व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“ऐका व समजून घ्या”

“ऐका व समजून घ्या”

“तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या.”—मार्क ७:१४.

१, २. अनेकांना येशूच्या शब्दांचा अर्थ का समजला नाही?

एक व्यक्ती तिच्याशी बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकू शकते. इतकेच नव्हे तर तिच्या आवाजातील भावनादेखील ती समजू शकते. पण, समजा समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थच तिला समजला नाही तर त्याचा काय उपयोग? (१ करिंथ. १४:९) त्याच प्रकारे, येशू जे बोलला ते हजारो लोकांनी ऐकले. येशू तर त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी बोलला. पण, त्याने जे शिकवले त्याचा अर्थ सर्वांनाच समजला नाही. याच कारणामुळे येशूने त्याचे ऐकणाऱ्यांना असे म्हटले: “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या.”—मार्क ७:१४.

अनेकांना येशूच्या शब्दांचा अर्थ का समजला नाही? कारण, त्यांच्या मनात आधीपासूनच काही चुकीचे विचार पक्के बसलेले होते आणि त्यांचा हेतूसुद्धा चुकीचा होता. अशा लोकांना येशूने म्हटले: “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे!” (मार्क ७:९) या लोकांनी येशूच्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही. त्यांना त्यांच्या प्रथा व त्यांचे मत बदलायचे नव्हते. ते आपल्या कानांनी येशूचे शब्द ऐकत तर होते, पण ते ग्रहण करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणाचे दरवाजे मात्र पूर्णपणे बंद होते! (मत्तय १३:१३-१५ वाचा.) तेव्हा, येशूच्या शिकवणींतून फायदा प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतःकरणाचे दरवाजे खुले आहेत की नाहीत, याची खात्री आपण कशी करू शकतो?

येशूच्या शिकवणींपासून फायदा मिळवा

३. येशूच्या शब्दांमागचा अर्थ त्याच्या शिष्यांना का समजला?

येशूच्या नम्र शिष्यांच्या उदाहरणाचे आपण अनुकरण केले पाहिजे. त्यांना उद्देशून येशूने असे म्हटले: “धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.” (मत्त. १३:१६) इतरांना येशूच्या शब्दांचा नेमका अर्थ समजत नव्हता, तरी त्याच्या शिष्यांना मात्र तो समजला. याचे काय कारण होते? पहिले कारण म्हणजे, त्यांनी प्रश्न विचारण्यास कोणताही संकोच बाळगला नाही आणि येशूच्या शब्दांमागील खरा अर्थ शोधून काढण्यास ते प्रयत्नशील होते. (मत्त. १३:३६; मार्क ७:१७) दुसरे कारण म्हणजे, ज्या शिकवणी त्यांनी आधीच स्वीकारल्या होत्या त्यांत नवीन शिकलेल्या गोष्टींची भर घालण्यास ते तयार होते. (मत्तय १३:११, १२ वाचा.) तिसरे कारण म्हणजे, ज्या गोष्टी त्यांनी ऐकल्या व समजून घेतल्या त्या स्वतःच्या जीवनात लागू करण्यास व इतरांना मदत करताना त्यांचा उपयोग करण्यास ते तयार होते.—मत्त. १३:५१, ५२.

४. येशूच्या दाखल्यांचा अर्थ समजण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी करणे गरजेचे आहे?

येशूने दिलेल्या दाखल्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या विश्वासू शिष्यांच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. यासाठी तीन गोष्टी करणे महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे, येशूने जे म्हटले त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्यावर मनन करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी आणि योग्य प्रश्न विचारण्यासाठी आपण वेळ काढायला तयार असले पाहिजे. असे केल्यास आपल्याला “ज्ञान” प्राप्त होते. (नीति. २:४, ५) त्यानंतर, जे ज्ञान आपल्याला मिळाले आहे ते आपल्या आधीच्या माहितीशी कशा प्रकारे जुळते ते आपण पाहिले पाहिजे. तसेच, त्यामुळे आपल्याला व्यक्तिगत रीत्या कसा फायदा होतो हे आपण समजून घेतले पाहिजे. असे केल्याने आपल्याला “समज” प्राप्त होते. (नीति. २:२, ३, NW) आणि सरतेशेवटी शिकलेल्या गोष्टींचा आपण उपयोग केला पाहिजे आणि जीवनात त्या लागू केल्या पाहिजेत. असे करण्याद्वारे आपण “बुद्धी” प्रदर्शित करतो.—नीति. २:६, ७, NW.

