व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या दुष्ट जगाच्या अंताचा एकत्र मिळून सामना करू या!

या दुष्ट जगाच्या अंताचा एकत्र मिळून सामना करू या!

“आपण एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव आहोत.”—इफिस. ४:२५, नयी दुनिया अनुवाद.

१, २. देवाची त्याच्या सर्व तरुण व वृद्ध उपासकांविषयी कोणती इच्छा आहे?

तुम्ही एक तरुण व्यक्ती आहात का? असाल, तर यहोवाच्या जगभरातील मंडळीचा तुम्ही एक महत्त्वाचा भाग आहात याची खात्री बाळगा. अनेक देशांत बाप्तिस्मा घेणाऱ्यांपैकी तरुणांचीच संख्या जास्त आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने तरुण लोक यहोवाची सेवा करण्याची निवड करत आहेत हे पाहून खरेच खूप उत्तेजन मिळते!

तरुणांनो, तुम्हाला तुमच्याच वयाच्या लोकांसोबत राहायला आवडते का? नक्कीच तुम्हाला आवडत असेल. आपल्याच वयाच्या लोकांसोबत वेळ घालवण्यात एक वेगळाच आनंद असतो. हे खरे असले, तरी यहोवाच्या सर्व उपासकांनी एकत्र मिळून उपासना करावी अशी त्याची इच्छा आहे; मग आपण तरुण असो किंवा वृद्ध आणि आपली परिस्थिती एकमेकांपासून कितीही वेगळी असली तरीही. प्रेषित पेत्राने देवाविषयी असे लिहिले: “त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीम. २:३, ४) देवाच्या उपासकांत “सर्व राषट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे” लोक आहेत असे प्रकटीकरण ७:९ सांगते.

३, ४. (क) आजच्या तरुणांमध्ये कोणती वृत्ती दिसून येते? (ख) इफिसकर ४:२५ मध्ये पौलाने मंडळीची तुलना कशासोबत केली?

यहोवाच्या तरुण उपासकांमध्ये आणि जगातील तरुणांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे! यहोवाची सेवा न करणाऱ्यांपैकी बहुतेक जण फक्त स्वतःचाच विचार करतात; त्यांना स्वतःच्या इच्छांपुढे आणखी काही दिसत नाही. खरेतर, आजचे तरुण पूर्वी कधी नव्हे इतके स्वार्थी झाले आहेत, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. ते ज्या प्रकारे बोलतात व ज्या प्रकारचे कपडे घालतात त्यावरून इतरांची आणि खासकरून मोठ्यांची त्यांना मुळीच पर्वा नाही हे दिसून येते.

आज सगळीकडे हीच वृत्ती पाहायला मिळते. त्यामुळे, अशी वृत्ती टाळून यहोवाचे मन आनंदित करण्यासाठी तरुणांना बरेच प्रयत्न करावे लागतात. पहिल्या शतकातसुद्धा प्रेषित पौलाने आपल्या बांधवांना अशी वृत्ती टाळण्याची ताकीद दिली होती. त्याने या वृत्तीला ‘आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणारा आत्मा’ असे म्हटले. (इफिसकर २:१-३ वाचा.) आज मंडळीतील जे तरुण असे वागत नाहीत त्यांना पाहून खरोखरच किती दिलासा मिळतो! सर्व बांधवांसोबत मिळून सेवा करणे किती महत्त्वाचे आहे हे या तरुणांनी ओळखले आहे. तसेच, मंडळी ही अनेक अवयव असलेल्या एका शरीराप्रमाणे आहे आणि हे सर्व अवयव एकत्र मिळून कार्य करतात हेदेखील त्यांनी ओळखले आहे. पौलाने याविषयी असे म्हटले: “आपण एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव आहोत.” (इफिस. ४:२५, नयी दुनिया अनुवाद) या दुष्ट जगाचा अंत जसजसा जवळ येईल तसतसे एकत्र मिळून सेवा करणे आणखीनच गरजेचे असेल. म्हणूनच आता आपण बायबलमधील काही उदाहरणांवर चर्चा करू या. यांमुळे बांधवांसोबत एकत्र मिळून उपासना करणे व आपली एकता टिकवून ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजेल.

