जीवन कथा
जन्मदात्या पित्याला गमावलं—पण स्वर्गातील पित्याला मिळवलं!
माझ्या वडलांचा जन्म १८९९ या वर्षी ऑस्ट्रियातील ग्रात्स शहरात झाला होता. त्यामुळे, पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा ते अजून लहान होते. पण १९३९ साली दुसरं महायुद्ध पेटलं तेव्हा मात्र त्यांना लगेच जर्मन सैन्यात भरती व्हावं लागलं. दुःखाची गोष्ट म्हणजे, १९४३ साली रशियामध्ये त्यांचा लढाईत मृत्यू झाला. अशा रीतीनं, फक्त दोनएक वर्षांचा असताना मी माझ्या बाबांना गमावलं. माझे बाबा कसे होते हे जाणून घेण्याची मला संधीच मिळाली नाही. मला त्यांची खूप आठवण यायची. शाळेतल्या सर्व मुलांना बाबा आहेत, पण आपल्याला नाहीत याचं मला खूप वाईट वाटायचं. पण नंतर, किशोरवयीन झाल्यावर मला आपल्या स्वर्गातील पित्याबद्दल शिकायला मिळालं. तो सर्वश्रेष्ठ पिता आहे आणि त्याचा कधीही मृत्यू होऊ शकत नाही हे मला समजलं तेव्हा मला खूप सांत्वन मिळालं.
बॉय स्काउट्स या संघटनेतील माझे अनुभव
सात वर्षांचा असताना मी बॉय स्काउट्स या तरुणांच्या संघटनेचा सदस्य बनलो. बॉय स्काउट्स ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून, ब्रिटिश सैन्यात वरिष्ठ अधिकारी असलेल्या रॉबर्ट स्टीव्हनसन स्मिथ बेडन-पॉवेल यांनी १९०८ या वर्षी ती स्थापन केली होती. १९१६ मध्ये त्यांनी माझ्या वयोगटातल्या लहानग्या मुलांसाठी वूल्फ कब्स (किंवा कब स्काउट्स) हा गट स्थापन केला.
सहसा आठवड्याच्या सुटीदरम्यान शहरापासून लांब असलेल्या एखाद्या ठिकाणी आमची शिबिरं भरायची. तिथं तंबूंमध्ये राहणं आणि स्काउट्सचा खास गणवेष घालून ड्रम्सच्या तालावर परेड करणं मला खूप आवडायचं. विशेषतः इतर स्काउट्सच्या सहवासात राहणं, संध्याकाळी शेकोटी पेटवून त्याभोवती बसून गाणी म्हणणं आणि जंगलात वेगवेगळे खेळ खेळणं या सर्व गोष्टींची मला खूप मौज वाटायची. शिवाय, आम्हाला निसर्गाविषयीही बरंच काही शिकायला मिळायचं. यामुळे, आपल्या निर्माणकर्त्याच्या अद्भुत कृतींबद्दल माझ्या मनात कृतज्ञता निर्माण झाली.
बॉय स्काउट्सच्या सदस्यांना दररोज निदान एकतरी चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन दिलं जातं. त्यांचं ब्रीदच आहे ते. एकमेकांना भेटल्यावर आम्ही “सदैव सुसज्ज” या अर्थाचं अभिवादन करायचो. हेही मला फार आवडायचं. आमच्या संघात शंभरपेक्षा जास्त मुलं होती. यांपैकी अर्धी मुलं कॅथलिक तर अर्धी प्रोटेस्टंट होती, आणि आमच्यात एक बौद्ध मुलगाही होता.
