व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांना त्यांची क्षमता ओळखण्यास मदत करा

इतरांना त्यांची क्षमता ओळखण्यास मदत करा

“मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” —स्तो. ३२:८.

१, २. पृथ्वीवरील आपल्या सेवकांना यहोवा कोणत्या नजरेने पाहतो?

आईवडील जेव्हा आपल्या मुलांना खेळताना पाहतात तेव्हा त्यांच्यात जन्मतःच जी कौशल्ये आहेत ती पाहून त्यांना सहसा आश्चर्य वाटते. तुम्हालाही कधी तसे वाटले आहे का? एखादे मूल खूप चपळ असते किंवा खेळांत खूप हुशार असते, तर त्याचाच भाऊ किंवा बहीण बुद्धिबळासारख्या खेळांत, चित्रकलेत किंवा इतर कलेत आवड दाखवते. मुलांमध्ये कोणतीही कौशल्ये असोत, त्यांचे आईवडील त्यांना ती पूर्णपणे विकसित करता यावीत म्हणून आनंदाने त्यांना मदत करतात.

यहोवा देवालाही पृथ्वीवरील आपल्या मुलांबद्दल आस्था आहे. आजच्या काळातील त्याचे सेवक “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू” आहेत असे तो समजतो. (हाग्ग. २:७) ते खासकरून त्यांच्या विश्वासामुळे व एकनिष्ठेमुळे त्याला प्रिय आहेत. असे असले तरी, आपल्या बांधवांमध्ये अनेक वेगवेगळी कौशल्ये आहेत हे तुम्ही पाहिले असेल. काही बांधवांना चांगल्या प्रकारे भाषण देता येते, तर काही जण चांगले व्यवस्थापक आहेत. अनेक बहिणींना एखादी नवीन भाषा शिकणे आणि सेवेत तिचा उपयोग करणे चांगले जमते, तर काही जणींना इतरांना उत्तेजन देणे किंवा जे आजारी आहेत त्यांची काळजी घेणे चांगल्या प्रकारे जमते. (रोम. १६:१, १२) आपल्या मंडळीत असे ख्रिस्ती बंधुभगिनी आहेत यासाठी आपण खरेच खूप कृतज्ञ आहोत.

३. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

 पण काही ख्रिश्चनांना, खासकरून जे तरुण आहेत किंवा ज्यांचा नुकताच बाप्तिस्मा झाला आहे, त्यांना मंडळीत आपलेही एक स्थान आहे असे कदाचित अजूनही वाटत नसेल. त्यांना त्यांच्या क्षमता ओळखण्यास आपण कशी मदत करू शकतो? त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याचा आणि यहोवा ज्या नजरेने त्यांच्याकडे पाहतो त्याप्रमाणे पाहण्याचा आपण जास्तीतजास्त प्रयत्न का केला पाहिजे?

यहोवा आपल्या सेवकांमधील चांगले गुण पाहतो

४, ५. यहोवा आपल्या सेवकांमधील क्षमता पाहतो हे शास्ते ६:११-१६ मधील अहवालातून कसे दिसून येते?

बायबलमधील अनेक अहवालांतून हे दिसून येते की यहोवा आपल्या सेवकांचे फक्त चांगले गुणच नाही, तर त्यांच्या क्षमताही पाहतो. उदाहरणार्थ, देवाच्या लोकांना मिद्यान्यांच्या जुलमांपासून सोडवण्यासाठी जेव्हा गिदोनाला नियुक्त करण्यात आले, तेव्हा देवदूताने त्याला, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे,” असे म्हटले. हे ऐकल्यावर गिदोन थक्क झाला असावा. कारण त्या वेळी गिदोनाला आपण “बलवान” आहोत असे जराही वाटत नव्हते. देवाच्या लोकांना सोडवणे आपल्याला शक्य नाही असे त्याला वाटत होते. पण, पुढे झालेल्या संभाषणातून कळते की गिदोन स्वतःत जे पाहू शकला नाही ते यहोवाने पाहिले. यहोवाचा त्याच्या या सेवकाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन होता.—शास्ते ६:११-१६ वाचा.

