व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे वचन सजीव आहे—त्याचा उपयोग करा!

देवाचे वचन सजीव आहे—त्याचा उपयोग करा!

“देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे.—इब्री ४:१२.

१, २. यहोवाने मोशेवर कोणती कामगिरी सोपवली, आणि त्याने त्याला कोणते आश्वासन दिले?

समजा या पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली शासकासमोर यहोवाच्या लोकांची बाजू घेऊन बोलण्याची वेळ तुमच्यावर आली तर तुम्हाला कसे वाटेल? नक्कीच तुम्ही अस्वस्थ व्हाल, आपल्याला हे जमणार नाही असे कदाचित तुम्हाला वाटेल, आणि तुम्हाला भीतीही वाटेल. त्या शासकासोबत काय बोलायचे याची तुम्ही कशी तयारी कराल? सर्वशक्तिमान देवाचा प्रतिनिधी या नात्याने तुम्ही जे काही म्हणाल ते आणखी प्रभावी ठरावे म्हणून तुम्हाला काय करता येईल?

मोशे अगदी अशाच परिस्थितीत होता. “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र” असलेल्या मोशेला यहोवाने असे सांगितले, की इजिप्तच्या दास्यातून देवाच्या लोकांची सुटका करण्याकरता तो त्याला फारोकडे पाठवणार आहे. (गण. १२:३) पुढे घडलेल्या घटनांवरून दिसून आले की फारो हा अतिशय गर्विष्ठ होता आणि त्याच्या मनात कोणाविषयीही आदर नव्हता. (निर्ग. ५:१, २) पण, अशा गर्विष्ठ शासकाकडे मोशेने जावे आणि त्याच्या दास्यात असलेल्या देवाच्या लोकांना मुक्त करण्याचा त्याला आदेश द्यावा, अशी यहोवाची इच्छा होती! तेव्हा, मोशेने यहोवाला पुढील प्रश्न का विचारला असावा हे समजण्याजोगे आहे. त्याने यहोवाला विचारले: “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांस मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?” आपण ही कामगिरी पार पाडण्यास असमर्थ आहोत, आपल्याला हे जमणार नाही असे कदाचित मोशेला वाटले असावे. पण, देवाने त्याला आश्वासन दिले की तो एकटा नाही. यहोवा त्याला म्हणाला: “मी तुझ्याबरोबर असेन.”—निर्ग. ३:९-१२.

३, ४. (क) मोशेला कोणकोणत्या गोष्टींची भीती होती? (ख) मोशेप्रमाणे तुम्हालाही कोणत्या गोष्टीची भीती वाटू शकते?

 मोशेला कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटत होती? मोशेला ही भीती होती की त्याला यहोवा देवाने पाठवले असल्यामुळे फारो त्याचे ऐकणार नाही. तसेच, मोशेला याचीसुद्धा भीती होती की इस्राएली लोकांना दास्यातून सोडवण्यासाठी यहोवाने त्याला नियुक्त केले आहे यावर त्याच्या स्वतःच्या लोकांचाही विश्वास बसणार नाही. त्यामुळे मोशे यहोवाला म्हणाला: “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.”—निर्ग. ३:१५-१८; ४:१.

यहोवाने मोशेला जे उत्तर दिले आणि त्यानंतर ज्या घटना घडल्या त्यांवरून आपल्यापैकी प्रत्येक जण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो. हे खरे आहे, की एखाद्या उच्च पदावर असलेल्या सरकारी अधिकाऱ्यासमोर बोलण्याची वेळ कदाचित तुमच्यावर येणार नाही. पण, दररोज तुमच्या संपर्कात येणाऱ्या सर्वसाधारण लोकांनाही देवाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल सांगणे कधीकधी तुम्हाला कठीण वाटते का? असे असेल, तर मोशेच्या अनुभवावरून काय शिकता येईल याकडे लक्ष द्या.

“तुझ्या हाती ते काय आहे?”

