व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

येशूने सदूकी लोकांना सांगितले की पुनरुत्थान झालेले “लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत.” (लूक २०:३४-३६) त्या सदूक्यांशी तो पृथ्वीवरील पुनरुत्थानाबद्दल बोलत होता का?

हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः तुमच्या जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर. नव्या जगात पुनरुत्थान झालेल्या आपल्या जोडीदारासोबत पुन्हा एकदा वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्याची तुमची तीव्र इच्छा असेल. आपल्या पत्नीला गमावलेल्या एका बांधवाने म्हटले: “आमचं वैवाहिक बंधन संपुष्टात आणण्याचं मी व माझ्या पत्नीनं स्वतःहून निवडलं नाही. आम्हाला तर सदासर्वकाळ पती-पत्नी म्हणून यहोवाची सेवा करण्याची इच्छा होती. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला, तरी माझ्या भावना अजूनही बदललेल्या नाहीत.” ज्यांचे पृथ्वीवर पुनरुत्थान होईल ते लग्न करू शकतील असे मानण्यासाठी काही आधार आहे का? आपण सध्याच हे सांगू शकत नाही.

अनेक वर्षांपासून आपल्या प्रकाशनांत असे म्हणण्यात आले आहे की येशूचे वरील शब्द पृथ्वीवरील पुनरुत्थानाबद्दल आहेत. तसेच, नव्या जगात पुनरुत्थान झालेल्या व्यक्ती बहुधा लग्न करणार नाहीत असेही आपल्या प्रकाशनांत म्हणण्यात आले आहे. * (मत्त. २२:२९, ३०; मार्क १२:२४, २५; लूक २०:३४-३६) पण, वरील शब्द बोलताना येशू कदाचित स्वर्गातील पुनरुत्थानाविषयी सांगत असावा का? आपण याविषयी ठामपणे काहीही सांगू शकत नाही. तरीसुद्धा, येशूच्या शब्दांचे आपण जवळून परीक्षण करू या.

पुनरुत्थानाविषयी वरील विधान करताना येशू कोणाशी बोलत होता? (लूक २०:२७-३३ वाचा.) तो सदूकी लोकांशी बोलत होता. सदूकी लोकांचा पुनरुत्थानावर विश्वास नव्हता. खरेतर, पुनरुत्थानाबद्दल आणि मृत पतीच्या भावाशी लग्न करण्याच्या प्रथेबद्दल प्रश्न विचारून येशूला पेचात टाकण्याचा त्यांचा इरादा होता. * येशूने त्यांना सांगितले: “या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात; परंतु ते युग व मेलेल्यांतून पुनरुत्थान ही प्राप्त करून घ्यावयास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत; आणि ते पुढे मरणारही नाहीत [“मरू शकत नाहीत,” NW], कारण ते देवदूतांसमान आहेत, आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत.”—लूक २०:३४-३६.

येशू या ठिकाणी पृथ्वीवरील पुनरुत्थानाविषयी बोलत असावा, असे आपल्या प्रकाशनांत का म्हणण्यात आले? याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, सदूकी लोक येशूशी पृथ्वीवरील पुनरुत्थानाबद्दल बोलत असावेत. त्यामुळे, येशूनेही त्यांना उत्तर देताना पृथ्वीवरील पुनरुत्थानाबद्दल सांगितले असा निष्कर्ष काढणे तर्कशुद्ध वाटले असावे. दुसरे कारण म्हणजे, येशूने सदूकी लोकांना उत्तर देताना शेवटी अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा उल्लेख केला. देवाच्या या विश्वासू सेवकांचे पृथ्वीवर पुनरुत्थान होणार आहे.—लूक २०:३७, ३८.

पण, असे दिसते की कदाचित येशू स्वर्गातील पुनरुत्थानाबद्दल बोलत असावा. असे का म्हणता येईल? येशूने सदूकी लोकांना जे उत्तर दिले त्यातील दोन विधानांकडे लक्ष द्या.