५. ज्ञान, समज आणि बुद्धी यांच्यातील फरक स्पष्ट करणारे एक उदाहरण सांगा.

ज्ञान, समज आणि बुद्धी यांच्यात काय फरक आहे? हे समजण्यासाठी पुढील उदाहरणाकडे लक्ष द्या: समजा तुम्ही रस्त्याच्या मधोमध उभे आहात आणि एक बस तुमच्या दिशेने येत आहे. सर्वात आधी ती बस असल्याचे तुम्ही ओळखता—हे ज्ञान आहे. त्यानंतर, तुम्ही जर तेथेच उभे राहिलात तर ती बस तुम्हाला धडक देईल याची तुम्हाला जाणीव होते—ही समज आहे! आणि हे समजल्यामुळे तुम्ही पटकन बाजूला सरकता—ही बुद्धी आहे! खरोखर सुबुद्धीने कार्य केल्याने आपले जीवन वाचू शकते. म्हणूनच, बायबल आपल्याला सुबुद्धीने कार्य करण्याचे प्रोत्साहन देते.—नीति. ३:२१, २२; १ तीम. ४:१६.

६. येशूच्या सात दाखल्यांचे परीक्षण करताना आपण कोणत्या चार प्रश्नांवर विचार करणार आहोत? (चौकट पाहा.)

येशूने वापरलेल्या सात दाखल्यांचे, या लेखात व पुढील लेखात आपण परीक्षण करणार आहोत. असे करताना आपण पुढील प्रश्नांवर चर्चा करू: या दाखल्याचा काय अर्थ होतो? (यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते.) येशूने हा दाखला का दिला? (यामुळे आपल्याला समज प्राप्त होते.) या माहितीचा आपण स्वतःकरता व इतरांना मदत करण्याकरता कसा उपयोग करू शकतो? (ही बुद्धी आहे.) आणि, यावरून येशू आणि यहोवा यांच्याबद्दल काय शिकायला मिळते?

मोहरीचा दाणा

७. मोहरीच्या दाण्याच्या दाखल्याचा काय अर्थ होतो?

मत्तय १३:३१, ३२ वाचा. येशूने मोहरीच्या दाण्याचा जो दाखला दिला त्याचा काय अर्थ होतो? मोहरीचा दाणा, राज्याच्या संदेशाला व ख्रिस्ती मंडळीला चित्रित करतो. ज्या प्रकारे मोहरीचा दाणा “सर्व दाण्यांमध्ये लहान आहे,” त्याच प्रकारे इ.स. ३३ साली ख्रिस्ती मंडळीची सुरुवातही अगदी लहान होती. पण, काही काळातच मंडळीत झपाट्याने वाढ झाली. ही वाढ अगदी अपेक्षेपलीकडे होती. (कलस्सै. १:२३) ख्रिस्ती मंडळीत झालेली ही वाढ खूप फायदेकारक ठरली असे म्हणता येईल. कारण, “आकाशातील पाखरे येऊन [झाडाच्या] फांद्यांत वस्ती” करतील असे येशूने म्हटले. हे लाक्षणिक पक्षी योग्य मनोवृत्ती असलेल्या अशा लोकांना चित्रित करतात ज्यांना ख्रिस्ती मंडळीत आध्यात्मिक रीत्या अन्न, छाया आणि निवारा लाभतो.—यहेज्केल १७:२३ पडताळून पाहा.

८. येशूने मोहरीच्या दाण्याचा दाखला का वापरला?

येशूने हा दाखला का वापरला? मोहरीच्या दाण्याच्या आश्चर्यकारक वाढीकडे लक्ष वेधून, येशूने देवाचे राज्य कशा प्रकारे वाढते, सुरक्षा देते आणि सर्व अडथळ्यांना पार करते हे स्पष्ट केले. १९१४ सालापासून ख्रिस्ती मंडळीत झालेली वाढ खरोखरच थक्क करणारी आहे! (यश. ६०:२२) या मंडळीच्या सदस्यांना आध्यात्मिक सुरक्षा लाभली आहे. (नीति. २:७; यश. ३२:१, २) तसेच, पुष्कळ विरोध होऊनही ख्रिस्ती मंडळीची वाढ आजवर कोणीही थांबवू शकले नाही.—यश. ५४:१७.

९. (क) मोहरीच्या दाण्याच्या दाखल्यावरून आपण काय शिकू शकतो? (ख) या दाखल्यावरून आपण यहोवा आणि येशू यांच्याबद्दल काय शिकू शकतो?

