व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या उद्देशात स्त्रियांची भूमिका

यहोवाच्या उद्देशात स्त्रियांची भूमिका

“मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना” आहे. —स्तो. ६८:११.

१, २. (क) देवाने आदामाला कोणते आशीर्वाद दिले? (ख) देवाने आदामाला एक पत्नी का दिली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

ही पृथ्वी निर्माण करताना यहोवाच्या मनात एक खास उद्देश होता. तिच्यावर “लोकवस्ती व्हावी म्हणून” त्याने ती निर्माण केली होती. (यश. ४५:१८) देवाने निर्माण केलेला पहिला मनुष्य, आदाम हा परिपूर्ण होता. देवाने त्याला राहण्यासाठी एक सुंदर बाग दिली होती—एदेनची बाग. त्या बागेतील मोठमोठी वृक्षे, खळखळून वाहणारे झरे आणि तिच्यात बागडणारे पशपक्षी पाहून आदामाला किती आनंद होत असेल! पण, एक अतिशय महत्त्वाची उणीव त्याच्या जीवनात होती. ती कोणती, हे यहोवाच्या पुढील शब्दांवरून दिसून आले: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करेन.” मग देवाने आदामाला गाढ झोप आणली आणि तो झोपल्यावर त्याने आदामाची एक फासळी घेऊन “तिची स्त्री बनवली.” आदाम झोपेतून जागा झाला तेव्हा स्त्रीला पाहून त्याला किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. तो म्हणाला, “ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे.”—उत्प. २:१८-२३.

आदामासाठी एक स्त्री निर्माण करून देवाने खरेतर त्याला एक अप्रतिम भेट दिली होती. कारण ही स्त्री आदामाची परिपूर्ण साहाय्यक असणार होती. तसेच, मुलांना जन्म देण्याची खास क्षमता तिला देण्यात आली होती. आणि म्हणूनच, “आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता” होणार  होती. (उत्प. ३:२०) खरोखर, देवाने त्या पहिल्या मानवी जोडप्याला किती अद्भुत आशीर्वाद दिला होता! ते स्वतःसारख्याच इतर परिपूर्ण मानवांना जन्म देऊ शकत होते. या आशीर्वादामुळे कालांतराने सबंध पृथ्वी, परिपूर्ण मानवांची वस्ती असलेले एक नंदनवन बनणार होती. आणि हे मानव इतर सर्व प्राणिमात्रांवर अधिकार चालवणार होते.—उत्प. १:२७, २८.

३. (क) देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आदाम व हव्वा यांनी काय करण्याची गरज होती, पण प्रत्यक्षात काय घडले? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणार आहोत?

आदाम व हव्वा यांच्याकरता राखून ठेवलेले सर्व आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांनी यहोवाच्या आज्ञेत राहणे आणि त्याचे आपल्यावरील शासन स्वीकारणे गरजेचे होते. (उत्प. २:१५-१७) तरच ते देवाचा त्यांच्याकरता असलेला उद्देश पूर्ण करू शकणार होते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे “जुनाट साप” अर्थात सैतान याच्या दुष्ट प्रभावाला बळी पडून त्यांनी देवाची आज्ञा मोडली. (प्रकटी. १२:९; उत्प. ३:१-६) देवाविरुद्ध केलेल्या या विद्रोहाचा स्त्रियांवर काय परिणाम झाला आहे? देवाला भिऊन वागणाऱ्या पुरातन काळातील स्त्रियांनी कोणती चांगली कार्ये केली आहेत? आणि आजच्या काळातील ख्रिस्ती स्त्रियांना एक “मोठी सेना” म्हणणे रास्त का आहे?—स्तो. ६८:११.

विद्रोहामुळे झालेले परिणाम

४. पहिल्या मानवी जोडप्याने केलेल्या पापाबद्दल कोणाला जबाबदार धरण्यात आले?

आदामाने केलेल्या पापाबद्दल देवाने त्याला जाब विचारला तेव्हा आदामाने असे म्हटले: “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” (उत्प. ३:१२) अशा रीतीने, आपण केलेले पाप तर आदामाने कबूल केले नाहीच; उलट, देवाने त्याला दिलेल्या स्त्रीवर आणि इतक्या प्रेमळपणे त्याला एक अनुरूप साहाय्यक देणाऱ्या देवावरच त्याने दोष ढकलण्याचा प्रयत्न केला. खरे पाहता, आदाम व हव्वा या दोघांनीही पाप केले होते. पण त्यांच्या या पापासाठी आदामाला जबाबदार धरण्यात आले. म्हणूनच, प्रेषित पौलाने लिहिले की “एका माणसाच्या [आदामाच्या] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले.”—रोम. ५:१२.