५. यहोवाने मोशेच्या हातात काय दिले, आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कसा वाढला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

आपल्या शब्दांवर कोणी विश्वास ठेवणार नाही अशी भीती जेव्हा मोशेने व्यक्त केली तेव्हा देवाने त्याला पुढे जे घडणार होते त्यासाठी तयार केले. निर्गमच्या पुस्तकात असे सांगण्यात आले आहे: “परमेश्वर [मोशेला] म्हणाला, तुझ्या हाती ते काय आहे? तो म्हणाला, काठी आहे. त्याने म्हटले, ती जमिनीवर टाक, ती त्याने टाकताच तिचा साप झाला; त्यास पाहून मोशे पळाला. परमेश्वराने मोशेस सांगितले, आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर, त्याने हात पुढे करून ते धरले, तो त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली.” पुढे यहोवा म्हणाला: “यावरून ते विश्वास धरतील की . . . [परमेश्वराचे] तुला दर्शन झाले आहे.” (निर्ग. ४:२-५) अशा रीतीने देवाने मोशेच्या हातात जणू एक साधन दिले. या साधनाच्या साहाय्याने तो हे सिद्ध करून दाखवू शकणार होता की त्याचा संदेश यहोवाकडून आहे. इतरांच्या नजरेत ती फक्त एक काठी होती पण यहोवाच्या शक्तीने तिच्यात जीव आला होता! अशा चमत्कारामुळे मोशेच्या शब्दांना किती वजन येणार होते! यहोवा त्याच्यासोबत होता याविषयी कोणतीही शंका उरणार नव्हती. म्हणून, यहोवा त्याला म्हणाला: “तू आपल्या हाती ही काठी घे; हिने तू चिन्हे करून दाखवशील.” (निर्ग. ४:१७) देवाने त्याला दिलेल्या अधिकाराचा हा पुरावा हातात असल्यामुळेच मोशे फारोसमोर व आपल्या लोकांसमोर खऱ्या देवाच्या वतीने अगदी आत्मविश्वासाने बोलू शकणार होता.—निर्ग. ४:२९-३१; ७:८-१३.

६. (क) प्रचार कार्याला जाताना आपल्या हातात काय असले पाहिजे, आणि का? (ख) देवाचे वचन कोणत्या अर्थाने “सजीव” आहे, आणि ते कशा प्रकारे “सक्रिय” आहे?

मोशेच्या हातात जसे यहोवाने दिलेले एक साधन होते, तसेच प्रचार कार्याला जाताना ‘आपल्या हातात काय असते?’ सहसा, घरमालकाला उघडून दाखवण्यासाठी आपल्या हातात बायबल असते. काहींना बायबल हे एक सर्वसाधारण पुस्तक वाटत असेल; पण आपल्यासाठी ते देवाचे प्रेरित वचन आहे आणि त्याद्वारे तो आपल्याशी बोलतो. (२ पेत्र १:२१) देव आपल्या राज्याद्वारे जी अभिवचने पूर्ण करणार आहे ती त्याच्या वचनात लिहिण्यात आली आहेत. त्यामुळेच प्रेषित पौल असे लिहू शकला: “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे. (इब्री लोकांस ४:१२ वाचा.) यहोवाने दिलेली अभिवचने पोकळ आश्वासने नसून ती सजीव आहेत, कारण ही अभिवचने पूर्ण करण्यासाठी यहोवा सतत कार्य करत आहे. (यश. ४६:१०; ५५:११) यहोवाच्या वचनाबद्दल एखाद्या व्यक्तीला एकदा का ही जाणीव झाली, की मग बायबलमधील वचने तिच्या जीवनात सक्रियपणे कार्य करू लागतात; म्हणजेच, ती व्यक्ती जीवनात बदल करण्यास प्रवृत्त होते.

७. आपण कशा प्रकारे ‘सत्याचे वचन नीट सांगणारे’ होऊ शकतो?

आपला संदेश देवाकडून आहे व तो विश्वसनीय आहे हे सिद्ध करण्यासाठी यहोवाने आपल्या हातात त्याचे सजीव वचन दिले आहे. त्यामुळे, इब्री लोकांना पत्र लिहिल्यानंतर पौलाने तीमथ्याला, ‘सत्याचे वचन नीट सांगण्यासाठी खूप मेहनत घेण्यास’ आर्जवले. (२ तीम. २:१५) आपणही पौलाच्या सल्ल्याचे पालन कसे करू शकतो? आपला संदेश ऐकून घेणाऱ्या लोकांच्या मनाला स्पर्श करतील अशी विचारपूर्वक निवडलेली शास्त्रवचने वाचून दाखवण्याद्वारे.  याबाबतीत आपल्याला मदत व्हावी म्हणून २०१३ साली काही पत्रिका प्रकाशित करण्यात आल्या.

