व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “याजकराज्य” व्हाल

तुम्ही “याजकराज्य” व्हाल

“तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.” —निर्ग. १९:६.

१, २. स्त्रीच्या संततीचे कशापासून संरक्षण करणे गरजेचे होते, आणि का?

यहोवाचा उद्देश कशा प्रकारे पूर्ण होईल हे समजून घेण्यासाठी बायबलमध्ये देण्यात आलेल्या पहिल्या भविष्यवाणीचा अर्थ समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. एदेन बागेतील अभिवचन देताना यहोवाने म्हटले: “तू [सैतान] व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन.” हे वैर किंवा शत्रुता किती तीव्र स्वरूपाची असेल? यहोवाने सांगितले, “ती [स्त्रीची संतती] तुझे [सैतानाचे] डोके फोडेल, व तू तिची टाच फोडशील.” (उत्प. ३:१५) सैतान आणि स्त्री यांच्यात अतिशय तीव्र स्वरूपाचे वैर असेल आणि त्यामुळे सैतान सतत स्त्रीच्या संततीचा सर्वनाश करण्यासाठी प्रयत्न करत राहील असे या भविष्यवाणीतून दिसून आले.

म्हणूनच, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या संदर्भात प्रार्थना करताना एका स्तोत्राच्या लेखकाने देवाला असे म्हटले: “पाहा, तुझे शत्रू दंगल करत आहेत; तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढले आहे. ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करतात; तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करतात. ते म्हणतात, चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.” (स्तो. ८३:२-४) ज्या वंशातून स्त्रीची संतती उत्पन्न होणार होती त्या वंशाचा सर्वनाश होऊ नये किंवा तो दूषित होऊ नये म्हणून त्याचे संरक्षण करणे गरजेचे होते. याच उद्देशासाठी यहोवाने आणखी काही करार केले. पृथ्वीबद्दल व मानवांबद्दल असलेला देवाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल याची खात्री या करारांद्वारे देण्यात आली.

 संततीचे संरक्षण करणारा करार

३, ४. (क) नियमशास्त्राचा करार केव्हा अंमलात आला, आणि इस्राएल राष्ट्राने काय करण्याचे वचन दिले? (ख) इस्राएल राष्ट्राला देण्यात आलेल्या नियमांचा काय उद्देश होता?

अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या वंशजांची संख्या वाढत जाऊन लाखोंच्या घरात गेली. कालांतराने, यहोवाने त्यांच्यापासून एक राष्ट्र निर्माण केले. हेच प्राचीन काळातील इस्राएल राष्ट्र होते. मोशेद्वारे यहोवाने या राष्ट्राला नियमशास्त्र देऊन त्यांच्यासोबत एक करार केला. या कराराला नियमशास्त्राचा करार म्हणण्यात आले आहे. यहोवाने एका सबंध राष्ट्रासोबत असा करार करण्याची ही पहिलीच वेळ होती. इस्राएल राष्ट्राने यहोवाच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे वचन दिले. बायबलमध्ये याविषयी असे सांगण्यात आले आहे: “[मोशेने] कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले; ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. नंतर मोशेने रक्त [अर्पण केलेल्या बैलांचे] घेऊन लोकांवर टाकले, आणि म्हटले, पाहा, परमेश्वराने या सर्व वचनांप्रमाणे तुमच्याशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय.”—निर्ग. २४:३-८.

नियमशास्त्राचा करार सीनाय पर्वतावर ख्रिस्तपूर्व १५१३ या वर्षी अंमलात आला. या कराराद्वारे यहोवाने प्राचीन काळातील इस्राएल राष्ट्राला एका खास उद्देशासाठी निवडले. अशा रीतीने यहोवा ‘त्यांचा न्यायाधीश, त्यांचा नियमकर्ता, आणि त्यांचा राजा’ बनला. (यश. ३३:२२ पं.र.भा.) इस्राएली लोकांना यहोवाचे उपासक नसलेल्यांशी विवाह करण्यास आणि खोट्या उपासनेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती. अब्राहामाचा वंश दूषित होऊ नये या उद्देशाने हे नियम देण्यात आले होते.—निर्ग. २०:४-६; ३४:१२-१६.

