व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बांधवांना साहाय्य करण्यासाठी तुम्ही पुन्हा पुढे याल का?

बांधवांना साहाय्य करण्यासाठी तुम्ही पुन्हा पुढे याल का?

येशूला नाकारल्यानंतर पेत्र दुःखी होऊन खूप रडला. पेत्राला आध्यात्मिक रीत्या आपला तोल सावरण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार होती. असे असले तरी, येशूची इच्छा होती की इतरांना मदत करण्यासाठी पेत्राचा उपयोग करावा. त्यामुळे येशूने पेत्राला म्हटले: “तू वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.” (लूक २२:३२, ५४-६२) पुढे, पेत्र पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीचा एक मुख्य आधारस्तंभ ठरला. (गलती. २:९) त्याच प्रकारे, आधी मंडळीत वडील म्हणून सेवा करणारा एक बांधव पुन्हा ही जबाबदारी हाताळण्यास पुढे येऊ शकतो आणि आपल्या सहविश्वासू बांधवांना आध्यात्मिक रीत्या मदत करण्याचा आनंद पुन्हा अनुभवू शकतो.

वडील म्हणून सेवा करणाऱ्या काही बांधवांकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आल्यामुळे कदाचित त्यांच्या मनात अपयशी ठरल्याची भावना आली असेल. दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्या हूल्यो * नावाच्या बांधवाने वडील म्हणून २० वर्षे सेवा केली होती. ते म्हणतात: “भाषणांची तयारी करणं, बांधवांच्या भेटी घेणं आणि त्यांना आध्यात्मिक रीत्या मदत करणं या गोष्टींमध्येच सहसा मी खूप व्यस्त असायचो. आणि क्षणातच हे सर्व संपलं. माझ्या जीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता.” आज हूल्यो पुन्हा वडील म्हणून सेवा करत आहेत.

“तुम्ही आनंदच माना”

याकोबाने असे म्हटले: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना.” (याको. १:२) देवावरील आपल्या विश्वासामुळे आणि अपरिपूर्णतेमुळे आपल्यावर ज्या परीक्षा येतात त्यांविषयी याकोब बोलत होता. त्याने स्वार्थी इच्छा, पक्षपात करणे आणि अशा प्रकारच्या इतर गोष्टींचा उल्लेख केला. (याको. १:१४; २:१; ४:१, २, ११) यहोवा आपले ताडन करतो तेव्हा साहजिकच आपल्याला दुःख होते. (इब्री १२:११) पण अशा परीक्षांमुळे आपण खचून जाऊ नये.

मंडळीतील जबाबदारीचे पद आपल्याकडून काढून घेण्यात आले असले तरी, आपला विश्वास किती दृढ आहे हे तपासून पाहण्याची आणि यहोवावरील आपले प्रेम कार्यांतून दाखवण्याची संधी अजूनही आपल्याजवळ आहे. पूर्वी वडील म्हणून आपण सेवा का करत होतो यावरदेखील आपण विचार करू शकतो. आपण स्वतःच्या फायद्यासाठी  सेवा करत होतो का? की आपले देवावर प्रेम असल्यामुळे आणि मंडळी देवाची असून बांधवांची प्रेमळपणे काळजी घेण्याची गरज आहे या जाणिवेमुळे आपण ही जबाबदारी उचलण्यास पुढे आलो होतो? (प्रे. कृत्ये २०:२८-३०) पूर्वी वडील म्हणून सेवा करत असलेले बांधव जेव्हा सातत्याने यहोवाची सेवा करत राहतात, तेव्हा ते सैतानाला व इतरांना दाखवून देतात की त्यांचे यहोवावर मनापासून प्रेम आहे.

गंभीर पापे केल्याबद्दल दावीद राजाचे ताडन करण्यात आले तेव्हा त्याने ते स्वीकारले आणि त्याला क्षमा करण्यात आली. दाविदाने असे म्हटले: “ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य! ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!” (स्तो. ३२:१, २) ताडन मिळाल्यामुळे दावीद स्वतःत सुधारणा करू शकला आणि देवाच्या लोकांचा मेंढपाळ या नात्याने तो आपली जबाबदारी आणखी चांगल्या प्रकारे पार पाडू शकला.

जे बांधव पुन्हा वडील म्हणून सेवा करण्यास पुढे येतात ते मेंढपाळाचे काम सहसा पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे करतात. एका वडिलाने असे म्हटले: “ज्यांच्या हातून चूक घडते त्यांना आता मी जास्त चांगल्या प्रकारे मदत करू शकतो.” आणखी एका वडिलाने असे म्हटले: “बांधवांची सेवा करण्याच्या बहुमानाबद्दल माझी कदर आता खूप वाढली आहे.”

तुम्ही पुन्हा जबाबदारी घेऊ शकता का?

स्तोत्रकर्त्याने म्हटले की यहोवा “सर्वदाच दोष देत राहणार नाही.” (स्तो. १०३:९) यामुळे, गंभीर चूक केलेल्या एका व्यक्तीवर देव पुन्हा कधीच भरवसा ठेवणार नाही असा विचार आपण करू नये. बरीच वर्षे वडील म्हणून सेवा केल्यानंतर जबाबदारीतून कमी करण्यात आलेले रीकार्डो नावाचे बांधव असे म्हणतात: “दिलेली जबाबदारी मी योग्यपणे पार पाडू शकलो नाही यामुळे मी खूप निराश झालो होतो. मी जबाबदारीच्या लायक नाही या भावनेमुळे पुन्हा वडील म्हणून सेवा करण्यासाठी मी बरीच वर्षं पुढे आलो नाही. बांधवांचा भरवसा पुन्हा जिंकता येईल का ही भीती मला होती. पण नेहमी इतरांना मदत करण्याचा स्वभाव असल्यामुळे, मी बायबल अभ्यास चालवत राहिलो, राज्यगृहात बांधवांना प्रोत्साहन देत राहिलो आणि प्रचारात त्यांच्यासोबत कामदेखील करत राहिलो. या गोष्टींमुळे मला माझा आत्मविश्वास वाढवण्यास मदत मिळाली. आज मी पुन्हा एक वडील म्हणून सेवा करत आहे.”

