व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पूर्णवेळेच्या सेवकांची आठवण ठेवा

पूर्णवेळेच्या सेवकांची आठवण ठेवा

“तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम . . . यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो.”—१ थेस्सलनी. १:३.

१. आवेशाने सेवा करणाऱ्यांविषयी पौलाच्या काय भावना होत्या?

सुवार्ता सांगण्यासाठी ज्या बांधवांनी श्रम घेतले त्यांची प्रेषित पौलाने आठवण ठेवली. त्याने म्हटले: “आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो.” (१ थेस्सलनी. १:३) खरेतर, यहोवा स्वतःदेखील त्याची विश्वासूपणे सेवा करणाऱ्या सर्वांच्या कामाची आठवण ठेवतो. जीवनातील परिस्थितीमुळे काही जणांना यहोवाची जास्त प्रमाणात सेवा करणे शक्य होते तर काहींना कमी, पण यहोवा सर्वांच्या सेवेची कदर करतो.—इब्री ६:१०.

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

यहोवाची पूर्णवेळ सेवा करण्यासाठी पहिल्या शतकात व आजच्या काळात आपल्या बऱ्याच बांधवांनी मोठे त्याग केले आहेत. पहिल्या शतकात ज्यांनी पूर्णवेळेची सेवा केली अशा काही बांधवांची उदाहरणे आपण पाहू या. तसेच, आजच्या काळात पूर्णवेळेच्या सेवेचे काही प्रकार कोणते आहेत हेदेखील आपण पाहू या. ज्यांनी या सेवेत स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले आहे अशा प्रिय बांधवांची आपण आठवण कशी ठेवू शकतो याबद्दलही या लेखात आपण शिकू या.

पहिल्या शतकातील ख्रिश्चन

३, ४. (क) पहिल्या शतकात काहींनी वेगवेगळ्या प्रकारे पूर्णवेळेची सेवा कशी केली? (ख) या बांधवांच्या गरजा कशा पुरवण्यात आल्या?

बाप्तिस्मा झाल्यानंतर येशूने लगेच प्रचार कार्याची सुरुवात केली. हे कार्य पुढे जाऊन जगभरात केले जाणार होते. (लूक ३:२१-२३; ४:१४, १५, ४३) येशूच्या  मृत्यूनंतर प्रचार कार्याचा विस्तार करण्याचे काम त्याच्या प्रेषितांनी हाती घेतले. (प्रे. कृत्ये ५:४२; ६:७) फिलिप्पसारख्या काही ख्रिश्चनांनी जेरूसलेमच्या आसपासच्या भागांत सुवार्तिक व मिशनरी म्हणून आवेशाने कार्य केले. (प्रे. कृत्ये ८:५, ४०; २१:८) पौलाने आणि इतर काही जणांनी दूरवरच्या क्षेत्रांत जाऊन प्रचार कार्य केले. (प्रे. कृत्ये १३:२-४; १४:२६; २ करिंथ. १:१९) काहींनी, जसे की सिल्वान (सीला), मार्क आणि लूक यांनी बायबल लेखकांचे सहकारी म्हणून कार्य केले किंवा बायबलमधील पुस्तके लिहिली. (१ पेत्र ५:१२) या विश्वासू बांधवांना ख्रिस्ती बहिणींनीदेखील मदत केली. (प्रे. कृत्ये १८:२६; रोम. १६:१, २) या सर्व बांधवांच्या कामाचे रोमांचकारी अनुभव आपल्याला ग्रीक शास्त्रवचनांत वाचायला मिळतात. हे अनुभव वाचून आपल्याला याची खात्री पटते की यहोवा त्याच्या सेवकांची आठवण ठेवतो.

पहिल्या शतकातील पूर्णवेळेच्या सेवकांच्या गरजा कशा भागवल्या जायच्या? काही वेळा ख्रिस्ती बांधव त्यांचा पाहुणचार करायचे व त्यांच्या इतर गरजा पुरवायचे. पण, पूर्णवेळेच्या सेवकांनी अशा प्रकारची मदत स्वतःहून कधीच मागितली नाही. (१ करिंथ. ९:११-१५) काही बांधव आणि मंडळ्या या बांधवांना मदत करण्यास स्वेच्छेने पुढे आल्या. (प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५; फिलिप्पैकर ४:१५-१८ वाचा.) आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी पौल व त्याचे सहकारी यांनी कामदेखील केले.

आजच्या काळातील पूर्णवेळेचे सेवक

५. पूर्णवेळेच्या सेवेतील जीवनाविषयी एका जोडप्याने काय म्हटले?

