व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा आवाज नेहमी ऐकत राहा

यहोवाचा आवाज नेहमी ऐकत राहा

“‘हाच मार्ग आहे. याने चला,’ अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल.”—यश. ३०:२१.

१, २. यहोवा त्याच्या सेवकांना कोणकोणत्या मार्गांनी मार्गदर्शन देतो?

सबंध इतिहासात यहोवाने त्याच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतींनी मार्गदर्शन दिले आहे. त्याच्या काही सेवकांशी तो देवदूतांद्वारे किंवा स्वप्न व दृष्टान्त यांद्वारे बोलला आणि भविष्यात काय घडणार आहे हे त्यांना कळवले. तसेच, यहोवाने त्यांना वेगवेगळी कार्ये करण्यासंबंधी सूचना दिल्या. (गण. ७:८९; यहे. १:३; दानी. २:१९) कधीकधी, यहोवाने त्याच्या वतीने बोलण्यासाठी पृथ्वीवरील त्याच्या काही सेवकांना निवडले आणि त्यांच्या माध्यमाने आपल्या इतर सेवकांना मार्गदर्शन दिले. मार्गदर्शन यांपैकी कोणत्याही पद्धतीने मिळालेले असो, यहोवाच्या लोकांनी जेव्हा त्याचे पालन केले तेव्हा त्यांना नेहमीच आशीर्वाद मिळाले.

आज यहोवा बायबलद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आणि ख्रिस्ती मंडळीद्वारे त्याच्या लोकांना मार्गदर्शन करत आहे. (प्रे. कृत्ये ९:३१; १५:२८; २ तीम. ३:१६, १७) यहोवाचे मार्गदर्शन इतके सुस्पष्ट आहे, की जणू आपण स्वतःच्या कानांनी त्याचा आवाज ऐकू शकतो; आणि हा आवाज आपल्याला सांगतो, की “हाच मार्ग आहे, याने चला.” (यश. ३०:२१) यहोवा त्याचे मार्गदर्शन आपल्याला देण्यासाठी येशूचाही उपयोग करतो. आज येशू ‘विश्वासू व बुद्धिमान दासाद्वारे’ ख्रिस्ती मंडळीचे नेतृत्व करत आहे. (मत्त. २४:४५) मंडळीद्वारे मिळणारे मार्गदर्शन आपण गांभीर्याने घेतले पाहिजे कारण आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल किंवा नाही हे यावरच अवलंबून आहे.—इब्री ५:९.

३. आपण कशामुळे यहोवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त होऊ शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

यहोवाकडून मिळणाऱ्या जीवनदायक मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा मिळू नये  म्हणून सैतान हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. तसेच, आपले स्वतःचे “कपटी” हृदयदेखील कधीकधी आपल्याला यहोवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करते. (यिर्म. १७:९) म्हणूनच, देवाचा आवाज ऐकण्यापासून आपल्याला रोखणाऱ्या गोष्टींवर आपण कशी मात करू शकतो याविषयी आपण या लेखात चर्चा करणार आहोत. तसेच, आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरीही, सतत यहोवाला प्रार्थना केल्यामुळे त्याच्यासोबतचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यास आपल्याला कशी मदत मिळू शकते हेदेखील पाहू या.

सैतानाच्या कुयुक्त्यांवर मात करा

४. सैतान लोकांच्या विचारसरणीवर कशा प्रकारे प्रभाव पाडतो?

खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याद्वारे सैतान लोकांच्या विचारसरणीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. (१ योहान ५:१९ वाचा.) आज वृत्तपत्रे, पुस्तके, मासिके, रेडिओ, टीव्ही आणि इंटरनेट यांसारख्या माध्यमांद्वारे, जगाच्या कानाकोपऱ्यांत माहिती पोचवली जाते. यातील काही माहिती जरी उपयोगाची असली, तरी बऱ्याचदा या माध्यमांतून लोकांना यहोवाच्या नीतिनियमांच्या विरोधात वागण्याचे प्रोत्साहन दिले जाते. (यिर्म. २:१३) उदाहरणार्थ, अनेकदा प्रसार माध्यमे समलिंगी नात्यांचे समर्थन करतात. यामुळे, अनेकांना असे वाटते की समलैंगिकतेविषयी बायबलमध्ये जे सांगितले आहे ते सध्याच्या काळाला धरून नाही.—१ करिंथ. ६:९, १०.