मोहरीच्या दाण्याच्या दाखल्यावरून आपण काय शिकू शकतो? कदाचित आपण अशा ठिकाणी राहत असू जेथे जास्त साक्षीदार नसतील किंवा जेथे जास्त वाढ होताना दिसत नसेल. पण, देवाचे राज्य सर्व अडथळ्यांवर मात करू शकते हे लक्षात ठेवल्यास आपल्याला धीर धरण्यास मदत मिळेल. उदाहरणार्थ, १९२६ साली बंधू एड्विन स्किनर भारतात आले, तेव्हा येथे फार कमी साक्षीदार होते. सुरुवातीला, खूप कमी प्रमाणात वाढ होत होती आणि येथे प्रचार करणे “कठीण” होते. पण, बंधू स्किनर प्रचार करत राहिले आणि राज्याच्या संदेशाने कशा प्रकारे मोठमोठ्या अडथळ्यांना पार केले हे त्यांनी पाहिले. आता भारतात ४०,००० पेक्षा जास्त प्रचारक आहेत आणि २०१३ साली १,०८,००० पेक्षा जास्त लोक स्मारकविधीला उपस्थित राहिले होते. आणखी एका अप्रतिम उदाहरणाकडे लक्ष द्या. बंधू स्किनर भारतात आले त्याच वर्षी झांबियामध्ये प्रचार कार्याची सुरुवात झाली होती. आता तेथे १,७०,००० पेक्षा जास्त प्रचारक आहेत आणि २०१३ साली ७,६३,९१५ लोक स्मारकविधीला उपस्थित राहिले होते. म्हणजेच, झांबियामधील प्रत्येक १८ व्यक्तींपैकी १ जण स्मारकविधीला उपस्थित राहिला. खरोखरच किती विलक्षण वाढ!

खमीर

१०. खमिराच्या दाखल्याचा काय अर्थ होतो?

१० मत्तय १३:३३ वाचा. खमिराच्या दाखल्याचा काय अर्थ होतो? हा दाखलासुद्धा राज्याच्या संदेशाला व त्यामुळे लोकांच्या जीवनात जो बदल घडून येतो त्याला चित्रित करतो. दाखल्यातील “सर्व पीठ” पृथ्वीवरील सगळ्या राष्ट्रांना सूचित करते. तसेच, पीठ फुगण्याची प्रक्रिया ही प्रचार कार्याद्वारे राज्याचा संदेश कसा पसरत आहे, याला चित्रित करते. मोहरीच्या दाण्याची वाढ ज्या प्रकारे स्पष्टपणे दिसून येते, त्या प्रकारे खमिरामुळे पीठ फुगल्याचे सुरुवातीला दिसत नाही. पण, कालांतराने ही वाढ स्पष्टपणे दिसून येते.

११. येशूने खमिराचा दाखला का दिला?

११ येशूने हा दाखला का वापरला? राज्याच्या संदेशात सर्वत्र पसरण्याचे आणि बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे हे येशूला दाखवायचे होते. राज्याचा संदेश “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पोचला आहे. (प्रे. कृत्ये १:८) या संदेशामुळे होणारे बदल नेहमीच दिसून येत नाहीत हे खरे आहे; काही बदल तर सुरुवातीला लक्षातही येत नाहीत. पण, बदल घडत आहेत. हे बदल फक्त साक्षीदारांच्या संख्येतच नाही, तर राज्याचा प्रभावशाली संदेश स्वीकारणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वातही घडून येत आहेत.—रोम. १२:२; इफिस. ४:२२, २३.

१२, १३. खमिराच्या दाखल्यात सांगितल्याप्रमाणे राज्याचा संदेश कशा प्रकारे पसरला याची काही उदाहरणे सांगा.