त्यांनी एकमेकांना सोडले नाही

५, ६. लोटाच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

प्राचीन काळात जेव्हा यहोवाचे लोक संकटाच्या वेळी एकमेकांसोबत राहिले आणि त्यांनी एकमेकांना साथ दिली तेव्हा यहोवाचे मन आनंदित झाले आणि त्याने त्यांचे संरक्षण केले. बायबलमधील अशा उदाहरणांवरून आपण सर्वच जण बरेच काही शिकू शकतो, मग आपण तरुण असो वा वृद्ध. सर्वात आधी आपण लोटाचे उदाहरण पाहू या.

लोट आणि त्याचे कुटुंब संकटात सापडले होते. कारण, ते ज्या शहरात राहत होते त्या सदोम शहराचा नाश होणार होता. देवाच्या दूतांनी लोटाला त्या शहरातून पळ काढून, डोंगरावर असलेल्या एका सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. त्यांनी म्हटले: “आपला जीव घेऊन पळ.” (उत्प. १९:१२-२२) लोटाने आणि त्याच्या दोन्ही मुलींनी देवदूतांच्या सूचनांचे पालन केले. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या इतरांनी त्यांना साथ दिली नाही. लोटाच्या मुलींशी ज्यांचे लग्न ठरले होते त्या तरुणांनीही त्याचे ऐकले नाही. लोटाचे वय झाल्यामुळे तो “केवळ गंमत” करत आहे असे त्यांना वाटले. पण यामुळे, त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. (उत्प. १९:१४, NW) केवळ लोट आणि शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहिलेल्या त्याच्या दोन मुलीच सदोमाच्या नाशातून वाचल्या.

७. इजिप्तमधून निघालेल्या लोकांमधील एकतेमुळे यहोवाने त्यांना कशा प्रकारे मदत केली?

आणखी एका उदाहरणाकडे लक्ष द्या. इस्राएली लोक इजिप्तमधून निघाले तेव्हा ते लहानलहान स्वतंत्र गट करून मनाला वाटेल त्या मार्गाने गेले नाहीत. तसेच, पुढे जेव्हा मोशेने “आपला हात समुद्रावर उगारला” आणि यहोवाने समुद्राचे दोन भाग केले, तेव्हा मोशे एकटाच निघाला का? किंवा, त्याने फक्त काही इस्राएली लोकांना सोबत नेले का? नाही. उलट, सर्व इस्राएली लोक सोबत मिळून गेले आणि यहोवाने त्यांचे संरक्षण केले. (निर्ग. १४:२१, २२, २९, ३०) अनेक प्रकारचे विदेशी लोकदेखील इस्राएली लोकांसोबत होते. या लोकांनी यहोवाची सेवा करण्याचे ठरवले होते आणि त्यामुळे तेदेखील इस्राएली लोकांसोबत इजिप्तमधून बाहेर पडले. या सर्व लोकांमध्ये एकता होती. (निर्ग. १२:३८) त्यांच्यापैकी फक्त काही लोकांचा एखादा गट, कदाचित तरुणांचा गट स्वतंत्रपणे त्यांना योग्य वाटेल त्या मार्गाने गेला असेल, अशी आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. असे करणे मूर्खपणाचे ठरले असते. कारण, जो स्वतःच्या मनाप्रमाणे गेला असता त्याला यहोवाचे संरक्षण मिळाले नसते.—१ करिंथ. १०:१.

८. यहोशाफाटाच्या दिवसांत देवाच्या लोकांमध्ये असलेली एकता कशा प्रकारे दिसून आली?