विचारपूर्वक निवडलेले शास्त्रवचन वाचा!

८. पत्रिकांविषयी एका सेवा पर्यवेक्षकांचे काय म्हणणे आहे?

या प्रत्येक पत्रिकेचे स्वरूप सारखेच आहे. त्यामुळे, त्यांपैकी एक जरी पत्रिका वापरण्याचे आपण शिकलो तर सर्वच पत्रिका वापरण्याचे आपल्याला जमेल. त्यांचा वापर करणे सोपे आहे का? अमेरिकेतील हवाई येथील एका सेवा पर्यवेक्षकांनी असे लिहिले: “ही नवीन साधनं घरोघरच्या आणि सार्वजनिक साक्षकार्यात इतकी प्रभावी ठरतील याची आम्ही कल्पनाही केली नव्हती.” त्यांच्या मते, या पत्रिकांतील माहिती ज्या प्रकारे लिहिण्यात आली आहे त्यामुळे लोक लगेच प्रतिसाद देतात आणि त्यांच्याशी अर्थपूर्ण संवाद साधणे शक्य होते. कारण प्रत्येक पत्रिकेच्या पुढच्या पानावर एक प्रश्न आणि उत्तरासाठी तीन पर्याय दिले आहेत. यामुळे, आपले उत्तर चुकेल अशी भीती घरमालकाला वाटत नाही.

९, १०. (क) प्रत्येक पत्रिका आपल्याला बायबलचा उपयोग करण्यास कशी मदत करते? (ख) क्षेत्र सेवेत तुम्हाला कोणती पत्रिका सर्वात जास्त प्रभावी असल्याचे दिसून आले आहे, आणि का?

प्रत्येक पत्रिका एक विचारपूर्वक निवडलेले शास्त्रवचन घरमालकाला वाचून दाखवण्यास आपल्याला मदत करते. उदाहरणार्थ, दुःख कधी संपेल का? ही पत्रिका पाहा. त्यातील उत्तरांपैकी घरमालकाने “हो,” “नाही” किंवा “माहीत नाही” यांपैकी कोणताही पर्याय निवडला तरी याबद्दल काहीही न बोलता आतील पान उघडून असे म्हणा, “पवित्र शास्त्र याबद्दल काय म्हणते ते पाहा.” आणि त्यानंतर प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.

१० त्याच प्रकारे बायबलबद्दल तुमचे काय मत आहे? या पत्रिकेचा वापर करताना घरमालकाने पुढील पानावरील कोणताही पर्याय निवडला तरी काही हरकत नाही. आतील पान उघडून असे म्हणा, “बायबल म्हणते की ‘प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला’ आहे.” त्यानंतर तुम्ही असे म्हणू शकता, “खरेतर, बायबलमधील या वचनात आणखी काही सांगण्यात आले आहे.” आणि मग तुमचे बायबल उघडून २ तीमथ्य ३:१६ हे वचन वाचा.

११, १२. (क) सेवाकार्य करताना तुम्हाला कोणते समाधान मिळू शकते? (ख) पत्रिका तुम्हाला पुनर्भेट घेण्यासाठी कशा प्रकारे साहाय्य करतात?

११ पत्रिकेतील आणखी किती भाग वाचून त्यावर चर्चा करावी हे घरमालकाच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असेल. पण, घरमालकाची प्रतिक्रिया कशीही असली, तरी फक्त त्याच्या हातात पत्रिका देण्याऐवजी आपण देवाच्या वचनातून काही भाग त्यांना वाचून दाखवला याचे तुम्हाला समाधान वाटेल. पहिल्या भेटीत तुम्ही एकदोन वचने वाचली तरी चालेल. नंतर पुनर्भेट घेताना तुम्ही घरमालकाशी आणखी चर्चा करू शकता.

