सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे पालन करा
“लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्त. ७:१२.
१. सेवाकार्यात आपण लोकांशी ज्या प्रकारे वागतो त्यामुळे काही फरक पडतो का? उदाहरण द्या. (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
काही वर्षांपूर्वी फिजीमध्ये एक जोडपे स्मारकविधीच्या निमंत्रण पत्रिकेच्या वाटप मोहिमेत सहभागी झाले होते. ते एका स्त्रीसोबत तिच्या घराबाहेर बोलत असताना पाऊस पडू लागला. बांधवाने त्या स्त्रीला एक छत्री दिली आणि त्याने त्याच्या पत्नीसाठी एक छत्री धरली. ती स्त्री जेव्हा स्मारकविधीला उपस्थित राहिली तेव्हा या जोडप्याला खूप आनंद झाला. ती म्हणाली की तिला त्या साक्षीदारांनी काय सांगितले होते ते फारसे लक्षात नाही पण ते तिच्याशी ज्याप्रमाणे वागले त्याचा तिच्यावर फार चांगला परिणाम झाला. यामुळेच ती स्मारकविधीला उपस्थित राहिली. त्या स्त्रीने इतका चांगला प्रतिसाद का दिला होता? कारण त्या जोडप्याने सुवर्ण नियमाचे पालन केले होते.
२. सुवर्ण नियम काय आहे, आणि आपण त्याचे पालन कसे करू शकतो?
२ सुवर्ण नियम काय आहे? येशूने पुढील शब्दांद्वारे जो सल्ला दिला तो सुवर्ण नियम आहे. त्याने म्हटले: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्त. ७:१२) आपण या नियमाचे पालन कसे करू शकतो? आपण दोन मार्गांनी याचे पालन करू शकतो. पहिला मार्ग म्हणजे आपण स्वतःला असे विचारले पाहिजे, ‘जर मी समोरच्या माणसाच्या जागी असतो तर मी कशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा केली असती?’ त्यानंतर, समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे वागण्याचा होताहोईल तितका प्रयत्न आपण केला पाहिजे.—१ करिंथ. १०:२४.
३, ४. (क) सर्वांशीच वागताना सुवर्ण नियमाचे पालन केले पाहिजे असे का म्हणता येईल? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ आपल्या सहविश्वासू बांधवांसोबत व्यवहार करताना आपण सहसा सुवर्ण नियमाचे पालन करतो. पण, या ठिकाणी येशूने जो सल्ला दिला तो फक्त विश्वासू बांधवांसोबतच्या आपल्या वागणुकीबद्दल होता असे त्यातून सूचित होत नाही. खरेतर, येशूने जेव्हा हा सल्ला दिला तेव्हा सर्वसामान्य लोकांसोबत आणि खासकरून आपल्या वैऱ्यांसोबत आपली वागणूक कशी असली पाहिजे याबद्दल तो बोलत होता. (लूक ६:२७, २८, ३१, ३५ वाचा.) जर आपल्या वैऱ्यांसोबत वागताना सुवर्ण नियमाचे पालन करणे गरजेचे आहे, तर मग लोकांशी, ज्यांच्यापैकी अनेकांची सार्वकालिक जीवनाप्रती योग्य मनोवृत्ती असू शकते, त्यांच्यासोबत व्यवहार करताना या नियमाचे पालन करणे अधिकच गरजेचे नाही का?—प्रे. कृत्ये १३:४८.
४ आता आपण अशा चार प्रश्नांवर चर्चा करणार आहोत जे आपण सेवाकार्य करत असताना लक्षात ठेवले पाहिजेत. मी ज्या व्यक्तींची भेट घेणार आहे त्या कोण आहेत? मी त्यांना कोठे भेटणार आहे? कोणत्या वेळी त्यांची भेट घेणे सर्वात उत्तम ठरेल? त्यांना भेट देताना मी कसे बोलले पाहिजे? या प्रश्नांमुळे लोकांच्या भावना जाणून घेण्यास व त्यानुसार आपल्या वागणुकीत फेरबदल करण्यास कशी मदत होऊ शकते ते आपण पाहणार आहोत.—१ करिंथ. ९:१९-२३.
मी कोणाची भेट घेणार आहे?
५. आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो?
