व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानवी दुर्बलतेविषयी तुम्ही यहोवासारखा विचार करता का?

मानवी दुर्बलतेविषयी तुम्ही यहोवासारखा विचार करता का?

“शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत.”—१ करिंथ. १२:२२.

१, २. पौल दुर्बलांविषयी सहानुभूती का व्यक्त करू शकला?

अधूनमधून आपल्या सर्वांनाच अशक्तपणा जाणवतो. उदाहरणार्थ, आपण आजारी पडतो तेव्हा कधीकधी आपल्याला इतके अशक्त वाटते की आपण दररोजची कामेदेखील करू शकत नाही. पण, फक्त एखाददोन आठवडे नाही, तर कित्येक महिन्यांपर्यंत तुम्हाला अशक्तपणा जाणवत राहिला तर? अशा परिस्थितीत, इतरांनी तुमच्याशी सहानुभूतीने व्यवहार केल्यास तुम्हाला कृतज्ञ वाटणार नाही का?

प्रेषित पौलालाही कधीकधी मंडळीच्या आतून व बाहेरून येणाऱ्या दबावांमुळे, आपण दुर्बल आहोत असे वाटले. काही वेळा तर त्याच्यासमोर असलेल्या समस्यांना तोंड देणे त्याच्या शक्तीपलीकडे आहे असे त्याला वाटले. (२ करिंथ. १:८; ७:५) पौलाने एक विश्वासू ख्रिस्ती या नात्याने त्याच्या जीवनाबद्दल आणि त्याने सोसलेल्या कठीण प्रसंगांबद्दल विचार करताना असे कबूल केले: “एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय?” (२ करिंथ. ११:२९) तसेच, ख्रिस्ती मंडळीतील सदस्यांची तुलना मानवी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांशी करून पौलाने असे म्हटले की “जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत.” (१ करिंथ. १२:२२) पौलाच्या या शब्दांचा काय अर्थ होता? मंडळीत जे बांधव दुर्बल आहेत असे वाटते, त्यांच्याबद्दल आपण यहोवासारखा विचार कसा करू शकतो? आणि असे केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद लाभतील?

 यहोवा दुर्बलांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो?

३. आपल्या बांधवांबद्दल आपल्या मनात नकारार्थी भावना कशामुळे येऊ शकतात?

आज जगात सर्वत्र स्पर्धेची वृत्ती दिसून येते. जे तरुण आहेत आणि ज्यांच्याजवळ शक्ती आहे तेच यशस्वी होऊ शकतात असा लोकांचा समज आहे. बरेच जण आपल्यापेक्षा अशक्त माणसांच्या भावनांची पर्वा न करता, स्वतःची ध्येये मिळवण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार असतात. जगातील लोकांच्या या वृत्तीचा आपल्यावरही प्रभाव पडू शकतो. ज्या बांधवांना वारंवार साहाय्य पुरवण्याची गरज पडते अशांबद्दल आपल्या मनात नकारार्थी भावना येऊ शकतात. पण, मंडळीतील प्रत्येक बांधवाबद्दल आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार कसा करू शकतो?

४, ५. (क) पहिले करिंथकर १२:२१-२३ यातील उदाहरणावरून यहोवाच्या दृष्टिकोनाबद्दल काय कळून येते? (ख) दुर्बलांना साहाय्य केल्याने आपल्याला कोणते फायदे होतात?

यहोवा दुर्बलांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, हे पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रातील एका उदाहरणावरून कळून येते. १२ व्या अध्यायात पौल आपल्याला याची आठवण करून देतो की मानवाच्या शरीरातील सर्वात कुरूप किंवा अशक्त अवयवदेखील महत्त्वाचा असतो. (१ करिंथकर १२:१२, १८, २१-२३ वाचा.) उत्क्रांतीवर विश्वास असलेल्या काहींनी असा दावा केला होता की मानवाच्या शरीरातील काही अवयव निरुपयोगी आहेत. पण, मानवी शरीररचनेच्या अभ्यासांतून हे दिसून आले आहे की एकेकाळी ज्यांना निरुपयोगी समजले जात होते, ते अवयव खरेतर शरीरात महत्त्वाच्या क्रिया पार पाडतात. * उदाहरणार्थ, पायाची करंगळी खरोखरच उपयोगी आहे का याविषयी काहींनी शंका उपस्थित केली होती; पण संपूर्ण शरीराचा तोल राखण्यासाठी पायाच्या करंगळीची महत्त्वाची भूमिका असते ही गोष्ट आज सिद्ध झाली आहे.