१२ प्रत्येक पत्रिकेच्या मागील पानावर “थोडा विचार करा” या शीर्षकाखाली एक प्रश्न देण्यात आला आहे.  शिवाय, पुनर्भेट घेताना चर्चा करण्यासाठी काही शास्त्रवचनेही देण्यात आली आहेत. भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?या पत्रिकेत पुनर्भेटीत चर्चा करण्याकरता पुढील प्रश्न देण्यात आला आहे: “देव या जगाचा कायापालट करून त्याला सुंदर कसे बनवेल?” त्यासोबतच, नीतिसूत्रे २:२१, २२ आणि दानीएल २:४४ या वचनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?या पत्रिकेत, “आपण का म्हातारे होतो आणि मरतो?” हा प्रश्न देण्यात आला आहे. आणि उत्पत्ति ३:१७-१९ व रोमकर ५:१२ ही वचने उल्लेखण्यात आली आहेत.

१३. नवीन पत्रिका बायबल अभ्यास सुरू करण्यास कशा प्रकारे मदत करतात?

१३ बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी या नवीन पत्रिकांचा उपयोग करा. जेव्हा एखादी व्यक्ती मोबाईलद्वारे पत्रिकेच्या मागील पानावर दिलेला QR * कोड स्कॅन करते, तेव्हा तिला आपल्या वेबसाईटवरील काही माहिती पाहायला किंवा वाचायला मिळते. ही माहिती त्या व्यक्तीला बायबलचा अभ्यास करण्याचे उत्तेजन देऊ शकते. या पत्रिका देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकाकडे वाचकाचे लक्ष वेधतात, तसेच त्या माहितीपत्रकातील विशिष्ट धड्याचाही त्यांत उल्लेख केलेला आहे. उदाहरणार्थ, जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? या पत्रिकेत, ५ व्या धड्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? यात ९ व्या धड्याचा उल्लेख आहे. या नवीन पत्रिका ज्या उद्देशाने बनवण्यात आल्या आहेत त्यानुसार त्यांचा वापर केल्यास तुम्हाला पहिल्या भेटीत तसेच पुनर्भेट घेताना बायबलचा उपयोग करण्यास मदत मिळेल. बायबलचा उपयोग करणे ही एक चांगली सवय आहे कारण यामुळे तुम्हाला जास्त बायबल अभ्यास सुरू करणे शक्य होईल. पण, सेवाकार्यात देवाच्या वचनाचा प्रभावीपणे उपयोग करण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता?

लोकांच्या चिंतेच्या विषयावर चर्चा करा

१४, १५. सेवाकार्याबद्दल असलेल्या पौलाच्या मनोवृत्तीचे तुम्ही कसे अनुकरण करू शकता?

१४ सेवाकार्यात जास्तीत जास्त लोकांना परिणामकारक रीत्या सुवार्ता सांगता यावी अशी पौलाची मनापासून इच्छा होती. (१ करिंथकर ९:१९-२३ वाचा.) “यहुदी,” “नियमशास्त्राधीन,” “नियमशास्त्रविरहित” आणि “दुर्बळ” अशा सर्व प्रकारच्या लोकांच्या मनापर्यंत पोचण्याचा पौलाचा प्रयत्न होता. खरेतर, त्याला सर्व प्रकारच्या लोकांना प्रभावीपणे सुवार्ता सांगायची इच्छा होती, “अशा हेतूने की, [त्याने] सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.” क्षेत्र सेवेची तयारी करताना आपण पौलाच्या या मनोवृत्तीचे अनुकरण कसे करू शकतो?—१ तीम. २:३, ४.

१५ आपली राज्य सेवा यात सहसा जी नमुना सादरीकरणे येतात त्यांचा उपयोग करून पाहा. पण, तुमच्या क्षेत्रातील लोक दुसऱ्याच कारणांमुळे चिंतित असतील तर, त्यांच्या गरजा ओळखून लक्षवेधक प्रस्तावना तयार करा. तुम्ही राहत असलेला परिसर, तेथे राहणारे लोक आणि त्यांना कोणत्या गोष्टींची सर्वात जास्त काळजी वाटते यावर विचार करा. त्यानंतर, त्यांच्या गरजेनुसार एखादे शास्त्रवचन निवडा. एक विभागीय पर्यवेक्षक व त्यांची पत्नी सेवाकार्यात कशा प्रकारे बायबलचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात याबद्दल ते बांधव असे म्हणतात: “आम्ही थोडक्यात व मुद्द्याला धरून बोलतो तेव्हा बहुतेक घरमालक आम्हाला बायबलमधून एखादं वचन वाचू देतात. घरमालकाला अभिवादन केल्यानंतर आम्ही आमच्या हातात असलेल्या बायबलमधून एक शास्त्रवचन वाचून दाखवतो.” आता आपण अशा काही विषयांकडे, प्रश्नांकडे आणि शास्त्रवचनांकडे लक्ष देणार आहोत जी बऱ्याच प्रचारकांना प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

