१८, ३५-३७; अनु. ६:६-९) आज आपण देवाच्या अपेक्षांप्रमाणे जगत असल्यामुळे आपल्यालाही अनेक फायदे होतात आणि त्याच्या आज्ञा पाळणे आपल्याला नक्कीच कठीण वाटत नाही. (१ योहान ५:३ वाचा.) ज्या प्रकारे नियमशास्त्रामुळे इस्राएली लोक सुरक्षित राहिले त्याच प्रकारे जर आपणही यहोवा देवाच्या नियमांचे आणि तत्त्वांचे पालन केले तर आपण सुरक्षित राहू. इतकेच नव्हे तर यामुळे आपल्याला “विश्वासात खंबीर” राहणेही शक्य होईल.—तीत १:१४.

१०. वैयक्तिक बायबल अभ्यासासाठी आणि कौटुंबिक उपासनेसाठी वेळ काढणे महत्त्वाचे का आहे?

१० यहोवाच्या संघटनेचा पृथ्वीवरील भाग वेगवेगळ्या मार्गांनी पुढे वाटचाल करत आहे. उदाहरणार्थ, बायबलच्या सत्याबद्दलची आपली समज सतत स्पष्ट होत चालली आहे. हे अपेक्षितच आहे कारण, “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.” (नीति. ४:१८) पण, आपण स्वतःला विचारले पाहिजे: ‘शास्त्रवचनांतील सत्यासंबंधी जेव्हा नवीन समज दिली जाते तेव्हा त्यानुसार मी माझ्या विचारसरणीत फेरबदल करतो का? दररोज बायबल वाचण्याची माझी सवय आहे का? आपल्या सर्व प्रकाशनांचे मी उत्सुकतेने वाचन करतो का? मी माझ्या कुटुंबासोबत दर आठवडी कौटुंबिक उपासना करतो का?’ आपल्यापैकी बरेच जण हे मान्य करतील की या गोष्टी करणे इतके अवघड नाही. त्यासाठी फक्त ठरावीक वेळ बाजूला काढण्याची गरज आहे. मोठे संकट जवळ येत असताना, शास्त्रवचनांचे अचूक ज्ञान घेणे, त्याचा अवलंब करणे आणि आध्यात्मिक प्रगती करणे पूर्वी कधी नव्हे इतके आता जरुरीचे आहे!

११. प्राचीन काळातील सण व आपल्या काळातील सभा, संमेलने आणि अधिवेशने ही कोणत्या मार्गांनी फायदेकारक ठरली आहेत?

११ यहोवाची संघटना आपल्याला प्रेषित पौलाच्या सल्ल्याचे अनुकरण करण्यास आर्जवते, जे खरेतर  आपल्या फायद्यासाठी आहे. त्याने असे म्हटले: “प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री १०:२४, २५) इस्राएली लोकांचे वार्षिक सण व उपासनेच्या इतर सभा यांमुळे त्यांना आध्यात्मिक रीत्या उभारी मिळायची. शिवाय, नहेम्याच्या काळात साजरा करण्यात आलेल्या मांडवांच्या सणासारखे खास मेळावे त्यांच्याकरता खूप आनंददायक होते. (निर्ग. २३:१५, १६; नहे. ८:९-१८) आज सभांमुळे, संमेलनांमुळे आणि अधिवेशनांमुळे आपल्यालाही त्यांच्यासारखेच फायदे होतात. तर मग, आध्यात्मिक रीत्या सुदृढ व आनंदी राहण्याकरता आपण या तरतुदींचा पुरेपूर फायदा उठवू या.—तीत २:२.

१२. राज्य प्रचाराच्या कामाबद्दल आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे?

१२ यहोवाच्या संघटनेच्या सहवासात असताना आपण आनंदाने “देवाच्या सुवार्तेचा” प्रचार करतो. (रोम. १५:१६) या पवित्र कामात सहभागी होण्याद्वारे आपण “पवित्र” देव यहोवा याचे “सहकारी” बनतो. (१ करिंथ. ३:९; १ पेत्र १:१५) सुवार्ता घोषित केल्यामुळे यहोवाच्या पवित्र नावाचे गौरव होते. खरोखरच, “धन्यवादित देवाच्या गौरवाची . . . सुवार्ता” घोषित करण्याचा बहुमान खूप मोठा आहे.—१ तीम. १:११.

१३. चांगले आध्यात्मिक आरोग्य आणि जीवन हे कशावर अवलंबून आहे?

१३ यहोवाला जडून राहून आणि त्याच्या संघटनेच्या वेगवेगळ्या कार्यांना पाठिंबा देऊन आपण आपले आध्यात्मिक आरोग्य टिकवून ठेवावे अशी यहोवाची इच्छा आहे. मोशेने इस्राएली लोकांना असे सांगितले होते: “आकाश व पृथ्वी यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील; तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल.” (अनु. ३०:१९, २०) यहोवाची इच्छा पूर्ण करणे, त्याच्यावर प्रेम करणे, आज्ञाधारकपणे त्याचे ऐकणे आणि त्याला जडून राहणे यावरच आपले जीवन अवलंबून आहे.

१४. देवाच्या संघटनेबद्दल एका बांधवाने कोणत्या भावना व्यक्त केल्या?

