व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

आम्ही अधिक चांगल्या क्षेत्रात करिअर केलं

आम्ही अधिक चांगल्या क्षेत्रात करिअर केलं

ग्वेन आणि मी दोघांनीही वयाच्या पाचव्या वर्षापासूनच डान्स शिकायला सुरवात केली होती. तेव्हा आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. पुढं मी बॅले डान्सच्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आणि तिचंही तेच ध्येय होतं. आम्हाला खूप यश मिळत गेलं. पण, यशाच्या शिखरावर असतानाच आम्ही दोघांनीही ते क्षेत्र सोडून दिलं. आम्ही हा निर्णय का घेतला?

डेविड: १९४५ साली इंग्लंडच्या श्रॉपशर प्रदेशात माझा जन्म झाला. शहरापासून दूर असलेल्या या शांत ठिकाणी आमचा मळा होता. दररोज शाळेतून घरी आल्यावर मी कोंबड्यांना दाणे टाकायचो, त्यांची अंडी गोळा करायचो आणि गुराढोरांची देखभाल करायचो. शाळेला सुट्टी पडली, की मी शेतात काम करायचो आणि कधीकधी ट्रॅक्टरही चालवायचो.

पण, माझ्यात आणखी एका गोष्टीची आवड निर्माण होत होती. माझ्या वडिलांच्या हे लक्षात आलं, की संगीत कानावर पडताच माझे पाय थिरकायला लागायचे. त्यामुळं, मी पाच वर्षांचा झालो तेव्हा वडिलांच्या सांगण्यावरून आईनं मला टॅप डान्स शिकण्यासाठी जवळच्या डान्स स्कूलमध्ये घातलं. माझ्यात बॅले डान्स शिकण्याची क्षमता आहे हे ओळखून तिथल्या शिक्षकानं मला तेही शिकवलं. वयाच्या १५ व्या वर्षी मला लंडनच्या नामांकित रॉयल बॅले स्कूलमध्ये जाण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. तिथंच माझी आणि ग्वेनची भेट झाली आणि ती माझी डान्स पार्टनर बनली.

ग्वेन: १९४४ साली, गजबजलेल्या लंडन शहरात माझा जन्म झाला. लहानपणापासून माझा देवावर खूप विश्वास होता. मी बायबल वाचायचा प्रयत्न केला, पण मला ते समजत नव्हतं. वयाच्या पाचव्या वर्षापासून मी डान्स क्लासला जाऊ लागले. सहा वर्षांनंतर, मी अशा एका स्पर्धेत भाग घेतला ज्यात अख्ख्या ब्रिटनमधले स्पर्धक सहभागी झाले होते. मी ती स्पर्धा जिंकली आणि द रॉयल बॅले स्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. ही शाळा, लंडनपासून काही अंतरावर असलेल्या व्हाईट लॉज नावाच्या आलिशान इमारतीत होती. तिथं अतिशय अनुभवी शिक्षकांच्या हाताखाली मला बॅले डान्सचं प्रशिक्षण मिळालं आणि तिथंच माझं शालेय शिक्षणही पूर्ण झालं. वयाच्या सोळाव्या वर्षी, लंडनच्या द रॉयल बॅले स्कूलमध्ये मी उच्च श्रेणीतली विद्यार्थिनी बनले आणि तिथंच डेविडशी माझी गाठ पडली. काही महिन्यांतच, लंडनच्या रॉयल ऑपरा हाऊसमध्ये आम्ही जोडीनं बॅले डान्स करू लागलो.

बॅले क्षेत्रातल्या करिअरमुळं आम्ही जगातल्या मोठमोठ्या थिअटरमध्ये नृत्य सादर केलं

डेविड: ग्वेननं म्हटल्याप्रमाणे या करिअरमुळं आम्ही रॉयल ऑपरा हाऊसमध्ये आणि लंडन फेस्टिवल बॅलेमध्ये (ज्याला आज इंग्लिश नॅशनल बॅले म्हणतात) नृत्य सादर करू लागलो. रॉयल बॅलेच्या एका कोरिओग्राफरने (नृत्य दिग्दर्शकाने) जर्मनीत एक आंतरराष्ट्रीय कंपनी सुरू केली आणि प्रमुख डान्सर्स म्हणून आम्हाला निवडलं. त्या काळात, आम्ही जगभरातल्या मोठमोठ्या थिअटरमध्ये नृत्य सादर केलं. इतकंच नाही, तर अनेक जगप्रसिद्ध कलाकारांसोबतही आम्ही नृत्य केलं! अशा स्पर्धात्मक जीवनशैलीमुळं एक व्यक्ती स्वतःला खूप मोठी समजू लागते. तेच आमच्या बाबतीतही घडलं आणि आम्ही स्वतःला या करिअरसाठी वाहून घेतलं.

