व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्याजवळ सत्य आहे याची तुम्हाला खात्री आहे का? जर आहे, तर का?

आपल्याजवळ सत्य आहे याची तुम्हाला खात्री आहे का? जर आहे, तर का?

“देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे.”—रोम. १२:२.

१. ख्रिस्ती धर्मजगतातील पुढाऱ्यांनी युद्धांदरम्यान काय केले आहे?

खऱ्या ख्रिश्चनांनी दुसऱ्या राष्ट्रांतील लोकांशी युद्ध लढावे आणि त्यांना ठार मारावे अशी देवाची इच्छा आहे का? अशी देवाची मुळीच इच्छा नाही. पण तरी, स्वतःला ख्रिश्चन म्हणवून घेणाऱ्या बऱ्याच लोकांनी गेल्या शंभर वर्षांत हेच केले आहे. शत्रू राष्ट्रातील कॅथलिक लोकांवर हल्ला करण्यासाठी कॅथलिक धर्मपुढाऱ्यांनीच आपल्या देशातील सैनिकांवर व त्यांच्या शस्त्रांवर देवाकडून आशीर्वाद मागितला आहे. प्रोटेस्टंट धर्मपुढाऱ्यांनीही हेच केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे दुसरे महायुद्ध.

२, ३. दुसऱ्या महायुद्धादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांनी काय केले आणि का?

युद्धांदरम्यान यहोवाच्या साक्षीदारांनी काय केले? इतिहासावरून दिसून येते की त्यांनी कोणत्याही प्रकारे युद्धांत सहभाग घेतला नाही. असे करण्यामागचे कारण काय होते? त्यांनी येशूच्या उदाहरणाचे आणि त्याच्या शिकवणींचे परीक्षण केले. येशूने म्हटले होते: “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३५) तसेच, पौलाने  करिंथमधील ख्रिश्चनांसोबत जो तर्क केला त्यातील सल्लाही त्यांनी लागू केला.—२ करिंथकर १०:३, ४ वाचा.

त्यामुळे बायबलचे पालन करणारे खरे ख्रिस्ती युद्धकला शिकत नाहीत किंवा युद्धांत भाग घेत नाहीत. आपल्या या तटस्थ भूमिकेमुळे हजारो साक्षीदारांचा छळ करण्यात आला आहे. यांत तरुण, वृद्ध तसेच स्त्री-पुरुषांचाही समावेश आहे. अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले व त्यांच्याकडून सक्तमजुरी करून घेण्यात आली. जर्मनीत नात्झीचे शासन होते त्या काळात काहींना मारून टाकण्यात आले. युरोपमधील साक्षीदारांना अनेक भयंकर छळ सोसावे लागले. असे असूनही ते यहोवाच्या राज्याविषयी इतरांना सांगत राहिले. तुरुंगांत, यातना शिबिरांत आणि हद्दपार झाल्यानंतरही ते विश्वासूपणे हे काम करत राहिले. * त्यानंतर, १९९४ साली रुआंडामध्ये जातीच्या नावाखाली झालेल्या रक्तपातात साक्षीदारांनी सहभाग घेतला नाही. तसेच, युगोस्लाव्हियात मोठ्या प्रमाणावर झालेल्या रक्तपातातही त्यांनी सहभाग घेतला नाही.

४. यहोवाच्या साक्षीदारांनी युद्धात सहभाग न घेतल्यामुळे अनेकांना कोणती खात्री पटली आहे?

यहोवाच्या साक्षीदारांनी कोणत्याही प्रकारे युद्धाला समर्थन दिले नाही. यामुळे जगभरातील अनेकांच्या लक्षात आले आहे की साक्षीदार खऱ्या अर्थाने देवावर आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करतात. दुसऱ्या शब्दांत, ते ख्रिस्ताचे अनुकरण करतात. पण, याच एका कारणामुळे नाही, तर आपल्या उपासनेच्या इतर पैलूंमुळेही लोकांना याची खात्री पटली आहे की यहोवाचे साक्षीदार खरे ख्रिस्ती आहेत.

इतिहासातील सर्वात मोठे शैक्षणिक कार्य

५. येशूच्या शिष्यांना नंतर कोणाला साक्ष देण्यास सांगण्यात आले?

देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगणे किती महत्त्वाचे आहे हे येशूने त्याच्या सेवाकार्याच्या सुरुवातीलाच दाखवून दिले. जगभरात साक्ष देण्याच्या कार्याचा पाया घालण्यासाठी त्याने १२ शिष्यांची निवड केली. त्यानंतर त्याने ७० * शिष्यांना प्रशिक्षण दिले. (लूक ६:१३; १०:१) हे शिष्य आता इतरांना साक्ष देण्यास तयार होते. सर्वप्रथम ते यहुदी लोकांना साक्ष देणार होते. पण, नंतर यहुदी नसलेल्या लोकांनाही सुवार्ता सांगण्याचे काम त्यांना सोपवण्यात आले. या आवेशी यहुदी शिष्यांकरता हा किती मोठा बदल असेल याची तुम्ही कल्पना करू शकता!—प्रे. कृत्ये १:८.

६. यहोवा पक्षपाती नाही हे पेत्राला कसे समजले?

प्रेषित पेत्राला यहुदी नसलेल्या कर्नेल्याच्या घरी जाण्यासाठी सांगण्यात आले. तेव्हा पेत्राला समजले की देव पक्षपाती नाही. कर्नेल्याने आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी बाप्तिस्मा घेतला. ख्रिस्ताबद्दलची शिकवण आता मोठ्या प्रमाणावर दिली जात होती. सर्व राष्ट्रांतील लोकांना सत्य ऐकण्याची आणि ते स्वीकारण्याची संधी होती. (प्रे. कृत्ये १०:९-४८) आता फक्त यहूदाच नव्हे तर सबंध जग शिष्यांचे क्षेत्र होते!

७, ८. यहोवाच्या संघटनेने जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी कशा प्रकारे पुढाकार घेतला आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

आधुनिक काळात यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्या बांधवांनी प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्याची आवेशाने व्यवस्था केली आहे व त्याला हातभार लावला आहे. आज जवळजवळ ऐंशी लाख साक्षीदार सुवार्ता सांगण्यासाठी आपल्या परीने होताहोईल तितके प्रयत्न करत आहेत. ते ६०० पेक्षा जास्त भाषांमध्ये हा संदेश लोकांपर्यंत पोचवत आहेत आणि यात आणखी भाषांची भर पडत आहे. यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या घरोघरच्या प्रचार कार्यामुळे ओळखले जाते. तसेच, त्यांना रस्त्यावरील साक्षकार्यामुळेही ओळखले जाते. या प्रकारच्या साक्षकार्यात कधीकधी ते प्रकाशने मांडण्यासाठी टेबलांचा किंवा ट्रॉलींचा उपयोग करतात.

बायबल आणि बायबलवर आधारित प्रकाशनांचे वेगवेगळ्या भाषांत भाषांतर करण्यासाठी २,९०० पेक्षा  जास्त भाषांतरकारांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. भाषांतराचे काम फक्त प्रमुख भाषांपुरतेच मर्यादित नाही. जगातील प्रमुख भाषा वगळता अशा अनेक भाषा आहेत ज्यांचा वापर लाखो लोक आपल्या दररोजच्या जीवनात करतात. अशा भाषांमध्येही भाषांतर केले जाते. उदाहरणार्थ, स्पेनमध्ये लाखो कॅटालोनियन लोकांची मातृभाषा कॅटलन ही आहे. अलीकडे अँडोरा, अॅलेकॅन्टे, बेलिअॅरीक बेटे आणि वॅलेन्सिया या शहरांतील अनेक लोक कॅटलन ही भाषा पुन्हा वापरू लागले आहेत. त्यामुळे, यहोवाचे साक्षीदार आता कॅटलन भाषेत बायबलवर आधारित साहित्य प्रकाशित करतात. तसेच, कॅटलन भाषेत आता ख्रिस्ती सभा चालवल्या जातात. या सभांना उपस्थित राहिल्यामुळे कॅटालोनियन लोकांना खूप आनंद होतो.

९, १०. देवाची संघटना सर्वांच्या आध्यात्मिक गरजा भागवण्यास उत्सुक आहे हे कशावरून दिसून येते?