१४ बंधू प्राइस ह्यूझ जे त्यांच्या निर्धारानुसार देवाला जडून राहिले आणि त्याच्या संघटनेसोबत चालत राहिले, त्यांनी एकदा असे लिहिले: “१९१४ च्या काही काळाआधीपासूनच मला यहोवाच्या उद्देशांबद्दलची माहिती मिळाली होती, यासाठी मी खरंच खूप कृतज्ञ आहे. . . . एक गोष्ट जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे यहोवाच्या दृश्य संघटनेला जडून राहणं. मानवांच्या मतांवर भरवसा ठेवणं किती चुकीचं आहे हे मला माझ्या अनुभवावरून कळलं. आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी या भरवशालायक संघटनेला जडून राहण्याचा निर्धार केला. यहोवाची कृपापसंती आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्याचा दुसरा कोणता मार्ग असू शकतो?”

देवाच्या संघटनेसोबत पुढे वाटचाल करत राहा

१५. बायबलच्या विषयांबद्दल आपली समज सुधारली जाते तेव्हा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे शास्त्रवचनांतील एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.

१५ आपल्याला जर व्यक्तिगत रीत्या यहोवाची कृपापसंती आणि त्याचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्याच्या संघटनेला पाठिंबा देणे गरजेचे आहे. तसेच, जेव्हा शास्त्रवचनांबद्दलची आपली समज सुधारण्यात येते तेव्हा त्याप्रमाणे आपल्या विचारसरणीत फेरबदल करणेही महत्त्वाचे आहे. एका उदाहरणाकडे लक्ष द्या: येशूच्या मृत्यूनंतर असे हजारो यहुदी ख्रिश्चन होते ज्यांना नियमशास्त्राबद्दल खूप आवेश होता आणि त्यातील नियमांचे पालन करण्याचे सोडून देणे त्यांना खूप कठीण वाटत होते. (प्रे. कृत्ये २१:१७-२०) पण, पौलाने इब्री लोकांना पाठवलेल्या पत्रामुळे त्यांना ही गोष्ट स्वीकारण्यास मदत मिळाली की त्यांना,  “नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पिण्यात येतात” त्या बलिदानांमुळे नव्हे, तर “येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र” करण्यात आले आहे. (इब्री १०:५-१०) यहुदी कुळातून आलेल्या त्या ख्रिश्चनांपैकी बहुतेकांनी त्यांच्या विचारसरणीत फेरबदल केला आणि ते आध्यात्मिक रीत्या पुढे वाटचाल करत राहिले. त्याचप्रमाणे, जेव्हा आपल्याला बायबलविषयी सुधारित समज दिली जाते किंवा प्रचार कार्याशी संबंधित काही फेरबदल केले जातात, तेव्हा ते समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी आपण परिश्रमपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि खुल्या मनाने विचार करण्यास तयार असले पाहिजे.

१६. (क) कोणत्या आशीर्वादांमुळे नवीन जगातील जीवन हे आनंदविणारे असेल? (ख) नवीन जगात कोणते आशीर्वाद उपभोगण्यास तुम्ही उत्सुक आहात?

१६ जे लोक यहोवाला आणि त्याच्या संघटनेला एकनिष्ठ राहतात त्यांच्यावर तो आशीर्वादांचा वर्षाव करत राहील. विश्वासू अभिषिक्त जन ख्रिस्ताचे सहराजे या नात्याने स्वर्गात मोठ्या सुहक्कांचा आनंद घेतील. (रोम. ८:१६, १७) तुम्हाला पृथ्वीवर जगण्याची आशा असल्यास नंदनवनात जगणे किती आनंदविणारे असेल याची कल्पना करा. यहोवाच्या संघटनेचे सदस्य या नात्याने, नवीन जगाविषयी इतरांना सांगण्यास आपल्याला किती आनंद होतो! (२ पेत्र ३:१३) स्तोत्र ३७:११ यात सांगितले आहे: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” लोक “घरे बांधून त्यांत राहतील” आणि त्यांच्या “हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.” (यश. ६५:२१, २२) यापुढे जुलूम, गरिबी आणि उपासमार या समस्या राहणार नाहीत. (स्तो. ७२:१३-१६) मोठी बाबेल कोणालाही फसवणार नाही कारण तिचे अस्तित्वच राहणार नाही. (प्रकटी. १८:८, २१) जे मरण पावले आहेत त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि सदासर्वकाळ जगण्याची त्यांना संधी दिली जाईल. (यश. २५:८; प्रे. कृत्ये २४:१५) खरोखर, ज्या लाखो लोकांनी यहोवाला त्यांचे जीवन समर्पित केले आहे त्यांच्यासाठी किती रोमांचक आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत! आपल्यालाही जर शास्त्रवचनांतील या आशीर्वादांचा लाभ घ्यायचा असेल तर आपण सतत आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे आणि देवाच्या संघटनेसोबत वाटचाल करत राहिली पाहिजे.

तुम्ही स्वतःला नंदनवनात पाहू शकता का? (परिच्छेद १६ पाहा)

१७. यहोवाची उपासना आणि त्याची संघटना यांप्रती आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे?

१७ जगाचा अंत जवळ येत असताना, आपण विश्वासात खंबीर राहू या आणि उपासनेसंबंधी देवाने जी व्यवस्था केली आहे तिच्याप्रती मनापासून कदर बाळगू या. स्तोत्रकर्ता दाविदानेही अशीच मनोवृत्ती दाखवली. त्याने लिहिले: “परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.” (स्तो. २७:४) तर मग, आपण सर्व जण देवाला जडून राहून त्याच्या संघटनेसोबत व त्याच्या लोकांसोबत पुढे वाटचाल करत राहू या.