५ आपण सहसा क्षेत्रात लोकांची व्यक्तिगत रीत्या भेट घेतो. प्रत्येक व्यक्तीची पार्श्वभूमी आणि त्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. (२ इति. ६:२९) एखाद्याला सुवार्ता सांगण्याआधी स्वतःला विचारा: ‘जर मी त्याच्या जागी असतो तर त्यानं माझ्याप्रती कसा दृष्टिकोन बाळगावा अशी मी अपेक्षा केली असती? जर त्यानं माझ्याकडे, या परिसरात राहणाऱ्या ‘इतर सर्वांसारखीच आणखी एक व्यक्ती’ या दृष्टीनं पाहिलं असतं तर ते मला आवडलं असतं का? की त्यानं मला एक व्यक्ती म्हणून जाणून घ्यावं अशी मी अपेक्षा केली असती?’ या प्रश्नांवर विचार केल्याने आपल्याला प्रत्येक घरमालकाची व्यक्तिगत पार्श्वभूमी आणि समस्या लक्षात घेऊन त्याच्याशी व्यवहार करणे शक्य होईल.
६, ७. सेवाकार्यात भेटलेली एखादी व्यक्ती खूप भांडखोर आहे असे आपल्याला वाटते तेव्हा आपण काय केले पाहिजे?
६ समोरच्याने आपल्याला एक “नकारात्मक वृत्तीची व्यक्ती” म्हणून ओळखावे अशी कोणाचीही इच्छा नसते. उदाहरणार्थ: ख्रिस्ती या नात्याने आपले “बोलणे सर्वदा कृपायुक्त” असावे या बायबलच्या सल्ल्याचे पालन करण्याचा आपण खूप प्रयत्न करतो. (कलस्सै. ४:६) पण अपरिपूर्ण असल्यामुळे कधीकधी आपण असे काही बोलून जातो ज्याचा आपल्याला नंतर पस्तावा होतो. (याको. ३:२) एखादा दिवस खूप खराब गेल्यामुळे जर आपण कोणाशी कठोरतेने बोललो, तर त्याने आपल्याला एक “उद्धट” किंवा “अविचारी” व्यक्ती समजावे अशी आपली इच्छा नसेल. याउलट, समोरच्याने आपली परिस्थिती समजून घ्यावी अशी आपण अपेक्षा करू. तर मग, आपणदेखील इतरांच्या बाबतीत असाच विचारशीलपणा दाखवू नये का?
७ सेवाकार्यात भेटलेली एखादी व्यक्ती खूप भांडखोर आहे असे आपल्याला वाटते तेव्हा आपणही त्या व्यक्तीची परिस्थिती लक्षात घेऊ नये का? तिला कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत दबावाचा सामना करावा लागत असेल का? किंवा ती व्यक्ती एखाद्या गंभीर आजारपणाचा सामना करत असेल का? अशा अनेक घरमालकांची उदाहरणे आहेत जे सुरुवातीला रागाने बोलले होते. पण, यहोवाच्या लोकांचा सौम्य आणि आदरपूर्वक व्यवहार पाहून, त्यांनी पुढे चांगला प्रतिसाद दिला.—नीति. १५:१; १ पेत्र ३:१५.
८. आपण सर्व प्रकारच्या लोकांना राज्याचा संदेश का सांगितला पाहिजे?
८ सेवाकार्य करताना आपण वेगवेगळ्या पार्श्वभूमींच्या लोकांना भेटतो. उदाहरणार्थ मागील दोन-तीन वर्षांतच टेहळणी बुरूज नियतकालिकात “बायबलने बदलले जीवन!” असे शीर्षक असलेल्या लेखांच्या मालिकेत अनेक अनुभव प्रकाशित झाले आहेत. त्यांपैकी काही अनुभव अशा व्यक्तींचे आहेत जे पूर्वी चोर, दारुडे, गुंड किंवा मादक पदार्थांचे सेवन करणारे होते. तर काही राजकारणी, धार्मिक पुढारी, किंवा करियरलाच जीवनात जास्त महत्त्व देणारे होते. काही तर अनैतिक जीवन जगत होते. असे असूनही त्या सर्वांनी सुवार्ता ऐकली, बायबल अभ्यास स्वीकारला, जीवनात बदल केले आणि सत्यात आले. म्हणून आपण कधीही असा विचार करू नये की विशिष्ट प्रकारचे लोक राज्याचा संदेश स्वीकारणारच नाहीत. (१ करिंथकर ६:९-११ वाचा.) याउलट, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्व प्रकारचे लोक सुवार्तेला योग्य प्रतिसाद देऊ शकतात.—१ करिंथ. ९:२२.
मी लोकांची भेट कोठे घेणार आहे?
९. आपण दुसऱ्यांच्या घराप्रती आदर का दाखवला पाहिजे?