“पुनरुत्थान . . . प्राप्त करून घ्यावयास जे योग्य ठरतील.” विश्वासू अभिषिक्त जनांना देवाच्या राज्याकरता ‘योग्य ठरवले जाते.’ (२ थेस्सलनी. १:५, ११) ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर देव अभिषिक्त जनांना नीतिमान असे गणतो. त्यांचा मृत्यू होतो तेव्हा देवाच्या दृष्टिकोनातून ते त्यांच्या पापांपासून मुक्त होतात. (रोम. ५:१, १८; ८:१) अभिषिक्त जनांना “धन्य व पवित्र” म्हणण्यात आले आहे आणि ते स्वर्गातील पुनरुत्थानाकरता योग्य मानले जातात. (प्रकटी. २०:५, ६) पण, ज्यांचे पृथ्वीवर पुनरुत्थान होणार आहे त्यांच्याविषयी असे म्हणता येत नाही कारण त्यांमध्ये ‘अनीतिमानांचाही’ समावेश असेल. (प्रे. कृत्ये २४:१५) अशा ‘अनीतिमान’ जनांना पुनरुत्थानासाठी “योग्य” मानले जाऊ शकते का?

“ते पुढे मरू शकत नाहीत.” (NW) मूळ भाषेत, “ते  पुढे मरणार नाहीत” असे येशूने म्हटले नाही. तर, “ते पुढे मरू शकत नाहीत” असे त्याने म्हटले. इतर भाषांतरांत, “ते यापुढे मरणाच्या अधीन राहणार नाहीत” आणि “यापुढे त्यांच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही” असे म्हणण्यात आले आहे. अभिषिक्तांपैकी जे विश्वासू राहतात त्यांचे स्वर्गात पुनरुत्थान होते. तेथे त्यांना अमरत्व दिले जाते. याचा अर्थ त्यांना मरण येऊ शकत नाही आणि त्यांना नष्ट केले जाऊ शकत नाही. (१ करिंथ. १५:५३, ५४) ज्यांचे स्वर्गात पुनरुत्थान होते त्यांच्यावर मरणाचा कोणताही प्रभाव राहत नाही. *

वरील माहिती लक्षात घेतल्यावर आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? हाच, की येशू कदाचित स्वर्गातील पुनरुत्थानाविषयी बोलत असावा. असे असल्यास, ज्यांचे स्वर्गात पुनरुत्थान होते त्यांच्याविषयी आपल्याला तीन गोष्टी समजतात: (१) ते लग्न करत नाहीत, (२) ते मरू शकत नाहीत, आणि (३) काही बाबतींत ते स्वर्गातील देवदूतांसारखे आहेत. पण, जर येशू स्वर्गातील पुनरुत्थानाविषयी बोलत होता, तर मग पुढील प्रश्नांचे उत्तर मिळणे गरजेचे आहे.

पहिला प्रश्न म्हणजे, जर सदूकी लोक पृथ्वीवरील पुनरुत्थानाच्या संदर्भात बोलत होते, तर मग येशू त्यांना उत्तर देताना स्वर्गातील पुनरुत्थानाबद्दल का बरे सांगेल? येशूने नेहमीच त्याच्या विरोधकांच्या विचारांना अनुसरून त्यांना उत्तर दिले नाही. उदाहरणार्थ, जेव्हा काही यहुद्यांनी येशूला एक चमत्कार करण्यास सांगितले तेव्हा येशूने त्यांना म्हटले: “तुम्ही हे मंदिर मोडून टाका, आणि मी तीन दिवसांत ते उभारेन.” ते यहुदी, मंदिराच्या इमारतीविषयी विचार करत होते हे येशूला माहीत होते. पण, “तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता.” (योहा. २:१८-२१) येशूला प्रश्न विचारणाऱ्या सदूक्यांचा खरेतर पुनरुत्थानावर किंवा देवदूतांच्या अस्तित्वावर विश्वास नव्हता. त्यांनी केवळ ढोंगीपणाने येशूला प्रश्न विचारला होता. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची येशूला गरज वाटली नसावी. (नीति. २३:९; मत्त. ७:६; प्रे. कृत्ये २३:८) याउलट, येशूचे शिष्य प्रामाणिकपणे त्याच्याकडून शिकून घेण्यास उत्सुक होते. शिवाय, भविष्यात त्यांचे स्वर्गात पुनरुत्थान होणार होते. त्यामुळे येशूने त्यांना स्वर्गातील पुनरुत्थानाविषयी अधिक माहिती देण्याचे ठरवले असावे.

