व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

 जीवन कथा

माझ्या आयुष्यभराच्या सेवेतले महत्त्वाचे टप्पे

माझ्या आयुष्यभराच्या सेवेतले महत्त्वाचे टप्पे

१९४७ या वर्षी, एल साल्वाडॉरमधील सांता आना या ठिकाणी कॅथलिक पाळकांनी यहोवाच्या साक्षीदारांना त्रास देण्याच्या हेतूनं एक मोर्चा आयोजित केला. मिशनरी गृहात दर आठवडी होणारा टेहळणी बुरूज अभ्यास सुरू होता. तेवढ्यात काही मुलांनी मिशनरी गृहाच्या दरवाज्यातून मोठे दगड फेकण्यास सुरवात केली. त्यानंतर काही पाळक तिथं एक मोठा मोर्चा घेऊन आले. मोर्च्यात सहभागी झालेल्या काही लोकांच्या हातात मशाली तर इतरांच्या हातात मूर्ती होत्या. दोन तासांपर्यंत ते मिशनरी गृहाच्या इमारतीवर दगडफेक करत राहिले. त्यासोबतच ते “कुमारी मरीया जिंदाबाद!” आणि “यहोवा मुर्दाबाद!” असे नारेदेखील लावत होते. मिशनऱ्यांनी या सगळ्या प्रकारामुळे घाबरून ते शहर सोडून जावे अशी त्या पाळकांची इच्छा होती. मला हे सर्व कसं कळलं? कारण ६७ वर्षांपूर्वी मी स्वतः त्या सभेला हजर होते! *

वरील घटना घडायच्या दोन वर्षांआधी एव्हलिन ट्रेबर्ट आणि मी वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या चौथ्या वर्गाला उपस्थित राहिलो होतो. त्या वेळी ही प्रशाला न्यूयॉर्क राज्यातील इथाका या शहराजवळ होती. प्रशाला संपल्यानंतर आम्हा दोघींना सांता आना इथं सोबत मिळून मिशनरी सेवा करण्यासाठी पाठवण्यात आलं. पण जवळजवळ २९ वर्षांच्या माझ्या मिशनरी सेवेतील अनुभवांविषयी सांगण्याआधी, मी ही सेवा का निवडली ते सांगते.

घरातील आध्यात्मिक वातावरण

माझा जन्म १९२३ या वर्षी झाला. माझे आईबाबा, जॉन व ईव्हा ओल्सन त्या वेळी अमेरिकेत वॉशिंग्टन राज्यातल्या स्पोकेइन शहरात राहत होते. ते लूथरन पंथाचे होते. पण मानवांना नरकात यातना दिल्या जातात ही चर्चची शिकवण ते मानत नव्हते. कारण एक प्रेमळ देव कधीही मानवांना यातना देऊ शकत नाही असं त्यांचं मत होतं. (१ योहा. ४:८) बाबा एका बेकरीत कामाला होते. एके दिवशी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एकानं त्यांना समजावून सांगितलं की नरकात यातना दिल्या जातात ही बायबलची शिकवण नाही. हे ऐकून बाबांना खूप बरं वाटलं. लवकरच माझे आईबाबा यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागले; शेवटी त्यांना समजलं की मृतांच्या स्थितीबद्दल बायबलमध्ये नेमकं काय सांगितलं आहे.

त्या वेळी, मी फक्त नऊ वर्षांची होते. पण बायबलमधून समजलेल्या नवनवीन सत्यांबद्दल आईबाबा किती उत्साहानं बोलायचे हे मला आजही आठवतं. खऱ्या देवाचं नाव यहोवा आहे हे जेव्हा त्यांना समजलं, आणि त्रैक्याविषयीचा गोंधळ दूर झाला तेव्हा तर त्यांना आणखीनच आनंद झाला. बायबलच्या या आनंददायक सत्यांची माझ्या कोवळ्या मनावर  छाप पडत गेली. मनुष्याला “बंधमुक्त” करणारं सत्य मी शिकत होते. (योहा. ८:३२) त्यामुळे, बायबलचा अभ्यास कंटाळवाणा असतो असं मला कधीच वाटलं नाही. उलट, देवाच्या वचनाचं परीक्षण करायला मला नेहमीच खूप आनंद वाटतो. मी खूप लाजाळू स्वभावाची होते, पण तरीसुद्धा प्रचाराच्या कार्यात मी आईबाबांसोबत जायचे. त्यांचा बाप्तिस्मा १९३४ साली झाला. मग १९३९ मध्ये, वयाच्या १६ व्या वर्षी मीही बाप्तिस्मा घेतला आणि एक यहोवाची साक्षीदार बनले.