५. (क) नियमशास्त्राच्या करारामुळे इस्राएल राष्ट्राला कोणती सुसंधी होती? (ख) देवाने इस्राएल राष्ट्राला का नाकारले?

नियमशास्त्राच्या करारानुसार इस्राएलमध्ये याजकांची तरतूद करण्यात आली होती. भविष्यात स्वर्गात याजक म्हणून सेवा करणाऱ्यांद्वारे मानवजातीला कशा प्रकारे सार्वकालिक फायदे मिळतील हे या तरतुदीतून दाखवण्यात आले. (इब्री ७:११; १०:१) नियमशास्त्राच्या करारामुळे इस्राएल राष्ट्राजवळ एक खास संधी व विशेषाधिकार होता. यहोवाने दिलेल्या नियमांचे पालन केल्यास त्यांना एक “याजकराज्य” बनण्याची संधी होती. (निर्गम १९:५, ६ वाचा.) पण, इस्राएल राष्ट्राने यहोवाच्या नियमांचे पालन केले नाही. अब्राहामाच्या संततीचा प्रमुख सदस्य असलेला मशीहा जेव्हा पृथ्वीवर आला, तेव्हा त्याचा स्वीकार करण्याऐवजी इस्राएल राष्ट्राने त्याला नाकारले. त्यामुळे, यहोवा देवानेही इस्राएल राष्ट्राला नाकारले.

इस्राएल राष्ट्र देवाला अविश्वासू राहिले, पण नियमशास्त्राचा करार अपयशी ठरला असा याचा अर्थ नाही (परिच्छेद ३-६ पाहा)

६. नियमशास्त्राची तरतूद कशासाठी करण्यात आली होती?

इस्राएल राष्ट्र यहोवाला विश्वासू न राहिल्यामुळे ते एक याजकराज्य बनू शकले नाही. पण नियमशास्त्राची व्यवस्था अपयशी ठरली असा याचा अर्थ होत नाही. नियमशास्त्राची तरतूद ही स्त्रीच्या संततीचे संरक्षण करण्यासाठी आणि मानवांना मशीहाची ओळख करून देण्यासाठी करण्यात आली होती. म्हणूनच, जेव्हा ख्रिस्त पृथ्वीवर आला आणि लोकांनी तो  मशीहा असल्याचे ओळखले तेव्हा नियमशास्त्राचा उद्देश पूर्ण झाला. याच कारणामुळे, बायबलमध्ये असे म्हटले आहे की “ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे.” (रोम. १०:४) पण, आता याजकराज्य कोणापासून बनवले जाणार होते? यासाठी, यहोवा देवाने आणखी एक करार करून एक नवीन राष्ट्र निर्माण केले.

एक नवीन राष्ट्र निर्माण झाले

७. यहोवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे काय सांगितले होते?

नियमशास्त्राचा करार रद्द करण्याच्या बऱ्याच काळाआधी यहोवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे असे सांगितले होते की तो इस्राएल राष्ट्रासोबत एक “नवा करार” करेल. (यिर्मया ३१:३१-३३ वाचा.) हा करार नियमशास्त्राच्या करारापेक्षा वेगळा असणार होता. कारण या नव्या करारानुसार पापांच्या क्षमेसाठी प्राण्यांचे बलिदान देण्याची गरज नव्हती. तर मग, पापांची क्षमा कशाच्या आधारावर दिली जाणार होती?

८, ९. (क) येशूच्या वाहिलेल्या रक्ताद्वारे कोणत्या गोष्टी शक्य झाल्या? (ख) नव्या करारात सामील असलेल्यांना कोणती सुसंधी मिळाली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

अनेक शतकांनंतर, इ.स. ३३ च्या निसान १४ रोजी येशूने प्रभूचे सांजभोजन हा विधी स्थापन केला. त्या प्रसंगी, द्राक्षारसाच्या प्याल्याविषयी येशू आपल्या ११ विश्वासू प्रेषितांना म्हणाला: “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे.” (लूक २२:२०) मत्तयाच्या वृत्तान्तानुसार येशू असे म्हणतो: “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे.”—मत्त. २६:२७, २८.