सेवाकार्यात तुम्ही बायबलचा आणि पत्रिकांचा प्रभावीपणे वापर करत आहात का? (परिच्छेद ८-१३ पाहा)

१६. यशया १४:७ या वचनाचा सेवाकार्यात कसा वापर करता येईल?

१६ तुम्ही राहता त्या भागात लोक गुन्हेगारी, हिंसाचार यांसारख्या समस्यांनी त्रस्त आहेत का? असे असेल तर तुम्ही घरमालकाला पुढील प्रश्न विचारू शकता: “‘सर्व जगात शांती आहे, आणि पृथ्वीवरील सर्वच जण आनंदी आहेत,’ ही वर्तमानपत्राची ठळक बातमी असेल असा दिवस कधी येईल का? बायबलमधील यशया १४:७ या वचनात हेच सांगण्यात आले आहे. खरेतर, भविष्यात देव या पृथ्वीवर जी शांतिदायक परिस्थिती आणणार आहे त्याबद्दल बरीच अभिवचने बायबलमध्ये देण्यात आली आहेत.” त्यानंतर बायबलमधून त्यांपैकी एक अभिवचन वाचून दाखवा.

१७. संभाषणादरम्यान लूक ११:२८ हे वचन कसे दाखवता येईल?

१७ तुमच्या क्षेत्रात लोकांना रोजगार मिळवणे कठीण  जाते का? असे असल्यास तुम्ही पुढील प्रश्न विचारून संभाषण सुरू करू शकता: “आपले कुटुंब आनंदी राहावे म्हणून एखाद्याला किती पैसे कमवण्याची गरज आहे?” घरमालकाचे उत्तर ऐकून घेतल्यानंतर असे म्हणा: “अनेक जण यापेक्षा जास्त कमवतात पण तरी त्यांचे कुटुंब समाधानी नाही. तर मग आनंदी राहण्यासाठी कशाची गरज आहे?” त्यानंतर लूक ११:२८ वाचा आणि मग त्यांना बायबल अभ्यासाविषयी सांगा.

१८. इतरांना सांत्वन देण्याकरता यिर्मया २९:११ या वचनाचा तुम्ही कसा उपयोग करू शकता?

१८ तुमच्या भागात नुकतीच एखादी दुःखद घटना घडली आहे का? असे असल्यास तुम्ही असे म्हणू शकता: “मी तुम्हाला एक सांत्वनदायक संदेश सांगायला आलो आहे. (यिर्मया २९:११ वाचा.) आपल्या बाबतीत कोणत्या तीन चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी देवाची इच्छा आहे हे तुमच्या लक्षात आले का? वचनात सांगितल्याप्रमाणे, ‘आपले अनिष्ट होऊ नये,’ भविष्यात आपल्याला ‘सुस्थिती लाभावी’ आणि एक ‘आशा मिळावी’ अशी देवाची इच्छा आहे. आपल्याला एक चांगले जीवन जगता यावे अशी देवाची इच्छा आहे हे जाणून आपल्याला नक्कीच आनंद होतो. पण, हे कसे शक्य आहे?” प्रश्न विचारल्यानंतर आनंदाची बातमी! या माहितीपत्रकातील योग्य धड्याकडे घरमालकाचे लक्ष वेधा.

१९. ख्रिस्ती धर्मजगतातील लोकांसोबत चर्चा करताना प्रकटीकरण १४:६, ७ ही वचने कशी वापरता येतील?

