व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा सुव्यवस्थेचा देव आहे

यहोवा सुव्यवस्थेचा देव आहे

“देव अव्यवस्था माजवणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे.”—१ करिंथ. १४:३३.

१, २. (क) देवाची पहिली निर्मिती कोण होता आणि यहोवाने त्याचा कशा प्रकारे उपयोग केला? (ख) देवदूत सुसंघटित रीत्या यहोवाची सेवा करतात हे कशावरून दिसून येते?

विश्वाचा निर्माणकर्ता यहोवा सर्वकाही सुव्यवस्थित पद्धतीने करतो. त्याची पहिली निर्मिती असलेल्या त्याच्या एकुलत्या एका आत्मिक पुत्राला “शब्द” म्हणण्यात आले. कारण, प्रामुख्याने त्याच्याच माध्यमाने देवाने आपले संदेश आपल्या इतर सेवकांना कळवले. शब्द म्हटलेल्या या आत्मिक पुत्राने शतकानुशतके यहोवाची सेवा केली आहे. बायबल आपल्याला सांगते: “प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता.” तसेच आपण असेही वाचतो: “सर्व काही त्याच्याद्वारे [शब्दाद्वारे] झाले आणि जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही.” सुमारे २,००० वर्षांपूर्वी, देवाने शब्द म्हटलेल्या त्याच्या आत्मिक पुत्राला पृथ्वीवर पाठवले, जेथे येशू ख्रिस्त या परिपूर्ण मनुष्याच्या रूपात त्याने पित्याची इच्छा विश्वासूपणे पूर्ण केली.—योहा. १:१-३, १४.

मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी, देवाच्या पुत्राने एक “कुशल कारागीर” या नात्याने विश्वासूपणे कार्य केले. (नीति. ८:३०) त्याच्याद्वारे यहोवाने स्वर्गातील इतर कोट्यवधी देवदूतांना अस्तित्वात आणले. (कलस्सै. १:१६) या देवदूतांविषयी बायबलच्या एका अहवालात आपण असे वाचतो: “हजारो हजार त्याची [यहोवाची] सेवा करत होते, आणि दहा हजार गुणित दहा हजार त्याच्यासमोर उभे राहिले होते.” (दानी. ७:१०, पं.र.भा.) देवाच्या असंख्य दूतांचे वर्णन सुसंघटित ‘सैन्ये’ असे करण्यात आले आहे.—स्तो. १०३:२१.

३. ताऱ्यांची व ग्रहांची एकूण संख्या किती मोठी आहे आणि त्यांची रचना कशा प्रकारे करण्यात आली आहे?

 भौतिक विश्व, उदाहरणार्थ असंख्य तारे व ग्रह यांविषयी काय म्हणता येईल? ह्यूस्टन, टेक्सास येथील क्रॉनिकल या दैनिकात ग्रहताऱ्यांविषयी केलेल्या एका अलीकडील अभ्यासाविषयी सांगण्यात आले होते. या अभ्यासानुसार असे सुचवण्यात येते की विश्वातील ताऱ्यांची एकूण संख्या ही शास्त्रज्ञांनी बांधलेल्या अंदाजापेक्षा तीन पटीने जास्त आहे. या दैनिकात पुढे असे सांगण्यात आले की ही संख्या “तीन या संख्येपुढे २३ शून्य इतकी आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत दहा हजार कोटी या संख्येचा तीन लाख कोटीने गुणाकार केल्यावर मिळणारी संख्या इतकी आहे.” विश्वात ताऱ्यांची अगदी सुव्यवस्थित रीत्या रचना करण्यात आली आहे. असंख्य ताऱ्यांच्या मिळून आकाशगंगा बनतात. प्रत्येक आकाशगंगेत कोट्यवधी तारे व अनेक ग्रह आहेत. शिवाय, बहुतेक आकाशगंगांचे मिळून लहान किंवा मोठे तारकासमूह तयार होतात.

४. पृथ्वीवरही देवाचे सेवक सुसंघटित असले पाहिजेत असे का म्हणता येईल?