ग्वेन: मी माझं तन-मन सगळं काही नृत्यासाठी वाहिलं होतं. माझं आणि डेविडचं एकच स्वप्न होतं; कसंही करून प्रसिद्धीचं शिखर गाठायचं! चाहत्यांना ऑटोग्राफ देताना, पुष्पगुच्छ स्वीकारताना आणि टाळ्यांचा कडकडाट ऐकताना जणू मी हवेतच तरंगायचे. इतर कलाकारांप्रमाणे मीसुद्धा भाग्य उजळण्यासाठी शुभ वस्तू जवळ बाळगायचे. पण त्याच वेळी, या क्षेत्रात बरेच अनैतिक आणि व्यसनी लोक आहेत याचीही मला जाणीव होती.

आमचं आयुष्य पार बदलून गेलं

आमच्या लग्नाच्या दिवशी

डेविड: नृत्याच्या क्षेत्रात अनेक वर्षं काम केल्यानंतर सततच्या प्रवासाचा मला कंटाळा आला. माझं बालपण मळ्यावर गेलं होतं. त्यामुळं गावाकडच्या साध्यासुध्या जीवनाची मला ओढ लागली. म्हणून मग, १९६७ मध्ये मी नृत्याचं क्षेत्र सोडून दिलं आणि गावी गेलो. तिथं एका मोठ्या मळ्यावर मी काम करू लागलो. मळ्याच्या मालकानं मला एक छोटंसं घर राहायला दिलं होतं. मग मी ग्वेनला फोन केला आणि तिला लग्नाची मागणी घातली. पण, तोपर्यंत नृत्याच्या क्षेत्रात ती खूप पुढं गेली होती; त्यामुळं तिला एक मोठा निर्णय घ्यावा लागणार होता. गावाकडचं जीवन तिच्यासाठी अगदीच वेगळं असणार होतं. पण, तरीसुद्धा तिनं मला होकार दिला आणि माझ्यासोबत ती गावात राहायला आली.

ग्वेन: गावाकडच्या जीवनाशी जुळवून घेणं खरंच खूप कठीण होतं. ऊन असो वा पाऊस, दूध काढणं, जनावरांना चारा घालणं अशी कामं मला करावीच लागायची. ही कामं मी आयुष्यात कधीच केली नव्हती. शेतकामातल्या नवनवीन पद्धती शिकून घेण्यासाठी डेविड एका कृषी विद्यापीठात नऊ महिन्यांचा कोर्स करत होता. त्याला घरी यायला रात्रच व्हायची. त्यामुळं दिवसभर मला खूप एकटं-एकटं वाटायचं. नंतर आम्हाला एक मुलगी झाली. आम्ही तिचं नाव गिली ठेवलं. डेविडच्या सांगण्यावरून मी कार चालवायला शिकले. एकदा असंच मी जवळच्याच गावात गेले तेव्हा मला गेअल दिसली. पूर्वी आमच्या गावातल्या एका दुकानात ती काम करत असताना मी तिला भेटले होते.

लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसांत मळ्यावर

गेअलनं मला तिच्या घरी बोलवलं होतं. मी तिच्या घरी गेले तेव्हा तिने मला तिच्या लग्नाचे फोटो दाखवले. तिच्या लग्नाचा एक ग्रूप फोटो राज्य सभागृह म्हटलेल्या एका इमारतीसमोरचा होता. ‘हे कोणतं चर्च आहे?’ असं मी तिला विचारलं, तेव्हा ती म्हणाली की ती आणि तिचा पती यहोवाचे साक्षीदार आहेत. हे ऐकून मला खूप आनंद झाला कारण मला आठवलं की माझी एक आत्यासुद्धा यहोवाची साक्षीदार होती. एकदा माझे वडील तिच्यावर खूप भडकले होते आणि रागाच्या भरात त्यांनी तिची पुस्तकं कचऱ्यात टाकून दिली होती. वडिलांचा स्वभाव खरंतर खूप चांगला होता; त्यामुळं माझ्या प्रेमळ आत्याशी ते असं का वागले ते मला कधीच समजलं नव्हतं.

पण गेअलला भेटल्यानतंर, आत्याचे धार्मिक विश्वास चर्चच्या शिकवणींपेक्षा वेगळे कसे आहेत हे समजून घेण्याची संधी मला मिळाली. बायबल नेमकं काय शिकवतं ते गेअलनं मला सांगितलं. मला हे जाणून आश्चर्य वाटलं, की त्रैक्य आणि अमर आत्म्याची शिकवण बायबलवर आधारित नाही. (उप. ९:५, १०; योहा. १४:२८; १७:३) तसंच, देवाचं नाव यहोवा आहे हेसुद्धा मी बायबलमध्ये पहिल्यांदाच पाहिलं.—निर्ग. ६:३.