१९२० पासून दर दोनतीन वर्षांनी स्काउट्सची आंतरराष्ट्रीय शिबिरं आयोजित केली जाऊ लागली, ज्यांना जंबोरी असं म्हणतात. ऑगस्ट १९५१ मध्ये ऑस्ट्रियाच्या बाट इशल इथं झालेल्या सातव्या, आणि ऑगस्ट १९५७ मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगमजवळच्या सटन पार्क इथं झालेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय स्काउट शिबिरात मी सहभागी झालो. सटन पार्क इथं झालेल्या शिबिराला तर ८५ देशांहून व भागांतून जवळजवळ ३३,००० स्काउट्स आले होते! तसेच, या आंतरराष्ट्रीय शिबिराला इंग्लंडची राणी इलिझबेथ हिच्यासहित जवळजवळ ७,५०,००० लोकांनी भेट दिली होती. मला हे एखाद्या आंतरराष्ट्रीय बंधुसमाजासारखं वाटायचं. त्या वेळी मला कल्पनाही नव्हती की लवकरच मी यापेक्षा कित्येक पटीनं श्रेष्ठ अशा, आणि खऱ्या उपासनेमुळे एकत्र आलेल्या एका बंधुसमाजाच्या संपर्कात येणार आहे.
यहोवाच्या साक्षीदाराची पहिल्यांदा भेट
मी ऑस्ट्रियाच्या ग्रात्स शहरातील ग्रँड हॉटेल वीझ्लर इथं वेटरच्या कामाचं प्रशिक्षण घेत होतो. १९५८ साली माझं हे प्रशिक्षण पूर्ण होत आलं होतं. तिथं माझ्यासोबत बेकरी विभागात काम करणाऱ्या रूडॉल्फ शिगर्ल यानं मला त्याच्या विश्वासांबद्दल सांगितलं. मी सत्याबद्दल यापूर्वी कधीच काही ऐकलं नव्हतं. सर्वात आधी त्यानं त्रैक्याच्या शिकवणीचा उल्लेख केला आणि ही बायबलची शिकवण नाही असं सांगितलं. मी मात्र त्रैक्याचं समर्थन केलं. त्याचं म्हणणं चुकीचं आहे हे मला सिद्ध करून दाखवायचं होतं. व्यक्ती म्हणून रूडॉल्फ मला आवडायचा आणि त्यानं कॅथलिक चर्चकडे परत यावं म्हणून मी त्याचं मन वळवू इच्छित होतो.
रूडॉल्फ, ज्याला आम्ही रूडी म्हणायचो, त्यानं माझ्यासाठी एक बायबल आणलं. मला फक्त कॅथलिक व्हर्शन हवं आहे हे मी त्याला आवर्जून सांगितलं होतं. मी लगेच ते बायबल वाचायला सुरुवात केली. वाचताना, मला त्या बायबलमध्ये वॉचटावर संस्थेनं प्रकाशित केलेली एक पत्रिका सापडली. ती रूडीनं ठेवली होती. मी ती पत्रिका वाचायला नकार दिला. अशा प्रकारच्या प्रकाशनांतून, काही गोष्टी योग्य नसल्या तरी त्या योग्यच आहेत असं पटवून दिलं जातं असं माझं मत होतं. पण, बायबलमधून रूडीसोबत चर्चा करण्यास माझी हरकत नव्हती. रूडीनंही समजूतदारपणे यापुढे मला कोणतीच प्रकाशनं दिली नाहीत. जवळजवळ तीन महिन्यांपर्यंत आम्ही अधूनमधून बायबलविषयी चर्चा केल्या. बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत आमच्या या चर्चा चालायच्या.
ग्रात्स या माझ्या राहत्या शहरात हॉटेलमधील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, एका महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्या आईनं मला आर्थिक मदत केली. त्यामुळे मी आल्प्स पर्वतांत वसलेल्या बाट होफ्गास्टाइन या शहरात राहायला गेलो, जिथं हे महाविद्यालय होतं. हे महाविद्यालय बाट होफ्गास्टाइनमधील ग्रँड हॉटेलशी संलग्न असल्यामुळे वर्गातील प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी कधीकधी मला तिथंही जावं लागायचं.