यहोशाफाट राजाच्या काळात एका मोठ्या व शक्तिशाली सैन्याने देवाच्या लोकांवर हल्ला केला. (२ इति. २०:१, २) देवाच्या सेवकांनी स्वतःच्या शक्तीने या शत्रूंवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तर, त्यांनी यहोवाकडे मदत मागितली. (२ इतिहास २०:३, ४ वाचा.) पण, प्रत्येकाने त्याला योग्य वाटेल त्यानुसार स्वतंत्रपणे असे केले नाही. बायबलमध्ये असे सांगितले आहे: “तेव्हा सर्व यहुदी आपली मुलेबाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले.” (२ इति. २०:१३) सर्व तरुण व वृद्ध इस्राएली लोकांनी यहोवावर भरवसा ठेवला व त्याच्या मार्गदर्शनाचे पालन केले. यामुळे, यहोवाने त्यांचे संरक्षण केले. (२ इति. २०:२०-२७) देवाच्या लोकांनी संकटांचा सामना कसा करावा याचे हे किती चांगले उदाहरण आहे!

९. सुरुवातीच्या ख्रिश्चनांपासून आपण काय शिकू शकतो?

सुरुवातीच्या ख्रिश्चनांमध्येही एकता होती. उदाहरणार्थ, जेव्हा अनेक यहुदी आणि विदेशी लोक ख्रिस्ती बनले, तेव्हा ते सर्व जण सारख्याच शिकवणींचे पालन करायचे. तसेच, ते एकमेकांच्या सहवासात वेळ घालवायचे, सोबत मिळून भोजन करायचे आणि प्रार्थनादेखील करायचे. (प्रे. कृत्ये २:४२) त्यांची ही एकता खासकरून संकटाच्या काळात दिसून आली. तेव्हा त्यांना एकमेकांच्या मदतीची खूप जास्त गरज होती. (प्रे. कृत्ये ४:२३, २४) खरोखर, संकटाच्या काळात एकमेकांच्या सोबत राहणे खूप महत्त्वाचे असते असे तुम्हालाही वाटत नाही का?

यहोवाचा दिवस येण्याआधी एक व्हा

१०. एकतेने राहणे खासकरून केव्हा महत्त्वाचे असेल?

१० लवकरच आपण आजपर्यंत आलेल्या सर्वात भयंकर संकटाचा सामना करणार आहोत. योएल संदेष्ट्याने या संकटाला अंधाराचा आणि निराशेचा दिवस म्हटले आहे. (योए. २:१, २; सफ. १:१४) त्या वेळी देवाच्या लोकांनी एकतेने राहणे कधी नव्हे इतके महत्त्वाचे असेल. येशूचे शब्द लक्षात आणा: “फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते.”—मत्त. १२:२५.

११. स्तोत्र १२२:३, ४ वरून आपण एकतेविषयी काय शिकू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

११ सैतानाच्या या दुष्ट जगावर येणाऱ्या संकटाच्या वेळी आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने एकतेत राहणे गरजेचे असेल. या बाबतीत, प्राचीन जेरूसलेम शहरातली घरे ज्या पद्धतीने बांधली जायची त्यावरून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकू शकतो. ती घरे इतकी जवळजवळ बांधली जायची की स्तोत्रकर्त्याने, जेरूसलेम “एकत्र जोडलेल्या नगरीसारखी” बांधलेली आहे असे म्हटले. लोकांची घरे अगदी लागून असल्यामुळे त्यांना एकमेकांना मदत करणे व एकमेकांचे संरक्षण करणे शक्य व्हायचे. घरांच्या या रचनेवरून, इस्राएल राष्ट्रातले सर्व वंश कशा प्रकारे यहोवाची उपासना करण्यासाठी, एक राष्ट्र या नात्याने एकत्र यायचे याचीही कदाचित स्तोत्रकर्त्याला आठवण झाली असावी. (स्तोत्र १२२:३, ४ वाचा.) आज आणि पुढे येणाऱ्या कठीण दिवसांत आपणदेखील “एकत्र जोडलेल्या” जेरूसलेम नगरीसारखेच एकजुटीने राहणे अतिशय महत्त्वाचे आहे!