स्वर्गात देवाची सेवा करणाऱ्या देवदूतांप्रमाणेच भौतिक विश्वातील ग्रहतारे हेदेखील अतिशय सुव्यवस्थित रीत्या कार्य करतात. (यश. ४०:२६) त्यामुळे, साहजिकच पृथ्वीवरही देवाचे सेवक सुसंघटित असले पाहिजेत अशी अपेक्षा आपण करू शकतो. त्यांनी सुव्यवस्थित रीत्या कार्य करावे अशी यहोवाची इच्छा आहे. आणि असे करणे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे कारण त्यांना फार महत्त्वाचे असे कार्य सोपवण्यात आले आहे. गतकाळात आणि सध्याच्या काळातही यहोवाच्या सेवकांनी विश्वासूपणे त्याची सेवा केली आहे. त्यांच्या उदाहरणावरून, अगदी स्पष्ट होते की यहोवा त्यांच्या पाठीशी आहे आणि तो “अव्यवस्था माजवणारा नाही; तर . . . शांतीचा देव आहे.”—१ करिंथकर १४:३३, ४० वाचा.

देवाचे प्राचीन काळातील सुसंघटित लोक

५. मानव व पृथ्वी यांविषयीची यहोवाची इच्छा कशामुळे पूर्ण होऊ शकली नाही?

यहोवाने पहिल्या मानवांना निर्माण केले तेव्हा त्याने त्यांना म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्प. १:२८) मानवी कुटुंबाची अगदी सुव्यवस्थित रीत्या वाढ व्हावी आणि त्यांनी सबंध पृथ्वी व्यापून ती एदेन बागेतील नंदनवनासारखी करावी अशी यहोवाची इच्छा होती. पण, आदाम व हव्वा यांनी यहोवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे तात्पुरत्या काळासाठी यहोवाची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. (उत्प. ३:१-६) काही काळाने, “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले.” परिणामस्वरूप, “देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.” म्हणूनच, देवाने सबंध जगात एक जलप्रलय आणून दुष्ट लोकांचा नाश करण्याचे ठरवले.—उत्प. ६:५, ११-१३, १७.

६, ७. (क) नोहावर यहोवाची कृपादृष्टी का झाली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) नोहाच्या काळातील सर्व अविश्वासू लोकांचे काय झाले?

पण, नोहा “हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता.” त्यामुळे “नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती.” नोहा “देवाबरोबर चालला,” त्यामुळे यहोवाने त्याला एक मोठे तारू बांधण्याची आज्ञा दिली. (उत्प. ६:८, ९, १४-१६) जलप्रलयातून मानवांचा व प्राण्यांचा बचाव करण्यासाठी या तारवाची खास प्रकारे रचना करण्यात आली होती. नोहाने “परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.” त्याच्या कुटुंबानेही त्याला सहकार्य केले. आणि त्यामुळे त्याने तारवाचे बांधकाम अगदी सुव्यवस्थित रीत्या पार पाडले. नोहाने आपल्या कुटुंबाला तसेच, सर्व पशुपक्ष्यांना तारवात आणल्यानंतर यहोवाने तारवाचे दार बंद केले.—उत्प. ७:५, १६.

इ.स.पू. २३७० या वर्षी जलप्रलय आला तेव्हा यहोवाने “पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही” नष्ट केले, पण विश्वासू नोहा व त्याच्या कुटुंबाला त्याने तारवात सुरक्षित ठेवले. (उत्प. ७:२३) आज पृथ्वीवर असलेले सर्व लोक नोहा, त्याचे पुत्र व त्यांच्या पत्नींचेच वंशज आहेत. पण तारवाबाहेर जे लोक होते त्या सर्वांचा नाश झाला; कारण “नीतिमत्त्वाचा उपदेशक” असलेल्या नोहाचे त्यांनी ऐकले नाही.—२ पेत्र २:५.

सुव्यवस्थित रीत्या कार्य केल्यामुळे आठ लोकांना जलप्रलयातून बचावणे शक्य झाले (परिच्छेद ६, ७ पाहा)

८. इस्राएली लोक सुसंघटित होते असे का म्हणता येईल?