५. मानवी शासनामुळे कोणती गोष्ट सिद्ध झाली आहे?

सैतानाने पहिल्या मानवी जोडप्याला असा विचार करायला लावला की एक शासक म्हणून त्यांना यहोवाची गरज नाही. यामुळे विश्वाच्या सर्वोच्च अधिकाराबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला: शासन चालवण्याचा अधिकार कोणाला आहे? हा विवाद कायमचा मिटवण्यासाठी देवाने मानवांना काही काळ त्याच्या मार्गदर्शनाशिवाय शासन चालवण्याची परवानगी दिली. मानव देवाच्या मार्गदर्शनाशिवाय शासन चालवण्यात यशस्वी होऊ शकत नाही हे कालांतराने सिद्ध होईल याची देवाला कल्पना होती. आणि खरोखरच, मानवाने स्वतःच्या बळावर शासन चालवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मागील अनेक शतकांत जगावर एकापाठोपाठ एक संकटे आली आहेत. मागील एका शतकातच सुमारे दहा कोटी लोक युद्धांत मृत्यूमुखी पडले आहेत. यांत लाखो निष्पाप पुरुष, स्त्रिया व मुले होती. या व अशा अनेक पुराव्यांवरून हेच सिद्ध होते, की “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्म. १०:२३) याची जाणीव असल्यामुळेच आपण यहोवाला आपला शासक म्हणून स्वीकारतो.नीतिसूत्रे ३:५, ६ वाचा.

६. बऱ्याच देशांत स्त्रियांना कशी वागणूक दिली जाते?

सैतानाच्या प्रभावाखाली असलेल्या या जगात स्त्रियांना व पुरुषांनाही बरेच अत्याचार सहन करावे लागले आहेत. (उप. ८:९; १ योहा. ५:१९) पण, सर्वात भयानक प्रकारचे काही अत्याचार स्त्रियांविरुद्ध करण्यात आले आहेत. जगभरात, जवळजवळ ३० टक्के स्त्रिया एखाद्या पुरुषाकडून मारहाण झाल्याचे सांगतात. काही समाजांत मुलांना जास्त महत्त्व दिले जाते कारण तेच वंश पुढे चालवतील आणि आईवडिलांच्या व आजीआजोबांच्या म्हातारपणी त्यांना आधार देतील असा लोकांचा समज असतो. याच कारणामुळे सहसा लोकांना मुली नकोशा असतात आणि म्हणूनच स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण तुलनेने जास्त आहे.

७. देवाने स्त्रीपुरुषांना कशा प्रकारे एक अतिशय उत्तम सुरुवात करून दिली होती?

स्त्रियांना दिली जाणारी ही गैरवागणूक देवाला नक्कीच पसंत नाही. तो स्त्रियांशी न्यायीपणे व्यवहार करतो आणि त्यांचा आदर करतो. त्याने हव्वेला ज्या प्रकारे निर्माण केले होते, त्यावरून हे दिसून येते. हव्वेला परिपूर्ण असे निर्माण करण्यात आले होते. तसेच, आदामाची गुलाम  नव्हे तर एक उत्तम साहाय्यक होण्यासाठी लागणारे विशेष गुण तिला देण्यात आले होते. निर्मितीच्या सहाव्या दिवशी इतर गोष्टींसोबतच स्त्रीला निर्माण करून देवाला फार समाधान वाटले. तो दिवस पूर्ण झाल्यावर “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्प. १:३१) खरोखर, यहोवाने निर्माण केलेले “सर्व फार चांगले” होते. त्याने पुरुषांना व स्त्रियांनादेखील एक अतिशय उत्तम सुरुवात करून दिली होती!

यहोवाने आशीर्वादित केलेल्या स्त्रिया

८. (क) सर्वसामान्यपणे आज लोकांची वागणूक कशी आहे? (ख) सबंध इतिहासात देवाने कोणाला आशीर्वादित केले आहे?

