व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न मिळत आहे का?

तुम्हाला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न मिळत आहे का?

आपण मानवी इतिहासातील सर्वात कठीण काळात जगत आहोत. (२ तीम. ३:१-५) यहोवाप्रती आपल्या प्रेमाची आणि त्याच्या नीतिमान स्तरांनुसार जगण्याच्या आपल्या निर्धाराची दररोज परीक्षा होते. अशी परिस्थिती येईल हे येशूला आधीच माहीत होते. त्यामुळे त्याने आपल्या अनुयायांना असे आश्वासन दिले की शेवटपर्यंत विश्वासू राहण्यासाठी ज्या प्रोत्साहनाची त्यांना गरज आहे ते त्यांना पुरवले जाईल. (मत्त. २४:३, १३; २८:२०) आपल्या अनुयायांना सत्यात टिकून राहण्यास मदत करण्यासाठी, त्यांना “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न पुरवू शकेल अशा एका विश्वासू दासाला त्याने नेमले.—मत्त. २४:४५, ४६.

१९१९ साली विश्वासू दासाला नेमण्यात आले तेव्हापासून “परिवारातील,” वेगवेगळ्या भाषा बोलणारे लाखो लोक देवाच्या संघटनेचा भाग बनले आहेत आणि त्यांना आध्यात्मिक रीत्या अन्न पुरवले जात आहे. (मत्त. २४:१४; प्रकटी. २२:१७) पण, सगळ्या भाषांमध्ये सारख्याच प्रमाणात प्रकाशने उपलब्ध नाहीत. शिवाय, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या आपल्या प्रकाशनांचा, उदाहरणार्थ, फक्त jw.org वर प्रकाशित होणारे व्हिडिओ आणि लेख यांचा उपयोग करणे सर्वांनाच शक्य नाही. तर मग याचा अर्थ असा होतो का, की आध्यात्मिक रीत्या मजबूत राहण्यासाठी ज्या अन्नाची गरज आहे त्यापासून काही जण वंचित राहतात? योग्य निष्कर्षावर पोचण्यासाठी पुढील चार महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या उत्तरांवर विचार करा.

 यहोवा आपल्याला पुरवत असलेल्या आध्यात्मिक अन्नाचा मुख्य घटक काय आहे?

सैतानाने जेव्हा येशूसमोर धोंड्याची भाकरी बनवण्याचा मोह आणला तेव्हा येशू त्याला म्हणाला: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्त. ४:३, ४) यहोवाची वचने बायबलमध्ये नमूद करण्यात आली आहेत. (२ पेत्र १:२०, २१) तेव्हा, आपल्याला जे आध्यात्मिक अन्न पुरवले जाते त्याचा मुख्य घटक बायबल आहे.—२ तीम. ३:१६, १७.

यहोवाच्या संघटनेने न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स हे संपूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग १२० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, दरवर्षी यात आणखी भाषांची भर पडत आहे. या भाषांतराव्यतिरिक्त इतर बायबल आवृत्त्यांच्या कोट्यवधी प्रती उपलब्ध आहेत; या संपूर्ण आवृत्त्यांचे किंवा त्यांच्या काही भागांचे हजारो भाषांतून भाषांतर करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात व वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या बायबलच्या प्रती पाहून आपण थक्क होतो. खरेतर ही गोष्ट यहोवाच्या इच्छेनुसारच आहे. “त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीम. २:३, ४) तसेच, यहोवाच्या “दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही.” त्यामुळे आपण ही खात्री बाळगू शकतो की ज्यांना आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव आहे त्यांना यहोवा त्याच्या संघटनेकडे आकर्षित करेल आणि त्यांच्याकरता आध्यात्मिक अन्न पुरवेल.—इब्री ४:१३; मत्त. ५:३, ६; योहा. ६:४४; १०:१४.

२ आध्यात्मिक अन्न पुरवण्यात आपली प्रकाशने कोणती भूमिका पार पाडतात?

