व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रगतीसाठी “आपल्या पायांची वाट सपाट कर”

प्रगतीसाठी “आपल्या पायांची वाट सपाट कर”

देवाचे लोक इ.स.पू. ५३७ साली बॅबिलोन सोडून जेरूसलेमला परत निघाले, तेव्हा खुद्द यहोवाने त्यांच्या मार्गाविषयी काही सूचना दिल्या. त्याने त्यांना सांगितले: “लोकांचा मार्ग नीट करा; राजमार्गाला भर घाला, . . . धोंडे काढून टाका.” (यश. ६२:१०) काही यहुदी लगेच या कामाला कसे लागले असतील याची आपण कल्पना करू शकतो. रस्त्यातील खाचखळगे त्यांनी भरून काढले असावेत; तसेच काही ओबडधोबड पट्टे सपाट केले असावेत. यामुळे, मायदेशी परतत असताना त्यांच्या मागून येणाऱ्या त्यांच्या देशबांधवांना या रस्त्यावरून जाणे सोपे झाले असावे.

आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी मार्ग सुरळीत करण्याकरता आपण या उदाहरणाचा विचार करू शकतो. या मार्गावर कसल्याही अडखळणांविना आपण चालत राहावे, अशी यहोवाची इच्छा आहे. त्याच्या वचनात आपल्याला असे आर्जवण्यात आले आहे: “आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्‍चित असोत.” (नीति. ४:२६) तुम्ही तरुण असला आणि नसला तरी, तुम्हाला देवाचा हा सल्ला किती सुज्ञ आहे ते दिसून येईल.

योग्य निर्णय घेऊन मार्ग तयार करा

तुम्ही कदाचित, एखाद्या कुमारवयीन मुलाविषयी अथवा मुलीविषयी लोकांना असे बोलताना ऐकले असावे, की ‘तिच्याकडं/त्याच्याकडं परिस्थितीचं सोनं करण्याची संधी आहे.’ तरुणांमध्ये सहसा सळसळते रक्त असते, ते कुशाग्र बुद्धीचे असतात आणि त्यांच्यात यशाचा पाठलाग करण्याची जिद्द असते. म्हणूनच बायबलमध्ये अगदी अचूकपणे असे म्हटले आहे: “बल हे तरुणांस भूषण आहे.” (नीति. २०:२९) यहोवाची सेवा करण्यात तरुण जन जेव्हा त्यांच्या कौशल्यांचा, शक्तीचा उपयोग करतात तेव्हा ते आध्यात्मिक ध्येये साध्य करू शकतात आणि खरा आनंद मिळवू शकतात.

पण, जगातही तरुणांच्या कौशल्यांना खूप मौल्यवान समजले जाते. साक्षीदार असलेला एखादा तरुण शाळेत चांगले गुण मिळवतो तेव्हा, मार्गदर्शन देणारा सल्लागार, शिक्षक किंवा त्याच्यासोबतचे विद्यार्थी त्याच्यावर, या जगात उच्च शिक्षण घेऊन यशाची पायरी चढण्याचा दबाव आणतील. किंवा मग,  एखादा तरुण बांधव अथवा बहीण खेळात पहिला नंबर पटकावत असेल तर, क्रीडा क्षेत्रातील लोक त्याला/तिला या क्षेत्रात नाव कमावण्याचे आमिष दाखवतील. तुम्ही अशाच परिस्थितीत आहात का? किंवा, अशा दबावांचा सामना करत असलेल्या कोणा साक्षीदार तरुणाला/तरुणीला तुम्ही ओळखता का? या तरुणांना योग्य व सुज्ञ निर्णय घेण्यास कोणती गोष्ट मदत करू शकेल?

जीवनातील सर्वोत्तम मार्गावर प्रवास करण्यासाठी बायबलमधील शिकवणी एखाद्याला तयार करू शकतात. उपदेशक १२:१ या वचनात म्हटले आहे: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” तर मग, तुम्ही “आपल्या निर्माणकर्त्याला” कशा प्रकारे स्मरू शकता?

पश्‍चिम आफ्रिकेतील एरिकचे * उदाहरण घ्या. फुटबॉल खेळ त्याचा जीव की प्राण होता. १५ वर्षांचा होईपर्यंत त्याला एका राष्ट्रीय संघात खेळण्यास निवडण्यातही आले. पुढे जाऊन त्याला युरोपमध्ये उच्च दर्जाचे क्रीडाविषयक प्रशिक्षण मिळण्याची संधी होती. आणि या शिक्षणामुळे त्याला क्रीडा जगतात करिअर करण्यास वाव होता. मग या परिस्थितीत, आपल्या निर्माणकर्त्याला स्मर या सल्ल्यानुसार तो निर्णय कसा घेऊ शकत होता? आणि, यातून तुम्ही व साक्षीदार असलेला तुमचा मित्र कोणता धडा शिकू शकाल?

शाळेत असताना एरिकने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. आपला निर्माणकर्ता मानवजातीच्या समस्यांचे कायमचे निरसन करणार असल्याचे तो शिकला. देवाची इच्छा पूर्ण करण्यात आपला वेळ व आपली शक्ती खर्च करणे महत्त्वाचे आहे, हे एरिकला जाणवले. त्यामुळे, क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची धडपड न करण्याचा निर्णय एरिकने घेतला. त्याने बाप्तिस्मा घेऊन आध्यात्मिक गोष्टींत प्रगती करण्यास सुरुवात केली. कालांतराने तो सेवा सेवक बनला आणि नंतर अविवाहित बांधवांसाठी असलेल्या बायबल प्रशालेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण त्याला मिळाले.