अनेक देशांत अशाच प्रकारे भाषांतराचे आणि शिकवण्याचे काम केले जात आहे. उदाहरणार्थ, स्पॅनिश ही मेक्सिकोची राष्ट्रीय भाषा आहे. पण, तेथे इतर भाषा बोलणारे अनेक गट आहेत. त्यांपैकी एक गट माया भाषिक आहे. माया भाषेत भाषांतर करणाऱ्या गटाला मेक्सिको शाखा कार्यालयाने जेथे माया भाषा बोलली जाते तेथे पाठवले आहे. यामुळे, माया भाषा कशी बोलली जाते हे पाहण्याची संधी भाषांतरकारांना मिळाली आहे. दुसरे उदाहरण नेपाळमध्ये बोलल्या जाणाऱ्या नेपाळी भाषेचे आहे. या देशाची लोकसंख्या दोन कोटी नव्वद लाखांपेक्षा जास्त आहे. तेथे जवळजवळ १२० भाषा बोलल्या जातात. पण, एक कोटी पेक्षा जास्त लोकांची मातृभाषा नेपाळी आहे आणि इतर बरेच लोक ती बोलू शकतात. म्हणून बायबलवर आधारित साहित्य नेपाळीमध्ये प्रकाशित केले जाते.

१० जगभरात राज्याची सुवार्ता सांगण्याच्या कार्याला यहोवाची संघटना खूप महत्त्व देते. जगभरातील अनेक भाषांतर गटांना संघटनेकडून जो पाठिंबा दिला जातो त्यावरून हे दिसून येते. लाखोंच्या संख्येने पत्रिका, माहितीपत्रके आणि नियतकालिके वेगवेगळ्या मोहिमांद्वारे लोकांना विनामूल्य दिली जातात. यहोवाचे साक्षीदार स्वेच्छेने देत असलेल्या देणग्यांद्वारे या कार्याचा खर्च चालवला जातो. ते येशूच्या सल्ल्याचे पालन करतात. त्याने म्हटले: “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.”—मत्त. १०:८.

उत्तर जर्मनीतील लो जर्मन भाषेत साहित्य तयार करताना भाषांतर गट (परिच्छेद १० पाहा)

लो जर्मन भाषेतील प्रकाशनांचा पॅराग्वेमध्ये उपयोग केला जातो (लेखाच्या सुरुवातीचे चित्रदेखील पाहा)

११, १२. जगभरात चाललेल्या प्रचार कार्याचा लोकांवर कसा प्रभाव पडला आहे?

११ आपल्याला सत्य मिळाले आहे याची यहोवाच्या साक्षीदारांना पूर्ण खात्री आहे. यामुळेच, सर्व राष्ट्रांतील व पार्श्‍वभूमीतील लोकांना राज्याची सुवार्ता सांगता यावी म्हणून त्यांनी आपल्या जीवनात मोठमोठे त्याग केले आहेत. सुवार्ता सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी अनेकांनी त्यांचे जीवन साधे केले आहे, नवीन भाषा शिकून घेतली आहे आणि वेगळ्या संस्कृतीशी  जुळवून घेतले आहे. जगभरात चाललेल्या प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यामुळे अनेकांना हे पटले आहे की यहोवाचे साक्षीदार खऱ्या अर्थाने ख्रिस्त येशूचे अनुकरण करतात.

१२ साक्षीदार हे सर्व त्याग का करतात? कारण आपल्याला सत्य मिळाले आहे याची त्यांना खात्री आहे. पण, आणखी कोणती कारणे आहेत ज्यांमुळे लाखो लोकांना याची खात्री पटते की यहोवाच्या साक्षीदारांजवळ सत्य आहे?—रोमकर १४:१७, १८ वाचा.

साक्षीदारांना खात्री का आहे?

१३. यहोवाची संघटना शुद्ध कशी ठेवली जाते?