एखाद्या व्यक्तीला जर तिचा विश्वास मजबूत करायचा असेल तर तिने फक्त बायबलचे वाचन करणेच पुरेसे नाही. तर, ती जे वाचते त्याचा अर्थ तिला समजणे आणि तिने त्यानुसार वागणे गरजेचे आहे. (याको. १:२२-२५) पहिल्या शतकातील एका कुशी षंढाला या गोष्टीची जाणीव होती. तो जेव्हा देवाचे वचन वाचत होता तेव्हा सुवार्तिक असलेल्या फिलिप्पाने त्याला विचारले: “आपण जे वाचत आहा ते आपल्याला समजते काय?” तेव्हा तो कुशी षंढ म्हणाला: “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” हे ऐकल्यावर फिलिप्पाने त्या षंढाला देवाच्या वचनातील सत्य अचूकपणे समजून घेण्यास मदत केली. त्या षंढाला जे शिकायला मिळाले त्यामुळे तो इतका प्रभावित झाला की त्याने लगेच बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कृत्ये ८:२६-३१) त्याचप्रमाणे, बायबलवर आधारित प्रकाशनांमुळे आपल्यालाही सत्याचे अचूक ज्ञान मिळवण्यास मदत झाली आहे. तसेच या प्रकाशनांनी आपल्या मनावर खोलवर प्रभाव पाडून त्यांतील माहितीचा आपल्या जीवनात अवलंब करण्यास आपल्याला प्रेरित केले आहे.—कलस्सै. १:९, १०.

प्रकाशनांद्वारे यहोवाच्या सेवकांना मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक अन्नाचा साठा पुरवला जातो. (यश. ६५:१३) उदाहरणार्थ, २१० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या टेहळणी बुरूज नियतकालिकाद्वारे आपल्याला बायबलमधील भविष्यवाण्यांचे स्पष्टीकरण मिळते; बायबलमधील गहन सत्यांबद्दलची आपली समज वाढते आणि बायबल तत्त्वांनुसार जीवन जगण्याची प्रेरणाही आपल्याला मिळते. जवळजवळ १०० भाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या अवेक! मासिकामुळे देवाच्या निर्मितीबद्दलच्या आपल्या ज्ञानात भर पडते आणि बायबलमधील व्यावहारिक सल्ले कसे लागू करावे हेही आपल्याला समजते. (नीति. ३:२१-२३; रोम. १:२०) विश्वासू दास आज ६८० पेक्षा जास्त भाषांमध्ये बायबलवर आधारित साहित्य उपलब्ध करून देत आहे! तेव्हा, दररोज बायबल वाचण्यासाठी तुम्ही वेळ काढता का? तुमच्या भाषेत प्रकाशित होणारे प्रत्येक नवीन मासिक आणि दरवर्षी प्रकाशित होणारी सर्व नवीन प्रकाशने तुम्ही वाचून काढता का?

प्रकाशने उपलब्ध करून देण्यासोबतच यहोवाची संघटना सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या भाषणांच्या बायबल आधारित रूपरेषा तयार करते. या सभांमध्ये जी भाषणे, नाटके, प्रात्यक्षिके आणि मुलाखती सादर केल्या जातात त्यांचाही आपण आनंद घेत नाही का? खरेच, यहोवा आपल्याला आध्यात्मिक अन्नाची एक मोठी मेजवानी देत आहे!—यश. २५:६.

 ३ सर्वच प्रकाशने तुमच्या भाषेत उपलब्ध नसतील तर तुम्ही आध्यात्मिक रीत्या कुपोषित राहाल का?

नाही. कधीकधी यहोवाच्या काही सेवकांना इतर बांधवांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आध्यात्मिक अन्न मिळवणे शक्य असू शकेल. पण, यामुळे आपल्याला आश्चर्य वाटण्याची गरज नाही. असे का? हे समजण्यासाठी आपण प्रेषितांचे उदाहरण पाहू या. पहिल्या शतकातील इतर अनेक शिष्यांपेक्षा प्रेषितांना जास्त माहिती मिळाली होती. (मार्क ४:१०; ९:३५-३७) असे असले, तरी इतर शिष्य आध्यात्मिक रीत्या कुपोषित राहिले नाहीत; कारण आवश्यक असलेले आध्यात्मिक अन्न त्यांना पुरवण्यात आले.—इफिस. ४:२०-२४; १ पेत्र १:८.

आणखी एक गोष्ट लक्ष देण्याजोगी आहे. पृथ्वीवर असताना येशू जे काही बोलला आणि त्याने जे काही केले ते सर्वच शुभवर्तमानाच्या पुस्तकांत लिहिण्यात आलेले नाही. प्रेषित योहानाने लिहिले: “येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत, असे मला वाटते.” (योहा. २१:२५) येशूच्या पहिल्या शतकातील अनुयायांजवळ त्याच्याबद्दल जितकी माहिती होती तितकी आपल्याजवळ नसली, तरी त्या परिपूर्ण माणसाबद्दलच्या ज्ञानापासून आपण वंचित राहिलेलो नाही. कारण, येशूचे अनुकरण करण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी माहिती यहोवाने आपल्याला दिली आहे.—१ पेत्र २:२१.