एरिकने क्रीडा क्षेत्रात करिअर केले असते तर त्याला अमाप पैसा व नाव मिळाले असते यात काही शंका नाही. पण बायबलमधील या तत्त्वाची सत्यता त्याला पटली होती: “धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे.” (नीति. १८:११) हे वचन किती खरे आहे! पैशाद्वारे मिळणारी सुरक्षा खरेतर मृगजळासारखी आहे. शिवाय, जे हात धुऊन पैशाच्या मागे लागतात ते “स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून” घेतात.—१ तीम. ६:९, १०.

पण आनंदाची गोष्ट म्हणजे, पूर्णवेळेची सेवा करण्याची निवड केल्यामुळे अनेक तरुण आनंद व सुरक्षा अनुभवत आहेत. एरिक म्हणतो: “यहोवाच्या सेवेत पूर्णवेळ असलेल्यांच्या एका मोठ्या ‘संघात’ मी सामील झालो. हा सर्वोत्तम संघ आहे. जीवनात खरा आनंद व यश मिळवण्याचा एकमेव मार्ग दाखवल्याबद्दल मी यहोवाचे खूप आभार मानतो.”

तुमच्याबद्दल काय? जगातील ध्येयांच्या मागे लागण्याऐवजी, पायनियर सेवेत सहभाग घेऊन तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा करू शकता.—“ विद्यापीठातूनही न मिळणारे फायदे मिळवणे” हा चौकोन पाहा.

तुमच्या मार्गातील अडथळे दूर करा

अमेरिकेतील शाखा कार्यालयाला भेट देणाऱ्या एका जोडप्याने पाहिले, की तेथे काम करणाऱ्या बेथेल सदस्यांच्या चेहऱ्यांवर एक प्रकारचा आनंद होता. त्या बहिणीने नंतर असे लिहिले: “आम्हाला आरामदायक जीवनाची सवय लागली होती.” पण, या जोडप्याने सेवेत आणखी विशेषाधिकार मिळवण्याकरता त्यांचा वेळ व शक्ती खर्च करण्याचा निर्णय घेतला.

पण, त्यांना बदल करणे मुश्किल जात होते. मग एके दिवशी त्यांनी त्या दिवसाच्या बायबल वचनावर विचार केला. ते वचन योहान ८:३१ होते. त्यात येशू म्हणतो: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा.” हे वचन लक्षात ठेवून त्यांनी स्वतःशी असा तर्क केला, की “आपली जीवनशैली साधी बनवण्याकरता आपण जे काही त्याग करू ते वाया जाणार नाहीत.” त्यांनी त्यांचे भले मोठे घर विकले, अनावश्यक गोष्टींची विल्हेवाट लावली आणि ज्या मंडळीला गरज होती अशा एका मंडळीत गेले. आता ते पायनियरिंग करतात. शिवाय राज्य सभागृह बांधकामातही मदत करतात आणि प्रांतीय अधिवेशनांमध्ये स्वयंसेवक म्हणून सेवा करतात. आता त्यांना कसे वाटते? ते म्हणतात: “यहोवाची संघटना देत असलेल्या सूचनांनुसार आम्ही जेव्हा आमची जीवनशैली साधी बनवली तेव्हा किती आनंदी झालोय, हे पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटतं.”

आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर टिकून राहा

शलमोनाने लिहिले: “तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.” (नीति. ४:२५) गाडी चालवणाऱ्या चालकाचे लक्ष पुढे रस्त्यावर असते. आपणही, आध्यात्मिक ध्येये ठेवून ते मिळवण्यापासून आपल्याला विचलित करणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

तुमच्यासमोर कोणती आध्यात्मिक ध्येये ठेवून तुम्ही ती मिळवू शकता? पूर्णवेळेची सेवा सुरू करण्याचे ध्येय सर्वात उत्तम आहे  यात काहीच शंका नाही. दुसरे ध्येय म्हणजे, जवळपासच्या एखाद्या मंडळीचे प्रचाराचे क्षेत्र खूप मोठे असेल व त्यांना अनुभवी प्रचारकांची गरज असेल तर अशा मंडळीत तुम्ही जाऊ शकता. किंवा, एखाद्या मंडळीत अनेक प्रचारक असतील पण तेथे पुरेसे वडील व सेवा सेवक नसतील तर अशा मंडळीत जाण्याचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुम्ही कोणत्या बाबतीत मदत करू शकाल याबद्दल तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांबरोबर बोला. तुम्ही कोठे दूर जाऊ इच्छित असाल तर ज्यांना मदतीची गरज आहे अशा दूरवरच्या मंडळ्यांबद्दल तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. *

आता पुन्हा एकदा आपण यशया ६२:१० मध्ये वर्णन केलेल्या दृश्याची कल्पना करू या. देवाच्या लोकांना त्यांच्या मायदेशी सुखरूप पोचता यावे म्हणून, काही यहुद्यांनी जेरूसलेमकडे जाणारा मार्ग सरळ व सपाट करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले असावेत. पवित्र सेवेत ध्येये साध्य करण्यासाठी तुम्ही परिश्रम घेत असाल तर हार मानू नका. देवाच्या मदतीने तुम्ही ती जरूर साध्य करू शकाल. समोर येणारी अडखळणे दूर करण्यासाठी बुद्धी मिळावी म्हणून यहोवाला प्रार्थना करत राहा. त्याने तुमच्या “पायांची वाट सपाट” करण्यास कशी मदत केली हे कालांतराने तुम्हाला दिसून येईल.—नीति. ४:२६.

^ परि. 8 नाव बदलण्यात आले आहे.

^ परि. 18 यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित पृष्ठे १११-११२ पाहा.