१३ आपल्या काळातील यहोवाच्या साक्षीदारांना याची खात्री आहे की त्यांना सत्य मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे अनुभव ऐकल्याने आपल्याला खूप फायदा होईल. अनेक वर्षांपासून यहोवाची सेवा करणाऱ्या एका बांधवाने आपल्या भावना पुढील शब्दांत व्यक्त केल्या: “यहोवाच्या संघटनेला नैतिक रीत्या शुद्ध ठेवण्यासाठी होताहोईल तितका प्रयत्न केला जातो. मग यासाठी संघटनेत कोणत्याही पदावर असलेल्या व्यक्तीला ताडन देण्याची गरज पडली तरी ते दिलं जातं.” यहोवाची संघटना शुद्ध कशी ठेवली जाते? यासाठी बायबलमधील स्तरांचे पालन केले जाते आणि येशू व त्याच्या शिष्यांच्या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण केले जाते. त्यामुळे, आधुनिक काळातील यहोवाच्या साक्षीदारांमधून फार कमी लोकांना देवाच्या स्तरांचे उल्लंघन केल्यामुळे बहिष्कृत करण्यात आले आहे. साक्षीदारांपैकी बहुतेक जण शुद्ध जीवन जगून इतरांपुढे चांगले उदाहरण मांडतात. यांत अशा लोकांचाही समावेश आहे जे आधी देवाला अमान्य असलेले जीवन जगायचे पण नंतर त्यांनी स्वतःत बदल केले.—१ करिंथकर ६:९-११ वाचा.

१४. बऱ्याच बहिष्कृत झालेल्यांनी काय केले आहे, आणि याचा काय परिणाम झाला आहे?

१४ पण, देवाच्या वचनांच्या आधारे ज्यांना बहिष्कृत करण्यात आले आहे त्यांच्याबद्दल काय? त्यांपैकी हजारो लोकांनी वाईट मार्गापासून फिरून खरा पश्‍चात्ताप दाखवला आहे आणि त्यांना पुन्हा मंडळीत घेण्यात आले आहे. (२ करिंथकर २:६-८ वाचा.) बायबलमधील नीतिमान स्तरांचे पालन केल्यामुळे ख्रिस्ती मंडळीला शुद्ध ठेवणे शक्य झाले आहे. यामुळे बांधवांचा मंडळीवरील विश्वास आणि भरवसा वाढला आहे. स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणारे लोक देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जगत नाहीत. पण याच्या अगदी उलट यहोवाचे साक्षीदार देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जगतात. आणि यामुळे बऱ्याच लोकांना ही खात्री पटली आहे की यहोवाचे साक्षीदार हेच खरे ख्रिस्ती आहेत.

१५. आपल्याला सत्य मिळाले आहे याची खात्री एका बांधवाला कशामुळे पटली?

१५ आपल्याला सत्य मिळाले आहे असे इतर अनुभवी साक्षीदारांना का वाटते? ५४ वर्षांचे एक बांधव असे म्हणतात: “तरुणपणापासूनच माझा विश्वास पुढील तीन गोष्टींवर आधारित आहे: (१) देव अस्तित्वात आहे; (२) बायबल त्याच्या प्रेरणेनं लिहिण्यात आलं आहे; आणि (३) आज तो ख्रिस्ती मंडळ्यांचा उपयोग करत आहे व त्यांवर त्याचा आशीर्वाद आहे. आतापर्यंत मी या तिन्ही गोष्टींचं परीक्षण करत आलो आहे आणि त्यांवर माझा विश्वास मजबूत आहे की नाही हे मी पडताळून पाहिलं आहे. असं केल्यामुळे या तिन्ही गोष्टींवरचा माझा भरवसा दिवसेंदिवस वाढत गेला आहे. यामुळे  देवावरील माझा विश्वास आणखी भक्कम झाला आहे आणि आपल्याजवळ सत्य आहे याबद्दल कोणतीही शंका माझ्या मनात नाही.”

१६. एका बहिणीला सत्याबद्दलची कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली?

१६ न्यूयॉर्कमधील साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सेवा करणाऱ्या एका विवाहित बहिणीने असे म्हटले: “यहोवाची संघटना ही फक्त एकच अशी संघटना आहे जी देवाच्या नावाबद्दल घोषणा करते. बायबलमध्ये जवळजवळ ७,००० वेळा देवाचं नाव यासाठीच देण्यात आलं आहे. २ इतिहास १६:९ मध्ये जे उत्तेजन देण्यात आलं आहे त्याची मी खूप कदर करते. त्यात म्हटले आहे: ‘परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.’” ती पुढे म्हणते: “देवानं मला मदत करावी यासाठी मी त्याची सेवा पूर्ण मनानं कशी करू शकते हे मला सत्यामुळे समजलं आहे. यहोवासोबतचा माझा नातेसंबंध मला सर्वात जास्त प्रिय आहे. तसंच देवाबद्दल सखोल ज्ञान माझ्यापर्यंत पोचवण्यासाठी येशू जी भूमिका पार पाडतो त्याचीही मी खूप कदर करते.”