दोन मिशनरी बहिणींसोबत झालेली भेट
रूडीनं माझा पत्ता वियेना इथं असलेल्या शाखा कार्यालयाला पाठवला होता. आणि शाखा कार्यालयानं तो इल्झा उन्टरडोअर्फर आणि एलफ्रिडे लोअर या दोन मिशनरी बहिणींना पाठवला होता. एके दिवशी हॉटेलच्या रिसेप्शनिस्टनं मला बोलावलं आणि बाहेर एका कारमध्ये दोन स्त्रिया माझ्यासाठी थांबल्या आहेत व त्यांना माझ्याशी बोलायचं आहे असं मला सांगितलं. हे ऐकून मी गोंधळात पडलो कारण मला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण, त्या कोण आहेत हे पाहायला मी बाहेर गेलो. नंतर मला कळलं की दुसऱ्या महायुद्धाच्या आधी नात्झी जर्मनीत यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर बंदी होती तेव्हा या दोघी बहिणींनी गुप्तपणे आपली प्रकाशनं बांधवांपर्यंत पोचवण्याचं काम केलं होतं. युद्ध सुरू होण्याआधीच त्या दोघींना जर्मनीच्या गुप्त पोलिसांनी (गेस्टापो) अटक करून लिक्टनबर्ग इथं छळ छावणीत पाठवलं होतं. नंतर, युद्धादरम्यान त्यांना बर्लिनजवळच्या रावेन्सब्रुक इथल्या छावणीत पाठवण्यात आलं.
त्या बहिणी साधारण माझ्या आईच्याच वयाच्या असल्यामुळे साहजिकच त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर होता. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात करून काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी, मला आता चर्चा करायची इच्छा नाही असं सांगून मी त्यांचा वेळ वाया घालवू इच्छित नव्हतो. म्हणून मी त्यांना विचारलं की, प्रेषित पेत्र हा पहिला पोप असून, सर्व पोप हे त्याचे उत्तराधिकारी आहेत या कॅथलिक शिकवणीबद्दल बायबलमधील काही शास्त्रवचनांची यादी तुम्ही मला आणून देऊ शकाल का? ती यादी मी पाळकाकडे नेऊन त्यांच्यासोबत यावर चर्चा करेन असंही मी त्यांना सांगितलं. असं केल्यास सत्य काय आहे हे आपोआपच मला कळेल असा माझा समज होता.
स्वर्गातील एकाच खऱ्या व पवित्र पित्याबद्दलचं ज्ञान
सर्व पोप प्रेषित पेत्राचे उत्तराधिकारी आहेत असा दावा करणारी कॅथलिक शिकवण ही खरंतर मत्तय १६:१८, १९ यातील येशूच्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेऊन त्यावर आधारण्यात आली आहे. कॅथलिक धर्मात असंही शिकवलं जातं, की पोप हा त्या अधिकारपदावर असताना धर्मशिकवणीबाबत जे काही सांगतो ते कधीच चुकीचं असू शकत नाही. माझा या गोष्टीवर विश्वास होता. त्यामुळे कॅथलिक लोक ज्याला पवित्र पिता (होली फादर) म्हणतात त्या पोपनं सांगितलेली कोणतीही धर्मशिकवण जर चुकीची असू शकत नाही, आणि जर त्यानंच त्रैक्य हे खरं असल्याचं सांगितलं आहे तर मग ते नक्कीच खरं असलं पाहिजे असं मला वाटायचं. पण पोपनं सांगितलेली कोणतीही गोष्ट चुकीची असू शकत नाही ही धारणाच जर निराधार असेल, तर मात्र त्रैक्याची शिकवणदेखील चुकीची असू शकते. खरं पाहता, सर्व पोप प्रेषित पेत्राचे उत्तराधिकारी आहेत ही शिकवण बऱ्याच कॅथलिक लोकांना इतकी महत्त्वाची का वाटते हे समजण्याजोगं आहे. याचं कारण म्हणजे इतर सर्व कॅथलिक विश्वास योग्य आहेत किंवा नाहीत हे याच शिकवणीवर अवलंबून आहे!