येशूचे वाहिलेले रक्त हे नव्या कराराचा आधार आहे. हे रक्त एकदाच वाहण्यात आले आणि त्यामुळे अनेकांना आपल्या पापांची कायमची क्षमा मिळणे शक्य झाले. नवा करार हा यहोवा आणि आत्मिक इस्राएल यांच्यामध्ये करण्यात आला असल्यामुळे, या करारात येशू सहभागी नाही. त्याच्यावर आदामाच्या पापाचा प्रभाव नसल्यामुळे त्याला क्षमेची गरज नाही. पण यहोवा आदामाचे वंशज असलेल्या मानवांच्या फायद्याकरता येशूच्या रक्ताचे मोल उपयोगात आणतो. तसेच, तो आपल्या पवित्र आत्म्याद्वारे काही विश्वासू मानवांना अभिषिक्त करून त्यांना “मुले” या नात्याने दत्तक घेतो. (रोमकर ८:१४-१७ वाचा.) अशा रीतीने, देवाच्या दृष्टिकोनातून ते येशूसारखेच निरपराध बनतात. हे अभिषिक्त जन “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस” बनतील आणि इस्राएल राष्ट्राने गमावलेली सुसंधी त्यांना प्राप्त होईल; अर्थात, एक “याजकराज्य” बनण्याची सुसंधी. ख्रिस्ताच्या या सहवारसांच्या संदर्भात प्रेषित पेत्राने म्हटले: “तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; यासाठी की, ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.” (१ पेत्र २:९) खरोखर, नवा करार किती महत्त्वाचा आहे! या कराराद्वारेच येशूच्या शिष्यांना अब्राहामाच्या संततीमधील दुसरे सदस्य बनणे शक्य झाले.

नवा करार केव्हा अंमलात आला?

१०. नवा करार केव्हा अंमलात आला, आणि त्यापूर्वी का नाही?

१० नवा करार केव्हा अंमलात आला? येशूने पृथ्वीवरील त्याच्या शेवटल्या रात्री या कराराचा उल्लेख केला तेव्हा हे घडले का? नाही. हा करार अंमलात येण्यासाठी येशूचे रक्त वाहिले जाणे आणि त्याचे मोल स्वर्गात यहोवा देवाला सादर केले जाणे गरजेचे होते. तसेच, जे “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस” असतील त्यांच्यावर पवित्र आत्मा ओतला जाणेदेखील गरजेचे होते. त्यामुळे, इ.स. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी येशूच्या विश्वासू शिष्यांना पवित्र आत्म्याने अभिषिक्त करण्यात आले, तेव्हापासून नवा करार अंमलात आला.

११. नव्या करारामुळे विदेश्यांनाही आत्मिक इस्राएलचे सदस्य बनणे कशा प्रकारे शक्य झाले, आणि त्यांची एकूण संख्या किती असणार होती?

११ यहोवाने यिर्मयाद्वारे इस्राएलसोबत एक नवा करार करण्याविषयी जेव्हा सांगितले तेव्हाच एका अर्थाने नियमशास्त्राचा करार “जुना” ठरवण्यात आला. पण तो लगेच संपुष्टात आला नाही. खरे पाहता, नवा करार अंमलात आल्यानंतरच नियमशास्त्राचा  करार संपुष्टात आला. (इब्री ८:१३) नव्या करारामुळे, यहुद्यांनाच नाही तर सुंता न झालेल्या विदेश्यांनाही आत्मिक इस्राएलचे सदस्य बनण्याची संधी मिळाली. कारण, त्यांची सुंता “लेखी नियमांप्रमाणे नव्हे तर आत्म्याने अंतःकरणाची केलेली सुंता” आहे. (रोम. २:२९, ईझी-टू-रीड व्हर्शन) देवाने त्यांच्यासोबत नवा करार करण्याद्वारे आपले नियम त्यांच्या “मनात” घातले आणि त्यांच्या “हृदयपटावर” लिहिले. (इब्री ८:१०) नव्या करारातील सदस्यांची एकूण संख्या १,४४,००० इतकी असणार होती आणि त्यांच्यापासून एक नवे राष्ट्र निर्माण होणार होते. हे नवीन राष्ट्र म्हणजेच “देवाचे इस्राएल,” किंवा आत्मिक इस्राएल.—गलती. ६:१६; प्रकटी. १४:१, ४.