१९४१ मध्ये मिझूरीच्या सेंट लूईस शहरात झालेल्या संमेलनात आईबाबांसोबत

१९४० सालच्या जुलै महिन्यात आम्ही आमचं घर विकलं आणि तिघांनीही आइडहो राज्यातील कूअर डलेन इथं पायनियर या नात्यानं पूर्णवेळेची सेवा सुरू केली. एका कार-गॅरेजच्या वरती भाड्यानं घेतलेल्या घरात आम्ही राहू लागलो. सभासुद्धा आमच्या घरातच व्हायच्या. त्या वेळी बहुतेक मंडळ्यांजवळ स्वतःचं राज्य सभागृह नसल्यामुळे बांधवांच्या घरांत किंवा भाड्यानं घेतलेल्या खोल्यांमध्ये सभा चालवल्या जायच्या.

१९४१ मध्ये मी आईबाबांसोबत मिझूरी राज्यातल्या सेंट लूईस इथं झालेल्या संमेलनाला गेले होते. त्या संमेलनात रविवारचा दिवस हा खास “मुलांचा दिवस” होता. ५-१८ या वयोगटातल्या सर्व मुलांना स्टेजच्या अगदी समोर बसवण्यात आलं होतं. बंधू जोसेफ एफ. रदरफर्ड यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी आम्हा मुलांना उद्देशून म्हटलं: “देवाच्या आणि त्याने नियुक्त केलेल्या राजाच्या आज्ञांचे पालन करण्याचे ज्यांनी ठरवले आहे अशा सर्व मुलांनी उभे राहावे!” आम्ही सर्व मुलं उठून उभी राहिलो. मग बंधू रदरफर्ड म्हणाले: “पाहा, देवाच्या राज्याचे १५,००० नवीन साक्षीदार!” त्या क्षणीच मी मनाशी निश्चय केला की मी जीवनभर पायनियर सेवा करेन.

आमच्या कुटुंबाला मिळालेले विशेषाधिकार

सेंट लूईस इथं झालेल्या त्या संमेलनानंतर काही महिन्यांतच आम्ही दक्षिण कॅलिफोर्नियात राहायला आलो. तिथं ऑक्सनार्ड शहरात एक नवीन मंडळी सुरू करण्याचं काम आमच्यावर सोपवण्यात आलं होतं. आम्ही एका लहानशा ट्रेलरमध्ये (राहण्याची व्यवस्था असलेली गाडी) राहायचो. त्यात फक्त एकच पलंग होता. त्यामुळे मला दररोज रात्री डायनिंग टेबलवर बिछाना घालून त्यावर झोपावं लागायचं. आधीच्या घरात माझी स्वतःची बेडरूम होती, त्यामुळे हा माझ्यासाठी एक मोठा बदल होता!

आम्ही कॅलिफोर्नियाला आलो त्याच्या थोड्याच काळाआधी, ७ डिसेंबर, १९४१ रोजी जपाननं हवाईतल्या पर्ल हार्बरवर हल्ला केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकादेखील दुसऱ्या महायुद्धात सामील झाले. युद्धामुळे, आम्हाला रात्रीच्या वेळी घरातले सर्व दिवे बंद करावे लागायचे. तसा आदेशच देण्यात आला होता. कारण कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ जपानी पाणबुड्या हल्ला करण्यासाठी पाळत ठेवून होत्या. त्यांना समुद्रातून हल्ले करता येऊ नयेत म्हणून शहरांमध्ये संपूर्ण अंधार करणं सक्तीचं होतं.