पहिल्या शतकातील मंडळ्यांना प्रेषितांनी जी पत्रे लिहिली त्यांचाही विचार करा. त्यांच्यापैकी कमीतकमी एक पत्र तरी असे आहे ज्याचा बायबलमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. (कलस्सै. ४:१६) पौलाने लिहिलेले ते पत्र आपल्याला उपलब्ध नाही याचा अर्थ आपल्याजवळ पुरेसे आध्यात्मिक अन्न नाही असा होतो का? नक्कीच नाही. कारण, आपल्याला कशाची गरज आहे हे यहोवाला माहीत आहे. आणि आध्यात्मिक रीत्या मजबूत राहण्यासाठी आपल्याला ज्याची गरज आहे ते त्याने भरपूर प्रमाणात पुरवले आहे.—मत्त. ६:८.

आपल्याला कशाची गरज आहे हे यहोवाला माहीत आहे आणि त्याने भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न पुरवले आहे

आज यहोवाच्या काही सेवकांना इतर बांधवांपेक्षा जास्त प्रमाणात आध्यात्मिक अन्न उपलब्ध आहे. तुम्ही बोलता त्या भाषेत खूप कमी प्रकाशने उपलब्ध आहेत का? असे असले, तरी यहोवाला तुमची काळजी आहे हे लक्षात ठेवा. तुमच्याजवळ जे साहित्य उपलब्ध आहे त्याचा चांगला अभ्यास करा. तसेच, शक्य असल्यास तुम्हाला समजेल अशा भाषेतील सभेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. आणि यहोवा तुम्हाला आध्यात्मिक रीत्या सुदृढ ठेवेल याची खात्री बाळगा.—स्तो. १:२; इब्री १०:२४, २५.

४ jw.org वर प्रकाशित होणाऱ्या माहितीचा फायदा घेणे तुम्हाला शक्य नसल्यास तुम्ही आध्यात्मिक रीत्या कमजोर व्हाल का?

आपल्या वेबसाईटवर मासिके आणि बायबल अभ्यासाची प्रकाशने उपलब्ध करून दिली जातात. तसेच, जोडप्यांना, तरुणांना आणि पालकांना ज्यामुळे मदत होईल असे साहित्यदेखील वेबसाईटवर प्रकाशित केले जाते. कौटुंबिक उपासनेत या माहितीवर चर्चा केल्यास कुटुंबाला फायदा होतो. आपल्या वेबसाईटवर गिलियड प्रशालेचा पदवीदान समारंभ आणि वार्षिक सभा यांसारख्या खास कार्यक्रमांबद्दल माहिती दिली जाते. तसेच, ज्या नैसर्गिक विपत्तींचा आणि न्यायालयीन घडामोडींचा यहोवाच्या लोकांवर परिणाम होतो त्यांविषयीची अलीकडील माहिती आपल्या वेबसाईटद्वारे जगभरातील बांधवांना दिली जाते. (१ पेत्र ५:८, ९) त्यासोबतच, इतरांपर्यंत राज्याची सुवार्ता पोचवण्यासाठी ही वेबसाईट खूप जबरदस्त साधन आहे. याद्वारे राज्याची सुवार्ता अशा क्षेत्रांतही पोचते जेथे आपल्या कामावर बंदी आहे.

वेबसाईटवरील माहितीचा फायदा घेणे तुम्हाला शक्य असले किंवा नसले, तरी तुम्ही आध्यात्मिक रीत्या सुदृढ राहू शकता. विश्वासू दासाने, परिवारातील प्रत्येकाला पुरेसे आध्यात्मिक अन्न मिळावे म्हणून खूप मेहनत घेऊन छापील स्वरूपातील साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे, केवळ jw.org वरील माहितीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने तुम्हाला कंप्युटर, स्मार्टफोन इत्यादी विकत घेण्याची गरज नाही. ज्यांना इंटरनेटचा उपयोग करणे शक्य नाही त्यांना कदाचित काही जण आपल्या वेबसाईटवर प्रकाशित होणारी थोडीफार माहिती प्रिंट करून वैयक्तिक रीत्या देऊ शकतात. पण, मंडळीने अशी व्यवस्था करणे गरजेचे नाही.

आपल्या आध्यात्मिक गरजा पुरवण्याविषयी येशूने जे अभिवचन दिले होते ते त्याने पूर्ण केले आहे यासाठी आपण खरेच खूप कृतज्ञ आहोत. शेवटल्या दिवसांचा अंत वेगाने जवळ येत आहे. पण, आपण ही खात्री बाळगू शकतो की यहोवा देव पुढेही आपल्याला “यथाकाळी” आध्यात्मिक अन्न पुरवत राहील.