१२. नियमशास्त्राचा करार आणि नवा करार यांची कोणकोणत्या बाबतींत तुलना केली जाऊ शकते?

१२ नियमशास्त्राच्या कराराची आणि नव्या कराराची कशा प्रकारे तुलना करता येईल? नियमशास्त्राचा करार हा यहोवा आणि इस्राएल राष्ट्र यांच्यामध्ये करण्यात आला होता. तर, नवा करार हा यहोवा आणि आत्मिक इस्राएल यांच्यामध्ये करण्यात आला आहे. जुन्या कराराचा मध्यस्थ मोशे होता, तर नव्या कराराचा मध्यस्थ येशू आहे. नियमशास्त्राचा करार प्राण्यांच्या रक्ताद्वारे अंमलात आला, तर नवा करार हा येशूच्या वाहिलेल्या रक्ताद्वारे अंमलात आला. तसेच, नियमशास्त्राच्या करारात मोशे हा इस्राएल राष्ट्राचे नेतृत्व करत होता. तर, नव्या करारातील सदस्यांचे नेतृत्व मंडळीचे मस्तक, येशू ख्रिस्त करतो.—इफिस. १:२२.

१३, १४. (क) नव्या कराराचा मशीही राज्याशी काय संबंध आहे? (ख) आत्मिक इस्राएलच्या सदस्यांना ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करणे शक्य व्हावे म्हणून काय करण्यात आले?

१३ नव्या कराराचा मशीही राज्याशी काय संबंध आहे? या कराराद्वारे एक नवे राष्ट्र निर्माण झाले आणि त्या राष्ट्राच्या सदस्यांना मशीही राज्यात राजे व याजक म्हणून स्वर्गात सेवा करण्याचा विशेषाधिकार होता. या राष्ट्रातील सदस्य अब्राहामाच्या संततीतील दुसरे सदस्य आहेत. (गलती. ३:२९) अशा रीतीने, अब्राहामाशी केलेल्या करारात देण्यात आलेली अभिवचने नक्कीच पूर्ण होतील याची खात्री नव्या करारामुळे मिळते.

१४ नव्या करारामुळे आत्मिक इस्राएल हे राष्ट्र निर्माण झाले आणि या राष्ट्राच्या सदस्यांना नव्या करारामुळेच “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस” होणे शक्य झाले. पण अभिषिक्त जनांना येशूसोबत राजे व याजक या नात्याने राज्य करणे कायदेशीर रीत्या शक्य व्हावे म्हणून आणखी एक करार करण्यात आला.

ख्रिस्तासोबत इतर जणही राज्य करतील याची खात्री देणारा करार

१५. येशूने आपल्या विश्वासू प्रेषितांसोबत कोणता वैयक्तिक करार केला?

१५ प्रभूच्या सांजभोजनाचा विधी स्थापन केल्यानंतर येशूने त्याच्या विश्वासू शिष्यांसोबत एक करार केला. या कराराला सहसा राज्याचा करार म्हटले जाते. (लूक २२:२८-३० वाचा.) हा करार आपण चर्चा केलेल्या इतर करारांपेक्षा वेगळा आहे. इतर करार हे यहोवा आणि एखादी व्यक्ती किंवा राष्ट्र यांच्यामध्ये करण्यात आले होते. पण, राज्याचा करार हा येशू व त्याचे अभिषिक्त अनुयायी यांच्यामध्ये करण्यात आलेला वैयक्तिक करार आहे. “जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले [“माझ्यासोबत करार केला,” NW]” असे म्हणताना कदाचित येशू मलकीसदेकासारखा याजक होण्याविषयी यहोवाने त्याच्यासोबत केलेल्या कराराबद्दल बोलत असावा.—इब्री ५:५, ६.