आजदेखील बरेच बांधव वेगवेगळ्या मार्गांनी पूर्णवेळेची सेवा करत आहेत. (“ पूर्ण वेळेच्या सेवेचे प्रकार” ही चौकटदेखील पाहा.) पूर्णवेळेची सेवा निवडल्याबद्दल या बांधवांच्या काय भावना आहेत? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांच्या उत्तरामुळे तुम्हाला नक्कीच उत्तेजन मिळेल. उदाहरणार्थ, एका बांधवाने सामान्य पायनियर, खास पायनियर, मिशनरी आणि दुसऱ्या देशात बेथेल कुटुंबातील सदस्य म्हणून सेवा केली आहे. ते असे म्हणतात: “पूर्णवेळेची सेवा निवडणं हा मी आतापर्यंत घेतलेल्या सर्वात उत्तम निर्णयांपैकी एक आहे. १८ वर्षांचा असताना माझ्यापुढे तीन पर्याय होते, विद्यापीठात उच्च शिक्षण घेणं, जगात पूर्णवेळेचं करियर निवडणं किंवा एक पायनियर बनणं. माझ्यासाठी यांतून एक निवडणं त्या वेळी कठीण होतं. आज मी अनुभवातून सांगू शकतो की पूर्णवेळेच्या सेवेसाठी आपण जे काही त्याग करतो ते यहोवा कधीच विसरत नाही. मी जगात करियर करायचं ठरवलं असतं तर यहोवाकडून मला ज्या क्षमता मिळाल्या आहेत त्यांचा मी कधीच इतक्या चांगल्या प्रकारे उपयोग करू शकलो नसतो.” त्यांची पत्नी असे म्हणते: “यहोवाच्या सेवेतील प्रत्येक नेमणुकीमुळे मला खूप काही शिकायला मिळालं आहे. आम्ही वेळोवेळी आणि वेगवेगळ्या मार्गांनी यहोवाचं संरक्षण आणि मार्गदर्शन अनुभवलं आहे. आम्ही जर स्वतःच्याच इच्छा पूर्ण करण्याचा विचार केला असता तर आम्हाला हे कधीच अनुभवायला मिळालं नसतं. पूर्णवेळेच्या सेवेसाठी मी दररोज यहोवाचे खूप आभार मानते.” तुमचे जीवनही असेच असावे असे तुम्हाला वाटते का?

६. आपल्यापैकी प्रत्येक जण कोणती खात्री बाळगू शकतो?

हे खरे आहे की काहींना त्यांच्या परिस्थितीमुळे सध्यातरी पूर्णवेळेची सेवा करणे शक्य नाही. पण, यहोवाच्या सेवेत ते पूर्ण मनाने जे काही करतात त्याची तो कदर करतो ही खात्री आपण बाळगू शकतो. उदाहरणार्थ, फिलेमोन १-३ (वाचा.) या वचनांत पौलाने काही बांधवांचा नावाने उल्लेख केला. तसेच त्याने कलस्सै येथील मंडळीला आपले प्रेम पाठवले. ते करत असलेल्या सेवेबद्दल पौलाला आणि यहोवालादेखील कदर होती. तसेच, आज तुम्ही करत असलेल्या सेवेबद्दल आपला स्वर्गीय पिता कदर बाळगतो. पण, जे बांधव पूर्णवेळेच्या सेवेत आहेत त्यांना तुम्ही कशी मदत करू शकता?

पायनियरांना मदत करणे

७, ८. पायनियर सेवेत काय समाविष्ट आहे, आणि मंडळीतील इतर जण पायनियरांना कशी मदत करू शकतात?

पहिल्या शतकातील सुवार्तिकांप्रमाणे, आज आवेशी पायनियरांकडून मंडळीतील इतरांना बरेच उत्तेजन मिळते. सहसा सामान्य पायनियर दर महिन्याला ७० तास सेवेत देतात. तुम्ही त्यांना मदत कशी करू शकता?

शारी नावाच्या एका पायनियर बहिणीने असे म्हटले: “पायनियर दररोज सेवेत जात असल्यामुळे इतरांना वाटतं की ते आध्यात्मिक रीत्या दृढ आहेत. हे खरं असलं  तरी त्यांनादेखील उत्तेजनाची गरज असते.” (रोम. १:११, १२) काही वर्षे पायनियर म्हणून सेवा केलेल्या एका बहिणीने तिच्या मंडळीतील पायनियरांविषयी असे म्हटले: “ते सेवेत खूप मेहनत करतात. इतर बांधव त्यांना क्षेत्रात येण्याजाण्यासाठी जेव्हा मदत करतात, घरी जेवायला बोलवतात, पेट्रोलचे पैसे देतात किंवा इतर मार्गांनी आर्थिक मदत करतात, तेव्हा पायनियरांना खूप चांगलं वाटतं. यावरून त्यांना दिसून येतं की इतरांना त्यांची खरंच काळजी आहे.”