पौलाच्या या उदाहरणावरून स्पष्टपणे दिसून येते की ख्रिस्ती मंडळीतील सगळेच सदस्य उपयोगी आहेत. आपण स्वतःला निरुपयोगी समजावे अशी सैतानाची इच्छा आहे. पण, यहोवा त्याच्या सर्व सेवकांना, मग त्यांच्यापैकी काही अशक्त आहेत असे वाटत असले, तरीही त्या सर्वांना तो मौल्यवान लेखतो. (ईयो. ४:१८, १९) या विचाराने आपल्या सर्वांना सांत्वन मिळाले पाहिजे. कारण, आपल्या स्थानिक मंडळीत तसेच देवाच्या उपासकांच्या जगभरातील मंडळीतही आपल्या प्रत्येकाची एक महत्त्वाची भूमिका आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कधी एखाद्या वयस्क व्यक्तीचा हात धरून त्यांना चालायला साहाय्य केले आहे का? कदाचित तुम्हालाही त्यांच्यासोबत हळूहळू चालावे लागले असेल. पण असे केल्यामुळे त्यांना साहाय्य मिळण्यासोबतच तुम्हालाही फायदा झाला असे म्हणता येईल. कारण जेव्हा आपण इतरांना साहाय्य करतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. तसेच, आपण जास्त सहनशील बनतो. आपल्या बांधवांप्रती असलेले आपले प्रेम वाढते आणि ख्रिस्ती या नात्याने आपण जास्त प्रौढ बनतो. (इफिस. ४:१५, १६) यहोवाची अशी इच्छा आहे की आपण आपल्या सगळ्याच बंधुभगिनींना महत्त्वाचे समजावे, मग जे अशक्त आहेत असे वाटते त्यांनासुद्धा. असा दृष्टिकोन बाळगल्यास, आपण आपल्या बांधवांकडून अवाजवी अपेक्षा करणार नाही आणि मंडळीत अधिक प्रेमळ वातावरण राहील.

६. पौलाने काही वेळा “दुर्बळ” आणि “सशक्त” या शब्दांचा कोणत्या अर्थाने उपयोग केला?

हे खरे आहे, की पौलाने मंडळीतील काही जणांबद्दल लिहिताना, “दुर्बळ” व “अशक्त” हे शब्द वापरले होते. विश्वासात नसलेले काही जण त्यांच्याकडे या दृष्टीने पाहत असल्यामुळे पौलाने असे लिहिले होते. शिवाय, काही वेळा पौलाने स्वतःलाही दुर्बळ म्हटले. (१ करिंथ. १:२६, २७; २:३) काहींच्या संदर्भात लिहिताना जेव्हा पौलाने त्यांना “सशक्त” म्हटले, तेव्हा ते ख्रिस्ती इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत असे त्याला सुचवायचे नव्हते. (रोम. १५:१) उलट, त्याला असे सांगायचे होते की जे बांधव जास्त अनुभवी आहेत त्यांनी कमी अनुभव असलेल्यांशी वागताना सहनशीलता दाखवावी.

आपल्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे का?

७. कधीकधी आपण इतरांना मदत करण्यास मागेपुढे का पाहतो?