पुन्हा जबाबदारी सांभाळण्याची इच्छा उत्पन्न करण्यास व गमावलेला आनंद मिळवण्यास यहोवाने बऱ्याच बांधवांना मदत केली आहे

मनात राग बाळगणे हे एका बांधवाला पुन्हा वडील म्हणून सेवा करण्यापासून रोखू शकते. याऐवजी, यहोवाचा सेवक दावीद याच्यासारखे बनणे किती चांगले. दाविदाला त्याचा हेवा करणाऱ्या शौल राजापासून दूर पळून जावे लागले. पण, अनेक संधी असूनसुद्धा दाविदाने कधीच बदला घेतला नाही. (१ शमु. २४:४-७; २६: ८-१२) युद्धात शौलाचा मृत्यू झाला तेव्हा दाविदाला खूप दुःख झाले. शौल व योनाथान यांच्या मृत्यूचा शोक करताना, ते दोघे “प्रेमळ व मनमिळाऊ” होते असे म्हणून दाविदाने त्यांची प्रशंसा केली. (२ शमु. १:२१-२३) दाविदाने शौलाविरुद्ध मनात राग बाळगला नाही.

तुमच्याबद्दल इतरांना गैरसमज झाला आहे किंवा तुमच्यावर अन्याय झाला आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर सुडाच्या भावनेला तुमच्या मनात घर करू देऊ नका. उदाहरणार्थ, जवळजवळ ३० वर्षे वडील म्हणून सेवा केल्यानंतर ब्रिटनमधील विलियम नावाच्या बांधवाला जबाबदारीतून कमी करण्यात आले, तेव्हा त्यांच्या मनात इतर वडिलांप्रती कटू भावना निर्माण झाल्या. विलियम यांना या भावना मनातून काढून टाकण्यास कोणत्या गोष्टीने मदत केली? ते म्हणतात “ईयोबाचं पुस्तक वाचल्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं. यहोवानं जर ईयोबाला त्याच्या तीन मित्रांसोबत समेट करण्यास मदत केली, तर मग मंडळीतील ख्रिस्ती वडिलांसोबत समेट करण्यास तो मला नक्कीच मदत करेल हा विचार मी केला.”—ईयो. ४२:७-९.

पुन्हा जबाबदारी स्वीकारणाऱ्यांवर देवाचा आशीर्वाद

देवाच्या कळपाची राखण करण्याची जबाबदारी त्यागण्याचा तुम्ही स्वतःहून निर्णय घेतला असेल, तर त्यामागे काय कारण होते यावर तुम्ही विचार करू शकता. व्यक्तिगत समस्यांमुळे तुम्ही हा निर्णय घेतला होता का? की जीवनात इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटू लागल्यामुळे तुम्ही हे पाऊल उचलले होते? तुम्ही इतरांच्या कमतरतांमुळे निराश झाला होता का? कारण कोणतेही असो, पण तुम्ही हे नक्कीच मान्य कराल की आजच्या तुलनेत वडील म्हणून सेवा करत असताना तुमच्याजवळ इतरांना मदत करण्याच्या जास्त संधी होत्या. तुमच्या भाषणांमुळे इतरांना प्रोत्साहन मिळायचे, इतरांपुढे तुमचे उत्तम उदाहरण होते, आणि तुम्ही केलेल्या मेंढपाळ भेटींमुळे इतरांना परीक्षांचा सामना करण्यास मदत मिळाली. मंडळीत वडील म्हणून विश्वासूपणे सेवा केल्यामुळे तुम्हाला तर आनंद मिळालाच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही यहोवाचे मन आनंदित केले.—नीति. २७:११.

आनंदाने यहोवाची सेवा करत राहण्याद्वारे त्याच्यावर मनापासून प्रेम असल्याचे दाखवून द्या

मंडळीत पुन्हा जबाबदारी सांभाळण्याची इच्छा मनात उत्पन्न करण्यास व गमावलेला आनंद पुन्हा मिळवण्यास यहोवाने बऱ्याच बांधवांना मदत केली आहे. वडील म्हणून सेवा करण्याची जबाबदारी तुम्ही स्वतःहून त्यागली असली अथवा तुमच्याकडून ती काढून घेण्यात आली असली, तरी तुम्ही पुन्हा एकदा ती जबाबदारी मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. (१ तीम. ३:१) पौलाने कलस्सै येथील ख्रिश्चनांकरता “खंड पडू न देता प्रार्थना” केली जेणेकरून त्यांनी “प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने [त्यांची] वृद्धी व्हावी.” (कलस्सै. १:९, १०) तुम्हाला पुन्हा एकदा वडील म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्यास यहोवावर पूर्णपणे विसंबून राहा. तो तुम्हाला नक्कीच बळ देईल. तसेच, ही जबाबदारी धीराने व आनंदाने पेलण्यास तो तुम्हाला साहाय्य करेल. या शेवटल्या दिवसांत यहोवाच्या लोकांना प्रेमळ मेंढपाळांच्या आध्यात्मिक साहाय्याची खूप गरज आहे. तुम्ही आपल्या बांधवांना हे साहाय्य देण्यासाठी पुढे याल का?

^ परि. 3 काही नावे बदलण्यात आली आहेत.