१६. राज्याच्या करारामुळे अभिषिक्त ख्रिश्चनांना कोणता विशेषाधिकार मिळतो?

१६ येशूचे ११ विश्वासू प्रेषित त्याच्या परीक्षांमध्ये त्याच्याबरोबर टिकून राहिले. येशूने त्यांच्यासोबत राज्याचा करार करण्याद्वारे त्यांना असे आश्वासन दिले, की ते त्याच्यासोबत स्वर्गात राजासनांवर बसून राज्य करतील आणि याजक म्हणून सेवा करतील. पण, हा विशेषाधिकार फक्त त्या ११ प्रेषितांनाच मिळणार नव्हता. येशूने प्रेषित योहानाला एका दृष्टान्तात दर्शन देऊन त्याला म्हटले: “मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.” (प्रकटी. ३:२१) त्याअर्थी, राज्याचा करार १,४४,००० अभिषिक्त  जनांसोबत केलेला करार आहे. (प्रकटी. ५:९, १०; ७:४) या कराराद्वारे खात्री देण्यात आली की अभिषिक्त जन येशूसोबत स्वर्गात राज्य करतील. या अभिषिक्त जनांची तुलना एका राजाशी विवाह करण्यासाठी निवडलेल्या वधूशी करता येईल. राजाशी विवाह झाल्यानंतर सहसा तीसुद्धा त्याच्यासोबत राज्य करू लागते. बायबलमध्ये अभिषिक्त ख्रिश्चनांना ख्रिस्ताची ‘नवरी,’ तसेच ख्रिस्ताची वधू होण्याकरता निवडलेली “शुद्ध कुमारी” असे म्हणण्यात आले आहे.—प्रकटी. १९:७, ८; २१:९; २ करिंथ. ११:२.

देवाच्या राज्यावर पक्का विश्वास बाळगा

१७, १८. (क) आपण चर्चा केलेल्या, राज्याशी संबंधित सहा करारांबद्दल थोडक्यात सांगा. (ख) आपण देवाच्या राज्यावर पक्का विश्वास का बाळगू शकतो?

१७ या दोन लेखांत आपण चर्चा केलेल्या सर्व करारांतून मशीही राज्यासंबंधी एक किंवा अनेक पैलू स्पष्ट होतात. (“देव त्याचा उद्देश कशा प्रकारे पूर्ण करेल?” या शीर्षकाचा तक्ता पाहा.) यावरून हेच दिसून येते, की यहोवाने मशीही राज्यासंबंधी प्रत्येक पैलूची कायदेशीर हमी दिली आहे. त्यामुळे, मशीही राज्याद्वारे यहोवा पृथ्वीसाठी व मानवांसाठी असलेला त्याचा मूळ उद्देश पूर्ण करेल यावर आपण अगदी पक्का विश्वास बाळगू शकतो.—प्रकटी. ११:१५.

मशीही राज्याद्वारे यहोवा पृथ्वीसाठी असलेला त्याचा उद्देश पूर्ण करेल (परिच्छेद १५-१८ पाहा)

१८ मशीही राज्याद्वारे मानवांना सदासर्वकाळचे आशीर्वाद मिळतील यात कोणतीही शंका नाही. तेव्हा, आपण पूर्ण विश्वासाने लोकांना सांगू शकतो की देवाचे राज्य हाच मानवांच्या सर्व समस्यांवरील एकमात्र आणि कायमचा उपाय आहे. चला तर मग, हे सत्य आवेशाने सर्वांना सांगू या!—मत्त. २४:१४.