व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही आपला विचार बदलावा का?

तुम्ही आपला विचार बदलावा का?

यहोवाचे साक्षीदार असलेले काही तरुण एका चित्रपटाला जायचं ठरवतात. त्यांच्या बऱ्याच वर्गमित्रांनी हा चित्रपट खूप छान असल्याचं त्यांना सांगितलेलं असतं. पण, जेव्हा ते चित्रपटगृहात पोचतात तेव्हा बाहेर त्यांना चित्रपटाच्या पोस्टर्सवर भयानक शस्त्रांची आणि तोकडे कपडे घातलेल्या स्त्रियांची चित्रं दिसतात. आता ते काय करतील? ‘इथपर्यंत आलोच आहोत तर चित्रपट पाहूनच जावं’ असा विचार करून ते चित्रपटगृहात प्रवेश करतील का?

वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला दररोज अनेक निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयांचा आपल्या आध्यात्मिक आरोग्यावर आणि यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर एकतर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. कधीकधी तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवता, पण नंतर तुम्ही त्या गोष्टीवर नीट विचार करता आणि मग आपला विचार बदलता. तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम नाही असा याचा अर्थ होतो का? की, काही परिस्थितींत आपला विचार बदलणं हेच योग्य असतं?

असे प्रसंग जेव्हा विचार बदलणं चुकीचं असतं

यहोवावर प्रेम असल्यामुळेच आपण आपलं जीवन त्याला समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला. आणि पुढेही देवाला विश्वासू राहण्याची आपली मनापासून इच्छा आहे. पण आपला शत्रू दियाबल सैतान कसंही करून आपल्याला यहोवाच्या इच्छेविरुद्ध वागायला लावून त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध तोडू इच्छितो. (प्रक. १२:१७) समर्पणाद्वारे आपण यहोवाची सेवा करण्याचा आणि त्याच्या आज्ञांचं पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मग, हा निर्णय बदलणं किती दुःखाची गोष्ट ठरेल! यामुळे आपल्याला आपलं जीवनदेखील गमवावं लागू शकतं.

आजपासून २,६०० वर्षांपेक्षा जास्त काळाआधी बॅबिलोनचा राजा नबुखदनेस्सर यानं सोन्याची एक मोठी मूर्ती उभारली होती. सर्वांनी खाली वाकून या मूर्तीला नमन करावं असा हुकूम त्यानं दिला होता. जो कोणी असं करणार नाही त्याला आगीच्या भट्टीत टाकलं जाणार होतं. यहोवाचे उपासक असलेल्या शद्रख, मेशख आणि अबेदनगो या तीन तरुणांनी मूर्तीला नमन केलं नाही. यामुळे त्यांना आगीच्या भट्टीत टाकण्यात आलं. अर्थात, यहोवानं चमत्कारिक रीत्या त्या तिघांना आगीच्या भट्टीतून वाचवलं हे आपल्याला माहीत आहे. पण, देवाची उपासना करण्याच्या निर्णयाशी तडजोड करण्याऐवजी, ते आपला जीव धोक्यात घालण्यास तयार होते ही गोष्ट लक्ष देण्याजोगी आहे.—दानी. ३:१-२७.

नंतर, दानीएल संदेष्ट्यानंही सिंहांच्या गुहेत टाकले जाण्याचा धोका पत्करून यहोवाला प्रार्थना करत राहण्याचं निवडलं. दिवसातून तीन वेळा प्रार्थना करण्याचा नित्यक्रम त्यानं सोडला नाही. खऱ्या देवाची उपासना करण्याचा दानीएलाचा निर्धार पक्का होता. यामुळे, त्याला “सिंहांच्या पंजांतून” सोडवण्यात आलं.—दानी. ६:१-२७.