आपण “दीनांची” काळजी घेतो तेव्हा आपण यहोवाचे अनुकरण करत असतो आणि यामुळे त्याचे मन  आनंदित होते. (स्तो. ४१:१; इफिस. ५:१) पण कधीकधी गरजू बांधवांविषयी नकारार्थी भावनांमुळे आपण त्यांना मदत करण्यास मागेपुढे पाहतो. तसेच, त्यांच्याशी काय बोलावे हे समजत नसल्यामुळे कधीकधी आपण त्यांना भेटायचे टाळतो. कविता * जिचा पती तिला सोडून निघून गेला, ती बहीण असे म्हणते: “बांधव जेव्हा आपल्याला टाळतात किंवा जवळच्या माणसांनी वागावं तसं आपल्याशी वागत नाहीत तेव्हा फार वाईट वाटतं. कठीण परिस्थितीतून जात असताना लोकांनी सतत आपल्यासोबत असावं असं वाटतं.” इतर जण आपल्याला टाळतात तेव्हा किती वाईट वाटू शकते हे प्राचीन काळातील दाविदाने अनुभवले होते.—स्तो. ३१:१२.

८. दुर्बल बांधवांशी समजूतदारपणे वागण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

दुर्बल बांधवांशी जास्त समजूतदारपणे वागण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? त्यांच्यापैकी बरेच जण कदाचित आजारपणामुळे, नैराश्यामुळे किंवा सत्यात नसलेल्या कुटुंबीयांसोबत राहत असल्यामुळे त्रास सहन करत आहेत हे लक्षात असू द्या. कदाचित पुढे आपल्यावरही अशी परिस्थिती येऊ शकते. इजिप्तमध्ये असताना इस्राएली लोक अतिशय दीनदुबळे होते. त्यामुळे वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याआधी त्यांना अशी आठवण करून देण्यात आली की त्यांनी संकटात असलेल्या त्यांच्या बांधवांप्रती “आपले हृदय कठोर करू” नये. गरजू व दुर्बल बांधवांना त्यांनी मदत करावी अशी यहोवाची अपेक्षा होती.—अनु. १५:७, ११; लेवी. २५:३५-३८.

९. कठीण परिस्थितीतून जात असलेल्यांना मदत करताना आपण सर्वात आधी काय केले पाहिजे? उदाहरण द्या.

जे कठीण परिस्थितीतून जात आहेत अशा बांधवांचे दोष दाखवण्याऐवजी किंवा त्यांच्याविषयी शंका-कुशंका मनात आणण्याऐवजी आपण त्यांना आध्यात्मिक साहाय्य पुरवले पाहिजे. (ईयो. ३३:६, ७; मत्त. ७:१) उदाहरणार्थ, अपघात झाल्यावर एखाद्याला इस्पितळातील इमर्जन्सी विभागात आणले जाते, तेव्हा अपघाताला तो स्वतः जबाबदार होता किंवा नाही हे ठरवण्यात डॉक्टर व नर्स वेळ घालवतात का? नाही. ते लगेच त्याला आवश्यक वैद्यकीय मदत पुरवतात. त्याच प्रकारे, वैयक्तिक समस्यांमुळे एखादा भाऊ किंवा बहीण आध्यात्मिक रीत्या दुर्बल झाल्यास आपण सर्वात आधी त्याला किंवा तिला आध्यात्मिक रीत्या मदत कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर ५:१४ वाचा.

१०. जे दुर्बल वाटतात ते खरे पाहता “विश्वासासंबंधाने धनवान” कसे असू शकतात?

१० मंडळीतील काही भाऊ व बहिणी दुर्बल आहेत असे कदाचित आपल्याला वाटत असेल. पण, जर आपण त्यांच्या परिस्थितीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ते दुर्बल मुळीच नाहीत. उदाहरणार्थ, जिचा पती यहोवाची सेवा करत नाही अशा बहिणीला सत्यात टिकून राहणे किती कठीण जात असेल याची कल्पना करा. तसेच, तुम्ही अशा एखाद्या बहिणीचा विचार केला आहे का, जी एकटी पालक या नात्याने आपल्या मुलांचे संगोपन करते आणि तरीसुद्धा नियमित रीत्या त्यांना सभांना घेऊन येते? किंवा अशा तरुणांविषयी काय, जे दररोज शाळाकॉलेजांतील दबावांना तोंड देऊनही सत्यात टिकून राहतात? या सर्वांचे यहोवावर नितान्त प्रेम आहे आणि त्याला विश्वासू राहण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. आपले सर्व बांधव कोणकोणत्या परिस्थितीला तोंड देऊन यहोवाची सेवा करत आहेत याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की जरी ते दुर्बल वाटत असले, तरी खरे पाहता ते “विश्वासासंबंधाने धनवान” आहेत.—याको. २:५.