मी पाळकाची भेट घ्यायला गेलो, तेव्हा त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं काही देता आली नाहीत; पण, त्यांनी मला कॅथलिक धर्मशिकवणींबद्दल सांगणारं एक पुस्तक काढून दिलं. सर्व पोप हे पेत्राचे उत्तराधिकारी आहेत या शिकवणीबद्दलही त्या पुस्तकात माहिती होती. पाळकाच्या सांगण्यावरून मी ते पुस्तक घरी नेऊन वाचलं आणि पुन्हा त्यांना भेटायला गेलो. या वेळी माझ्याजवळ त्यांच्यासाठी आणखी प्रश्न होते. पण माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याजवळ नसल्यामुळे शेवटी पाळक मला इतकंच म्हणाले: “मी तुला पटवून देऊ शकत नाही आणि तूही मला पटवून देऊ शकत नाही. . . . तुझं भलं व्हावं हीच माझी प्रार्थना आहे!” त्यांना माझ्यासोबत आणखी चर्चा करण्याची इच्छा नव्हती.
आता मात्र मी इल्झा व एलफ्रिडे या बहिणींसोबत बायबलचा अभ्यास करण्यासाठी तयार झालो. त्यांनी मला स्वर्गातील एकच खरा व पवित्र पिता, यहोवा देव याच्याबद्दल बरंच काही शिकवलं. (योहा. १७:११) त्या भागात अजून एकही मंडळी नव्हती. त्यामुळे, त्या दोघी बहिणी सत्यात आवड असलेल्या एका कुटुंबाच्या घरात सभा चालवायच्या. सभेला फार कमी लोक यायचे. सभेचा बराचसा भाग त्या दोघी चर्चेच्या रूपात सादर करायच्या, कारण पुढाकार घेण्यासाठी बाप्तिस्मा झालेला एकही बांधव नव्हता. अधूनमधून इतर ठिकाणाहून एखादा बांधव येऊन भाड्यानं घेतलेल्या जागेत जाहीर भाषण द्यायचा.
सेवाकार्याला सुरुवात
इल्झा आणि एलफ्रिडे यांनी ऑक्टोबर १९५८ मध्ये माझ्यासोबत बायबलचा अभ्यास सुरू केला आणि याच्या तीन महिन्यांनंतर म्हणजे जानेवारी १९५९ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा होण्याआधी मी त्यांच्यासोबत घरोघरच्या कार्यात येण्याविषयी त्यांना विचारलं होतं. प्रचार कार्य कशा प्रकारे केलं जातं हे मला जाणून घ्यायचं होतं. (प्रे. कृत्ये २०:२०) पहिल्यांदा त्यांच्यासोबत प्रचार कार्याला गेल्यावर, मलासुद्धा प्रचार कार्य करण्यासाठी माझं स्वतःचं क्षेत्र मिळू शकेल का असं मी त्यांना विचारलं. त्यांनी एक गाव मला नेमलं. मी एकटाच तिथं जाऊन घरोघरी प्रचार करू लागलो आणि आवड दाखवणाऱ्यांच्या पुनर्भेटीही घेऊ लागलो. नंतर जेव्हा विभागीय पर्यवेक्षक आम्हाला भेट द्यायला आले तेव्हा पहिल्यांदाच मला एका बांधवासोबत घरोघरचं सेवाकार्य करण्याची संधी मिळाली.
१९६० मध्ये माझं हॉटेलचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी माझ्या नातेवाइकांना सत्य शिकून घेण्यास मदत करण्यासाठी माझ्या गावी परतलो. आजपर्यंत त्यांच्यापैकी एकही जण सत्यात आलेला नाही, पण काही जण आता थोडीफार आवड व्यक्त करू लागले आहेत.