काही महिन्यांनी, म्हणजे १९४२ च्या सप्टेंबरमध्ये आम्ही ओहायो राज्यातील क्लीव्हलँड शहरात झालेल्या न्यू वर्ल्ड थियोक्रॅटिक असेंब्लीला गेलो. तिथं आम्ही “शांती—टिकू शकेल का?” या विषयावर बंधू नेथन एच. नॉर यांचं भाषण ऐकलं. त्या भाषणात त्यांनी प्रकटीकरण पुस्तकातल्या १७ व्या अध्यायावर चर्चा केली. तिथं उल्लेखण्यात आलेले “श्वापद,” “होते, आणि नाही” तसेच, “ते अथांग डोहातून वर येणार आहे” हे कोणत्या अर्थानं, हे त्यांनी समजावून सांगितलं. (प्रक. १७:८, ११) बंधू नॉर यांनी सांगितलं की ते “श्वापद” म्हणजे लीग ऑफ नेशन्स ही संघटना आहे. १९३९ या वर्षी या संघटनेचे कार्य बंद पडले. पण बायबलमध्ये भाकीत करण्यात आलं होतं, की लीग ऑफ नेशन्सची जागा दुसरी एक संघटना घेईल आणि त्या संघटनेच्या स्थापनेनंतर काही काळासाठी पृथ्वीवर थोड्याफार प्रमाणात शांती राहील. आणि अगदी तसंच घडलं. १९४५ या वर्षी दुसरं महायुद्ध संपलं. त्यानंतर, “श्वापद” संयुक्त राष्ट्रसंघाच्या रूपानं पुन्हा वर आलं. या संधीचा फायदा घेऊन यहोवाच्या साक्षीदारांनी लगेच जगभरातील प्रचार कार्य आणखी मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरवात केली. आणि तेव्हापासून देवाच्या लोकांमध्ये खरोखरच किती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे!

माझं गिलियड प्रशालेचं प्रमाणपत्र

त्या भविष्यवाणीच्या स्पष्टीकरणामुळे, येणाऱ्या वर्षांत प्रचार कार्याला हातभार लावणं किती महत्त्वाचं आहे याची मला जाणीव झाली. पुढच्या वर्षी गिलियड प्रशाला सुरू होणार असल्याचं घोषित करण्यात आलं, तेव्हा माझ्या मनात मिशनरी बनण्याची इच्छा जागृत झाली. १९४३ मध्ये मला ऑरिगन राज्यातल्या पोर्टलँड इथं पायनियर सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं. त्या काळी आम्ही घरमालकांच्या दारातच  फोनोग्राफ ठेवून त्यावर बायबल आधारित भाषणांच्या रेकॉर्डिंग्स लावायचो. घरमालकांनी या रेकॉर्डिंग्स ऐकल्यावर आम्ही त्यांना देवाच्या राज्याबद्दल माहिती देणारे बायबल आधारित साहित्य द्यायचो. त्या सबंध वर्षभर मी मिशनरी सेवेबद्दल विचार करत होते.

१९४४ या वर्षी मला आणि एव्हलिन ट्रेबर्ट या माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीला गिलियड प्रशालेचं निमंत्रण मिळालं. मला खूप खूप आनंद झाला. पाच महिन्यांच्या त्या प्रशिक्षणात, बायबल अभ्यास आनंददायक कसा बनवावा हे आमच्या गिलियड शिक्षकांनी आम्हाला शिकवलं. त्यांची नम्रता पाहून आम्ही खूप प्रभावित झालो. कधीकधी आम्ही विद्यार्थी जेवत असताना हे बांधव आम्हाला जेवण वाढण्याचं काम करायचे. २२ जानेवारी, १९४५ या तारखेला आम्ही गिलियड प्रशालेचं शिक्षण पूर्ण केलं.