१७. नास्तिक असलेल्या एका व्यक्तीला कशाविषयी खात्री झाली आहे, आणि का?

१७ सत्यात येण्यापूर्वी नास्तिक असलेला एक बांधव असे म्हणतो: “मानवांनी जीवनाचा आनंद लुटावा अशी देवाची इच्छा आहे ही खात्री मला सृष्टीवरून झाली. त्यामुळे, तो दुःखांना कायमस्वरूपी राहू देणार नाही हेदेखील मला समजलं. हे जग अधिकाधिक वाईट होत चाललं आहे पण असं असतानाही यहोवाच्या लोकांमधील विश्वास, आवेश आणि प्रेम वाढतच चाललं आहे. आणि यहोवाच्या पवित्र आत्म्यामुळेच हे शक्य झालं आहे.”—१ पेत्र ४:१-४ वाचा.

१८. दोन बांधवांनी जे सांगितले त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?

१८ आणखी एका अनुभवी बांधवाने त्यांच्या विश्वासाचे कारण स्पष्ट केले. त्यांनी म्हटले: “अनेक वर्षांच्या अनुभवावरून मला हे दिसून आलं आहे की साक्षीदारांनी पहिल्या शतकातील ख्रिश्चनांचे अनुकरण करण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. जगातील वेगवेगळ्या भागांत प्रवास केल्यामुळे मी स्वतः यहोवाच्या साक्षीदारांमधील एकता पाहू शकलो. बायबलमधील सत्यामुळे मला खरा आनंद व समाधान मिळालं आहे.” साठीत असलेल्या एका बांधवाला जेव्हा विचारण्यात आले की, तुमच्याजवळ सत्य आहे अशी खात्री तुम्ही का बाळगता? तेव्हा त्यांनी असे म्हटले: “आपण येशूच्या जीवनाचं, त्याच्या सेवाकार्याचं बारकाईनं परीक्षण केलं आहे आणि त्याच्या चांगल्या उदाहरणाची आपण कदर करतो. ख्रिस्त येशूद्वारे देवाच्या जवळ येण्यासाठी आपण आपल्या जीवनात खूप बदल केले आहेत. आपला बचाव फक्त येशूच्या खंडणी बलिदानामुळेच शक्य आहे हे आपण ओळखलं आहे. आणि त्याला पुन्हा जिवंत करण्यात आलं हेही आपल्याला माहीत आहे. त्याच्या पुनरुत्थानाचे बरेच साक्षीदारदेखील होते.”—१ करिंथकर १५:३-८ वाचा.

इतरांना सत्याविषयी सांगा

१९, २०. (क) पौलाने रोममधील मंडळीला कोणत्या जबाबदारीविषयी जोर देऊन सांगितले? (ख) यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्याला कोणता बहुमान मिळाला आहे?

१९ ख्रिस्ती असल्यामुळे आपले शेजाऱ्यांवर प्रेम आहे. त्यामुळे, आपल्याला समजलेले बहुमूल्य सत्य आपण स्वतःकडेच ठेवू नये. रोममधील मंडळीतील बांधवांशी तर्क करताना पौलाने असे लिहिले: “येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा ‘आपल्या अंतःकरणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल; कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.”—रोम. १०:९, १०.

२० यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्याला याची खात्री आहे की आपल्याजवळ सत्य आहे. तसेच, इतरांना देवाच्या राज्याबद्दलची सुवार्ता सांगण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे याची आपल्याला जाणीव आहे. प्रचारात आपण बायबलमधून जे शिकवतो फक्त त्यामुळेच नाही, तर आपल्या जीवनावरूनही आपण इतरांना दाखवून देऊ की आपल्याजवळ सत्य आहे याची आपल्याला खात्री आहे.

^ परि. 3 जेहोवाज विट्नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्ज किंग्डम या पुस्तकातील पृष्ठे १९१-१९८, ४४८-४५४ पाहा.

^ परि. 5 बायबलच्या काही प्राचीन हस्तलिखितांत ७० तर काहींत ७२ शिष्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.