९, १०. काहींनी कशा प्रकारे पायनियरांना मदत केली?

तुम्हाला पायनियरांना त्यांच्या सेवेत मदत करण्याची इच्छा आहे का? बॉबी नावाची पायनियर बहीण इतरांना असा आग्रह करते: “आम्हाला खासकरून सोमवार ते शुक्रवार इतरांच्या मदतीची जास्त गरज असते.” तिच्याच मंडळीतील आणखी एक पायनियर बहीण असे म्हणते: “दुपारच्या वेळी क्षेत्र सेवेत जायला सहसा कोणी पार्टनर नसतं.” ब्रुकलिन बेथेलला येण्याआधी पायनियर म्हणून सेवा केलेली एक बहीण असे म्हणते: “माझ्या मंडळीत एका बहिणीकडे कार होती. ती मला म्हणाली, ‘तुला जर प्रचारात जायला कोणी पार्टनर नसेल तर मला केव्हाही कॉल कर, मी तुझ्यासोबत येईन.’ तिच्यामुळेच मला पायनियरिंग करता आली.” शारी असे म्हणते: “प्रचार कार्य झाल्यानंतर अविवाहित पायनियर सहसा एकटे पडतात. अशा बंधुभगिनींना आपण वेळोवेळी आपल्या कौटुंबिक उपासनेसाठी बोलवू शकतो. याशिवाय इतर गोष्टींमध्येही आपण त्यांना समाविष्ट करू शकतो. यामुळे त्यांना उत्तेजन मिळू शकते.”

१० एक बहीण जवळजवळ ५० वर्षांपासून पूर्णवेळेच्या सेवेत आहे. तिला व तिच्यासोबतच्या इतर अविवाहित बहिणींना पायनियर सेवेत कशी मदत करण्यात आली होती त्याविषयी ती म्हणते: “आमच्या मंडळीतील वडील आम्हा पायनियरांना दोन महिन्यांतून एकदा भेटायला यायचे. आमची तब्येत कशी आहे, आमचं काम कसं चाललंय, आम्हाला काही अडचणी आहेत का या सर्व गोष्टी ते आम्हाला विचारायचे. त्यांना आमची काळजी होती. आम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे पाहण्यासाठी ते आमच्या घरी यायचे.” हे वडील व यांच्यासारखे इतर बांधव अनेसिफराच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. अनेसिफर याच्यावर त्याच्या कुटुंबाची  जबाबदारी असूनही त्याने पौलाला मदत केली.—२ तीम. १:१८.

११. खास पायनियर म्हणून सेवा करण्यात काय समाविष्ट आहे?

११ काही मंडळ्यांमध्ये खास पायनियरांना नेमण्यात येते. त्या मंडळ्यांतील बांधवांसाठी हा एक मोठा सुहक्क आहे. खास पायनियर म्हणून सेवा करणारे बंधुभगिनी सहसा सेवेत दर महिन्याला १३० तास देतात. सेवेत आणि मंडळीत इतरांना मदत करण्यात या बंधुभगिनींचा बराच वेळ जातो. त्यामुळे सहसा त्यांना नोकरी करण्यासाठी वेळ उरत नाही. या बंधुभगिनींच्या गरजा भागवण्यासाठी शाखा कार्यालय दर महिन्याला त्यांना काही पैसे देते. यामुळे त्यांना सेवेत जास्त लक्ष देणे शक्य होते.

१२. मंडळीतील वडील व इतर बांधव खास पायनियरांना कशी मदत करू शकतात?

१२ आपण खास पायनियरांना कशी मदत करू शकतो? खास पायनियरांच्या संपर्कात असणारे बेथेलमधील एक बांधव असे म्हणतात: “मंडळीतील वडिलांनी नेहमी त्यांची विचारपूस केली पाहिजे. त्यांना कोणत्या गोष्टींची गरज आहे हे माहीत करून घेतलं पाहिजे. यामुळे त्यांना साहाय्य कसं करावं हे ठरवता येईल. काही बांधवांना वाटतं की खास पायनियरांना त्यांचा खर्च चालवण्यासाठी पैसे मिळतात म्हणून त्यांना मदतीची गरज नाही. पण मंडळीतील बांधव त्यांना अनेक मार्गांनी मदत करू शकतात.” सामान्य पायनियरांप्रमाणेच, खास पायनियरांनाही सेवेत सोबत्यांची गरज असते. या बाबतीत तुम्ही त्यांना मदत करू शकता का?