५. सैतानाच्या खोट्या प्रसाराला बळी पडण्याचे आपण कसे टाळू शकतो?

मग, ज्यांना देवाचे नीतिनियम प्रिय आहेत ते सैतानाच्या या खोट्या प्रसाराला बळी पडण्याचे कसे टाळू शकतात? चांगले आणि वाईट यात ते कसा फरक करू शकतात? “[देवाच्या] वचनानुसार” वागण्याची खबरदारी बाळगण्याद्वारे. (स्तो. ११९:९) देवाच्या वचनातील मार्गदर्शन आपल्याला खऱ्या व खोट्या माहितीतील फरक ओळखण्यास मदत करते. (नीति. २३:२३) येशूने शास्त्रवचनांचा आधार घेऊन म्हटले की “मनुष्य . . . परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्त. ४:४) बायबलमध्ये दिलेल्या तत्त्वांचे जीवनात पालन करण्याचे आपण शिकून घेतले पाहिजे. या बाबतीत योसेफाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. विवाहबाह्य संबंधांबद्दल मोशेने यहोवाचा नियम लिहिला, त्याच्या कितीतरी काळाआधी योसेफाने हे ओळखले होते की पोटीफराच्या बायकोशी संबंध ठेवणे हे देवाविरुद्ध पाप ठरेल. देवाच्या विरोधात वागण्याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. (उत्पत्ति ३९:७-९ वाचा.) पोटीफराची बायको बऱ्याच काळापर्यंत त्याला आपल्यासोबत वाईट काम करण्याची गळ घालत राहिली. तरीसुद्धा, योसेफाने नेहमीच यहोवाचा आवाज ऐकला. आज आपणदेखील सतत कानावर पडणाऱ्या सैतानाच्या प्रसाराकडे नव्हे, तर यहोवाच्या आवाजाकडे, त्याच्या मार्गदर्शनाकडे लक्ष दिले पाहिजे.

६, ७. सैतानाचा दुष्ट सल्ला टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

आज लोकांवर वेगवेगळ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या धार्मिक शिकवणींचा इतका भडिमार होत आहे की खऱ्या धर्माचा शोध घेणे व्यर्थ आहे असे अनेकांना वाटते. पण जे यहोवाचे मार्गदर्शन मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी त्याने ते विपुल प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. आपण कोणाचे ऐकणार हे आपल्यालाच ठरवायचे आहे. एकाच वेळी बोलणाऱ्या दोन व्यक्तींचे आवाज ऐकणे जवळजवळ अशक्य आहे. मेंढरे ज्याप्रमाणे आपल्या मेंढपाळाचा आवाज अचूक ओळखतात, त्याचप्रमाणे आपण येशूचा आवाज ओळखला पाहिजे. कारण, यहोवाने आपल्या मेंढरांचे पालन करण्यासाठी आज येशूलाच नेमले आहे.—योहान १०:३-५ वाचा.

येशूने म्हटले, “जे ऐकता ते नीट ध्यानात घ्या.” (मार्क  ४:२४, सुबोधभाषांतर) यहोवाचे मार्गदर्शन अगदी स्पष्ट आणि योग्य आहे. पण, तो जे काही सांगतो ते स्वीकारण्यासाठी आपली मनोवृत्ती योग्य असली पाहिजे. सावधगिरी न बाळगल्यास, आपण देवाच्या प्रेमळ सल्ल्याकडे दुर्लक्ष करून सैतानाच्या दुष्ट सल्ल्याकडे लक्ष देण्याची शक्यता आहे. तेव्हा, वाईट प्रकारचे संगीत, व्हिडिओ, टीव्ही कार्यक्रम, पुस्तके, सोबती, तसेच शिक्षण व इतर क्षेत्रांतील तज्ज्ञ समजले जाणारे लोक यांना कधीही तुमच्या जीवनावर नियंत्रण करू देऊ नका.—कलस्सै. २:८.