१२. देवाच्या लोकांवर होणार असलेल्या हल्ल्यातून बचावण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१२ त्या संकटादरम्यान आपल्यामध्ये एकता असणे इतके महत्त्वाचे का असेल? यहेज्केलच्या ३८ व्या अध्यायातल्या भविष्यवाणीप्रमाणे “मागोग देशातील गोग” देवाच्या लोकांवर हल्ला करेल. त्या वेळी कोणत्याही गोष्टीमुळे आपली एकता नष्ट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तसेच, सुरक्षेसाठी सैतानाच्या जगाकडे वळणे फार मोठी चूक ठरेल. त्याऐवजी, आपल्या बांधवांसोबत जवळचा सहवास राखणे गरजेचे असेल. पण, केवळ मंडळीचा सदस्य असल्यामुळे आपला बचाव होणार नाही. तर, ज्यांचा यहोवावर भरवसा असेल आणि जे त्याच्या आज्ञांचे पालन करतील केवळ अशांनाच यहोवा आणि येशू संकटातून वाचवतील. (योए. २:३२; मत्त. २८:२०) तर मग, जे यहोवाच्या लोकांसोबत एकतेने राहण्याऐवजी, स्वतःहून मंडळीपासून दूर गेले आहेत त्यांचा बचाव होईल असे तुम्हाला वाटते का?—मीखा २:१२.

१३. आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यावरून तरुणांना काय शिकायला मिळते?

१३ तरुणांनो, आपल्या बांधवांसोबत जवळचा सहवास राखणे किती महत्त्वाचे आहे हे आता तुमच्या लक्षात आले का? तर मग, फक्त स्वतःच्याच वयाच्या लोकांसोबत वेळ घालवण्याची आणि इतरांपासून दूर राहण्याची वृत्ती टाळा. लवकरच अशी वेळ येणार आहे जेव्हा आपल्या सर्वांनाच, मग आपण तरुण असो किंवा वृद्ध, एकमेकांच्या सहवासाची खूप गरज असेल. तेव्हा, आताच सर्व बांधवांसोबतची तुमची मैत्री आणखी घट्ट करा आणि त्यांच्यासोबत मिळून आनंदाने यहोवाची सेवा करा. येणाऱ्या दिवसांत या एकतेमुळेच आपला जीव वाचेल!

“एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव”

१४, १५. (क) यहोवा आज आपल्याला एकतेने राहण्यास का शिकवत आहे? (ख) एकतेने राहण्याकरता यहोवा आपल्याला कोणता सल्ला देतो?

१४ आपल्या बांधवांसोबत “खांद्याला खांदा लावून” सेवा करण्यासाठी यहोवा आज आपल्याला मदत करत आहे. (सफ. ३:८, ९, ईझी-टू-रीड व्हर्शन) भविष्यात तो त्याचा सदासर्वकाळाचा संकल्प पूर्ण करणार आहे आणि त्यासाठीच तो आज आपल्याला प्रशिक्षित करत आहे. हा संकल्प काय आहे? सर्व गोष्टी “ख्रिस्तामध्ये एकत्र” करण्याचा देवाचा संकल्प आहे. (इफिसकर १:९, १० वाचा.) स्वर्गातील आणि पृथ्वीवरील त्याच्या सर्व सेवकांमध्ये जणू एका कुटुंबासारखी एकता निर्माण करण्याचा त्याने संकल्प केला आहे; आणि असे करण्यात तो नक्कीच यशस्वी ठरेल. तर मग तरुणांनो, यहोवाच्या संघटनेसोबत मिळून कार्य करणे किती महत्त्वाचे आहे हे आता तुम्हाला समजले का?

