व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 जीवन कथा

यहोवानं मला खरोखर साहाय्य केलं

यहोवानं मला खरोखर साहाय्य केलं

माझी नववधू एव्हलिन हिच्यासह मी रेल्वेनं प्रवास करून हॉर्नपेन या गावी येऊन पोचलो. हे गाव कॅनडातील आँटेरियोच्या उत्तर दिशेला असलेल्या ग्रामीण भागात आहे. आम्ही अगदी पहाटेच पोचलो होतो. कडाक्याची थंडी होती. स्थानिक मंडळीचे एक बंधू आम्हाला घ्यायला आले होते. त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या घरी गेलो. ते, त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा यांच्यासोबत मिळून पोटभर न्याहारी केल्यावर, आम्ही बर्फानं झाकलेल्या रस्त्यावरून चालत घरोघरचं साक्षकार्य करण्यासाठी गेलो. त्या दिवशी दुपारी मी एक विभागीय पर्यवेक्षक या नात्यानं माझं पहिलं जाहीर भाषण दिलं. त्या सभेला आम्हा पाच जणांशिवाय आणखी कुणीच आलं नव्हतं.

खरं पाहता, १९५७ साली माझं ते भाषण ऐकायला इतके कमी लोक होते याचं मला मुळीच वाईट वाटलं नाही. कारण, सुरुवातीपासूनच मी अत्यंत लाजाळू स्वभावाचा होतो. लहान असताना तर आमच्या घरी पाहुणे आले, की मी कुठंतरी लपून बसायचो, मग त्यांना मी ओळखत असलो तरीही.

पण, तुम्हाला हे जाणून कदाचित आश्चर्य वाटेल, की यहोवाच्या संघटनेतील माझ्या बहुतेक नेमणुकींत मला सतत इतर लोकांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याशी संवाद करणं भाग होतं. या लोकांत बांधवांचा आणि अनोळखी लोकांचाही समावेश होता. पण, माझ्या बुजऱ्या व भित्र्या स्वभावावर मात करण्याचा मी आजवर प्रयत्न करतच आहे. त्यामुळे, या सर्व नेमणुकींत मला जे काही यश मिळालं त्याचं श्रेय मी स्वतः घेऊ शकत नाही. उलट, यहोवा देवाचं पुढील आश्वासन किती खरं आहे हे मला अनुभवायला मिळालं: “मी तुला सबळ करीन, होय, मी तुझे साहाय्य करीन, होय, मी आपल्या न्यायीपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.” (यश. ४१:१०, पं.र.भा.) यहोवानं मला ज्याद्वारे साहाय्य केलं असा एक सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे ख्रिस्ती बंधुभगिनींचं पाठबळ. अगदी लहानपणापासून मला बंधुभगिनींकडून कशा प्रकारे मदत मिळाली याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो.

त्या बायबलचा आणि एका काळ्या वहीचा वापर करायच्या

आँटेरियोच्या दक्षिणपश्‍चिम भागात असलेल्या आमच्या शेतमळ्यावर

१९४० च्या दशकात एका रविवारी सकाळी एल्सी हंटिंगफर्ड यांनी आँटेरियोच्या दक्षिणपश्‍चिम भागात असलेल्या आमच्या शेतमळ्यावर  आमच्या कुटुंबाला भेट दिली. माझ्या आईनं दार उघडलं. माझे बाबा स्वभावानं माझ्यासारखेच लाजाळू असल्यामुळे ते माझ्यासोबत घरातच बसून, बाहेर चाललेलं संभाषण ऐकत होते. दारावर आलेली स्त्री अर्थात बहीण हंटिंगफर्ड ही काहीतरी विकण्यासाठी आली आहे असं त्यांना वाटलं. आम्हाला गरज नसलेल्या वस्तू आई घेईल या विचारानं बाबा शेवटी बाहेर गेले आणि म्हणाले की आम्हाला काहीही नकोय. त्यावर बहीण हंटिंगफर्ड म्हणाल्या: “तुम्हाला बायबलचा अभ्यास करायला आवडणार नाही?” माझे बाबा म्हणाले: “हो, ते आम्हाला नक्कीच आवडेल.”