पूर्णवेळेच्या सेवेतील जीवन
१९६१ मध्ये, पायनियर सेवा करण्याचं प्रोत्साहन देणारी शाखा कार्यालयाची पत्रं मंडळ्यांमध्ये वाचून दाखवण्यात आली. मी अविवाहित होतो आणि माझं आरोग्यही उत्तम होतं. त्यामुळे मी विचार केला की पायनियर सेवा न करण्यासाठी मी कोणतंही निमित्त सांगू शकत नाही. म्हणून, मी विभागीय पर्यवेक्षक कर्ट कून यांच्याशी बोललो. पायनियर सेवेत वापरण्यासाठी कार घेता यावी म्हणून आणखी काही महिने नोकरी करण्याच्या माझ्या विचाराबद्दल मी त्यांचं मत विचारलं. त्यांनी मला काय उत्तर दिलं? ते म्हणाले, “पूर्णवेळेची सेवा करण्यासाठी येशूला आणि त्याच्या प्रेषितांना कारची गरज होती का?” मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं! मी लवकरात लवकर पायनियर सेवा सुरू करण्याच्या तयारीला लागलो. पण मी एका हॉटेलमध्ये आठवड्यातून ७२ तास काम करत असल्यामुळे मला आधी काही फेरबदल करावे लागणार होते.
मी ७२ तासांऐवजी ६० तास काम करण्याविषयी माझ्या बॉसला विचारलं. त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि माझा पगारही कमी केला नाही. काही काळानंतर मी आठवड्याला फक्त ४८ तास काम करण्याची परवानगी मागितली. या वेळीही त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि माझा पगारही तितकाच राहिला. यानंतर मी फक्त ३६ तास, किंवा आठवड्याचे सहा दिवस, दररोज सहा तास याप्रमाणे काम करण्याविषयी विचारलं. माझी ही विनंतीदेखील मान्य करण्यात आली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या पगारात कोणताही बदल करण्यात आला नाही! मी तिथलं काम सोडून जाऊ नये अशी बहुधा माझ्या बॉसची इच्छा असावी. आठवड्याला ३६ तास काम करण्याची मुभा मिळताच मी सामान्य पायनियर सेवेला सुरुवात केली. त्या वेळी सामान्य पायनियरांना महिन्याला १०० तास भरावे लागायचे.
चार महिन्यांनंतर मला कॉरिंथिया प्रांतात असलेल्या एका गावातील लहानशा मंडळीत, खास पायनियर आणि मंडळी सेवक म्हणून नेमण्यात आलं. त्या वेळी खास पायनियरांना महिन्याला १५० तास भरावे लागायचे. पायनियर सेवेत मला अजून कोणीही जोडीदार मिळाला नव्हता, पण गर्ट्रूड लोब्नर ही बहीण मला सेवाकार्यात साथ द्यायची. त्यांच्या मदतीसाठी मी मनापासून कृतज्ञ होतो. त्या सहायक मंडळी सेवक म्हणून काम करायच्या. *
नवनवीन नेमणुका
१९६३ मध्ये मला विभागीय कार्यावर नेमण्यात आलं. एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीत जाण्याकरता कधीकधी मी ट्रेननं प्रवास करायचो. अवजड सूटकेसेस मला स्वतःच उचलून न्याव्या लागायच्या. बहुतेक बांधवांजवळ कार नसल्यामुळे कुणीही मला स्टेशनवर घ्यायला येऊ शकत नव्हतं. बांधवांना उगीच “दिखावा” केल्यासारखं वाटू नये म्हणून ज्या घरी माझ्या राहण्याची व्यवस्था केलेली असायची, तिथं मी टॅक्सीनं जाण्याचं टाळायचो. स्टेशनपासून मी पायीच त्या ठिकाणी जायचो.