९ आपण सेवाकार्यात लोकांना कोठे भेटतो? आपण सहसा त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटतो. (मत्त. १०:११-१३) जेव्हा लोक आपल्या घराप्रती आणि आपल्या वैयक्तिक मालमत्तेप्रती आदर दाखवतात तेव्हा आपल्याला चांगले वाटते. शेवटी आपल्यासाठी आपले घर खूप महत्त्वाचे असते. आपली इच्छा असते की ते आपल्यासाठी एकांताचे आणि सुरक्षेचे ठिकाण असावे. आपण आपल्या शेजाऱ्यांच्या घराप्रतीही असाच आदर दाखवला पाहिजे. घरोघरच्या सेवेत आपण त्यांच्या घराप्रती आदर दाखवतो का, याचा आपण विचार केला पाहिजे.—प्रे. कृत्ये ५:४२.
१०. सेवाकार्य करत असताना लोकांना आपल्यावर विनाकारण शंका येऊ नये म्हणून आपण कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे?
१० गुन्हेगारीने भरलेल्या या जगात बरेच घरमालक अनोळखी व्यक्तींवर शंका घेतात. (२ तीम. ३:१-५) त्यांची शंका वाढेल असे आपण काहीही करू नये. उदाहरणार्थ, समजा आपण घराचे समोरचे दार वाजवले आणि जर कोणीही दार उघडले नाही तर आपल्याला खिडकीतून घरात वाकून पाहण्याचा किंवा घरमालकाला शोधण्यासाठी त्याच्या घराभोवती फिरण्याचा मोह होऊ शकतो. पण, तुमच्या क्षेत्रात घरमालकाला यामुळे राग येऊ शकेल का? त्याचे शेजारी याबद्दल काय विचार करतील? या गोष्टींचा तुम्ही विचार केला आहे का? हे खरे आहे की आपल्या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला साक्ष देण्याची आपली इच्छा आहे. (प्रे. कृत्ये १०:४२) तसेच, आपण एक आनंदाचा संदेश सांगण्यास उत्सुक आहोत आणि त्यामागचा आपला हेतूही चांगला आहे. (रोम. १:१४, १५) असे असले तरी, आपण असे काहीही करण्याचे टाळतो ज्यामुळे आपल्या क्षेत्रातील लोकांना विनाकारण शंका येईल. प्रेषित पेत्राने असे लिहिले: “आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही.” (२ करिंथ. ६:३) आपण आपल्या क्षेत्रातील लोकांच्या घराप्रती आणि त्यांच्या मालमत्तेप्रती आदर दाखवल्यास आपल्या चांगल्या वागणुकीमुळे काही लोक कदाचित सत्याकडे आकर्षित होतील.—१ पेत्र २:१२ वाचा.
मी लोकांना कोणत्या वेळी भेट देतो?
११. लोक आपल्या वेळेप्रती आदर दाखवतात तेव्हा आपल्याला चांगले का वाटते?
११ ख्रिस्ती या नात्याने आपल्यापैकी बहुतेक जण खूप व्यस्त असतात. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करता याव्यात म्हणून आपण वेळेचे विचारपूर्वक नियोजन करतो. (इफिस. ५:१६; फिलिप्पै. १:१०) एखादे काम करण्यासाठी आपण जी वेळ ठरवली आहे त्या वेळेत जर काही अडथळा निर्माण झाला तर आपली चिडचिड होते. पण, जेव्हा लोक आपल्या वेळेप्रती आदर दाखवतात, आपल्याशी बोलताना समजूतदारपणे आपला थोडाच वेळ घेतात तेव्हा आपल्याला चांगले वाटते. तर मग सुवर्ण नियम लक्षात ठेवून, ज्यांना आपण साक्ष देतो त्यांच्या वेळेप्रती आदर असल्याचे आपण कसे दाखवू शकतो?
१२. आपल्या क्षेत्रातील लोकांना भेटण्याची सर्वात चांगली वेळ कोणती आहे हे आपण कसे ठरवू शकतो?
१२ घरमालकाला भेटण्याची सर्वात चांगली वेळ कोणती असू शकते याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आपल्या क्षेत्रातील लोक सहसा केव्हा घरी असतात? ते कोणत्या वेळी आपले ऐकून घेण्याची जास्त शक्यता आहे? घरमालकाच्या वेळेनुसार आपण आपल्या वेळेत फेरबदल केला पाहिजे. जगातल्या काही भागांत दुपारी उशिरा किंवा संध्याकाळी अंधार होण्याच्या आत घरोघरचे कार्य केले जाते तेव्हा सर्वात चांगले परिणाम मिळतात. तुमच्या क्षेत्रातील लोक जर संध्याकाळी घरी भेटत असतील तर तुम्हीही तुमचे घरोघरचे कार्य, काही तासांसाठी तरी त्या वेळी करू शकता का? (१ करिंथकर १०:२४ वाचा.) आपण जर क्षेत्रातील लोकांच्या वेळेनुसार त्यांना साक्ष देण्यासाठी काही त्याग केले तर यहोवा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल अशी आपण खात्री बाळगू शकतो.