८. (क) आपले हृदय कशा प्रकारे आपल्याला सैतानाच्या कुयुक्त्यांना बळी पडायला लावू शकते? (ख) धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास काय घडू शकते?

मानवांचा पाप करण्याकडे कल आहे याची सैतानाला पूर्ण कल्पना आहे आणि तो या गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो. वाईट प्रवृत्तींना बळी पडून चुकीच्या गोष्टी करण्यासाठी सैतान जेव्हा आपल्याला प्रोत्साहित करतो, तेव्हा यहोवाप्रती आपली एकनिष्ठा टिकवून ठेवणे आपल्याला अतिशय कठीण वाटू शकते. (योहा. ८:४४-४७) मग या आव्हानावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो? हे समजून घेण्यासाठी, अशा एखाद्या बांधवाचे उदाहरण विचारात घ्या, जो काही क्षणाच्या सुखासाठी एखादे वाईट कृत्य करून बसतो. आपण ते कृत्य करू असे कदाचित त्याला वाटलेही नसेल. (रोम. ७:१५) पण मग ती चूक त्याच्या हातून का घडते? कदाचित, त्याला हळूहळू यहोवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागली असेल. एखाद्याचे हृदय वाईट गोष्टींकडे आकर्षित होत आहे याची काही लक्षणे दिसून येतात. पण या बांधवाला कदाचित हे धोक्याचे इशारे लक्षातच आले नसतील किंवा त्याने मुद्दामहून त्यांकडे दुर्लक्ष केले असेल. उदाहरणार्थ, त्याने प्रार्थना करण्याचे बंद केले असेल; सेवाकार्यात त्याचा आवेश कमी झाला असेल किंवा तो सभा चुकवू लागला असेल. आणि यामुळे शेवटी मोहाला बळी पडून, आपण वाईट गोष्ट करत आहोत याची जाणीव असूनही तो ती करून बसतो. किती दुःखाची गोष्ट! पण, आपण अशी चूक करण्याचे टाळू शकतो. यासाठी आपण सावध राहून धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे आणि वाईट मार्ग सोडून देण्यासाठी लगेच पाऊल उचलले पाहिजे. आपण जर यहोवाचा आवाज लक्षपूर्वक ऐकत राहिलो तर आपण कोणत्याही धर्मत्यागी कल्पनांना कधीच मनात थारा देणार नाही.—नीति. ११:९.

९. अयोग्य विचार वेळीच ओळखणे इतके महत्त्वाचे का आहे?

गंभीर आजार असल्याचे लवकर लक्षात आल्यास एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्याच प्रकारे, आपण एखाद्या वाईट गोष्टीकडे आकर्षित होत आहोत हे ओळखून लगेच त्यावर उपाय केल्यास, आपण सैतानाच्या ‘पाशाला’ बळी पडण्याचे टाळू शकतो. (२ तीम. २:२६) आपल्या मनात येणारे विचार किंवा आपल्या इच्छा यहोवाच्या आज्ञांच्या विरोधात आहेत हे लक्षात येताच आपण काय केले पाहिजे? आपण जराही विलंब न लावता नम्रपणे यहोवाकडे परत वळले पाहिजे, त्याच्या सल्ल्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि मनापासून त्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. (यश. ४४:२२) अर्थात, काही चुकांचे दुष्परिणाम खूप गंभीर असतात. आपण जरी यहोवाकडे परत आलो तरी आपल्याला ते दुष्परिणाम भोगावेच लागतात. त्यापेक्षा, आपल्या हातून अशी गंभीर चूक होऊ नये म्हणून वेळीच पाऊल उचलणे केव्हाही चांगले!