एदेन बागेत देवाविरुद्ध झालेल्या विद्रोहानंतर सर्वसामान्यपणे पाहता स्त्रीपुरुषांचे वर्तन अधिकाधिक बिघडले. आणि मागील शंभरेक वर्षांत तर परिस्थिती फारच वाईट झाली आहे. “शेवटल्या काळी” लोक दुष्टपणे वागतील हे बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते. सबंध जगातील मानवांचे वर्तन इतके बिघडले आहे की सध्याच्या काळाला खरोखरच एक “कठीण” काळ म्हणता येईल. (२ तीम. ३:१-५) पण, संपूर्ण मानवी इतिहासात विश्वाचा सर्वोच्च “प्रभू” असलेल्या यहोवाने त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या, त्याच्या नीतिनियमांचे पालन करणाऱ्या आणि त्याला आपला शासक म्हणून स्वीकारणाऱ्या स्त्रीपुरुषांना आशीर्वादित केले आहे.—स्तोत्र ७१:५ वाचा.

९. जलप्रलयातून किती माणसांचा बचाव झाला आणि का?

नोहाच्या दिवसांत देवाने जलप्रलयाद्वारे त्या काळातील दुष्ट जगाचा नाश केला, तेव्हा अगदी बोटांवर मोजण्याइतक्याच मानवांचा बचाव झाला. नोहाचे भाऊ व बहिणी त्या वेळी जिवंत असल्यास जलप्रलयात त्यांचाही नाश झाला असेल. (उत्प. ५:३०) पण, जलप्रलयातून जिवंत बचावणाऱ्या पुरुषांची व स्त्रियांची संख्या सारखीच होती. नोहा, त्याची पत्नी, त्याची तीन मुले आणि त्यांच्या पत्नी जलप्रलयातून वाचल्या. हे सर्व जण देवाचे भय बाळगून त्याच्या इच्छेनुसार वागल्यामुळे त्यांचा बचाव झाला. आज जिवंत असलेले कोट्यवधी मानव, यहोवाचा आशीर्वाद असलेल्या त्या आठ जणांचेच वंशज आहेत.—उत्प. ७:७; १ पेत्र ३:२०.

१०. विश्वासू कुलप्रमुखांच्या देवभीरू पत्नींना यहोवाने आशीर्वादित का केले?

१० कित्येक वर्षांनंतर, विश्वासू कुलप्रमुख जसे की अब्राहाम व इसहाक यांच्या देवभीरू पत्नींनादेखील यहोवाने आशीर्वादित केले. त्या आपल्या जीवनातील परिस्थितीबद्दल कुरकूर करणाऱ्या स्त्रिया असत्या, तर यहोवाने त्यांना आशीर्वाद दिला नसता. (यहू. १६) उदाहरणार्थ, अब्राहामाने ऊर देशातील आरामदायी जीवन मागे सोडले आणि तो आपल्या कुटुंबासोबत दुसऱ्या एका देशात तंबूंमध्ये राहू लागला. पण, अब्राहामाचा मनापासून आदर करणारी त्याची पत्नी सारा हिने याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार केली असेल अशी आपण कल्पनाही करू शकत नाही. कारण बायबलमध्ये सांगितले आहे, की “सारा अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली.” (१ पेत्र ३:६) तसेच रिबका हिचेही उदाहरण विचारात घ्या. इसहाकासाठी ती देवाकडून मिळालेली एक अमूल्य देणगी होती आणि ती एक उत्तम पत्नी ठरली. म्हणूनच “तिच्यावर [इसहाकाचे] प्रेम होते आणि आपल्या आईच्या पश्‍चात इसहाक सांत्वन पावला.” (उत्प. २४:६७) आजही आपल्यामध्ये सारा व रिबका यांच्यासारख्या देवाला भिऊन वागणाऱ्या स्त्रिया आहेत, ही आपल्याकरता किती आनंदाची गोष्ट आहे!

११. दोन इब्री सुइणींनी कशा प्रकारे धैर्य दाखवले?

११ इस्राएली लोक इजिप्तमध्ये गुलाम होते तेव्हा त्यांची संख्या अतिशय वाढली. त्यामुळे, फारोने असा आदेश दिला की इब्री स्त्रियांना मुलगे झाल्यास त्यांना जन्मताच जिवे मारले जावे. पण त्या वेळी शिप्रा व पुवा, ज्या कदाचित प्रमुख इब्री सुइणी असाव्यात, त्यांनी काय केले याचा विचार करा. या दोघींच्या मनात यहोवाबद्दल आदरयुक्त भय असल्यामुळे, त्यांनी बालकांचा संहार करण्याच्या आदेशाचे पालन करण्यास धैर्याने नकार दिला. यामुळे यहोवाने त्यांना मुलेबाळे देऊन आशीर्वादित केले.—निर्ग. १:१५-२१.