गिदोन त्याच्या लोकांचा बचाव करण्यास सक्षम आहे हे यहोवाला माहीत होते कारण त्याने त्याची कौशल्ये पाहिली होती. यहोवाच्या देवदूताने गिदोनाला जोमाने गव्हाची झोडपणी करताना पाहिले होते. पण, आणखी एका गोष्टीने देवदूताचे लक्ष वेधले होते. बायबलच्या काळात, शेतकरी सहसा खुल्या मैदानात धान्याची झोडपणी करायचे. कारण, मैदानात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे भुसा अगदी सहजपणे धान्यापासून वेगळा व्हायचा. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे गिदोन द्राक्षारसाच्या कुंडात गव्हाची झोडपणी करत होता, जेणेकरून त्याच्याकडे धान्याचा जो थोडाफार साठा होता त्याचे मिद्यान्यांपासून रक्षण होईल. किती समजूतदारपणा! यात काहीच शंका नाही, की यहोवाच्या नजरेत गिदोन फक्त एक सावध शेतकरीच नव्हे तर एक चतुर मनुष्यदेखील होता. यहोवा देवाने त्याच्यातील क्षमता पाहिली आणि आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला.

६, ७. (क) आमोसकडे पाहण्याचा यहोवाचा दृष्टिकोन काही इस्राएली लोकांपेक्षा कशा प्रकारे वेगळा होता? (ख) आमोस अजाण नव्हता हे कशावरून दिसून येते?

यहोवाने आमोस संदेष्ट्यातील क्षमता पाहिल्या. इतरांच्या नजरेत जरी तो अगदी सर्वसाधारण असला तरी यहोवाने त्याच्या या सेवकामधील क्षमतांकडे लक्ष दिले. आमोस हा गुराखी आणि उंबराच्या झाडाची निगा राखण्याचे साधेसुधे काम करायचा. इस्राएलच्या मूर्तिपूजक दहा-वंशीय राज्याला दंड सुनावण्यासाठी यहोवाने जेव्हा आमोसची निवड केली, तेव्हा काही इस्राएली लोकांना देवाची ही निवड चुकीची आहे असे वाटले असावे.—आमोस ७:१४, १५ वाचा.

आमोस शहरापासून दूर असलेल्या एका गावातून आला असला तरी त्याला त्याच्या काळातील रुढीपरंपरांची आणि शासकांविषयीची माहिती होती. यावरून कळते की तो अजाण नव्हता. इस्राएलमधील परिस्थितीविषयी त्याला चांगली माहिती होती आणि व्यापाऱ्यांच्या संपर्कात असल्यामुळे आजूबाजूच्या देशांत काय चालले आहे तेही त्याला समजायचे. (आमो. १:६, ९, ११, १३; २:८; ६:४-६) काही बायबल विद्वानांचे असे म्हणणे आहे की आमोस एक चांगला लेखक होता. आपल्या लिखाणांत त्याने साध्या आणि जोरदार शब्दांचा उपयोग केला. खरेतर, भ्रष्ट याजक अमस्या याला आमोसने ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिले त्यावरून हे स्पष्ट झाले की यहोवाची निवड अगदी योग्य होती. सुरुवातीला त्याच्या ज्या क्षमता इतरांना दिसून आल्या नाहीत त्या यहोवाने ओळखल्या व त्यांचा चांगला उपयोग केला.—आमो. ७:१२, १३, १६, १७.

८. (क) यहोवाने दाविदाला कोणते आश्वासन दिले? (ख) ज्यांच्यात आत्मविश्वासाची कमी आहे त्यांना स्तोत्र ३२:८ मधील शब्दांमुळे उत्तेजन कसे मिळू शकते?