१९ तुम्हाला क्षेत्र सेवेत कधीकधी ख्रिस्ती धर्मजगतातील लोक भेटतात का? त्यांच्याशी संभाषण सुरू करताना त्यांना असे विचारा: “समजा एखाद्या देवदूताला तुमच्याशी बोलायचे असेल तर तुम्ही त्याचे बोलणे ऐकून घ्याल का? (प्रकटीकरण १४:६, ७ वाचा.) या ठिकाणी हा देवदूत आपल्याला ‘देवाची भीती बाळगण्यास’ सांगत आहे. तर मग तो कोणत्या देवाबद्दल बोलत आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे नाही का? पुढे देवदूत असे म्हणतो की हा तोच आहे ‘ज्याने आकाश व पृथ्वी’ निर्माण केली आहे. मग हा देव कोण आहे?” स्तोत्र ८३:१८ वाचा. या वचनात म्हटले आहे: “तू, केवळ तूच, [“याव्हे,” तळटीप] या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” त्यानंतर, यहोवाबद्दल तुम्हाला आणखी माहिती घ्यायला आवडेल का, असे घरमालकाला विचारा.

२०. (क) एखाद्याला देवाच्या नावाबद्दल सांगण्यासाठी आपण नीतिसूत्रे ३०:४ या वचनाचा उपयोग कसा करू शकतो? (ख) क्षेत्र सेवेत तुम्हाला कोणते शास्त्रवचन परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे?

२० एखाद्या तरुणाबरोबर संभाषण सुरू करताना तुम्ही असे म्हणू शकता: “मी तुझ्याकरता एक वचन वाचून दाखवले तर चालेल का? या वचनात एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला आहे. (नीतिसूत्रे ३०:४ वाचा.) हे वर्णन साहजिकच कोणा मनुष्याबद्दल नसून आपल्या निर्माणकर्त्याबद्दलच असले पाहिजे. तर मग आपल्याला त्याचे नाव कसे कळेल? तुला बायबलमध्ये हे नाव पाहायला आवडेल का?”

सेवाकार्यात देवाच्या वचनाचे सामर्थ्य अजमावून पाहा

२१, २२. (क) विचारपूर्वक निवडलेल्या वचनाचा एखाद्याच्या जीवनावर कसा प्रभाव पडू शकतो? (ख) सेवाकार्यात अधिक प्रभावी ठरण्याकरता तुम्ही कोणता निर्धार केला आहे?

२१ विचारपूर्वक निवडलेल्या एखाद्या वचनाचा लोकांवर कसा प्रभाव पडेल हे आपण सांगू शकत नाही. ऑस्ट्रेलियातील एका अनुभवाकडे लक्ष द्या. दोन साक्षीदार बांधवांनी एका तरुण स्त्रीला भेट दिली. त्यांच्यापैकी एका बांधवाने तिला विचारले: “तुम्हाला देवाचं नाव माहीत आहे का?” त्यानंतर त्यांनी स्तोत्र ८३:१८ हे वचन तिला वाचून दाखवले. ती स्त्री म्हणते: “मला इतकं आश्चर्य वाटलं की मी पुढे काही बोलूच शकले नाही. ते बांधव गेल्यानंतर, बायबलची इतर भाषांतरं तपासून पाहण्यासाठी मी कारनं ५६ किमी. अंतरावर असलेल्या एका पुस्तकांच्या दुकानात गेले. तसंच एका शब्दकोशातही मी ते नाव शोधलं. देवाचं नाव यहोवा आहे याची मला खात्री पटली तेव्हा मला आणखी कितीतरी गोष्टी माहिती नसाव्यात हा विचार माझ्या मनात घोळू लागला.” त्यानंतर, लवकरच तिने व तिच्या होणाऱ्या पतीने बायबल अभ्यास सुरू केला आणि कालांतराने त्यांनी बाप्तिस्मा घेतला.

२२ जे लोक देवाचे वचन वाचून त्याच्या भरवशालायक अभिवचनांवर विश्वास ठेवतात, त्यांच्या संपूर्ण जीवनाला बायबलमुळे कलाटणी मिळते. (१ थेस्सलनीकाकर २:१३ वाचा.) एखाद्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोचण्यासाठी आपल्या शब्दांपेक्षा देवाच्या वचनात जास्त सामर्थ्य आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंगी देवाच्या वचनाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. कारण, देवाचे वचन सजीव आहे!

^ परि. 13 QR कोड हे डेन्सो वेव्ह इन्कॉर्पोरेटेड या कंपनीचे अधिकृत ट्रेडमार्क आहे.