१२ केव्हाकेव्हा तर प्रचार कार्याची सुरुवात केल्यानंतर अनेक वर्षांनी त्याचे परिणाम दिसून येतात. यहोवाच्या साक्षीदारांच्या एका शाखा कार्यालयात सेवा करत असलेले फ्रॅन्ट्झ आणि मार्गीट, १९८२ साली ब्राझीलच्या शाखा कार्यालयात सेवा करत होते. तेथे त्यांनी एका लहानशा गावात सेवाकार्य केले. त्यांनी जे बायबल अभ्यास सुरू केले त्यांत एक स्त्रीदेखील होती. तिला चार मुले होती. त्यांपैकी सर्वात मोठा मुलगा तेव्हा फक्त १२ वर्षांचा होता. तो स्वभावाने खूप लाजाळू होता आणि सहसा बायबल अभ्यास सुरू होण्याआधी लपून बसायचा. नंतर, या जोडप्याची नेमणूक बदलल्यामुळे त्यांना हा बायबल अभ्यास घेणे शक्य नव्हते. पुढे २५ वर्षांनंतर ते पुन्हा या गावात आले. तेव्हा त्यांना या ठिकाणी कोणते बदल दिसून आले? आता येथे ६९ प्रचारकांची एक मंडळी होती आणि या प्रचारकांपैकी १३ जण सामान्य पायनियर होते. त्यांच्या सभा एका नवीन राज्य सभागृहात चालवल्या जात होत्या. आणि त्या लाजाळू मुलाबद्दल काय? तो आता वडीलवर्गाचा संयोजक या नात्याने सेवा करत आहे! येशूच्या दाखल्यातील खमिराप्रमाणेच या गावातही राज्याच्या संदेशाचा प्रसार होऊन अनेकांच्या जीवनात त्यामुळे बदल घडून आले होते. हे पाहून त्या जोडप्याच्या आनंदाला सीमा राहिली नाही!

१३ राज्याच्या संदेशात लोकांचे जीवन बदलण्याची ताकद आहे हे खासकरून अशा देशांत दिसून येते, जेथे प्रचार कार्यावर प्रतिबंध आहे. अशा देशांत राज्याचा संदेश किती प्रमाणात पसरला आहे हे समजणे सहसा कठीण असते. पण, आपण त्याचे परिणाम पाहतो तेव्हा आश्चर्यचकित होतो. क्यूबाचे उदाहरण लक्षात घ्या. त्या देशात राज्याचा संदेश १९१० साली पोचला आणि बंधू रस्सल यांनी १९१३ साली त्या देशाला भेट दिली. सुरुवातीला तेथे खूप कमी प्रगती होती. पण, आता क्यूबामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? आता तेथे ९६,००० पेक्षा जास्त प्रचारक राज्याची सुवार्ता घोषित करत आहेत. तसेच, २०१३ सालच्या स्मारकविधीला २,२९,७२६ लोक उपस्थित होते. म्हणजे क्यूबा बेटावरील प्रत्येक ४८ जणांपैकी १ जण उपस्थित राहिला होता. बंदी नसलेल्या देशांतसुद्धा अशी काही क्षेत्रे असू शकतात जेथे प्रचार कार्य करणे शक्य नाही असे स्थानिक साक्षीदारांना वाटू शकते. पण, कदाचित या भागांतसुद्धा राज्याचा संदेश बऱ्याच दूरवर पोचला असेल. *उप. ८:७; ११:५.

१४, १५. (क) खमिराच्या दाखल्यावरून आपल्याला काय शिकायला मिळते? (ख) या दाखल्यावरून आपल्याला यहोवा आणि येशू यांच्याबद्दल काय शिकायला मिळते?

१४ खमिराच्या दाखल्यातून आपल्याला काय शिकायला मिळते? येशूने दिलेल्या दाखल्याचा काय अर्थ होतो यावर मनन केल्यास आपल्याला हे समजते की ज्यांनी आजपर्यंत राज्याचा संदेश ऐकला नाही अशा लाखो लोकांपर्यंत तो कसा पोचेल याची अनावश्यक चिंता करण्याची गरज नाही. कारण सर्वकाही यहोवाच्या नियंत्रणात आहे. मग, आपण काय केले पाहिजे? देवाच्या वचनात सांगितले आहे: “सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.” (उप. ११:६) तसेच, प्रचार कार्य परिणामकारक ठरावे यासाठी आपण नेहमी प्रार्थनादेखील केली पाहिजे, खासकरून अशा देशांतील कार्यासाठी जेथे बंदी आहे.—इफिस. ६:१८-२०.

१५ त्यासोबतच, सुरुवातीला आपल्याला काही परिणाम दिसून आले नाहीत, तरी आपण निराश होण्याची गरज नाही. सुरुवात छोटी असली तरी तिला आपण कमी लेखू नये. (जख. ४:१०) कदाचित पुढे जाऊन याचे परिणाम आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त प्रभावशाली असतील!—स्तो. ४०:५; जख. ४:७.

