व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला जे मिळाले आहे त्याची तुम्ही कदर करता का?

तुम्हाला जे मिळाले आहे त्याची तुम्ही कदर करता का?

“आपल्याला . . . देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे; यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.”—१ करिंथ. २:१२.

१. जवळ असलेल्या गोष्टींबद्दल अनेकांना काय वाटते?

“एखादी गोष्ट गमावल्यावरच तिची किंमत कळते.” असे तुम्ही बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकले असेल. तुम्हालाही असेच वाटते का? लहानपणापासून ज्या गोष्टी मिळतात त्यांची सहसा लोकांना कदर नसते. उदाहरणार्थ, श्रीमंत असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला लहानपणापासूनच सगळ्या सुखसोयी मिळालेल्या असतील. त्यामुळे, या गोष्टींचे त्या व्यक्तीला कदाचित काहीच विशेष वाटत नसेल. अशा व्यक्तीला जीवनात पुरेसा अनुभव नसल्यामुळे, कोणत्या गोष्टी खरोखर मौल्यवान आहेत याची तिला जाणीव नसते.

२, ३. (क) यहोवाच्या तरुण साक्षीदारांनी कशा प्रकारे विचार करण्याचे टाळले पाहिजे? (ख) आपल्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टींची कदर करायला कशामुळे मदत मिळेल?

तरुणांनो, तुम्हाला जीवनात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात? जगातले बहुतेक तरुण सहसा चांगल्या पगाराची नोकरी, सर्व सुखसोयी असलेले घर तसेच, बाजारात आलेले सगळ्यात नवीन मोबाईल किंवा कंप्युटर याच गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. पण जर आपल्याला याच गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील, तर मग आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींची कमी असेल. आणि या म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने मौल्यवान असलेल्या गोष्टी. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे आज जगातले लाखो तरुण या मौल्यवान गोष्टी मिळवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. तुम्ही लहानपणापासून सत्यात वाढला आहात का? तर मग, तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून ज्या मौल्यवान आध्यात्मिक गोष्टी मिळाल्या आहेत, म्हणजेच जो आध्यात्मिक वारसा मिळाला आहे त्याची नेहमी कदर करा. कारण, या आध्यात्मिक गोष्टींची कदर न केल्यास तुम्हाला पुढच्या आयुष्यात बऱ्याच दुःखद परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

पण हे दुःखद परिणाम टाळणे तुमच्या हातात आहे. तुम्हाला हे कसे करता येईल हे जाणून घेण्यासाठी आता आपण बायबलमधल्या काही उदाहरणांवर विचार करू या. आपल्याजवळ असलेल्या मौल्यवान आध्यात्मिक गोष्टींची कदर करणे का महत्त्वाचे आहे, हे या उदाहरणांवरून आपल्याला कळून येईल. आणि ही उदाहरणे फक्त तरुणांनाच नाही, तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान आध्यात्मिक गोष्टींची कदर करायला मदत करू शकतात.

त्यांनी कदर केली नाही

४. पहिले शमुवेल ८:१-५ यातून आपल्याला शमुवेलाच्या मुलांबद्दल काय समजते?

बायबलमध्ये आपल्याला अशा काही व्यक्तींची उदाहरणे सापडतात, ज्यांना आपल्या पालकांकडून एक अतिशय मौल्यवान आध्यात्मिक वारसा मिळाला होता; पण त्यांनी त्याची कदर केली नाही. उदाहरणार्थ, शमुवेल संदेष्ट्याची मुले. शमुवेलाने अगदी लहानपणापासून यहोवाची सेवा केली होती आणि तो देवाचा अतिशय विश्वासू सेवक होता. (१ शमु. १२:१-५) त्यामुळे, त्याने योएल आणि अबीया या त्याच्या मुलांसमोर फार चांगले उदाहरण ठेवले होते; असे उदाहरण, ज्याचे त्यांनी पालन करायला हवे होते. पण, त्यांना आपल्या वडिलांच्या उत्तम उदाहरणाची कदर नव्हती, आणि ते दोघेही वाईट चालीचे निघाले. आपल्या वडिलांसारखे वागण्याऐवजी ते अन्यायीपणे वागले असे बायबल आपल्याला सांगते.—१ शमुवेल ८:१-५ वाचा.