डेविड: ग्वेन जे काही शिकत होती ते ती मला सांगायची. लहान असताना वडील मला नेहमी म्हणायचे की मी बायबल वाचलं पाहिजे. त्यामुळं मी आणि ग्वेन आम्ही दोघांनी गेअल आणि तिचा पती डेरिक यांच्यासोबत बायबल अभ्यास करण्याचं ठरवलं. सहा महिन्यांनंतर, आम्हाला सरकारकडून भाडेपट्टीवर एक छोटासा मळा मिळाला. त्यामुळं आम्ही त्याच प्रदेशातल्या ऑझवस्ट्री या ठिकाणी राहायला गेलो. तिथं गेल्यानंतर, डीड्री नावाच्या एका यहोवाच्या साक्षीदारानं खूप धीरानं आमच्यासोबत बायबलचा अभ्यास केला. आमचा बराचसा वेळ गुराढोरांना सांभाळण्यातच जायचा. त्यामुळं सुरुवातीला प्रगती करायला वेळ लागला. पण, हळूहळू बायबलचं सत्य आमच्या हृदयात रुजू लागलं.

ग्वेन: अंधश्रद्धा सोडून देणं ही माझ्यासाठी खूप मोठी समस्या होती. जे ‘भाग्यदेवतेसाठी मेजवानी तयार करतात,’ अशांबद्दल यहोवाला काय वाटतं हे समजण्यास यशया ६५:११ या वचनानं मला मदत केली. भाग्य उजळण्यासाठी मी ज्या वस्तू ठेवल्या होत्या त्या नष्ट करायला मला बराच वेळ लागला. पण, प्रार्थनेमुळं मला ते शक्य झालं. बायबलमधून मी शिकले होते, की “जो कोणी स्वतःला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल.” यावरून यहोवाला कशा प्रकारची व्यक्ती आवडते हे मला समजलं. (मत्त. २३:१२) देवाला आपली इतकी काळजी आहे की त्यानं आपल्यासाठी त्याच्या प्रिय पुत्राचं बलिदान दिलं. अशाच देवाची मला उपासना करायची होती. पुढे आम्हाला आणखी एक मुलगी झाली. आमचं संपूर्ण कुटुंब पृथ्वीवरील नंदनवनात कायम राहू शकेल हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला.

डेविड: मत्तयचा २४ वा अध्याय आणि दानीएलचं पुस्तक यांत दिलेल्या भविष्यवाण्यांची पूर्णता कशी झाली हे मला समजलं आणि माझी खातरी पटली की हेच सत्य आहे. यहोवासोबत चांगला नातेसंबंध टिकवून ठेवणं यापेक्षा महत्त्वाचं काहीच या जगात असू शकत नाही, हे मला कळून चुकलं. त्यामुळं हळूहळू मी मोठी स्वप्नं पाहायचं सोडून दिलं. माझ्याइतकंच माझं कुटुंबही महत्त्वाचं आहे हे मला समजलं. मी फक्त स्वतःचा किंवा आणखी मोठा मळा घेण्याच्या माझ्या इच्छेचा विचार करू नये ही गोष्ट फिलिप्पैकर २:४ या वचनावरून मला पक्की पटली. यहोवाच्या सेवेला मी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे हे मला समजलं. मी सिगारेट ओढण्याचं सोडून दिलं. पण, आमची एक समस्या होती. ती म्हणजे, दर शनिवारी संध्याकाळी १० किलोमीटरचा प्रवास करून सभांना जाणं; कारण नेमकं त्याच वेळी गायींचं दूध काढावं लागायचं. पण, ग्वेनची मदत असल्यामुळं आम्ही एकही सभा चुकवली नाही; तसंच, दर रविवारी सकाळी दूध काढल्यानंतर आम्ही आमच्या मुलींना सेवाकार्यात घेऊन जायचो.

जीवनात आम्ही जे काही बदल केले ते आमच्या नातेवाइकांना मुळीच आवडले नाहीत. चक्क सहा वर्षं ग्वेनचे वडील तिच्याशी बोलले नाहीत. माझ्या आईवडिलांनीही आम्हाला यहोवाच्या साक्षीदारांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला.

ग्वेन: पण, या सगळ्या समस्यांचा सामना करण्यास यहोवानं आम्हाला मदत केली. मंडळीतल्या भाऊबहिणींच्या रूपात आम्हाला एक नवीन कुटुंब मिळालं. आमच्या सर्व संकटांत त्यांनी आम्हाला खूप आधार दिला. (लूक १८:२९, ३०) १९७२ मध्ये आम्ही यहोवाला आमचं जीवन समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला. मला जास्तीत जास्त लोकांना सत्य शिकवायची इच्छा होती; त्यामुळं मी पायनियर सेवा सुरू केली.

