त्यांना ‘मार्ग ठाऊक होता’
यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य असलेले बंधू गाय हॉलिस पिअर्स यांचे पृथ्वीवरील जीवन १८ मार्च २०१४ रोजी संपुष्टात आले. अशा रितीने वयाच्या ७९ वर्षी, ख्रिस्ताच्या पुनरुत्थान झालेल्या बांधवांपैकी एक असल्याची त्यांची आशा पूर्ण झाली.—इब्री २:१०-१२; १ पेत्र ३:१८.
बंधू गाय पिअर्स यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९३४ रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ऑबर्नमध्ये झाला आणि १९५५ मध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला. त्यांनी १९७७ मध्ये पेनी यांच्याशी विवाह केला आणि दोघांनी मिळून आपल्या मुलांचे संगोपन केले. बंधू पिअर्स यांना मुले असल्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय मायाळू होता. १९८२ साली ते त्यांच्या पत्नीसोबत पायनियर सेवा करत होते; तसेच त्यांनी अमेरिकेत १९८६ सालापासून ११ वर्षे विभागीय पर्यवेक्षक या नात्याने सेवा केली.
गाय आणि पेनी पिअर्स यांनी अमेरिकेतील बेथेलगृहामध्ये १९९७ साली सेवा सुरू केली. बंधू पिअर्स यांनी सेवा समितीमध्ये काम केले; आणि १९९८ साली त्यांना नियमन मंडळाच्या सभासद समितीचा सहायक म्हणून नेमण्यात आले. वॉचटावर बायबल अॅन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्वेनियातील, २ ऑक्टोबर १९९९ रोजी झालेल्या वार्षिक सभेत बंधू गाय पिअर्स हे नियमन मंडळाचे सदस्य बनल्याची घोषणा करण्यात आली. अलीकडच्या वर्षांत त्यांनी सभासद, लेखन, प्रकाशन आणि सूत्रसंचालक या समित्यांमध्ये काम केले.
बंधू गाय पिअर्स यांचा हसरा चेहरा आणि विनोदी वृत्ती यांमुळे विविध पार्श्वभूमींचे आणि संस्कृतींचे लोक सहजपणे त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. तसेच, त्यांचे प्रेम, नम्रता, आणि नीतिमान स्तर व तत्त्वे यांबद्दल असणारा त्यांचा आदर आणि यहोवावर असणारा भक्कम विश्वास या विशिष्ट गुणांमुळे ते सर्वांचे आवडते होते. गाय पिअर्स यांचे असे म्हणणे होते की, एकवेळ सूर्य उगवणार नाही पण यहोवाची अभिवचने मात्र नक्की पूर्ण होतील आणि हेच सत्य त्यांना संपूर्ण जगाला सांगायचे होते.
बंधू पिअर्स यांनी यहोवाच्या सेवेत खूप परिश्रम घेतले; पहाटे लवकर उठून रात्री उशिरापर्यंत ते काम करायचे. ख्रिस्ती बंधुभगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सबंध जगभरात प्रवास केला. बंधू पिअर्स अतिशय व्यस्त असायचे; तरीपण, ज्यांना त्यांच्या सहवासाची, सल्ल्याची व मार्गदर्शनाची गरज होती अशा बेथेल सदस्यांसाठी व इतर बांधवांसाठी ते नेहमी वेळ काढायचे. आज अनेक वर्षे उलटल्यानंतरही बंधुभगिनींना त्यांनी दाखवलेल्या पाहुणचाराची, मैत्रिपूर्ण सहवासाची आणि त्यांनी दिलेल्या बायबल आधारित मार्गदर्शनाची आठवण येते.
आपले बंधू व प्रिय मित्र गाय पिअर्स यांच्यामागे त्यांची पत्नी, सहा मुले, नातवंडे आणि पतवंडेही आहेत. तसेच, ज्यांना आध्यात्मिक अर्थाने त्यांची मुले म्हणता येईल असेही अनेक जण आहेत. ब्रुकलिन बेथेलमध्ये नियमन मंडळाचे सदस्य असणारे बंधू मार्क सॅन्डर्सन यांनी, बंधू पिअर्स यांच्या स्मरणार्थ, २२ मार्च २०१४ रोजी भाषण दिले. भाषणादरम्यान, ते बंधू पिअर्स यांच्या स्वर्गीय आशेबद्दल बोलले आणि त्यांनी बायबलमधील येशूचे पुढील शब्द वाचले: “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; . . . मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे.”—योहा. १४:२-४.
बंधू पिअर्स यांची आपल्याला नक्कीच आठवण येत राहील. पण, त्यांना त्यांच्या कायमच्या निवासस्थानाचा ‘मार्ग ठाऊक होता’ हे जाणून आपल्याला आनंद होतो.