विभागीय पर्यवेक्षकांना मदत करणे

१३, १४. (क) विभागीय पर्यवेक्षकांबाबत आपण काय लक्षात ठेवले पाहिजे? (ख) त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१३ विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांची पत्नी हे आध्यात्मिक रीत्या खूप दृढ असतात असे सर्वांना वाटते. हे खरे असले तरी त्यांनादेखील प्रोत्साहनाची गरज असते. क्षेत्र सेवेत इतरांनी त्यांच्यासोबत काम करावे असे त्यांना वाटते. आणि बांधव जेव्हा फिरायला जाताना किंवा करमणूक करताना त्यांनादेखील सामील करतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. कदाचित एखाद्या वेळी त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज पडू शकते. अशा वेळी आपण त्यांना दवाखान्यात जाऊन भेटू शकतो. त्यांना कशाची गरज आहे हे ओळखून मदत पुरवल्यास त्यांना नक्कीच आनंद होईल. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा लेखक, “प्रिय वैद्य” लूक याने पौलाला व त्याच्या सोबत्यांना नक्कीच मदत पुरवली असेल.—कलस्सै. ४:१४; प्रे. कृत्ये २०:५–२१:१८.

१४ विभागीय पर्यवेक्षक व त्यांची पत्नी यांना जवळच्या मित्रांकडून प्रेमाची व उत्तेजनाची गरज असते. एका विभागीय पर्यवेक्षकाने असे म्हटले: “मला प्रोत्साहनाची गरज आहे हे माझे मित्र लगेच ओळखतात. मला कशाची चिंता सतावत आहे हे जाणून घेण्यासाठी ते समजूतदारपणे मला प्रश्न विचारतात. यामुळे मला माझ्या चिंता त्यांना सांगणं सोपं जातं. फक्त ऐकून घेण्याद्वारेही ते मला खूप मदत करतात.” बंधुभगिनी विभागीय पर्यवेक्षक व त्यांची पत्नी यांच्यासाठी जे काही करतात त्याची ते खूप कदर करतात.

बेथेल सदस्यांना मदत करणे

१५, १६. बेथेलमधील बांधवांचे काम इतके महत्त्वाचे का आहे, आणि आपण त्यांना मदत कशी करू शकतो?

१५ जगभरातील बेथेल गृहांत काम करणारे बंधुभगिनी राज्याच्या कामाला मोठ्या प्रमाणात हातभार लावतात. तुमच्या मंडळीमध्ये किंवा विभागात जर बेथेल कुटुंबातील सदस्य असतील, तर तुम्हाला त्यांची आठवण आहे हे तुम्ही कसे दाखवू शकता?

१६ कुटुंबीयांपासून व मित्रांपासून लांब असल्यामुळे बेथेलमध्ये आलेल्या बांधवांना सुरुवातीला काही प्रमाणात एकटेपणा जाणवू शकतो. पण अशा वेळी जेव्हा बेथेलमधील इतर सदस्य आणि नवीन मंडळीतील बांधव त्यांच्याशी मैत्री करतात तेव्हा त्यांना आनंद होतो. (मार्क १०:२९, ३०) सहसा बेथेल सदस्यांना मंडळीच्या सभांना व क्षेत्र सेवेला नियमितपणे उपस्थित राहणे शक्य होते. पण, कधीकधी त्यांना बेथेलमध्ये इतर कामेही करावी लागतात. अशा वेळी मंडळीतील बांधवांनी त्यांना समजून घेतले व त्यांच्या कामाची कदर बाळगली तर याचा सर्वांनाच फायदा होईल.—१ थेस्सलनीकाकर २:९ वाचा.

 दुसऱ्या देशात सेवा करणाऱ्या पूर्णवेळेच्या सेवकांना मदत करणे

१७, १८. काही बांधव दुसऱ्या देशात जाऊन कोणकोणत्या प्रकारे सेवा करतात?

१७ जे बांधव दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याची नेमणूक स्वीकारतात त्यांना त्या देशातील खाणेपिणे, भाषा, संस्कृती आणि परिस्थिती यांच्याशी जुळवून घेणे सुरुवातीला कठीण जाऊ शकते. दुसऱ्या देशात जाऊन पूर्णवेळेचे सेवक कोणकोणत्या प्रकारे सेवा करतात?