या करिअरमध्ये मिळालेले आशीर्वाद

डेविड: मळ्यावरचं काम खूप कष्टाचं होतं. पण, आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व देण्याच्या बाबतीत आम्ही मुलींसमोर चांगलं उदाहरण मांडण्याचा प्रयत्न केला. पुढं, सरकारकडून मिळणारी मदत बंद झाल्यामुळं आम्हाला आमचा मळा सोडून द्यावा लागला. त्या वेळी, आमची तिसरी मुलगी अवघ्या एक वर्षाची होती. डोक्यावर छत नाही, हातात नोकरी नाही अशी आमची अवस्था झाली होती. यातून मार्ग काढण्यासाठी यहोवानं मदत करावी म्हणून आम्ही त्याला प्रार्थना केली. घर चालवण्यासाठी आम्ही आमच्या कलेचा उपयोग करण्याचा विचार केला आणि एक डान्स स्टुडिओ सुरू केला. आध्यात्मिक गोष्टींना नेहमी महत्त्व देण्याच्या आमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळालं. आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होतो, की आमच्या तिन्ही मुलींचं शिक्षण संपल्यानंतर त्यांनी पायनियर सेवा सुरू केली. ग्वेनसुद्धा पायनियर असल्यामुळं सेवेत ती त्यांना मदत करू शकत होती.

आमच्या दोन मुली, गिली आणि डिनीस यांचं लग्न झाल्यानंतर आम्ही स्टुडिओ बंद केला आणि आमचा जास्त उपयोग कुठं होऊ शकतो याबद्दल शाखा कार्यालयाला विचारलं. त्यांनी आम्हाला इंग्लंडच्या दक्षिण-पूर्व भागात सेवा करायला पाठवलं. आमच्यावर आता फक्त एकाच मुलीची म्हणजे डेबीची जबाबदारी असल्यामुळं मीसुद्धा पायनियर सेवा सुरू केली. पाच वर्षांनंतर आम्हाला इंग्लडच्या उत्तर भागात असलेल्या मंडळ्यांना मदत करायला पाठवण्यात आलं. डेबीचं लग्न झाल्यानंतर आम्हाला झिंबाब्वे, मॉल्डोवा, हंगेरी आणि कोट दि वार या देशांत दहा वर्षं आंतरराष्ट्रीय बांधकाम प्रकल्पांवर काम करण्याची सुसंधी मिळाली. त्यानंतर आम्ही इंग्लंडला परतलो आणि लंडन बेथेलमध्ये बांधकामात मदत करू लागलो. मला शेतकामाचा अनुभव असल्यामुळं मी बेथेलच्या मळ्यातदेखील काम केलं. सध्या आम्ही इंग्लंडच्या उत्तर-पश्‍चिम भागात पायनियर सेवा करत आहोत.

आंतरराष्ट्रीय बांधकाम प्रकल्पांवर काम करण्यात आम्हाला वेगळाच आनंद मिळाला

ग्वेन: आम्ही आमचं सर्वस्व बॅले डान्सला वाहिलं होतं; पण त्यातून मिळणारा आनंद तात्पुरता होता. याउलट, यहोवाला वाहून घेतल्यामुळं मिळणारा आनंद कायम टिकणारा आहे. पूर्वी आम्ही जोडीनं डान्स करायचो; आज आम्ही जोडीनं पायनियर सेवा करतो. बायबलचं मौल्यवान, जीवनदायी सत्य लोकांना शिकवल्यामुळं जो आनंद मिळतो तो आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ही “शिफारसपत्रे” जगात मिळणाऱ्या प्रसिद्धीपेक्षा कितीतरी जास्त मोलाची आहेत. (२ करिंथ. ३:१, २) आम्हाला सत्य मिळालं नसतं, तर पूर्वीच्या करिअरमधल्या आमच्याकडे फक्त आठवणी आणि जुने फोटो उरले असते.

डेविड: यहोवाच्या सेवेत करिअर केल्यामुळं आमचं जीवन पार बदलून गेलं. एक पती आणि वडील या नात्यानं माझ्यात नक्कीच खूप बदल झाला आहे. बायबल म्हणते, की मिर्यामने आणि दावीद राजानेही नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला होता. आम्हीसुद्धा यहोवाच्या नवीन जगात आनंदानं नृत्य करण्याची आतुरतेनं वाट पाहत आहोत.—निर्ग. १५:२०; २ शमु. ६:१४.