५, ६. योशीयाच्या मुलांना आणि नातवाला कोणत्या परिणामांना तोंड द्यावे लागले?

योशीया राजाच्या मुलांचाही विचार करा. यहोवाच्या उपासनेच्या बाबतीत योशीयाने एक अतिशय उत्तम उदाहरण मांडले होते. मंदिराच्या बांधकामाच्या वेळी देवाचे नियमशास्त्र सापडले आणि ते योशीयाला वाचून दाखवण्यात आले, तेव्हा त्याने यहोवाच्या आज्ञांप्रमाणे कार्य करण्यासाठी खूपच आवेशाने पावले उचलली. त्याने इस्राएलातून मूर्तिपूजा आणि जादूटोणा यांसारख्या गोष्टी पूर्णपणे काढून टाकल्या आणि लोकांना यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे प्रोत्साहन दिले. (२ राजे २२:८; २३:२, ३, १२-१५, २४, २५) खरोखर, योशीयाच्या मुलांना त्यांच्या वडिलांकडून किती मौल्यवान आध्यात्मिक वारसा मिळाला होता! योशीयाची तीन मुले आणि एक नातू नंतर राजे बनले. पण, त्यांच्यापैकी एकानेही त्यांना मिळालेल्या आध्यात्मिक वारशाची कदर केली नाही.

योशीयाच्या नंतर यहोआहाज हा त्याचा मुलगा राजा बनला. पण, “परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.” त्याने फक्त तीनच महिने राज्य केल्यानंतर, इजिप्तच्या एका फारोने त्याला कैद करून नेले आणि बंदिवासात असतानाच यहोआहाज मरण पावला. (२ राजे २३:३१-३४) त्यानंतर, त्याचा भाऊ यहोयाकीम राजा बनला आणि त्याने ११ वर्षे राज्य केले. पण, त्यालाही आपल्या वडिलांच्या उत्तम उदाहरणाची कदर नव्हती. यहोयाकीम याने केलेल्या वाईट कामांमुळे यिर्मयाने त्याच्याविषयी अशी भविष्यवाणी केली: “गाढव पुरून टाकतात तसा तो पुरला जाईल.” (यिर्म. २२:१७-१९, पं.र.भा.) योशीयाचा आणखी एक मुलगा, सिदकीया आणि नातू यहोयाखीन हे दोघेही काही वेगळे नव्हते. त्यांनीही योशीयाच्या विश्वासू उदाहरणाचे अनुकरण केले नाही.—२ राजे २४:८, ९, १८, १९.

७, ८. (क) शलमोनाने त्याला मिळालेल्या आध्यात्मिक वारशाची कदर नसल्याचे कसे दाखवले? (ख) आपण पाहिलेल्या वाईट उदाहरणांवरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो?

शलमोन राजासमोरही त्याच्या पित्याचे, म्हणजेच दाविदाचे उत्तम उदाहरण होते. सुरुवातीला शलमोनाने आपल्याला मिळालेल्या या आध्यात्मिक वारशाची कदर असल्याचे दाखवले. पण काही काळाने तो चांगल्या मार्गापासून भरकटला. “शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले; त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे.” (१ राजे ११:४) यामुळे, शलमोन यहोवाच्या नजरेतून उतरला.

खरोखर, या सर्वांनाच किती उत्तम आध्यात्मिक वारसा मिळाला होता! यहोवाची सेवा करण्याची फार चांगली संधी त्यांच्यासमोर होती. दुःखाची गोष्ट म्हणजे, त्यांनी ही संधी वाया घालवली. पण सर्वच युवकांनी असे केले नाही. आता आपण अशा काही चांगल्या उदाहरणांवर विचार करू, ज्यांचे तुम्ही अनुकरण करू शकता.