यहोवा त्याच्या प्रत्येक सेवकाची कुवत ओळखतो. त्याने दावीद राजाला असे आश्वासन दिले की तो नेहमी त्याच्यावर आपली दृष्टी ठेवून त्याचे मार्गदर्शन करेल. (स्तोत्र ३२:८ वाचा.) देवाचे हे आश्वासन आपल्यालाही  उत्तेजन देत नाही का? आपल्यात आत्मविश्वास नसला तरी यहोवा आपल्याला आपली ध्येये मिळवण्यास मदत करेल. तो आपल्याला अशी ध्येये गाठण्यासही मदत करू शकतो जी मिळवणे आपल्याला शक्य वाटत नाही. ज्या प्रकारे एक चांगला शिक्षक अनुभव नसलेल्या आपल्या विद्यार्थ्याला प्रत्येक बाबतीत मदत करतो त्याच प्रकारे यहोवा आपल्याला आपल्या क्षमता ओळखून त्यांना उपयोगात आणण्यास मार्गदर्शित करतो. असे करण्यासाठी तो कदाचित आपल्या विश्वासू बांधवांचाही उपयोग करू शकतो. हे तो कसे करतो?

इतरांमधील चांगले गुण पाहा

९. आपण पौलाच्या सल्ल्याचे अनुकरण कसे करू शकतो?

पौलाने ख्रिश्चनांना आपल्या बांधवांच्या हिताकडे लक्ष देण्याचे आर्जवले. (फिलिप्पैकर २:३, ४ वाचा.) इतरांमध्ये जी कौशल्ये आहेत त्यांकडे लक्ष देऊन आपण त्यांची प्रशंसा करावी असा पौलाच्या सल्ल्याचा अर्थ आहे. आपल्या प्रगतीबद्दल कोणी प्रशंसा केल्यास आपल्याला कसे वाटते? सहसा अशा प्रशंसेमुळे आपल्याला पूर्वीपेक्षा आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. त्याच प्रकारे, जेव्हा आपण आपल्या बांधवांमधील क्षमतांची कदर करतो, त्यांबद्दल त्यांची प्रशंसा करतो, तेव्हा त्यांनाही आध्यात्मिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळते.

१०. आपण खासकरून कोणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे?

१० आपण खासकरून कोणाकडे लक्ष दिले पाहिजे? खरेतर, आपल्यापैकी सर्वांनाच वेळोवेळी इतरांच्या मदतीची गरज असते. असे असले तरी, तरुणांना किंवा ज्यांचा नुकताच बाप्तिस्मा झाला आहे त्यांना जास्त मदतीची गरज असते. त्यांच्याकडे लक्ष दिल्यास त्यांना या गोष्टीची जाणीव होईल की मंडळीत त्यांचीही एक महत्त्वाची भूमिका आहे. बायबल अशा बांधवांना जबाबदारी हाताळण्यास योग्य बनण्याचा प्रयत्न करण्याचे उत्तेजन देते. (१ तीम. ३:१) पण, आपण जर त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते प्रगती करण्याचा प्रयत्नच करणार नाहीत.

११. (क) एका वडिलाने तरुण बांधवाला त्याच्या लाजाळू स्वभावावर मात करण्यास कशी मदत केली? (ख) झूएल्यानच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळते?

११ मंडळीत वडील म्हणून सेवा करत असलेल्या लूडोव्हिक नावाच्या एका बांधवालाही तरुणपणी मिळालेल्या मदतीचा फायदा झाला. त्यांचे असे म्हणणे आहे की, जेव्हा ते बांधवांबद्दल मनापासून आस्था दाखवतात तेव्हा ते बांधव लवकर प्रगती करतात. अशांपैकी एक होता झूएल्यान. त्याच्याविषयी लूडोव्हिक सांगतात की त्याच्यात आत्मविश्वासाची कमी होती आणि कधीकधी तो वेंधळ्यासारखा वागायचा. लूडोव्हिक म्हणतात: “पण, माझ्या हे लक्षात आलं की तो खूप प्रेमळ आहे व इतरांना मदत करावी असं त्याला मनापासून वाटतं. म्हणून, त्याची टीका करण्याऐवजी मी त्याच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं.” यामुळे काही काळाने झूएल्यान सेवा सेवक बनण्यास पात्र ठरला आणि आता तो सामान्य पायनियर या नात्याने सेवा करत आहे.