१५ नव्या जगात आपल्याला एकमेकांसोबत एकतेने राहता यावे म्हणून आज यहोवा आपल्याला प्रशिक्षित करत आहे. आपण “एकमेकांची सारखीच काळजी” घ्यावी, “एकमेकांना खरा स्नेहभाव” दाखवावा, “एकमेकांचे सांत्वन” करावे आणि “एकमेकांची उन्नती” करावी असे बायबल वारंवार आपल्याला सांगते. (१ करिंथ. १२:२५; रोम. १२:१०; १ थेस्सलनी. ४:१८; ५:११) पण, सर्व ख्रिस्ती अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांना एकतेने राहणे कठीण जाऊ शकते हे यहोवाला माहीत आहे. म्हणूनच, आपण एकमेकांना “क्षमा” करत राहिले पाहिजे असे तो आपल्याला सांगतो.—इफिस. ४:३२.

१६, १७. (क) ख्रिस्ती सभांचा एक उद्देश काय आहे? (ख) येशूच्या उदाहरणावरून तरुण काय शिकू शकतात?

१६ आपण बांधवांसोबत एकतेने राहायला शिकावे म्हणून यहोवा ख्रिस्ती सभांचाही उपयोग करत आहे. इब्री लोकांस १०:२४, २५ या वचनांत सभेच्या महत्त्वाविषयी आपण अनेकदा वाचले आहे. या सभांना येण्याचा एक उद्देश एकमेकांना चांगली कार्ये करण्याचे उत्तेजन देणे हा आहे. आणि जसजसा अंत जवळ येईल, तसतशी सभांमधून मिळणाऱ्या या उत्तेजनाची आपल्याला आणखीनच गरज असेल.

१७ सभांना उपस्थित राहण्याविषयी येशूचे आपल्यासमोर खूप चांगले उदाहरण आहे. बारा वर्षांचा असताना तो आपल्या आईवडिलांसोबत मंदिरात एका मोठ्या सभेसाठी गेला होता. पण काही वेळानंतर, येशू आपल्यासोबत नाही असे त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आले. तो आपल्या वयाच्या इतर मुलांसोबत कुठेतरी निघून गेला होता का? नाही. उलट, योसेफ व मरीया त्याला शोधायला गेले तेव्हा तो मंदिरात शिक्षकांसोबत आध्यात्मिक विषयांवर चर्चा करताना त्यांना दिसला.—लूक २:४५-४७.

१८. आपल्या प्रार्थनांमुळे एकता कशी वाढू शकते?

१८ एकमेकांप्रती प्रेमाची भावना वाढवणे आणि सभांमध्ये एकमेकांना उत्तेजन देणे यासोबतच आपण एकमेकांसाठी प्रार्थनादेखील करू शकतो. प्रार्थना करताना आपण आपल्या बांधवांच्या गरजांचा स्पष्टपणे उल्लेख केला पाहिजे. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्याला वाटणारी काळजी आणि प्रेम आणखी वाढते. वरील सर्व गोष्टी फक्त मोठ्यांनीच कराव्यात असे नाही. तर मग तरुणांनो, तुम्ही या मार्गांचा उपयोग करून मंडळीतल्या बांधवांसोबत तुमची मैत्री आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहात का? कारण, येणाऱ्या नाशातून बचावण्यासाठी आपला सैतानाच्या जगाशी नव्हे, तर आपल्या बांधवांशी जवळचा संबंध असणे गरजेचे असेल.

तरुणसुद्धा इतर बांधवांकरता प्रार्थना करू शकतात (परिच्छेद १८ पाहा)

“आपण एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव आहोत” हे दाखवणे

१९-२१. (क) ‘आपण एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव आहोत’ हे कसे दाखवू शकतो? उदाहरणे द्या. (ख) विपत्तीच्या काळात आपले बांधव ज्या प्रकारे एकमेकांना साहाय्य करतात त्यावरून तुम्हाला काय शिकायला मिळते?

१९ रोमकर १२:५ नुसार आपण सर्व जण एकाच शरीराचे वेगवेगळे अवयव आहोत. यहोवाचे साक्षीदार या तत्त्वानुसार वागतात. याचा पुरावा आपल्याला पुढील उदाहरणांत पाहायला मिळतो. २०११ सालच्या डिसेंबर महिन्यात मिंडानाओ या फिलिपीन्झच्या बेटावर जोरदार वादळ आले होते. या वादळामुळे एका रात्रीत, ४०,००० पेक्षा जास्त घरे पाण्याखाली बुडाली होती. यांत आपल्या अनेक बांधवांची घरेदेखील होती. शाखा कार्यालयाच्या रिपोर्टनुसार फिलिपीन्झच्या मदतकार्य समित्यांनी बांधवांपर्यंत मदत पोचवण्याआधीच “जवळपासच्या बांधवांनी मदत पाठवण्यास सुरुवात केली होती.”