 जलप्रलयाच्या आठ शतकांपेक्षा जास्त काळानंतर देवाने इस्राएली लोकांपासून एक सुसंघटित राष्ट्र तयार केले. इस्राएली लोकांच्या जीवनातील सर्व पैलू, विशेषतः त्यांची उपासना ही  सुव्यवस्थित रीत्या होण्यासाठी देवाने त्यांना नियम दिले. उदाहरणार्थ, इस्राएलमध्ये अनेक याजक व लेवी सेवा करत होते. शिवाय, स्त्रियादेखील “दर्शनमंडपाच्या द्वारापाशी सेवा” करायच्या. (निर्ग. ३८:८) पण, जेव्हा यहोवाने इस्राएली लोकांना कनान देशात प्रवेश करण्यास सांगितले तेव्हा इस्राएली लोकांच्या त्या पिढीने यहोवाशी अविश्वासूपणा केला. त्यामुळे यहोवाने त्यांना सांगितले: “ज्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात [तुमच्यापैकी कोणीही] जाणारच नाही; पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील.” (गण. १४:३०, ३७, ३८) पुढे, देवाने सांगितल्यानुसार मोशेने आपल्यानंतर इस्राएली लोकांचे नेतृत्व करण्यासाठी यहोशवाला नेमले. (गण. २७:१८-२३) यहोशवा इस्राएली लोकांना कनान देशात नेण्याच्या बेतात होता तेव्हा त्याला असे सांगण्यात आले: “खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”—यहो. १:९.

९. यहोवा व त्याच्या लोकांविषयी राहाबचा दृष्टिकोन काय होता?

यहोवाने वचन दिल्याप्रमाणे, यहोशवा जेथे कोठे गेला तेथे यहोवा त्याच्याबरोबर होता. उदाहरणार्थ, यरीहो या कनानी शहराजवळ जेव्हा इस्राएली लोकांनी तळ ठोकला होता तेव्हा काय घडले याचा विचार करा. इ.स.पू. १४७३ मध्ये यहोशवाने दोन हेरांना यरीहो शहराची पाहणी करण्यासाठी पाठवले. तेथे त्यांना राहाब नावाची एक वेश्या भेटली. तिने त्यांना आपल्या घराच्या छतावर लपवले आणि अशा रीतीने यरीहोच्या राजाने त्यांना पकडण्यासाठी ज्या सैनिकांना पाठवले होते त्यांच्यापासून त्या हेरांचा बचाव झाला. राहाब त्यांना म्हणाली: “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे . . . हे मला ठाऊक आहे; कारण . . . तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोऱ्यांचे दोन राजे . . . यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे.” ती पुढे म्हणाली: “तुमचा देव परमेश्वर [“यहोवा,” NW] हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.” (यहो. २:९-११) अशा रीतीने, राहाबने  त्या काळातील यहोवाच्या संघटनेला ओळखले व त्या संघटनेचा स्वीकार केला. त्यामुळे, इस्राएली लोकांनी यरीहोवर कब्जा केला तेव्हा देवाने तिला व तिच्या घराण्याला वाचवले. (यहो. ६:२५) राहाबने विश्वासाने कार्य केले. तसेच तिने यहोवाविषयी व त्याच्या लोकांविषयी आदर असल्याचे दाखवले.

पहिल्या शतकातील एक प्रभावशाली संघटना

१०. येशूने त्याच्या काळातील यहूदी धर्मपुढाऱ्यांना काय सांगितले आणि त्याने असे विधान का केले?

१० यहोशवाच्या नेतृत्वाखाली इस्राएली लोकांनी एकापाठोपाठ एक शहरावर विजय मिळवला आणि कनान देशावर कब्जा केला. पण कालांतराने काय झाले? पुढील शतकांत इस्राएली लोकांनी वारंवार देवाच्या नियमांचे उल्लंघन केले. यहोवाने आपल्या पुत्राला पृथ्वीवर पाठवले त्या काळापर्यंत इस्राएली लोक यहोवाच्या आज्ञांचे फार मोठ्या प्रमाणात उल्लंघन करू लागले होते. तसेच, यहोवाने पाठवलेल्या संदेष्ट्यांचेही ते ऐकायला तयार नव्हते. म्हणूनच, येशूने त्यांना “संदेष्ट्यांचा घात करणाऱ्ये” असे म्हटले. (मत्तय २३:३७, ३८ वाचा.) यहूदी धर्मपुढाऱ्यांनी अविश्वासूपणा केल्यामुळे देवाने त्यांचा धिक्कार केला. याच कारणामुळे येशूने त्यांना सांगितले: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.”—मत्त. २१:४३.