बहीण हंटिंगफर्ड यांनी आम्हाला अगदी योग्य समयी भेट दिली. माझे आईबाबा कॅनडाच्या युनायटेड चर्चचे खूप आवेशी सदस्य होते, पण अलीकडेच त्यांनी चर्चला राजीनामा देण्याचं ठरवलं होतं. का? कारण चर्चचे पाळक चर्चच्या प्रवेशद्वारावर अनुदान देणाऱ्यांची नावे त्यांनी दिलेल्या रकमेनुसार लावायचे. आम्ही गरीब होतो, त्यामुळे आमचं नाव सहसा यादीच्या अगदी शेवटी यायचं. चर्चचे पाळक आणखी जास्त अनुदान देण्यास आईबाबांना गळ घालायचे. दुसऱ्या एका पाळकानं कबूल केलं की ज्या गोष्टींवर त्याचा खरोखर विश्वास होता त्या तो शिकवत नव्हता, कारण त्याला त्याची नोकरी गमवायची नव्हती. या कारणांमुळे, आम्ही चर्चला राजीनामा दिला. पण, आमची आध्यात्मिक भूक शमविण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो.

त्या काळात कॅनडामध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर बंदी होती. म्हणून बहीण हंटिंगफर्ड आमच्या कुटुंबासोबत केवळ बायबल आणि एका काळ्या वहीत त्यांनी घेतलेल्या टिपणांच्या साहाय्यानं बायबलचा अभ्यास घ्यायच्या. नंतर त्यांना जेव्हा जाणवलं की त्या एक यहोवाच्या साक्षीदार आहेत असं आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना सांगणार नाही तेव्हा त्यांनी आम्हाला बायबल प्रकाशनं दिली. प्रत्येक अभ्यासानंतर आम्ही ही प्रकाशनं काळजीपूर्वक लपवून ठेवायचो. *

घरोघरच्या सेवेदरम्यान माझ्या आईबाबांना सत्य मिळालं आणि १९४८ मध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला

इतका विरोध व अडथळे असतानासुद्धा बहीण हंटिंगफर्ड सुवार्तेचा आवेशानं प्रचार करायच्या. त्यांचा आवेश पाहून मी प्रभावित झालो आणि याच गोष्टीमुळे सत्य स्वीकारण्याचं पाऊल उचलण्यास मला मदत मिळाली. यहोवाचे साक्षीदार म्हणून माझ्या आईबाबांचा बाप्तिस्मा झाला त्याच्या एका वर्षानंतर मी देवाला आपलं जीवन समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला. २७ फेब्रुवारी १९४९ मध्ये, शेतकरी जनावरांना ज्यात पाणी पाजतात त्या लोखंडाच्या टाकीत मला बाप्तिस्मा देण्यात आला. त्या वेळी मी १७ वर्षांचा होतो. बाप्तिस्मा झाल्यानंतर मी पूर्णवेळची सेवा करण्याचा दृढनिश्चय केला.

धाडस दाखवण्यासाठी यहोवानं मला मदत केली

१९५२ मध्ये मला बेथेलमध्ये सेवा करण्याचं आमंत्रण आलं तेव्हा मी आश्चर्यचकित झालो

बाप्तिस्मा झाल्याझाल्या पायनियर सेवा करण्यास मी कचरत होतो. स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आधी काही पैसे कमवले पाहिजे  असं मी स्वतःला समजवलं होतं. म्हणून काही काळासाठी मी एका बँकेत व नंतर एका कार्यालयात काम केलं. पण, तरुण असल्यामुळे जो पैसा मी कमवायचो तो चटकन खर्चही करून टाकायचो. त्यामुळे, बंधू टेड सारजंट यांनी मला धैर्य धरण्यास आणि यहोवावर विश्वास ठेवण्यास आग्रह केला. (१ इति. २८:१०) त्या प्रेमळ सल्ल्यामुळे मी नोव्हेंबर १९५१ पासून पायनियर सेवा सुरू केली. माझ्याकडे केवळ ४० डॉलर्स, एक जुनी सायकल आणि एक नवीन पेटी होती. पण, मला ज्या गोष्टींची गरज होती त्या सर्व गोष्टी यहोवानं नेहमी मला पुरवल्या. टेड यांनी मला पायनियर सेवा सुरू करण्यासाठी जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी खरंच त्यांचा ऋणी आहे! पायनियर सेवा सुरू केल्यामुळे मला पुढं बऱ्याच आशीर्वादांचा अनुभव घेता आला.