दुसरा प्रश्न म्हणजे, येशूने या चर्चेच्या शेवटी अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा उल्लेख का केला? या सर्वांचे तर पृथ्वीवर पुनरुत्थान होणार आहे. (मत्तय २२:३१, ३२ वाचा.) या विश्वासू सेवकांचा उल्लेख करण्याआधी, येशूने “मृतांच्या पुनरुत्थानाविषयी” असे म्हणून त्या विधानाची सुरुवात केली. त्याने या वाक्यांशाचा वापर केल्यामुळे, आता तो स्वर्गातील पुनरुत्थानाचा विषय बदलून पृथ्वीवरील पुनरुत्थानाविषयी बोलत होता असे सूचित होऊ शकते. सदूकी लोक मोशेने लिहिलेली पुस्तके मानतात हे येशूला माहीत होते. त्यामुळे, त्याने जळणाऱ्या झुडपातून देवाने मोशेला बोललेले शब्द उद्धृत केले. पृथ्वीवर मृतांचे पुनरुत्थान करण्याचा देवाचा उद्देश आहे हे सदूकी लोकांना सिद्ध करून दाखवण्याची येशूची इच्छा होती.—निर्ग. ३:१-६.

तिसरा प्रश्न म्हणजे, जर येशूचे शब्द स्वर्गातील पुनरुत्थानाच्या संदर्भात होते, तर मग ज्यांचे पृथ्वीवर पुनरुत्थान होईल ते लग्न करू शकतील असा याचा अर्थ होतो का? देवाच्या वचनातून या प्रश्‍नाचे कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नाही. जर येशू स्वर्गातील पुनरुत्थानाबद्दल बोलत होता, तर मग पृथ्वीवर ज्यांचे पुनरुत्थान होईल ते लग्न करू शकतील किंवा नाही याविषयी त्याच्या शब्दांवरून आपल्याला कोणतीही माहिती मिळत नाही.

मृत्यूमुळे विवाहबंधन संपुष्टात येते हे बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे, तुमच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यावर तुम्ही पुनर्विवाह करण्याचे ठरवल्यास आपण काहीतरी चुकीचे करत आहोत असे तुम्हाला वाटण्याची गरज नाही. हा एक वैयक्तिक निर्णय आहे. जीवनात एका जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळवण्याकरता एखाद्याने पुन्हा लग्न करण्याचे ठरवल्यास कोणीही त्या व्यक्तीची टीका करू नये.—रोम. ७:२, ३; १ करिंथ. ७:३९.

नव्या जगातील जीवनाविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असू शकतात. पण, त्यांविषयी कोणतेही अंदाज बांधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. एक गोष्ट मात्र आपण अगदी खात्रीने म्हणू शकतो: जे देवाला आज्ञाधारक राहतात ते नेहमी आनंदी राहतील कारण यहोवा त्यांच्या सर्व गरजा व इच्छा सर्वात उत्तम मार्गाने पूर्ण करेल.—स्तो. १४५:१६.

^ परि. 4 टेहळणी बुरूज, १ जून १९८७ (इंग्रजी) यातील पृष्ठे ३०-३१ पाहा.

^ परि. 5 येशूच्या काळात, पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाशी लग्न करण्याची प्रथा होती. जर एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाला आणि त्याला मुलगे नसतील, तर त्याची विधवा पत्नी त्याचा वंश पुढे चालवण्यासाठी त्याच्या भावाशी लग्न करायची.—उत्प. ३८:८; अनु. २५:५, ६.

^ परि. 9 ज्यांचे पृथ्वीवर पुनरुत्थान होईल त्यांना सर्वकाळ जगण्याची आशा आहे. पण त्यांना अमरत्व प्राप्त होत नाही. या दोन गोष्टींत काय फरक आहे याविषयी अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज, १ एप्रिल १९८४ (इंग्रजी) अंकातील पृष्ठे ३०-३१, तसेच टेहळणी बुरूज, १५ फेब्रुवारी २००९ अंकातील पृष्ठ २५, परि. ६ पाहा.