व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तोडून टाकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटेल का?

तोडून टाकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटेल का?

लबानोनमध्ये वाढणाऱ्या गंधसरूच्या रुबाबदार वृक्षापुढे जैतुनाचं वाकडं-तिकडं, पिळवटलेलं झाड कदाचित फार देखणं दिसणार नाही. पण जैतुनाच्या झाडाचा एक आश्चर्यकारक गुणधर्म म्हणजे, अतिशय खडतर परिस्थितीतही हे झाड टिकून राहतं. काही झाडं तर जवळजवळ १,००० वर्षं जुनी आहेत. जैतुनाच्या झाडाची मुळं जमिनीखाली दूरवर पसरत जातात; आणि झाडाचं खोड जरी नष्ट झालं तरीही या झाडाला जगवलं जाऊ शकतं. झाडाची मुळं शाबूत असल्यास त्याला पुन्हा पालवी फुटण्याची आशा असते.

देवाचा विश्वासू सेवक ईयोब याला खात्री होती, की जरी त्याचा मृत्यू झाला तरी त्याला पुन्हा जीवन मिळेल. (ईयो. १४:१३-१५) आपल्याला पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य देवाजवळ आहे या गोष्टीवर असलेला विश्वास व्यक्त करण्यासाठी ईयोबानं एका झाडाचं उदाहरण दिलं. कदाचित, त्याच्या मनात जैतुनाचं झाड असावं. तो म्हणाला: “झाडाला देखील आशा असते. ते कापून टाकले तरी पुन्हा फुटते.” दुष्काळानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सुकलेल्या जैतुनाच्या झाडाचा बुंधा जणू पुन्हा जिवंत होतो आणि “एखाद्या नव्या रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात व पालवी फुटू लागते.”—ईयो. १४:७-९, सुबोधभाषांतर.

तोडून टाकलेल्या जैतुनाच्या झाडाला पुन्हा पालवी फुटण्याची शेतकरी वाट पाहत असतो. त्याचप्रमाणे, यहोवा देव त्याच्या सेवकांना आणि इतर अनेक मानवांना पुन्हा जिवंत करण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे. (मत्त. २२:३१, ३२; योहा. ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५) कल्पना करा, जेव्हा मृतजन पुन्हा जिवंत होतील आणि आपण त्यांचं स्वागत करू तेव्हा आपल्याला किती आनंद होईल!