२० तसेच, एका शक्तिशाली भूकंपामुळे जेव्हा पूर्व जपानमध्ये त्सुनामी आली, तेव्हा अनेक बांधवांचे खूप नुकसान झाले. काहींनी तर सर्वकाही गमावले. राज्य सभागृहापासून ४० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या योशीको नावाच्या एका बहिणीचे घर या भूकंपात पूर्णपणे नष्ट झाले. ती असे म्हणते: “भूकंपाच्या दुसऱ्याच दिवशी विभागीय पर्यवेक्षक आणि एक बांधव आम्हाला शोधायला आले होते हे जेव्हा आम्हाला नंतर समजलं तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटलं.” ती आनंदाने पुढे म्हणते: “मंडळीनं आमची आध्यात्मिक रीतीनं खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. तसंच, आम्हाला कोट, बूट, बॅग आणि कपडेदेखील पुरवण्यात आले.” मदतकार्य समितीचे एक बांधव असे म्हणतात: “जपानमधील सर्वच बांधव एकजुटीनं एकमेकांना मदत करत होते. मदत करण्यासाठी काही बांधव तर अमेरिकेहून आले होते. तुम्ही इतक्या लांब का आलात, असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, ‘जपानमधले हे बांधवही आमचेच बांधव आहेत आणि त्यांना आमच्या मदतीची गरज आहे.’” जी संघटना आपल्या सर्व सदस्यांची इतक्या प्रेमळपणे काळजी घेते तिचा भाग असण्याचा तुम्हाला अभिमान वाटत नाही का? आपल्या लोकांमध्ये असलेली ही एकता पाहून यहोवालाही नक्कीच खूप आनंद होत असेल.

२१ आपण जर आताच एकतेने राहण्यास शिकलो, तर भविष्यात येणार असलेल्या संकटांचा संघटितपणे सामना करणे आपल्याला शक्य होईल. भविष्यात समजा जगातल्या इतर बांधवांशी आपला संपर्क तुटला, तरीसुद्धा आपल्या स्थानिक मंडळीतल्या बांधवांसोबत आपण एकतेने राहू या. वादळातून सुरक्षित वाचलेली जपानमधील फ्युमीको नावाची एक बहीण असे म्हणते: “अंत खूप जवळ आहे आणि येणाऱ्या नव्या जगात कोणत्याच नैसर्गिक विपत्ती नसतील हे खरं आहे. पण, तोपर्यंत आपण एकमेकांना मदत करत राहणं गरजेचं आहे.”

२२. एकतेने राहिल्यास भविष्यात आपल्याला कोणता फायदा होईल?

२२ तर मग, आपल्या बांधवांसोबत एकतेने राहण्याचा मनापासून प्रयत्न करा आणि त्याद्वारे या दुष्ट जगाच्या अंतातून बचावण्यासाठी आताच तयारी करा. प्राचीन काळात ज्या प्रकारे यहोवाने त्याच्या लोकांचे संरक्षण केले, त्याच प्रकारे भविष्यात तो आपलेही संरक्षण करेल. (यश. ५२:९, १०) तुम्ही तरुण असा किंवा वृद्ध, जर तुम्ही देवाच्या लोकांसोबत एकतेने राहिला तर तुमचाही येणाऱ्या नाशातून बचाव होऊ शकतो. एकतेत राहण्यासाठी ज्या आणखी एका गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळेल ती म्हणजे आपल्याला जे मिळाले आहे त्याची मनापासून कदर करणे. पुढील लेखात याच विषयावर चर्चा करण्यात येईल.