१२. दबोरा व याएल यांनी कोणती उल्लेखनीय कामगिरी केली?

१२ इस्राएलमध्ये शास्त्यांच्या काळात, संदेष्ट्री दबोरा हिला देवाने आशीर्वादित केले. तिने शास्ता म्हणून कार्य करणाऱ्या बाराकाचे मनोबल वाढवले. तसेच, इस्राएली लोकांना कनानी लोकांच्या अत्याचारापासून मुक्त करण्यात तिचेही योगदान होते. पण, तिने असे भाकीत केले होते की कनानी लोकांवर मिळणाऱ्या विजयाचे श्रेय हे बाराकाला मिळणार नाही. याउलट, कनानी सैन्याचा सेनापती सीसरा याला देव “एका स्त्रीच्या हाती” देईल. आणि  अगदी तसेच घडले. इस्राएलांपैकी नसलेली एक स्त्री याएल हिने सीसराचा वध केला.—शास्ते ४:४-९, १७-२२.

१३. बायबलमध्ये अबीगईलविषयी काय सांगण्यात आले आहे?

१३ अबीगईल ही इ.स.पू. ११ व्या शतकात राहणारी एक अतिशय उल्लेखनीय स्त्री होती. ती खूप समंजस होती. पण, तिचा पती नाबाल हा एक कठोर, दुर्गुणी व मूर्ख मनुष्य होता. (१ शमु. २५:२, ३, २५) दावीद व त्याच्या माणसांनी काही काळापर्यंत नाबालाच्या मालमत्तेचे व गुराढोरांचे रक्षण केले होते. पण जेव्हा त्यांनी नाबालाकडे अन्न व पाणी मागितले, तेव्हा “तो त्यांच्या अंगावर ओरडला” आणि त्याने त्यांना रिकाम्या हातीच परत पाठवले. दाविदाला याविषयी समजले तेव्हा तो क्रोधित झाला आणि त्याने नाबाल व त्याच्या माणसांना ठार मारण्याचे ठरवले. हे ऐकल्यावर, अबीगईल बऱ्याच खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन दावीद व त्याच्या माणसांना भेटायला गेली. यामुळे, दाविदाच्या हातून मोठा रक्तपात होताहोता राहिला. (१ शमु. २५:८-१८) नंतर, दावीद अबीगईलला म्हणाला: “ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठवले तो इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य!” (१ शमु. २५:३२) नाबालाच्या मृत्यूनंतर दाविदाने अबीगईलशी लग्न केले.—१ शमु. २५:३७-४२.

१४. शल्लूमाच्या मुलींनी कोणत्या कार्यात सहभाग घेतला, आणि आज काही ख्रिस्ती स्त्रिया कशा प्रकारे त्यांच्यासारखेच कार्य करत आहेत?

१४ बॅबिलोनी सैन्याने इ.स.पू. ६०७ साली जेरूसलेम व त्यातील मंदिराचा नाश केला तेव्हा कित्येक पुरुष, स्त्रिया व मुले यांना आपला जीव गमवावा लागला. इ.स.पू. ४५५ साली नहेम्याच्या देखरेखीखाली शहराच्या भिंतींच्या पुनर्बांधणीचे कार्य करण्यात आले. या दुरुस्तीच्या कामात जेरूसलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी शल्लूम याच्या मुलींनीही सहभाग घेतला. (नहे. ३:१२) त्यांनी हे कष्टाचे काम स्वखुषीने केले. आजही अनेक ख्रिस्ती स्त्रिया देवाच्या उपासनेशी संबंधित असलेल्या बांधकाम प्रकल्पांना वेगवेगळ्या मार्गांनी हातभार लावतात ही किती प्रशंसनीय गोष्ट आहे!

पहिल्या शतकातील देवभीरू स्त्रिया

१५. देवाने मरियेला कोणता विशेषाधिकार दिला?