१८ काही बांधव मिशनरी म्हणून सेवा करतात. त्यांना मुख्यतः क्षेत्रात प्रचार करण्यासाठी नेमले जाते व यासाठी त्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. शाखा कार्यालय त्यांच्या राहण्याची सोय करते, आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत पुरवते. इतर बांधव दुसऱ्या देशातील शाखा कार्यालयात सेवा करतात. तर काही बेथेल गृहे, भाषांतर कार्यालये, संमेलन गृहे किंवा राज्य सभागृहे यांच्या बांधकाम प्रकल्पांत काम करतात. त्यांच्या राहण्याची व इतर गरजा पुरवण्याची सोय केली जाते. बेथेल कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच हे बांधवदेखील सभांना व जेथे शक्य असेल तेथे क्षेत्र सेवेला जातात. मंडळ्यांना या अनुभवी बांधवांची बऱ्याच मार्गांनी मदत होते.

१९. दुसऱ्या देशात सेवा करणाऱ्यांबाबत आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?

१९ या बांधवांना तुम्ही कशी मदत करू शकता? सुरुवातीला कदाचित त्यांना तुमच्या भागातील जेवणाची सवय नसेल. त्यामुळे तुम्ही त्यांना घरी जेवायला बोलवता तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवू शकता. त्यांना काय आवडते हे कदाचित तुम्ही त्यांना विचारू शकता. स्थानिक भाषा व रीतिरिवाज शिकून घेण्यासाठी त्यांना वेळ लागेल, तेव्हा धीर धरा. भाषा येत नसल्यामुळे सुरुवातीला काही शब्दांचा अर्थ त्यांना कळणार नाही किंवा ते नीट उच्चारता येणार नाहीत. पण अशा वेळी तुम्ही त्यांना प्रेमळपणे मदत करू शकता. त्यांना शिकून घेण्याची इच्छा आहे!

२०. पूर्णवेळेचे सेवक व त्यांचे आईवडील यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो?

२० इतरांसारखीच पूर्णवेळेच्या सेवकांवरही त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी असते. आणि आईवडिलांना वृद्धावस्थेत मदतीची गरज पडू शकते. ते साक्षीदार असले, तर त्यांची नेहमी हीच इच्छा असते की आपल्या मुलांनी त्यांची नेमणूक सोडू नये. (३ योहा. ४) अर्थात, पूर्णवेळेचे सेवक आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी होताहोईल तितके प्रयत्न करतील. पण त्यांच्या आईवडिलांच्या मंडळीतील बांधवसुद्धा त्यांना मदत पुरवू शकतात. या प्रकारे ते खरेतर या सेवकांनाच मदत करत असतात. पूर्णवेळेचे सेवक जगातील सर्वात महत्त्वाच्या कार्याला हातभार लावत आहेत, हे नेहमी लक्षात असू द्या. (मत्त. २८:१९, २०) तर मग, पूर्णवेळेच्या सेवकांच्या आईवडिलांना मदतीची गरज पडल्यास तुम्ही किंवा तुमची मंडळी त्यांना साहाय्य करण्यास पुढे येऊ शकते का?

२१. इतरांकडून मिळणारी मदत व प्रोत्साहन यांबद्दल पूर्णवेळेच्या सेवकांना कसे वाटते?

२१ जे बांधव पूर्णवेळेची सेवा निवडतात ते आर्थिक फायद्यासाठी नाही, तर यहोवाची व इतरांची सेवा करण्यासाठी ही निवड करतात. तुम्ही त्यांना जी काही मदत पुरवता त्याची ते मनापासून कदर करतात. दुसऱ्या देशात सेवा करत असलेल्या एका बहिणीच्या ज्या भावना आहेत त्याच इतर सेवकांच्याही असतील. तिने म्हटले: “एखादं छोटं पत्र किंवा कार्ड लिहूनही आम्ही करत असलेल्या कामाबद्दल कोणी कदर व्यक्त केली, तर यावरून दिसतं की ते आमच्याबद्दल विचार करतात, आमच्या सेवेबद्दल त्यांना आनंद होतो.”

२२. पूर्णवेळेच्या सेवेबद्दल तुम्हाला कसे वाटते?

२२ यहोवाची पूर्णवेळ सेवा करणे हा खरोखर जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे. या सेवेतून खूप काही शिकायला मिळते आणि खरे समाधान लाभते. भविष्यात यहोवाचे सर्व विश्वासू सेवक त्याच्या राज्यात सदासर्वकाळ आनंदाने त्याची सेवा करतील. त्यासाठी आज पूर्णवेळेची सेवा करणे ही चांगली तयारी आहे. तर मग, पूर्णवेळेचे सेवक ‘विश्वासाने व प्रीतीने जे श्रम’ घेत आहेत त्याची आपण नेहमी आठवण ठेवू या.—१ थेस्सलनी. १:३.