त्यांनी आपल्या वारशाची कदर केली

९. नोहाच्या मुलांनी कशा प्रकारे उत्तम उदाहरण मांडले? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

नोहाच्या मुलांचे फार चांगले उदाहरण आपल्यासमोर आहे. यहोवाने त्यांच्या पित्याला एक तारू बांधण्याची आणि आपल्या कुटुंबाला त्यात नेण्याची आज्ञा दिली होती. यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे नोहाच्या मुलांनी ओळखले होते. यहोवाच्या इच्छेनुसार वागण्यात त्यांनी नक्कीच आपल्या पित्याला पूर्ण सहकार्य दिले असेल. त्यांनी नोहाला तारू बांधण्यास मदत केली आणि मग त्यांचे पूर्ण कुटुंब तारवात गेले. (उत्प. ७:१, ७) त्यांनी प्राण्यांनाही तारवात नेले. असे त्यांनी का केले? उत्पत्ति ७:३ (सुबोधभाषांतर) या वचनानुसार प्राण्यांच्या “जाती जिवंत राहाव्यात म्हणून” यहोवाने त्यांना असे करण्यास सांगितले होते. अशा प्रकारे, मानवांचा आणि प्राण्यांचाही बचाव झाला. नोहाच्या मुलांनी त्यांच्या आध्यात्मिक वारशाची कदर केल्यामुळे त्यांना किती मोठा सुहक्क मिळाला! मानवजातीचा बचाव करण्यास आणि पृथ्वीवर खरी उपासना पुन्हा सुरू करण्यास ते हातभार लावू शकले.—उत्प. ८:२०; ९:१८, १९.

१०. बॅबिलोनला गेलेल्या चार इब्री तरुणांनी आपल्या आध्यात्मिक वारशाबद्दल कदर असल्याचे कसे दाखवले?

१० याच्या शेकडो वर्षांनंतर, चार इब्री तरुणांनीदेखील एक चांगले उदाहरण मांडले. हनन्या, मीशाएल, अजऱ्या आणि दानीएल या चौघांना इ.स.पू. ६१७ या वर्षी बॅबिलोनला नेण्यात आले होते. ते चौघेही देखणे व बुद्धिमान तरुण होते. खरेतर, ते बॅबिलोनी लोकांचे अनुकरण करून त्यांच्या चालीरितींनुसार वागू शकले असते. पण त्यांनी असे केले नाही. त्यांचा आध्यात्मिक वारसा ते विसरले नाहीत. देवाच्या उपासनेसंबंधी लहानपणी जे शिकवण्यात आले होते त्यानुसार वागत राहिल्यामुळे यहोवाने त्यांना अनेक आशीर्वाद दिले.—दानीएल १:८, ११-१५, २० वाचा.

११. येशूच्या आध्यात्मिक वारशामुळे इतरांना कोणता फायदा झाला?

११ चांगल्या उदाहरणांबद्दल बोलताना देवाचा पुत्र येशू याचे उदाहरण विसरून कसे चालेल? येशूला त्याच्या पित्याकडून जे काही शिकायला मिळाले होते त्याची त्याने मनापासून कदर केली. म्हणूनच त्याने म्हटले: “मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो.” (योहा. ८:२८) शिवाय, त्याला जे शिकायला मिळाले होते त्याचा फायदा इतरांनाही व्हावा अशी त्याची इच्छा होती. तो लोकांना म्हणाला: “मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.” (लूक ४:१८, ४३) सहसा जगातल्या लोकांना आध्यात्मिक गोष्टींची काहीच किंमत नसते, त्यामुळे येशूने त्याच्या शिष्यांना या जगापासून वेगळे राहण्यास सांगितले.—योहा. १५:१९.