यहोवासारखा विचार करायला शिका

११, १२. (क) दुर्बल बांधवांबद्दल यहोवासारखा विचार करण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल? (ख) यहोवाने अहरोनाशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

११ यहोवाने त्याच्या काही सेवकांशी कशा प्रकारे व्यवहार केला याचे परीक्षण केल्यास आपल्याला त्याच्यासारखा विचार करण्यास साहाय्य मिळू शकते. (स्तोत्र १३०:३ वाचा.) उदाहरणार्थ, अहरोनाने सोन्याचे वासरू तयार केले त्या प्रसंगी जर तुम्हीही मोशेसोबत असता, तर अहरोनाने आपल्या कृत्याबद्दल जी कारणे सांगितली त्यांबद्दल तुम्ही कसा विचार केला असता? (निर्ग. ३२:२१-२४) किंवा, अहरोनाने मिर्याम या आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून, मोशेची एका विदेशी स्त्रीशी लग्न केल्याबद्दल टीका केली तेव्हा तुम्हाला अहरोनाच्या मनोवृत्तीबद्दल काय वाटले असते? (गण. १२:१, २) मरीबा येथे यहोवाने चमत्कारिक रीत्या पाणी पुरवले तेव्हा अहरोन व मोशे यांनी यहोवाचे गौरव केले नाही, हे पाहून तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवली असती?—गण. २०:१०-१३.

 १२ यांपैकी प्रत्येक परिस्थितीत यहोवा अहरोनाला लगेच शिक्षा देऊ शकला असता. पण यहोवाला हे माहीत होते, की अहरोन मुळात वाईट नव्हता. त्याने चुका केल्या हे खरे आहे, पण सहसा परिस्थितीच्या किंवा लोकांच्या दबावाला बळी पडून त्याने असे केले होते. पण, जेव्हा त्याचे दोष त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने ते लगेच कबूल केले आणि यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारले. (निर्ग. ३२:२६; गण. १२:११; २०:२३-२७) अहरोनाचे यहोवावर प्रेम होते आणि त्याने पश्‍चात्तापी वृत्ती दाखवली. त्यामुळे, यहोवाने त्याला क्षमा केली. म्हणूनच, कित्येक शतकांनंतरही, अहरोन व त्याच्या वंशजांना यहोवाचे विश्वासू सेवक म्हणून ओळखण्यात आले.—स्तो. ११५:१०-१२; १३५:१९, २०.

१३. आपण आपल्या विचारसरणीत बदल कसा करू शकतो? उदाहरण द्या.

१३ यहोवासारखा विचार करायला शिकायचे असेल, तर मंडळीत जे दुर्बल आहेत असे आपल्याला वाटते त्यांच्याविषयी आपण कसा विचार करतो हे तपासून पाहिले पाहिजे. (१ शमु. १६:७) उदाहरणार्थ अशा एखाद्या तरुणाचा विचार करा, जो निष्काळजीपणे वागतो. कदाचित, तो वाईट प्रकारच्या मनोरंजनाची निवड करत असेल. अशा तरुणाबद्दल विचार करताना, तो वाईट आहे असा लगेच निष्कर्ष काढू नका. त्याऐवजी त्याला कशा प्रकारे मदत करता येईल याचा विचार करा. योग्य निर्णय कसे घ्यावेत हे त्याला शिकवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे बांधवांना मदत कराल तेव्हा त्यांच्याशी अधिक सहनशीलपणे व्यवहार करणे तुम्हाला शक्य होईल आणि त्यांच्यावर असलेले तुमचे प्रेमही वाढेल.