१९६५ साली मला गिलियड प्रशालेच्या ४१ व्या वर्गाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं. मी अद्याप अविवाहित होतो. माझे अनेक वर्गसोबतीसुद्धा अविवाहित होते. पदवीदान झाल्यावर मला स्वतःच्या देशात म्हणजे ऑस्ट्रियाला परत जाऊन विभागीय कार्य सुरू ठेवण्यास सांगण्यात आलं, तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. पण, अमेरिकेहून ऑस्ट्रियाला परत जाण्याआधी मला चार आठवड्यांसाठी एका विभागीय पर्यवेक्षकांसोबत काम करायला सांगण्यात आलं. त्यांचं नाव होतं अॅन्टनी कॉन्टी. ते अतिशय प्रेमळ होते आणि त्यांना क्षेत्र सेवाकार्य मनापासून आवडायचं. शिवाय, या कार्यात ते अतिशय निपुण होते. मला त्यांच्यासोबत सेवा करून फार समाधान मिळालं. आम्ही न्यूयॉर्क शहराच्या उत्तरेकडील कॉर्नवॉल क्षेत्रात सोबत मिळून सेवा केली.
ऑस्ट्रियाला परत आल्यानंतर मला ज्या विभागात नेमण्यात आलं तिथं टोवे मेरेटे नावाच्या एका आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या बहिणीशी माझी भेट झाली. बालपणापासूनच, म्हणजे अवघ्या पाच वर्षांच्या वयापासूनच तिचं सत्यात असलेल्या कुटुंबात संगोपन झालं होतं. एका वर्षानंतर, १९६७ च्या एप्रिल महिन्यात आमचं लग्न झालं आणि त्यानंतर आम्हाला सोबत मिळून प्रवासी कार्य करण्याची परवानगी देण्यात आली. आमची एकमेकांशी कशी काय गाठ पडली असं बांधव आम्हाला विचारतात तेव्हा आम्ही गमतीनं म्हणतो, की “शाखा कार्यालयानंच त्याची व्यवस्था केली होती.”
पुढच्या वर्षी मला जाणीव झाली की यहोवानं माझ्यावर अगाध कृपा करून मला त्याचा आत्मिक पुत्र या नात्यानं दत्तक घेतलं आहे. अशा रीतीनं माझ्या स्वर्गातील पित्यासोबत आणि रोमकर ८:१५ यात सांगितल्याप्रमाणे “अब्बा, बापा, अशी हाक” मारणाऱ्या इतरांसोबत एका खास नातेसंबंधाला सुरुवात झाली.
मेरेटे व मी सोबत मिळून १९७६ पर्यंत विभागीय व प्रांतीय कार्य केलं. कधीकधी हिवाळ्यात आम्हाला शून्यापेक्षा कमी तापमानांत, ऊब देण्याची कोणतीही व्यवस्था नसलेल्या खोल्यांमध्ये झोपावं लागायचं. एकदा तर आम्हाला रात्री अचानक जाग आली, कारण आमच्या श्वासाची वाफ गोठून ब्लँकेटची वरची किनार अगदी कडक आणि पांढरी झाली होती! शेवटी, रात्रीची थंडी थोडी सुसह्य व्हावी म्हणून आम्ही विजेवर चालणारं लहानसं हीटर सोबत नेण्याचं ठरवलं. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी बाथरूम वापरायचं असल्यास, आम्हाला बर्फातून चालत घराबाहेर असलेल्या न्हाणीघरात जावं लागायचं. तिथं खिडक्यांच्या आणि दारांच्या फटींतून गार वारा आत यायचा. तसंच, सहसा आम्हाला वापरण्यासाठी वेगळं असं घर मिळायचं नाही. त्यामुळे, आठवडाभर ज्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केलेली असेल त्यांच्याच घरी आम्ही सोमवारीही राहायचो. मग, मंगळवारी सकाळी आम्ही पुढच्या मंडळीकडे निघायचो.
मला हे सांगायला फार आनंद वाटतो, की या सर्व वर्षांत माझ्या प्रिय पत्नीनं नेहमीच मला साथ दिली आहे. तिला क्षेत्र सेवा करायला मनापासून आवडतं. खरंतर, तिला सेवाकार्याला जाण्याचं प्रोत्साहन मला आजपर्यंत कधीही द्यावं लागलं नाही. तसंच, तिचं बांधवांवरही मनापासून प्रेम आहे आणि इतरांबद्दल तिच्या मनात खूप कळकळ आहे. तिच्या या गुणांमुळे माझ्या कार्यात मला तिची मोलाची मदत झाली आहे.