तुम्हाला जे मिळाले आहे त्याची कदर करा

१२. (क) तीमथ्याच्या बाबतीत जे म्हणण्यात आले ते आज बऱ्याच तरुणांच्या बाबतीतही का म्हणता येईल? (ख) यहोवाच्या तरुण उपासकांनी स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?

१२ आपण आताच ज्यांच्याविषयी चर्चा केली, त्या तरुणांप्रमाणेच कदाचित तुमचे आईवडीलही यहोवाचे उपासक असतील. असे असल्यास, बायबलमध्ये तीमथ्याबद्दल जे म्हणण्यात आले आहे तेच तुमच्या बाबतीतही म्हणता येईल. (२ तीमथ्य ३:१४-१७ वाचा.) खऱ्या देवाबद्दल आणि त्याची उपासना कशी करावी याबद्दल तुम्ही आपल्या आईवडिलांकडून ‘शिकला’ आहात. कदाचित तुम्ही अगदी लहान असतानाच त्यांनी तुम्हाला या गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली असेल. आणि यामुळेच तुम्हाला “ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे . . . तारणासाठी ज्ञानी” होण्यास आणि देवाच्या सेवेसाठी “सज्ज” होण्यास मदत मिळाली. पण तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून जे मिळाले आहे त्याची तुम्हाला खरोखरच मनापासून कदर आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता तुम्ही पुढील प्रश्नांच्या साहाय्याने स्वतःचे परीक्षण करू शकता: ‘पूर्वी होऊन गेलेल्या सर्व विश्वासू साक्षीदारांविषयी माझ्या भावना काय आहेत? मीसुद्धा यहोवाचा साक्षीदार आहे याचा मला अभिमान वाटतो का? देव ज्यांना आपले मित्र म्हणतो त्या अगदी थोड्या लोकांपैकी एक असण्याविषयी मला कसं वाटतं? यहोवाच्या उपासकांपैकी असणं ही किती सन्मानाची आणि विशेष गोष्ट आहे, याची मला जाणीव आहे का?’

पूर्वी होऊन गेलेल्या विश्वासू सेवकांप्रमाणेच यहोवाचा एक साक्षीदार असण्याबद्दल तुम्हाला कसे वाटते? (परिच्छेद ९, १०, १२ पाहा)

१३, १४. काही तरुणांना कोणता मोह होतो, आणि या मोहाला बळी पडणे अयोग्य का आहे? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१३ यहोवाच्या संघटनेतील आध्यात्मिक नंदनवनाच्या तुलनेत सैतानाचे जग किती घाणेरडे व किळसवाणे आहे याची साक्षीदार कुटुंबात वाढलेल्या काही तरुणांना जाणीव नसते. त्यांच्यापैकी काहींना तर सैतानाच्या जगातले जीवन कसे असेल हे अनुभवून पाहण्याचा मोहदेखील होतो. पण, अपघात किती वेदनादायी आणि जीवघेणा असू शकतो हे पाहण्यासाठी तुम्ही भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या कारसमोर उडी घ्याल का? नक्कीच नाही! त्याच प्रकारे, सैतानाच्या जगातल्या वाईट गोष्टींमुळे किती दुःखदायक परिणाम होऊ शकतात हे पाहण्यासाठी आपण स्वतः त्यागोष्टी करून पाहण्याची गरज नाही.—१ पेत्र ४:४.