इतरांना त्यांच्या क्षमता ओळखण्यास मदत करा

१२. इतरांना त्यांची क्षमता ओळखण्यास मदत करण्यासाठी कोणत्या गुणाची गरज आहे? उदाहरण द्या.

१२ इतरांना त्यांच्या क्षमता ओळखण्यास मदत करायची असेल तर आपण समंजस असले पाहिजे. झूएल्यानच्या उदाहरणावरून हे कळते की आपण एखाद्या व्यक्तीच्या कमतरतांकडे नाही तर तिच्यात असलेल्या चांगल्या गुणांकडे आणि कौशल्यांकडे पाहिले पाहिजे. पेत्राकडे पाहण्याचा येशूचा दृष्टिकोन असाच होता. पेत्र चंचल आहे असे कधीकधी वाटत असले, तरी येशूला अशी खात्री होती की तो पुढे खडकासारखा स्थिर होईल.—योहा. १:४२.

१३, १४. (क) मार्कच्या बाबतीत बर्णबाने समजबुद्धी कशी दाखवली? (ख) आलेक्सांड्र यांना मिळालेल्या मदतीमुळे त्यांना कसा फायदा झाला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

१३ बर्णबाने मार्कसोबत व्यवहार करताना अशीच समजबुद्धी दाखवली. (प्रे. कृत्ये १२:२५) बर्णबासोबत पौलाच्या पहिल्या मिशनरी दौऱ्यात मार्क हा त्यांचा “साहाय्यक” होता. तो कदाचित त्यांच्या शारीरिक गरजांकडे लक्ष देत असावा. पण, पंफुलिया येथे पोचल्यावर मार्क अचानकच त्याच्या या सोबत्यांना सोडून निघून गेला. त्यामुळे पौल व बर्णबा यांना त्यांचा पुढील धोकादायक प्रवास मार्कशिवाय करावा लागला.  (प्रे. कृत्ये १३:५, १३) पण, नंतर बर्णबाने काय केले? त्याने मार्कच्या कमतरतांकडे लक्ष देण्याऐवजी त्याच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिले. मार्क भरवशालायक नाही असा विचार त्याने केला नाही. उलट, बर्णबाने मार्कला चांगले प्रशिक्षण दिले आणि यामुळे तो यहोवाचा एक प्रौढ सेवक बनू शकला. (प्रे. कृत्ये १५:३७-३९) अनेक वर्षांनंतर, पौल तुरुंगात होता तेव्हा मार्क त्याचे साहाय्य करण्यासाठी त्याच्यासोबत होता असे बायबल सांगते. आणि जेव्हा पौलाने कलस्सै मंडळीला पत्र लिहिले तेव्हा त्याने मार्कची प्रशंसा केली. (कलस्सै. ४:१०) पौलाने स्वतःहून मार्कच्या साहाय्याची विनंती केली तेव्हा बर्णबाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा.—२ तीम. ४:११.

१४ नुकतेच वडील या नात्याने नियुक्त करण्यात आलेल्या आलेक्सांड्र नावाच्या बांधवाला कशी मदत झाली त्याबद्दल ते सांगतात: “तरुण असताना इतरांसमोर प्रार्थना करणं मला खूप कठीण जायचं. पण, मंडळीतील एका वडिलांनी प्रार्थनेची तयारी कशी करायची आणि तणाव कमी करण्यासाठी काय करायचं हे मला शिकवलं. मी प्रार्थना करायला घाबरतो यामुळे मला प्रार्थना देण्याचं टाळण्याऐवजी ते वडील मला नेहमी क्षेत्र सेवेच्या सभेत प्रार्थना करायला सांगायचे. काही काळानंतर मी आत्मविश्वासाने प्रार्थना करू लागलो.”