माझी मिशनरी नेमणूक

१९४६ च्या जून महिन्यात एव्हलिन व मी, तसेच लीयो आणि एस्तर महॅन, एल साल्वाडॉरला मिशनरी सेवा करण्यासाठी आलो. इथं आल्यावर, शेतं “कापणीसाठी पांढरी” झाली आहेत असं आम्हाला आढळलं. पुष्कळ लोक सत्य शिकून घेण्यास उत्सुक होते. (योहा. ४:३५) साहजिकच यामुळे चर्चच्या पाळकांना खूप राग आला. ते किती संतापले होते, हे सुरवातीला उल्लेख केलेल्या घटनेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. एकाच आठवड्याआधी सांता आना इथं आमचं पहिलं विभागीय संमेलन झालं होतं. त्या संमेलनाच्या जाहीर भाषणाची आम्ही मोठ्या प्रमाणात जाहिरात केली होती. जवळजवळ ५०० लोक त्या भाषणाला उपस्थित राहिल्याचं पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला. पाळकांच्या विरोधाला घाबरून, शहर सोडून जाण्याऐवजी प्रामाणिक मनाच्या लोकांना मदत करण्यासाठी तिथंच राहण्याचा आमचा निश्चय आणखीनच पक्का झाला. पाळकांनी इथल्या लोकांना बायबल न वाचण्याची ताकीद दिली होती. शिवाय, बहुतेकांजवळ स्वतःचं बायबल विकत घेण्याइतके पैसेसुद्धा नव्हते. पण, तरीसुद्धा बरेच लोक सत्य शिकून घेण्यासाठी आसुसलेले होते. त्यांना खरा देव, यहोवा याच्याबद्दल आणि पृथ्वीवर नंदनवन आणण्याच्या त्याच्या अभिवचनाबद्दल शिकवता यावं, म्हणून आम्ही बरीच मेहनत घेऊन स्पॅनिश शिकत आहोत याचं त्यांना खूप कौतुक वाटायचं.

मला आणि गिलियडच्या माझ्या चार वर्गसोबत्यांना एल साल्वाडॉर इथं पाठवण्यात आलं. डावीकडून उजवीकडे: एव्हलिन ट्रेबर्ट, मिली ब्रॅशर, एस्तर महॅन, मी आणि लीयो महॅन

मला अगदी सुरवातीला भेटलेल्या, सत्याविषयी आवड दाखवणाऱ्या व्यक्तींपैकी रोसा असेन्सियो ही एक होती. तिनं बायबलचा अभ्यास सुरू केला तेव्हा ती एका माणसाबरोबर राहत होती. पण, बायबलचं ज्ञान घेतल्यावर ती त्याच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर त्यानंसुद्धा बायबल अभ्यास सुरू केला. पुढे त्यांचं लग्न झालं, मग बाप्तिस्मा झाला आणि त्यानंतर दोघंही यहोवाचे आवेशी साक्षीदार बनले. सांता आना इथं पायनियर सेवा सुरू करणारी रोसा अगदी पहिलीच बहीण होती. *

रोसाचं एक लहानसं किराण्याचं दुकान होतं. सेवेला जाताना ती दुकान बंद करून जायची. यहोवा आपल्या गरजा पुरवेल यावर तिचा पूर्ण भरवसा होता. काही तासांनी जेव्हा ती दुकान उघडायची तेव्हा सामान घेण्यासाठी गिऱ्हाईक अक्षरशः गर्दी करायचे. मत्तय ६:३३ यात दिलेले शब्द किती खरे आहेत याची तिला स्वतःच्या अनुभवावरून खात्री पटली. तिचा मृत्यू होईपर्यंत ती यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहिली.

आम्ही सहा मिशनरी, भाड्यानं घेतलेल्या एका घरात राहत होतो. एकदा चर्चचा पाळक आमच्या घरमालकाला भेटायला आला. त्यानं घरमाकाला ताकीद दिली की जर त्यानं आम्हाला घराबाहेर काढलं नाही तर त्याला व त्याच्या बायकोला चर्चमधून बहिष्कृत केलं जाईल. हा घरमालक एक प्रतिष्ठित व्यापारी होता. शिवाय, पाळकांच्या ढोंगी वागणुकीमुळे त्याच्या मनात आधीपासूनच त्यांच्याविषयी राग होता. त्यामुळे, त्यानं पाळकाचं ऐकलं नाही. उलट, त्यानं पाळकाला स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मला बहिष्कृत केलं तरी मला काहीच पर्वा नाही. आणि  त्यानं आम्हाला सांगितलं की आम्ही अगदी निश्‍चिंतपणे त्याच्या घरात राहू शकतो.

एक सन्माननीय नागरिक साक्षीदार बनला

१९५५ मध्ये बांधण्यात आलेलं शाखा कार्यालय

सान साल्वाडॉर या राजधानी शहरात आणखी एक मिशनरी बहीण बाल्तासार पेर्ला नावाच्या एका इंजिनियरच्या पत्नीसोबत बायबल अभ्यास करत होती. पेर्ला फार चांगले गृहस्थ होते. पण, धर्मपुढाऱ्यांचा ढोंगीपणा पाहिल्यामुळे त्यांचा देवावरचा विश्वास उडाला होता. शाखा कार्यालयाच्या बांधकामाची योजना आखली जात होती, तेव्हा अद्याप सत्यात आलेले नसतानाही त्यांनी कार्यालयाच्या इमारतींचं डिझाईन व बांधकाम करून देण्याचं वचन दिलं. शिवाय, त्यांच्या कामासाठी त्यांनी कोणताही मोबदला घेतला नाही.