१४ आशियात राहणारा जेनेर नावाचा एक बांधव, साक्षीदार कुटुंबातच लहानाचा मोठा झाला होता. तो १२ वर्षांचा असताना त्याचा बाप्तिस्मा झाला. पण, काही वर्षांनी तो जगातल्या गोष्टींकडे आकर्षित होऊ लागला. तो सांगतो: “मला बाहेरच्या जगातलं ‘स्वातंत्र्य’ अनुभवायचं होतं.” त्यामुळे, एकीकडे यहोवाची उपासना तर दुसरीकडे जगातल्या वाईट गोष्टी करणे असे ढोंगीपणाचे जीवन तो जगू लागला. १५ वर्षांचा होईपर्यंत तर तो आपल्या जगातल्या मित्रांसारखाच बनला होता. तो दारू पिऊ लागला आणि शिव्या देऊन बोलू लागला. मित्रांसोबत हिंसक कंप्युटर गेम खेळून तो रात्री-अपरात्री घरी परतायचा. पण जगातल्या आकर्षक वाटणाऱ्या गोष्टींमुळे खरा आनंद मिळत नाही याची हळूहळू त्याला जाणीव होऊ लागली. उलट, तसल्या जीवनात काहीच अर्थ नाही असे त्याला वाटू लागले. आता तो ख्रिस्ती मंडळीत परत आला आहे. तो म्हणतो: “आजही माझ्यावर अनेक दबाव आहेत, पण यहोवाकडून मिळणाऱ्या असंख्य आशीर्वादांपुढे ते काहीच नाहीत.”

१५. ज्यांचे आईवडील सत्यात नाहीत अशा तरुणांनीही कशाबद्दल विचार केला पाहिजे?

१५ तुमचे आईवडील सत्यात नसले, तरीही तुम्हाला यहोवाची ओळख झाली आहे आणि आज तुम्ही त्याची सेवा करता हा किती मोठा विशेषाधिकार आहे याचा विचार करा. जगातल्या लाखो लोकांपैकी यहोवाने प्रेमळपणे तुम्हाला त्याच्याविषयी शिकून घेण्याची संधी दिली. हा खरोखरच किती मोठा आशीर्वाद आहे! (योहा. ६:४४, ४५) सत्य आपल्याला आईवडिलांकडून मिळालेले असो किंवा इतर मार्गांनी, ते माहीत असणे हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. (१ करिंथकर २:१२ वाचा.) जेनेर म्हणतो: “मी असा कोण आहे, की संपूर्ण विश्वाच्या मालकानं, यहोवानं मला ओळखावं? नुसत्या विचारानंही अंगावर काटा येतो.” (स्तो. ८:४) एक ख्रिस्ती बहीण म्हणते: “आपले शिक्षक आपल्याला ओळखतात याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना अभिमान वाटतो. पण, महान शिक्षक यहोवा आपल्याला ओळखतो यापेक्षा मोठ्या अभिमानाची गोष्ट कोणती असू शकते?”

तुम्ही काय करणार?

१६. आज यहोवाच्या तरुण साक्षीदारांनी काय करणे शहाणपणाचे ठरेल?

१६ तुम्हाला मिळालेला आध्यात्मिक वारसा किती मौल्यवान आहे याचा विचार करा आणि यहोवाची सेवा करत राहण्याचा मनाशी निश्चय करा. आज जगातले बहुतेक तरुण लोक आपले जीवन वाया घालवत आहेत आणि सैतानाच्या जगासोबत नाशाकडे वाटचाल करत आहेत. (२ करिंथ. ४:३, ४) पण तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका. त्याऐवजी, आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्व विश्वासू सेवकांच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करा.

१७-१९. जगापासून वेगळे असणेच शहाणपणाचे का आहे?

१७ जगापासून वेगळे असणे नेहमीच सोपे असेल असे नाही. पण, थोडा विचार करून पाहिल्यास हाच शहाणपणाचा मार्ग आहे हे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, ऑलिंपिक खेळांत भाग घेणाऱ्या खेळाडूचा विचार करा. ऑलिंपिकपर्यंत पोचण्यासाठी नक्कीच त्याला आपल्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा वेगळे असावे लागले असेल. वेळ घालवणाऱ्या आणि लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी कदाचित त्याला टाळाव्या लागल्या असतील. पण, इतर तरुणांपेक्षा वेगळे असण्याचे त्याला काहीच वाटत नाही. कारण खेळाची चांगली प्रॅक्टिस करण्यासाठी व आपले लक्ष्य गाठण्यासाठी हे गरजेचे आहे याची त्याला जाणीव असते.

