व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

पूर्वी आपल्या प्रकाशनांमध्ये नमुने आणि प्रतिनमुने यांचा सहसा उल्लेख केला जायचा. पण, आता क्वचितच केला जातो. असं का?

१५ सप्टेंबर १९५० च्या टेहळणी बुरूज नियतकालिकात “नमुना” आणि “प्रतिनमुना” यांचा अर्थ सांगण्यात आला होता. त्यात म्हटलं होतं की नमुना म्हणजे अशी एखादी व्यक्ती, घटना किंवा वस्तू, जी भविष्यातील एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला चित्रित करते. आणि ज्या व्यक्तीला, घटनेला किंवा वस्तूला हा नमुना चित्रित करतो त्याला प्रतिनमुना असं म्हणतात. नमुना यासाठी छाया आणि प्रतिनमुना यासाठी वास्तविकता हे शब्ददेखील वापरले जायचे.

पूर्वी आपल्या प्रकाशनांत दबोरा, अलीहू, इफ्ताह, ईयोब, राहाब, रिबका आणि यांच्यासारखे अनेक विश्वासू स्त्री-पुरुष एकतर अभिषिक्त जनांना किंवा ‘मोठ्या लोकसमुदायाला’ सूचित करतात, असं सांगण्यात आलं होतं. (प्रकटी. ७:९) उदाहरणार्थ, इफ्ताह, ईयोब आणि रिबका हे अभिषिक्तांना चित्रित करतात, तर दबोरा व राहाब हे मोठ्या लोकसमुदायाला चित्रित करतात असं म्हणण्यात आलं होतं. पण, हल्ली आपल्या प्रकाशनांत अशी तुलना केली जात नाही. यामागचं कारण काय आहे?

नमुना

प्राचीन इस्राएलमध्ये अर्पण केला जाणारा वल्हांडणाचा कोकरा एक नमुना होता.—गण. ९:२

प्रतिनमुना

पौलानं सांगितलं की ख्रिस्त हा “आपला वल्हांडणाचा यज्ञपशू” आहे.—१ करिंथ. ५:७

हे खरं आहे, की बायबलमध्ये उल्लेख केलेल्या काही व्यक्ती भविष्यातील एखाद्या व्यक्तीला किंवा महत्त्वाच्या गोष्टीला सूचित करतात असं खुद्द बायबलमध्येच सांगण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, गलतीकर ४:२१-३१ यात प्रेषित पौलानं एका “दृष्टांतरूप” अहवालाचा उल्लेख केला आहे. या अहवालात दोन स्त्रियांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी पहिली स्त्री अब्राहामाची दासी हागार ही आहे. पौल स्पष्ट करतो की हागार ही इस्राएल राष्ट्राला सूचित करते. आणि मोशेच्या नियमशास्त्रामुळे या राष्ट्राचा यहोवासोबत एक नातेसंबंध जुळला. तसंच, दुसरी स्त्री ही एक “स्वतंत्र” स्त्री आहे, अर्थात अब्राहामाची बायको सारा. ती देवाच्या पत्नीला म्हणजे त्याच्या संघटनेच्या स्वर्गीय भागाला चित्रित करते. यासोबतच, पौलानं राजा आणि याजक असलेला मलकीसदेक आणि येशू यांच्यात असलेल्या बऱ्याच समान गोष्टींचाही उल्लेख केला. (इब्री ६:२०; ७:१-३) शिवाय, पौलानं संदेष्टा यशया आणि त्याच्या मुलांची तुलना येशू आणि अभिषिक्त ख्रिश्चनांशी केली. (इब्री २:१३, १४) खरंतर, या सर्व तुलना पौलानं यहोवाच्या प्रेरणेने केल्या होत्या. आणि यामुळेच या तुलना अचूक आहेत असा भरवसा आपण बाळगू शकतो.