त्या बांधकाम प्रकल्पाच्या निमित्तानं यहोवाच्या लोकांच्या सहवासात आल्यावर बाल्तासार यांची खात्री पटली की हाच खरा धर्म आहे. २२ जुलै, १९५५ रोजी बाल्तासार यांचा, व काही काळातच त्यांची पत्नी पॉलीना यांचाही बाप्तिस्मा झाला. त्यांची दोन्ही मुलं यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहेत. धाकटा मुलगा, म्हणजेच बाल्तासार ज्युनियर हे ब्रुकलिन बेथेलमध्ये ४९ वर्षांपासून सेवा करत आहेत व या सेवेद्वारे जगभरात वाढत चाललेल्या प्रचार कार्याला ते हातभार लावत आहेत. सध्या ते अमेरिकेच्या शाखा समितीचे सदस्य म्हणून सेवा करत आहेत. *

आम्ही सान साल्वाडॉर इथं अधिवेशनं भरवू लागलो तेव्हा बंधू पेर्ला यांनी आम्हाला अधिवेशनासाठी एक मोठं प्रेक्षागृह वापरण्याची परवानगी मिळवून दिली. सुरवातीला आम्ही या प्रेक्षागृहाचे फक्त काही भाग वापरत होतो. पण यहोवाच्या आशीर्वादानं आमची संख्या दरवर्षी वाढतच गेली. शेवटी, आम्ही संपूर्ण प्रेक्षागृह वापरू लागलो आणि पुढे तर तेही कमी पडू लागलं. अधिवेशनाच्या आनंददायक प्रसंगी माझी अशा अनेकांशी भेट व्हायची, ज्यांच्यासोबत मी एकेकाळी बायबल अभ्यास केला होता. त्यांच्यापैकी काही जण, नुकताच बाप्तिस्मा झालेल्या आपल्या बायबल विद्यार्थ्यांशी माझी ओळख करून द्यायचे. माझ्या या “नातवंडांना” भेटून मला किती आनंद होत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता!

बंधू एफ. डब्ल्यू. फ्रान्झ एका अधिवेशनात मिशनऱ्यांना उद्देशून बोलताना

एका संमेलनात एक बांधव माझ्याजवळ आले आणि त्यांना माझ्याजवळ काहीतरी कबूल करायचं आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना ओळखलं नाही. पण त्यांना काय सांगायचं असेल हे जाणून घ्यायला मी उत्सुक होते. ते म्हणाले, “सांता आना इथं तुमच्यावर दगड फेकणाऱ्या मुलांपैकी मीही एक होतो.” आता तेसुद्धा माझ्यासारखीच यहोवाची सेवा करत होते! त्यांना भेटून मला खूप आनंद झाला आणि या गोष्टीची खात्री पटली की पूर्णवेळेची सेवा हाच जीवनाचा सर्वात उत्तम मार्ग आहे.

एल साल्वाडॉर इथं आमचं पहिलं विभागीय संमेलन

 जीवनात खरं समाधान लाभलं

एल साल्वाडॉर इथं मी जवळजवळ २९ वर्षं मिशनरी सेवा केली. सुरवातीला सांता आना या शहरात, मग सॉन्सोनाटे या ठिकाणी; त्यानंतर सांता टेकला आणि शेवटी सान साल्वाडॉर इथं मी सेवा केली. पण काही काळानंतर, स्पोकेइन इथं यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असलेल्या माझ्या वृद्ध आईबाबांना माझ्या मदतीची गरज भासू लागली. त्यामुळे, १९७५ साली खूप प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर मी माझी मिशनरी नेमणूक सोडून स्पोकेइनला परतण्याचा निर्णय घेतला.