१४, १५. (क) तात्पुरत्या काळासाठी एलीयाचे धैर्य खचले तेव्हा यहोवाला त्याच्याविषयी कसे वाटले? (ख) एलीयाच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळते?

१४ इतरांविषयी जास्त समजूतदारपणे विचार करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो? यासाठी आपण स्वतःच्या विचारसरणीची तुलना, यहोवाने आपल्या निराश झालेल्या काही सेवकांविषयी कसा विचार केला याच्याशी करू शकतो. त्या सेवकांपैकी एक होता एलीया. बआलाच्या ४५० संदेष्ट्यांना एलीयाने अगदी निर्भयपणे ललकारले होते. पण, ईजबेल राणीने आपल्याला जिवे मारण्याचा कट रचला आहे हे जेव्हा त्याला समजले तेव्हा मात्र तो पळून गेला. जवळजवळ १५० किलोमीटर पायी चालून बैर-शेबा  येथे पोचल्यावर एलीया दूर रानात जाऊन लपला. रणरणत्या उन्हात पायी चालल्यामुळे तो अगदी थकून गेला होता. तो एका झाडाखाली बसला आणि “माझा अंत कर” अशी त्याने यहोवाकडे प्रार्थना केली.—१ राजे १८:१९; १९:१-४.

एलीया अपरिपूर्ण आहे हे यहोवाने लक्षात घेतले आणि त्याचे सांत्वन करण्यासाठी एका देवदूताला पाठवले (परिच्छेद १४, १५ पाहा)

१५ निराशेच्या गर्तेत सापडलेल्या आपल्या या विश्वासू संदेष्ट्याकडे जेव्हा यहोवाने स्वर्गातून पाहिले तेव्हा त्याला कसे वाटले? तात्पुरत्या काळासाठी निराशेच्या भावनेला बळी पडलेल्या आणि धैर्य खचलेल्या आपल्या या सेवकाला पाहून यहोवाला त्याचा राग आला का? मुळीच नाही! उलट, एलीया अपरिपूर्ण आहे हे यहोवाने लक्षात घेतले आणि त्याचे सांत्वन करण्यासाठी त्याने एका देवदूताला पाठवले. त्या देवदूताने दोनदा एलीयाला काही खाऊन घ्यावे असे प्रोत्साहन दिले, जेणेकरून पुढचा प्रवास करण्यासाठी त्याला शक्ती मिळेल. (१ राजे १९:५-८ वाचा.) एलीयाला कोणतेही मार्गदर्शन किंवा सूचना देण्याआधी, यहोवाने प्रथम आपल्या संदेष्ट्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याला आवश्यक असलेले साहाय्य पुरवले.

१६, १७. यहोवाप्रमाणे आपण कशा प्रकारे आपल्या बांधवांना मदत करू शकतो?

१६ आपण आपल्या प्रेमळ देवाचे अनुकरण कसे करू शकतो? इतरांना तडकाफडकी सल्ला देण्याची वृत्ती आपण टाळली पाहिजे. (नीति. १८:१३) त्याऐवजी, वैयक्तिक परिस्थितीमुळे जे निराश झाले आहेत किंवा ज्यांचे धैर्य खचले आहे त्यांच्याविषयी प्रथम आपण सहानुभूती व्यक्त केली पाहिजे. (१ करिंथ. १२:२३) असे केल्यास, त्यांची खरी गरज ओळखून त्यांना आवश्यक साहाय्य पुरवणे आपल्याला सोपे जाईल.