१३. आपण घरमालकाप्रती आदर कसा दाखवू शकतो?
१३ आपण घरमालकाप्रती आणखी कोणत्या मार्गांनी आदर दाखवू शकतो? समजा तो ऐकून घेण्यास तयार असेल तर आपण त्याला चांगल्या प्रकारे साक्ष दिली पाहिजे, पण त्याचा जास्त वेळ न घेता. घरमालकाने कदाचित तो वेळ त्याचे काही महत्त्वाचे काम करण्यासाठी ठेवला असेल. जर त्याच्याकडे वेळ नाही असे त्याने म्हटले तर आपण त्याला सांगितले पाहिजे की आपण त्याचा जास्त वेळ घेणार नाही, आणि आपण आपला शब्द पाळला पाहिजे. (मत्त. ५:३७) संभाषण पूर्ण करण्याआधी, पुढच्या वेळेस आपण त्याची भेट केव्हा घेऊ शकतो असे त्याला विचारले पाहिजे. काही प्रचारक घरमालकाला पुढीलप्रमाणे विचारतात, “तुम्हाला पुन्हा भेटायला मला आनंद वाटेल. येण्यापूर्वी मी तुम्हाला फोन किंवा मेसेज केला तर चालेल का?” ही पद्धत प्रभावी असल्याचे त्यांना दिसून आले आहे. आपण जेव्हा क्षेत्रातील लोकांच्या वेळेनुसार प्रचार करण्याचे ठरवतो तेव्हा आपण पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करत असतो. त्याने इतरांचे “तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित” पाहिले.—१ करिंथ. १०:३३.
मी लोकांशी कसे बोलले पाहिजे?
१४-१६. (क) घरमालकाला भेट देण्याचा आपला उद्देश आपण स्पष्ट का केला पाहिजे? उदाहरण द्या. (ख) एका प्रवासी पर्यवेक्षकाला संभाषण साधण्याची कोणती पद्धत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे?
१४ समजा एके दिवशी आपल्याला एक फोन येतो पण फोन करणाऱ्याचा आवाज आपल्याला ओळखीचा वाटत नाही. तो अनोळखी असूनही आपल्याला आपल्या जेवणाच्या आवडीनिवडी विचारतो. हा फोन करणारा नेमका कोण आहे आणि त्याला काय हवे आहे याबद्दल आपण विचार करू लागतो. कदाचित सभ्यता दाखवण्यासाठी आपण त्याच्याशी थोडा वेळ बोलूही, पण काही वेळाने मात्र आपण ते संभाषण थांबवू. दुसरीकडे पाहता, असा विचार करा की फोन करणारा स्वतःची ओळख करून देतो. तो सांगतो की तो पोषक आहाराशी संबंधित क्षेत्रात काम करतो आणि त्याच्याकडे काही माहिती आहे ज्यामुळे आपल्याला मदत होईल. अशा व्यक्तीचे ऐकून घेण्यास आपण नक्कीच तयार होऊ. लोक स्पष्ट पण समजूतदारपणे आपल्याशी बोलतात तेव्हा आपल्याला चांगले वाटते. तसेच आपण ज्यांना सेवाकार्यात भेटतो त्यांच्याशी आपण सभ्यपणे कशा प्रकारे वागू शकतो?
१५ बऱ्याच क्षेत्रांत घरमालकाशी बोलण्याआधी आपल्याला त्यांच्याकडे येण्याचा उद्देश स्पष्टपणे सांगावा लागतो. हे खरे आहे की आपल्याकडे खूप महत्त्वाची माहिती आहे जी घरमालकाकडे नाही, पण समजा आपण त्याला स्वतःची नीट ओळख करून न देताच बोलायला सुरुवात केली तर काय होईल? असे समजा की, त्याच्या घरी गेल्यागेल्या आपण त्याला विचारले की: “जगातील समस्यांना सोडवणं जर तुम्हाला शक्य असतं तर तुम्ही कोणती समस्या सोडवली असती?” आपल्याला माहीत आहे की या प्रश्नाचा उद्देश त्या माणसाच्या मनात काय आहे ते जाणून घेणे आणि मग त्याचे लक्ष बायबलकडे वळवणे हा आहे. पण, तो घरमालक मात्र असा विचार करत असेल: ‘ही अनोळखी व्यक्ती कोण आहे आणि मला हा प्रश्न का विचारत आहे? नेमकं कशाबद्दल आहे हे?’ असे घडू नये म्हणून आपण सुरुवातीला घरमालकाच्या मनातील भीती नाहीशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (फिलिप्पै. २:३, ४) आपण हे कसे करू शकतो?