१५. पौलाने त्याच्या बांधवांची कशा प्रकारे प्रशंसा केली?

१५ आपल्याला जेव्हा इतर बांधवांमध्ये काही चांगले गुण दिसतात तेव्हा आपण त्यांची प्रशंसा करतो का? रोमकर याच्या १६ व्या अध्यायात पौलाने २० पेक्षा जास्त सहविश्वासूंची त्यांच्या चांगल्या गुणांकरता प्रशंसा केली. (रोम. १६:३-७, १३) उदाहरणार्थ, पौलाने कबूल केले की अंद्रोनीक आणि युनिया हे त्याच्या आधीपासून ख्रिस्ताची सेवा करत आहेत. पौलाने त्यांच्या धीराची प्रशंसा केली. तसेच, रूफ याच्या आईने दाखवलेल्या प्रेमळ काळजीबद्दल पौलाने तिच्याविषयीही मनापासून कदर व्यक्त केली.

फ्रेडेरीक (डावीकडे) यांनी रीकोला यहोवाची सेवा करत राहण्याचे उत्तेजन दिले (परिच्छेद १६ पाहा)

१६. लहान मुलांची प्रशंसा केली जाते तेव्हा त्याचे कोणते चांगले परिणाम घडून येऊ शकतात?

१६ आपण जेव्हा मनापासून प्रशंसा करतो तेव्हा त्याचे चांगले परिणाम घडून येऊ शकतात. फ्रान्समध्ये राहणाऱ्या रीको नावाच्या एका लहान मुलाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. त्याचे वडील सत्यात नव्हते आणि रीकोच्या बाप्तिस्म्याला त्यांचा विरोध होता. यामुळे रीको खूप निराश झाला. रीकोला वाटले की जोपर्यंत तो १८ वर्षांचा होत नाही तोपर्यंत तो बाप्तिस्मा घेऊ शकणार नाही. शाळेतील मुले त्याच्या विश्वासांबद्दल त्याला चिडवायची यामुळेही तो दुःखी होता. त्याच्या मंडळीतील फ्रेडेरीक नावाचे एक वडील त्याचा बायबल अभ्यास घ्यायचे. ते म्हणतात: “मी रीकोची प्रशंसा केली. मी त्याला सांगितलं की शाळेत तुझा विरोध होत आहे यावरून दिसून येतं की आपल्या विश्वासांबद्दल सांगण्याचं धैर्य तुझ्याजवळ आहे.” या प्रशंसेमुळे प्रगती करत राहण्याचा रीकोचा निर्धार अजून पक्का झाला. त्याच्या वडिलांसोबतचे त्याचे संबंधदेखील सुधारले. रीकोने १२ वर्षांचा असताना बाप्तिस्मा घेतला.

झेरोम (उजवीकडे) यांनी रायनला मिशनरी बनण्यास मदत केली (परिच्छेद १७ पाहा)

१७. (क) आपण आपल्या बांधवांना आणखी प्रगती करण्यासाठी कशी मदत करू शकतो? (ख) एका मिशनरीने कशा प्रकारे तरुण बांधवांकडे लक्ष दिले, आणि यामुळे कोणते चांगले परिणाम घडून आले आहेत?