१७ उदाहरणार्थ कविता, जिचा याआधी उल्लेख करण्यात आला होता तिचा विचार करा. तिचा पती तिला व तिच्या दोन मुलींना टाकून निघून गेला, तेव्हा त्या अगदीच एकट्या पडल्या. त्यांच्या परिस्थितीविषयी समजल्यावर काही बांधवांनी काय केले? कविता सांगते: “घडलेल्या प्रकाराबद्दल फोनवरून कळवल्यावर ४५ मिनिटांच्या आत मंडळीतील भाऊ व बहिणी आमच्या घरी आल्या. आम्हाला पाहून त्यांचे डोळे भरून आले. पहिले दोन-तीन दिवस त्यांनी थोडा वेळही आम्हाला एकटं सोडलं नाही. आमची जणू भूक मरून गेली होती आणि सारखं रडायला येत होतं. त्यामुळे त्यांनी आम्हाला काही दिवसांकरता आपल्या घरी नेलं.” हा अनुभव वाचून कदाचित याकोबाने लिहिलेल्या या शब्दांची तुम्हाला आठवण झाली असावी: “भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो, सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा; पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.” (याको. २:१५-१७) मंडळीतील बांधवांनी कविता व तिच्या मुलींना योग्य वेळी आधार दिल्यामुळे त्यांच्यावर कोसळलेल्या संकटातून त्या सावरू शकल्या. इतकेच काय, तर या घटनेच्या फक्त सहा महिन्यांनी त्यांनी सहायक पायनियर सेवादेखील केली!—२ करिंथ. १२:१०.

अनेक आशीर्वाद

१८, १९. (क) आपण दुर्बलांना कशा प्रकारे साहाय्य करू शकतो? (ख) आपण दुर्बलांना साहाय्य करतो तेव्हा कोणाकोणाला आशीर्वाद लाभतात?

१८ आपण बऱ्याच दिवसांपासून आजारी असतो तेव्हा त्यातून पूर्णपणे बरे होण्यास सहसा काही काळ लागतो हे तुम्हाला माहीतच आहे. त्याच प्रकारे, वैयक्तिक समस्यांमुळे किंवा जीवनात अतिशय कठीण प्रसंग आल्यामुळे जे दुर्बल झाले आहेत त्यांना आध्यात्मिक रीत्या पुन्हा सुदृढ होण्यास वेळ लागू शकतो. अशा बांधवांनी वैयक्तिक अभ्यास, प्रार्थना व इतर ख्रिस्ती कार्यांत सहभाग घेण्याद्वारे आपला विश्वास दृढ करण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत हे तर खरे आहे; पण, ते पूर्णपणे सावरेपर्यंत आपण सहनशीलता दाखवू का? आणि तोपर्यंत त्यांच्याशी धीराने व प्रेमाने वागू का? आपले त्यांच्यावर प्रेम आहे आणि तेदेखील मंडळीचा एक महत्त्वाचा भाग आहेत याची त्यांना जाणीव करून देण्याचा आपण सतत प्रयत्न करू का?—२ करिंथ. ८:८.

१९ “देणे यात जास्त धन्यता आहे” असे बायबल सांगते. म्हणूनच, जेव्हा आपण आपल्या बांधवांना मदत करतो तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो. तसेच, आपण इतरांशी जास्त सहानुभूतीने व सहनशीलतेने वागायला शिकतो. पण फक्त आपल्यालाच आशीर्वाद मिळतात असे नाही, तर सबंध मंडळीत अधिक प्रेमळ व आपुलकीचे वातावरण निर्माण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक व्यक्तीला मौल्यवान लेखणाऱ्या यहोवा देवाचे आपण अनुकरण करत असतो. खरोखर, “अशक्तांना आधार” देण्याविषयी मिळालेल्या सल्ल्याचे पालन करण्याची ही किती चांगली कारणे आहेत!—प्रे. कृत्ये २०:३५.

^ परि. 4 द डिसेंट ऑफ मॅन या आपल्या पुस्तकात चार्ल्झ डार्विन याने शरीरातील कित्येक अवयवांना “निरुपयोगी” म्हटले. डार्विनच्या मताचा अनुयायी असलेल्या एकाने असा दावा केला की मानवाच्या शरीरात अपेंडिक्स व थायमस ग्रंथी यांसारखे अनेक “अनावश्यक अवयव” आहेत.

^ परि. 7 नाव बदलण्यात आले आहे.