व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जपानी लोकांसाठी एक खास भेट

जपानी लोकांसाठी एक खास भेट

२८ एप्रिल २०१३ रोजी, जपानमधील नागोया इथं एक खास सभा भरवण्यात आली. नियमन मंडळाचे सदस्य, अॅन्थनी मॉरिस यांनी एक अतिशय रोमांचक घोषणा केली. ही घोषणा जपानी भाषेतील एका नव्या प्रकाशनाची होती. आणि ते प्रकाशन होतं: द बायबल—द गॉस्पल अकॉर्डिंग टू मॅथ्यू. २,१०,००० हून जास्त लोकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा थेट व्हिडिओ प्रक्षेपणाच्या सहाय्यानं या सभेचा आनंद घेतला. घोषणा होताच सर्वांनी बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट करत आपला आनंद व्यक्त केला.

मत्तयच्या शुभवर्तमानाची ही आवृत्ती खरंतर जपानी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मधूनच छापण्यात आली. पण तरी, हे १२८ पानी पुस्तक विशेष होतं. या पुस्तकाविषयी बोलताना बंधू मॉरिस म्हणाले, की या पुस्तकाची रचना खास जपानी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन करण्यात आली होती. पण या पुस्तकात वेगळं असं काय आहे? आणि असं वेगळं पुस्तक काढण्याची गरज तरी काय होती? तसंच, याला लोकांनी कसा प्रतिसाद दिला?

पुस्तकाचा वेगळेपणा

जपानी भाषेत अक्षरांची मांडणी उभ्या किंवा आडव्या ओळींत करता येते. आपल्या प्रकाशनांसहित इतर बऱ्याच प्रकाशनांत अक्षरांची मांडणी ही आडव्या ओळींत असते. पण बऱ्याच बातमीपत्रांमध्ये व इतर साहित्यात असते त्याप्रमाणे, या नवीन पुस्तकात मात्र अक्षरांची मांडणी उभ्या ओळींत करण्यात आली आहे. कारण बऱ्याच जणांना उभ्या ओळींतील अक्षरं वाचायला सोपी जातात. तसंच वाचकांना मुख्य मुद्दे सहज पाहता यावेत म्हणून सहसा पानाच्या वरच्या बाजूस दिली जाणारी शीर्षके लेखामध्येच उपशीर्षकांच्या स्वरूपात घालण्यात आली आहेत. ही रचना पाहून बऱ्याच लोकांना अतिशय आश्चर्य वाटलं.

या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर लगेचच बंधूभगिनींनी ते वाचायला सुरवात केली. ऐंशी वय ओलांडलेल्या एका बहिणीनं म्हटलं: “मत्तयचं पुस्तक मी याआधीही पुष्कळदा वाचलं आहे, पण उभ्या ओळी व उपशीर्षकांमुळे डोंगरावरील प्रवचन मला आणखी चांगल्या प्रकारे समजलं.” आणखी एका बहिणीनं म्हटलं: “हे पुस्तक मी एका दमात वाचून काढलं. मला जरी आडव्या ओळींत वाचण्याची सवय असली तरी बहुतेक जपानी लोकांना उभ्या ओळींतच वाचायला आवडतं.”

खास जपानी क्षेत्रासाठी बनवलेलं पुस्तक

बायबलचं असं एकच पुस्तक वेगळं करून छापणं जपानी क्षेत्रासाठी फायद्याचं का आहे? बऱ्याच जपानी लोकांना बायबलविषयी म्हणावं तितकं माहीत नाही, पण संधी मिळाली तर ते वाचायला त्यांची मुळीच हरकत नसते. म्हणून बऱ्याच लोकांनी बायबल पाहिलं नसलं तरी आता मात्र त्याचा एक छोटा भाग वाचण्याची चांगली संधी त्यांना मिळाली आहे.

पण मग मत्तयचं पुस्तकच का निवडण्यात आलं? ‘बायबल’ म्हटलं की बहुतेक जपानी लोकांसमोर येशूचं चित्र येतं. म्हणूनच मत्तयचं पुस्तक निवडण्यात आलं. कारण या पुस्तकात, येशूची वंशावळ, त्याचा जन्म, डोंगरावरील त्याचं लोकप्रिय प्रवचन, शेवटल्या काळात होणाऱ्या रोमांचक घटनांविषयी त्यानं केलेली भविष्यवाणी यांबद्दल सांगितलं आहे. या सर्व गोष्टींबद्दल बऱ्याच जपानी लोकांना ऐकायला आवडतं.

जपानमधील प्रचारकांनी घरोघरच्या साक्षकार्यात व पुनर्भेटीच्या वेळी या पुस्तकाचा आवेशानं वापर करायला सुरवात केली आहे. एक बहीण म्हणते: “आता क्षेत्रातील बऱ्याच लोकांना मी देवाचं वचन देऊ शकते. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही खास सभा झाली, त्याच दिवशी दुपारी मी एका व्यक्तीला या पुस्तकाची एक प्रत दिली!”

लोकांचा प्रतिसाद

प्रचारक या पुस्तकाचा वापर क्षेत्रसेवेत कसा करतात? जपानमधील पुष्कळ लोकांना, “अरुंद दरवाजा,” “डुकरांपुढे मोती,” किंवा “उद्याची चिंता उद्याला” यांसारखे वाक्प्रचार चांगले ओळखीचे आहेत. (मत्त. ६:३४; ७:६, १३) पण हे शब्द येशूचे आहेत हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटतं. म्हणून हे शब्द जेव्हा ते या पुस्तकात बघतात तेव्हा बऱ्याच जणांची प्रतिक्रिया असते: “मला बायबल वाचायचंच होतं.”

हे पुस्तक ज्यांनी स्वीकारलं होतं त्यांना पुनर्भेट देताना, हे पूर्ण पुस्तक किंवा त्याचा थोडातरी भाग लगेचच वाचून काढल्याचं बऱ्याच लोकांनी सांगितलं. वयाच्या साठीत असलेल्या एका व्यक्तीनं प्रचारकाला असं म्हटलं: “मी ते पुष्कळदा वाचलंय, आणि मला खूप सांत्वन मिळालं. मला बायबलविषयी आणखी सांगा.”

सार्वजनिक साक्षकार्यातही हे पुस्तक दिलं जातं. एकदा आपल्या बहिणीनं, एका तरुण स्त्रीला हे पुस्तक व स्वतःचा ई-मेल अॅड्रेस दिला. यानंतर एका तासातच, त्या स्त्रीनं या बहिणीला ई-मेल पाठवला. त्यात तिनं पुस्तकाचा काही भाग वाचल्याचं सांगितलं आणि तिला याविषयी आणखी जाणून घ्यायचं आहे असंही तिनं सांगितलं. शिवाय याच्या एका आठवड्यानंतर, तिचा बायबल अभ्यास सुरू झाला आणि लवकरच ती सभांनाही येऊ लागली.

जपानमधील वेगवेगळ्या मंडळ्यांना या पुस्तकाच्या १६,००,००० पेक्षा जास्त प्रती पाठवण्यात आल्या. प्रचारक दर महिन्याला या पुस्तकाच्या हजारो प्रती लोकांना देत आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रकाशकांनी आपल्या भावना पुढील शब्दांत व्यक्त केल्या आहेत: “हा भाग वाचून बायबलविषयी तुमची आस्था आणखी वाढेल अशी आशा आम्ही बाळगतो.”