११, १२. (क) पहिल्या शतकात यहोवाने इस्राएल राष्ट्राऐवजी एका नव्या संघटनेवर कृपादृष्टी केली हे कशावरून दिसून येते? (ख) देवाचे पाठबळ असलेल्या या नव्या संघटनेत कोणाचा समावेश होता?

११ इ.स. पहिल्या शतकात यहोवाने अविश्वासू इस्राएल राष्ट्राशी सर्व संबंध तोडून टाकले. पण याचा अर्थ, आता पृथ्वीवर यहोवाच्या विश्वासू लोकांची कोणतीही संघटना नसेल असा नव्हता. कारण इस्राएल राष्ट्राऐवजी यहोवाने एका नव्या प्रभावशाली संघटनेवर आपली कृपादृष्टी केली. ही संघटना येशू ख्रिस्त व त्याच्या शिकवणी यांवर आधारित होती. इ.स. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी या नव्या संघटनेचा जन्म झाला. त्या प्रसंगी येशूचे जवळजवळ १२० शिष्य जेरूसलेममध्ये एका ठिकाणी जमले असताना, “अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले.” त्यानंतर, “वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.” (प्रे. कृत्ये २:१-४) या विलक्षण घटनेमुळे, ख्रिस्ताच्या शिष्यांनी बनलेल्या या नव्या संघटनेला यहोवाचे पाठबळ होते याविषयी कोणतीही शंका उरली नाही.

१२ त्या रोमांचक घटनेनंतर, त्याच दिवशी येशूच्या अनुयायांमध्ये “सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.” शिवाय, “प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे.” (प्रे. कृत्ये २:४१, ४७) पहिल्या शतकातील त्या प्रचारकांचे सेवाकार्य इतके परिणामकारक ठरले, की “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली.” तसेच, “याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासाला मान्यता दिली.” (प्रे. कृत्ये ६:७) अशा रीतीने, अनेक प्रामाणिक मनाच्या लोकांनी या नव्या संघटनेच्या सदस्यांद्वारे घोषित केलेल्या सत्यांचा स्वीकार केला. कालांतराने, यहोवाने ख्रिस्ती मंडळीत विदेशी लोकांचाही समावेश केला. असे करण्याद्वारे त्याने या नव्या संघटनेला आपले पाठबळ असल्याचा आणखी पुरावा दिला.—प्रेषितांची कृत्ये १०:४४, ४५ वाचा.

१३. देवाच्या नव्या संघटनेला कोणते कार्य सोपवण्यात आले होते?

१३ देवाने आपल्यावर कोणते महत्त्वाचे कार्य सोपवले आहे याविषयी ख्रिस्ताच्या अनुयायांच्या मनात कोणतीच शंका नव्हती. येशूने स्वतः त्यांच्याकरता एक उत्तम उदाहरण मांडले होते. त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर त्याने लगेच ‘स्वर्गाच्या राज्याविषयी’ घोषणा करण्यास सुरुवात केली. (मत्त. ४:१७) येशूने आपल्या शिष्यांनाही हेच कार्य करण्यास शिकवले. त्याने त्यांना सांगितले: “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) देवाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे ख्रिस्ताच्या त्या सुरुवातीच्या अनुयायांना पक्के ठाऊक होते. उदाहरणार्थ, पिसिदीयातील अंत्युखिया येथे पौल व बर्णबा यांनी  त्यांच्या यहूदी विरोधकांना धैर्याने सांगितले: “देवाचे वचन प्रथम तुम्हाला सांगावयाचे अगत्य होते; तरी ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करता व आपणाला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्याअर्थी पाहा, आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की, ‘मी तुला परराष्ट्रीयांचा प्रकाश करून ठेवले आहे, यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.’” (प्रे. कृत्ये १३:१४, ४५-४७) देवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागातील त्याचे सेवक, पहिल्या शतकापासून आजपर्यंत देवाने तारणाकरता केलेल्या तरतुदीविषयी लोकांना सांगत आहेत.

अनेकांचा नाश, पण देवाच्या सेवकांचा बचाव

१४. पहिल्या शतकात जेरूसलेममध्ये काय झाले, पण कोणाचा बचाव झाला?