१५ इसवी सन पहिले शतक सुरू होण्याच्या काही काळाआधी आणि या शतकादरम्यान यहोवाने अनेक स्त्रियांना उत्तम विशेषाधिकार देऊन आशीर्वादित केले. त्यांच्यापैकी एक होती मरिया नावाची कुमारी. मरियेचे योसेफाशी लग्न ठरले असताना ती पवित्र आत्म्याद्वारे चमत्कारिक रीत्या गर्भवती राहिली. येशूची आई होण्याकरता देवाने तिलाच का निवडले? एका परिपूर्ण मुलाला लहानाचा मोठा करण्याकरता आवश्यक असलेले आध्यात्मिक गुण तिच्यात असल्यामुळेच देवाने तिची निवड केली. खरोखर, पृथ्वीवर होऊन गेलेल्या सर्वश्रेष्ठ मनुष्याची आई असणे हा किती मोठा बहुमान होता!—मत्त. १:१८-२५.

१६. स्त्रियांप्रती येशूची कशी मनोवृत्ती होती हे उदाहरण देऊन सांगा.

१६ येशू स्त्रियांशी खूप दयाळूपणे वागायचा. उदाहरणार्थ, १२ वर्षांपासून रक्तस्रावाने पीडित असलेल्या एका स्त्रीबद्दल विचार करा. या स्त्रीने गर्दीत येशूच्या मागून येऊन त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला. तिला दटावण्याऐवजी येशूने दयाळूपणे म्हटले: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”—मार्क ५:२५-३४.

१७. पेन्टेकॉस्टच्या दिवशी कोणती चमत्कारिक घटना घडली?

१७ येशूच्या शिष्यांपैकी असलेल्या काही स्त्रिया, त्याची व त्याच्या प्रेषितांची सेवाचाकरी करायच्या. (लूक ८:१-३) तसेच, इ.स. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी सुमारे १२० पुरुषांना व स्त्रियांना एका खास पद्धतीने देवाचा पवित्र आत्मा देण्यात आला. (प्रेषितांची कृत्ये २:१-४ वाचा.) पवित्र आत्मा दिला जाईल हे पुढील भविष्यवाणीत सांगण्यात आले होते: “मी [“यहोवा,” NW] मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, . . . तुमचे दास व दासी यांवरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन.” (योए. २:२८, २९) पेन्टेकॉस्टच्या दिवशी घडलेल्या त्या चमत्कारिक घटनेतून देवाने दाखवले की धर्मत्यागी इस्राएल राष्ट्रावरून त्याने आपला आशीर्वाद काढून घेतला आहे; आणि आता स्त्री व पुरुष दोघांचा समावेश असलेल्या ‘देवाच्या इस्राएलवर’ त्याने कृपादृष्टी केली आहे. (गलती. ३:२८; ६:१५, १६) पहिल्या शतकात राज्याचा संदेश घोषित करण्यात सहभागी झालेल्या ख्रिस्ती स्त्रियांमध्ये सुवार्तिक फिलिप्प याच्या चार मुलींचाही समावेश होता.—प्रे. कृत्ये २१:८, ९.

 स्त्रियांची “मोठी सेना”

१८, १९. (क) खऱ्या उपासनेच्या बाबतीत देवाने स्त्री व पुरुष दोघांनाही कोणता बहुमान दिला आहे? (ख) स्तोत्रकर्त्याने सुवार्तेची घोषणा करणाऱ्या स्त्रियांबद्दल काय म्हटले?

१८ एकोणीसाव्या शतकाच्या शेवटल्या काही वर्षांत काही स्त्रीपुरुषांनी खऱ्या उपासनेचा अगदी मनापासून शोध घेतला. बायबल विद्यार्थ्यांच्या त्या लहानशा गटाने एका फार महत्त्वाच्या कार्याचा जणू पाया घातला. आणि आज त्या कार्यात सहभागी होणारे स्त्रीपुरुष, येशूच्या पुढील शब्दांच्या पूर्णतेला हातभार लावत आहेत: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्त. २४:१४.