१९५२ च्या ऑगस्ट महिन्यात, एका संध्याकाळी मला टराँटो येथून फोन आला. कॅनडा येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयानं मला सप्टेंबरपासून तिथं येऊन सेवा करण्याचं आमंत्रण दिलं. मी लाजाळू स्वभावाचा होतो आणि बेथेलला केव्हाही गेलो नव्हतो. पण, इतर पायनियर बंधुभगिनींनी मला बेथेलविषयी फार चांगल्याचांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे तिथं जाण्यास मी खूप उत्सुक होतो आणि तिथल्या जीवनाला मी लगेच रुळलो.

“तुला बांधवांची काळजी आहे हे त्यांना दाखव”

बेथेलला आल्यावर दोन वर्षांनंतर, बिल येकस यांच्या जागी मला टराँटोच्या शॉ युनिटमध्ये मंडळी सेवक (आता ज्याला वडील वर्गाचा संयोजक म्हटलं जातं) म्हणून नेमण्यात आलं. * मी फक्त २३ वर्षांचा होतो आणि मी खेड्यातून आलो आहे, मला काहीच येत नाही असं मला वाटत होतं. पण, बंधू येकस यांनी नम्रपणे व प्रेमळपणे मला सगळी कामं शिकवली. आणि खरंच यहोवानं मला मदत केली.

ठेंगणे व दणकट व्यक्तिमत्त्व व चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असलेले बंधू येकस यांना लोकांबद्दल आस्था होती. त्यांचं बंधुभगिनींवर खूप प्रेम होतं आणि बंधुभगिनीही त्यांच्यावर प्रेम करायचे. बंधू येकस नियमितपणे बंधुभगिनींना, मग ते समस्येत असोत वा नसोत जाऊन भेटायचे. हीच गोष्ट करण्याचं प्रोत्साहन बंधू येकस यांनी मला दिलं. शिवाय, त्यांनी मला बंधुभगिनींसोबत क्षेत्र सेवेत काम करण्यासही सांगितलं. ते म्हणाले: “केन, तुला बांधवांची काळजी आहे हे त्यांना दाखव. यामुळे तुझ्या कमतरतेचा विचार तुझ्या मनात घोळत राहणार नाही.”

माझ्या पत्नीनं एकनिष्ठ प्रेम दाखवलं

जानेवारी १९५७ पासून यहोवानं मला एका खास मार्गानं मदत केली आहे. त्या महिन्यात माझं लग्न एव्हलिनसोबत झालं जी गिलियड प्रशालेच्या १४ व्या वर्गातून पदवीधर झाली होती. आमचं लग्न होण्याआधी ती फ्रेंच भाषा बोलल्या जाणाऱ्या क्विबेक राज्यात सेवा करत होती. त्या काळात क्विबेकवर रोमन कॅथलिक चर्चचा मोठ्या प्रमाणात दबदबा होता. यामुळे तिथं सेवा करणं एव्हलिनला खूप कठीण होतं, पण तिनं तिची नेमणूक प्रामाणिकपणे पार पाडली व यहोवाला एकनिष्ठ राहिली.

१९५७ मध्ये मी एव्हलिनसोबत लग्न केलं

शिवाय, एव्हलिन मलाही एकनिष्ठ राहिली आहे. (इफिस. ५:३१) खरंतर लग्न झाल्याझाल्या तिच्या एकनिष्ठेची परीक्षा झाली! लग्नानंतर आम्ही अमेरिकेतील फ्लोरिडा इथं फिरायला जाण्याचं ठरवलं होतं. पण, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी शाखा कार्यालयानं मला एक आठवडा चालणार असलेल्या सभेला उपस्थित राहण्यासाठी कॅनडा बेथेलला जाण्यास सांगितलं. ही सभा आमच्या योजनांच्या आड येत होती. पण, यहोवा आम्हाला जे काही करण्यास सांगत आहे ते पूर्ण करण्याची आम्हा दोघांना इच्छा होती. त्यामुळे आम्ही हनिमूनला जाण्याचा आमचा बेत रद्द केला. त्या एका आठवड्यादरम्यान एव्हलिननं बेथेलजवळ असलेल्या क्षेत्रात प्रचार  कार्य केलं. हे क्षेत्र क्विबेकपेक्षा अगदी वेगळं असलं तरी ती चिकाटीनं सेवा करत राहिली.