१४ बहुतेक यहुद्यांनी सुवार्तेचा स्वीकार केला नाही. त्यांच्यावर लवकरच एक संकट येणार होते. येशूने आपल्या शिष्यांना याविषयी असा इशारा दिला होता: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांत पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारांत असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये.” (लूक २१:२०, २१) येशूने भाकीत केले होते, तसेच घडले. यहुद्यांनी बंडाळी केल्यामुळे सेस्टियस गॅलसच्या नेतृत्वाखाली रोमी सैन्याने इ.स. ६६ साली जेरूसलेम शहराला वेढा घातला. पण, त्यानंतर अचानक रोमी सैन्याने माघार घेतली. यामुळे येशूच्या अनुयायांना जेरूसलेम व यहूदीयातून बाहेर पडण्याची संधी मिळाली. युसेबियस नावाच्या एका इतिहासकारानुसार बरेच जण यार्देन नदी पार करून पेरियातील पेल्ला या शहरी गेले. इ.स. ७० मध्ये सेनापती टायटस याच्या नेतृत्वाखाली रोमी सैन्याने पुन्हा जेरूसलेमवर हल्ला केला आणि त्याला उद्ध्वस्त केले. पण, विश्वासू ख्रिश्चनांनी येशूच्या इशाऱ्याकडे लक्ष दिल्यामुळे त्यांचा बचाव झाला.

१५. कोणती परिस्थिती असतानासुद्धा ख्रिस्ती विश्वासाचा प्रसार होत गेला?

१५ खडतर परिस्थिती, छळ आणि इतर संकटांमुळे पहिल्या शतकातील ख्रिस्ताच्या अनुयायांच्या विश्वासाची परीक्षा झाली. पण, तरीसुद्धा ख्रिस्ती विश्वासाचा प्रसार होत गेला. (प्रे. कृत्ये ११:१९-२१; १९:१, १९, २०) देवाचा आशीर्वाद असल्यामुळेच त्या सुरुवातीच्या ख्रिश्चनांची आध्यात्मिक रीत्या भरभराट झाली.—नीति. १०:२२.

१६. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने काय करणे गरजेचे होते?

१६ आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला मेहनत घ्यावी लागली. शास्त्रवचनांचा सखोल अभ्यास, उपासनेच्या सभांना नियमित उपस्थित राहणे, आणि राज्य प्रचाराच्या कार्यात आवेशाने सहभागी होणे त्या प्रत्येकासाठी गरजेचे होते. या कार्यांमुळे त्या काळातील यहोवाच्या लोकांच्या आध्यात्मिक समृद्धीत व ऐक्यात भर पडली आणि आजही या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पहिल्या शतकातील सुसंघटित मंडळ्यांतील वडील व सहायक सेवक मंडळीतील सदस्यांना मदत करण्यास उत्सुक होते. त्यांच्या साहाय्यामुळे त्या काळातील ख्रिश्चनांना खूप फायदा झाला. (फिलिप्पै. १:१; १ पेत्र ५:१-४) तसेच, पौलासारखे प्रवासी वडील त्यांच्या मंडळीला भेट देत असतील तेव्हा त्यांना किती आनंद होत असेल याची कल्पना करा! (प्रे. कृत्ये १५:३६, ४०, ४१) खरोखर, पहिल्या शतकातील ख्रिस्ती ज्या प्रकारे उपासना करायचे आणि आज आपण ज्या प्रकारे उपासना करतो त्यात खूप साम्य आहे. पहिल्या शतकाप्रमाणेच आजही यहोवाने आपल्या सेवकांना सुसंघटित केले आहे याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! *

१७. पुढील लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

१७ सैतानाच्या जगाचा अंत जसजसा जवळ येत आहे, तसतसा यहोवाच्या विश्वव्यापी संघटनेचा पृथ्वीवरील भाग अतिशय वेगाने पुढे वाटचाल करत आहे. तुम्हीदेखील यहोवाच्या संघटनेसोबत चालत आहात का? तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का? तुम्हाला हे कसे करता येईल याविषयी पुढील लेखात पाहू या.

^ परि. 16 टेहळणी बुरूज १५ जुलै २००२ अंकातील, “ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात” आणि “ते सत्यात चालत राहतात” हे लेख पाहा. आजच्या काळातील देवाच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागासंबंधी माहिती यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? या माहितीपत्रकात प्रकाशित करण्यात आली आहे.