१९७९ मध्ये बाबांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी आईची काळजी घेऊ लागले. तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. तिला स्वतःहून काहीही करणं शक्य नव्हतं. आठ वर्षांनंतर, वयाच्या ९४ व्या वर्षी तिचाही मृत्यू झाला. त्या कठीण काळात मी शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या अगदीच थकून गेले होते. तीव्र मानसिक तणावामुळे मला नागीण हा वेदनादायक आजार झाला. पण प्रार्थनेमुळे आणि यहोवानं घेतलेल्या प्रेमळ काळजीमुळे मी तो कठीण प्रसंगही धीरानं सोसू शकले. यहोवाचे हे शब्द किती खरे आहेत, “तुमचे केस पिकून तुम्ही म्हातारे व्हाल, तरीही मी तुमची काळजी वाहीन. . . . मी तुम्हाला साहाय्य करेन व तुमची सुटका करेन.”—यश. ४६:४, मराठी कॉमन लँग्वेज.

१९९० या वर्षी मी वॉशिंग्टन राज्यातल्या ओमाक या शहरात राहायला गेले. तिथं स्पॅनिश क्षेत्रात काम करू शकल्यामुळे मला पुन्हा यहोवाच्या सेवेला हातभार लावण्याचं समाधान मिळालं. माझ्या अनेक बायबल विद्यार्थ्यांचा बाप्तिस्मा झाला. २००७ सालच्या नोव्हेंबरमध्ये, ओमाक इथं असलेल्या माझ्या घराची देखभाल करणं मला शक्य नसल्यामुळे, मी जवळच्याच शलॅन नावाच्या शहरात एक छोटंसं घर घेऊन राहू लागले. तेव्हापासून इथली स्पॅनिश मंडळी खूप प्रेमळपणे माझी काळजी घेत आहे आणि त्याबद्दल मी त्यांची खूप कृतज्ञ आहे. मंडळीत मी एकटीच वयस्क बहीण असल्यामुळे इथल्या बंधुभगिनींनी दयाळूपणे मला त्यांची “आजी” म्हणून “दत्तक” घेतलं आहे!

सेवाकार्यात जास्तीतजास्त सहभाग घेता यावा म्हणून मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मला स्वतःची मुलंबाळं नसली, तरी आध्यात्मिक अर्थानं मला कितीतरी मुलं आहेत. (१ करिंथ. ७:३४, ३५) सध्याच्या जीवनात मी सर्वकाही मिळवू शकत नाही याची मला जाणीव होती. त्यामुळे मी जीवनात जे सर्वात महत्त्वाचं आहे त्याला, म्हणजेच यहोवाची मनापासून सेवा करण्यासाठी जे समर्पण मी केलं होतं, त्यालाच पहिलं स्थान देण्याचा निर्णय घेतला. नव्या जगात इतर सर्व प्रकारच्या आनंददायक गोष्टी अनुभवण्यासाठी भरपूर वेळ असेल. स्तोत्र १४५:१६ हे माझं आवडतं शास्त्रवचन आहे. त्यात यहोवा वचन देतो की तो “आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी” करेल.

पायनियर सेवेमुळे मला मनानं तरुण राहण्यास मदत मिळते

आता मी ९१ वर्षांची आहे. माझं आरोग्य अजूनही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे मी आजही पायनियर सेवा करत आहे. पायनियर सेवेमुळे मला मनानं तरुण राहण्यास मदत मिळते आणि एक उद्देशपूर्ण जीवन जगण्याचं समाधान अनुभवता येतं. मी पहिल्यांदा एल साल्वाडॉरमध्ये गेले होते, तेव्हा तिथं प्रचार कार्य नुकतंच सुरू झालं होतं. सैतानानं सतत विरोध करूनही आज त्या देशात ३९,००० पेक्षा जास्त प्रचारक आहेत. हे पाहून माझा विश्वास खरंच खूप दृढ झाला आहे. यहोवाच्या लोकांच्या कार्याला त्याच्या पवित्र आत्म्याचा पाठिंबा आहे यात कोणतीही शंका नाही!

^ परि. 4 इयरबुक ऑफ जेहोवाज विट्नेसेस १९८१ यातील पृष्ठे ४५-४६ पाहा.

^ परि. 19 १९८१ ईयरबुक, पृष्ठे ४१-४२.

^ परि. 24 १९८१ ईयरबुक, पृष्ठे ६६-६७, ७४-७५.