आजसुद्धा, देवाचे सेवक त्याला केलेल्या समर्पणाच्या बाबतीत तडजोड करत नाहीत. आफ्रिकेत, यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेल्या काही विद्यार्थ्यांनी एका राष्ट्रीय चिन्हाच्या उपासनेत सहभाग घेण्यास नकार दिला. जर त्यांनी इतर विद्यार्थ्यांसोबत या कार्यक्रमात सहभाग घेतला नाही, तर त्यांना शाळेतून काढून टाकलं जाईल असं त्यांना सांगण्यात आलं. याच्या काही काळानंतर, जेव्हा शिक्षणमंत्री त्या शहराला भेट द्यायला आले, तेव्हा काही साक्षीदार विद्यार्थ्यांशी ते बोलले. साक्षीदार मुलांनी आदरपूर्वक, पण अगदी निर्भयपणे आपल्या विश्वासांबद्दल त्यांना समजावून सांगितलं. त्यानंतर पुन्हा ही समस्या कधीच आली नाही. आता जेव्हा हे तरुण शाळेत जातात तेव्हा यहोवाला न आवडणारं कोणतंही कृत्य करण्याच्या दबावाला त्यांना तोंड द्यावं लागत नाही.

जोसेफ नावाच्या एका बांधवाच्या उदाहरणाकडेही लक्ष द्या. त्यांच्या पत्नीला कॅन्सर झाला आणि तिचा अचानक मृत्यू झाला. अंत्यविधी जोसेफच्या इच्छेप्रमाणे व्हावा याला जोसेफच्या घरच्यांचा विरोध नव्हता. पण, त्यांच्या पत्नीचे नातेवाईक सत्यात नव्हते आणि त्यांना त्यांच्या रुढीपरंपरेनुसार तो करायचा होता. त्यात देवाला आवडणार नाहीत अशा काही प्रथासुद्धा होत्या. जोसेफ म्हणतात: “मी माझ्या निर्णयावर ठाम आहे हे पाहून त्यांनी माझ्या मुलांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला; पण माझी सर्व मुलंदेखील खंबीर राहिली. नातेवाइकांना माझ्या घरात जागरणाचा कार्यक्रमसुद्धा ठेवायचा होता. पण, माझ्या घरात मी हा कार्यक्रम करू देणार नाही असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. या प्रथा माझ्या आणि माझ्या पत्नीच्या तत्त्वांत बसत नाहीत हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे, खूप चर्चा केल्यानंतर शेवटी त्यांनी तो कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी पार पाडला.

“त्या दुःखद प्रसंगी, यहोवानं आम्हाला मदत करावी आणि आमच्या कुटुंबाच्या हातून त्याच्या नियमांच्या विरोधात काही घडू नये म्हणून मी त्याला कळकळीनं प्रार्थना करत राहिलो. यहोवानं माझ्या प्रार्थना ऐकल्या आणि एवढा दबाव असूनही खंबीर राहायला आम्हाला मदत केली.” जोसेफ आणि त्यांची मुलं उपासनेच्या संबंधात कोणतीही तडजोड करण्याचा विचारदेखील करू शकत नव्हते.

असे प्रसंग जेव्हा विचार बदलला जाऊ शकतो

इ.स. ३२ सालचा वल्हांडण झाल्यावर थोड्याच काळानंतर, सिदोनजवळ असलेल्या एका ठिकाणी एक विदेशी स्त्री येशू ख्रिस्ताकडे आली. आपल्या मुलीला दुरात्म्यापासून मुक्त करावं अशी ती येशूला विनंती करू लागली. सुरवातीला येशूनं तिला काहीच उत्तर दिलं नाही. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला: “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.” पण, तरीही ती स्त्री वारंवार विनवणी करतच राहिली. तेव्हा येशू म्हणाला: “मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे!” यानंतर तिनं जे उत्तर दिलं त्यावरून तिला येशूवर किती विश्वास होता हे दिसून आलं. ती म्हणाली: “खरेच, प्रभुजी; तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरुन पडलेला चूर खातात.” हे ऐकून येशूनं तिची विनंती मान्य केली आणि तिच्या मुलीला बरं केलं.—मत्त. १५:२१-२८.