आध्यात्मिक कार्यांत व्यस्त राहिल्यामुळे सैतानाच्या कुयुक्त्यांपासून तुमचे संरक्षण कसे होते? (परिच्छेद ४-९ पाहा)

 गर्विष्ठ आणि लोभी प्रवृत्तींवर विजय मिळवा

१०, ११. (क) गर्विष्ठ व्यक्ती कशा प्रकारे वागते? (ख) कोरह, दाथान व अबीराम यांच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

१० सैतानच नव्हे, तर आपले स्वतःचे हृदयदेखील आपल्याला यहोवापासून दूर नेऊ शकते हे आपण ओळखले पाहिजे. खरोखर, आपल्या पापी प्रवृत्तींचा आपल्यावर किती जबरदस्त पगडा असतो! उदाहरणार्थ, गर्विष्ठपणा आणि लोभीपणा यांसारख्या प्रवृत्तींचा विचार करा. या दोन्ही प्रवृत्ती कशा प्रकारे आपल्याला यहोवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करून एखादी गंभीर चूक करायला लावू शकतात याकडे लक्ष द्या. गर्विष्ठ मनुष्य सहसा स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजतो. आपण मनात येईल तसे वागू शकतो आणि आपल्याला कसे वागावे हे सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही असे त्याला वाटत असते. त्यामुळे, इतर ख्रिस्ती बांधवांच्या, वडिलांच्या इतकेच काय तर देवाच्या संघटनेच्याही सल्ल्याची आपल्याला गरज नाही असा त्याचा समज असतो. अशा व्यक्तीला यहोवाचा आवाज ऐकू येणे फारच कठीण असते.

११ इस्राएली लोक अरण्यात असताना कोरह, दाथान व अबीराम यांनी मोशे व अहरोन यांच्या अधिकाराविरुद्ध बंड पुकारले. गर्विष्ठपणामुळे त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे यहोवाची उपासना करण्याचा प्रयत्न केला. यहोवाची प्रतिक्रिया काय होती? त्याने त्या सर्व बंडखोरांना मृत्युदंड दिला. (गण. २६:८-१०) पुरातन काळात घडलेल्या या घटनेवरून आपल्याला किती महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो! यहोवाच्या विरोधात बंड केल्यास आपण स्वतःवरच संकट ओढवून घेतो. आणि “गर्व झाला की नाश ठेवलेला” हे सत्यदेखील आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे.—नीति. १६:१८; यश. १३:११.

१२, १३. (क) लोभीपणामुळे कशा प्रकारे संकट ओढवू शकते हे गेहजीच्या उदाहरणावरून सांगा. (ख) लोभी इच्छेवर नियंत्रण न मिळवल्यास ती पाहतापाहता कशी वाढू शकते हे स्पष्ट करा.

१२ आता लोभीपणाच्या प्रवृत्तीबद्दल थोडा विचार करू या. लोभी व्यक्तीदेखील सहसा आपल्या मनाप्रमाणे, मर्यादा ओलांडून वागते. एक उदाहरण विचारात घ्या. अरामी सेनापती नामान याचे कोड बरे झाल्यानंतर तो अलीशा संदेष्ट्याला काही भेटवस्तू देऊ करतो. पण अलीशा त्या घेण्यास नकार देतो. अलीशाचा सेवक गेहजी याला मात्र त्या वस्तू पाहून हाव सुटते. तो असा विचार करतो: “परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी [नामानाच्या मागून] धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच.” अलीशाच्या नकळत तो नामानाच्या मागे धावत जातो आणि त्याला खोटे सांगून “एक किक्कार चांदी व दोन पोशाख” त्याच्याकडून घेतो. गेहजीच्या या कृत्यामुळे आणि यहोवाच्या संदेष्ट्याशी त्याने लबाडी केल्यामुळे काय घडते? गेहजीच्या हावरटपणामुळे नामानाचे कोड त्याला लागते.—२ राजे ५:२०-२७.