१८ जगातले लोक फक्त आजच्यापुरता विचार करतात. पण, भविष्यातल्या परिणामांचा विचार करून जर तुम्ही या जगात दिसणारी अनैतिकता आणि इतर वाईट गोष्टी टाळल्या, तर तुम्हाला ‘खरे जीवन बळकट धरण्यास’ मदत मिळेल. (१ तीम. ६:१९) याआधी जिचा उल्लेख करण्यात आला होता, ती बहीण म्हणते: “आपल्या विश्वासांच्या विरोधात जाऊन चुकीचं काम करायला जेव्हा तुम्ही नकार देता, तेव्हा मनात एकप्रकारचं समाधान जाणवतं. सैतानाच्या जगानं कितीही दबाव आणला तरी योग्य ते करण्याची तुमच्याजवळ ताकद आहे हे तुम्ही दाखवून देता. पण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यहोवा देव तुमच्याकडे अभिमानानं पाहत आहे आणि तुम्हाला शाबासकी देत आहे अशी जाणीव तुम्हाला होते. आणि त्या क्षणी, इतरांपेक्षा वेगळं वागल्याबद्दल तुम्हालाही स्वतःचा अभिमान वाटतो!”

१९ आज आपण कोणत्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो केवळ याचाच विचार करून आपले जीवन वाया घालवू नका. (उप. ९:२, १०) कारण, जीवनाचा उद्देश काय आहे हे आपल्याला माहीत आहे. तसेच, आपण फक्त काही वर्षे नाही, तर सर्वकाळ जगू शकतो हेही आपल्याला माहीत आहे. तर मग, जगातल्या लोकांसारखे वागण्याऐवजी, योग्य निर्णय घेऊन आपले जीवन खरोखर अर्थपूर्ण बनवणेच जास्त शहाणपणाचे ठरणार नाही का?—इफिस. ४:१७; मला. ३:१८.

२०, २१. योग्य निर्णय घेतल्यास आपले भविष्य कसे असेल? पण यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

२० जर आपण योग्य निर्णय घेतले, तर सध्याचे जीवन समाधानी होण्यासोबतच आपल्याला देवाच्या नव्या जगात सार्वकालिक जीवनदेखील मिळेल. त्या वेळी यहोवा आपल्याला जे असंख्य आशीर्वाद देणार आहे त्यांची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. (मत्त. ५:५; १९:२९; २५:३४) अर्थात, यहोवा आपल्याला काहीही न करता हे आशीर्वाद देणार नाही. आपण त्याच्या आज्ञा पाळाव्यात अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (१ योहान ५:३, ४ वाचा.) पण, कितीही प्रयत्न करावे लागले तरी ते वाया जाणार नाहीत हे लक्षात असू द्या!

२१ खरेतर, आजही आपल्याला देवाकडून कितीतरी मौल्यवान आशीर्वाद मिळाले आहेत! त्याने आपल्याला त्याच्या वचनाचे अचूक ज्ञान दिले आहे. तसेच, त्याच्याबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल स्पष्टपणे समजून घ्यायला त्याने आपल्याला मदत केली आहे. त्याच्या नावाने ओळखले जाण्याचा आणि त्याचे साक्षीदार असण्याचा विशेष हक्क आपल्याला मिळाला आहे. तसेच, यहोवा कधीही त्याच्या लोकांना सोडणार नाही असे वचन त्याने दिले आहे. (स्तो. ११८:७) तेव्हा, तरुण असो किंवा वयस्क, आपण सर्व जण योग्य निर्णय घेण्याद्वारे आपल्याला मिळालेल्या आध्यात्मिक वारशाची कदर असल्याचे दाखवू या. तसेच, यहोवा देवाचे “युगानुयुग गौरव” करण्याची आपली इच्छा आहे हेही आपण दाखवून देऊ या.—रोम. ११:३३-३६; स्तो. ३३:१२.