१७ बांधवांनी केलेल्या चांगल्या कामासाठी जेव्हा आपण त्यांची प्रशंसा करतो, तेव्हा ते यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करण्यास प्रवृत्त होतात. फ्रान्सच्या बेथेलमध्ये अनेक वर्षांपासून सेवा करत असलेली  सिल्वी * असे म्हणते की बहिणीही बांधवांची प्रशंसा करू शकतात. तिने पाहिले आहे की सहसा स्त्रियांचा दृष्टिकोन पुरुषांपेक्षा वेगळा असल्यामुळे बहिणी काही खास गोष्टींचे निरीक्षण करून बांधवांची प्रशंसा करू शकतात. त्यामुळे जरी अनुभवी बांधवांनी कोणाची प्रशंसा केली असली तरीही बहिणी आपले अभिप्राय सांगून या प्रशंसेत भर घालू शकतात. ती म्हणते: “प्रशंसा करणं ही माझी जबाबदारी आहे असं मी समजते.” (नीति. ३:२७) झेरोम नावाचे बांधव जे फ्रेंच गायाना येथे मिशनरी म्हणून सेवा करत आहेत त्यांनी अनेक तरुण बांधवांना मिशनरी सेवेसाठी योग्य बनण्यास मदत केली आहे. ते म्हणतात: “मी हे पाहिलं आहे की ज्या तरुणांची त्यांच्या सेवेबद्दल किंवा चांगलं उत्तर दिल्याबद्दल मी प्रशंसा केली त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि यामुळे ते त्यांची कौशल्यं आणखी वाढवण्यास प्रवृत्त झाले.”

१८. तरुण बांधवांसोबत काम केल्याने कोणते फायदे होऊ शकतात?

१८ आपण आपल्या बांधवांसोबत मिळून काम करण्याद्वारेही त्यांना आध्यात्मिक प्रगती करण्याचे उत्तेजन देऊ शकतो. मंडळीतील एखाद्या तरुण बांधवाला कंप्युटर चांगल्या प्रकारे वापरणे जमत असेल, तर वडील त्याला jw.org या आपल्या वेबसाईटवरून काही माहिती प्रिंट करण्यास सांगू शकतात, जेणेकरून मंडळीतील अशा वृद्ध बांधवांना मदत होऊ शकेल ज्यांच्याकडे कंप्युटर नाही. किंवा तुम्ही जर राज्य सभागृहाचे दुरुस्तीचे किंवा साफसफाईचे काम करणार असाल तर तुम्ही तुमच्या मदतीसाठी एखाद्या तरुण बांधवाला घेऊ शकता का? अशा प्रकारे पुढाकार घेतल्याने तुम्हाला तरुण बांधवांना जवळून ओळखण्याची, त्यांची प्रशंसा करण्याची आणि यामुळे होणारे चांगले परिणाम पाहण्याची संधी मिळेल.—नीति. १५:२३.

भविष्यासाठी तयारी करा

१९, २०. आपण बांधवांना प्रगती करण्यासाठी मदत का केली पाहिजे?

१९ यहोवाने जेव्हा यहोशवाला इस्राएली लोकांचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले तेव्हा त्याने मोशेला आज्ञा दिली की त्याने यहोशवाला “धीर देऊन दृढ” करावे. (अनुवाद ३:२८ वाचा.) आज आपल्या जगभरातील मंडळ्यांत अनेक जणांची भर पडत आहे. या नवीन लोकांना आणि तरुण बांधवांना त्यांच्या अंगी असलेले चांगले गुण ओळखून त्यांचा पुरेपूर उपयोग करता यावा, यासाठी फक्त मंडळीतील वडीलच नाही तर सर्वच अनुभवी ख्रिस्ती मदत करू शकतात. यामुळे जास्तीतजास्त जण पूर्ण वेळेची सेवा सुरू करण्यास प्रवृत्त होतील आणि “इतरांना शिकवण्यास” योग्य बनतील.—२ तीम. २:२.

२० आपण बरेच अनुभवी बांधव असलेल्या मोठ्या मंडळीचा भाग असो किंवा मंडळी बनण्याच्या मार्गावर असलेल्या एका छोट्या गटाचा, आपण भविष्यासाठी चांगली तयारी केली पाहिजे. आणि असे करण्याची गुरुकिल्ली म्हणजे नेहमी आपल्या सेवकांमधील चांगल्या गुणांकडे लक्ष देणाऱ्या यहोवा देवाचे अनुकरण करणे.

^ परि. 17 नाव बदलण्यात आले आहे.