१३ मनात आलेल्या लोभी इच्छेवर नियंत्रण केले नाही तर पाहतापाहता एखादी व्यक्ती पूर्णपणे तिच्या आहारी जाऊ शकते. लोभीपणाची प्रवृत्ती किती घातक ठरू शकते, हे बायबलमधील आखानाच्या अहवालावरून दिसून येते. आखानाच्या लोभीपणाने किती कमी वेळात त्याला वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त केले याकडे लक्ष द्या. आखानाने सांगितले: “लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या.” मनात आलेली चुकीची लोभी कल्पना लगेच मनातून काढून टाकण्याऐवजी आखानाने तिच्या आहारी जाऊन त्या वस्तू चोरल्या आणि आपल्या तंबूत लपवून ठेवल्या. आखानाने केलेले वाईट कृत्य उजेडात आले तेव्हा यहोशवाने त्याला सांगितले की त्याने ही चूक केल्यामुळे यहोवा त्याच्यावर संकट आणेल. त्याच दिवशी आखान व त्याच्या कुटुंबाला दगडमार करून ठार मारण्यात आले. (यहो. ७:११, २१, २४, २५) लोभीपणाची प्रवृत्ती केव्हाही आपल्या मनात निर्माण होऊन आपल्याला वाईट गोष्टी करायला लावू शकते. त्यामुळे, आपण “सर्व प्रकारच्या लोभापासून दूर” राहण्याची काळजी घेतली पाहिजे. (लूक १२:१५) एखाद्या वेळी आपल्या मनात चुकीची इच्छा किंवा अनैतिक कल्पना येऊ शकते; पण, आपण लगेच आपल्या मनावर नियंत्रण मिळवले पाहिजे. आपली लोभी इच्छा वाढून आपल्याला वाईट कृत्य करायला लावणार नाही यासाठी आपण वेळीच पाऊल उचलले पाहिजे.—याकोब १:१४, १५ वाचा.

१४. गर्वामुळे किंवा लोभामुळे एखादी चुकीची गोष्ट करण्याची इच्छा मनात निर्माण झाल्यास आपण काय केले पाहिजे?

१४ गर्विष्ठपणा आणि लोभीपणा या दोन्ही गोष्टींमुळे आपल्यावर संकट ओढवू शकते हे आपण पाहिले. अशा चुकीच्या प्रवृत्तींमुळे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात यावर मनन केल्यास यहोवाचा आवाज आपण नेहमीच ऐकू. (अनु. ३२:२९) बायबलद्वारे यहोवा आपल्याला  फक्त योग्य मार्ग कोणता हेच सांगत नाही; तर त्या मार्गाने चालल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळू शकतात आणि चुकीच्या मार्गाने गेल्यास कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हेदेखील तो आपल्याला सांगतो. आपल्या मनात गर्वामुळे किंवा लोभामुळे एखादी चुकीची गोष्ट करण्याची इच्छा निर्माण झाल्यास, त्या कृत्याचे काय परिणाम होतील याविषयी मनन करणे किती सुज्ञपणाचे ठरेल! आपल्या चुकीमुळे आपल्या स्वतःवर, आपल्या प्रिय जनांवर आणि विशेषतः यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर कसा परिणाम होईल याचा आपण विचार केला पाहिजे.

प्रार्थनेद्वारे सतत यहोवाशी बोलत राहा

१५. येशूच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

१५ आपण जीवनात यशस्वी व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे. (स्तो. १:१-३) म्हणूनच, तो आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पुरवतो. (इब्री लोकांस ४:१६ वाचा.) येशू परिपूर्ण होता, तरीसुद्धा तो निरंतर प्रार्थना करण्याद्वारे सतत यहोवाशी बोलायचा. यहोवाने येशूला खूप अद्भुत मार्गांनी साहाय्य व मार्गदर्शन पुरवले. उदाहरणार्थ, त्याची सेवा करण्यासाठी यहोवाने देवदूतांना पाठवले, त्याला साहाय्य करण्यासाठी पवित्र आत्मा दिला आणि १२ प्रेषितांची निवड करण्यासाठीही येशूला आवश्यक मार्गदर्शन पुरवले. इतकेच काय, तर यहोवाने स्वर्गातून येशूबद्दल आपली पसंती व्यक्त केली आणि त्याला आपला पाठिंबा असल्याचे व्यक्त केले. (मत्त. ३:१७; १७:५; मार्क १:१२, १३; योहा. १२:२८) येशूप्रमाणेच आपणदेखील प्रार्थनेद्वारे यहोवाजवळ आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. (स्तो. ६२:७, ८; इब्री ५:७) असे केल्यामुळे आपणदेखील सतत यहोवाशी बोलत राहू शकतो. यामुळे आपल्याला जीवनात यशस्वी रीत्या वाटचाल करून यहोवाचे गौरव करता येईल.