पण, जेव्हा बायबल सांगते की एखादी व्यक्ती पुढे होणाऱ्या एखाद्या गोष्टीला सूचित करते तेव्हा तिच्याबद्दलची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट किंवा तिच्या जीवनात घडलेली प्रत्येक घटना भविष्यातील महत्त्वाच्या गोष्टींना सूचित करते असा अर्थ घेणं योग्य नाही. मलकीसदेकाचंच उदाहरण घ्या. पौल स्पष्ट करतो की मलकीसदेक येशूला चित्रित करतो. तरीसुद्धा, त्याच्या जीवनातील प्रत्येक घटनेचा पौलानं उल्लेख केला नाही. उदाहरणार्थ, अब्राहामानं चार राजांवर विजय प्राप्त केल्यानंतर मलकीसदेक त्याच्यासाठी भाकर आणि द्राक्षारस घेऊन आला. पण, या घटनेचा उल्लेख पौलानं केला नाही. त्यामुळे, या घटनेमागेही काहीतरी अर्थ लपलेला असावा असा विचार करण्यासाठी शास्त्रवचनांमध्ये कोणताही आधार मिळत नाही.—उत्प. १४:१, १८.

ख्रिस्ताच्या मृत्यूनंतरच्या शतकांत काही लेखकांनी खूप मोठी चूक केली. बायबलमधील प्रत्येकच अहवाल एक नमुना आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला. एका बायबल विश्वकोशात, ओरिजेन, अॅम्ब्रोस आणि जेरोम या विद्वानांच्या शिकवणींविषयी पुढीलप्रमाणे सांगण्यात आलं: “हे लेखक सतत ‘नमुने’ आणि ‘प्रतिनमुने’ यांच्या शोधात असायचे. आणि शास्त्रवचनांत उल्लेखलेल्या प्रत्येक प्रसंगात व घटनेत त्यांना ते सापडायचेही. मग, ती अगदी क्षुल्लक गोष्ट का असेना. तसंच, प्रत्येक साध्यासुध्या आणि छोट्या घटनेमागेही खोलवर अर्थ लपलेला आहे असं त्यांचं मत होतं . . . , पुनरुत्थान झाल्यानंतर येशू त्याच्या शिष्यांसमोर प्रकट झाला त्या रात्री त्यांनी जे १५३ मासे धरले होते त्यांचाही काहींनी अर्थ लावण्याचा प्रयत्न केला!”

ऑगस्टीन नावाच्या आणखी एका लेखकानं असं लिहिलं, की जवाच्या पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन येशूनं ५,००० माणसांना खाऊ घातलं याविषयीच्या अहवालामागं एक लाक्षणिक अर्थ आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पाच भाकरी बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांना सूचित करतात. आणि जव हे गव्हापेक्षा कमी दर्जाचं धान्य समजलं जात असल्यामुळे, ‘जुना करार’ हा ‘नव्या करारापेक्षा’ कमी महत्त्वाचा आहे असं त्यानं म्हटलं. तसंच दोन मासे, एका राजाला आणि याजकाला चित्रित करतात असंही त्यानं सांगितलं. आणखी एका विद्वानानं म्हटलं, की याकोबानं तांबड्या वरणाच्या बदल्यात एसावाचा जन्मसिद्ध हक्क विकत घेतला ही घटना येशूनं आपल्या रक्ताचे मोल देऊन मानवजातीसाठी स्वर्गीय आशा मिळवली या गोष्टीला सूचित करते.

वर उल्लेख केलेली स्पष्टीकरणं ओढूनताणून करण्यात आलेली आहेत असं कदाचित तुम्हाला वाटलं असेल. मग आता तुम्हाला खरी समस्या काय आहे हे लक्षात आलं का? बायबलमधील कोणता अहवाल भविष्यातील गोष्टीला सूचित करतो आणि कोणता नाही हे समजणं मानवांना शक्य नाही. तर मग सुज्ञपणा कशात आहे? एखादी व्यक्ती, घटना किंवा वस्तू भविष्यातील महत्त्वाच्या गोष्टीला सूचित करते असं जेव्हा बायबलमध्ये सांगितलेलं असतं तेव्हा साहजिकच आपण ते स्पष्टीकरण स्वीकारतो. पण, शास्त्रवचनांचा कोणताही आधार नसल्यास आपण बायबलमधील अहवालांना लाक्षणिक अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नये.