१६ एका प्रवासी पर्यवेक्षकाला पुढे सांगितल्याप्रमाणे लोकांशी संभाषण साधणे प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. घरमालकाला अभिवादन केल्यानंतर ते बांधव त्याला जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका देतात आणि म्हणतात: “आज आम्ही तुमच्या क्षेत्रात सर्वांना ही पत्रिका देत आहोत. यात अशा सहा प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे जे सहसा लोक विचारतात. ही घ्या तुमची प्रत.” बांधव सांगतात की बहुतेक लोकांना जेव्हा आपल्या भेटीचा उद्देश कळतो तेव्हा त्यांची भीती नाहीशी होते. त्यानंतर प्रवासी पर्यवेक्षक घरमालकाला विचारतात: “या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न तुमच्या मनात कधी आला का?” घरमालकाने एखादा प्रश्न निवडल्यास बांधव पत्रिका उघडून त्या प्रश्नाचे बायबल काय उत्तर देते यावर चर्चा करतात. आणि समजा घरमालकाने प्रश्न निवडला नाही तर बांधव स्वतःच एक प्रश्न निवडून चर्चा सुरू ठेवतात. संभाषणाची सुरुवात करण्याचे तसे अनेक मार्ग आहेत. काही देशांत घरमालकांना आधी स्वतःबद्दल सविस्तर माहिती सांगावी लागते, त्यांचीही विचारपूस करावी लागते आणि त्यानंतरच आपण त्यांना आपला संदेश सांगू शकतो. तेव्हा, क्षेत्रातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार आपल्या प्रस्तावनेत फेरबदल केले पाहिजेत.
सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे पालन करत राहा
१७. या लेखात चर्चा केल्याप्रमाणे आपण कोणत्या काही मार्गांनी सुवर्ण नियमाचे पालन करू शकतो?
१७ तर मग, सेवाकार्यात आपण कोणकोणत्या मार्गांनी सुवर्ण नियमाचे पालन करतो? आपण प्रत्येक घरमालकाकडे एक व्यक्ती म्हणून पाहतो. आपण त्यांच्या घराप्रती आणि वैयक्तिक मालमत्तेप्रती आदर दाखवतो. लोक घरी भेटण्याची आणि आपले ऐकून घेण्याची सर्वात जास्त शक्यता आहे अशा वेळी सेवाकार्य करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि आपल्या क्षेत्रातील लोकांच्या आवडीनिवडी व अपेक्षा लक्षात घेऊन आपण आपल्या संदेशाची प्रस्तावना देतो.
१८. आपल्याला जशा व्यवहाराची अपेक्षा असते तसे जेव्हा आपण क्षेत्रात भेटणाऱ्या लोकांशी वागतो तेव्हा कोणते फायदे होतात?
१८ आपल्याला जशा व्यवहाराची अपेक्षा असते तसे जेव्हा आपण क्षेत्रात भेटणाऱ्या लोकांशी वागतो तेव्हा अनेक फायदे होतात. नम्रपणे व समजूतदारपणे वागल्यामुळे लोकांवर चांगला प्रभाव पडतो. त्यासोबतच, बायबलमधील तत्त्वे खरोखरच किती उपयोगी आहेत हे आपण दाखवून देतो. तसेच, अशा वागणुकीमुळे आपल्या स्वर्गीय पित्याचा महिमा होतो. (मत्त. ५:१६) शिवाय, आपल्या चांगल्या वागणुकीमुळे जास्त लोक सत्याकडे आकर्षित होऊ शकतात. (१ तीम. ४:१६) तसेच, त्यांनी राज्याचा संदेश स्वीकारला किंवा नाही तरी आपण आपली सेवा पूर्ण मनाने करत आहोत याचे आपल्याला समाधान वाटते. (२ तीम. ४:५) तर मग, आपण सर्व जण प्रेषित पौलाचे अनुकरण करू या. त्याने म्हटले: “मी सर्वकाही सुवार्तेकरता करतो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.” (१ करिंथ. ९:२३) तेव्हा, आपणही आपल्या सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे नेहमी पालन करत राहू या.