त्या आठवड्याच्या शेवटी मला आश्चर्याचा एक धक्का बसला. मला आँटेरियोच्या उत्तर भागात विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. माझं नुकतंच लग्न झालं होतं, मी फक्त २५ वर्षांचा होतो आणि मला कसलाही अनुभव नव्हता. पण तरीही यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून आम्ही तिथं जाण्यास निघालो. कॅनडामध्ये त्या वेळी कडाक्याची थंडी होती. त्या रात्री आम्ही ज्या ट्रेननं प्रवास करणार होतो त्यात बरेच अनुभवी विभागीय पर्यवेक्षक होते जे आपआपल्या नेमलेल्या ठिकाणी परतत होते. त्यांनी आम्हाला खूप उत्तेजन दिलं! आम्हाला पूर्ण रात्र बसून काढावी लागू नये म्हणून एका बांधवानं तर त्याच्या आरक्षित असलेल्या बर्थवर आम्ही झोपावं असा आग्रह केला. दुसऱ्या दिवशी सकाळी, लग्नाच्या १५ दिवसांनंतर, लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही हॉर्नपेनमध्ये असलेल्या एका लहानशा गटाला भेट दिली.

पुढे आमच्या जीवनात बऱ्याच गोष्टी बदलणार होत्या. १९६० च्या शेवटी प्रांतीय कार्य करत असताना मला गिलियड प्रशालेच्या ३६ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. हा वर्ग दहा महिने चालणार होता आणि तो अमेरिकेतील ब्रुकलिन येथे, फेब्रुवारी १९६१ च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार होता. साहजिकच मी अतिशय आनंदी होतो, पण एव्हलिनला आमंत्रण मिळालेलं नाही या गोष्टीमुळे माझ्या आनंदात विरजण पडलं. आमंत्रण न मिळालेल्या इतर पत्नींप्रमाणे, ती कमीतकमी दहा महिने माझ्यापासून वेगळी राहण्यास तयार आहे असं एक पत्र तिलाही लिहिण्यास सांगण्यात आलं. एव्हलिनला रडू आवरेना. पण, मी प्रशालेला जावं असं आम्ही दोघांनी ठरवलं. गिलियड प्रशालेमुळे मला मौल्यवान प्रशिक्षण मिळेल याबद्दल ती खूप खूश होती.

या काळादरम्यान एव्हलिननं कॅनडा शाखा कार्यालयात सेवा केली. बेथेलमध्ये एव्हलिनला मार्गरेट लव्हल या अभिषिक्त बहिणीसोबत राहण्याचा सुहक्क लाभला. साहजिकच आम्हा दोघांना एकमेकांची खूप आठवण यायची. पण यहोवाच्या मदतीमुळे आम्ही आमच्या तात्पुरत्या काळासाठी असलेल्या नेमणुकींत रुळलो. यहोवाकरता आणि त्याच्या संघटनेकरता आणखी उपयोगी व्हावं म्हणून एकमेकांसोबत घालवण्याच्या वेळेचा स्वखुशीनं त्याग करण्यास ती तयार होती. ही गोष्ट माझ्या मनाला भिडली.

गिलियडला गेल्याच्या सुमारे तीन महिन्यांनंतर बंधू नेथन नॉर, जे त्या काळात जगभरातील कार्याचं नेतृत्व करायचे त्यांनी माझ्यासमोर एक अनपेक्षित प्रस्ताव मांडला. मी ताबडतोब गिलियड प्रशालेचा वर्ग सोडून कॅनडा बेथेलमध्ये राज्य सेवा प्रशालेचा प्रशिक्षक म्हणून तात्पुरत्या काळासाठी कार्य करण्यास तयार आहे का असं त्यांनी विचारलं. त्यांनी मला सांगितलं की मी या आमंत्रणाचा स्वीकार केलाच पाहिजे असं काही नाही. माझी इच्छा असल्यास मी गिलियड प्रशालेचा वर्ग पूर्ण करून, नंतर कदाचित एक मिशनरी म्हणून जिथं नेमण्यात येईल तिथं सेवा करू शकतो. त्यांनी मला ही गोष्टदेखील सांगितली की जर मी कॅनडाला परत जाण्याचं ठरवलं तर कदाचित मला पुन्हा कधीही गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्यास मिळणार नाही आणि काही काळानं मला बहुधा पुन्हा एकदा कॅनडातील क्षेत्रात नेमण्यात येईल. मी आणि माझ्या पत्नीनं विचार करून निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलं.

देवाच्या सेवेतील नेमणुकींबद्दल एव्हलिनचा काय दृष्टिकोन आहे हे तिनं मला आधीच सांगितलं असल्यामुळे मी लगबगीनं बंधू नॉर यांना म्हणालो: “यहोवाची संघटना आम्हाला जे काही करण्यास सांगेल ते आम्ही आनंदानं करू.” आम्ही पहिल्यापासून असा दृष्टिकोन बाळगला आहे की आपल्या आवडीनिवडी काहीही असल्या तरी यहोवाची संघटना आपल्याला जिथं जाण्यास सांगेल तिथं आपण गेलं पाहिजे.