असं करण्याद्वारे येशूनं खरंतर यहोवाचं अनुकरण केलं. कारण, यहोवादेखील परिस्थितीनुसार आपले निर्णय बदलण्यास तयार असतो. उदाहरणार्थ, इस्राएली लोकांनी सोन्याचं वासरू तयार केलं, तेव्हा यहोवानं त्यांचा पूर्णपणे नाश करायचं ठरवलं होतं. पण, जेव्हा मोशेनं यहोवाकडे इस्राएली लोकांच्या वतीनं विनवणी केली, तेव्हा यहोवानं आपला निर्णय बदलला.—निर्ग. ३२:७-१४.

प्रेषित पौलानं यहोवाचं आणि येशूचं अनुकरण केलं. योहान मार्क हा पौलाच्या पहिल्या मिशनरी दौऱ्याच्या वेळी पौल व बर्णबा यांना मध्येच सोडून निघून गेला होता. त्यामुळे, पुढच्या दौऱ्यांना जाताना मार्कला सोबत घेऊ नये असं आधी पौलाचं मत होतं. पण, मार्कनं स्वतःमध्ये सुधारणा केली आहे आणि तो एक चांगला सहकारी ठरेल याची पौलाला नंतर जाणीव झाली. म्हणूनच पौल तीमथ्याला म्हणाला: “मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे.”—२ तीम. ४:११.

आपल्याविषयी काय? आपला दयाळू, सहनशील आणि प्रेमळ पिता यहोवा याचं अनुकरण करत असताना कधीकधी आपल्यालाही एखाद्या बाबतीत आपला विचार बदलण्याची गरज वाटू शकते. उदाहरणार्थ, इतरांबद्दल पूर्वी आपण विशिष्ट प्रकारे विचार करत असू. पण, नंतर कदाचित आपल्याला त्यांच्याविषयीचं आपलं मत बदलावंसं वाटेल. यहोवा आणि येशू यांच्याप्रमाणे आपण परिपूर्ण नाही. जर ते परिपूर्ण असतानाही आपला निर्णय बदलण्यास तयार होते, तर मग आपणही इतरांची परिस्थिती लक्षात घेऊन आपलं मत बदलण्यास तयार असू नये का?

कधीकधी, देवाच्या सेवेतील ध्येयांच्या बाबतीत आपली विचारसरणी बदलणं योग्य ठरू शकतं. उदाहरणार्थ, काही जण बऱ्याच काळापासून बायबलचा अभ्यास करत असतील आणि मंडळीच्या सभांनाही उपस्थित राहत असतील. पण, बाप्तिस्मा घेण्याच्या बाबतीत कदाचित ते टाळाटाळ करत असतील. किंवा, काही बांधवांना शक्य असतानाही ते पायनियर सेवा सुरू करण्यास कचरत असतील. तसेच, काही बांधवांचा मंडळीत जबाबदाऱ्या स्वीकारण्याकडे विशेष कल नसेल. (१ तीम. ३:१) तुमचीही परिस्थिती वर उल्लेख केलेल्या एखाद्या उदाहरणाशी मिळतीजुळती आहे का? अशा प्रकारच्या विशेषाधिकारांचा आनंद अनुभवण्यास यहोवा तुम्हाला प्रेमळपणे निमंत्रण देतो. तर मग, तुमच्या विचारसरणीत बदल करून देवाची आणि इतरांची सेवा करण्याचा आनंद चाखून पाहण्यास काय हरकत आहे?

विचार बदलल्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतात

आफ्रिकेतील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयात सेवा करत असलेली एल्ला आपल्या या सेवेविषयी सांगते: “मी बेथेलला आले तेव्हा मी इथं जास्त काळ राहीन किंवा नाही याची मला खात्री नव्हती. यहोवाची मनापासून सेवा करण्याची मला इच्छा तर होती, पण मला माझ्या घरच्यांची खूप ओढ होती. सुरवातीला मला त्यांची सारखी आठवण यायची! पण, माझ्यासोबत राहणाऱ्या बहिणीनं मला प्रोत्साहन दिल्यामुळे मी इथंच राहायचं ठरवलं. आता बेथेलमध्ये दहा वर्षं राहिल्यानंतर, मला असं वाटतं की पुढंही शक्य होईल तोपर्यंत याच नेमणुकीत राहून माझ्या बहीण-भावांची मी सेवा करावी.”