१९ बायबल विद्यार्थ्यांच्या त्या लहानशा गटात पुढे बरीच वाढ झाली. आज त्यांना यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाते आणि त्यांची संख्या ८० लाखांच्या जवळपास आहे. यांव्यतिरिक्त, १,१०,००,००० पेक्षा जास्त लोक स्मारकविधीला उपस्थित राहतात. याद्वारे ते दाखवतात की बायबलबद्दल व आपल्या कार्याबद्दल जाणून घेण्यास ते उत्सुक आहेत. बहुतेक देशांत, या समारंभाला उपस्थित राहणाऱ्यांपैकी स्त्रियांचीच संख्या जास्त असते. तसेच, आज सबंध जगात राज्याच्या संदेशाची घोषणा करण्यात पूर्णवेळ सहभाग घेणाऱ्या १०,००,००० पेक्षा जास्त सेवकांमध्येही स्त्रियांची संख्या तुलनेने जास्त आहे. खरोखर, देवाने विश्वासू स्त्रियांना स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांच्या पूर्णतेत सहभागी होण्याचा बहुमान दिला आहे: “प्रभू अनुज्ञा देतो; मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या स्त्रियांची मोठी सेना” आहे.—स्तो. ६८:११.

सुवार्ता घोषित करणाऱ्या स्त्रियांची खरोखरच “मोठी सेना” आहे (परिच्छेद १८, १९ पाहा)

देवभीरू स्त्रियांकरता भविष्यात अद्भुत आशीर्वाद

२०. आपण कोणत्या विषयांवर सखोल अभ्यास करण्याचे प्रकल्प हाती घेऊ शकतो?

२० बायबलमध्ये आणखी अनेक विश्वासू स्त्रियांबद्दल सांगण्यात आले आहे. त्या सर्वांचीच येथे चर्चा करणे शक्य नाही. पण बायबलमध्ये व आपल्या प्रकाशनांमध्ये त्यांच्याविषयी दिलेली माहिती आपण वाचू शकतो. उदाहरणार्थ, आपण रूथच्या एकनिष्ठपणाविषयी मनन करू शकतो. (रूथ १:१६, १७) तसेच, एस्तेर नावाच्या पुस्तकाचे व तिच्याविषयीच्या लेखांचे वाचन केल्यामुळे आपला विश्वास नक्कीच दृढ होईल. अशा एखाद्या विषयावर कौटुंबिक उपासनेच्या संध्याकाळी सखोल अभ्यास करण्याचा प्रकल्प तुम्ही हाती घेऊ शकता. जर आपण एकटे राहत असू तर आपल्या वैयक्तिक अभ्यासाच्या वेळी आपण या विषयांवर मनन करू शकतो.

२१. विश्वासू स्त्रिया कठीण काळांतही कशा प्रकारे यहोवाला एकनिष्ठ राहिल्या?

२१ ख्रिस्ती स्त्रिया करत असलेल्या प्रचार कार्यावर यहोवा देवाचा आशीर्वाद आहे आणि कठीण परिस्थितीला तोंड देण्यास तो त्यांना मदत करतो हे आपण अगदी खात्रीने म्हणू शकतो. उदाहरणार्थ, यहोवाच्या मदतीने अनेक बहिणींनी नात्झी व कम्युनिस्ट शासनाखाली आपली एकनिष्ठा टिकवून ठेवली. देवाच्या आज्ञांचे पालन केल्यामुळे त्यांच्यापैकी कित्येकांना छळ सोसावा लागला आणि काहींना तर जीवही गमवावा लागला. (प्रे. कृत्ये ५:२९) आजही, आपल्या बहिणी इतर सर्व बांधवांसोबत मिळून देवाच्या सर्वोच्च अधिकाराला आपले समर्थन देत आहेत. यामुळे, प्राचीन काळात इस्राएली लोकांप्रमाणेच यहोवा त्यांचाही उजवा हात धरून त्यांना सांगतो की त्यांनी भिऊ नये कारण तो सदैव त्यांच्या पाठीशी आहे.—यश. ४१:१०-१३.

२२. भविष्यात आपल्याला कोणकोणते सुहक्क मिळणार आहेत?

२२ लवकरच, देवभीरू स्त्रीपुरुष या पृथ्वीचे नंदनवनात रूपांतर करतील. तसेच, लाखो पुनरुत्थित जनांना यहोवाच्या उद्देशांबद्दल शिकून घेण्यास ते मदत करतील. तोपर्यंत आपण सर्व जण, मग आपण स्त्री असो अथवा पुरुष, “खांद्याला खांदा लावून” यहोवाची उपासना करण्याच्या बहुमानाबद्दल मनापासून कदर बाळगू या.—सफ. ३:९, ईझी-टू-रीड व्हर्शन.