 तेव्हा एप्रिल १९६१ मध्ये मी ब्रुकलिनहून कॅनडाला, राज्य सेवा प्रशालेमध्ये एक प्रशिक्षक म्हणून सेवा करण्यास परत आलो. कालांतराने, आम्ही बेथेल कुटुंबाचे सदस्य म्हणून सेवा करू लागलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही काळानंतर मला गिलियड प्रशालेच्या ४० व्या वर्गासाठी आमंत्रित करण्यात आलं, जो १९६५ मध्ये सुरू होणार होता. एव्हलिनला पुन्हा एकदा ती माझ्यापासून वेगळी राहण्यास तयार आहे असं पत्र लिहावं लागलं. पण, काही आठवड्यांनंतर तिलाही माझ्यासोबत वर्गाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. आम्ही दोघंही खूप खूश झालो.

गिलियड प्रशालेला आल्यानंतर बंधू नॉर यांनी आम्हाला सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषा शिकण्यासाठी आपली नावं दिली आहेत त्यांना आफ्रिकेला पाठवण्यात येईल. पण, आमच्या पदवीदान समारंभात आम्हाला पुन्हा कॅनडालाच नेमण्यात आलं! मला नवीन शाखा पर्यवेक्षक (ज्याला आता शाखा समिती संयोजक म्हटलं जातं) म्हणून नेमण्यात आलं. केवळ ३४ वर्षांचा असल्यामुळे मी बंधू नॉर यांना म्हटलं: “मी खूप लहान आहे.” पण, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. या नवीन नेमणुकीत मी सुरुवातीपासूनच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी बेथेलमधील वयस्क व जास्त अनुभवी बांधवांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करू लागलो.

बेथेल—शिकण्याचं व शिकवण्याचं ठिकाण

बेथेल सेवेमुळे मला इतरांपासून शिकण्याच्या अनेक मौल्यवान संधी लाभल्या आहेत. शाखा समितीमधील इतर सदस्यांचा मी आदर करतो व त्यांच्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं. इथं बेथेलमध्ये व ज्या निरनिराळ्या मंडळ्यांत जाऊन आम्ही सेवा केली आहे त्यांतील बऱ्याच तरुण व वयस्क बंधुभगिनींच्या उदाहरणाचा चांगला प्रभाव माझ्यावर पडला आहे.

कॅनडा बेथेलमध्ये सकाळच्या उपासनेचा कार्यक्रम संचालित करताना

शिवाय, बेथेल सेवेमुळे मला इतरांना शिकवणं व त्यांचा विश्वास मजबूत करणंही शक्य झालं आहे. प्रेषित पौलानं तीमथ्याला असं म्हटलं: “ज्या गोष्टी शिकलास . . . त्या धरून राहा.” तो असंही म्हणाला: “ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे.” (२ तीम. २:२; ३:१४) कधीकधी बंधुभगिनी मला असा प्रश्न विचारतात की ५७ वर्षांच्या बेथेल सेवेदरम्यान मला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तेव्हा मी त्यांना सांगतो की यहोवाची संघटना तुम्हाला जे काही करण्यास सांगते ते लगेच व स्वखुशीनं करा. शिवाय, मदतीसाठी यहोवावर विसंबून राहा.

एक लाजाळू व अनुभव नसलेला तरुण म्हणून मी बेथेलमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवलं, ती अगदी कालपरवाचीच गोष्ट वाटते. पण या सबंध वर्षांदरम्यान यहोवानं जणू माझा “उजवा हात” धरून ठेवला आहे असं वाटतं. खासकरून बंधुभगिनींच्या प्रेमळ व समयोचित मदतीद्वारे यहोवा मला आजही असं आश्वासन देत आहे: “भिऊ नको, मी तुझे साहाय्य करीन.”—यश. ४१:१३, पं.र.भा.

^ परि. 10 २२ मे १९४५ मध्ये कॅनडा सरकारने साक्षीदारांच्या कामावरील बंदी उठवली.

^ परि. 16 त्या काळात, एका शहरात जर एकापेक्षा जास्त मंडळ्या असतील तर प्रत्येक मंडळीला युनिट असे म्हटले जायचे.