१६. आपण यहोवाचा आवाज कशा प्रकारे ऐकू शकतो?

१६ यहोवाचे मार्गदर्शन विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. पण, तो कोणालाही बळजबरीने आपला सल्ला स्वीकारण्यास लावत नाही. त्याच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण त्याकरता विनंती केली पाहिजे. असे केल्यास तो उदारतेने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देईल. (लूक ११:१०-१३ वाचा.) पण त्याच वेळेस, बायबल आपल्याला सांगते की “तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा.” (लूक ८:१८) उदाहरणार्थ, जर एकीकडे आपण अनैतिक भावनांवर मात करण्यासाठी यहोवाला मदत मागत असू, आणि दुसरीकडे अश्लील साहित्य किंवा अनैतिक इच्छा जागृत करणारे चित्रपट पाहत असू तर हा ढोंगीपणा ठरेल. याउलट, आपण यहोवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळू शकेल, अशा ठिकाणी असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंडळीच्या सभांमध्ये यहोवाचा पवित्र आत्मा असतो हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे यहोवा सभांद्वारे आपल्याशी बोलतो तेव्हा आपण त्याचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. असे केल्यास आपण मोहात पडून स्वतःवर संकट ओढवण्याचे टाळू शकतो. अनेकांनी हे स्वतः अनुभवले आहे. सभेत लक्षपूर्वक ऐकल्यामुळे आपल्या हृदयात वाईट इच्छा निर्माण होत आहेत याची त्यांना जाणीव झाली आणि वेळीच योग्य मार्गावर येणे त्यांना शक्य झाले.—स्तो. ७३:१२-१७; १४३:१०.

यहोवाचा आवाज नेहमी ऐकत राहा

१७. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणे धोक्याचे का आहे?

१७ पुरातन इस्राएलचा राजा दावीद याचे उदाहरण लक्षात घ्या. कोवळ्या वयातच त्याने शक्तिशाली पलिष्टी सैनिक गल्याथ याच्यावर विजय मिळवला होता. पुढे दावीद स्वतः एक योद्धा व राजा बनला. इस्राएल राष्ट्राचे संरक्षण करण्याची व राष्ट्राकरता चांगले निर्णय घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. पण, जेव्हा दाविदाने स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या हातून गंभीर चुका घडल्या. त्याने बथशेबेशी व्यभिचार केला आणि कट रचून तिचा पती उरीया याची हत्या घडवून आणली. पण, दाविदाला ताडन देण्यात आले तेव्हा त्याने नम्रपणे आपल्या चुका कबूल केल्या आणि यहोवासोबत पुन्हा एकदा चांगला नातेसंबंध जोडला.—स्तो. ५१:४, ६, १०, ११.

१८. यहोवाचा आवाज लक्षपूर्वक ऐकत राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१८ आपण सर्व जण १ करिंथकर १०:१२ यातील सल्ल्याचे पालन करून फाजील आत्मविश्वास बाळगण्याचे टाळू या. बायबल स्पष्टपणे सांगते की “पावले नीट टाकणे” हे मानवाच्या हाती नाही; त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. पण, आपण यहोवाचा आवाज ऐकणार की सैतानाचा, हे आपल्याला ठरवायचे आहे. (यिर्म. १०:२३) तेव्हा, आपण सतत प्रार्थना करत राहू या, पवित्र आत्म्याने दाखवलेल्या मार्गाने चालत राहू या आणि अशा रीतीने यहोवाचा आवाज लक्षपूर्वक ऐकत राहू या.