१९७६ मध्ये आम्हाला वियेना इथं असलेल्या ऑस्ट्रियाच्या शाखा कार्यालयात सेवा करण्याचं निमंत्रण देण्यात आलं आणि मला शाखा समितीचा सदस्य म्हणून नेमण्यात आलं. त्या वेळी, ऑस्ट्रियाचं शाखा कार्यालय पूर्व युरोपातील अनेक देशांचं कार्य पाहत होतं. तसंच, या देशांत अधिकाऱ्यांच्या नकळत बांधवांपर्यंत प्रकाशनं पोचवण्याची व्यवस्थाही ऑस्ट्रियाच्या शाखा कार्यालयाद्वारे केली जात होती. या कार्यात बंधू योर्गन रुंडल यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी अतिशय कौशल्यानं ही जबाबदारी पार पाडली. मला त्यांच्यासोबत कार्य करण्याची सुसंधी मिळाली आणि नंतर दहा पूर्व युरोपीय भाषांतील भाषांतर कार्यावर देखरेख करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. योर्गन व त्यांची पत्नी गर्ट्रूड हे जर्मनीत खास पायनियर म्हणून अजूनही विश्वासूपणे सेवा करत आहेत. १९७८ पासून, ऑस्ट्रिया शाखेत नियतकालिकांचं फोटोटाईपसेटिंग केलं जाऊ लागलं. एका लहानशा ऑफसेट प्रेसवर सहा भाषांतील नियतकालिकं छापली जायची. तसंच, निरनिराळ्या देशांतील वर्गणीदारांना आम्ही नियतकालिकं पाठवायचो. ऑटो कुगलिच हे प्रामुख्यानं या सर्व कामांची व्यवस्था बघायचे. आता ते त्यांची पत्नी इंग्रीट हिच्यासोबत जर्मनीमधील शाखा कार्यालयात सेवा करत आहेत.
पूर्व युरोपातील बांधवदेखील त्यांच्याच देशांत मिमियोग्राफ यंत्रांच्या साहाय्यानं किंवा फिल्मवरून साहित्य तयार करायचे. तरीसुद्धा, त्यांना साहाय्याची गरज होती. यहोवानं हे सबंध कार्य सुरक्षित रीत्या करण्यास आम्हाला मदत केली. अनेक वर्षांपासून कार्यावर बंदी असल्यामुळे पूर्व युरोपातील अनेक देशांत बांधव अतिशय कठीण परिस्थितीत यहोवाची सेवा करत होते. ऑस्ट्रिया शाखा कार्यालयातील आम्हा सर्वांना हे बांधव अतिशय प्रिय वाटायचे.
रोमानियाला दिलेली खास भेट
१९८९ या वर्षी मला नियमन मंडळाचे सदस्य बंधू थियोडोर जॅरझ यांच्यासोबत रोमानिया देशाला भेट देण्याचा विशेषाधिकार मिळाला. बांधवांच्या एका मोठ्या गटाला पुन्हा एकदा संघटनेत आणण्याचा या भेटीचा उद्देश होता. १९४९ सालापासून वेगवेगळ्या कारणांमुळे या बांधवांनी संघटनेसोबत संबंध तोडून स्वतःच्या मंडळ्या स्थापन केल्या होत्या. पण, त्यांनी प्रचार कार्य करण्याचं आणि नव्या सदस्यांना बाप्तिस्मा देण्याचं सुरूच ठेवलं होतं. तसंच, संघटनेसोबत राहून जागतिक मुख्यालयाच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत असलेल्या बांधवांप्रमाणेच, या बांधवांनीदेखील युद्ध व राजकारणात सहभाग घेण्यास नकार दिल्यामुळे तुरुंगवास भोगला होता. रोमानिया देशात अजूनही कार्यावर बंदी होती. त्यामुळे चार मुख्य वडील आणि संस्थेची संमती असलेल्या रोमानिया कंट्री कमिटीचे प्रतिनिधी यांच्यासोबत आम्ही बंधू पाम्फील आल्बू यांच्या घरी एक गुप्त बैठक घेतली. ऑस्ट्रियाहून आम्ही आपल्यासोबत एक दुभाषी, रॉल्फ केल्नर यालाही आणलं होतं.