तर मग, बायबलमधील बारीकसारीक माहितीचा आणि अहवालांचा आपल्याला कसा फायदा होतो? प्रेषित पौलानं लिहिलं: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले.” (रोम. १५:४) या ठिकाणी पौल पहिल्या शतकातील अभिषिक्त ख्रिश्चनांना उद्देशून बोलत होता आणि ते बायबलच्या अहवालांतून फायदा कसा मिळवू शकतात हे तो त्यांना सांगत होता. पण, खरंतर आतापर्यंतच्या सर्व ख्रिश्चनांना मग ते अभिषिक्त असोत अथवा “दुसरी मेंढरे,” त्यांना शास्त्रवचनांतील माहितीचा फायदा झाला आहे.—योहा. १०:१६; २ तीम. ३:१.

त्यामुळे, बायबलमधील बहुतेक अहवाल फक्त अभिषिक्तांना, दुसऱ्या मेंढरांना किंवा विशिष्ट काळात होऊन गेलेल्या ख्रिश्चनांनाच लागू होत नाहीत. याउलट, बायबलमधील बहुतेक अहवालांचा देवाच्या पूर्वीच्या आणि सध्याच्या काळातील सर्वच सेवकांना फायदा झाला आहे. उदाहरणार्थ, ईयोबानं सहन केलेलं दुःख केवळ पहिल्या महायुद्धादरम्यान अभिषिक्तांच्या झालेल्या छळालाच सूचित करत नाही. कारण, देवाच्या लोकांपैकी अनेकांनी ईयोबाप्रमाणे दुःख भोगलं आहे आणि त्याच्या अहवालाचं परीक्षण केल्यामुळे त्यांना सांत्वन मिळालं आहे. यांत स्त्रियांचा, पुरुषांचा, अभिषिक्तांचा आणि दुसऱ्या मेंढरांचाही समावेश आहे. यहोवा “फार कनवाळू व दयाळू आहे” हेही त्यांना दिसून आलं आहे.—याको. ५:११.

आज आपल्या मंडळ्यांमध्येही असे अनेक भाऊ व बहिणी आहेत ज्यांनी पूर्वी होऊन गेलेल्या विश्वासू स्त्री-पुरुषांचं अनुकरण केलं आहे. उदाहरणार्थ, आपल्यामध्ये एकनिष्ठ दबोरासारख्या वृद्ध स्त्रिया आणि अलीहूसारखे समजदार तरुण ख्रिस्ती वडील आहेत. तसंच, इफ्ताहासारखा आवेश आणि धैर्य दाखवणारे पायनियरसुद्धा आहेत. शिवाय, ईयोबाप्रमाणे धीर धरणारे अनेक विश्वासू स्त्री-पुरुषदेखील आहेत. खरोखरच आज आपण यहोवाचे किती आभारी आहोत! कारण, “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी” म्हणून “पूर्वी लिहिले ते सर्व” आज यहोवानं आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे.

वर चर्चा केलेल्या कारणांमुळेच आता आपण बायबलमधील प्रत्येक अहवालाला लाक्षणिक अर्थ लावण्याचा किंवा तो अहवाल भविष्यातील एखाद्या घटनेला सूचित करत असावा, असा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत नाही. त्याऐवजी, आता आपल्या प्रकाशनांत बायबलमधील अहवालांमधून शिकायला मिळणाऱ्या व्यावहारिक गोष्टींवर जास्त भर दिला जातो.