असे प्रसंग जेव्हा विचार बदललाच पाहिजे

काईन आपल्या भावाचा द्वेष करू लागला आणि त्याच्यावर संतापला तेव्हा काय घडलं हे तुम्हाला आठवतं का? रागानं धुमसत असलेल्या काइनाला देवानं सांगितलं की त्यानं चांगलं करण्याचं ठरवल्यास तो देवाची मर्जी पुन्हा मिळवू शकतो. पाप दाराशी “टपूनच” आहे, त्यामुळे तू त्याच्यावर नियंत्रण मिळव, असा सल्ला देवानं त्याला दिला. काईन आपली मनोवृत्ती आणि आपले विचार बदलू शकत होता. पण, त्यानं देवाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. याचा किती दुःखद परिणाम झाला! काइनानं आपल्याच भावाची हत्या केली आणि अशा रीतीनं तो मानवहत्या करणारा पहिला मनुष्य ठरला.—उत्प. ४:२-८.

काइनानं त्याचा विचार बदलला असता तर?

उज्जीया राजाचे उदाहरणदेखील लक्षात घ्या. सुरवातीला, तो यहोवाच्या नजरेत जे योग्य तेच करत होता आणि नेहमी देवाचं मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे कालांतरानं उज्जीया गर्विष्ठ बनला. आणि यामुळे पूर्वीच्या त्याच्या सर्व चांगल्या कामावर पाणी पडलं. गर्विष्ठ बनलेल्या उज्जीयानं आपण याजक नाही हे माहीत असूनही धूप जाळण्याकरता मंदिरात प्रवेश केला. जेव्हा याजकांनी त्याला अशी चूक न करण्याची ताकीद दिली तेव्हा त्यानं आपला विचार बदलला का? नाही. उलट उज्जीया “संतापला” आणि त्यानं याजकांचा इशारा धुडकावून लावला. परिणामस्वरूप, यहोवानं त्याला शिक्षा दिली आणि तो कोड या रोगानं पीडित झाला.—२ इति. २६:३-५, १६-२०.

यावरून स्पष्ट आहे, की काही प्रसंगांमध्ये आपण आपला विचार बदललाच पाहिजे. झॉकीम नावाच्या एका बांधवाचं उदाहरण पाहू या. झॉकीम यांचा १९५५ साली बाप्तिस्मा झाला होता, पण १९७८ मध्ये त्यांना बहिष्कृत करण्यात आलं. २० वर्षांपेक्षाही जास्त काळानंतर त्यांनी पश्‍चात्तापी मनोवृत्ती दाखवली आणि त्यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत परत घेण्यात आलं. परत घेतलं जाण्याची विनंती करण्यासाठी तुम्ही इतका काळ का थांबून राहिलात, असं अलीकडेच एका वडिलांनी झॉकीम यांना विचारलं. तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं: “माझ्या मनात राग होता आणि मी घमेंडीदेखील होतो. मी इतका काळ जाऊ दिला याचा मला खरंच पस्तावा होतो. मी बहिष्कृत झालो होतो तरीसुद्धा यहोवाचे साक्षीदार जे काही शिकवतात ते सत्य आहे हे मला माहीत होतं.” या बांधवानं आपली मनोवृत्ती बदलून पश्‍चात्ताप करणं खरंच योग्य होतं.

आज ना उद्या आपल्यावरही असे प्रसंग येतील जेव्हा आपण आपला विचार आणि आपली वागणूक बदलणे गरजेचे असेल. यहोवाच्या दृष्टीनं योग्य ते करण्यासाठी आपण असा बदल करण्याची तयारी दाखवू का?—स्तो. ३४:८.