चर्चेच्या दुसऱ्या रात्री, बंधू आल्बू यांनी त्यांच्यासोबतच्या चार वडिलांना संस्थेशी पुन्हा संबंध जोडण्यास आर्जवण्यासाठी असं म्हटलं, की “जर आताच आपण हे पाऊल उचललं नाही, तर कदाचित पुन्हा कधीच संधी मिळणार नाही.” काही काळानं, जवळजवळ ५,००० बांधव संघटनेत परतले. यहोवासाठी हा किती मोठा विजय होता आणि सैतानासाठी किती मोठा पराभव!
१९८९ या वर्षाच्या शेवटास, पूर्व युरोपात कम्युनिस्ट सत्ता संपुष्टात येण्याआधी नियमन मंडळानं मला व माझ्या पत्नीला न्यूयॉर्क इथं असलेल्या जागतिक मुख्यालयात येऊन राहण्याचं निमंत्रण दिलं. हा आमच्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. १९९० सालच्या जुलैपासून आम्ही ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा करू लागलो. १९९२ मध्ये मला नियमन मंडळाच्या सेवा समितीचा सहायक म्हणून नेमण्यात आलं, आणि १९९४ च्या जुलैपासून मला नियमन मंडळाचा सदस्य म्हणून सेवा करण्याचा बहुमान मिळाला आहे.
भूतकाळावर आणि भविष्यकाळावर एक नजर
हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्याचे माझे दिवस कधीच संपले. आता मला आध्यात्मिक अन्न तयार करून आपल्या जगभरातील बांधवांपर्यंत ते पोचवण्याच्या कार्यात सहभाग घेण्याचा सुहक्क लाभला आहे. (मत्त. २४:४५-४७) खास पूर्णवेळेच्या सेवेतल्या ५० पेक्षा जास्त वर्षांकडे मागं वळून पाहताना, यहोवानं आपल्या जगभरातील बंधुसमाजावर किती आशीर्वादांचा वर्षाव केला आहे हे पाहून मला खूप कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करावासा वाटतो. मला आपल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांना उपस्थित राहायला फार आवडतं कारण तिथं स्वर्गातील आपला पिता, यहोवा आणि बायबलमधील सत्य यांविषयी ज्ञान घेण्यावर भर दिला जातो.
माझी हीच प्रार्थना आहे की आणखी लाखो लोकांनी बायबलचा अभ्यास करावा, सत्य स्वीकारावं आणि जगभरातील ख्रिस्ती बंधुसमाजासोबत एकतेने यहोवाची सेवा करावी. (१ पेत्र २:१७) तसंच, मी त्या दिवसाचीही आतुरतेनं वाट पाहत आहे जेव्हा पृथ्वीवरील पुनरुत्थान होताना मी स्वर्गातून पाहू शकेन आणि सरतेशेवटी माझे बाबा मला पुन्हा मिळतील. मी मनापासून ही आशा बाळगतो की ते, माझी आई आणि इतर अनेक प्रिय नातेवाईक नंदनवनात यहोवाची उपासना करण्याची निवड करतील.
मी त्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत आहे जेव्हा पृथ्वीवरील पुनरुत्थान होताना मी स्वर्गातून पाहू शकेन आणि सरतेशेवटी माझे बाबा मला पुन्हा मिळतील
^ परि. 27 आता मंडळी सेवक आणि सहायक मंडळी सेवक यांच्याऐवजी प्रत्येक वडील वर्गात एका संयोजकाला व सचिवाला नेमले जाते.