व्यापारी आणि लपवून ठेवलेले धन

१६. व्यापाऱ्याच्या दाखल्याचा आणि लपवून ठेवलेल्या धनाच्या दाखल्याचा काय अर्थ होतो?

१६ मत्तय १३:४४-४६ वाचा. व्यापाऱ्याच्या आणि लपवून ठेवलेल्या धनाच्या दाखल्याचा काय अर्थ होतो? येशूच्या दिवसांतील काही व्यापारी उत्तम प्रतीचे मोती मिळवण्याकरता हिंदी महासागरापर्यंत मजल मारायचे. या दाखल्यातील व्यापारी योग्य मनोवृत्ती असलेल्या लोकांना चित्रित करतो. हे लोक त्यांची आध्यात्मिक गरज भागवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करतात. दाखल्यातील “अती मोलवान मोती” राज्याच्या मौल्यवान सत्याला सूचित करतो. त्या मोत्याचे मोल लक्षात येताच, तो विकत घेता यावा म्हणून व्यापारी त्याच्याजवळ असलेले सर्वकाही विकतो. येशूने अशा एका मनुष्याबद्दलही सांगितले ज्याला शेतात काम करत असताना “लपवून” ठेवलेले धन सापडते. व्यापाऱ्याप्रमाणे हा मनुष्य धनाच्या शोधात नसतो. पण, तोही ते धन मिळवण्याकरता आपले “सर्वस्व” विकण्यास तयार होतो.

१७. येशूने हे दाखले का दिले?

१७ येशूने हे दोन दाखले का दिले? सत्य वेगवेगळ्या मार्गांनी सापडू शकते हे दाखवण्यासाठी येशूने या दाखल्यांचा वापर केला. काही जण सत्याच्या शोधात असतात आणि ते मिळवण्यासाठी ते अनेक प्रयत्न करतात. तर, काहींना त्याच्या शोधात नसतानादेखील ते सापडते. कदाचित कोणीतरी येऊन त्यांना त्याबद्दल सांगितले असेल. या दोन्ही दाखल्यांतील माणसांनी, त्यांना जे मिळाले होते त्याचे मोल जाणले आणि ते प्राप्त करण्यासाठी आपले सर्वस्व विकण्यास ते तयार झाले.

१८. (क) या दोन दाखल्यांतून आपण कसा फायदा मिळवू शकतो? (ख) या दाखल्यांवरून यहोवा आणि येशू यांच्याविषयी काय शिकायला मिळते?

१८ या दोन्ही दाखल्यांतून आपण कसा फायदा मिळवू शकतो? (मत्त. ६:१९-२१) स्वतःला असे विचारा: ‘त्या माणसांची जशी मनोवृत्ती होती तशीच माझीही आहे का? मीही सत्याला मौल्यवान समजतो का? सत्यावरील माझी पकड मजबूत करण्यासाठी त्याग करण्यास मी तयार आहे का? की, दैनंदिन चिंता व यांसारख्या इतर समस्यांमुळे मी विचलित होतो?’ (मत्त. ६:२२-२४, ३३; लूक ५:२७, २८; फिलिप्पै. ३:८) सत्य मिळाल्याबद्दल जितका जास्त आनंद आपल्या मनात असेल, तितकाच सत्याला जीवनात प्रथम स्थान देण्याचा आपला निर्धारही पक्का असेल.

१९. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१९ या लेखात ज्या दाखल्यांवर आपण चर्चा केली ते आपण फक्त ऐकलेच नाही, तर त्यांचा अर्थही समजून घेतला आहे हे आपल्या कार्यांतून दाखवू या. आपल्याला हे कसे करता येईल? यासाठी फक्त त्यांचा अर्थ माहीत असणे पुरेसे नाही, तर त्यांतून जे धडे आपण शिकलो ते जीवनात लागू करणेदेखील महत्त्वाचे आहे. पुढील लेखात आपण आणखी तीन दाखल्यांवर चर्चा करून आपल्याला त्यांतून काय शिकायला मिळते हे पाहू या.

^ परि. 13 असेच अनुभव, अर्जेंटिना (२००१ ईयरबुक, पृष्ठ १८६); पूर्व जर्मनी (१९९९ ईयरबुक, पृष्ठ ८३); पापुआ न्यू गिनी (२००५ ईयरबुक, पृष्ठ ६३); या देशांत, तसेच रॉबिनसन क्रूसो (टेहळणी बुरूज १५ जून २००० पृष्ठ ८) या बेटावरदेखील पाहण्यात आले आहेत.